श्रीमती अनुराधा फाटक

? विविधा ?

☆ खुळखुळा… ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

स्वरा उमाताईंची सहा महिन्यांची नात तशी खेळकर पण तिच्याजवळ कुणाला तरी बसावे लागे.त्यांची सून उषा अंघोळीला गेली होती म्हणून उमाताई स्वराजवळ बसल्या असतानाच गॅसवर दूध तापत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.उतू जाईल म्हणून खेळणाऱ्या स्वराकडं बघतच त्या पटकन स्वयंपाकघरात गेल्या तसा स्वराचा रडलेला आवाज त्यांच्या कानावर आला.

‘ रडू दोन मिनिटं’म्हणत त्या दुधाजवळच थांबल्या तेवढ्यात त्यांच्या कानावर खुळखुळ्याचा आवाज आला. दूधही वर आले होते.गॅस बंद करून त्या बाहेर आल्या.शेजारचा निमिष स्वराजवळ खुळखुळा वाजवत बसला होता. स्वराही रडायची थांबली होती.

‘ आजी, मी बसतो खुळखुळा वाजवत’निमिष बोलत असतानाच उषाही अंघोळ करून बाहेर आली.तिनं स्वराला घेतलं.निमिष तिथच बसला.उमाताई मात्र कामाला लागल्या.काम करता करता त्यांना शिरीषचे,त्यांच्या मुलाचे बालपण आठवले.

एक दिवस शिरीष असाच रडत होता.उमाचे धाकटे दीर पेपर वाचत होते पण त्यांनी शिरीषकडं लक्ष दिलं नाही . हातातलं काम टाकून उमानं शिरीषला घेतलं.

‘ भाऊजी,बाहेर गेलात की शिरीषसाठी एक खुळखुळा आणा..’ दिरकडं बघत उमा बोलली.

‘ त्याचे वडील आणतील की..’पटकन उमाचा दीर बोलला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.चुकून संसारात पडलेला तिच्या नवऱ्याला कसलीच हौस नव्हती हे माहीत असलेल्या  दिराने तिच्या जखमेवरच मीठ चोळलं होतं.

‘ त्याच्या वडिलांचे माहीत नाही पण मी नक्की आणीन माझ्या शिरीषसाठी खुळखुळा.’त्यानंतर उमाने कधीच कुणाला काही सांगितले नाही स्वतःच्या हिमतीवर आपल्या मुलाची सर्व हौस पुरवली होती.

माणसाचं जीवन म्हणजे एक खुळखुळाच..’ उमा आपल्याच विचारात होती.जसा आयुष्याचा खुळखुळा वाजतो तसे आपण जगत असतो. परिस्थितिच्या खुळखुळ्यातून कधी मधुर नाद निघतो तर कधी त्या नादाने आपण खुळे बनतो,अस्वस्थ होतो. आपल्याला कळत नसतानाच आपल्या आयुष्यात आलेला हा खुळखुळा सतत वेगवेगळे नाद करून आपले आयुष्य घडवत असतो.कधी सुखावह तर कधी दुःखाची जाणीव त्यातून होते.असा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं जाणारा खुळखुळा ! नाद खुळा करणारा खुळखुळा !

© श्रीमती अनुराधा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments