मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कर्मफळ आणि नियती….☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

?  वाचताना वेचलेले ? 

☆ कर्मफळ आणि नियती…. ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

 हजारो गाई जरी असल्या तरी वासरू बरोबर आपल्या मातेकडेच पोहोचते, तशीच पूर्वकर्मे कर्त्याला अचूक शोधून भोग भोगायला लावतात. आपल्या डोळ्यासमोर घडणार्‍या घटना अवलोकन केल्या तर लक्षात येते की कर्मे फळताना नियती फार काटेकोर आणि कठोर असते. ती राजा म्हणत नाही की लहान मूल म्हणत नाही. अपघातात चिमण्या जीवांचे हातपाय तुटतात तर बॉम्बस्फोटात  मोठमोठ्या देशाच्या पंतप्रधानांचे मुंडके धडापासून वेगळे होते. काटेकोर संरक्षणात असलेल्या नेत्याच्या छातीत धाडधाड गोळ्या शिरतात तर दूधपित्या तान्ह्या मुलापासून आईलाच दूर नेऊन मृत्यु त्यांची ताटातूट करतो. सतीसावित्रींचा छळ, श्रीरामांचा वनवास, परमहंसांचा कॅन्सर, गुलाबराव महाराजांचे अंधत्व, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मीराबाई यांना समाजाने दिलेला त्रास, ही सारी कर्मफलांची बोलकी उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष सूर्यपुत्र असून जन्मभर झालेली कर्णाची अवहेलना, देवमाता असून पोटची सात अर्भके गमवावी लागलेली देवकी आणि आचार्य पद लाभूनही, सबंध आयुष्य कष्टात काढल्यावर मृत्युसमयीसुद्धा कंटकशय्येवर भोग भोगावे लागलेले भीष्म, या सर्वांना भगवंतानी त्यांच्या भोगाची कारणे सविस्तर सांगितली, तेव्हा कर्मफळे किती अटळ असतात त्याची प्रचिती आली.  मृत्यू राजा-रंक, स्त्री-पुरुष, लहान-थोर असा काहीही भेद करीत नाही. बुद्धिबळाच्या पटावर जरी राजा, वजीर असला तरी खेळ संपल्यावर डब्यात भरताना प्यादी खाली आणि राजेसाहेब सन्मानाने वर असे कोणी भरीत नाही तर सर्वांना एकत्र कोंबले जाते.  हे सारे लक्षात घेऊन प्राण हे देहाला वश आहेत तोपर्यंत सत्कर्में , भगवंतस्मरण,  नामस्मरण ,दानपुण्य केलं पाहिजे, कारण देहपतनानंतर प्राणप्रिय पत्नी दरवाजा पर्यंत , नातेवाईक स्मशानापर्यंत आणि देह चितेपर्यंत सोबत करतात. बरोबर येतात ती कर्में,पुण्य, भगवंत नामाचे गाठोडे—-

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆

श्रीमती अनुराधा फाटक

? विविधा ?

☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

स्वरा उमाताईंची सहा महिन्यांची नात तशी खेळकर पण तिच्याजवळ कुणाला तरी बसावे लागे.त्यांची सून उषा अंघोळीला गेली होती म्हणून उमाताई स्वराजवळ बसल्या असतानाच गॅसवर दूध तापत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.उतू जाईल म्हणून खेळणाऱ्या स्वराकडं बघतच त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या तसा स्वराचा रडलेला आवाज त्यांच्या कानावर आला.

‘ रडू दोन मिनिटं’म्हणत त्या दुधाजवळच थांबल्या तेवढ्यात त्यांच्या कानावर खुळखुळ्याचा आवाज आला. दूधही वर आले होते.गॅस बंद करून त्या बाहेर आल्या.शेजारचा निमिष स्वराजवळ खुळखुळा वाजवत बसला होता. स्वराही रडायची थांबली होती.

‘ आजी, मी बसतो खुळखुळा वाजवत’निमिष बोलत असतानाच उषाही अंघोळ करून बाहेर आली.तिनं स्वराला घेतलं.निमिष तिथच बसला.उमाताई मात्र कामाला लागल्या.काम करता करता त्यांना शिरीषचे,त्यांच्या मुलाचे बालपण आठवले.

एक दिवस शिरीष असाच रडत होता.उमाचे धाकटे दीर पेपर वाचत होते पण त्यांनी शिरीषकडं लक्ष दिलं नाही . हातातलं काम टाकून उमानं शिरीषला घेतलं.

‘ भाऊजी,बाहेर गेलात की शिरीषसाठी एक खुळखुळा आणा..’ दिरकडं बघत उमा बोलली.

‘ त्याचे वडील आणतील की..’पटकन उमाचा दीर बोलला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.चुकून संसारात पडलेला तिच्या नवऱ्याला कसलीच हौस नव्हती हे माहीत असलेल्या  दिराने तिच्या जखमेवरच मीठ चोळलं होतं.

‘ त्याच्या वडिलांचे माहीत नाही पण मी नक्की आणीन माझ्या शिरीषसाठी खुळखुळा.’त्यानंतर उमाने कधीच कुणाला काही सांगितले नाही स्वतःच्या हिमतीवर आपल्या मुलाची सर्व हौस पुरवली होती.

माणसाचं जीवन म्हणजे एक खुळखुळाच..’ उमा आपल्याच विचारात होती.जसा आयुष्याचा खुळखुळा वाजतो तसे आपण जगत असतो. परिस्थितिच्या खुळखुळ्यातून कधी मधुर नाद निघतो तर कधी त्या नादाने आपण खुळे बनतो,अस्वस्थ होतो. आपल्याला कळत नसतानाच आपल्या आयुष्यात आलेला हा खुळखुळा सतत वेगवेगळे नाद करून आपले आयुष्य घडवत असतो.कधी सुखावह तर कधी दुःखाची जाणीव त्यातून होते.असा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जाणारा खुळखुळा ! नाद खुळा करणारा खुळखुळा !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अदृश्य लेबल – भाग – 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ अदृश्य लेबल – भाग – 1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

परवाचीच गोष्ट. नेहमी प्रमाणे घरातून म्हणजेच श्रीनगर, वागळे  इस्टेटमधून दुकानात जायला निघालॊ. गाडी रोडवर  आणली आणि घडाळ्यात बघितले. ९.४५ झाले होते, म्हणजेच नेहमीपेक्षा  १० ते १५ मिनिट्स मला निघायला उशीर झाला होता.  १० वाजता दुकान उघडण्याची वेळ आणि घर ते दुकान गाडीने कमीत कमी २० ते २५ मिनिटांचा वेळ लागतोच. डोक्यात विचारांचं चक्र चालू होतं . नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे वेळेवर पोहचण्यासाठी माझी धडपड चालू होती. नशिबाने आज तसा रोडवर हेवी ट्रॅफिक नव्हता म्हणून काही गाडयांना ओव्हरटेक करत मी जेवढ्या वेगाने गाडी चालवता, नाही गाडी मारता येईल तेवढी मारत होतो. पुढे जुने पासपोर्ट ऑफिसकडून डाव्या रस्त्याला गाडी वळवून मी हजुरी रस्त्याला लागलो. रस्ता जरा अरुंद असल्याने मला काही करता वेग घेता येत नव्हता आणि गाडयांना ओव्हरटेकही घेता येत नव्हते. मी जरा मनाला आवर घालत, गाडीचा वेग कमी करत हळूहळू पुढे जात होतो. हळूहळू गाडी चालवत हजुरीचा रस्ता पार केला आणि पुढे लुईसवाडीच्या जरा मोठ्या रोडवर लागलो.

आता पुढचा रस्ता सगळा मोकळा दिसत होता तरीही माझ्या पुढे असलेली एक गाडी काही वेग घेत नव्हती. मला एकतर उशीर झाला होता आणि हा जो कोण होता तो गाडी आरामात चालवत होता. पहिल्यांदा मला वाटले कदाचित तो मोबाइलवर बोलत असणार, पण तसे नव्हते. मला त्याचा खूप राग आला होता. मी पहिले गिरगावात रहात असल्याने, राग आल्यानंतर सवयीप्रमाणे पुढची गाडी चालवणाऱ्याच्या खानदानाची माझ्याकडून जोरदार आठवण काढली गेली. माझ्या गाडीच्या काचा बंद असल्याने माझा आवाज बाहेर किंवा त्याच्याकडे पोचण्याचा काहीच प्रश्न नव्हता आणि माझा आवाज त्याच्याकडे पोचावा अशी माझीही अपेक्षा नव्हती.  पण त्या क्रियेने आपण जरा मोकळे होतो, हा आमचा गिरगावकरांचा अनुभव.

अजूनही पुढचा गाडीवाला वेग घेत नव्हता. आता माझा धीर सुटायला लागला. मी जोरजोरात हॉर्न मारू लागलो तरीही तो, त्याच्यापुढे पूर्ण रस्ता मोकळा दिसत असूनसुद्धा वेग काही घेत नव्हता. माझी सहनशीलता आता पणाला लागली. माझे एकसारखे  घड्याळाकडे लक्ष जात होते. मला खूप उशीर होत होता आणि जो कोण होता तो गाडी बैलगाडीच्या वेगाने चालवत होता आणि ओव्हरटेक करायला पण संधी मिळत  नव्हती. आता मी माझा अनावर झालेला राग, हॉर्न दाबूनच ठेवून प्रकट केला. मोठा कर्कशपणे हॉर्नचा आवाज येत होता आणि …

आणि माझं लक्ष त्या गाडीच्या मागच्या काचेवर  लिहिलेल्या वाक्यावर गेले. “अपंगांची  गाडी, जरा धीर धरा “

ते बघितल्यावर मलाच माझी लाज वाटली. मी जो काही मोठयाने हॉर्न वाजवून माझी अक्कल पाजळली होती त्याची मला शरम वाटली. आता माझी ही गाडी त्या गाडीच्या मागे हळूहळू  जात होती आणि मला त्याचा काहीही त्रास होत नव्हता. पुढे जरा डाव्या बाजूला मोकळी जागा होती तेंव्हा त्या पुढच्या गाडी चालवणाऱ्यानी गाडी डाव्या बाजूला घेऊन मला पुढे जाण्यासाठी जागा करून दिली. मी माझी गाडी पुढे घेऊन त्या गाडीच्या समांतर आणून, माझ्या गाडीची काच खाली करून त्याला सॉरी बोलून दिलगिरी व्यक्त केली. त्या माणसाने  माझ्याकडे बघून एक लहानसे पण छानसे स्माईल दिले.

क्रमशः… 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संगीत” – जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ? 

संगीत— जोतिष्यशास्त्रातील एक उपाय ☆ संग्राहक – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

जोतिष्यशास्त्रात ग्रहांच्या स्पंदनाला खूप महत्व आहे. Viabrations ज्याला आपण मराठीत कंप किंवा स्पंदन म्हणू . जेव्हा एका सेकंदात सोळापेक्षा जास्त पण आठ हजारपेक्षा कमी स्पंदने होतात तेव्हा त्यातून नाद निर्माण होतो आणि जेव्हा तो लयबद्ध होतो तेव्हा त्याला आपण संगीत म्हणतो. सामवेद हा सर्वस्वी संगीतासाठी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि जोतिष्य हे वेदांग आहे. या दोघांच्या संबंधाचा उपयोग करून आपण जोतिष्यशास्त्रात संगीताचा वापर एक उपाय म्हणून कसा वापरता येईल ते पाहू.          

संगीत हे एक असे एकमेवाव्दितीय विज्ञान आहे की  ज्याच्या प्रभावापासून कोणीही, अगदी पक्षी, प्राणी, मानव, आदिवासी, जात, धर्म, पंथ दूर नाहीत. संगीताला विज्ञानाचे विज्ञान असे म्हणतात कारण संगीत मग ते कोणत्याही देशाचे, भाषेचे असो त्याच्यामध्ये तुमच्या अंतरात्म्याला थेट स्पर्श करण्याची ताकद आहे. आणि ते समजण्यास कोणत्याही भाषेच्या भाषान्तराची गरज नसते.    

संगीताचे विज्ञान “नाद” यावर अवलंबून आहे आणि नाद हा साऱ्या विश्वात व्यापून राहिला आहे. “सा रे ग म प ध नि” हे सात सूर महादेवाच्या नृत्य आविष्कारातून निर्माण झाले असे मानतात.  स्वर व त्यांचे ग्रह खालील प्रमाणे-  

१) सा –रवी 

२) प … चंद्र 

३) ध — मंगळ 

४) रे —बुध  

५) नी — गुरु 

६) म –शुक्र 

७) ग –शनी 

तसेच राग आणि राशी   

१) भैरवी कुंभ 

२) भूप राग कन्या 

३) राग बैरागी मीन रास 

४) श्री राग वृषभ 

५) राग वसंत सिंह रास 

६) राग सारंग धनु 

७) राग पंचम धनु

भैरवी रागावर शनीचे  प्रभुत्व आहे असे मानतात. राग भैरवी हा एक गूढ, भव्य, दिव्य, धीर, गंभीर असा राग आहे त्यामुळे शनीचे सर्व गुण त्याला लागू पडतात. श्री राग हा हळुवार प्रेम, संध्याकाळची हुरहूर, कोमलता व्यक्त करताना वापरतात म्हणूच हा शुक्राचा राग असे मानतात. 

वेगवेगळे राग आणि त्यांची गायन पद्धती इतकी प्रभावशाली आहे की ऐकणाऱ्याचा मनाचा नूर आणि मूड बदलून टाकण्याची क्षमता आहे. ज्या जातकांच्या पत्रिकेत चंद्र शनी, मंगळ राहू युती असते ते थोडयाशा चिथावणीने एकदम सटकून जातात किंवा निराशेच्या गर्तेत लोटले जातात. अश्यांना वीणेच्या एका झंकारानें आपोआप शांत करता येते. उष्णता, प्रकाश, आवाज, चुंबकीय व विद्युत क्षेत्रात सौम्य व उग्र अशी दोन टोके असतात.  तसेच राग, लोभ, मद, मोह, मत्सर, शांति या स्थितीमध्ये दोन टोकाची स्थिती घातकच असते.  सुवर्णमध्य संगीतानेच साधणे शक्य आहे. 

जेव्हा चंद्राबरोबर शनी, मंगळ किंवा राहू असतात तेव्हा जातकात असलेली टोकाची नकारात्मक वृत्ती काही निवडक ट्यूनमुळे काढून टाकता येते. म्हणून तर आपल्या कडे विशिष्ठ मंत्र होम-जप असतात त्याच्या मध्ये संगीत आहेच. मंत्र होम जप या मधील नादानेच यजमानाच्या मनातील नकारात्मक वृत्तीवर परिणाम साधायचा असतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक व उत्तम विचारशक्ती वाढीस लागते. गुरु हा बुद्धीचा तर शुक्र हा भावनेचा कारक मानतात.  ज्यांच्या चतुर्थात शुक्र ते संगीत उत्तम जाणतात, तर गुरु असता ते संगीताचे उत्तम ज्ञान असलेले असतात.  

एके काळी भारतीयांना या संगीत आणि नाद यावर इतके प्रभुत्व होते की ते दीप राग आळवून दिवे तर मेघमल्हार गाऊन पाऊस पाडू शकत. तानसेन यांनी एकदा आपल्या संगीताने पिसाळलेला हत्ती शांत केला अशा कथा तुम्ही ऐकल्या असतीलच. पंचमहाभूतांवर विजय मिळवू शकण्याची ही कला कालांतराने भारतीयांची दैवीशक्ती व अंतर्स्फूर्तीबद्दलची होत गेलेली उदासीनता कारणीभूत आहे. त्यागराज, तानसेन, पंडित ओंकारनाथ ठाकूर, दिगंबर विष्णू पलुस्कर यांना त्यांच्या मनाच्या उत्कट भावावस्थेत  रागाची रचना सुचली असावी. असो.  पण आजही एक छानसे अंगाई गीत म्हणताच बाळ झोपी जाते की नाही. 

सप्तमात बिघडलेला शुक्र असणाऱ्यांनी मादक विषयासक्त संगीत फार ऐकू नये.  तसे करणे घातक ठरू शकते तसेच चतुर्थात बाधित शनी किंवा व्दितीयात शुक्र मंगळ अशा लोकांनी जरूर भक्तीसंगीत (डिव्होशनल) ऐकावे. 

सध्याचे संगीत हे ऐकणाऱ्यांना हिंस्त्र, पाशवी, रागीट, वाईट वृत्ती वाढीस लागण्यास मदत करते. पण संगीत हे एक दैवी शास्त्र आहे.  त्याचा आपण योग्य वापर समाज समृद्ध करण्यास केला पाहिजे.

(सदर लेख हा प्रसिद्ध जोतिषी बी. व्ही. रमण यांनी लिहिलेल्या Astrological मॅगझीनच्या (मार्च १९४४) संपादकीय लेखाचा सरळ अनुवाद आहे.)

संग्राहक –  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ऋतु गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆

सुश्री सुनिता गद्रे

? वाचताना वेचलेले ?

 ☆ ऋतू गाभुळताना.…– अनामिक ☆ संग्रहिका – सुश्री सुनिता गद्रे ☆ 

ऋतु गाभुळताना…

झोपता झोपता दुरदर्शन बातमी देतं..मान्सून एक जुनपर्यंत केरळ मध्ये दाखल होणार..

मार्च,एप्रिल..२४तासएसी,कुलर,पंख्यालाआचवलेलं शरीर..पहाटे पहाटे पायाशी असलेलं पातळ चादर बेडशीट, साखरझोपेत कधीतरी अंगावर ओढून घेतं…समजावं तेंव्हा ऋतु गाभुळतोय.

ऐटीत झाडावरुन मोहीत करणारे.बहावा,पलाश,गुलमोहर…वार्‍याच्या खोडसाळपणाने पायाशी पायघड्या पसरवू लागतात.झाडावरचं कै-यांचं गोकुळ रिकामं होउन गेलेलं असतं,एखादा झाडावरच पिकलेला आंबा,खाली पडून केशर कोयसांडतो.जांभुळ,करवंदाचा काळा,जांभळा रंग जमिनी रंगवू लागतो…तेंव्हा खुशाल समजावं ऋतु गाभुळतोय.

आईआजीची लोणच्या,

साखरंब्याची घाई,कोठीत धान्यं भरुन जागेवर ठेवायची लगबग,गच्ची  गॅलरीत निवांत पहुडलेली चीजवस्तूआडोश्याच्या जागी हलवायची बाबा आजोबांची गडबड…समजावं ऋतु गाभुळतोय.

 ताटातला आमरस सर्रासपणे गोडच लागतो..साखरेची गोडी त्याला आता नकोशी होते.उरलेल्या पापडकुर्डया आता हवाबंद डब्यात जाउन बसतात,डाळपन्हं,आईस्क्रीम, सरबतं,सवयीची होत जातात.माठातल्या पाण्यात एखादी भर आताशी कमीच पडते.तेंव्हा खुशाल समजावं

ऋतु गाभुळतोय.

दुर्वास ऋषी च्या अविर्भावात आग ओकरणारा रवी..काळ्या पांढऱ्या ढगांशी सलगी करु पाहतो,मेघनभात अडकलेली किरणं सोडवता सोडवता…असाच दमुन जातो.भास्कराचा धाक कमी झाल्याचं पाहुन वारा ही उधळतो.गच्ची,दोरीवरच्या कपडे,गाद्यांवर आता लक्ष ठेवावं लागतं..तेंव्हा खुशाल समजावं..ऋतु गाभुळतोय.

निरभ्र वाटणारं आकाश क्षणात आभाळ होऊन जातं,उनसावलीच्या खेळात चराचर सावळं होतं ,वीज,गडगडाटानं.. रसपोळीनं सुस्तावलेली दुपार..धावपळीची होते.

झाडांवरच्या पक्षांची किलबिल.. किलबिल न राहता नव्या स्थलांतराची भाषा बोलू लागते..उफाळत्या जमीनीत नांगर फिरु लागतात.

 मोगऱ्याचे ताटवे विरळ होऊ लागतात,मृदगंधाचे वास श्वासात विसावून जातात.. खुशाल समजावं तेंव्हा..ऋतु गाभुळतोय.

उंबर्‍यावर आलेल्या त्या वर्षेला भेटण्यासाठी देहमनाने आपण ही आतुरतो….तेंव्हा अगदी खुशाल समजावं…ऋतु गाभुळतोय……

 –  अनामिक 

संग्राहिका –  सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆☆ मनातलं  कागदावर ☆☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

अल्प परिचय 

शिक्षण – B.Sc. (1st class with Hons) पुणे विश्वविद्यालय 

सम्प्रति – 1995 पासून फ्री लान्स ट्रान्सलेटर म्हणून कार्यरत.

यातील विशेष कामगिरी:

  1. समकालीन ब्रिटिश कवयित्री ही पाच भागांची मालिका स्त्री मासिकातून प्रकाशित.यामध्ये कवयित्रींचा परिचय व त्यांच्या दोन कवितांचा अनुवाद सादर करण्यात आला.
  2. अॅडव्हरटारझिंग बेसिक्स हे अनुवादीत पुस्तक डायमंड प्रकाशन तर्फे प्रकाशित.
  3. ‘मेडन व्हाॅयेजेस’ धाडसी महिलां नी एकट्याने केलेल्या साहसी प्रवासाची प्रवासवर्णने ‘मस्त भटकंती’ मधून प्रसिद्ध.
  4. ‘प्रतिमा पैलतिरीच्या’ या चरित्रात्मक लेखांचे पुस्तक प्रकाशित..2016मध्ये.
  5. ‘तुमचे आयुष्य तुमच्या हाती’ अनुवादीत,प्रकाशन 2018.

याशिवाय शेती व्यवस्थापन,जल व्यवस्थापन व पाणलोट विकास,आयुर्वेदिक वनस्पती विषयी माहिती,लहान मुलांसाठी प्रयोग विज्ञान मालिका अशा विविध प्रकारच्या साहित्याचे भाषांतर केले आहे.

या व्यतिरीक्त स्वतंत्रपणे कथालेखन,ललितलेखन चालू आहे.

? विविधा ?

मनातलं  कागदावर ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

इथे नाशिकला आल्यापासून सकाळच्या वेळी बाहेरून पक्ष्यांचा सतत कलकलाट ऐकू येत होता. बाहेर बाल्कनीत येऊन नजर टाकली, तर शेवग्याच्या झाडावर इवल्याशा, मूठभर आकाराच्या सनबर्डस् ची नुसती झुंबड उडालेली दिसत होती. इतके सुरेख रंग त्यांचे, सूर्यप्रकाशात नुसते झळाळत होते. कोणी गडद निळ्या रंगामधे मधूनच झळाळणारी मोरपिशी छटा मिरवत होतं, आणि त्या मोरपिशी रंगाच्या पिसांवर ऊन पडल्यावर त्याच्यावर जी चमक येत होती, त्यावर नजर ठरत नव्हती! तर कोणाचा शेवाळी रंग मेंदीची आठवण करून देत होता. आणि काय ते त्यांचे विभ्रम! ते छोटुसं शरीर पूर्ण उलटं करून चोचीने त्या फुलांमधला मध ओढून घेऊन भुर्रदिशी उडून कुठेसे नाहीसे व्हायचे, बहुतेक त्यांच्या पिल्लांना तो मध भरवायला जात असावेत. काहीजण फक्त हाच उद्योग करत होते, तर काही उडाणटप्पू आपल्या जोडीदारांबरोबर मुक्तपणे विहरत होते. विलक्षण मोहक हालचाली होत्या त्यांच्या! त्या झाडामधून वरच्या दिशेला सूर मारून थोडसं वर आभाळात जाऊन ज्या काही सुरेख गिरक्या ते घेत होते, त्यानं माझी नजरबंदीच करून टाकली. परत वरून खाली सूर मारून त्या झाडाच्या फांद्यांमधूनही सफाईदार गिरक्या घेत थोडं खाली जाऊन उसळी मारून  परत वर आभाळात! आणि या सगळ्या खेळात सूर्यप्रकाशाचीही मोठी भूमिका होती बरं! या सगळ्या गिरक्या आणि परन्यास, हो! पदन्यास नव्हे, परन्यासच! चालू असताना, आकाशातून, झाडाच्या फांद्यांमधून पाझरणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या नृत्याला एक विलक्षण अशी रंगभूषा पुरवलेली होती! एखाद्या गिरकीच्या वेळी फक्त गडद निळा रंग चमकलेला दिसायचा, तर वरच्या दिशेने सूर मारताना मोरपिशी छटा झळाळून उठलेली दिसायची. पटाईत नृत्यांगनांनी लाजून मान खाली घालावी अशा हालचाली होत्या त्या चिटुकल्या पक्ष्यांच्या! आणि दोघांची प्रत्येक हालचाल इतकी विलक्षणपणे सारखी, की हल्लीचं सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा डान्सिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊनच रचत असावेत, याची खात्रीच पटली माझी!  

आणखी एक गम्मत माझ्या लक्षात आली, ती ही, की त्या झाडावर मध गोळा करणारे फक्त हे छोटेसे सनबर्डच दिसत होते. काही काळे भुंगे येत जात होते अधून मधून, पण आम्ही तिथे होतो, त्या पंधरा  दिवसात एकही मोठा पक्षी त्या झाडावर आलेला दिसला नाही मला. म्हणजे, आपण माणसं स्वतःला फार बुद्धिमान आणि सुसंस्कृत समजतो, पण पक्ष्यांमधे असलेली ही सुसंस्कृत जाणीव उरलेली आहे का आपल्यात? दुर्बल गटांसाठी असलेल्या योजनांमधील कितीसा वाटा प्रत्यक्षात मिळतो, त्यांना? त्याच्यावर डल्ला मारणारे गब्बर अधिकारीच जास्त असतात! पण या छोट्या पक्ष्यांना त्रास द्यायला, त्या शेवग्याच्या फुलांमधला मध त्यांना मिळू न देता, स्वतः हडप करायला एकही मोठा पक्षी तिथे आलेला एकदाही मला दिसला नाही! कशी आणि कोण, ही जाणीव त्या एवढ्याशा पाखरांच्या एवढ्याशा मेंदूमधे जागृत ठेवत असेल? इथे देवाचा अदृश्य हात जाणवतो मला तरी! आणि आपल्या मेंदूमधेही असतेच ना, ही जाणीव, ‘त्याने’ दिलेली? पण आपण स्वार्थापोटी ती जाणीव पुसून टाकून आपल्यापेक्षा दुर्बल गटातील माणसांना आणखी दुर्बल बनवत असतो. हा आपल्या अधिक बुद्धिमत्तेचा उपयोग, की दुरुपयोग?

नेहमी आपण ऐकत आलोय, की निसर्गाकडून चांगल्या गोष्टी शिकायला पाहिजेत, पण पंधरा दिवसात या पक्ष्यांकडे बघून काय शिकायला हवं, त्याची लख्ख जाणीव मनात जागी झाली! आता या जाणीवेचा प्रसार व्हायला हवा, म्हणून हा लेखनप्रपंच!

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी

??

☆ भगवान वेदव्यास… ☆ सौ कुंदा कुलकर्णी

आपण सर्वजण लहानपणापासून “व्यासोच्छिष्टम्  जगत्सर्वंम्” हे वाक्य वाचत आलो आहोत, ऐकत आलो आहोत. असा एकही विषय नाही की महर्षी व्यासांनी त्याला स्पर्श केला नाही. असे ते सर्व ज्ञानी होते. अशा भगवान वेदव्यास यांच्याबद्दल मला लहानपणापासून खूप उत्सुकता होती. त्यामुळे त्यांच्याविषयी पूर्ण माहिती मिळवावी असे वाटत होते.  

मी माहेरची ग्रामोपाध्ये,  माझी आई माहेरची जोशी. त्यामुळे आई-वडील दोघांकडूनही अध्यात्माचा वारसा मिळाला होता . वडिलांचं घर वाळव्याला. दिवाळीच्या सुट्टीत आम्ही तिथे जात असू. आईचं माहेर चिकुर्ड्याला. आंबे, जांभळे, करवंदे भरपूर. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे जात असू. दोन्हीकडे पोथ्या पुराणे भरपूर असत. त्यावेळी मोबाईल ,टीव्ही तर सोडाच पण साधे वाचनालय किंवा रेडिओ देखील नव्हता. त्यामुळे घरातलीच पुस्तके  वाचण्याचा  छंद लागला. अनेक पोथ्या ,पुराणे वाचून झाली. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी ” इति श्री वेदव्यास विरचितं***समाप्तम् ” असेच असायचे, हे लक्षात आले. त्यामुळे इतके छान लिहिणारे हे ऋषी कोण अशी उत्सुकता तेव्हापासूनच होती.

२०१७ साली मी नैमिषारण्यात गेले होते . तिथे व्यास गद्दी पाहिली. तो सारा परिसर अत्यंत पवित्र आणि भारावून टाकणारा होता. डोळ्यातून घळाघळा पाणी वहात होते. भगवान वेदव्यास चिरंजीव आहेत. त्यांचे अस्तित्व त्याठिकाणी जाणवले. तिथे 88000 ऋषीमुनी वायुरूपाने आहेत असे म्हणतात. त्याची देखील अनुभूती आली. भगवान वेदव्यास यांची ती धीरगंभीर मूर्ती डोळ्यात साठवून घेतली. मोबाईल मध्ये भरपूर फोटो काढले. एक वेगळीच ऊर्जा मिळाली.

तेथून परत आल्यानंतर “ नैमिषारण्य सुरम्य कथा “ हे पुस्तक लिहायला घेतले. त्यासाठी अनेक ग्रंथ वाचायला मिळाले. त्यातूनही वेदव्यास यांची बरीच माहिती कळली.

“नैमिषारण्य सुरम्य कथा “ या माझ्या पुस्तकाची परवा तिसरी आवृत्ती निघाली. त्या संदर्भात मी बरीच व्याख्याने पण दिली.  त्यावेळी लक्षात आले की भगवान वेदव्यास यांच्याबद्दल फारशी माहिती कुणाला नाही .इतकेच काय, “व्यासपीठ म्हणजे काय? त्यामागील कथा काय ? “ हेही  कुणाला माहिती नाही. व्यासपीठ ,मंच, रंगमंच हे शब्द एकाच अर्थाचे आहेत असे समजून सगळे सर्रास वापरतात. पण त्यातील फरक कुणाला माहीत नाही. भगवान वेदव्यास यांच्यावर पुस्तकही उपलब्ध नाही .` तुम्हीच लिहा आणि आम्हाला द्या ` असे वाचनालयातून सांगण्यात आले. योगायोगाने याविषयीचे अनेक ग्रंथ वाचायला मिळाले.आणि मग माझ्या हातून “ ।। भगवान वेदव्यास ।। “  या पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक लवकरच बुक गंगा वर उपलब्ध होईल. नक्की वाचा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा ही विनंती.

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ A for  appreciation… ☆ संग्राहिका – कालिंदी नवाथे ☆ 

‘A’ for Appreciation (अर्थात प्रशंसेचा प्रयत्न) 🤗

नुकत्याच एका मैत्रिणीच्या आजारी सासूला भेटून आले. दोघींचीही तक्रार एकच…” एव्हढं केलं मी हिचं , पण दोन शब्दांचं  कौतुक नाही. ” वास्तविक त्या मैत्रिणीने सासूच्या भरवशावर उत्तम नोकरी करत आपली मुले वाढवली… सासूला देखील ठाऊक आहेच की आपल्या लेकी जेव्हढ्या मायेने करत नाहीत, सून करते… अगदी प्रेमानं … …

गरज आहे ती आवर्जून बोलून दाखवायची.

नेहमी एक गोष्ट तीव्रतेने जाणवते की आपण स्त्रिया सर्वाधिक कद्रू कश्यात असतो तर प्रशंसेत..

कोणत्याही वयाच्या , कितीही शिकलेल्या ,नोकरी करणाऱ्या , व्यावसायिक वा गृहिणी असो…. 

दुसऱ्या स्त्रीची तारीफ चटकन मनापासून करताच येत नाही.अत्यंत कोत्या मनाने, क्षुद्र मनोभूमिकेने आपण सतत एकमेकींना स्पर्धक समजत राहतो… जणू तिची रेषा मोठी झाली की माझी लहान होणार आहे. हे वाढता वाढता एव्हढे वाढते की आपल्याला काही सुंदर आगळे दिसणेच बंद होते. 

छान तयार होऊन भिशीला स्वागत करणाऱ्या मैत्रिणीकडच्या फर्निचरची धूळ आपल्याला दिसते.  तर घर लक्ख आवरणाऱ्या सखीचा गबाळा अवतार आपल्या डोळ्यात सलतो. डाएट- जिम वगैरे करून स्वतःला जपणाऱ्या मैत्रिणीला आपण नटवी म्हणतो, तर सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी राबणाऱ्या गृहस्वामिनीला आपण काकूबाई म्हणतो. खरंतर समस्या बरेचदा हीच असते की, आपण काही म्हणतच नाही.

एकीच्या मुलाला दहावीला 93% मिळाले… इतरांची प्रतिक्रिया– “मिळणार नाही तर काय? हिने दुसरं केलंच काय वर्षभर … मुलाची दहावी म्ह्णून भिशी सुध्दा बंद केलीन.”

दुसरीच्या मुलीला 65% मिळाले.  प्रतिक्रिया– “जरा लक्ष नाही दिलं हिने.  सदा घराबाहेर..”

गम्मत आहे ना ! अहो सोपं आहे. दोघींकडेही जा. मनापासून अभिनंदन करा … आईचे कौतुक करा।  काय लागतं हो याला … हां , मन मात्र जरासं मोठं लागतं. 

.. माझ्या या मतावर तडकून एक जेष्ठ मैत्रिण म्हणाली.. ” मला नाही बाई येत असं लगेच चांगलं म्हणता… जेव्हा फारच उत्तम performance असेल तेव्हाच मी छान म्हणते.” 

“का ग तू ऑस्करची ज्युरी आहेस ?” 😆

क्षणभंगुर आयुष्य साधं सोपं असावं .. कशाला हव्यात या पट्ट्या आणि मोजमापं… 

स्त्री स्त्रीची शत्रू असते की नाही माहित नाही . पण ही तारीफ न करण्याची वृत्ती मात्र स्त्रीची फार मोठी शत्रू आहे. एखादीच्या उत्साहाला, चैतन्याला, एव्हढेच काय पहाडासारख्या कर्तृत्वाला ही नामोहरम करते. 👊🏻

 प्रशंसा म्हणजे लांगुलचालन किंवा चमचेगिरी निश्चित नाही … ती उत्स्फूर्तपणे हृदयातून व्यक्त होते .. काही स्त्रियांना दिसेल त्या मैत्रिणीला ” काय बारीक झालीस ग ! ” असे म्हणायची सवय असते. … ही प्रशंसा नव्हे… 😆

एखादीच्या कर्तृत्वाची .. गुणांची .. संघर्षाची दखल घ्यायला काय हरकत आहे? दूध पाण्यातूनही वेगळं करतो तो राजहंस … आणि सडलेलं कुजलेलं खातो तो गिधाड. स्वतःला विचारा एकदा काय व्हायला आवडेल?

आयुष्याच्या एकाच पटावर राहत असलो तरी आपण प्रतिस्पर्धी खचितच नाही . लक्षात घ्या… एखादीचे घर मस्त सुरेख नटवले म्हटले, की आपले कचराडेपो होत नाही. “छान वळण लावलेस ग मुलांना”  असे दुसरीला  म्हटले की आपली मुले काही उनाड होत नाहीत. एखादी झक्कास स्वयंपाक करते म्हणून मी काही  कांदू होत नाही किंवा एखादी स्मार्ट  म्हणून मी गबाळी असे होणे नाही. 

प्रशंसेचे दोन शब्द मोठा चमत्कार करतात… आंतरिक प्रेरणा , जगण्याची नवी उमेद, चैतन्य देऊन जातात. प्रशंसेच्या दोन शब्दांची भूक दुसऱ्या कशाने भागत नाही. बघा एकदा करून ही जादू… त्यापेक्षा कित्येक पट positive energy तुमच्याकडे rebound होऊन येईल.. शंकाच नाही.

आपण स्त्री आहोत ..निसर्गाची सर्वश्रेष्ठ कलाकृती… जी स्वतःमधील सारे ओज तेज सगुणात साकारते अपत्यजन्माने.

वाणीवाटेही हाच सृजनाचा साक्षात्कार होऊ देत. 

A = appreciation– हळूहळू सवय होऊ द्यात… आयुष्य सुरेख होइल…  तुमच्या एकटीचं नाही,  तर आयुष्यात येणाऱ्या प्रत्येकीचं. 👍🏻

संग्राहिका – सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

महिनाअखेरचे पान – 5 ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

काळाच्या पुढे चार पावलं असावं असं म्हणतात.पण बघता बघता काळाचीच चार काय,पाचवही पाऊल टाकून झालं आणि उद्या सहाव पाऊल पडेल.हे पाचवं पाऊल  म्हणजेच वर्षाचा पाचवा महिना. तापवणाराही आणि सुखावणाराही! मे महिना! मे  म्हणजे वैशाख वणवा. मे महिन्याची अखेर म्हणजे ज्येष्ठाची चाहूल.संपूर्ण महिना जसा चटके देणारा तसाच सुट्टीच्या मोठ्या कालखंडामुळे  विद्यार्थी वर्गाला आनंद देणारा.लहान मुलांना मामाच्या गावाला घेऊन जाणारा,शिबिरांच्या निमित्ताने अभ्यासाव्यतिरिक्त नवीन काहीतरी शिकायला वेळ देणारा,मनसोक्त खेळू देणारा,लग्न समारंभातून सर्व आप्तेष्टांना भेटवणारा,थंडगार पेयांनी तहान भागवणारा आणि रसराज आंब्याच्या रसात बुडून जाताना फणसातील ग-यांचा वास घमघमवणारा मे महिना तो हाच.यामुळेच की काय,वणव्यासारखा पेटणारा सूर्य असूनही, त्याची दाहकता सोसूनही दरवर्षी आतुरतेने वाट बघायला लावणारा हा महिना, मे महिना! वैशाखातून ज्येष्ठाकडे नेणारा महिना.ग्रीष्मातील धारा विसरून मान्सूनच्या वा-यांचे स्वागत करायला उत्सुक असणारा महिना !

मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा दिवस म्हणजे एक मे.याच दिवशी 1960 साठ साली भाषावार प्रांत रचनेप्रमाणे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.मराठी भाषा राजभाषा झाली. त्यामुळे आधुनिक महाराष्ट्राच्या स्थापनेचा हा महिना आपल्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहे.

एक मे हा दिवस कामगार चळवळींचा गौरव करण्यासाठी जागतिक कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो.

तीन मे 1991 साली विंडहोक येथे पत्रकारांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यात पत्रकारांच्या लिखाणाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा सादर करण्यात आला. त्यानंतर 1992 पासून तीन मे हा दिवस वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. तर पाच मे हा दिवस जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे.याच दिवशी 1895 साली पहिले रंगीत व्यंगचित्र ‘द यलो कीड ‘हे प्रकाशित झाले होते.

युद्धातील जखमी सैनिकांची सेवा शुश्रूषा करण्यासाठी जीन हेनरी ड्यूनेट यांनी मोहिम सुरू केली.ती संघटना म्हणजे रेड क्राॅस सोसायटी.म्हणून जीन यांचा जन्मदिवस आठ मे हा  दिवस रेड क्राॅस दिन म्हणून साजरा केला जातो.

आई हे दैवत आहे हे आपणा भारतीयांना तर माहित आहेच.पण हे महत्व लक्षात घेऊन आईचा सन्मान करण्यासाठी 1914 पासून आंतरराष्ट्रीय मातृ दिन झाला आहे  नऊ मे हा दिवस. आईप्रमाणेच ममता देणा-या आणि सेवाधर्म पाळणा-या परिचारिकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारा मे हा जागतिक परिचारिका दिन आहे.कारण आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापिका फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा तो जन्मदिवस आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भारतीयांची भावना आहे.शांतता,विचार आणि भावनांच्या देवाणघेवाणीची जाणीव निर्माण व्हावी या कल्पनेतून 1994पासून युनो कडून पंधरा मे हा दिवस जागतिक कुटुंब दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.तसेच अठरा मे हा दिवस जागतिक वस्तू संग्रहालय दिन आहे.1991 साली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली.तो दिवस होता एकवीस मे.त्यामुळे एकवीस मे हा दिवस जागतिक दहशतवादविरोधी दिन म्हणून पाळला जातो.एकतीस मे हा दिवस जागतिक तंबाखू  विरोधी दिन आहे.

गोवा पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर त्याला संपूर्ण राज्याचा दर्जा मिळाला तो तीस मे 1987 ला.त्यामुळे तीस मे हा गोवा राज्य दिन म्हणून साजरा केला जातो.

1998साली अकरा मे ला पोखरण येथे अणुचाचणी यशस्वी झाली.त्यानंतर 1992 पासून अकरा मे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दिवस या नावाने  ओळखला जातो.     

असे  विविध दिन या  मे महिन्यात येत असतात.याच मे मध्ये म्हणजेच वैशाख पौर्णिमेला असते बुद्ध पौर्णिमा.बसवेश्वर जयंती,आद्य शंकराचार्य जयंती,छ.संभाजी महाराज जयंती,स्वा.सावरकर जयंती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती ही याच महिन्यात असते.तसेच छ.शाहू महाराज,पं.नेहरू,राजीव गांधी यांचे स्मृतीदिन याच महिन्याताल.

शिवाय मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद याच मे मध्ये साजरा होतो.

असा हा मे किंवा वैशाख सरता सरता पावसाच्या आगमनाच्या बातम्या सुरू होतात आणि क्वचित मान्सूनपूर्व सरीही पडून जातात.सुखद गारव्याची जाणीव, येणा-या पावसाची पुनःपुन्हा आठवण करून देते.शेतक-यासह सगळेच आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात.कारण नवजीवन प्राप्त करून देणारा,’जीवन’ घेऊन येणारा वर्षाऋतू येणार असतो,आपल्या तनामनाला न्हाऊ घालायला,वसुंधरेला फुलवायला !तो येईपर्यंत फक्त एवढंच म्हणायचं,’ये रे घना,  ये रे घना….

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सायिचं पातेलं…योगिया ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ सायिचं पातेलं…योगिया ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

गेले काही वर्ष हे जाणवतं आहेच आणि वाढतच चाललं आहे. आधीच सांगतो की माझं बालपण छानपैकी गेलं.  दरवर्षी नवीन पुस्तक, दिवाळीला नवीन कपडे , फटाके. सगळ्या सणांना भरपूर पाहुणे आणि गोड-धोड. दारिद्रय वगैरे काही खास सोसावं लागलं नाही. पण तरीही गेल्या २-३ आठवड्यात असे प्रसंग घडले की हे लिहावं वाटू लागलं. 

प्रसंग १ :

हा.. तर परवा एका मित्राकडे गेलो होतो. रात्री सहज गप्पा मारायला. त्याच्या बायकोने छान हापूस आंबे चिरले. अगदी बाठीला लागून चिरले. गोड होते आंबे. आंब्याच्या फोडी खाऊन झाल्या आणि ती ते सगळं टाकायला उठली. 

“अहो वाहिनी त्या बाठी राहिल्या आहेत अजून” 

“राहू दे हो भाऊजी इतकी काही गरिबी आली नाही आहे, जाऊदे ते आता. अजून आंबे चिरू का?”

“अहो गरिबीचा प्रश्न नाही, पण अजून गर आहे त्याला. आपल्याला नको पण मुलांना बोलवा. मजेत चोखतील.”  

तेवढ्यात दुसऱ्या मित्राची बायको म्हणाली “नको  ..सगळं तोंड बरबटून ठेवतील…मग उठा ..त्यांना धुवा..जाऊ  देना…छान गप्पा रंगल्या आहेत”

मला पुढच्या गप्पा नीट ऐकूच आल्या नाहीत. 

प्रसंग २:

उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून आम्ही चार मित्र फॅमिलीसहित महाबळेश्वरला गेलो होतो. हॉटेलमध्ये सकाळचा ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी होता. आम्ही ब्रेकफास्ट घेत होतो. मित्र त्याच्या मुलाला सांगत होता. “सगळं भरभरून घेऊन ठेव, मी परत परत उठून रांगेत उभा रहाणार नाही” त्याचं ८ वर्षाचं कार्ट दोन हातात दोन डिश घेऊन चालत होतं आणि मित्र आपल्याबरोबर त्याची डिश भरून देत होता. टेबलावर तो मुलगा आला तेव्हा त्याच्या डिशमध्ये पुरीभाजी, मेदूवडा , चिकन सॉसेज , फ्रुटस , ऑम्लेटपाव , अमूल बटर , कॉर्नफ्लेक्स , मंचुरियन होते. मित्राने त्याला बसवले आणि हातातला ग्लासभर ज्यूस त्याच्यासमोर ठेवला. 

अजून दहा मिनिटात त्या मित्राची बायको शेजारच्या टेबलावरून त्यांच्या मुलाला ओरडत होती. “जाईल तेवढंच खा, बाकीचं टाकून दे”

आमच्याकडे वळून म्हणाली ..”नाहीतर खा-खा खातील आणि मग पोट धरून बसतील. दोन दिवस सुट्टी मिळालीये त्यात यांच्यामागे धावायची माझी अजिबात इच्छा नाही आहे.” 

तसंही आम्ही आराम करायला गेलो होतो. पुढचा काही प्लॅन नव्हता. मुलाला २-३ वेळा हवं तेवढच घेऊन दिलं असतं  तर काही बिघडलं नसतं. वाया तरी गेलं नसतं.. असो. 

प्रसंग ३ :

पिझ्झा पार्टी होती. तुडुंब पिझ्झा खाऊन झाला. मी खोकी गोळा करायला उठलो तर प्रत्येक खोक्यात पिझ्य्यांच्या कडांचा गोल केलेला होता. मागवलेल्या ६ पिझ्झानपैकी सगळे गोल पूर्ण करायला ५ कडा कमी होत्या. (त्यातल्या दोन माझ्या पोटात होत्या आणि अजून ३ कडांना माझ्यासारखा कोणीतरी धनी होता). म्हणजे बहुतेकांनी कडा खाल्ल्या नव्हत्या. खरं तर..घरापासून ५ मि. वर पिझ्झ्याचं दुकान आहे आणि आम्ही पण आल्याआल्या खाल्ला होता त्यामुळे कडा कडक वगैरे होण्याचा पण चान्स नव्हता. 

प्रसंग  ४ :

परवा दोन मित्र घरी राहायला आले होते. बायकोने सकाळचा चहा केला आणि सवयीने तिने दुधाचं रिकामं पातेलं आणि बारीक कड असलेला चमचा माझ्या पुढ्यात ठेवला. 

एका मित्राने विचारलं “हे काय”

“विचारू नका भाऊजी. तुमच्या मित्राच्या घरची परंपरा आहे. सकाळी साय वाडग्यात काढायची. मग ते नुसतं दूध दुसऱ्या पातेल्यात गाळायचं. गाळणीत आलेली थोडीशी साय पण सायीच्या वाडग्यात टाकायची आणि मग कर्त्या पुरुषाच्या पुढ्यात दुधाचं रिकामं पातेलं खरवडायला द्यायचं…. . मी आहे म्हणून या परंपरा पाळत टिकली आहे . दुसरी असती तर कधीच कंटाळून सोडून गेली असती”

सगळे हसले. 

एका मित्राच्या बायकोने विचारले. “पण मग तुम्ही सायीचे काय करता?”

“दही -लोणी – तूप”. “मग ती बेरी खायचा पण एक कार्यक्रम असतो..सुंठ…पिठीसाखर ….  काही विचारू नको”

माझ्या बायकोने विचारलं “तुम्ही काय करता सायीचं?”

“आम्ही चहाच्या गाळण्यातच दूध गाळतो मग साय पडते त्या गाळण्यातच..उगाच दोन गाळणी कोण करणार”

“आणि मग तूप ?”

“चितळ्यांचं”

तोपर्यंत सायीचं पातेलं खरवडण्यात माझी ब्रम्हानंदी टाळी लागली होती. अशी साय खरवडताना माझी समाधी लागते. त्या चमच्या पातेल्याचा होणार कुर -कुर आवाज माझ्या कानी पडतच नाही. 

साय खरवडता खरवडता मी भूतकाळात गेलो होतो. माझे आजोबा सायीचं पातेलं खायचे, मग बाबा आणि आता मी (मी नसेन तर मुलं खातात आता).  घरात दूध-दुभतं कधीच कमी नव्हतं पण काहीही टाकायचं नाही. पूर्णपणे संपवायचं हे संस्कार अशा सायीच्या पातेल्यातूनच झाले. आजी तर बेरीचं रिकामं पातेलं पाणी घालून तापवायची, पाण्यावर तुपाचा तवंग दाटून यायचा तो काढून आजीचं निरांजन त्यावर दोन दिवस तेवायचं . 

उन्हाळ्याच्या सुट्टीत आमरस काढून झाला की मामा सगळ्यांना बाठी चोखायला द्यायचा. ज्याची सगळ्यात स्वच्छ त्याला १ वाटी एक्सट्रा आमरस ठरलेला. 

रिझल्ट लागला की सगळ्या जुन्या वह्यातील कोरी पाने फाडायची. बाबांना दाखवायची आणि मग त्याच्या बाइंडिंगच्या वह्या करायच्या. पुढच्यावर्षी शाळेला सगळ्या नवीन मिळायच्या पण बाइंडिंगच्या वह्या रफ वर्क / शुद्धलेखन यासाठी वापरायच्या.   

घरी किराणाच्या पुड्या किंवा फुलपुडी यायची. आजीचं दोऱ्याचं एक बंडल होतं. कुठलीही पुडी आली की आजी त्याचा दोरा सोडून त्या बंडलाबरोबर गुंडाळून टाकायची आणि आजोबा तो पेपर परत व्यवस्थित घडी करून रद्दीच्या पेपरात ठेवून द्यायचे. दोऱ्याचं बंडल नंतर हार/माळ  करायला कामाला यायचे. 

Reuse-recycle साठी आम्हाला कधी शाळेत प्रोजेक्ट करावेच लागले नाहीत. टाकू नये –  हवं तेवढंच घ्यावं  ,  कुठल्याही गोष्टीचा पुरेपूर वापर करावा हा संस्कार आहे. त्याचा तुमच्या पैशाशी, गरिबीशी , स्टेटसशी, शिक्षणाशी काही संबंध नाही. असं वागणं म्हणजे चिंधीगिरी, कंजूषपणा नव्हे.  हा श्रीमंत “मध्यमवर्गीय”  संस्कार आहे आणि त्या बाबतीत आम्ही नक्कीच श्रीमंत होतो. 

टाकलेली साय , आंब्याची बाठ , पिझ्झ्याच्या कडा, अर्ध टाकलेलं ताट आणि मग हळूहळू टाकून देण्याचं काहीच वाटेनासं होतं.  पुढे जाऊन  ड्रॉईंग चुकलं म्हणून न खोडता सरळ चुरगळून टाकलेला कागद, सोल झिजला तर तो न चिकटवता टाकून दिलेला बूट , दर २-३ वर्षांनी बोर झालं म्हणून बदललेल्या गाड्या  आणि थोडंसं नाही पटलं तर लगेच बदललेले बॉयफ्रेंड / गर्लफ्रेंड. आणि मग तक्रार ” ही आजकालची पिढी म्हणजे ….” 

“अहो- आता बास …त्या पातेल्याला भोक पडेल” –  बायको सांगत होती. सगळे माझ्याकडे बघून हसत होते. मी माझ्या ध्यानातून बाहेर आलो. चमचाभरून सायीचा बोकाणा भरला… आहाहा …सुख!

मग …उद्यापासून सायीचं पातेलं खायला सुरवात करताय ना? ती गरिबी नाही ..चिंधीगिरी नाही ..तो संस्कार आहे.  

-योगिया    

१७/०५/२०२२

संग्राहक : सुहास सोहोनी 

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print