डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिक्षेकरी ते कष्टकरी भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

१ . तीन वर्षांपूर्वी अत्यंत वाईट अवस्थेत रस्त्यात पडलेला एक मुलगा… सर्व ट्रीटमेंट देऊन त्याला पूर्ववत केले… तीन वर्षात एकदाही भेट झाली नाही आणि अचानक या महिन्यात एका मंगळवारी तो मला भेटला ते एका मोठ्या हॉटेलमधील शेफ म्हणून…! 

शाहरुखसारखा दिसणारा हा मुलगा, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभा आहे याचं कौतुक आहेच… पण त्याहीपेक्षा जास्त कौतुक वाटलं- जेव्हा तो म्हणाला, ‘लाचारीच्या दलदलीतून मी जरी बाहेर आलो असलो, तरी माझ्यासारखे अनेक जण अजूनही त्या दलदलीत फसले आहेत, मला त्यांना आता हात द्यायचा आहे ‘. 

— माझ्या कामात त्याला सक्रिय मदत करायची आहे… “घेता” हात आता “देता” झाला आहे, यापेक्षा दुसरा आनंद कोणता असू शकतो ? 

‘ सलामी ‘ या माझ्या लेखात याच्याविषयी सविस्तर लिहिले आहे. तो भेटला त्यादिवशी तारीख होती ११ एप्रिल. 

२. पूर्वी मुलीला सोबत घेऊन भीक मागायला येणारी एक तरुणी. सख्ख्या भावापेक्षा मला ती जास्त मान देते. याच नात्याचा उपयोग करून, तिचे समुपदेशन केले, मुलीचे भीक मागणे नुसते थांबवले नाही…. तर तिच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी सुध्दा आपणा सर्वांच्या सहकार्याने घेतली आहे…. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की मुलगी आता दुसऱ्या वर्षात बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करत आहे. (BBA). पण मुलीला शिकायला परवानगी दिली, तरी “ती” स्वतः मात्र अजूनही भीकच मागत होती. उद्यापासून भीक मागणार नाही, काहीतरी काम शोधते… असं ती मला हसत तोंडदेखलं म्हणायची आणि परत परत भीक मागतानाच दिसायची. जगातली कोणतीही आई असो, तीला आपल्या मुलांच्या “जेवणाची” आणि संपूर्ण “जीवनाची” काळजी असतेच…! 

“मुलीचे लग्न” हा कोणत्याही आईच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय… “ती” माझ्याशी जेव्हा जेव्हा बोलायची त्या वेळेला मुलीच्या लग्नाचा हा विषय बऱ्याचदा तिच्या बोलण्यात यायचा….!  एके दिवशी मी बरोबर तोच धागा पकडला….तिला म्हणालो, ‘ मुलगी तर आता शिकते आहे, उद्या शिकून ती मोठी होईल… दिसायला छान आहे, तिला  भविष्यात चांगली चांगली स्थळं येतील… पण मला सांग मुलगी कितीही चांगली असली, तरी “भिकाऱ्याच्या मुलीशी” एखादा चांगला मुलगा का लग्न करेल ? इतक्या चांगल्या मुलीचे तुझ्यासारखी भीक मागणाऱ्या एखाद्या मुलाशी लग्न लावून देणार आहेस का ? ‘ 

“भिकाऱ्याच्या मुलीशी” या शब्दांवर देता येईल तेवढा जोर दिला….!  हा घाव तीच्या वर्मी बसला… 

ती अंतर्मुख झाली… माझ्याशी काहीही न बोलता, खाली मान घालून तिथून ती निघून गेली. 

यानंतर कित्येक दिवस त्या ठिकाणी ती मला भीक मागताना दिसली नाही.  मला वाटलं, माझ्या “जाचामुळे” भीक मागण्याची जागा तिने बदलली असेल…

यानंतर, बऱ्याच दिवसांनी ती मला दिसली, त्यावेळी तिच्या पाठीवर भलं मोठं प्लास्टिकचं पांढरं पोतं होतं…

माझ्याजवळ येऊन ती म्हणाली, ‘तुमी म्हनाले व्हते ना ? भिकाऱ्याच्या पोरीसंगं कोन लगीन करंल ? बगा मी भीक मागायची सोडली… आता भंगार येचायचं काम करते… ते इकते…! आता हुईल ना माज्या पोरीचं लगीन ? आता कुनाची हिंमत हाय तिला भिकाऱ्याची पोरगी म्हनायची….?  सांगा….’

माझ्या डोळ्यात पाणी दाटलं… एक आई मुलांच्या भवितव्यासाठी…. ठरवलं तर काय काय करू शकते…. याचं हे  जिवंत उदाहरण…. ! भंगार वेचून ते विकायचं काम सुरूच ठेव, असा मी तिला सल्ला दिला. 

माझे ज्येष्ठ मित्र श्री सुनील नातु यांच्याशी बोलताना हा विषय सहज निघाला, या तरुणीला आणखी एखादा व्यवसाय टाकून द्यावा, या हेतूने त्यांनी विकण्यासाठी इंदोरवरून तिच्यासाठी उत्तम क्वालिटीची आर्टिफिशियल ज्वेलरी आणली. तारीख होती ११ एप्रिल. 

ज्वेलरी पाहताच ती म्हणाली, ‘भंगार गोळा करून झाल्यानंतर,  झोपडपट्टीत फिरून फिरून तीतल्या पोरीस्नी मी हे दागिने इकीन…’ 

… यानंतर कृतज्ञतेने नातु सरांचे पाय धरण्यासाठी ती वाकली…. नातु सरांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले…! यानंतर ती माझ्या कानाशी आली आणि हळुच म्हणाली, ‘ यातलं एक कानातलं मला लय आवडलंय, मी घालून बगु का ? ‘ .. माझ्या कोणत्याही उत्तराची वाट न बघता, शेजारी उभ्या असलेल्या गाडीच्या काचेत पाहून, ते कानातलं घालून, ती स्वतःला निरखून निरखून पाहू लागली… जणू आजूबाजूला कुणीच नाही… अख्ख्या विश्वात “ती” एकटीच होती…! 

मी नातू सरांकडे पाहिले… ते माझ्याकडे बघून हसत होते…. त्यांच्या हातावर टाळी देत म्हणालो.. 

‘Sir, Women are Women…!‘ 

‘पटलं रे बाबा…’  म्हणत, त्यांनी टाळी स्वीकारली आणि आम्ही दोघेही हसत हसत तिथून सटकलो…!!! 

क्रमशः भाग पहिला

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments