डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

  1. मध्यम वयाची एक अंध ताई. चिंचवड परिसरात एका जागी बसून भीक मागते आणि स्वतःसह आईला जगवते.बरेच दिवसांपासून मी तिला विनंती करत होतो की, ‘ बाई गं, बसून भीक मागतेस, त्याऐवजी तुला एक वजन काटा आणून देतो. लोक येतील, स्वतःचं वजन करतील आणि त्या बदल्यात तुला पैसे देतील. भिकेपेक्षा जास्त पैसे तुला वजन काट्यावर मिळतील…. तेही स्वाभिमानाने…!‘ 

…. तिला कळत होतं परंतु वळत नव्हतं…! दरवेळी वेगवेगळी कारणं देऊन ती मला टोलवत होती…

आता हिचं काही ऐकायचं नाही, असं म्हणून मग एके दिवशी डायरेक्ट वजन काटा घेऊन गेलो, तिच्या पुढ्यात ठेवला आणि गळ्यात एक पाटी अडकवली…

डोळ्यातली फक्त ज्योत विझली आहे… मनातला प्रकाश नाही….

” फक्त सृष्टी हरवली आहे… आत्मविश्वास नाही…

आम्हाला भिकेचा चंद्र नको आहे…कष्टाची भाकरी हवी  आहे…

आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या…

यानंतर सर्वप्रथम मी माझं वजन करून तिला पन्नासची नोट दिली…. बाजूला उभ्या असणाऱ्या भाविकांनी मग तिच्या गळ्यात अडकवलेली पाटी वाचून, स्वतःचं वजन करून, पैसे द्यायला सुरुवात केली….

बघता बघता… शे दीडशे रुपये पंधरा मिनिटातच जमले…. !  ती प्रचंड खुश झाली….

मला म्हणाली, ‘आदीच सांगायला पायजे हुतं ना तुमी डाक्टर, आदीपस्नच केला आस्ता ना ह्यो धंदा मी …’

.. मी चमकलो, इतक्या वेळा सांगूनही तिने यापूर्वी माझं ऐकलं नव्हतं…. आणि आज ही अशी बोलतेय…. ? 

मी तिला म्हणालो, ‘अगं बाई , पन्नास वेळा तुला सांगत होतो, तरी तू माझं त्यावेळी ऐकलं नाहीस, म्हणून आज आता डायरेक्ट हा काटा घेऊन आलो मग मी…’ 

ती हसत म्हणाली, ‘हां, त्येच तर म्हनतीया मी…. तुमी आदी नुसतेच सांगत व्हते… डायरेक्ट आज आनला तसा तवाच काटा घीवून माझ्यासमुर ठीवायाचा ना…. ??? ‘ 

‘ होय गं बाई चुकलंच माझं…. आता तो जोडा घे आणि हान माज्या टाळक्यात…’

… माझं वाक्य ऐकून आजूबाजूचे लोक हसायला लागले… पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं…. ती मिळालेले पैसे मोजण्यात व्यस्त होती…. गालातल्या गालात ती हसत होती…. ! 

हे चित्र मी जपून ठेवलंय माझ्या हृदयात… !!!

मनातलं काही

रस्त्यात पडलेली “ती” … 

६ एप्रिलला तिला व्हीलचेअर देऊन, रस्त्यातून उचलून सुस्थितीत ठेवलं…. १२ तारखेला ती अनंतात विलीन झाली…! 

६० वर्षे प्रतिकूल परिस्थितीत जगली…मात्र ६ दिवस सुद्धा अनुकूल परिस्थितीत जगू शकली नाही…! 

जगण्याने छळले होते…मरणाने सुटका केली, हेच खरं …!!!

मागेही एकदा असंच झालं होतं….

बारा वर्षे फुटपाथवर पडून असलेले बाबा…. त्यांना मुलाने घराबाहेर काढलं होतं ! बाबांना मग आंघोळ घालून, नवे कपडे घालून एका आश्रमात ठेवलं….अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बारा वर्षे ते जगत होते आणि आश्रमात ठेवल्यानंतर पुढील पंधरा दिवसात तेही गेले…. ! 

मला कळत नव्हतं…. हे असं का ? 

एके दिवशी माईला (आदरणीय श्रीमती सिंधुताई सपकाळ) हा प्रश्न विचारला. ‘ माई इतक्या प्रतिकूल परिस्थितीत ही माणसं जगतात आणि अनुकूल परिस्थिती आल्यानंतर ही माणसं निघून जातात. मला याचं खूप आश्चर्य वाटतं आणि खूप त्रासही होतो…. ! ‘ 

माईने सांगितलं, ‘अरे वाईट वाटून घेऊ नकोस… “आपलं” कुणीतरी आपल्याला भेटायला, कधीतरी येईल…  या आशेवर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वतःचा जीव जगवत असतात…. परंतु त्यांची “आपली माणसं” कधीच येत नाहीत…. ते शेवटपर्यंत वाट पाहतात. तू जेव्हा त्यांची मायेनं विचारपूस करतोस… जेवू घालतोस, अंघोळ घालतोस आणि त्यांना निवारा देतोस, त्यावेळी त्यांना त्यांचं हे हरवलेलं “आपलं माणूस” परत भेटल्याचा आनंद होतो… .. याच क्षणासाठी तर ते प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा जगत होते…. 

शेवटाला का होईना…. परंतु “आपलं माणूस” मिळालं, या सुखाच्या कल्पनेनं, ते अगदी आनंदानं मग आपला जीव सोडतात…. ! 

माईचं हे वाक्य ऐकून, माझ्या अंगावर सर्रकन काटा आला होता….!!!

कधी अंगावर काटे आणणारं… कधी रोमांच उभे करणारं…. कधी खळखळून हसवणारं….कधी डोळ्यात पाणी उभं करणारं… तुम्हा सर्वांच्या साथीनं आणि साक्षीनं चालणारं हे काम….! 

आपली सुख दुःख आपण आपल्याच माणसांशी शेअर करतो ना ? 

आणि म्हणूनच एप्रिल महिन्याचा हा लेखा जोखा आपल्या पायाशी सविनय सादर….!!!

प्रणाम ….. 

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments