मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ भूत आणि गाढव… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ भूत आणि गाढव… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

घटनाक्रम लक्षात घ्या…

एका कुंभाराने आपले गाढव दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला मोकळे केले.

त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले.

हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले.

गाढव मेल्यामुळे कुंभार उध्वस्त झाला.

प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली.

बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळे केलं.

कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको व मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली.

हे पाहून क्रोधित झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको व मुलाला ठार केले…

शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चात्ताप झाला, तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, “तुझ्यामुळे माझी पत्नी, कुंभार, कुंभाराची बायको व मुलगा मेले अन् माझ्या घराची राखरांगोळी झाली. तू असं का केलंस?”

त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले… “मी कुणालाही ठार केले नाही, मी फक्त ‘दोरीने बांधलेले गाढव’  सोडले !!”

– तात्पर्य – 

आज माध्यमं (WhatsApp, Facebook, Instagram, Twitter, Print Media, News Channel etc.) भूतासारखी झाली आहेत. ते रोज नवनवीन गाढवांच्या दोऱ्या सोडतात आणि लोकं कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलट – सुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकांशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात… आपले मित्र, नातेवाईक, हितचिंतक आणि सहकारी यांचेशी असलेले संबंध जपण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे.

सतर्क राहा… सुरक्षित राहा…

लेखक – अज्ञात 

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मकर संक्रांत…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला  येणारा सण म्हणजे मकरसंक्रांत. कुणाच्याही मनात घर करायचं असेल तर त्याचा रस्ता हा आपल्या वाणीमार्फत जातो.तुमच्या वाणीवरच तुमच्याशी जोडल्या गेलेली माणसं ही जुळून राहतात की दुरावतात हे संपूर्णपणे अवलंबून असतं.म्हणून ह्या सणाचा मूलमंत्रच मुळी “तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला”असा आहे. ह्या सणाद्वारे गैरसमजाने निर्माण झालेले मनमुटाव,नाराजी क्षणात दूर होऊन निरभ्र आकाशासारखं मनं स्वच्छ होतं. अर्थातच” गोड बोला” हे शब्द अगदी स्वच्छ पारदर्शी मनातून आणि मनापासून सुद्धा उमटले तरच त्याला अर्थ आहे.

पुराणात मकरसंक्रांतीची अशी कथा सांगतात की, संकरासूर नावाच्या राक्षसाला जगदंबेने या दिवशी मारले म्हणून तिला संक्रांतीदेवी असे म्हटले जाऊ लागले.

…हा सण साजरा करण्याच्या पद्धती ह्या प्रांतानुरूप थोड्या बदलतात.मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगड्यांची पूजा केली जाते. या सुगड्यांना दोरा गुंडाळतात.. त्यानंतर हळद-कुंकू लावून त्यामध्ये ऊसाचे काप टाकले जातात, त्याबरोबरच तीळ गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, बोरं टाकली जातात. यानंतर एका शुभ्र वस्त्राने कपडे झाकून प्रार्थना केली जाते. ही पूजा आटोपल्यानंतर गृहिणी आपल्या सवडीप्रमाणे एकमेकींना भेटण्यासाठी जातात. तीळ गुळ देऊन छोट्या भेटवस्तू देऊन हा सण साजरा करतात. या भेटवस्तूंना वाण देणे म्हणते. नवविवाहित जोडप्याचा दोन्ही घरी संक्रांतीचा सण उत्साहात साजरा करतात. एरवी आपण काळा रंग अशुभ मानतो परंतु ह्या संक्रांतीच्या सणाला काळ्या वस्त्रांच महत्त्व असतात त्यामुळे बाजारात ह्या दिवसात काळ्या साड्या व काळे पंजाबी ड्रेसेस खप असल्या कारणाने भरपूर बघायला मिळतात.

मकरसंक्रांतीला उत्तरायण सुरू होते. उत्तरायण हा शुभ काल मानला जातो. याबद्दल अशी गोष्ट आहे की, महाभारतातील कौरव –  पांडवांचे युद्ध चालू होते. अर्जुन भीष्मांशी लढत होता पण ते त्याला जड जात होते. तेव्हा श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून अर्जुनाने शिखंडी ला पुढे उभे केले आणि तो त्याच्याआडून लढू लागला. शिखंडी हा अगोदर अंबा नावाची राजकन्या होता. भीष्मांनी आपल्या सावत्र भावासाठी अंबा, अंबिका व अंबालिका अशा तीन राजकन्या पळवून आणल्या होत्या.

अंबेचे दुसर्‍या राजावर प्रेम होते म्हणून भीष्मांनी तिला त्याच्याकडे पाठवले; पण पळवून नेलेल्या मुलीचा स्वीकार करायला त्याने नकार दिला. ज्या भीष्मांमुळे हे सारे झाले त्यांचा सूड घेण्याचे अंबेने ठरवले. ती तपश्चर्या करून शिखंडी नावाचा पुरुष झाली आणि भीष्मांशी लढायला आली. पण ती पूर्वी स्त्री होती म्हणून भीष्म शिखंडीशी लढेनात. तेव्हा अर्जुनाने शिखंडीच्या आडून सोडलेल्या बाणांनी जखमी होऊन भीष्म कोसळले. त्यांच्या अंगामध्ये इतके बाण घुसले होते की, ते जमिनीवर खाली न पडता बाणांच्याच गादीवर आडवे झाले. तेव्हा दक्षिणायन सुरू होते. पण भीष्म इच्छामरणी होते म्हणून त्यांनी उत्तरायणाचा शुभ काल सुरू होण्याची वाट पाहिली आणि मगच प्राण सोडले.

अशा ह्या स्नेहबंधाचे धागे गुंफणा-या सणाची महती सांगणारी माझी एक रचना  पुढीलप्रमाणे

मकरसंक्रांतीची शिकवण

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो काटेरी हलवा

तीळ गुळासंगे मुखी ठेऊनी राग मनीचा घालवा

ह्याला काय महत्त्व सांगतात ती आंबटगोड बोरं

मनातील किल्मिष पूर्ण घालवा मनं करा कोरं

ह्याला काय महत्त्व सांगतात गोड ऊसाचे कांडे

गोड बोलून टाळावे जरी लागले भांड्याला भांडे

ह्या सणाला काय महत्त्व सांगतो टप्पोरा तीळ

आढ्यता आता सोडा घालवा मनातील पीळ

ह्याला काय महत्त्व सांगतो पिवळाधम्म गूळ

स्वच्छ निरभ्र करा मनं सोडून गैरसमजाचे खूळ

ह्याला काय महत्त्व सांगते मिश्रडाळीची खिचडी

फटकळ तोंडाळपणा पेक्षा बरी ती लाडीगोडी

काय महत्त्व सांगतात ती लालचुटुक गाजरं,

मनात शिरूर राह्यलं की आयुष्य होतं साजरं

द्वेष आता सोडा माणसं आता  जोडा ,

तीळगूळ घेऊन गोड बोलून गाठ मनीची सोडा.,

गाठ मनीची सोडा…

परत एकदा तीळगूळ घ्या अन् गोडगोड बोला. मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मी, तिळगुळ आणि संक्रात…एक संवाद… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ मी, तिळगुळ आणि संक्रात…एक संवाद… ☆ सौ राधिका भांडारकर

मी—-अगबाई ! नवं वर्ष उगवलं.जानेवारी महिना सुरु झाला. आता संक्रातीचे वेध लागले.   .स्वच्छ तीळ चिकीचा गुळ आणायलाच हवा..शिवाय सुगडी..बोरं ऊस आवळे..कितीही ठरवलं ना या वेळेस चितळेकडूनच आणूया लाडू, आता नाही हो होत…पण मन नाही ना मानत..नाही म्हटलं तरी  संस्काराची मुळं नाही सुटत हो..

पण अधिक माहिती देण्यासाठी संक्रात आणि तिळगुळ माझ्या घरीच आले आहेत..अम्मळ बोलूच या का त्यांच्याशी..

“ काय म्हणताय् तिळगुळजी..? ”

*तिळगुळ..*— “ सर्वप्रथम मी तुझं कौतुकच करतो की या वयातही तू अजून तिळगुळ घरी बनवतेस…

संक्रात — “ अरे पण तुझं महत्व सांग ना..” 

तिळगुळ— “ हे बघ तीळ आणि गुळाचं बंधन म्हणजे मी..तिळगुळ. हेमंत ऋतुत येते संक्रांत..थंडीची शिरशिरी..तीळ हे उष्णवर्धक , स्निग्ध. शिवाय त्यातली अमीनो प्रथीने ,लोह शरीरास पोषक असतात. गुळातही सुक्रोज आणि ग्लुकोज  आणि लोह असते. ते शरीराचे तपमानही राखते अन् कांतीही सतेज राहते…म्हणून संक्रातीला माझे महत्व असते बरं का? शिवाय स्नेह आणि मैत्रीचे मी प्रतीक. राग हेवे दावे विसरून जायचे. नवे स्नेहसंबंध प्रस्थापित करायचे..तीळगुळ घ्या गोड बोला म्हणत आनंदाचे, प्रेमाचे बंध जोडायचे..”

मी— “ किती छान !!आपल्या भारतीय सणातली ही तत्वंच महत्वाची..”

*संक्रांत.*— “ अगदी बरोबर !”

मी— “ पण संक्रातबाई,,”काय बाई संक्रांत आली माझ्यावर..”असं लाक्षणिक अर्थानं ,थोडंसं कडवट का बरं 

बोलतात ?”

संक्रांत— “ कारण यावेळी एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करणं असतं ना..१४जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो.आणि या भ्रमणास मकर संक्रांत असं म्हणतात. याचवेळी उत्तरायण सुरु होते. हा काळ धर्म परंपरेच्या दृष्टी कोनातून अत्यंत महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. अन्न ,वस्तु यांचं दान केलं जातं.. सूर्याची पूजा केली जाते. शुक्राचाही उदय होतो.. “

मी — “ भारतात संक्रातीला वेगवेगळी नावेही आहेत ना..?”

संक्रांत – “हो .तामीळनाडुत पोंगल असतो. बिहार मधे तर मला खिचडीही म्हणतात…”

मी — “ खिचडी?”

संक्रांत — “ हो. कारण या दिवशी तूर मसूर तांदळाची खिचडी बनवून खायचीही प्रथा आहे. तिळाचे लाडू, वड्या, रेवडी, गजक, गुळपोळी या खाद्य पदार्थांची तर रेलचेलच असते…”

मी— “ वा !! किती छान माहिती मिळाली. भारतीय सण म्हणजे नुसतीच संस्कृती किंवा परंपरा नव्हे, त्यामागे शास्त्रीय विचार आहे. बदलणार्‍या ऋतुमानाचा आणि मानवी जीवनाचा केलेला वैज्ञानिक अभ्यास आहे…मग स्त्रियांसाठी हळदीकुंकु, वाण वाटणे ,लहान मुलांचे बोर नहाण, पतंग उडवणे, या आनंदकृती असल्या तरी भारतीय कृषीपरंपरेला आणि निसर्गाला मानणार्‍या आहेत…आनंदाचे संकेत आहेत.”

खरोखरच आज मला मी, तिळगुळ आणि संक्रांत यातील परस्परसंबंध डोळसपणे जाणता आले…

चला तर मग—–

तिळगुळ घ्या अन् गोड बोला…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 1 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆  लामणदिवे: श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई – भाग – 1 – लेखक – श्री सदानंद कदम ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

सांगलीत अखिल भारतीय साहित्य संमेलन भरणार होतं. संमेलनाची स्मरणिका आणि त्या अनुषंगानं प्रकाशित करावयाच्या काही पुस्तिका यांचं संपादन करण्याच्या कामात मी सहभागी होतो. त्या पूर्वीची संमेलनं आणि त्यावेळच्या अध्यक्षांनी केलेल्या भाषणांमधील उताऱ्यांची एक पुस्तिका काढायची होती. त्यासाठी जुन्या कागदपत्रांचा पसारा मांडला होता. माध्यमांमधूनही तसं आवाहन करण्यात आलं होतं. ते वाचून एक आजी भेटायला आल्या होत्या.

श्रीमती सुमती बाबुराव फडकेबाई

ऐंशी ओलांडून गेलेल्या त्या आजी. किरकोळ देहयष्टीच्या. गोऱ्यापान. सुती पातळातल्या. हातात एक कापडी पिशवी. त्यात कोंबून भरलेली वृत्तपत्रांची कात्रणं. या आजींनी पिशवीतून काय आणलं असावं या विचारात पडलेला मी. 

आजींनी बैठक मारली आणि पोतडीतली कात्रणं बाहेर काढून माझ्यासमोर ठेवत त्या म्हणाल्या, “ही गेल्या पन्नास वर्षांतली कात्रणं. त्या त्या वेळच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे वृत्तांत यात छापून आलेत. ही कात्रणं ताब्यात घ्या आणि मुख्य म्हणजे तुमचं काम झालं की मलाच परत द्या.”

मी ते घबाड लगेच ताब्यात घेतलं. आजींचा पत्ता लिहून घेतला आणि त्यांना निरोप दिला. ज्या वयात हरिकीर्तन करत किंवा दूरदर्शनवरच्या धार्मिक मालिका पाहत घरी बसायचं, त्या वयात आजी  कात्रणांचं हे बाड घेऊन दोन किलोमीटर चालत आल्या होत्या आणि त्या चालत गेल्याही. तेव्हाच ठरवलं आजींच्या घरी जायचंच. 

दोन दिवसांनी मी आजींच्या घरी. आजी बाहेरच्या खोलीत कातरी, पुठ्ठे घेऊन बसलेल्या. भोवती मराठी-इंग्रजीमधली अनेक दैनिकं. माझं कुतूहल वाढलेलं. 

“काय करताय?”

माझं स्वागत करून मला बसायला खुर्ची देत त्या म्हणाल्या, “अहो, वेगवेगळ्या विषयांवरची कात्रणं काढून ती पुठ्ठ्यावर डकवतेय. विषयवार गठ्ठे तयार करत बसलेय. गेल्या पन्नास वर्षांचा हा रोजचा उद्योग.”

“आणि अशा पुठ्ठ्यांचं काय करता? काय उपयोग?”

“मी शिक्षक होते. आता निवृत्त. सेवेत असताना या संग्रहाचा खूप उपयोग व्हायचा वर्गात शिकवताना. आता असे विषयवार गठ्ठे बांधून ठेवलेत. ज्यांना हवेत त्यांनी न्यावेत. काम झालं की परत आणून द्यावेत.”

मी गठ्ठे पाहूनच हबकलो. जवळपास वीस-पंचवीस विषयांवरची ती कात्रणं. हजारावर पुठ्ठे. त्यावर ती कात्रणं चिकटवलेली. लहान मुलांच्या चित्रांपासून, मोठमोठ्या इमारतींच्या चित्रांपर्यंत आणि भाषा-कला-साहित्य पर्यावरणापासून सर्व विषयांवरचे लेख. पुठ्ठेही एकाच प्रकारचे, नीट कापलेले. कपाटांतही असेच पुठ्ठे ठेवलेले. प्रत्येक कप्प्यावर आत कुठला विषय आहे त्याच्या नावाच्या चिठ्ठ्या लावलेल्या. स्टीलची सहा फूट उंचीची तीन कपाटं भरलेली. एरवी साड्यानं कपाटं भरतात बायकांची हे बघण्याची सवय. मला एखाद्या संदर्भ ग्रंथालयात गेल्यासारखंच वाटत होतं. 

“पुठ्ठे एकसारखे कसे? कुठून आणता?”

“प्रेसमधून विकत आणते.”

“हा खर्च कशासाठी?”

“अहो, मुलींच्या हातात हे पुठ्ठे पडले की त्यांच्या डोळ्यांतल्या बाहुल्या नाचू लागतात. त्यांचा अवघा देह शिकण्यातला आनंद घेताना दिसतो. जाणवतं आपल्याला ते. माझ्यादृष्टीनं तो आनंद महत्त्वाचा. माझी ऊर्जा वाढविणारा. मुली अशा बहरताना पाहणं यासारखं सुख नाही.”

कधीकाळी प्रबोधनाचं काम करणारी वृत्तपत्रं हल्ली ‘कूपन संकलन स्पर्धा’ घेतात. पोळपाट-लाटण्यापासून कुकर पर्यंतची बक्षीस जाहीर करतात. ती मिळवण्यासाठी अनेकांची धडपड. घरी वृत्तपत्र न घेता शाळेतल्या दैनिकांतली कूपनं कापून नेणाऱ्या माझ्या शिक्षक भगिनी माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागल्या. घरी एकही दैनिक न घेणारे शिक्षक बांधव माझ्याभोवती फेर धरून उभे राहिले. अशांना या बाई समजतील? त्यांच्या दृष्टीनं या वेड्याच की. पण या बाईंनी हा वेडेपणा सेवेत असतानाच केला नव्हता, तर निवृत्तीनंतर पंचवीस वर्षं होत आली तरी सुरू ठेवला होता. इतर शिक्षकांना मदत व्हावी म्हणून. पदरचा पैसा खर्च करत. घरी दैनिकांचा रतीब लावत. आजही त्यांचा हा वेडेपणा तसूभरही कमी झालेला नाही.  बाई दिवसभर हेच करत असतात. केवळ स्वानंदासाठी. हे कामच आज त्यांना जगवतं. 

बाई एकट्या. वडिलांची नोकरी फिरतीची असल्यानं विजापूरपासून पुण्यापर्यंत शिक्षण घेतलेल्या. सर परशुरामभाऊ महाविद्यालयामधून सत्तेचाळीसला गणित विषय घेऊन बी. ए. झालेल्या. पण त्यांना शिकवावं लागलं ते इंग्रजी. ज्याला ज्या विषयाची आवड तो विषय त्याला न देण्याची शाळांची अशी परंपरा आजही अबाधित. पण बाईंनी न डगमगता ती परकी भाषा आत्मसात केली. तिच्यावर मातृभाषेइतकंच प्रभुत्व मिळवलं आणि आपल्या विद्यार्थिनींनाही ती भाषा त्यांच्या मातृभाषेइतकीच सोपी वाटावी असं अध्यापन केलं. त्यासाठी अपार मेहनत घेतली. 

“इंग्रजीवर इतकं कसं तुमचं प्रभुत्व?” असं विचारताच त्या म्हणाल्या, “अहो, प्रयत्न केला तर कुठलीच भाषा अवघड नाही. हाताशी उत्तम शब्दकोश आणि इनसायक्लोपिडिया ब्रिटानिकाचे दहा खंड एवढ्या शिदोरीवर मला सगळं जमून गेलं.”

“शब्दकोशांचं मी समजू शकतो, पण ब्रिटानिकाचे खंड?”

हातात ‘मार्गदर्शक’  घेतल्याशिवाय इंग्रजीच्या तासाला वर्गात पाऊलही न टाकणारे माझे बांधव मला दिसू लागले. इंग्रजी शिकवणारे. ज्यांना मराठीही ‘नीट’ लिहिता येत नाही असे. बहुतेकांचे पदवीचे विषय इंग्रजी सोडून बाकीचे. यातले फार म्हणजे फारच थोडे इंग्रजी नीट बोलणारे. 

“पाठ नीट समजावून देण्यासाठी हे खंड खूप उपयुक्त. पाठात आलेल्या शब्द, कल्पना समजावून देताना यातली माहिती उपयोगाला येते. ती शोधून, त्या त्या पाठाच्या अनुषंगानं सांगितली तर मुलांना जादा माहितीही मिळते आणि त्यांची भाषाही सुधारते. विषयाची गोडी लागते त्यांना. त्यासाठी सोप्या इंग्रजी बोलीतून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो इतकंच.  तेवढं तर शिक्षकानं करायलाच हवं ना?”

– क्रमशः भाग पहिला. 

लेखक :  श्री सदानंद कदम 

मो. ९४२०७९१६८०

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मैत्रिणी… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी⭐

मैत्रिणी हा श्वास  असतो ,

मैत्रिणी हा ध्यास  असतो

 

 एखादी चंचल असते ,

तर एखादी शांत असते ,एखादी बोलकी तर एखादी अबोल

 

 एखादीचं हास्य  स्मित असतं तर एखादीचं हास्य  खळखळून असतं

 

 एखादीला साडीच आवडते तर कोणाला ड्रेस, तर कोणाला Western Outfit

 

 एकत्रित  जेवायला जातील ,पण घरातील  सगळ्यांचं खाण्याचं करून निघतील .

 सगळ्याच एकमेकीस  सांगतील, “आज मी निवांत  ताव मारणार  आहे” ,

पण गप्पाटप्पांच्या नादात  थोडेच  खातील

 

कोणी धैर्यवान  असतात तर कोणी भागूबाई असतात

 

 कोणी नोकरीत,कोणी  व्यावसायिक.

 

कोणी छान  गृहिणी ,

कोणी तानसेन

तर कोणी कानसेन.

 

 आवड प्रत्येकाची वेगवेगळी

 

आनंद घेतात क्षणभर

अन दुःख विसरतात मणभर

 

जीवन रुपी प्रवासात गरज असते मैत्रिणींच्या कळपाची

कारण त्यांच्या सहवासात ऊब मिळते माहेरच्या माणसांची

 

संग्राहिका: सौ. शशी नाडकर्णी-नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! – शकुनी महिला मंडळ ! – ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

 😂 चं म त ग ! 🎲 शकुनी महिला मंडळ ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

चाळीतले “शकुनी” महिला मंडळ सकाळची काम आटपून, रोजच्या प्रमाणे दुपारी जिन्या जवळच्या मोकळ्या चौकात, चाळगोष्टी करायला जमले होते.  प्रत्येकीच्या हातात काही ना काही निवड, टिपण, शिवण (स्वतःच्या घरचे) होतेच ! आता तुम्ही म्हणाल “शकुनी” महिला मंडळ म्हणजे ? शकुनी तर कपटी पुरुष होता आणि महिला मंडळाला “शकुनी” महिला मंडळ हे नांव कसे काय पडले ? मी तुम्हाला शकुनीच्या फाशांची शपथ घेवून सांगतो, की महिला मंडळाला हे असे नांव ठेवण्यात माझा फाशां प्रमाणे त्याच्या पटाचाही संबंध नाही ! पण तुमचा प्रश्न रास्तच आहे आणि त्याचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसण्याचा पण संभव आहे !  त्या महिला मंडळाला असे नांव सर्वानुमते त्यांच्याच मुला मुलींनी दिले होते, आता बोला !  त्या सगळ्यांनीच सध्या टीव्ही वर चालू असलेले महाभारत बघून त्यात दाखवलेल्या शकुनीच्या द्यूतामुळे महाभारताचे रामायण घडले, अशी आपल्या बाल मनांची समजूत करून घेतली असावी ! त्यामुळे चाळीत आपापल्या आयांमुळं, अगदी महाभारत होत नसले,  तरी कायम शीतयुद्ध सुरूच असते,  या समजुतीतून त्यांनी हे नांव महिला मंडळाला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही !

तशी “शकुनी” महिला मंडळाची सभासद संख्या जरी जास्त असली, तरी यंग टर्क्सच्या मते त्यांच्या पैकी शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकू, चाळीतल्या आतल्या बातम्या काढण्यात जेम्स बॉण्डवर मात करतील अशा ! त्यामुळे त्या तिघींच्या आडनावाचे आद्याक्षर वापरून “शकुनी” हे नांव त्यांनी मंडळाला बहाल केले होते असे पण काही लोक म्हणतात !

आज जरा बऱ्या पैकी ऑडियन्स जमलेला बघून जोशीणीने पहिला फासा टाकला !  “तळ मजल्यावरची चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली वाटत !” हे ऐकताच सगळ्या महिला मंडळाचे हात, जे काही निवड,  टिपण करत होते, ते एकदमच कोणीतरी स्टॅचू केल्यागत थिजल्या सारखे झाले ! पण स्वतः जोशीण मात्र काहीच झालं नाही अशा अविर्भावात पुन्हा तांदूळ निवडायला लागली.  हा धक्का पचवायला सकल महिला मंडळाला साधारण सारखाच वेळ लागला आणि सगळ्यांनी एकदमच बोलायला सुरवात केली.  “काय सांगतेस काय? कुणाबरोबर गं?” “माझा तर बाई विश्वासच बसत नाहीये” “नेहमी खाली मान घालून जाणारी, साधी राहणारी असं काही…. ” “हो ना, तिच्या वयाच्या मुली नको नको ती फॅशन करत असतांना, ही अजून साडीत…. ” “म्हणजे अगदी खाली मुंडी पातळ धुंडी निघाली…. ” तो गलका ऐकून जोशी काकू म्हणाल्या “माझं जरा ऐका, मी म्हटलं ‘चितळ्यांची नलू बहुतेक पळून गेली !’ अजून तशी खात्रीलाय बातमी यायची…. ” तिला मधेच तोडत साने काकू म्हणाल्या “म्हणजे अजून तुला नक्की माहित नाही, तर कशाला उगाच तीच नांव खराब करतेस ? अशांन तीच लग्नतरी होईल का ?” यावर साठे काकूंनी पण जोशी काकुंवरचा आपला राग व्यक्त केला आणि म्हणाल्या “तुला ना त्या टीव्ही वरच्या बातम्या देणाऱ्यांसारखी घाई असते, बघा आमच्याच चॅनेलने ही बातमी प्रथम तुमच्या पर्यंत आणली….”  तेवढ्याच ठसक्यात जोशीण म्हणाली “अग बरेच दिवसात दिसली नाही म्हणून म्हटलं पळून गेली की काय, कारण तीच्या प्रेम

प्रकरणाची बातमी तूच तर  आम्हाला दिली होतीस !” हे ऐकताच साठे काकू परत खाली मान घालून गहू निवडायला लागल्या. ते बघून जोशीणीला मनोमन आनंद झाला आणि तिने आपला मोर्चा साने काकूंकडे वळवला “आणि साने काकू लग्न न व्हायला काय झालंय नलूच,  हिरा कितीही लपवला तरी चमकायचा राहतो का ?” हे ऐकताच सावंत काकू म्हणाल्या “आता ही हिरा कोण ?” त्यांच हे बोलण ऐकून मंडळात एक हास्याची लहर उठली.  सावंत काकूना काही कळेना, पण आपल्या प्रश्नाचे कोणीच उत्तर देत नाहीत हे बघितल्यावर त्या पुन्हा हातातली गोधडी शिवायला लागल्या.

त्या हास्य लहरीत वातावरण थोडं निवळत असतानांच, हातात दोन मेथीच्या जुड्या घेवून स्वतः चितळे काकू हजर ! त्यांना पाहताच जणू काहीच झाले नाही, या थाटात साने काकू त्यांना म्हणाल्या “छान दिसत्ये मेथी, कुठून आणलीस गं ?” “अग यांच्या ओळखीचा एक भाजीवाला आहे नाशिकचा, त्याच्या कडून हे घेवून आले !” “पुढच्या वेळेस मला पण दोन जुड्या सांग हं, आमच्यकडे पण मेथी फार आवडते सगळ्यांना.” “हो सांगीन ना, त्यात काय एवढं आणि हो आणखी कोणाकोणाला हवी असेल तर आत्ताच सांगा म्हणजे एकदम आणायला बरी.” मग प्रत्येकीनं आपआपली ऑर्डर दिली पण जोशीण काही बोलायला तयार नव्हती.

ते बघून साठीणीला पण चेव आला आणि ती मुद्दामच तिला म्हणते कशी “काय गं, तुला नको का नाशिकची मेथी ?” “नको हो, आमच्याकडे माझ्याशिवाय कोणीच खात नाही.  पण तुम्ही एक कामं करा, तुम्ही भाजी केलीत की द्या वाटीभर पाठवून, कडू असली तरी गोड मानून खाईन हो !” हे ऐकताच साठीणीचा चेहरा पाहण्या सारखा झाला.  पण ती खमकी तशी जोशीणीची पाठ सोडायला तयार नव्हती. वरकरणी हसत म्हणाली “हो देईन की त्यात काय एवढं !” पण मनांतून जोशीणीच्या बातमीची खात्री करायला, स्वतः चितळे काकू हजर असल्याचा फायदा घेण्याचे ठरवून, तिने जोशीणीकडे पहात चितळे काकूंना डायरेक्ट सवाल केला, “काय हो काकू, हल्ली तुमची नलू दिसली नाही बरेच दिवसात. तब्बेत वगैरे बरी आहे ना तिची ?” “हो अगदी मजेत आहे, तिला काय होतंय !” “तसं नाही पण जोशी काकू म्हणत होत्या….. ” साठीणीला मधेच थांबवत जोशीण म्हणाली “हो बरेच दिवसात दिसली नाही ना,  म्हणून जरा काळजी पोटी विचारत होते की नलूला कुणी बघितलीत का !” जोशी काकूंच्या या बोलण्यावर साठे काकूंनी बोलायला तोंड उघडले, पण त्या आधीच चितळीण बोलती झाली, “नाही तुमच सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे, पण तिची तब्येत अगदी ठणठणीत आहे, काळजी करायच काहीच कारण नाही.” “ते चांगलंच आहे, पण चाळीत कुठे दिसली नाही…. ” “अहो साठे काकू ती घरात असेल तर दिसेल ना?” “म्हणजे मग आम्ही जे ऐकलं ते खरच…” “हो खरच आहे ते,  ती सध्या ओबेरॉय मध्ये  राहते आहे !” “म्हणजे ?” “अहो ती गेल्याच महिन्यात US वरून आली आणि सेल्फ क्वारंटाईन साठी म्हणून एअरपोर्ट वरून डायरेक्ट ओबेरॉयला अठ्ठावीस दिवसासाठी !”  चितळे काकूंचे बोलणे ऐकून तमाम महिला मंडळ जोशीणीकडे खाऊ का गिळू नजरेने बघायला लागले आणि जोशीण खाली मान घालून परत तांदूळ निवडायला लागली.  आणि एकीकडे  मंडळाच्या तीन आधारस्तंभानी म्हणजे शहाणे, कुलकर्णी आणि निफाडकर काकूंनी सुटकेचा निश्वास टाकला !

© श्री प्रमोद वामन वर्तक

१७-०१-२०२२

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘व्हीलचेअर…’ – लेखक – अज्ञात  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

विवियाना मॉलमध्ये रविवारी संध्याकाळची वेळ म्हणजे तरुणांची गर्दीची वेळ.. त्यांचा चिवचिवाट, भरलेले कॉफी हाऊसेस, सेल्फी टाईम.

अशा गर्दीच्या वातावरणात चटकन नजर गेली ती एका व्हीलचेअरवर एका आजीबाईंना प्रेमाने नेणारा एक माणूस आणि सोबत 12-13 वर्षाचा एक मुलगा.. मी आणि माझी मैत्रीण तिथे एका बाजूला बाकावर बसलो होतो. आम्ही बघत होतो.. व्हीलचेअर ढकलत तो माणूस त्या आजीबाईंना इकडून तिकडे नेत होता आणि त्याचा मुलगाही त्याच्या सोबत होता….  ५ मिनिटांतच तो माणूस त्या आजींची व्हीलचेअर आमच्या अगदी बाजूला आणून उभं करून त्या मुलाशी इंग्रजीत बोलत होता. ” मी ATM मधून पैसे काढून एकदोन कामे करून येतो, तू आजी जवळ थांब. ” असं सांगून निघून गेला.

त्या आजी आमच्याकडे बघून थोडं हसल्या.. दोन – तीन मिनिटं गेली आणि हिंदीत मला सांगू लागल्या.. ” हा माझा नातू. मुलाचा मुलगा. आणि तो गेला ना पैसे काढायला तो माझा मुलगा.. आम्ही ठाण्यातच राहतो.. आज ‘सुईधागा’ सिनेमा बघायला आम्ही आलो. सुनेला तिच्या कॉलेज ग्रुपबरोबर बाहेर जायचं होतं, मग माझ्या मुलांनी आमचा हा बेत जुळवून आणला..” नकळत माझ्या तोंडून “अरे वाह!”  निघून गेलं..

आजी पुढे सांगू लागल्या… “ माझं वय 73 आहे.. मला चालता येत नाही म्हणून ही खुर्ची आणि ही फोल्डिंग काठी.. सिनेमा, नाटक बघायला जायचं तर थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आत आम्हाला आत शिरावं लागतं. म्हणून मी कुठे जायचं म्हणजे माझी वरातच असते.. पण मुलगा, सून ऐकत नाहीत.. अजून दोन मुलं आहेत मला.. पण ते मला सांभाळायला तयार नाहीत.. हा मुलगा सायकॉलॉजीचा प्राध्यापक आहे. तो मला आनंदाने सांभाळतो.. दुसरी भावंडे सांभाळत नाहीत, त्याबद्दल त्याचा आकस नाही. मला माझा मुलगा थिएटरमध्ये काळोख व्हायच्या आतच घेऊन येतो.

आज आम्ही बाहेर जेवून सिनेमाला गेलो.. आता मॉलमध्ये या खुर्चीतून मला फिरवतो.. मी नको म्हणत असताना त्याचं म्हणणं.. ‘बघ नं जग किती बदललंय. सुंदर गोष्टीही आहेतच. असं फिरलीस, चार माणसं बघितलीस की तुझं मन व शरीर ही फ्रेश होईल. मी मनाचा अभ्यास केलेला माणूस आहे म्हणूनच सांगतोय.'”

हे सांगत असताना त्यांचा मुलगा काम आटपून परत आला.. आजीबाई माझ्याशी बोलत असलेल्या बघून त्यांनी त्यांना हिंदीत मला निर्देश करून विचारलं, ” कौन है? किससे बात कर रही हो मम्मा..?”

आजीबाईंनी लगेच सांगितलं, ” यहीपे बैठी थी। ऐसे ही मैने बात की उससे।”

मला वाटलं, हा माणूस वैतागेल. कोण कुठली ही बाई ! पण त्यांनी चक्क हसून मला जे सांगितलं त्यावर मी थक्क झाले.

ते म्हणाले, “आम्ही आईला दर महिन्याला एकदा असं बाहेर फिरवून आणतो.. रोज आम्ही व्यस्त असतो. मग एक दिवस तिला असं बाहेर घेऊन येतो. माझे वडील असतांनाही आम्ही हेच करायचो. ते नाहीत आता.. आज माझी बायको नाही येऊ शकली, नाहीतर आम्ही तिघे येतो. एक दिवस तिला देतो. कधी सिनेमा, नाटक, ते नाही जमलं तर संध्याकाळी तरी काहीतरी प्लॅन करतो आणि तिला फ्रेश व्हायला मदत करतो. त्यामुळे तिची तब्येत चांगली राहायला मदतच होते ना.”

आम्हाला त्यांनी धन्यवाद म्हटलं, ” माझ्या आईला तुमची सोबतच झाली ” म्हणून ते तिघेही निघून गेले नि मी आणि माझी मैत्रीण सुन्न झालो. अरे किती नशीबवान या आजी..

 — कुठे ही परिस्थिती नी कुठे ‘आईवडील नकोत’ ही भावना जोपासणारी काही मुलं आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात..  समाजात एकाच परिस्थितीबाबत दोन भिन्न बाजू दिसल्या.

वय झालं आहे.. चालता येत नाही.. गर्दीत कुठे न्यायचं.. असा विचार न करता हा आजींचा मुलगा, सून आणि नातू ही यांच्या लेखी ‘आई म्हातारी झाली पण मी नेईन, तिला आनंद मिळावा’ ही भावना..

अशीही माणसं समाजात आहेत हे बघून आम्हा दोघींना खरंच खूप बरं वाटलं. आणि कितीतरी वेळ आम्ही शांतपणे त्या तिघांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे शांतपणे बघत होतो आणि डोळे कधी पाणावले कळलंच नाही…

लेखका : अज्ञात. 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 2 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

(पण जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या चलनाला डावलणे हा या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे.) इथून पुढे —- 

रशिया हा  इंधनाचा फार मोठा पुरवठादार आहे.  रशिया १० मिलियन barels प्रत्येक दिवशी crude oil उत्पादन करतो. पण अमेरिकेने निर्बंध लावल्यामुळे हा तेलाचा पुरवठा इतर तेलउत्पादक देशांना करावा लागेल अशी अपेक्षा होती. त्यात सौदी अरेबिया आणि UAE ने उत्पादन वाढवायला नकार दिला आणि रशियाने युरोपीय देशांना रुबलमधेच पेमेंट करायला सांगितले.

भारताने रशियाकडून crude oil  खरेदीचा करार रुपयामधे केला. Indian Oil Corporation ने रशियाकडून 3 मिलियन barrels crude oil खरेदीचा करार केला. भारताला हे crude oil 20$-25$ प्रत्येक barrel मागे discount मिळाला. तसेच भारताने रशियाशी हिरे खरेदीचा करार हा युरोमधे केला. चीनने सौदीबरोबर युआनमधे crude oil खरेदीचा व्यवहार केला. ( हे खूप महत्वाचं आहे कारण जर OPEC countries डॉलर्सशिवाय व्यवहार करायला लागल्या तर डॉलर्सची किंमत कमी होईल). इराणने  भारताला crude oil चा व्यवहार रुपया रिआलमधे करण्यासाठी प्रस्ताव दिला .

कोरोनाने जागतिकीकरणाच्या मर्यादा स्पष्ट केल्यानंतर ‘आत्मनिर्भर’ धोरण निश्चित करणारा भारत हा जागतिक पटलावर एक समर्थ, ताकदवान राष्ट्र म्हणून समोर आला. उद्योगधंद्यांपासून लसीकरणापर्यंत प्रत्येक बाबतीत भारताने स्वत:चे असे वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घेतले. आणि युद्धानंतर बदललेल्या पार्श्वभूमीवर ट्रेड सेटलमेंटचे नवे धोरण रिझर्व बँकेने जुलै 2022 मधे जाहीर केले. या नवीन धोरणानुसार भारत इतर देशांशी रुपयामधे व्यवहार करेल. त्यामुळे डॉलर्स वाचतील. रशिया, इराण या देशांवर अमेरिकेने निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे ते देश रुपयात व्यवहार करत आहेतच. पण ज्या देशांकडे पुरेसे डॉलर्स नाहीत किंवा कमी आहेत ते देश रुपयामधे व्यवहार करतील.

या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व बँकेने जी नियमावली दिली आहे त्यात परकीय बँकांना वोस्ट्रो अकाउंट काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नोस्ट्रो आणि वोस्ट्रो अशी अकाउंट वापरली जातात. यात एक ऑथोराइज्ड डिलर बँक असते आणि या बँकेमधे नोस्ट्रो आणि वोस्ट्रो अकाउंट परदेशी बँकांकडून काढले जातात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत परदेशी चलनात व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते, त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. जेव्हा परदेशी बँक ऑथोराइज्ड डिलर बँकेत स्वदेशी  चलनात व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते, त्याला  वोस्ट्रो अकाउंट म्हणतात. उदा. समजा भारताची ऑथोराइज्ड डिलर बँक एस बी आय आहे असं मानलं आणि भारतात एस बी आय मधे एखाद्या इराणच्या बँकेने परदेशी चलनात म्हणजे डॉलर, युरोमधे व्यवहार कारणासाठी अकाउंट उघडलं तर त्याला नोस्ट्रो अकाउंट म्हणतात. पण जेव्हा हीच इराणची बँक भारतातील एस बी आय मधे फक्त रुपयामधे व्यवहार करण्यासाठी अकाउंट उघडते तेव्हा त्याला वोस्ट्रो अकाउंट म्हणतात. —- रिझर्व बँकेच्या या नवीन धोरणानुसार भारतात वोस्ट्रो अकाउंट काढण्यासाठी निर्देश दिले आहेत. म्हणजेच आयात निर्यातीचे व्यवहार पूर्णपणे रुपयामधे करण्यावर भर दिला आहे. 

नोव्हेंबर 2022 मधे श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेने असं म्हटलं की ते आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भारतीय रुपयाचा वापर करण्यासाठी श्रीलंकेची मध्यवर्ती बँक भारतीय रिझर्व बँकेच्या परवानगीची वाट पाहत आहेत. यात महत्वाचा मुद्दा असा आहे की श्रीलंकेने त्यांच्या Foreign Currency Basket मधे भारतीय रुपयाला प्रथम प्राधान्य देऊन अमेरिकन डॉलरला द्वितीय पसंती दिली आहे. श्रीलंकेने त्यांच्या नागरिकांना १००००डॉलर मूल्याचे भारतीय रुपये ठेवायला परवानगी दिली आहे. म्हणजे श्रीलंकन व्यापारी भारताशी रुपयात व्यवहार करतीलच, पण जे इतर देश भारतीय रुपयात व्यवहार करू इच्छितात, त्या देशांशीही भारतीय रुपयात व्यवहार करतील. आतापर्यंत भारतीय रिझर्व बँकेने रशियाबरोबर व्यापारासाठी १२ वोस्ट्रो अकाउंट, श्रीलंकेबरोबर व्यापारासाठी ५ वोस्ट्रो अकाउंट, तर मॉरिशसबरोबर व्यापारासाठी १ वोस्ट्रो अकाउंट उघडण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. काही आफ्रिकन देशही रुपयात व्यापार करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर ताजिकिस्तान, क्यूबा, लक्ज़ेंबर्ग, सुदान हे देश भारतीय रुपयात व्यापार करण्यासाठी उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात अजूनही बरेच देश रुपयात व्यापार करण्यासाठी पुढे येतील हे नक्की. आणि  याचं  कारण म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली विश्वासार्हता.

याचा परिणाम असा होईल, की रुपयाची मागणी वाढल्यामुळे रुपया स्थिर आणि भक्कम होईल. भारताची परकीय गंगाजळी (फोरेक्स रिझर्व) वाचेल. डॉलरचं  महत्त्व कमी होऊन रुपयाचं महत्व वाढेल. आज जगात पाचव्या क्रमांकाची असलेली भारताची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल.

— समाप्त —

लेखिका  – प्रा. गौरी पिंपळे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय रुपयाची जागतिक भरारी भाग – 1 – लेखिका – प्रा.गौरी पिंगळे ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

अबुधाबी, युएई येथे नुकत्याच झालेल्या (डिसेंबर 2022) इंडिया ग्लोबल फोरमच्या व्यासपीठावर बोलताना भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांना विचारलं गेलं की ब्रेटनवूडस इन्स्टिट्यूशन्स बदलण्यासाठी प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय. त्याला उत्तर देताना भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणाले की हे करायची गरज आहे. त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल. आता प्रश्न पडेल की ब्रेटनवूडस इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय ? तर दुसऱ्या महायद्धनंतर ब्रेटनवूडस येथे जगातील ४४ राष्ट्र एकत्र येऊन स्थापन झालेल्या संस्था म्हणजे जागतिक बँक (World Bank), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International monetary fund) आणि जागतिक व्यापारी संघटना (पूर्वीचे GAAT आताचे WTO). या संस्थांनी अमेरिकेला महासत्ता होण्यास मदत होईल असे निर्णय घेतले. यात सर्वात महत्वाचा भाग असा की आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी डॉलरची केलेली निवड. कोणतीही व्यवस्था ही सदासर्वकाळ एकच असू शकत नाही. त्याचप्रमाणे डॉलरकेंद्री असलेली व्यवस्थाही कायम असू शकत नाही. यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी जे देश प्रयत्नशील आहेत त्यात भारताचा वाटा मोठा आहे. 

परराष्ट्रमंत्री काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात –

Host: Did it seem to be some movement around the idea of reforming the Bretton woods Institutions (World bank ,IMF and dollarisation) ?

S.Jaishankar : Were you heartened by that? I would say it’s something needs to be done. Let me put politely…I think it’s a lot of hard work ahead of us.

१९९० ला जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं तरी याची पायाभरणी ५० च्या दशकात झाली होती. दुसऱ्या  महायुद्धानंतर बदललेल्या जागतिक राजकीय पार्श्वभूमीवर ज्या आंतरराष्ट्रीय संघटनांची स्थापना झाली, त्यांनी जी धोरणं निश्चित केली ती सगळ्या देशांसाठी सारखी होती – One Size fits All. यात  प्रत्येक देशाची स्वत:ची अशी वैशिष्टये आहेत—सांस्कृतिक, धार्मिक, भौगोलिक, ऐतिहासिक. आणि त्या वैशिष्ट्यांप्रमाणे समाज व्यवस्था आणि त्या समाज व्यवस्थेवर आधारित अर्थव्यवस्था आहे, याचा ही धोरणे ठरवणाऱ्या अर्थतज्ज्ञांना विसर पडला आणि एक नवी जागतिक अर्थव्यवस्था उदयाला आली. ही नवी जागतिक अर्थव्यवस्था पाश्चिमात्य देशांना झुकतं माप देत होती- विशेषत: अमेरिकेला. जागतिक बँक आणि  आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थांमधे तर फक्त अमेरिकेला नकाराधिकार ( Veto) देण्यात आला. म्हणजे अर्थातच महासत्ता असलेला ( त्यावेळी होऊ घातलेला) हा देश स्वत:चा जास्तीत जास्त फायदा होईल असे निर्णय घेऊ लागला. त्याचा फटका इतर देशांना बसत असला आणि कळत असलं तरी डॉलरकेंद्रीत असलेल्या जागतिक आर्थिक  व्यवस्थेला कोणताही देश आव्हान देत नव्हता. ११ सप्टेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेलाही कोणी आव्हान देऊ शकतो, हे जगाच्या लक्षात आलं. इथे महासत्तेच्या अहंला धक्का बसला. या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेलाही धक्का बसला. यातून सावरण्यासाठी क्रेडिट policies मधे बदल केले गेले. अमेरिकन लोकांच्या हातात जास्तीतजास्त डॉलर्स कसे जातील या अनुषंगाने धोरणं ठरवली गेली आणि याचा परिणाम २००८ च्या Great Financial Crisis मधे झाला. त्यावेळचे फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष असलेले Allen Greenspam यांनी सांगितलं की “आम्ही नोबेलविजेत्या अर्थतज्ञांचा (macroeconomists)  सल्ला घेऊन धोरणं आखली होती.”  मग चुकलं कुठे?

डॉलरकेंद्री अर्थव्यवस्था अस्तित्वात आणताना प्रत्येक देशाची ठराविक वैशिष्टये दुर्लक्षली गेली. आणि कोरोनानंतर संपूर्ण जग अशा एका ठिकाणी थांबलं की जागतिकीकरणातला फोलपणा जवळजवळ सगळ्या देशांच्या लक्षात आला आणि त्यानंतर झालेले जागतिक करार बघितले तर लक्षात येईल की सगळ्या देशांनी द्विपक्षीय करारावर भर दिला आणि यात आपापल्या स्थानिक चलनांना प्राधान्य दिलं. कोरोनानंतर हळूहळू जग पूर्वपदावर येत असताना रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं आणि अमेरिकेला आपलं आवडतं हत्यार मिळालं, ते म्हणजे आर्थिक निर्बंधांचं. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध जाहीर केले. रशियाकडून तेल घेणार नाही. तसेच SWIFT या बॅंकिंग प्रणालीतूनही रशियाला वगळण्यात आले. पण रशिया काही कच्या गुरूचा चेला नव्हता. शीत युद्ध आणि त्यानंतर झालेल्या विभाजनाला अमेरिका कारणीभूत आहे असे रशियाचे म्हणणे आहे. ( पुतिन असे जाहीरपणे म्हणतात की अमेरिकेने जगाला फक्त वर्चस्व दिले ). त्यामुळे खनिज तेल, वायू ,सोने ,इतर खनिजे आणि शेती उत्पादने यात संपन्न असलेल्या रशियाला निर्बंधांचा विशेष फटका बसला नाही. रशियाने इतर देशांशी द्विपक्षीय करार करायला सुरुवात केली. 

रशिया युक्रेन युद्धाने geopolitics ची दिशा बदलली, तशी आंतरराष्ट्रीय अर्थकारणाचीही दिशा बदलली. कोणत्याही युद्धाचे पडसाद हे आंतरराष्ट्रीय अर्थकारणावर होतच असतात. इंधनान्चे दर वाढण्ं,अन्नधान्य महागणं हे युद्धाचे परिणाम असतातच. पण जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या चलनाला डावलणे हा या युद्धाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे.

– क्रमशः भाग पहिला.

लेखिका  – प्रा. गौरी पिंपळे

संग्राहक – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षांचे झाले तरी अजूनही काम करतात, म्हणून बातमी होते. देव आनंदच्या चिरतरुण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते, यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयातील देखणेपण जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सिताऱ्यांत इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलीकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना, इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॅा.रघुनाथ माशेलकर.  १ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॅाक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दिसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही  आकारानेच एवढी मोठी असलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॅालिमर रिअॅक्शन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार प्राप्त.म्हणजे फक्त भारतरत्न बाकी.

असा ऋषितुल्य भारतीय ८१ व्या वयात पदार्पण करताना अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल असो.

या महान वैज्ञानिकाला ८१ व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares