मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वडिलोपार्जित आई… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

एक आई सोडली

तर

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे

काहीही नाही आणि

भावंडांमध्येही

मी एकटाच.

 

एकदा

थकल्या आवाजात आई म्हणाली होती,

“तुला एखादा भाऊ हवा होता

म्हणजे जरा तुझा ताण हलका झाला असता.”

बस्स इतकेच.

 

मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून

त्याची आई कुठे दिसली नाही घरात

सहज विचारले तर म्हणाला,

“दादाकडे गेली आहे पुढच्या सहा महिन्यांसाठी.”

“सहा महिन्यांसाठी म्हणजे ?

म्हणजे काय ?”

“वडील वारले आणि गावाकडच्या

घराची आणि शेतजमिनीची

वाटणी

झाली होती दोघांमध्ये

तेव्हाच ठरले होते –

आईलाही दोघांनी सहा-सहा महिने सांभाळायचे आणि

तसेच काही झाले तर अर्धा-अर्धा खर्चही

वाटून घ्यायचा दोघांनी.”

आईविना पोरक्या घराचा

आणि मित्राचा मी निरोप घेतला.

 

घरी आलो तर

आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी बडबडत असलेली

सुरकुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या समुद्रासारखे अथांग

देहाला जाणवणारा, न जाणवणारा हलकासा कंप

घट्ट पदर लपेटून, उजव्या हाताने मांडीवर हलकासा ठेका

एक अपार करूणा समोर

मूर्तिमंत !

 

मी जवळ गेलो तिच्या

बसलो गळून गेल्यासारखा

तर म्हणाली –

“का रे ?

चेहरा का उतरलाय ?

कोठे गेला होतास ? बरे का नाही वाटत ?”

“काही नाही गं,” असे म्हणून मी तिचा हात हातात घेतला

घट्ट धरून ठेवला

तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजुनही नाळ न तुटलेला दृष्टांत.

 

उठलो सावकाश गेलो आत

देवघरात

मित्राची आई आठवत राहिलो

समईच्या मंद उजेडात.

 

रात्र झाली असावी खूप आता

मध्येच जाग येते आहे आणि

मी सावकाश येतो आईजवळ तर

ती शांत झोपलेली –

माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा एक कवडसा हलतो आहे

तिच्या चेह-यावर अजुनही.

 

देवा,

मला कोणत्याही जन्मी

लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस

आईची वाटणी कधीही होऊ देऊ नकोस.

 

मी सावकाश उठतो

पाय न वाजवता

सावध फिरत राहतो सगळ्या घरभर

आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून वाहत राहतात

माझे ओठ

रात्रभर कसलीतरी प्रार्थना गुणगुणत राहतात…

 

एक आई सोडली

तर

तसे आमच्याकडे वडिलोपार्जित असे काहीही नाही

आणि

भावंडांमध्येही मी

एकटाच….

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी- नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – किनारा शोधत राही – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– किनारा शोधत राही – 🚤⛵? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

अथांग सागर भवताली

आकाशाची जली निळाई

 दिशा द्यायला नाही वल्हे

नाव एकटी टिकून  राही

 बोलवी  का  कुणी किनारा?

 शाश्वत  सहारा नीत देणारा

त्याच किनार्‍याच्या विश्वावर

मिठीत घेईल पुर्ण  सागरा

 सागराची निळी नवलाई

भूल पाडत हाकारत जाई

भरकटण्याचे भय  होडीला

 म्हणून  किनारा शोधत राही

  किनारा मिळे बंधन येते

 बंधन विश्वहर्तता देते

 प्रेमरज्जू साथीला मिळता

 होडी सागरी खुशाल फिरते

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जादू… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जादू💦 ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

केली जादू त्या निळ्याने

गेले होऊनी मी निळी

भारावूनी गेले मनी

रेशमी शेला सोनसळी

 

घुमे सूर वेळूतूनी

जीवा गारूड जाहले

गात्रागात्रांतूनी माझ्या

नाम कृष्ण कृष्ण वाहिले

 

मीच माझ्या देहात या

कुठे आता रे राहिले

अधिरशा त्या स्वरमयी

मीच पुन्हा झंकारले

 

 सावळ्या त्या रुपाची

 पडे पुन्हा पुन्हा भूल

 मनी दरवळे कान्हा

 उरी मोरपिशी चाहूल

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 134 – हा भास दो घडीचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 134 – हा भास दो घडीचा ☆

प्रेमात रंगलो मी । हा भास दो घडीचा।

खोटेच भाव सारे। आभास दो घडीचा।

 

हे स्वप्न भाव वेडे। देऊ नको कुणाला।

स्वप्नात रंगलेला हा रास दो घडीचा।

 

या भाबड्या मनाला। समजाविता कळेना।

या बेगडी फुलांचा। हा वास दो घडीचा।

 

भाळू नको उगा रे। खोट्याच कल्पनांना ।

संपेल हा कधीही ।सहवास दो घडीचा ।

 

जादूत धुंद  होशी।स्वप्नातल्या परीच्या।

येशील भूवरी रे। हा ध्यास दो घडीचा ।

 

सौंदर्य या मनाचे। जाणून घेई आता।

प्रेमास लाभलेला।विश्वास दो घडीचा

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुण्याची कहाणी:  कालची अन् आजची! – सुश्री प्रज्ञा रामतीर्थकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ पुण्याची कहाणी:  कालची अन् आजची! – सुश्री प्रज्ञा रामतीर्थकर ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

आटपाट नगर होतं ​—-विद्येचं माहेरघर होतं ​​​​

​​​​सह्याद्रीच्या कुशीत होतं​​​​—-टेकड्यांच्या मुशीत होतं ​​​​

​​

मुळा-मुठा निर्मळ होती ​​​​​—-गोड पाण्याची चंगळ होती ​​

​​​काळ्या मातीत कस होता​​​​​​—-वरण भात बस्स होता​​​​​​

 

निसर्गाचं देणं होतं ​​​​—-पाताळेश्वरी लेणं होतं ​​​​

​​​​नाव त्याच पुणं होतं ​​​​—-खरंच काही उणं नव्हतं ​​​​

​​​​​

शिवबाचं बालपण होतं​​​—-जिजामातेचं धोरण होतं​​​

​​मोगलाई कारण होतं​​​—-पुण्याचं ज्वलन होतं​​​

​​​

​छत्रपतींचं स्वराज्य होतं​​​​—-पेशव्यांचं अटकेपार राज्य होतं​​​​

​​​​निधड्या छातीचे मावळे होते​​​​—-पराक्रमाने न्हायले होते​​​​

 

पर-स्त्री मातेसमान होती​​​​—-कोल्ही-कुत्री गुमान होती​​​​

​​नवसाला पावणारे गणपती होते​​​​—-तालमीसाठी मारुती होते​​​​

​​

चिरेबंदी वाडे होते​​​​—-आयुर्वेदाचे काढे होते​​​​

अंगणात रांगोळी होती​​​​​​—-घराची दारं उघडी होती​​​​​

​​​​

संध्याकाळी दिवेलागणी होती​​​​—-घरोघरी शुभंकरोती होती​​​​

गृहिणी अन्नपूर्णा होत्या​​​​—-तडफदार स्वयंसिद्धा होत्या

​​​​

जेवायला साधी पत्रावळ होती ​​—-चौरस आहाराने परिपूर्ण होती​​​

वेदांचा अंगिकार होता​​​​​​​—-विद्वान लोकांचा संचार होता​​​​​​

 

टिळकांची सिंहगर्जना होती​​​​—-आगरकरांची सुधारणा होती​​​​

​​​​फडके चाफेकरांचं बंड होतं—-सावरकरांचं अग्निकुंड होतं

​​​

रानडे, फुले, कर्वे झटले होते​​​—-बायकांचे जगणे फुलले होते​​​

​​विद्वत्तेची पगडी होती​​​​—-सन्मानाची भिकबाळी होती​​​​

 

घरंदाज पैठणी होती—-शालीन नथणी होती

काटकसरीचा वारा होता —-उधळपट्टीला थारा नव्हता

 

सायकलींचे शहर होतं—-निवृत्त लोकांचे घर होतं  

एका दमात पर्वती चढणं होतं—-दुपारी उसाचा रस पिणं होतं 

 

पुण्याची मराठी प्रमाण होती​​​​—-शुद्धतेची कमाल होती​​​​

कलाकारांची कर्मभूमी होती​​​—-पुणेकरांची दाद जरूरी होती​​​

 

सवाई गंधर्व, वसंत उत्सव होते —-पुणेकरांना अभिमानास्पद होते 

​​​​सार्वजनिक मंडळे विधायक होती​​​​—-समाज-स्वास्थ्याला तारक होती​​​​

​​​​:

:

पण परंतु किंतु….​​​​​…. 

 

औद्योगिक क्रांती झाली​​​​—-पुण्यामध्ये पिंपरी आली​​​​

​​चारी दिशांनी कामगार आले​​​​​​—-स्थानिक मात्र बेरोजगार झाले​​​​​​

​​

​​​कारखाने धूर ओकू लागले ​​—-पुणेकर सारखे खोकू लागले ​​

​संगणकाची नांदी झाली ​​—-हिंजवडीची चांदी झाली ​​

​​

पुण्याची आय-टी पंढरी झाली​​—-तज्ञांची मांदियाळी आली​​

तांत्रिक भाषा ओठावर रूजली​​​​​—-मराठी मात्र मनातच थिजली​​​​​

 

उंच इमारतींचे पीक आले​​—-शेती करणे अहित झाले 

टेकड्यांवर हातोडा पडला—-सह्याद्रीच तेवढा कळवळला 

 

मुळा-मुठा सुकून गेली—-सांडपाण्याने बहरून आली

​​​​​रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला​​​​​​—-चालताना श्वास कोंडत गेला 

 

पिझा बर्गर ‘जेवण’ झाले—-सार्‍यांनाच आजारपण आले 

डॉक्टरांनी आपली दुकाने थाटली —-बँकांनी आरोग्यासाठी कर्जे दिली

​​​​​

‘युज अँड थ्रो’ प्रतिष्ठेचे झाले​​​​​​—-जागोजागी ढीग कचऱ्याचे आले​​​​​​

​​​​तरुणाई  रेव पार्टीत रंगली​​​​—-चारित्र्याची कल्पना मोडीत निघाली​​​​

​​

मारामारी, खून, बलात्कार झाले​​—-निर्ढावलेल्या मनांचे साक्षात्कार झाले ​​—– 

​​​​

​एकेकाळची पुण्य नगरी​​​​—-

होतेय आता पाप नगरी​​​​—-

भिन्न प्रांतीयांची भाऊगर्दी—-

कुठे हरवला अस्सल पुणेरी?​​​​​—-

कुठे हरवला अस्सल पुणेरी?​​​​​—-

 

प्रस्तुती –  सुश्री प्रज्ञा रामतीर्थकर

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बायको… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ बायको… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

प्रत्येकाच्या नशिबात

एक बायको असते

आपणास कळतही नसते

डोक्यावर ती केव्हा बसते

 

बायको इतरांशी बोलताना

गोड, मृदू स्वरात बोलते

अजून ब्रह्मदेवाला कळाले नाही

नवऱ्याने काय पाप केले असते

 

ज्ञानेश्वराने भिंत चालवली

बायको त्यांचं कौतुक करते

सालं! नवरा अख्खं घर चालवितो

तेव्हा मात्र बायको गप्प असते

 

वस्तू कुठे ठेवली

हे बायको विसरते

दिवसभर नवऱ्यावर

उगीचच डाफरते

 

लग्नात पाचवारी बायकोला

खूप होत होती मोठी

आता नऊवारी गोल नेसताना

बायकोला होतेय खूपच छोटी

 

बायकोच्या प्रेमाची गड्यांनो

तर्‍हाच खूप  न्यारी असते

पाहिजे तेव्हा रेशन लागते

नको तेव्हा उतू जाते

 

वयाच्या साठीनंतर

एक मात्र बरं असतं

बायको ओरडली तरी

नवऱ्याला ऐकू येत नसतं

 

       काट्याकुट्याच्या रस्त्यातून

       नवरा किती मस्तीत चालतो

       याला कारण खरं बायकोचा

       मस्त, धुंद सहवास असतो

 

   बायको गावाला गेली की

  देवाशपथ, करमत नसतं

   क्षणाक्षणाला रुसणारं

   घरात कुणीच नसतं

 

   नवरा-बायकोचं

   वेगळंच नातं असतं

   एकमेकांचं चुकलं तरी

   एकमेकांच्याच मिठीत जातं

 

       बायकोवर रागावलो तरी

       तिचं नेहमी काम पडतं

       थोडावेळ जवळ नसली तर

       आपलं सर्वच काही अडत असतं

 

       अव्यवस्थित संसाराला

       व्यवस्थित वळण लागतं

       त्यासाठी मधूनमधून

       बायकोचं ऐकावंच लागतं

 

       सुना-नातवंडासह आता

       घर चांगलं सजले आहे

       बायको एकटी सापडत नाही

       दुःख मात्र एवढंच आहे.

 

      बायकोशी भांडताना

      मन कलुषित नसावं

      दोघांचं भांडण

      खेळातलंच असावं

 

      नाती असतात पुष्कळ

      पण नसतो कुणी कुणाचा

      खरं फक्त एकच नातं

      असतं नवरा  बायकोचं

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती परत आली ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

💃 ती परत आली ! 🙆‍♀🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आली गुलाबी थंडीला

पुन्हा एकदा लहर,

सुरू केला बघा तिने

परत तिचा तो कहर !

 

बाहेर काढा परत

स्वेटर आणि शाली,

ऊब घ्या तयांची

मऊ मऊ मखमली !

 

आता घसरले आहे

इतके काही टेंपरेचर, 

करून टाकले तिने

मुंबईचे महाबळेश्वर !

 

पेटतील गावोगावी

रोज रोज शेकोट्या,

जमून सारे करतील

आनंदाने “पोपट्या” !

 

बेभरोशी हवामानाची

पाहून अशी गती,

कुंठली आहे सध्या

मानवाची “मंद” मती !

 

पण

आपणच बघा मोडले

पर्यावरणाचे कंबरडे, 

आता रोज रोज मरे

त्याला कोण बरं रडे ?

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #156 ☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 156 – विजय साहित्य ?

☆ संस्कार सावली…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(4 जानेवारी – कै सिंधुताई सापकाल स्मृतीदिवस दिना निमित्त)

अनाथांची माय

करुणा सागर

आहे भोवताली

स्मृतींचा वावर…!

 

ममतेची माय

आदर्शाची वाट

सुख दुःख तिच्या

जीवनाचा घाट..!

 

परखड बोली

मायेची पाखर

आधाराचा हात

देतसे भाकर…!

 

जगूनीया दावी

एक एक क्षण

संकटाला मात

झिजविले तन…!

 

पोरकी जाहली

माय ही लेखणी

आठवात जागी

मूर्त तू देखणी…!

 

दु:ख पचवीत

झालीस तू माय

संस्कार सावली

शब्द दुजा नाय..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १३ (आप्री सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – आप्री देवतासमूह 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाराव्या सूक्तात मधुछन्दस वैश्वामित्र या ऋषींनी अग्निदेवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त अग्निसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री

सुस॑मिद्धो न॒ आ व॑ह दे॒वाँ अ॑ग्ने ह॒विष्म॑ते । होतः॑ पावक॒ यक्षि॑ च ॥ १ ॥

यज्ञामध्ये अग्निदेवा हवी सिद्ध जाहला

प्रदीप्त होऊनी आता यावे स्वीकाराया हविला

हे हविर्दात्या सकल देवता घेउनी सवे यावे 

पुण्यप्रदा हे  अमुच्या यागा पूर्णत्वासी न्यावे ||१|| 

मधु॑मन्तं तनूनपाद्य॒ज्ञं दे॒वेषु॑ नः कवे । अ॒द्या कृ॑णुहि वी॒तये॑ ॥ २ ॥

प्रज्ञानी हे अग्निदेवा स्वयंजात असशी

अर्पण करण्या हवीस नेशी देवांच्यापाशी

मधुर सोमरस सिद्ध करुनिया यज्ञी ठेविला

यज्ञा नेवूनी देवतांप्रति सुपूर्द त्या करण्याला ||२||

नरा॒शंस॑मि॒ह प्रि॒यम॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । मधु॑जिह्वं हवि॒ष्कृत॑म् ॥ ३ ॥

मधुर अतिमधुर जिव्हाधारी हा असा असे अग्नी

अमुच्या हृदया अतिप्रिय हा असा असे अग्नी

स्तुती करावी सदैव ज्याची असा असे अग्नी

पाचारण तुम्हाला करितो यज्ञा या हो अग्नी ||३||

अग्ने॑ सु॒खत॑मे॒ रथे॑ दे॒वाँ ई॑ळि॒त आ व॑ह । असि॒ होता॒ मनु॑र्हितः ॥ ४ ॥

आम्हि अर्पिल्या हवीस अग्ने देवताप्रती नेशी

तू तर साऱ्या मनुपुत्रांचा हितकर्ता असशी

सकल जनांनी तुझ्या स्तुतीला आर्त आळवीले

प्रशस्त ऐशा रथातुनी देवांना घेउनी ये ||४||

स्तृ॒णी॒त ब॒र्हिरा॑नु॒षग्घृ॒तपृ॑ष्ठं मनीषिणः । यत्रा॒मृत॑स्य॒ चक्ष॑णम् ॥ ५ ॥

लखलखत्या दर्भांची आसने समीप हो मांडा

सूज्ञ ऋत्विजांनो देवांना आवाहन हो करा

दर्शन घेऊनिया देवांचे व्हाल तुम्ही धन्य 

त्यांच्या ठायी दर्शन होइल अमृत चैतन्य ||५||

वि श्र॑यन्तामृता॒वृधो॒ द्वारो॑ दे॒वीर॑स॒श्चतः॑ । अ॒द्या नू॒नं च॒ यष्ट॑वे ॥ ६ ॥

उघडा उघडा यज्ञमंडपाची प्रशस्त द्वारे 

सिद्ध कराया यागाला उघडा विशाल दारे

त्यातुनि बहुतम ज्ञानी यावे यज्ञ विधी करण्या

पवित्र यज्ञाला या अपुल्या सिद्धीला नेण्या ||६||

नक्तो॒षासा॑ सु॒पेश॑सा॒स्मिन्य॒ज्ञ उप॑ ह्वये । इ॒दं नो॑ ब॒र्हिरा॒सदे॑ ॥ ७ ॥

सौंदर्याची खाण अशी ही निशादेवीराणी

उषादेवीही उजळत आहे सौंदर्याची राणी

आसन अर्पाया दोघींना दर्भ इथे मांडिले

पूजन करुनी यज्ञासाठी त्यांसी  आमंत्रिले ||७|| 

ता सु॑जि॒ह्वा उप॑ ह्वये॒ होता॑रा॒ दैव्या॑ क॒वी । य॒ज्ञं नो॑ यक्षतामि॒मम् ॥ ८ ॥

दिव्य मधुरभाषी जे सिद्ध अपुल्या प्रज्ञेने 

ऋत्विजांना हवनकर्त्या करितो बोलावणे

पूजन करितो ऋत्विग्वरणे श्रद्धा भावाने

हवन करोनी या यज्ञाला तुम्ही सिद्ध करावे ||८||

इळा॒ सर॑स्वती म॒ही ति॒स्रो दे॒वीर्म॑यो॒भुवः॑ । ब॒र्हिः सी॑दन्त्व॒स्रिधः॑ ॥ ९ ॥

यागकृती नियमन करणारी इळा मानवी देवी

ब्रह्मज्ञाना पूर्ण जाणते सरस्वती देवी

त्यांच्या संगे सौख्यदायिनी महीधरित्री देवी 

आसन घ्यावे दर्भावरती येउनीया त्रीदेवी ||९|| 

इ॒ह त्वष्टा॑रमग्रि॒यं वि॒श्वरू॑प॒मुप॑ ह्वये । अ॒स्माक॑मस्तु॒ केव॑लः ॥ १० ॥

विश्वकर्म्या सर्वदर्शी तुम्ही सर्वश्रेष्ठ

केवळ अमुच्यावरी असावी तुमची माया श्रेष्ठ

अमुच्या यागा पावन करण्या तुम्हास आवाहन

यज्ञाला या सिद्ध करावे झणी येथ येऊन ||१०|| 

अव॑ सृजा वनस्पते॒ देव॑ दे॒वेभ्यो॑ ह॒विः । प्र दा॒तुर॑स्तु॒ चेत॑नम् ॥ ११ ॥

वनस्पतिच्या देवा अर्पण देवांसी हवि  करी

प्रसन्नतेच्या त्यांच्या दाने कृतार्थ आम्हा करी 

यजमानाला यागाच्या या सकल पुण्य लाभो

ज्ञानप्राप्ति होवोनीया तो धन्य जीवनी होवो ||११||

स्वाहा॑ य॒ज्ञं कृ॑णोत॒नेन्द्रा॑य॒ यज्व॑नो गृ॒हे । तत्र॑ दे॒वाँ उप॑ ह्वये ॥ १२ ॥

यजमानाच्या गृहात यज्ञा इंद्रा अर्पण करा

ऋत्वीजांनो यज्ञकर्त्या प्रदान पुण्या करा 

सर्व देवतांना आमंत्रण यज्ञी साक्ष करा

देवांना पाचारुनि यजमानाला धन्य करा ||१२|| 

हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.

https://youtu.be/U2ajyRxxd-E

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 13 Marathi Geyanuvad :: ऋग्वेद मंडळ १ सुक्त १३ मराठी गेयानुवाद

Rugved Mandal 1 Sukta 13 Marathi Geyanuvad :: ऋग्वेद मंडळ १ सुक्त १३ मराठी गेयानुवाद

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

गोदावरी तीरावर

गंगाखेड जन्मगाव

दमा करूंडाची लेक

जनाबाई तिचे नाव. . . . ! १

 

दामाशेट शिंप्याकडे

जीवनास घाली टाके

झाली नामयाची  दासी

सार्थ अभिमान दाटे. . ! २

 

ओवी आणि अभंगात

जनाबाई जाणवते

घरा घरातली बाई

पहा दळण दळते…! ३

 

वात्सल्याची जणू ओवी

त्यागी, समर्पण वृत्ती

पूर्ण निष्काम होऊनी

विठू रूजविला चित्ती. . . . ! ४

 

तत्कालीन संतश्रेष्ठ

अभंगात आलंकृत

संत जीवन आढावा

काव्य पदी सालंकृत….! ५

 

प्रासादिक संकीर्तन

कधी देवाशी भांडण

संत जनाबाई करी

सहा रिपूंचे कांडण…! ६

 

संत सकल गाथेत

ओवी अभंगाचे देणे

संत जनाबाई जणू

काव्य शारदेचे लेणे…! ७

 

जनाबाई अभंगांने

मुक्तेश्वरा मिळे स्फूर्ती

भाव भावना निर्मळ

साकारती भावमूर्ती…! ८

 

बोली भाषा ग्रामस्थांची

जनाबाई वेचतसे

विठू तुझ्या दालनात

सुख दुःख सांगतसे….! ९

 

साडे तीनशे अभंग

कृष्णजन्म थाळीपाक

प्रल्हादाच्या चरीत्राने

दिली  ईश्वराला हाक. . . . ! १०

 

हरीश्चंद्र आख्यानाचा

आहे  आगळाच ठसा

बालक्रीडा अभंगात

जना पसरते पसा. . . . ! ११

 

द्रौपदीचे स्वयंवर

अभंगाने दिली कीर्ती

मुक्तेश्वर नाथनातू

तया लाभली रे स्फूर्ती. . . . ! १२

 

नामदेव गाथेमध्ये

जनाबाई एकरूप

अभंगात  भक्तीभाव

विठ्ठलाचे निजरूप.. . ! १३

 

परमार्थ वेचियेला

संत विचारांचा ठेवा

नामदेवा केले गुरू 

केली पांडुरंग सेवा …! १४

 

आषाढाची त्रयोदशी

पंढरीत महाद्वारी

समाधीस्त झाली जना

करे अंतरात वारी…! १५

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares