सौ. विद्या पराडकर

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ ऋषितुल्य वैज्ञानिक – डॅा.रघुनाथ माशेलकर… ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षांचे झाले तरी अजूनही काम करतात, म्हणून बातमी होते. देव आनंदच्या चिरतरुण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते, यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयातील देखणेपण जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सिताऱ्यांत इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलीकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना, इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॅा.रघुनाथ माशेलकर.  १ जानेवारी २०२३ रोजी ते ८१ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून दहावीला संपूर्ण महाराष्ट्रात दुसरे आले, तर बारावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. बारावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॅाक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दिसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही  आकारानेच एवढी मोठी असलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॅालिमर रिअॅक्शन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार प्राप्त.म्हणजे फक्त भारतरत्न बाकी.

असा ऋषितुल्य भारतीय ८१ व्या वयात पदार्पण करताना अजूनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल असो.

या महान वैज्ञानिकाला ८१ व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक :अज्ञात

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments