श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 142 ☆ संत जनाबाई… ☆ श्री सुजित कदम ☆

गोदावरी तीरावर

गंगाखेड जन्मगाव

दमा करूंडाची लेक

जनाबाई तिचे नाव. . . . ! १

 

दामाशेट शिंप्याकडे

जीवनास घाली टाके

झाली नामयाची  दासी

सार्थ अभिमान दाटे. . ! २

 

ओवी आणि अभंगात

जनाबाई जाणवते

घरा घरातली बाई

पहा दळण दळते…! ३

 

वात्सल्याची जणू ओवी

त्यागी, समर्पण वृत्ती

पूर्ण निष्काम होऊनी

विठू रूजविला चित्ती. . . . ! ४

 

तत्कालीन संतश्रेष्ठ

अभंगात आलंकृत

संत जीवन आढावा

काव्य पदी सालंकृत….! ५

 

प्रासादिक संकीर्तन

कधी देवाशी भांडण

संत जनाबाई करी

सहा रिपूंचे कांडण…! ६

 

संत सकल गाथेत

ओवी अभंगाचे देणे

संत जनाबाई जणू

काव्य शारदेचे लेणे…! ७

 

जनाबाई अभंगांने

मुक्तेश्वरा मिळे स्फूर्ती

भाव भावना निर्मळ

साकारती भावमूर्ती…! ८

 

बोली भाषा ग्रामस्थांची

जनाबाई वेचतसे

विठू तुझ्या दालनात

सुख दुःख सांगतसे….! ९

 

साडे तीनशे अभंग

कृष्णजन्म थाळीपाक

प्रल्हादाच्या चरीत्राने

दिली  ईश्वराला हाक. . . . ! १०

 

हरीश्चंद्र आख्यानाचा

आहे  आगळाच ठसा

बालक्रीडा अभंगात

जना पसरते पसा. . . . ! ११

 

द्रौपदीचे स्वयंवर

अभंगाने दिली कीर्ती

मुक्तेश्वर नाथनातू

तया लाभली रे स्फूर्ती. . . . ! १२

 

नामदेव गाथेमध्ये

जनाबाई एकरूप

अभंगात  भक्तीभाव

विठ्ठलाचे निजरूप.. . ! १३

 

परमार्थ वेचियेला

संत विचारांचा ठेवा

नामदेवा केले गुरू 

केली पांडुरंग सेवा …! १४

 

आषाढाची त्रयोदशी

पंढरीत महाद्वारी

समाधीस्त झाली जना

करे अंतरात वारी…! १५

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments