सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

(श्रावणातला प्रत्येक  दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचा असतो.सणावाराला रेलचेल असणारा ऋतू !)

चौथा ऋतु शरद! स्वच्छ निरभ्र आकाश, रात्रीचं टिपूर चांदणं, ते पिण्यासाठी आतुर चकोर, काव्याच्या चांदण्याची बरसात,’ चांदणे शिंपीत जाशी’, ‘ टिपूर चांदणे धरती हसते’, ‘चांदण्यात फिरताना’ ! सण म्हणाल तर शारदीय नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा! कोजागिरीला (शरद किंवा आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात) चंद्राची पूजा करायची, त्याला ओवाळायचं , चंद्र हा मातृकारक म्हणून मातृत्वाचा पहिला पाझर अनुभवण्याचं सुख दिलेल्या ज्येष्ठ अपत्याला ही ओवाळायचं, चंद्राच्या सर्वात प्रखर अशा चांदण्याची गुण शक्ती दुधाद्वारे प्राशन करायची, आनंदा बरोबर कृतज्ञता ही व्यक्त करायची. कुठे थिल्लरपणा नाही,सारं वैचारिक, जाणिवांचं नेणतेपण जपणारे सण! आणखी कोणता सण? विचारू नका. वर्णन संपणारच नाही. मी वर्णन करणार पण नाही.फक्त डोळ्यासमोर पणत्यांची आरास, आकाशदिवे, फराळाची ताटं आणा आणि कल्पनेतल्या आनंदात बुडून जा.

अर्थात दिवाळी हा सण मराठी महिन्याप्रमाणे येत असल्यामुळे कधी शरदात तर कधी हेमंतात  येतो.

पाचवा ऋतू हेमंत! गार बोचरा वारा, हुडहुडी भरणारी थंडी, गोधडीच्या उबेत शिरणारी, अगदी रविवारी तर दुपारी सुध्दा गोधडी घ्यायची, झोप लागली नाही तरी गुडूप पडण्यात मजा असते, मग उठल्यावर गरम भजी लागतेच. दारोदारी शेकोटीच्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या रंगतात.मग येतो धुंधूर मास, सूर्याचा धनू राशी प्रवेश!आरोग्य शास्त्र आणि भक्ती यांचा संगम! पहाटे विष्णू पूजन ( काकडा) मग सूर्य पूजन करून, नैवेद्य दाखवून सूर्योदयाला जेवणे महत्त्वाचे!खिचडी, बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, भाज्या, गाजर हा आहार असतो. ब्राह्म मुहूर्ताला आराधना, नामस्मरण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. सूर्याचा मकर राशी प्रवेश झाला की धनुर्मास संपतो.मग संक्रांत, तिळगुळ, हळदीकुंकू, नव्या वधूचा सण, लहान बाळाचं बोरन्हाण अशा सामुदायिक सणांची रेलचेल, भाज्यांची सम्राज्ञी शाकंभरी,तिचं नवरात्र, असा हा आरोग्यदायी ऋतु!

सहावा ऋतू शिशिर! सुरवातीला हेमंतासारखा, थंडी जरा आणखी वाढवणारा! दवबिंदुंनी नटलेली सृष्टी, पण पुष्पहीन झाल्यामुळे थोडासा उदास वाटणारा! जणू हा थकलेल्या सुष्टीला निजायला सांगतो, परत नव्या उत्साहानं वसंताचं स्वागत करण्यासाठी! तरी रंगीबेरंगी पानांचा सडा, गुलमोहरा सारखं सौंदर्य मनाला मोहून टाकतंच ! पडलेल्या पानांची होळी करून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगांची उधळण करूनआनंद साजरा करायचा,कारण वसंत येणार!

ऋतूंचे वर्णन आलं म्हणजे कालिदास आठवणारच. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ ऋतुसंहार ‘,यात सगळ्या ऋतूंचे क्रमाने वर्णन आहे. त्यांची सुरवात ग्रिष्माने तर शेवट वसंताने आहे. एकतर कालिदासाच्या सर्व रचना सुखांत आहेत म्हणून असेल किंवा अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात पहिला ऋतू म्हणून ग्रीष्म आहे, त्यामुळे असेल. कालिदासाच्या या ‘ ऋतुसंहार ‘ ची अगदीच एक दोन वाक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न!

ग्रीष्म ऋतूत शीतल चंद्र हवासा वाटतो, पण गारवा मिळवण्यासाठी कारंजाचा उल्लेख कवीने केला आहे आणि एरवी एकमेकाच्या जीवावर उठणारे प्राणी सुध्दा आता एकदिलाने जलपान करताहेत, असे वर्णन आहे.

वर्षा ऋतू राजाप्रमाणे वाजत गाजत येतो, स्त्रिया पाण्याने भरलेले घडे त्याच्या पायावर घालत आहेत, शृंगारलेले हत्ती, चौघडे पुढे चालले आहेत, कमळे नसल्याने भुंगे भ्रमित झाले आहेत, त्यामुळे ते मोराच्या पिसाऱ्यावर भाळले आहेत.

शरद ऋतू मधे कोजागिरीच्या चांदण रात्री धरती आणि आकाश दोन्हीकडे समृद्धीची भरती आली आहे. तळ्यात राजहंस फिरू लागले आणि आकाशात चंद्रमा! कवीला निसर्गाकडे पाहून स्त्रीचा शृंगार दिसतो तर स्त्री च्या शृंगारात निसर्ग सापडतो.

हेमंत ऋतू चे वर्णन करताना कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे अप्रतिम शिल्प आहे, त्याचा आधार घेऊन हेमंत ऋतूतील शृंगाराचे वर्णन केले आहे.

शिशिर ऋतू फारसा न आवडणारा असावा, कारण कवी हिमालय परिसरात राहणारा असल्यामुळे हिमवर्षाव, हिमांकित थंड रात्रीचे वर्णन आहे.शेवटच्या श्लोकात संक्रांत सणाचा उल्लेख आहे.

वसंत ऋतू खूपच आवडता!

शृंगार रसाची मनापासून आवड असल्यामुळे या ऋतूचे वर्णन फार सुंदर केले आहे. मदन जणू योद्धा बनून काम युद्ध जिंकण्यास निघाला आहे असे वर्णन केले आहे. आंब्याचे झाड, त्याचा आकार, सावली, त्याचा डौल, मोहराचा धुंद करणारा गंध, कोकिळेला फुटलेला कंठ, रस रंग व गंध यांचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असणारा आंबा यांचे रसाळ वर्णन कवीने केले आहे. वसंत म्हणजे फुलांनी नटलेली झाडे, रंगांची उधळण आहे, वसंत  हा ऋतूंचा राजा त्यामुळे त्याच्या डौलाचे भरभरून वर्णन केले आहे, वसंत पौर्णिमेचा ही उल्लेख आहे.

विरोधी प्रतिमा वापरण्याची शैली, अप्रतिम कल्पना विस्तार, उपमांची खाण कवीकडे आहे, शब्द सौंदर्याच्या बाबतीत तर कालिदासांचा हात कुणीच धरू शकत नाही. कारंज्याला ते जलयंत्र संबोधतात. पक्षी, प्राणी, फुलं, झाडं यांची इतकी विविध नावं वापरली आहेत की वाचणारा संभ्रमित होतो.उदा. प्राजक्ताला शेफालिका, जाई ला मल्लिका   आणि कितीतरी! आता पुष्कळ कवींनी कालिदासाच्या काव्यांचा मराठीत भावानुवाद  केला आहे त्यामुळं आपणही त्या काव्यांचा रसास्वाद घेऊ शकतो.

असे हे ऋतुचक्र, त्यातले ऋतु एकामागून एक त्याच क्रमाने येणारे, कधीही न थांबणारे, म्हणून अविनाशी ठरलेले, आपल्याही आयुष्यात बदल घडवून आणणारे, त्यामुळे आपलं आयुष्य सुसह्य करणारे!

मंगेश पाडगावकर यांच्या दोन सुंदर ओळी आठवतात —

सहा ऋतूंचे, सहा सोहळे, बघुनी भान हरावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

– समाप्त – 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments