सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ एकांत… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆
(आनंदकंद – गागालगा लगागा । गागालगा लगागा)
एकांत हा मिळावा कोणास ना कळावा
वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा
आपापल्या मनाचा घेण्यास ठाव यावा
साकारल्या क्षणांना वेळीच वेळ द्यावा
पाणावल्या सुखांचा आवेग ओळखावा
वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा
धास्तावल्या मनाचा हातात हात घ्यावा
हातातल्या उबेचा आधार त्यास व्हावा
त्याच्यातल्या भयाचा अंधार ओसरावा
वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा
झोक्यावरी झुलावा वाऱ्यासही छळावा
हा कोणत्या जगाचा कोणास ना कळावा
माझ्यातल्या खट्याळा आनंद हा मिळावा
वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा
डोहात डोकवावे साक्षात मी दिसावे
त्याच्या तळात माझे स्वातंत्र्य मी पहावे
तो शांत डोह आता माझ्या मनी वसावा
वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा
मी सावल्या पहाव्या मोठ्या लहान व्हाव्या
त्यांच्यासवे सुखाने खेळास रंग यावा
माझ्याच या सुखाचा सूर्यास मोह व्हावा
वाटेवरी खुणांचा कोणी न माग घ्यावा
काठावरी विसावा अंती असाच घ्यावा
पाठी वळून सारा तोंडी हिशोब द्यावा
सुखावल्या क्षणांना साभार देत यावा
वाटेवरी खुणांचा ठेवा सुरेख व्हावा
© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈