डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ लेखाजोखा… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

जिंकणं हे मोरपिसासारखं हलकं असतं… कुणीही ते हसत हसत झेलू शकतं….

आणि हरण्याइतकं दुसरं ओझं या जगात कशाचंही नसतं….!  

हे ओझं पेलता पेलता, जो हसत जगतो तो खरा बलवान…. ! 

सर्व काही जिंकूनही, जगत जगत मरणारी माणसं रोज भेटतात…. 

आणि सर्वस्व हरूनही मरता मरता जगणारी माणसंही रोजच भेटतात…!

दोघांकडूनही बरंच शिकायला मिळतं…! 

हे शिकत, शिकवत… लाचारीने जगणाऱ्या लोकांना आपल्या साथीने एक हात देत आहे, त्याचाच हा एप्रिल महिन्याचा लेखाजोखा… !!!

वैद्यकीय

वैद्यकीय शिक्षण घेत असताना पुस्तकात अतिशय दुर्धर अगम्य अशा अनेक केसेस वाचलेल्या असतात… परंतु डॉक्टर झाल्यानंतर प्रत्येकाला अशा केसेस आयुष्यात कधीतरी पहायला मिळतीलच याची गॅरंटी नसते.  

रस्त्यावर काम करताना, मला मात्र महिन्याभरात किमान एकतरी अशी केस पाहायला मिळते. 

अशा केसेस मग हॉस्पिटलमध्ये नेऊन सुपर स्पेशालिस्टना दाखवाव्या लागतात, ऍडमिट करावे लागते. 

या महिन्यात असे सहा पेशंट मिळाले. इतर अनेकांबरोबर त्यांनाही ऍडमिट केले आहे. 

यातील एकाला अंतिम टप्प्यात असलेला कॅन्सर आहे. डॉक्टर म्हणाले, ‘याला आधी आणलं असतं, तर आपण काहीतरी केलं असतं, आता फक्त याला वेदनामुक्त मरण देणं, इतकंच आपल्या हातात आहे….!’ 

हा मुलगा खरंतर नेपाळचा. मोठी स्वप्नं घेऊन नोकरीसाठी पुण्यात आला. गावी गरीब, वृद्ध आई-वडील आहेत, लग्न झालेलं नाही. नोकरी मिळाली, गावी पैसे पाठवू लागला, परंतु परिस्थितीच्या विळख्याने सगळंच पालटलं. आजारपण सुरू झालं, नोकरी गेली … होते नव्हते ते पैसे उपचारासाठी गेले. आई-वडिलांना पैसे पाठविणे सोडा, स्वतःच्या जगण्यासाठी सुद्धा याला भीक मागावी लागली. वेळ होती, त्यावेळी कोणीही हात दिला नाही…. आता माझ्या माध्यमातून, “तुमचा हात” त्याच्यापर्यंत पोहोचवायचा म्हटलं, तर वेळ निघून गेलेली आहे… मिनिटा मिनिटाने आयुष्य डोळ्यादेखत संपत चाललंय… मृत्यु 

उंबऱ्याबाहेर ताटकळत उभा आहे…!  समोर आपल्याशी बोलत असणारा माणूस पंधरा-वीस दिवसानंतर, “तो” आपल्यात नसणार आहे… हे आपल्याला माहित आहे…. परंतु त्याला माहीत नाही…

— हे पाहणं, अनुभवणं आणि पचवणं… वाटतं तितकं सोपं नाही, खूप वेदनादायी आहे हे ! 

समोरच्या कॉटवर असलेलं, चालतं बोलतं “शरीर”, काही दिवसानंतर “बॉडी” म्हणून पांढऱ्या कपड्यात गुंडाळलं जाणार आहे…

श्वास असतात तेव्हा “शरीर”… श्वास थांबले की “बॉडी”, शरीर आणि बॉडी मध्ये अंतर फक्त एका श्वासाचं ! 

आज पन्नास किलो वजनाचं हे शरीर …काही दिवसानंतर मुठभर राख म्हणून तांब्यात विसावणार आहे… 

जिवंत असताना कोणी साथ नाही दिली, सोबत नाही केली, कुणीही पाठीशी नाही… पण, हा गेल्यावर मात्र याच्यामागे चालत पन्नासजण याच्या पाठीशी राहुन याला “पोचवायला” येतील…! 

जिवंत असताना याला कोणी घास भरवला नाही…. पण गेल्यावर मात्र दरवर्षी याला “घास” ठेवले जातील, न चुकता…! 

“या घासापासून” ते “त्या घासापर्यंत”, मध्ये जे काही असतं, ते आयुष्य !!!

आणि,…. आयुष्यभर तुझं – माझं करत आपण जगत राहतो, झुंजत राहतो….फक्त मुठभर राख होण्यासाठी ! 

मुठभर राख हेच अंतिम सत्य !!! 

असो. 

… दरवेळी भेटला की विचारतो, ‘डॉक्टर मैं बचुंगा ना ? बाकी कुछ नही, लेकिन मेरे मा बाप उधर है, उनके लिये मुझे जिंदा रहना पडेगा ‘, हात जोडून तो केविलवाणे जेव्हा बोलू लागतो…. तेव्हा आपल्याच आतड्याला पीळ पडतो. 

‘अरे हो रे… तुला काय झालंय मरायला ? अजून खूप काही करायचं आहे तुला… चल, असा विचार करू नकोस…’ अशी खोटी खोटी वाक्यं बोलत, त्याला उरलेले दिवस हिमतीने जगण्याची आशा दाखवत आहे. 

सर्वात जास्त वेदनादायी आहे ते हे… खोटं बोलणं…! 

कधी वाटतं, खरं खरं सांगून मोकळं व्हावं… पण नकोच, प्रत्येक जण जगतो तो आशेवर…

आपल्यालाही आपल्या मृत्यूची तारीख समजली, तर आपण आज, आत्ता या क्षणापासूनच जगणं सोडून देऊ….!…. असू दे, रोज बोलत राहीन मी खोटं ….रोज वाढवत राहीन मी त्याची आशा…एक जीव वाचला… तर रोज खोटं बोलल्याबद्दल मला मिळतील त्या शंभर शिक्षा घ्यायला मी तयार आहे… तयार आहे… !!! 

अन्नपूर्णा प्रकल्प

रस्त्यावर असहायपणे पडून असणारे आणि दवाखान्यात उपचार घेत असणारे असे दयनीय अवस्थेत जगणाऱ्या लोकांना अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रोज अन्नदान केले आहे. सणावाराच्या दिवशी आपल्या घरी काहीतरी गोड असतं….. याच धर्तीवर, सणावाराला त्यांना गोडाचे जेवण दिले आहे. 

… तुम्हा सर्वांचे माध्यमातून अक्षय्य तृतीयेनिमित्त किमान १००० लोकांना जेवू घातले. 

हा यज्ञ आपणा सर्वांच्या साथीने रोजच सुरू आहे. 

खराटा पलटण

जी मंडळी भीक मागणे सोडून काम करायला लागली आहेत त्यांना वेळोवेळी कोरडा शिधा / किराणा दिला आहे. ४० आज्यांची स्वच्छता टीम तयार केली आहे.  पुण्यातील विविध भाग त्यांच्याकडून स्वच्छ करून घेऊन त्यांनाही शिधा दिला आहे. आमची ही टीम पुण्याच्या स्वच्छता अभियानाची ब्रँड अँबेसिडर आहे. 

भीक नको बाई…. शिक

एप्रिल महिना म्हटलं, की परीक्षांचा आणि परीक्षांचे निकाल लागण्याचा महिना….! 

पूर्वी भीक मागणाऱ्या ५२ मुलांना शैक्षणिक मदत करत आहोत. आणि ही सर्व मुलं यावर्षी पास झाली आहेत. कुणी दुसरीतून तिसरीत गेलं…. कुणी तिसरीतून चौथीत गेलं… कोणी चौथीतून पाचवीत गेलं… 

त्यापैकी असाच एक यावर्षी इन्स्पेक्टर होणार आहे, आणि येत्या काही वर्षात कुणी सीए, कुणी बीबीए तर कुणी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर होणार आहे…! 

एका बापाला अजून काय हवं…??? 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments