मराठी साहित्य – विविधा ☆ विचारपुष्पातील मधुसंचय… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

🌸 विविधा 🌸

विचारपुष्पातील मधुसंचय… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

स्वामी विवेकानंद  यांचे जीवन व कार्य  याविषयी सविस्तर  माहिती देणारी ‘विचारपुष्प ‘ ही डॉ.नयना कासखेडीकर लिखित  लेखमाला नुकतीच समाप्त झाली. सुमारे सव्वावर्षाहून अधिक काळ  ही साप्ताहिक  लेखमाला चालू होती.  स्वामीजींच्या बालपणापासून  ते त्यांची जीवनज्योत मालवेपर्यंतचा जीवनपट यात त्यांनी मांडला आहे. अवघ्या एकोणचाळीस वर्षांच्या अल्पायुष्यात असामान्य  कार्य करणा-या महामानवाचे कार्य  मोजक्या शब्दमर्यादेत  लोकांपर्यंत  पोहोचवणे हे काम सोपे  नव्हते.पण सौ.कासखेडीकर  यांनी आपल्या  अन्य जबाबदार-या पार पाडून  ते पूर्ण  केले आहे.

डाॅ.नयना कासखेडीकर

स्वामीजींचे बालपण, युवावस्था, त्यांचे मानसिक द्वंद्व, जिज्ञासा, प्रखर बुद्धीमत्ता, विदेशातील कार्य अशा अनेक बाबींवर या लेखमालेतून वाचायला मिळाले. लेखमालेतील  सर्वच भागांचा आढावा घेणे शक्य  व योग्य  नसले तरी स्वामीजींचे  काही विचार, वचने ही कधीच विसरता येणार  नाहीत. त्यापैकी  काहींचा उल्लेख  इथे करावासा वाटतो.

जीवनातील ध्येयाविषयी स्वामीजी म्हणतात, “जीवनात आदर्श  हवा. प्रयत्नांची पराकाष्ठा आणि दुर्दम्य  इच्छाशक्ती असेल तर अपयशाला  यशामध्ये बदलता येते.”

शिक्षणाविषयी ते म्हणतात

“जे शिक्षण सामान्य  लोकांमध्ये चारित्र्य, बल, सेवा, तत्परता आणि साहस निर्माण करु शकत नाही, ते काय कामाचे ? ज्यामुळे सामान्य  माणूस  स्वतःच्या पायावर  उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण.”

कशासाठी वाचायचे?

“वाचनाने जीवन जगण्याचा दृष्टिकोन  मिळतो, उमेद मिळते. मन संवेदनाशील होते. एकमेकांच्या सुखदुःखाची  तीव्रता कळते. शब्दसंग्रह  वाढतो.”

स्वामीजींचे संगीताविषयीचे  ज्ञानही सखोल होते. ते स्वतः गात असत. ते म्हणत, “संगीत ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची  पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट  प्रकार आहे.”

“परिस्थिती जितकी प्रतिकूल असेल तितकी तुमच्या आंतरिक शक्तींना अधिक जाग येत असते. “हे स्वामीजींचे विधान सर्वांनाच मार्गदर्शक ठरणारे आहे.

निरासक्त, निःसंग,वैराग्यशीलता आणि विनम्रता हे स्वामीजींचे विशेष गुण. अनेक प्रसंगातून याचे दर्शन घडते.

स्वामीजींची धर्माविषयीची मते तर जाणून घेऊन  आचरणात  आणणे आवश्यक  आहे.कर्मकांडाचा अतिरेक झाल्यामुळेच  समाज रचनेत दोष निर्माण  झाला आणि त्यामुळेच संस्कृतीचा-ह्रास झाला हे त्यांचे मत परखड असले तरी सत्य आहे. “आपल्या संस्कृतीतील आध्यात्मिक  आदर्श  आपण विसरुन गेलो आहोत हे आपले खरे दारिद्र्यपण आहे. आपल्या ठायी स्वतःच्या अस्मितेचे भान उत्पन्न  होईल  तेव्हाच  आपले सारे प्रश्न  सुटतील. “स्वामीजींचे हे निरीक्षण आजही खरे ठरत आहे. सर्वधर्मसमभाव हा शब्द आपणा सर्वांनाच  माहित आहे. स्वामीजी म्हणतात, “प्रत्येकाने दुस-या धर्मातलं सारभूत तत्व ग्रहण करायचं आहे. त्याचवेळी आपलं वैशिष्ट्यही जपायचं आहे. आणि अखेर स्वतःच्या स्वाभाविक  प्रवृत्तीला अनुसरून आपला विकास  करुन घ्यायचा आहे.”

अध्यात्म आणि विज्ञान  यांचा सुरेख  संगम  व्हावा अशी इच्छा बाळगणारे  स्वामी विवेकानंद  म्हणतात, “भारताचा अध्यात्म  विचार पाश्चात्य  देशात पोहोचला पाहिजे आणि भारताने पाश्चात्यांकडून त्यांचे विज्ञान  घेतले पाहिजे.”

प्रत्येक  लेखातून  अशी नवीन  माहिती, विचार, वचने मिळत गेल्याने संपूर्ण  लेखमाला वाचनीय झाली आहे. मालिका संपली असली तरी त्यातील विचार कण वेचावेत तेवढे थोडेच  आहेत. हा सारांश नव्हे पण लेखमाला वाचल्यानंतर  आपल्याला मिळालेले इतरांनाही द्यावे, म्हणून  लिहावेसे वाटले, एवढेच !

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी… भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

  1. मध्यम वयाची एक अंध ताई. चिंचवड परिसरात एका जागी बसून भीक मागते आणि स्वतःसह आईला जगवते.बरेच दिवसांपासून मी तिला विनंती करत होतो की, ‘ बाई गं, बसून भीक मागतेस, त्याऐवजी तुला एक वजन काटा आणून देतो. लोक येतील, स्वतःचं वजन करतील आणि त्या बदल्यात तुला पैसे देतील. भिकेपेक्षा जास्त पैसे तुला वजन काट्यावर मिळतील…. तेही स्वाभिमानाने…!‘ 

…. तिला कळत होतं परंतु वळत नव्हतं…! दरवेळी वेगवेगळी कारणं देऊन ती मला टोलवत होती…

आता हिचं काही ऐकायचं नाही, असं म्हणून मग एके दिवशी डायरेक्ट वजन काटा घेऊन गेलो, तिच्या पुढ्यात ठेवला आणि गळ्यात एक पाटी अडकवली…

डोळ्यातली फक्त ज्योत विझली आहे… मनातला प्रकाश नाही….

” फक्त सृष्टी हरवली आहे… आत्मविश्वास नाही…

आम्हाला भिकेचा चंद्र नको आहे…कष्टाची भाकरी हवी  आहे…

आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या…

यानंतर सर्वप्रथम मी माझं वजन करून तिला पन्नासची नोट दिली…. बाजूला उभ्या असणाऱ्या भाविकांनी मग तिच्या गळ्यात अडकवलेली पाटी वाचून, स्वतःचं वजन करून, पैसे द्यायला सुरुवात केली….

बघता बघता… शे दीडशे रुपये पंधरा मिनिटातच जमले…. !  ती प्रचंड खुश झाली….

मला म्हणाली, ‘आदीच सांगायला पायजे हुतं ना तुमी डाक्टर, आदीपस्नच केला आस्ता ना ह्यो धंदा मी …’

.. मी चमकलो, इतक्या वेळा सांगूनही तिने यापूर्वी माझं ऐकलं नव्हतं…. आणि आज ही अशी बोलतेय…. ? 

मी तिला म्हणालो, ‘अगं बाई , पन्नास वेळा तुला सांगत होतो, तरी तू माझं त्यावेळी ऐकलं नाहीस, म्हणून आज आता डायरेक्ट हा काटा घेऊन आलो मग मी…’ 

ती हसत म्हणाली, ‘हां, त्येच तर म्हनतीया मी…. तुमी आदी नुसतेच सांगत व्हते… डायरेक्ट आज आनला तसा तवाच काटा घीवून माझ्यासमुर ठीवायाचा ना…. ??? ‘ 

‘ होय गं बाई चुकलंच माझं…. आता तो जोडा घे आणि हान माज्या टाळक्यात…’

… माझं वाक्य ऐकून आजूबाजूचे लोक हसायला लागले… पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं…. ती मिळालेले पैसे मोजण्यात व्यस्त होती…. गालातल्या गालात ती हसत होती…. ! 

हे चित्र मी जपून ठेवलंय माझ्या हृदयात… !!!

मनातलं काही

रस्त्यात पडलेली “ती” … 

६ एप्रिलला तिला व्हीलचेअर देऊन, रस्त्यातून उचलून सुस्थितीत ठेवलं…. १२ तारखेला ती अनंतात विलीन झाली…! 

६० वर्षे प्रतिकूल परिस्थितीत जगली…मात्र ६ दिवस सुद्धा अनुकूल परिस्थितीत जगू शकली नाही…! 

जगण्याने छळले होते…मरणाने सुटका केली, हेच खरं …!!!

मागेही एकदा असंच झालं होतं….

बारा वर्षे फुटपाथवर पडून असलेले बाबा…. त्यांना मुलाने घराबाहेर काढलं होतं ! बाबांना मग आंघोळ घालून, नवे कपडे घालून एका आश्रमात ठेवलं….अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बारा वर्षे ते जगत होते आणि आश्रमात ठेवल्यानंतर पुढील पंधरा दिवसात तेही गेले…. ! 

मला कळत नव्हतं…. हे असं का ? 

एके दिवशी माईला (आदरणीय श्रीमती सिंधुताई सपकाळ) हा प्रश्न विचारला. ‘ माई इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही माणसं जगतात आणि अनुकूल परिस्थिती आल्यानंतर ही माणसं निघून जातात. मला याचं खूप आश्चर्य वाटतं आणि खूप त्रासही होतो…. ! ‘ 

माईने सांगितलं, ‘अरे वाईट वाटून घेऊ नकोस… “आपलं” कुणीतरी आपल्याला भेटायला, कधीतरी येईल…  या आशेवर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःचा जीव जगवत असतात…. परंतु त्यांची “आपली माणसं” कधीच येत नाहीत…. ते शेवटपर्यंत वाट पाहतात. तू जेव्हा त्यांची मायेनं विचारपूस करतोस… जेवू घालतोस, अंघोळ घालतोस आणि त्यांना निवारा देतोस, त्यावेळी त्यांना त्यांचं हे हरवलेलं “आपलं माणूस” परत भेटल्याचा आनंद होतो… .. याच क्षणासाठी तर ते प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जगत होते…. 

शेवटाला का होईना…. परंतु “आपलं माणूस” मिळालं, या सुखाच्या कल्पनेनं, ते अगदी आनंदानं मग आपला जीव सोडतात…. ! 

माईचं हे वाक्य ऐकून, माझ्या अंगावर सर्रकन काटा आला होता….!!!

कधी अंगावर काटे आणणारं… कधी रोमांच उभे करणारं…. कधी खळखळून हसवणारं….कधी डोळ्यात पाणी उभं करणारं… तुम्हा सर्वांच्या साथीनं आणि साक्षीनं चालणारं हे काम….! 

आपली सुख दुःख आपण आपल्याच माणसांशी शेअर करतो ना ? 

आणि म्हणूनच एप्रिल महिन्याचा हा लेखा जोखा आपल्या पायाशी सविनय सादर….!!!

प्रणाम ….. 

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “अबोल झाली घरं…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

आपण एखाद्या परिचित किंवा अपरिचित घरात पाय टाकला तर कोणता अनुभव यायला हवा? त्या घरातील माणसांनी किमान “या”  असं म्हणावं!पेलाभर पाणी द्यावं.अपरिचित असू तर कोण? कुठले? अशी साधी चौकशी करावी.बरं घर म्हंटल्यावर त्या घरातील माणसांच्या बोलण्याचा, हसण्याचा, मुलांच्या ओरडण्याचा, भांडणाचा आवाज तरी कानावर पडायला नको का? पण हल्ली घरात आवाज असतो तो दूरदर्शन चा. घरं कशी अबोल झाल्यासारखी वाटतात.घरात माणसं असून ही एक वेगळीच शांतता जाणवते.या शांततेला कुठला चेहरा आहे हेही अनाकलनीय असतं.मंदीराच्या गाभा-यात जाणवणारी शांतता, ध्यान विपश्यना अशा साधनेत अनुभवायला मिळणारी शांतता,प्रचंड दडपणाखाली निर्माण झालेली शांतता किंवा एखाद्या वनराईतून संथपणे वाहणा-या नदीकाठ ची शांतता या प्रत्येक प्रसंगात, क्षणात जाणवणा-या शांततेला तिचा स्वतःचा एक चेहरा आहे, हे आवर्जून जाणवतं. पण घरात माणसं असून ही निर्माण झालेली शांतता अनुभवतांना तिचा चेहरा एकदम अनोळखी वाटायला लागतो.

आठवणीतल्या घरातलं लहानपण आठवलं की एक गोष्ट लक्षात येते की     पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती…त्यामुळेच घर कसं भरलेलं वाटायचं.मुलांची भांडणं झाली की आजी आजोबांचं कोर्ट! हट्ट पुरविणारे ही तेच! संध्याकाळी ” शुभं करोती ” म्हणजे मुलांच्या हजेरीची वेळ!संस्कृत मधील अनेक श्लोक, स्तोत्र पाठ करवून घ्यायची जबाबदारी आजोबांकडे.आणि गोष्ट सांगून मनोरंजन आजीकडे.सतत पाहुणे आणि येणा-या जाणा-यांचा राबता!त्यामुळे घरात माणसं असल्याचं जाणवायचं. घर चैतन्याचं आवार वाटायचं.आता अशी घरं आठवणीत गेलीत. पूर्वी घरात ‘आम्ही’ होतो, आता घरात ‘मी’  वास्तव्य करतांना दिसतो.’मी’  ‘मी’ मध्ये संवाद कसा होणार? गप्पा कशा रंगणार?

या ‘मी’ मुळे हल्ली शेजारधर्म ही उरला नाही. फ्लॅट पद्धतीत आपल्या आजूबाजूला, वर खाली घरं असली तरी त्या घरांचा आपल्या घराशी संपर्क नसतो. माणसांची सलगी नसते. नावही माहीत नसतात.फक्त जाता येता ओळख असल्याचं दाखवायचं… बळजबरीनं हसायचं. शेजारधर्म हा एकोपा वाढवणारा, सहकार्याची भावना जागवणारा असतो. नात्याची वीण घट्ट करणारा असतो. पण सा-याच घरात ‘मी’. मग दोष कुणाला द्यायचा?’मी ‘ आणि ‘मी’ चं मैत्र झालंयं का कधी?  ‘मी’ ला ‘आपण’ मध्ये विरघळून जायला हवं तेव्हाच मैत्र निर्माण होतं.  घर केवढं आहे याला महत्व नाही.फक्त त्यात माणसं असावीत.माणसा-माणसात आत्मीयता जिव्हाळा असावा. घरातून बाहेर गेलेल्याला घराची ओढ वाटावी.इतरांच्या सुखासाठी स्वतःतला ‘मी’ विरघळविण्याची सवय असावी. अशी माणसाला माणसांची ओढ, माणसाला घराची ओढ, घरांना घराची ओढ निर्माण झाली की ” हे विश्वचि माझे घर” म्हणणारा, ज्ञानोबा एखाद्या घरातून विश्वकल्याणाचं स्वप्न घेऊन बाहेर पडेल.कुणी सांगावं?

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी… भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

१ . तीन वर्षांपूर्वी अत्यंत वाईट अवस्थेत रस्त्यात पडलेला एक मुलगा… सर्व ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्ववत केले… तीन वर्षात एकदाही भेट झाली नाही आणि अचानक या महिन्यात एका मंगळवारी तो मला भेटला ते एका मोठ्या हॉटेलमधील शेफ म्हणून…! 

शाहरुखसारखा दिसणारा हा मुलगा, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे याचं कौतुक आहेच… पण त्याहीपेक्षा जास्त कौतुक वाटलं- जेव्हा तो म्हणाला, ‘लाचारीच्या दलदलीतून मी जरी बाहेर आलो असलो, तरी माझ्यासारखे अनेक जण अजूनही त्या दलदलीत फसले आहेत, मला त्यांना आता हात द्यायचा आहे ‘. 

— माझ्या कामात त्याला सक्रिय मदत करायची आहे… “घेता” हात आता “देता” झाला आहे, यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो ? 

‘ सलामी ‘ या माझ्या लेखात याच्याविषयी सविस्तर लिहिले आहे. तो भेटला त्यादिवशी तारीख होती ११ एप्रिल. 

२. पूर्वी मुलीला सोबत घेऊन भीक मागायला येणारी एक तरुणी. सख्ख्या भावापेक्षा मला ती जास्त मान देते. याच नात्याचा उपयोग करून, तिचे समुपदेशन केले, मुलीचे भीक मागणे नुसते थांबवले नाही…. तर तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सुध्दा आपणा सर्वांच्या सहकार्याने घेतली आहे…. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मुलगी आता दुसऱ्या वर्षात बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे. (BBA). पण मुलीला शिकायला परवानगी दिली, तरी “ती” स्वतः मात्र अजूनही भीकच मागत होती. उद्यापासून भीक मागणार नाही, काहीतरी काम शोधते… असं ती मला हसत तोंडदेखलं म्हणायची आणि परत परत भीक मागतानाच दिसायची. जगातली कोणतीही आई असो, तीला आपल्या मुलांच्या “जेवणाची” आणि संपूर्ण “जीवनाची” काळजी असतेच…! 

“मुलीचे लग्न” हा कोणत्याही आईच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय… “ती” माझ्याशी जेव्हा जेव्हा बोलायची त्या वेळेला मुलीच्या लग्नाचा हा विषय बऱ्याचदा तिच्या बोलण्यात यायचा….!  एके दिवशी मी बरोबर तोच धागा पकडला….तिला म्हणालो, ‘ मुलगी तर आता शिकते आहे, उद्या शिकून ती मोठी होईल… दिसायला छान आहे, तिला  भविष्यात चांगली चांगली स्थळं येतील… पण मला सांग मुलगी कितीही चांगली असली, तरी “भिकाऱ्याच्या मुलीशी” एखादा चांगला मुलगा का लग्न करेल ? इतक्या चांगल्या मुलीचे तुझ्यासारखी भीक मागणाऱ्या एखाद्या मुलाशी लग्न लावून देणार आहेस का ? ‘ 

“भिकाऱ्याच्या मुलीशी” या शब्दांवर देता येईल तेवढा जोर दिला….!  हा घाव तीच्या वर्मी बसला… 

ती अंतर्मुख झाली… माझ्याशी काहीही न बोलता, खाली मान घालून तिथून ती निघून गेली. 

यानंतर कित्येक दिवस त्या ठिकाणी ती मला भीक मागताना दिसली नाही.  मला वाटलं, माझ्या “जाचामुळे” भीक मागण्याची जागा तिने बदलली असेल…

यानंतर, बऱ्याच दिवसांनी ती मला दिसली, त्यावेळी तिच्या पाठीवर भलं मोठं प्लास्टिकचं पांढरं पोतं होतं…

माझ्याजवळ येऊन ती म्हणाली, ‘तुमी म्हनाले व्हते ना ? भिकाऱ्याच्या पोरीसंगं कोन लगीन करंल ? बगा मी भीक मागायची सोडली… आता भंगार येचायचं काम करते… ते इकते…! आता हुईल ना माज्या पोरीचं लगीन ? आता कुनाची हिंमत हाय तिला भिकाऱ्याची पोरगी म्हनायची….?  सांगा….’

माझ्या डोळ्यात पाणी दाटलं… एक आई मुलांच्या भवितव्यासाठी…. ठरवलं तर काय काय करू शकते…. याचं हे  जिवंत उदाहरण…. ! भंगार वेचून ते विकायचं काम सुरूच ठेव, असा मी तिला सल्ला दिला. 

माझे ज्येष्ठ मित्र श्री सुनील नातु यांच्याशी बोलताना हा विषय सहज निघाला, या तरुणीला आणखी एखादा व्यवसाय टाकून द्यावा, या हेतूने त्यांनी विकण्यासाठी इंदोरवरून तिच्यासाठी उत्तम क्वालिटीची आर्टिफिशियल ज्वेलरी आणली. तारीख होती ११ एप्रिल. 

ज्वेलरी पाहताच ती म्हणाली, ‘भंगार गोळा करून झाल्यानंतर,  झोपडपट्टीत फिरून फिरून तीतल्या पोरीस्नी मी हे दागिने इकीन…’ 

… यानंतर कृतज्ञतेने नातु सरांचे पाय धरण्यासाठी ती वाकली…. नातु सरांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले…! यानंतर ती माझ्या कानाशी आली आणि हळुच म्हणाली, ‘ यातलं एक कानातलं मला लय आवडलंय, मी घालून बगु का ? ‘ .. माझ्या कोणत्याही उत्तराची वाट न बघता, शेजारी उभ्या असलेल्या गाडीच्या काचेत पाहून, ते कानातलं घालून, ती स्वतःला निरखून निरखून पाहू लागली… जणू आजूबाजूला कुणीच नाही… अख्ख्या विश्वात “ती” एकटीच होती…! 

मी नातू सरांकडे पाहिले… ते माझ्याकडे बघून हसत होते…. त्यांच्या हातावर टाळी देत म्हणालो.. 

‘Sir, Women are Women…!‘ 

‘पटलं रे बाबा…’  म्हणत, त्यांनी टाळी स्वीकारली आणि आम्ही दोघेही हसत हसत तिथून सटकलो…!!! 

क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी” ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

इतिहासात डोकावताना “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी” बद्दल समजले ते असे —-

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला आपल्या येथील काही होतकरू तरुणांनी अमेरिकेतील बाजारपेठेत आमरस निर्यात करायचा ठरवला होता. त्या लोकांसाठी नवीन असणारा हा पदार्थ तिकडे हातोहात खपेल आणि आपल्या पदरी चार पैसे पडतील अशी त्यांची अपेक्षा होती. आपल्या येथील तेव्हाची सुप्त बाजारपेठ आणि भरघोस येणारे आंबे बघता त्यांची अपेक्षा काही चुकीची नव्हती. त्याकाळी अमेरिकेत आपला  व्यवसाय स्थिरस्थावर करण्याच्या प्रयत्नात असणारे श्री. नानासाहेब जवळकर यांनी, त्या रसाचे वितरण अमेरिकेत करण्याची जबाबदारी स्वीकारली होती. भारतातून पाठवलेले आमरसाचे पिंप जेव्हा न्यूयॉर्क किनारी आले, तेव्हा खुद्द नानासाहेब त्यांची डिलिव्हरी घ्यायला गेले होते. तिथल्या कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं “ हे काय आहे ? “ 

नानासाहेबांनी रसाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली आणि त्याची चव घेण्याचा आग्रह केला. आमरस चाखल्यावर कस्टम अधिकारी विचारात पडले आणि नानासाहेबांना म्हणाले, “ हे प्रकरण भलतंच चविष्ट आहे आणि याचं व्यसन जर इतद्देशिय लोकांना लागले तर आमचे कष्टाचे डॉलर तुमच्या देशात जाऊन तुमची अर्थव्यवस्था उभारी घेईल. आमच्या देशाच्या हितासाठी हा रस इकडे विकायची परवानगी मी देऊ शकत नाही. मला माफ करा. “ नानासाहेबांनी बऱ्याच विनवण्या केल्या पण अधिकारी बधले नाहीत. त्यांनी आमरसाची सगळी पिंपं नाल्यात ओतून दिली. या घटनेला तिकडे  “न्यूयॉर्क मँगो पल्प पार्टी”  म्हणून ओळखले जाते. त्या घटनेचा फोटो आज मी इथे पोस्ट करत आहे. आमचे मित्र उद्योगभूषण यदुनाथ जवळकर यांचे नानासाहेब हे पणजोबा. त्यांच्याकडून आम्हाला ही घटना ज्ञात झाली.

संग्राहक : श्री सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “जागतिक  परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अशी एक म्हण आहे.त्यानुसार आपल्या आवडीनिवडी, कल हा बालपणी पासून लक्षात येतो.अर्थातच ह्यात काही अंशी बदलही होतोच. माझ्या लहान बहिणीचा सेवाभावी कल ओळखून ही वैद्यकीय पेशा स्विकारुन रुग्णसेवा उत्तम करेल हे लहानपणीच लक्षात आलं.ती ह्या शिक्षणाच्या मार्गाने गेली नाही परंतु तिची रुग्णांची सेवा मनापासून करण्याची सवय मात्र अजूनही तशीच आहे. तसचं आमच्या व्हाट्सएप समुहामधील  एक सदस्या श्रुती आंबेकर ह्या तर विदेशात राहून आवडीने मनापासून रुग्णसेवा करतात ह्याच खूप कौतुक वाटतं. आज ही आठवण यायला आजचा दिवस खूप खास.

एखादी आपत्ती, संकट ह्यांचा अनुभव आल्यानंतर त्यातील गांभीर्य हे कळायला लागतं

तमाम जगाला हा अनुभव कोविड च्या येऊन गेलेल्या जीवघेण्या लाटेने दिला . ह्या अनुभवा नंतर मात्र जवळपास प्रत्येकाला “सर सलामत तो पगडी पचास”ह्या म्हणीवर विश्वास बसायला भाग पाडले. ह्या आणिबाणीच्या काळात महत्त्वाचे, विश्वासाचे जिव्हाळ्याचे तसेच  आजार,दवाखाने, रुग्ण ह्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.

12 मे .   “जागतिक परिचर्या दिन”. आज आपण ह्या दिनाच्या निमीत्ताने “जगाची सुश्रुषा”हे घोषवाक्य सत्यात उतरविणा-या सर्व परिचारीकांचे मनापासून धन्यवाद. खरतरं त्या करीत असलेल्या सेवेसाठी धन्यवाद हा शब्दच मुळी खूप तोकडा आहे.

असं म्हंटलं जातं सेवा करणं ह्या मागे बरेच वेळा स्वार्थ दडलेला असतो परंतू सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की कोरोना काळात सुद्धा अमरावती ला सरकारी दवाखान्यात आणि अनेक कोवीड आयसोलेशन सेंटर मध्ये ह्या परिचारीकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक वृद्धांची, रुग्णांची निस्वार्थ भावनेने मनापासून सेवा केली. नुसतेच औषधोपचार न करता रुग्णांना तुम्ही नक्की बरे होऊन घरी जाणार हे मनावर ठसवितं भक्कम मानसिक आधार पण दिला. विशेष म्हणजे हा चांगुलपणाचा परिचारीकांचा अनुभव एकट्यादुकट्याचा नसून अनेकांनी अनुभवला आहे. खरोखरच आपले ब्रीदवाक्य आचरणात आणून जगणाऱ्या ह्या परिचारीकांना मानाचा मुजरा.

नाइटिंगेल ह्यांचे नाव माहिती नसलेली एकही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आढळणार नाही. ह्या परिचारिका, लेखिका,संख्याशास्त्रज्ञ होत्या. 1853 मध्ये त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार केला.त्यांनी शरीरासोबतच त्यांच्या मनावरील जखमा भरून काढल्या.त्यांना लेडी विथ दी लँप ही उपाधी मिळाली.त्यांचा जन्मदिवस 12 मे हा त्यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचर्या दिन म्हणून साजरा केल्या जातो.

आजच्या दिनी कौशल्यवान,सेवाव्रती, प्रेमळ, सामाजिक कार्यात भाग घेणारी,आणि रुग्णसेवा हीच ईशसेवा मानणारी परिचारिका अरुणा शानबाग हीचेही हटकून स्मरण होतचं.

आजच्या ह्या दिनी परिचारिका नाइटिंगेल व अरुणा शानबाग ह्यांना अभिवादन करुन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ लेखाजोखा… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ लेखाजोखा… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जिंकणं हे मोरपिसासारखं हलकं असतं… कुणीही ते हसत हसत झेलू शकतं….

आणि हरण्याइतकं दुसरं ओझं या जगात कशाचंही नसतं….!  

हे ओझं पेलता पेलता, जो हसत जगतो तो खरा बलवान…. ! 

सर्व काही जिंकूनही, जगत जगत मरणारी माणसं रोज भेटतात…. 

आणि सर्वस्व हरूनही मरता मरता जगणारी माणसंही रोजच भेटतात…!

दोघांकडूनही बरंच शिकायला मिळतं…! 

हे शिकत, शिकवत… लाचारीने जगणाऱ्या लोकांना आपल्या साथीने एक हात देत आहे, त्याचाच हा एप्रिल महिन्याचा लेखाजोखा… !!!

वैद्यकीय

वैद्यकीय शिक्षण घेत असताना पुस्तकात अतिशय दुर्धर अगम्य अशा अनेक केसेस वाचलेल्या असतात… परंतु डॉक्टर झाल्यानंतर प्रत्येकाला अशा केसेस आयुष्यात कधीतरी पहायला मिळतीलच याची गॅरंटी नसते.  

रस्त्यावर काम करताना, मला मात्र महिन्याभरात किमान एकतरी अशी केस पाहायला मिळते. 

अशा केसेस मग हॉस्पिटलमध्ये नेऊन सुपर स्पेशालिस्टना दाखवाव्या लागतात, ऍडमिट करावे लागते. 

या महिन्यात असे सहा पेशंट मिळाले. इतर अनेकांबरोबर त्यांनाही ऍडमिट केले आहे. 

यातील एकाला अंतिम टप्प्यात असलेला कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले, ‘याला आधी आणलं असतं, तर आपण काहीतरी केलं असतं, आता फक्त याला वेदनामुक्त मरण देणं, इतकंच आपल्या हातात आहे….!’ 

हा मुलगा खरंतर नेपाळचा. मोठी स्वप्नं घेऊन नोकरीसाठी पुण्यात आला. गावी गरीब, वृद्ध आई-वडील आहेत, लग्न झालेलं नाही. नोकरी मिळाली, गावी पैसे पाठवू लागला, परंतु परिस्थितीच्या विळख्याने सगळंच पालटलं. आजारपण सुरू झालं, नोकरी गेली … होते नव्हते ते पैसे उपचारासाठी गेले. आई-वडिलांना पैसे पाठविणे सोडा, स्वतःच्या जगण्यासाठी सुद्धा याला भीक मागावी लागली. वेळ होती, त्यावेळी कोणीही हात दिला नाही…. आता माझ्या माध्यमातून, “तुमचा हात” त्याच्यापर्यंत पोहोचवायचा म्हटलं, तर वेळ निघून गेलेली आहे… मिनिटा मिनिटाने आयुष्य डोळ्यादेखत संपत चाललंय… मृत्यु 

उंबऱ्याबाहेर ताटकळत उभा आहे…!  समोर आपल्याशी बोलत असणारा माणूस पंधरा-वीस दिवसानंतर, “तो” आपल्यात नसणार आहे… हे आपल्याला माहित आहे…. परंतु त्याला माहीत नाही…

— हे पाहणं, अनुभवणं आणि पचवणं… वाटतं तितकं सोपं नाही, खूप वेदनादायी आहे हे ! 

समोरच्या कॉटवर असलेलं, चालतं बोलतं “शरीर”, काही दिवसानंतर “बॉडी” म्हणून पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं जाणार आहे…

श्वास असतात तेव्हा “शरीर”… श्वास थांबले की “बॉडी”, शरीर आणि बॉडी मध्ये अंतर फक्त एका श्वासाचं ! 

आज पन्नास किलो वजनाचं हे शरीर …काही दिवसानंतर मुठभर राख म्हणून तांब्यात विसावणार आहे… 

जिवंत असताना कोणी साथ नाही दिली, सोबत नाही केली, कुणीही पाठीशी नाही… पण, हा गेल्यावर मात्र याच्यामागे चालत पन्नासजण याच्या पाठीशी राहुन याला “पोचवायला” येतील…! 

जिवंत असताना याला कोणी घास भरवला नाही…. पण गेल्यावर मात्र दरवर्षी याला “घास” ठेवले जातील, न चुकता…! 

“या घासापासून” ते “त्या घासापर्यंत”, मध्ये जे काही असतं, ते आयुष्य !!!

आणि,…. आयुष्यभर तुझं – माझं करत आपण जगत राहतो, झुंजत राहतो….फक्त मुठभर राख होण्यासाठी ! 

मुठभर राख हेच अंतिम सत्य !!! 

असो. 

… दरवेळी भेटला की विचारतो, ‘डॉक्टर मैं बचुंगा ना ? बाकी कुछ नही, लेकिन मेरे मा बाप उधर है, उनके लिये मुझे जिंदा रहना पडेगा ‘, हात जोडून तो केविलवाणे जेव्हा बोलू लागतो…. तेव्हा आपल्याच आतड्याला पीळ पडतो. 

‘अरे हो रे… तुला काय झालंय मरायला ? अजून खूप काही करायचं आहे तुला… चल, असा विचार करू नकोस…’ अशी खोटी खोटी वाक्यं बोलत, त्याला उरलेले दिवस हिमतीने जगण्याची आशा दाखवत आहे. 

सर्वात जास्त वेदनादायी आहे ते हे… खोटं बोलणं…! 

कधी वाटतं, खरं खरं सांगून मोकळं व्हावं… पण नकोच, प्रत्येक जण जगतो तो आशेवर…

आपल्यालाही आपल्या मृत्यूची तारीख समजली, तर आपण आज, आत्ता या क्षणापासूनच जगणं सोडून देऊ….!…. असू दे, रोज बोलत राहीन मी खोटं ….रोज वाढवत राहीन मी त्याची आशा…एक जीव वाचला… तर रोज खोटं बोलल्याबद्दल मला मिळतील त्या शंभर शिक्षा घ्यायला मी तयार आहे… तयार आहे… !!! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे. 

… तुम्हा सर्वांचे माध्यमातून अक्षय्य तृतीयेनिमित्त किमान १००० लोकांना जेवू घातले. 

हा यज्ञ आपणा सर्वांच्या साथीने रोजच सुरू आहे. 

खराटा पलटण

जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे. ४० आज्यांची स्वच्छता टीम तयार केली आहे.  पुण्यातील विविध भाग त्यांच्याकडून स्वच्छ करून घेऊन त्यांनाही शिधा दिला आहे. आमची ही टीम पुण्याच्या स्वच्छता अभियानाची ब्रँड अँबेसिडर आहे. 

भीक नको बाई…. शिक

एप्रिल महिना म्हटलं, की परीक्षांचा आणि परीक्षांचे निकाल लागण्याचा महिना….! 

पूर्वी भीक मागणाऱ्या ५२ मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. आणि ही सर्व मुलं यावर्षी पास झाली आहेत. कुणी दुसरीतून तिसरीत गेलं…. कुणी तिसरीतून चौथीत गेलं… कोणी चौथीतून पाचवीत गेलं… 

त्यापैकी असाच एक यावर्षी इन्स्पेक्टर होणार आहे, आणि येत्या काही वर्षात कुणी सीए, कुणी बीबीए तर कुणी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर होणार आहे…! 

एका बापाला अजून काय हवं…??? 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आंतरराष्ट्रीय मातृदिन – एक बाजू अशीही…  ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

Anna Reeves Jarvis

नमस्कार मित्रांनो,  

आंतरराष्ट्रीय मदर्स डे (मे महिन्याचा दुसरा रविवार) अर्थात मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!

हा मातृदिन आजच्याच दिवशी का साजरा करतात, या प्रश्नाचा मी मागोवा घेत असता काही मनोरंजक तसेच विचारणीय माहिती हाती लागली. मदर्स डेचा सर्वात जुना इतिहास ग्रीसशी जोडल्या जातो. तिथे ग्रीक देवी देवतांच्या आईची आदराने पूजा केल्या जात होती. हे मिथक असल्याचे देखील बोलल्या जाते. मात्र आज अस्तित्वात असलेल्या मदर्स डे ची सुरुवात करण्याचे श्रेय बहुतेक जण अॅना रीव्ह्ज जार्विस (Anna Reeves Jarvis) हिलाच देतात. तिचे आपल्या आईवर (अॅन मारिया रीव्ह्ज- Ann Maria Reeves) नितांत प्रेम होते. जेव्हां तिच्या आईचे ९ मे १९०५ ला निधन झाले, तेव्हा स्वतःच्या आईबद्दल आणि सर्वच मातांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी एक दिवस असावा असे तिला प्रकर्षाने वाटायला लागले. यासाठी तिने खूप पाठपुरावा करून वेस्ट व्हर्जिनियामध्ये चळवळ सुरू केली. तीन वर्षांनी (१९०८) अँड्र्यूज मेथोडिस्ट एपिस्कोपल चर्चमध्ये प्रथम अधिकृत मदर्स डे सेलिब्रेशन आयोजित केल्या गेला. १९१४ साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी अॅना जार्विसच्या कल्पनेला मान्यता देत मे महिन्यातील प्रत्येक दुसऱ्या रविवारी राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता देणाऱ्या विधेयकावर स्वाक्षरी केली. हा दिवस मग हळू हळू अमेरिकेतून युरोपीय आणि इतर देशात आणि नंतर जगभर आंतरराष्ट्रीय मदर्स डे म्हणून मान्यता पावला.

कवी आणि लेखिका ज्युलिया वॉर्ड होवे (Julia Ward Howe) हिने या आधुनिक मातृदिनाच्या काही दशके आधी वेगळ्या कारणासाठी ‘मातृशांती दिन’ साजरा करण्याचा प्रचार केला. अमेरिका आणि युरोप मध्ये युद्ध सुरु असतांना हजारों सैनिक मारले गेले, अनेक प्रकाराने नागरिक पोळले गेले आणि आर्थिक हानी झाली ती वेगळीच. या पार्श्वभूमीवर एखादा दिवस युद्धविरोधी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मातृदिन साजरा करण्याची कल्पना जगभरात पसरली पाहिजे असे ज्युलियाला वाटत होते. तिची कल्पना होती की महिलांना वर्षातून एकदा चर्च किंवा सोशल हॉलमध्ये एकत्र येण्यासाठी, प्रवचने ऐकण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी, ईश्वरभक्तीची गीते सादर करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी प्रोत्साहित करावे व त्यांच्यासाठी असा एखादा दिवस नेमून द्यावा. या कृतीमुळे शांतता वाढेल आणि युद्धाचे संकट टळेल असे तिला वाटत होते.

मात्र ‘एकसंध शांतता-केंद्रित मदर्स डे’ साजरा करण्याचे हे सुरुवातीचे प्रयत्न मागे पडले, कारण तोंवर व्यक्तिगतरित्या मातृदिन साजरा करण्याची दुसरी संकल्पना रुजली. याला कारण होते व्यापारीकरण! नॅशनल रिटेल फेडरेशनच्या २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार, आजकाल मदर्स डे हा अमेरिकेत $२५ अब्ज इतका महागडा सुट्टीचा दिवस बनला आहे. तिथे लोक या दिवशी आईवर सर्वात जास्त खर्च करतात. ख्रिसमस आणि हनुक्का सीझन (ज्यू लोकांचा ‘सिझन ऑफ जॉय’) वगळता मदर्स डेसाठी सर्वात जास्त फुले खरेदी करण्यात येतात. या व्यतिरिक्त गिफ्ट कार्ड, भेटवस्तू, दागिने यांवर $५ अब्ज पेक्षाही अधिक खर्च केल्या जातो. या शिवाय विविध स्कीमच्या अंतर्गत स्पेशल आउटिंग सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे.

अॅना रीव्ह्ज जार्विसला याच कारणास्तव तिच्या मातृप्रेमावर आधारित कल्पनेबद्दल खेद वाटत होता. तिच्या हयातीत, ती फ्लोरिस्ट्स (फुले विकणारी इंडस्ट्री) यांच्या आक्रमक व्यापारीकरणाविरुद्ध एकाकी लढली. मात्र दुर्दैवाने त्यासाठी तिलाच तुरुंगवास घडला. या निमित्ताने मातेप्रती असलेल्या भावभावनांचा राजनैतिक गैरवापर करणे, धर्मादाय संस्थांच्या नांवाखाली निधी गोळा करणे, हे प्रकार सुद्धा तिच्या डोळ्यादेखत घडत होते. जार्विसने १९२० साली एक अत्यंत महत्वपूर्ण विचार मांडला. ती म्हणाली, ‘हा विशेष दिवस आता बोजड आणि फालतू झालाय. आईला महागडे गिफ्ट देणे, हा मदर्स डे साजरा करण्याचा योग्य मार्ग नाही.’  १९४८ साली, वयाच्या ८४ व्या वर्षी, जार्विस एका सॅनेटोरियम मध्ये एकाकी रित्या मरण पावली. तोवर तिने आपला सर्व पैसा मदर्स डे च्या सुट्टीच्या व्यापारीकरणाविरुद्ध लढण्यासाठी वापरून खर्च केला होता. मातृदिनानिमित्त मी या धाडसी आणि प्रगत विचारांनी समृद्ध अशा वीरांगना स्त्रीला नमन करते. तिचे छायाचित्र लेखाच्या सोबत जोडले आहे.

मैत्रांनो, मी ही माहिती वाचली तेव्हां माझ्या मनांत विचार आला की, खरंच या दिवशी आईची ही अपेक्षा असते कां? खरे पाहिले तर निरपेक्ष प्रेम करणे हाच स्थायी मातृभाव असतांना ते व्यक्त करण्यासाठी या तद्दन व्यापारी मनोवृत्तीला खत पाणी घालणे योग्य आहे कां? बहुतेक मातांना वाटत असते की, या दिवशी त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी फक्त वेळ काढावा, त्यांच्याशी प्रेमाचे दोन शब्द बोलावे, आईबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांच्या आठवणींना उजाळा द्यावा, गप्पा गोष्टी कराव्या अन सोबत असावे, बस! यात काडीचाही खर्च नाही.  माझ्या मते हेच सर्वात बहुमूल्य गिफ्ट असावे मदर्स डे चे अर्थात मातृदिनाचे !  

धन्यवाद !   

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? विविधा ?

☆ झुळूक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘वाटते सानुली मंद झुळुक मी व्हावे,घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे’माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसलं की मन असे स्वैर पणे फिरत असते! सध्या बाहेर फिरणे कमी झाले आहे,पण या बाल्कनीतल्या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येते! दिवसभराच्या उन्हाच्या काहिलीनंतर येणारी संध्याकाळची वार्याची झुळुक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते!थंडी किंवा पावसाळ्यात या झुळुकेचे तितके महत्त्व नाही,

पण उन्हाळ्यात ही झुळुक खूपच छान वाटते. दु:खानंतर येणारं सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!सतत सुखाच्या झुल्यावर झुलणार्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्या नंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला आनंद देतात आणि गार वार्याच्या झुळुकीचा आनंद देतात!

हीच झुळुक कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही, पण दुसऱ्या कुणाकडून तरी,अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र मैत्रिणींकडून मिळते.

तो प्रेमाचा सुखद ओलावा त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळुक असते.

कधीं कधीं साध्या साध्या गोष्टीतून ही आपण आनंद घेतो.

गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते तेव्हा खिडकीतून येणारी वार्याची झुळुक आपल्याला ‘हुश्श् ‘ करायला लावते! कधीं अशी झुळुक एखाद्या बातमी तून मिळते! अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळूक च असते. माणसाचे आयुष्य सतत बदलते असते. कधी एका पाठोपाठ एक इतकी संकटे येतात की या सर्वाला कसे तोंड द्यावे कळत नाही, पण अशावेळी अचानक पणे एखादी चांगली गोष्ट घडते की त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते.

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवर्या चा अॅक्सिडेंट झाला. जीव बचावला, पण हाॅस्पिटलमध्ये दोन महिने पडून रहावे लागले. दोन लहान मुलं होती तिला, नवर्याचा व्यवसाय बंद पडलेला,रहायला घर होते, पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरी चा काॅल आला,ट्रेनिंगसाठी एक महिना जावं लागणार होतं,मुलांना कुणाजवळ तरी सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली. नोकरी कायम स्वरुपी झाली. आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळवार्यात झाडं, घरं, माणसं सारीच कोलमडतात. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात

असतेच असे नाही, पण झुळुक ही सौम्य असते. ती मनाला शांति देते.

लहानपणी अशी झुळुक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा,आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळुकीसारखा वाटायचा. रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकंफुलकं पीस व्हायचं आणि वार्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळुक अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात,वेगवेगळ्या रूपात ही ‘झुळुक’ आपल्या ला साथ देते. कधी कधी

आपण संकटाच्या कल्पनेनेही टेंशन घेतो. प्रत्यक्ष संकट रहातं दूर, पण आपलं मन मात्र जड झालेले असते. अचानक कुणीतरी सहाय्य करतं,संकट जाते आणि एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

मध्यंतरी कोरोनाच्या काळात आपण कठीण काळातून जात होतो. मन साशंक झाले होते., अस्थिर होते.

जीविताची काळजी तर होतीच, पण भविष्याची होती. अचानकपणे आलेल्या कोरोनाच्या संकटाला तोंड देताना लोक अगदी हवालदिल झाले होते. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! रोजच्या बातम्या आपल्या ला आशा – निराशेवर झुलवत होत्या. लवकरच हे ‘कोरोना’ चे संकट दूर होईल असं ऐकलं की समाधानाची झुळुक येत होती तर पुढील दहा दिवस धोकादायक आहेत ऐकलं की मनात ्वादळ उठतं होतं!आता हे रोगाचं उच्चाटन हळूहळू होत जाईल ही आशा आपल्या मनी होती. निसर्गाने हिरावून घेतलेलं आपलं स्वातंत्र्य परत मिळवून आपण जर जाणीवपूर्वक वापरले तरंच आपल्याला ही सुखाची झुळूक मिळणार! याची जाणीव माणसाला होत होती.

संध्याकाळी येणारी वाऱ्याची झुळूक ही अशीच सौम्य,आनंद देणारी आहे. तिच्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि त्यांचे थैमान नसते. ती हळूहळू अंगात भिनते. तिचा आस्वाद घेता आला पाहिजे.

कोरोनाचे वादळ घोंघावत होतं ते हळूहळू शांत होत गेले. लोकांनी संयमाने आणि धीराने तोंड दिले.

अशावेळी कुठून तरी आशादायी स्वर येतात, ‘दिस येतील, दिस जातील. . . गाण्याचे! हे संकटाचे वादळ जाऊन झुळुक येईल आशेची, आनंदाची!

वादळ जेव्हा परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधी तरी ते लयाला जाणारच असते!

ते वादळ जाऊन शांत झुळूक येईल या आशेवर प्रत्येक भारतीय आलेल्या वादळाला धीराने,संयमाने तोंड देऊन त्या शीतल झुळुकीचे सर्वांत करण्यास तयार होता! सुदैवाने त्या कोरोनाच्या वादळाला आपण धैर्याने तोंड दिले आणि ती जीवनातील शीतल झुळूक अनुभवता आली हे आपले भाग्यच!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

☆ माझी फजिती !… लेखक – श्री सुहास  टिल्लू ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

माझी फजिती !

सन 1969 मधे 1 मे रोजी अस्मादिक विवाहबद्ध झाले. जागतिक कामगार दिनाचा मुहूर्त साधून, जन्मभरासाठी स्वतःला वेठीला धरून ठेवले.मी एक वेठबिगार झालो. एक आझाद पँछी पिंजडेमें बंद हो गया !

आमचे लग्न म्हणजे, पूरब पश्चिम असा प्रकार होते, कारण मी राजस्थानात कोट्याला नोकरी करत होतो. तर ही छत्तीसगड मधील रायपूरची !

‘नेमेची येतो मग पावसाळा ‘… प्रमाणेच नेमेची येणारा चातुर्मास फार लवकर आला. हिला माहेरी घेऊन जाण्यासाठी सासू- सासरे आले होते.

‘अभी अभी तो आयीं हो

अभी अभी जाना है ।’

असे सगळे होते.

मग विरह म्हणजे काय असतो, ते कळले. कारण बाईसाहेब गणपतीपर्यंत नसणार होत्या.  घरच्या गणपती करता म्हणून ही मुंबईला येणार होती. व मीसुद्धा मुंबईला जाणार होतो. तोपर्यंत हा विरह सहन करावा लागणार होता…. ज्यावर्षी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचवर्षी एक व्याकूळ चकोर, चंद्रमेच्या अमृतकणांकरता प्यासा झाला होता !

थोडेसे विषयांतर ! विरहव्यथेचे व लेखणीचे काय साटेलोटे आहे, देवजाणे ! लेखणी हाती घेतली की ती लगेच झरझरा कागदांवर शब्दांचा पाऊस पाडते.

त्या काळात पत्र लिहिणे हा संपर्कात रहाण्याचा एकमेव पर्याय होता. विरहव्यथा इतकी जबरदस्त होती की, बायकोला पत्र लिहायला सुरुवात केली की दहाबारा पाने कधी लिहून संपत ते कळत नसे. एका मोठ्या लिफाफ्यात ते पत्र घालावे लागत असे व वजन जास्त झाल्याने जास्तीची टपाल तिकीटे लावावी लागत. ते पत्र रायपूरला जेव्हा डिलिव्हर होई, तेव्हा ते उघडून पुन्हा बंद केले आहे हे लक्षात येत असे. त्याबाबत फिर्याद केली तेव्हा पोस्ट ऑफिसकडून एक विलक्षण कारण सांगण्यात आले…’ राजस्थानातून अफूची तस्करी करण्यासाठी असे जाडजूड लिफाफे वापरले जातात म्हणून आम्ही ते उघडून पहातो.’   त्या भागात मराठी माणसांची संख्या बरीच जास्त आहे. कुणी मराठी कर्मचारी जर आतला मजकूरही वाचत असेल तर त्याला चंद्रकांत काकोडकरांचे लिखाण वाचण्याचा आनंद मिळाला असेल.

माझे एक चुलत सासरे पोस्टातच नोकरीला होते. त्यांनी ह्याला पुष्टी दिली होती. हे काका मुंबईतच रहात होते. व लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडे जाण्याचा योग आला नसल्याने, त्यांनी अगदी आग्रहपूर्वक जावयाला व पुतणीला भोजनाचे निमंत्रण दिले होते. चुलत सासूबाई आमच्या चौल अलिबागकडल्या होत्या. त्यामुळे त्यांना जावयाचे जरा जास्त कौतुक होते. त्यांनी जेवणाचा बेत खास ‘अष्टाघरी ‘ केला होता…. जावयास जेवणात ब-याच खोड्या आहेत हे माहीत नसणे स्वाभाविक होते.

भरपूर ओला नारळ वापरून सगळे पदार्थ केले होते. पानगी, खांडवी, व डाळिब्यांची उसळ असा मेनू होता. ह्या डाळिंब्यांना बिरडे असेही म्हणतात. मी आजवरच्या आयुष्यात डाळिंब्या किंवा वाल पानावर घेतले नव्हते. चाखून पहाण्याचा तर प्रश्नच नव्हता ! तर सासूबाईंना शंभर टक्के खात्री होती की, जावयाला त्या डाळिंब्या नक्कीच आवडत असणार !!  खरेतर डाळिंब्या खूपच चविष्ट झाल्या होत्या. किंचित गोडसर, गुळचट व भरपूर ओला नारळ घातला होता. भिडस्तपणामुळे आज मला त्या खाणे भाग होते. ‘ पानावर वाढलेले सगळे संपवलेच पाहिजेत ‘ ही घरची शिस्त असल्याने, मी पहिल्या घासातच वाढलेल्या डाळिंब्या खाऊन टाकल्या व इतर आवडीच्या पदार्थांचा समाचार घेऊ लागलो. आणि तिथेच ब्रह्म घोटाळा झाला होता….. 

…. सासूबाई माझ्या पानावर लक्ष ठेवून होत्या. त्या डाळिंब्यांचा वाडगा घेऊन पुढे सरसावल्या व ” मला खात्री होती की डाळिंब्या तुम्हाला खूप आवडत  असतील,” असे म्हणत त्यांनी संपूर्ण वाडगा माझ्या पानात रिकामा केला. … ‘ पानात काहीही टाकायचे नाही. शेवटी पान चाटून स्वच्छ करायचे ‘ अशा शिस्तीचे पालन करणे आवश्यक होते. काय करणार ! आलिया भोगासी सादर होण्यावाचून गत्यंतरच नव्हते.! आयुष्यात मी डाळिंब्या खायला सुरवात अशा जम्बो क्वांटिटीने केली होती.

मंडळी, नंतरच्या आयुष्यात मात्र जे पदार्थ ह्या ‘ आझाद पंछीने ‘ चाखलेही नव्हते ते, पिंजडेके पंछीला न कटकट करता खाण्याची सवय लावली गेली, हे वेगळे सांगायला नकोच !

ह्या आझाद पंछीला जिने  पिंज-यात बंद केले, ती काय म्हणते पहा !

(तिचे शिक्षण हिंदीत झाल्याने तिची भाषा अशी झाली आहे)…. 

“ शादीके लिये श्रमिक दिन फायनल केला

मैने एक लडका हेरून ठेवला

उडता पंछी पिंजडेमे बंद केला

आयुष्यभरच्या आरामाचा मुहूर्त साधला “ …. 

– इति मंगल टिल्लू

लेखक : श्री सुहास टिल्लू

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares