मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ एक उलट एक सुलट – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ एक उलट एक सुलट – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆ 

श्वास रोखून धरत एक टाका सोडायचा –

दुसरा अलगद उचलायचा, मग चार उलट चार सुलट –

 

आई शिकवायची तेव्हा कटकट वाटायची फक्त –

कधी वीण विसविशीत, तर कधी घट्ट – 

 

ती म्हणायची….असंच असतं सुरुवातीला–

एखादा जास्तीचा सुटायचा – एखादा दाटायचाच.–..

पण मनासारख्या वीणेसाठी श्वास मात्र रोखायचा –

 

सांगायची..

टप्प्यावर धागे बदलताना जोड नकोत दिसायला –

सोडलेल्या टाक्यांचे भगदाड नको वाटायला आणि –

तेच पुन्हा ओवतांना नक्षीत हवेत शोभायला –

 

तेव्हा वाटायचं…

हिला काय आहे बोलायला !–

 

पण

आज इतक्या वर्षांनंतर सारं सारं उमगतंय–

एक मन जपताना दुसरं सुटेलसं वाटतंय–

तरी ओवून सारं एकत्र नक्षीत घ्यायला जमतंय—

 

मुलांचे चार सुलट , परिवाराचे उलट—

यजमानांचे –एक उलट दुसरा सुलट –

आणि माझे? 

गरजेनुसार कधी चार सोडायचे  – कधी सुटलेले अलगद उचलायचे—

 

हं, तसा रंग आता थोडा फिकट होतोय 

 

पण…… 

 

असो गुंता कितीही, उकल करता येतेय…. 

नक्षी असो कठीण कितीही, वीण घालता येतेय…

ह्यालाच तर जगणं म्हणतात ना…..

लेखक – अज्ञात 

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #161 ☆ गिळतोय राग आता… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 161 ?

☆ गिळतोय राग आता… ☆

नावे तिच्या फुलांची केलीय बाग आता

सुस्तावल्या कळ्यांना येईल जाग आता

 

किमया अशी कशीही झाली मला कळेना

हलतो गुलाब तैसा डुलतोय नाग आता

 

ही जात लाकडाची झाली महाग इतकी

भावात चंदनाच्या विकतोय साग आता

 

चर्चा नका करू रे खड्डे नि पावसाची

खड्डेच जीवनाचा झालेत भाग आता

 

वाहून पीक गेले पोटास काय सांगू

जर भूक लागली तर गिळतोय राग आता

 

सूर्यास दोष देऊ सांगा अता कसा मी

वर्षाच लावते रे शेतास आग आता

 

तू चंद्र निरखुनी बघ आहेच डाग तेथे

शोधू नको उगाचच माझ्यात डाग आता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझे फूल… ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

 

? कवितेचा उत्सव ?

☆ माझे फूल… ☆ श्री आशिष मुळे ☆

जगण्याच्या त्या निरर्थक कोलाहलात

फूल एक उभे गर्दीतल्या एकांतात।

देणगी त्यासी सुंदर कोमलतेची

किनार पुसट त्याला असहायतेची।

सोसे बहू संघर्षाच्या जीवनात

फरक नाहीं त्याच्या सुवासात।

असती जरी काटे स्वभावात

दडले मुळ त्यांचे अनुभवात।

येती भुंगे कोमल सहवासात

चोरूनी मधुपर्क नेती विरहात।

त्यापरी वाटे फ़ुलदाणीत शोभावे

त्यासी लागत असे खुडावे।

प्रश्न कोमल जीवास कसोटीचा

इकडे आडाचा तिकडे विहिरीचा।

मज सतावे व्यथा त्या उत्तराची

तुर्तास देतो साथ एका आश्रुची॥

© आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 103 ☆ स्वप्ने गोड असतात… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 103 ? 

☆ स्वप्ने गोड असतात… ☆

(विषय:- जगू पुन्हा बालपण…)

जगू पुन्हा बालपण,

होऊ लहान लहान

मौज मस्ती करतांना,

करू अ,आ,इ मनन.!!

 

जगू पुन्हा बालपण,

आई सोबती असेल

माया तिची अनमोल,

सर कशात नसेल..!!

 

जगू पुन्हा बालपण,

मना उधाण येईल

रात्री तारे मोजतांना,

भान-सुद्धा हरपेल..!!

 

जगू पुन्हा बालपण,

शाळा भरेल एकदा

छडी गुरुजी मारता,

रड येईल खूपदा..!!

 

जगू पुन्हा बालपण,

कैरी आंब्याची पाडूया

बोरे आंबट आंबट,

चिंचा लीलया तोडूया..!!

 

जगू पुन्हा बालपण,

नौका कागदाची बरी

सोडू पाण्यात सहज,

अंगी येई तरतरी..!!

 

जगू पुन्हा बालपण,

नसे कुणाचे बंधन

कधी अनवाणी पाय,

देव करेल रक्षण..!!

 

जगू पुन्हा बालपण,

माय पदर धरेल

ऊन लागणार नाही,

छत्र प्रेमाचे असेल..!!

 

जगू पुन्हा बालपण,

कवी राज उक्त झाला

नाही होणार हे सर्व,

भाव फक्त जागवीला..!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 34 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

५२.

तुझ्या गळ्यातला गुलाबांचा हार

मागून घ्यावा असं वाटलं पण

मागायचं धाडस झालं नाही. सकाळ झाली.

तू निघून गेलास. बिछान्यावर काही पाकळ्या

राहिल्या होत्या आणि भिकाऱ्यासारखी मी

सकाळी एखाद- दुसरी पाकळी शोधीत राहिले.

 

अरे देवा! मला काय मिळालं?

तुझ्या प्रेमाची कोणती खूण?

फूल नाही, सुगंध नाही की गुलाबदाणी नाही.

विजेच्या आघातासारखी चमचमणारी

जडशीळ अशी तुझी तलवार!

 

चिवचिवाट करून पहाटपक्षी विचारत होता,

‘ बाई गं! तुला काय मिळालं?’

‘ नाही फूल, नाही अत्तराचा सुगंध,

 नाही गुलाबदाणी.फक्त तुझी भयानक तलवार!

 

मी विचार करीत बसले ‘ ही कसली तुझी भेट!’

ती मी कुठं लपवू? मी ती पेलू शकत नाही

याची शरम वाटते. कारण मी इतकी नाजूक!

मी ती पोटाशी धरते तेव्हा ती मला खुपते.

तरीसुद्धा तू दिलेल्या दु:खाच्या ओझ्याचा हा मान,

तुझी भेटवस्तू मी ऱ्हदयाशी धरते.

 

या जगात मला कसलीच भीती आता नाही.

माझ्या लढाईत तुझाच विजय होत राहील.

 

तू माझ्या सोबत्यासाठी मरण ठेवलंस.

मी त्याला आयुष्याचा शिरपेच चढवीन.

मला बंधनातून मोकळं करायला

तुझी ही तलवार आहे.

मला या जगात आता कशाचीच भीती नाही.

 

माझ्या ऱ्हदयस्वामी! क्षुद्र साजशृंगार मी

व्यर्ज केले आहेत.

आता कोपऱ्यात बसून मी रडणार नाही;

अवनत होणार नाही, उन्नत होईन व राहीन.

 

या तलवारीचा अलंकार तू मला बहाल केलास.

बाहुल्यांचा खेळ आता कशाला?

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खरं सांग ना… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ खरं सांग ना🍃 सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

अरे माझिया मना

 तू खरं सांग ना

गुंतलासी असा कुठे

कानी बोल ना

 

स्पर्श तो धुंद अधिर

चांदणेही भावमधुर

शब्दाविना संवादची

नी अंतरात झंकार

 

काय असे जाहले

अंगांगची मोहरले

भेटीची ओढ मनी

क्षण क्षण गंधाळले

 

 दुर्मिळसा  भाग्याने

क्षण असा लाभतो

स्वप्नातील वाटेने

चांदण्यात नेतो

 

भारलेल्या क्षणाने

वेड असे लावले

फिरूनी त्या वाटेवरी         

ओढाळ मन थांबले

 

 परिस स्पर्श लाभला

अंगांगी सुवर्ण झळा

 मोरपिशी स्पर्शाचा

लागतो कसा लळा

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 125 – भाकरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 125 – भाकरी ☆

दिसरात राबतिया

माझी माय ही बावरी।

तरी तिला मिळेना हो

चार घास ती भाकरी।।

 

बाप ठेऊनिया गेला

उभा कर्जाचा डोंगर।

उभी हयात राबून

गळा फासाचा हो दोर।

 

मार्ग सारेच खुंटले

भर दिसा अंधारले।

दोन्ही पिलांना पाहून

बळ अंगी संचारले ।

 

शेण पाणी झाडलोट

धुणी भांडी ही घासते।

अधाशीही मालकीण

पाने तोंडाला पुसते।

 

हाता तोंडाचं भांडण

काही सरता सरेना।

किती राबते तरीही

पोट सार्‍यांची भरेना

 

कशी शिकवावी लेक

कसे करावे संस्कार ।

निराधार योजनेला

घूस खोरीचा आधार।

 

कथा दारिद्रय रेषेची

असे फारच आगळी।

लाभार्थीच्या यादीला हो

दिसे दिग्गज मंडळी।

 

माय म्हणे बापा बरी

अर्धी कष्टाची भाकरी।

लाचारीच्या जिण्यापरी

लाख मोलाची चाकरी

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #147 ☆ भिजून गेली वाणी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 147 – विजय साहित्य ?

☆ भिजून गेली वाणी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

गोंदवल्याच्य सहलिची ही सांगू काय कहाणी

कृतज्ञतेच्या शब्दांनी ही भिजून गेली वाणी.

राजे वदले कवी वृंदाला जाऊ तीर्थ स्थाना

त्यांच्या हाके सवे डोलल्या कित्येकांच्या माना

सुखकर्ता च्या आशीर्वादे बघ दाटून आले पाणी. १

सारी वदली बघत एकटक दूर दूर जाताना

गड जेजुरी,आई यमाई , चैतन्याचा वारा

मग साऱ्यांनी रंगत आणली, सजली सहल दिवाणी. २

सचिन सारथी, सुसुत्र यंत्रणा नाते एक जुळावे

कलेकलेने सहल यात्रीने, कला विश्व फुलवावे

चेष्टा,गंमत आणि मस्करी, स्वामी कृपेची गाणी. ३

धन्य जाहलो आम्ही सारे, गोंदवले बघताना

राम सावळा, परब्रह्म ते, नेत्री या सत्तांना

आबालवृद्धां आनंद दायी, शतायुषी स्वर वाणी. ४

मिळे अनुभूती, झाले दर्शन, यमाईस बघताना

भक्ती शक्ती चा ह्रृद्य सोहळा,सहल अशी खुलताना

अंतरधामी ठसून बसली, प्रासादिक ही वाणी. ५

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ ( वायु, इंद्र, मित्रावरुण सूक्त ) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २ ( वायु, इंद्र, मित्रावरुण सूक्त ) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र

देवता – १ ते ३ वायु; ४ ते ६ इंद्रवायु; ७ ते ९ मित्रावरुण 

मराठी भावानुवादित गीत : डॉ. निशिकांत श्रोत्री

वाय॒वा या॑हि दर्शते॒मे सोमा॒ अरं॑कृताः । तेषां॑ पाहि श्रु॒धी हव॑म् ॥ १ ॥

सर्व जना आल्हाद देतसे हे वायू देवा

येई झडकरी तुझे आगमन होऊ दे देवा

सिद्ध करुनिया सोमरसा या उत्तम ठेविले

ऐक प्रार्थना अमुची आता दर्शन तव होऊ दे ||१||

वाय॑ उ॒क्थेभि॑र्जरन्ते॒ त्वामच्छा॑ जरि॒तारः॑ । सु॒तसो॑मा अह॒र्विदः॑ ॥ २ ॥

यागकाल जे उत्तम जाणत स्तोत्रांचे कर्ते 

वायूदेवा तुझियासाठी सिद्ध सोमरस करिते

मधुर स्वरांनी सुंदर स्तोत्रे महती तुझी गाती

सत्वर येई वायूदेवा भक्त तुला स्तविती ||२||

वायो॒ तव॑ प्रपृञ्च॒ती धेना॑ जिगाति दा॒शुषे॑ । उ॒रू॒ची सोम॑पीतये ॥ ३ ॥

विश्वामध्ये शब्द तुझा संचार करित मुक्त

श्रवण तयाचे करिता सिद्ध सर्व कामना होत 

सोमरसाचे पान करावे तुझी असे कामना 

तव भक्तांना कथन करूनी तुझीच रे अर्चना ||३||

इन्द्र॑वायू इ॒मे सु॒ता उप॒ प्रयो॑भि॒रा ग॑तम् । इन्द॑वो वामु॒शन्ति॒ हि ॥ ४ ॥

सिद्ध करुनिया सोमरसाला तुम्हासि आवाहन

इंद्रवायु हो आता यावे करावाया हवन

सोमरसही आतूर जाहले प्राशुनिया घ्याया

आर्त जाहलो आम्ही भक्त प्रसाद या घ्याया ||४||

वाय॒विन्द्र॑श्च चेतथः सु॒तानां॑ वाजिनीवसू । तावा या॑त॒मुप॑ द्र॒वत् ॥ ५ ॥

वायूदेवा वेग तुझा हे तुझेच सामर्थ्य

बलशाली वैभव देवेंद्राचे तर सामर्थ्य

तुम्ही उभयता त्वरा करावी उपस्थित व्हा अता 

सोमरसाची रुची सर्वथा तुम्ही हो जाणता ||५||

वाय॒विन्द्र॑श्च सुन्व॒त आ या॑त॒मुप॑ निष्कृ॒तम् । म॒क्ष्वै॒त्था धि॒या न॑रा ॥ ६ ॥

अनुपम आहे बलसामर्थ्य इंद्रवायुच्या ठायी

तुम्हासि प्रिय या सोमरसाला सिद्ध तुम्हापायी

भक्तीने दिव्यत्व लाभले सुमधुर सोमरसाला

सत्वर यावे प्राशन करण्या पावन सोमरसाला ||६||

मि॒त्रं हु॑वे पू॒तद॑क्षं॒ वरु॑णं च रि॒शाद॑सम् । धियं॑ घृ॒ताचीं॒ साध॑न्ता ॥ ७ ॥

वरद लाभला समर्थ मित्राचा शुभ कार्याला 

वरुणदेव हा सिद्ध राहतो अधमा निर्दायला

हे दोघेही वर्षा सिंचुन भिजवित धरित्रीला

भक्तीपूर्वक आवाहन हे सूर्य-वरुणाला ||७||

ऋ॒तेन॑ मित्रावरुणावृतावृधावृतस्पृशा । क्रतुं॑ बृ॒हन्त॑माशाथे ॥ ८ ॥

विश्वाचा समतोल राखती वरूण नी सूर्य 

पालन करुनी पूजन करती तेही नियम धर्म

धर्माने नीतीने विभुषित त्यांचे सामर्थ्य 

आवाहन सन्मानाने संपन्न करावे कार्य ||८||

क॒वी नो॑ मि॒त्रावरु॑णा तुविजा॒ता उ॑रु॒क्षया॑ । दक्षं॑ दधाते अ॒पस॑म् ॥ ९ ॥

सर्वउपकारी सर्वव्यापी मित्र-वरूणाची

अपूर्व बुद्धी संपदा असे जनकल्याणाची

व्यक्त होत सामर्थ्य तयांचे कृतिरूपातून

फलश्रुती आम्हासी लाभो हे द्यावे दान ||९||

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

या सूक्ताचा शशांक दिवेकर यांनी गायलेला आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी चित्रांकन केलेला व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहे. त्यासाठी लिंक देत आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.  

https://youtu.be/1ttGC6lQ16I

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 2 Indra Vayu Mita Varun Sukt

Rugved Mandal 1 Sukta 2 Indra Vayu Mita Varun Sukt

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंगण! ☆ श्री मुबारक उमराणी ☆

श्री मुबारक उमराणी

? कवितेचा उत्सव ?

☆ अंगण!… ☆ श्री मुबारक उमराणी ☆

माझ्या अंगणाला

मेंदीचं कुंपण

माझी आई घालते

मायेचं शिंपण

 

अंगणात फुलते

मेंदीसंग तुळस

दारातूनच सर्वा दिसतं

विठुरायाचं कळस

 

सोनचाफा पिवळा

देई सुगंध

कपाळाला लावतो

भक्तभावाचा गंध

 

सांयकाळी बाबासंगे

म्हणतो रामरक्षा

ताई माझी सदा करे

माझी सुरक्षा

 

चिमणपाखराची येथे

सदा वर्दळ

कोप-यात फुलते

पिवळी, लाल कर्दळ

 

जाई जुई मोगरा, शेवंती

सदा फुलते

आईबाबासंगे माझ

बालमन झुलते

 

खारुताई उड्या मारी

माझ्यासह अंगणात

रोज नवे गाणे फुले

माझ्या मनात

 

मनीमाऊ पिल्यासंगे

येथे खेळते

ओवी गात माझी आई

दळण दळते

 

दारातच राखण करी

मोत्या माझा मित्र

दुरूनच शोभे माझ्या

अंगणाचे चित्र

 

कोप-यात फणस उभा

लेकराबाळासवे

आंबा चाखण्यासाठी

येती पक्ष्यांचे थवे

 

माझा मैतरं सांगतो

अंगण खूप सुंदर

अंध मी मनस्पर्शाने

अंगण समिंदर

 

खेळ दैवाचा असे

असा न्यारा

माझे अंगणच जग

असे मला प्यारा

 

© श्री मुबारक उमराणी

राजर्षी शाहू काॅलनी, शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares