सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “जागतिक परिचर्या दिन…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अशी एक म्हण आहे.त्यानुसार आपल्या आवडीनिवडी, कल हा बालपणी पासून लक्षात येतो.अर्थातच ह्यात काही अंशी बदलही होतोच. माझ्या लहान बहिणीचा सेवाभावी कल ओळखून ही वैद्यकीय पेशा स्विकारुन रुग्णसेवा उत्तम करेल हे लहानपणीच लक्षात आलं.ती ह्या शिक्षणाच्या मार्गाने गेली नाही परंतु तिची रुग्णांची सेवा मनापासून करण्याची सवय मात्र अजूनही तशीच आहे. तसचं आमच्या व्हाट्सएप समुहामधील  एक सदस्या श्रुती आंबेकर ह्या तर विदेशात राहून आवडीने मनापासून रुग्णसेवा करतात ह्याच खूप कौतुक वाटतं. आज ही आठवण यायला आजचा दिवस खूप खास.

एखादी आपत्ती, संकट ह्यांचा अनुभव आल्यानंतर त्यातील गांभीर्य हे कळायला लागतं

तमाम जगाला हा अनुभव कोविड च्या येऊन गेलेल्या जीवघेण्या लाटेने दिला . ह्या अनुभवा नंतर मात्र जवळपास प्रत्येकाला “सर सलामत तो पगडी पचास”ह्या म्हणीवर विश्वास बसायला भाग पाडले. ह्या आणिबाणीच्या काळात महत्त्वाचे, विश्वासाचे जिव्हाळ्याचे तसेच  आजार,दवाखाने, रुग्ण ह्यांच्याशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.

12 मे .   “जागतिक परिचर्या दिन”. आज आपण ह्या दिनाच्या निमीत्ताने “जगाची सुश्रुषा”हे घोषवाक्य सत्यात उतरविणा-या सर्व परिचारीकांचे मनापासून धन्यवाद. खरतरं त्या करीत असलेल्या सेवेसाठी धन्यवाद हा शब्दच मुळी खूप तोकडा आहे.

असं म्हंटलं जातं सेवा करणं ह्या मागे बरेच वेळा स्वार्थ दडलेला असतो परंतू सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की कोरोना काळात सुद्धा अमरावती ला सरकारी दवाखान्यात आणि अनेक कोवीड आयसोलेशन सेंटर मध्ये ह्या परिचारीकांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अनेक वृद्धांची, रुग्णांची निस्वार्थ भावनेने मनापासून सेवा केली. नुसतेच औषधोपचार न करता रुग्णांना तुम्ही नक्की बरे होऊन घरी जाणार हे मनावर ठसवितं भक्कम मानसिक आधार पण दिला. विशेष म्हणजे हा चांगुलपणाचा परिचारीकांचा अनुभव एकट्यादुकट्याचा नसून अनेकांनी अनुभवला आहे. खरोखरच आपले ब्रीदवाक्य आचरणात आणून जगणाऱ्या ह्या परिचारीकांना मानाचा मुजरा.

नाइटिंगेल ह्यांचे नाव माहिती नसलेली एकही व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रात आढळणार नाही. ह्या परिचारिका, लेखिका,संख्याशास्त्रज्ञ होत्या. 1853 मध्ये त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार केला.त्यांनी शरीरासोबतच त्यांच्या मनावरील जखमा भरून काढल्या.त्यांना लेडी विथ दी लँप ही उपाधी मिळाली.त्यांचा जन्मदिवस 12 मे हा त्यांच्या सन्मानार्थ जागतिक परिचर्या दिन म्हणून साजरा केल्या जातो.

आजच्या दिनी कौशल्यवान,सेवाव्रती, प्रेमळ, सामाजिक कार्यात भाग घेणारी,आणि रुग्णसेवा हीच ईशसेवा मानणारी परिचारिका अरुणा शानबाग हीचेही हटकून स्मरण होतचं.

आजच्या ह्या दिनी परिचारिका नाइटिंगेल व अरुणा शानबाग ह्यांना अभिवादन करुन आजच्या पोस्टची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments