मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ असं कुठं असतं का देवा? ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ असं कुठं असतं का देवा? ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर

जन्म दिलास माणसाचा

हाच एक जन्म जिथून

मार्ग खुला मोक्षाचा

दिलंस एक मन त्यात

अनेक विचारांचा वावर

आणि म्हणतोस आता

या विचारांना आवर 

दिलेस दोन डोळे

सौंदर्य सृष्टीचे बघायला

आता म्हणतोस मिटून घे

आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला 

नानाविध चवी घेण्यास

दिलीस एक रसना

आणि आता म्हणतोस

अन्नावर ठेवू नकोस वासना 

जन्मापासून नात्यांच्या

बंधनात अडकवतोस

बंध सगळे खोटे असतात

असं आता म्हणतोस

भाव आणि भावनांचा

इतका वाढवतोस गुंता

आणि मग सांगतोस

व्यर्थ आहे ही चिंता

संसाराच्या रगाड्यात

पुरता अडकवून टाकतोस

म्हणे शांतपणे ध्यान कर आता

अशी कशी रे मजा करतोस??

मेजवानीने भरलेले ताट 

समोर बघून उपास करायचा

हाच अर्थ का रे

सांग बरं मोक्षाचा?

वर बसून छान पैकी

आमची बघ हो तू मजा

पाप आणि पुण्याची 

मांड बेरीज आणि वजा

माहीत नाही बाबा मला

मिळेल की नाही मोक्ष

तू जवळ असल्याची फक्त

पटवून देत जा साक्ष ……

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी आणि माझी ती ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

💃 मी आणि माझी ती ! 🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

शल्य मनाचे तिजवीण

जाणले कधी ना कोणी,

असे मज प्राणाहून प्रिय

माझीच बघा लेखणी !

 

जे जे उतरे तिच्यातून

असे माझ्या मनीचे गूज,

भावले न जरी ते कोणा

देई समाधानाची गाज !

 

भले बुरे कळता मत

तिचे मन सुखावते,

नाही कळलेच काही

ती दुःखी कष्टी होते !

 

कानी लागून ती मग

मी संप करीन म्हणते,

हवी कशास ही उठाठेव

मज उगाच धमकावते !

 

होतो बापुडा शरणागत

समजूत तिची काढतो,

सुचता मग नवीन विषय

पुन्हा हाती तिज धरतो !

© श्री प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #163 ☆ बीज प्रीतीचं… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 163 ?

☆ बीज प्रीतीचं… ☆
वर्षाराणीच्या ध्यासानं बीज प्रीतीचं पेरलं

तिच्या भेटीत बियाणं होतं छानसं रुजलं

 

कोंब आले तरारुन होती माती खूष झाली

हिरव्याच्या सोबतीनं गालामध्ये ती हासली

दडी मारता पाऊस कोंब पुन्हा ते झोपलं

 

प्रीत चार दिवसांची होती मनात ठसली

वर्षाराणी पुन्हा कशी माझ्यावरती रुसली

भेगाळल्या जमिनीचं पुन्हा काळीज फाटलं

 

दुबार ह्या पेरणीला मन धजावत नाही

किती नांगरू भुईला नाही उमगत काही

पावसाशी नातं होतं कसं त्यानं ते तोडलं

 

नाद शेतीचा सोडला सोडलं मी गणगोत

भक्ती रसात भिजलो ईश्वराच्या नामी रत

सोडुनीया सर्व काही वस्त्र भगवं नेसलं

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री ललिता पञ्चरत्नम् स्तोत्रम् – (मूळ रचना : आदी शंकराचार्य) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री ललिता पञ्चरत्नम् स्तोत्रम् – (मूळ रचना : आदी शंकराचार्य) — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्रातः स्मरामि ललितावदनारविन्दं

विम्बाधरं पृथुलमौक्तिकशोभिनासम् ।

आकर्णदीर्घनयनं मणिकुण्डलाढ्यं

मन्दस्मितं मृगमदोज्ज्वलभालदेशम् ॥१॥

 

प्रातर्भजामि ललिताभुजकल्पवल्लीं

रक्ताङ्गुलीयलसदङ्गुलिपल्लवाढ्याम् ।

माणिक्यहेमवलयाङ्गदशोभमानां

पुण्ड्रेक्षुचापकुसुमेषुसृणिदधानाम् ॥२॥

 

प्रातर्नमामि ललिताचरणारविन्दं

भक्तेष्टदाननिरतं भवसिन्धुपोतम् ।

पद्मासनादिसुरनायकपूजनीयं

पद्माङ्कुशध्वजसुदर्शनलाञ्छनाढ्यम् ॥३॥

 

प्रातः स्तुवे परशिवां ललितां भवानीं

त्रय्यन्तवेद्यविभवां करुणानवद्याम् ।

विश्वस्य सृष्टिविलयस्थितिहेतुभूतां

विद्येश्वरीं निगमवाङ्मनसातिदूराम् ॥४॥

 

प्रातर्वदामि ललिते तव पुण्यनाम

कामेश्वरीति कमलेति महेश्वरीति ।

श्रीशाम्भवीति जगतां जननी परेति

वाग्देवतेति वचसा त्रिपुरेश्वरीति ॥५॥

 

यः श्लोकपञ्चकमिदं ललिताम्बिकायाः

सौभाग्यदं सुललितं पठति प्रभाते ।

तस्मै ददाति ललिता झटति प्रसन्ना

विद्यां श्रियं विमलसौख्यमनन्तकीर्तिम् ॥६॥

||इति श्री आदि शंकराचार्य विरचित ललिता पञ्चरत्न स्तोत्र संपूर्णम् ||

 

ललिता पञ्चरत्न स्तोत्र— मराठी भावानुवाद — डॉ. निशिकांत श्रोत्री

स्मरीतो प्रभाते पद्मवदनी ललीता 

बिंबस्वरूप अधरोष्ठ नथ मौक्तिका 

आकर्णनेत्र विशाल रत्नखचित बाळी 

हास्य मंद विलसे कस्तुरीगंध भाळी ||१||

 

भजीतो प्रभाते कल्पवल्ली ललीता

पल्लवस्वरूप अंगुली शोभिते ती रत्ना

माणिकहेम कंकण शोभा दे बाहुंना

इक्षुचाप पद्मांकुश पुष्पशर हाती  ||२||

 

नमीतो प्रभाते कमलपाद ललीता

भवसिंधुहारिणी भक्तकामाक्षीपूर्ता

पद्मासनी सूरनायक पूजिताती

पद्म ध्वज सुदर्शनांकुश जिया हाती ||३||

 

स्तवीतो प्रभाते पावन ललिता भवानी

वैभवी करुणा विमला वेदांत ज्ञानी

विश्वस्थितीसृष्टी असे विलयाकारिणी 

निगमवैखरीपरा श्रीविद्येश्वरीणी ||४||

 

वदीतो प्रभाते ललिते तव पुण्यनाम

कामेश्वरी कमला महेश्वरी असती नाम

श्रीशाम्भावी जगद्जननी तू सर्वापरेति

त्रिपुरेश्वरी असशी वाचा वाणीदेवी ||५||

 

पठीतो प्रभाते जो ललितापञ्चकाते

सौभाग्य प्राप्त झणी त्या हो भाग्यवंते

त्यासी प्रसन्न होय माता क्षणार्धे ललीता

विद्या श्री विमलसौख्य हो कीर्तीस प्राप्ता ||६||

||इति श्री आदि शंकराचार्य विरचित निशिकांत भावानुवादित ललिता पञ्चरत्न स्तोत्र संपूर्ण||

मूळ संस्कृत रचना :: आदी शंकराचार्य

भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री 

९८९०११७७५४

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ. अंजली दिलीप गोखले

? वाचताना वेचलेले ?

☆ समर्थ लिखीत शिवकालीन पर्जन्य… ☆ संग्रहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆

बळे धुंधार सुटला वारा !

थोर प्रजन्य मोकळी धारा !

फडफडा पडती गारा रे !

हिंव वाजते थरार रे !! धृ !!

 

मेघ वोळले अंबरी !

विजु झमके तदनंतरी !

गर्जताहे नानापरी रे !

घरे उडती वरिच्या वरी रे !! १ !!

 

घडी मध्ये चि पाण जंजाळ !

पूर लोटले पाभळ !

नदि फुफाती चळचळ रे !

जाऊ नेदीति ओहळ रे !! २ !!

 

कडे कोसळती पर्वती !

जळे उदंड पडिल्या भिंती !

थंडवारे घरे गळती रे !

भूमीवर त्या पाझरती रे !! ३ !!

 

ऐसा प्रजन्य मांडला थोर !

गुरे निघेतना बाहेर !

केव्हा दिसेल देव दिनकर !

लोक बहुत जाले जेर रे !! ४ !!

 

जळे उदंडचि लोटली !

नदीतीरे पीके वाहवली !

ठांई ठांई किती बुडाली रे !

गुरे माणसे पुरे नेली रे !! ५ !!

 

माळवदे किती पडली !

पेवामध्ये पाण्ये भरली !

मोठी मोठी झाडे उन्मळली रे !

पिके अवघी पिंगटली रे !! ६ !!

 

ऐसा प्रजन्य मांडला फार !

खवळला नेणो जळधर !

तळी उचंबळली थोर थोर रे !

जेथे निघती पाझर रे !! ७ !!

 

कधी दिसतील उष्ण कीर्णे !

केव्हा उठेल मेघ धरणे !

जीवा होयील सुख पारणे रे !

रवि थोर तो याचकारणे रे !! ८ !!

 

रवि कीर्णीचा पाऊस !

लोक पावती संतोष !

रवि वेगळे कासावीस रे !

धन्य आमुचा सूर्यवंश रे !! ९ !!

 

— समर्थ रामदास स्वामी

 

संग्राहिका : अंजली दिलीप गोखले 

मो ८४८२९३९०११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नियमांस सक्त येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ नियमांस सक्त येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : आनंदकंद – गागाल गालगागा गागाल गालगागा)

नियमांस सक्त येथे अपवाद फार होते

दाते भिकार काही याचक उदार होते !

 

कळपात होयबांच्या शिरलो कधीच नाही

मानी बुलंद माझे काही नकार होते !

 

तपसाधना युगांची नाही फळास आली

होण्यास संधिसाधू…साधू तयार होते !

 

संग्राम घोर होता…संताविरुद्ध संत

श्वासात रोखलेले काही थरार होते !

 

सरला वसंत आता अधिराज्य पावसाचे

जलशात बेडके पण कोकिळ फरार होते !

 

झाले मरण सुगंधी अंतिम तुझाच घाव

किरकोळ बेहिशेबी बाकी प्रहार होते !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 104 ☆ माझ्या आईचे गुणवर्णन… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 104 ? 

☆ माझ्या आईचे गुणवर्णन..… ☆

माझ्या आईचे गुणवर्णन

मी कसे ते करावे

शब्दात कसे तोलावे.. ०१

माझ्या आईचे गुणवर्णन

शब्दातीत आहे आई

बहुगुणी प्रेमळ माई..०२

माझ्या आईचे गुणवर्णन

असह्य वेदना तिला झाल्या

न मी पहिल्या, न अनुभवल्या..०३

माझ्या आईचे गुणवर्णन

आई प्रेमाचा निर्झर

आई सौख्याचा सागर..०४

माझ्या आईचे गुणवर्णन

कोणते कोणते दाखले द्यावे 

ऋणातून कैसे मुक्त व्हावे..०५

माझ्या आईचे गुणवर्णन

पवित्र तुळस अंगणातली

मंदिरात समई तेवली..०६

माझ्या आईचे गुणवर्णन

मजला न करवे आता

देवा नंतर, तीच खरी माता ..०७

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 35 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

 ५३.

अगणित रंगाच्या रत्नांनी कौशल्यानं घडलेलं,

नक्षत्रांनी जडवलेलं हे कंगन सुरेख आहे.

 

पण भगवान विष्णूंच्या गरुडाच्या आरक्त सूर्यप्रकाशात पूर्णपणे तळपणाऱ्या पंखांच्या

विजेच्या आकाराची ही तू दिलेली तलवार

अधिक सुंदर आहे.

 

मृत्यूचा अखेरचा घाव बसल्यानंतरच्या दु:खाची

अखेरची धडपड व्हावी तशी ती चमचम करते.

एकाच भीषण आघातानं जाणीव होतानाच्या

शुध्द ज्वालेप्रमाणं ती तळपत राहते.

 

तू दिलेलं कंगन सुरेख आहे.

त्यावरील नक्षत्रासारखे मोती छान आहेत.

पण तू दिलेली तलवार हे स्वामी, किती सुंदर बनवली आहे!

ती पाहताना तिचा विचार मनात आला तरी भीती वाटते.

 

५४.

तुझ्याकडं मी काहीच मागितलं नाही की

माझं नावही तुला सांगितलं नाही.

तू परतून गेलास तेव्हा मी स्तब्ध राहिलो.

झाडांच्या सावल्या

वेड्यावाकड्या पसरलेल्या होत्या.

आपल्या तांबड्या घागरी काठोकाठ भरून

बायका गावाकडे परतत असताना

त्या मला पालवीत होत्या.

“घराकडे चल. सकाळ संपून दुपार होत आलीय.”

पण. . .

एकटाच विहिरीच्या आसपास भटकत राहिलो.

धूसर चिंतनात मी हरवून गेलो.

 

तू माझ्याकडे येत असताना

तुझ्या पावलांचा आवाज मला ऐकू आला नाही.

दु:खभरल्या नजरेनं माझ्याकडे पाहून

दमलेल्या आवाजात म्हणालास,

“अरे! मी तहानलेला प्रवासी आहे.”

मी माझ्या दिवास्वप्नातून जागा झालो आणि

तुझ्या जुळलेल्या ओंजळीत पाण्याची धार धरली.

 

माझ्या माथ्यावरची पानं सळसळली.

दूरच्या काळोखात कोकीळ गाऊ लागला.

रस्त्यावरच्या वळणावरून ‘बाबला’ फुलांचा वास

दरवळला.

तू माझं नाव विचारलंस तेव्हा

शरमेनं मी उगी राहिलो.

माझं नाव लक्षात ठेवण्यासारखं

मी तुझ्यासाठी काय केलंय?

तुझ्या तहानवेळी मी तुला पाणी देऊ शकलो

याची जाण मी मनात जपून ठेवीन आणि

तिची गोडी माझ्या ऱ्हदयात फुलत ठेवीन.

 

सकाळ संपली, पक्षी उंच स्वरात गाताहेत.

निंबाच्या झाडावरची पानं सळसळताहेत आणि

मी विचार करतो आहे…

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

संध्याकाळी

आयुष्याच्या गडद सावल्या लांबत गेल्या संध्याकाळी

आठवणींच्या तळ्यात सगळ्या मिसळत गेल्या संध्याकाळी

 

स्वप्नामधल्या ठोस प्रतिमा आदर्शाच्या मनात होत्या

काळासोबत फिरता फिरता वितळत गेल्या संध्याकाळी

 

सहजपणाने जगतानाही संघर्षाला भिडणे झाले

चालत असता अवघड वाटा चकवत गेल्या संध्याकाळी

 

अनंतकोटी ब्रम्हांडाची ओळख पुरती झाली नाही

जगण्यामधल्या मोहक बाबी फसवत गेल्या संध्याकाळी

 

अंधारातच अंदाजाने दिशा शोधल्या मानवतेच्या

मग प्रेमाच्या प्रकाश रेषा उजळत गेल्या संध्याकाळी

 

संसाराचा खेळ मांडला तो तर होता प्रभावशाली

प्रतिमा त्याच्या डोळ्यादेखत सरकत गेल्या संध्याकाळी

 

सुखदुःखाची करत बोळवण तडजोडीच्या घटना घडल्या

झंजावाती वादळात त्या उधळत गेल्या संध्याकाळी

 

खरे काय ते अखेर कळले अनुभवले ते मृगजळ होते

लोचनातल्या आसवधारा बरसत गेल्या संध्याकाळी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

सुश्री नीलिमा खरे

अल्प परिचय 

बॅंकेतून रिटायर झाल्यावर काही वर्षे एका खाजगी कंपनीत काम केले.

कामाच्या व्यस्ततेमुळे मागे पडलेली वाचनाची आवड परत सुरू केली. कविता लेखनाची सुरुवात झाली. कवितेचे रसग्रहण हा प्रांत ही आवडू लागला आहे.

? काव्यानंद ?

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण – सुश्री नीलिमा खरे ☆

डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांच्या निशिगंध या काव्यसंग्रहात कवीने प्रेम विषयक विविध भाव वेगवेगळ्या कवितांतून वाचकांसमोर उलगडले आहेत. उदात्त ,शाश्वत ,समर्पित प्रेम तर कधी विरहाग्नीत होरपळणारे तनमन ,प्रतारणेतून अनुभवाला येणारे दुःख ,कधी प्रेमाच्या अतूटपणाबद्दल असलेला गाढ विश्वास आणि त्या विश्वासातून एकमेकांकडे मागितलेले वचन अशा विविध प्रेमभावना अत्यंत तरल पणे व तितक्याच बारकाव्याने आणि समर्थपणे काव्य रसिकांसमोर प्रस्तुत केल्या आहेत. या संग्रहातील वचन देई मला ही कविता अशीच प्रेमात गुंतलेल्या, रमलेल्या, प्रेमावर विश्वास असलेल्या प्रियकराचे भावविश्व आपल्यासमोर साकारते.

साधारणतः प्रियकर प्रेयसीला विसरतो अशी मनोधारणा असते.या कवितेचे वैशिष्ट्य असे की येथे प्रेयसी विसरेल अशी शंका प्रियकराच्या मनात आहे.रुढ मनोभावनेला छेद देणारी ही कविता लक्षवेधी ठरते.

कवितेतील प्रेयसी जर  कवितेतील प्रियकराला विसरली तर त्याच्या स्मृतीत तिने एक तरी अश्रू ढाळावा एवढी माफक अपेक्षा करणारा प्रियकर कवीने काव्य रसिकांसमोर शब्दांतून उभा केला आहे .

☆ वचन देई मला… डॉ निशिकांत श्रोत्री ☆

 विसरलीस जर कधी जीवनी एक वचन तू देइ मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।ध्रु।।

 

प्रीत तरल ना देहवासना ही आत्म्याची साद तुला

एकरूप मी तव  हृदयाशी क्षण न साहवे द्वैत मला

पवित्र असता प्रेम चिरंतन विसरणार मी कसे तुला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।१।।

 

जगायचे ते तुला आठवत मरणही यावे तुज साठी

कधी न सुटाव्या शाश्वत अपुल्या प्रेमाच्या रेशिमगाठी

मृत्यूनंतर येउ परतुनि प्रेमपूर्तीची आंस मला

कधी झाकलो स्मृतीत तुझिया अश्रू एक तू ढाळ भला ।।२।।

 डॉ निशिकांत श्रोत्री

निशिगंध – रसग्रहण

प्रेम विश्वात रममाण असणाऱ्या प्रियकराच्या मनात उगीच शंका येते आणि तो प्रेयसीला म्हणतो की जर कधी जीवनात तू मला विसरलीस तरी एक वचन मात्र तू मला दे .ती विसरणार नाही याची खात्री विसरलीस जर या शब्दातून व्यक्त होते. तसेच पुढे तो म्हणतो की तू विसरलीस आणि जर कधी मी तुझ्या स्मृतीत डोकावलो म्हणजे त्याचा आठव जरी तिच्या मनात आला तर एक अश्रू मात्र तू ढाळ. भला हा शब्द अश्रूशी  निगडीत करताना तिच्या मनात त्याच्याविषयी कुठलाही गैरभाव ,गैरसमज नसावा हे सूचित केले आहे. विरह किंवा वियोग जर का झाला तर तो केवळ परिस्थितीमुळे होईल त्याच्या वर्तनाने नाही असा विश्वास या कवितेतून आपल्यासमोर व्यक्त केला गेला आहे .विसरली तरी प्रेयसी कडून वचन मागणारा, कधी तरी तिच्या स्मृतीत डोकावण्याची ,झाकण्याची मनोमन खात्री बाळगणारा हा प्रियकर मनाला मोहवून जातो.

ध्रुवपदामध्ये विसरलीस जर कधी ,तरी एक वचन दे, हा विरोधाभास मनाला भावतो.तसेच अश्रूला भला हे अत्यंत वेगळे विशेषण वापरले आहे.प्रियकराच्या सात्विक प्रेमाची साक्ष पटवणारा हा समर्पक शब्द कवितेतील आशयाला पुष्टी देतो.

 पहिल्या कडव्यात तो म्हणतो माझी प्रीत ही तरल निष्कलंक आहे .त्या भावनेत देहवासना,कामवासना नाही. तर ही आत्म्याची आत्म्याला साद आहे .तो खात्रीपूर्वक म्हणतो की तो तिच्या हृदयाशी एकरूप झाला आहे. ही समरसता, हे तादात्म्य आहे ते मनोमन झालेले आहे. त्यात अंतर नाही. त्यातले बंधन अनाठायी नाही.त्यामुळे कुठलेही ,कसलेही द्वैत अगदी क्षणा पुरते ही त्याला सहन होणार नाही.त्यांच्यातले प्रेम हे पवित्र तसेच चिरंतन आहे याची ग्वाही त्याच्या मनाला आहे त्यामुळे तो तिला कधीच विसरणार नाही हे ही तो स्पष्ट करतो. आणि असे असूनही जर कधी ती विसरली तर तो तिच्याकडून एकच वचन मागतो त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक भला अश्रू तिने ढाळावा.

देह व आत्मा यांचा उल्लेख प्रीतिला आध्यात्मिक उंची देतो.द्वैत व अद्वैत यांचा सुस्पष्ट व सुसंस्कृत विचार प्रेमाचा अर्थपूर्ण आविष्कार घडवतो.जे पवित्र ते चिरंतन हा साक्षात्कार प्रीतीच्या भावनेला पटणारा. एकरूप व द्वैत या विरोधाभासातून प्रीतिचे खरे स्वरूप प्रकटते. तुला, मला, भला अशा यमक सिध्दीने कवितेला सुंदर गेयता लाभली आहे.त्यामुळे कवितेतील भावार्थ सहजपणे लक्षात येतो.कवितेशी वाचकांची समरसता प्रस्थापित होते.

दुसऱ्या कडव्यात  प्रेयसीच्या केवळ एका अश्रूची  माफक अपेक्षा ठेवणारा तो म्हणतो की जे जगायचं ते तिला आठवत जगायचं आणि जर मरण आलं तर तेही तिच्यासाठी यावं असं त्याला वाटतं. सर्वस्व ,आपले जीवन तिच्यावर ओवाळून टाकण्याची त्याची मानसिक तयारी आहे. त्याच वेळी शाश्वत असलेल्या प्रेमाच्या रेशीमगाठी कधी न सुटाव्यात अशी योग्य व रास्त अपेक्षा तो बाळगून आहे .त्यांच्या प्रेमावर त्याची अढळ श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला खात्री आहे जर कधी मृत्यू आला तर परत येऊन म्हणजे जणू काही पुनर्जन्म घेऊन आपण या इहलोकी परतू .कारण त्याला या प्रेमपूर्तीची आस आहे.स्वतः चे प्रेयसी वरील पवित्र,शाश्वत,निरंतर प्रेम याची कल्पना,जाण तिला देता देता प्राक्तनी कदाचित येईल अशा विरहाचा विचार त्याला सर्वथैव बैचेन करतो. त्यामुळे व्यथित तो प्रेयसीच्या प्रेमाविषयी खात्री असूनही साशंकता व्यक्त करतो.पण ती व्यक्त करताना ही त्यात तिच्या शाश्वत प्रेमाचा अर्थपूर्ण उल्लेख करतो.एकमेकांच्या सान्निध्यात जगत असताना चिरंतन प्रेमभावनेची जाण असूनही शाश्वत मरणाचे भान त्याला आहे.मृत्युने वियोग घडला तरी पुनर्जन्मी पुन्हा भेट होईल असा आशावाद व्यक्त केला आहे.तुजसाठी, रेशिमगाठी हे यमक साधले आहे.रेशिमगाठी शब्द वापरून प्रीतिची मुलायमता अधोरेखित केली आहे.

 संपूर्ण कवितेत प्रीत भावनेला सुयोग्य पणे व्यक्त करताना समर्पक व सुलभ शब्द योजना कवीने केली आहे.त्यामुळे प्रीतिचा तरल, पवित्र शाश्वत भाव मनाला स्पर्शून जातो.भावनेचा खरेपणा व त्यातली आर्तता मनाला भिडते.साहित्यिक अलंकारांचा अट्टाहास न ठेवता भावनेचा प्रांजळ पणा जपण्याचे भान कवीने ठेवले आहे. कवीची साहित्यविषयक, भाषाविषयक व काव्य विषयक सजगता यातून प्रतीत होते.साधी पण भावुकतेत न्हालेली ही कविता सर्वांना आवडेल अशीच आहे.

© सुश्री नीलिमा खरे

३-१०-२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares