प्रा. सौ. सुमती पवार
कवितेचा उत्सव
☆ चांदरात … ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
चांदरात चांदरात दूध सांडते जसे
अवकाशी चंद्र कसा गोड गोड तो हसे….
चमचमते गगन कसे नक्षत्रे हासती
ग्रहगोल सारे कसे देवदूत भासती
बघत रहावीच प्रभा,दृश्य पहा सुंदरसे
अवकाशी चंद्र कसा …
चांदण्यात जग कसे सुंदरसे भासते
रजतपटी लोपूनी ते गोड गोड हासते
खडी चांदण्यांची ती नयनमनोहर दिसे…
अवकाशी चंद्र कसा ….
चंद्र चांदण्यांचे जग अद्भूत ते रम्य किती
सौंदर्या तेथ पहा नाही मोज ना मिती
देवाचे देणे हे अनमोल अन् रम्य असे…
अवकाशी चंद्र कसा ….
प्रियकर हा लाडका चंद्र प्रिय सर्वांचा
खिडकीतून रोज दिसे लपंडाव त्याचा
प्रेमभाव अर्पून त्यास मनमोर नित्य हसे…
अवकाशी चंद्र कसा …
गोड गोड तो हसे ….
© प्रा.सौ.सुमती पवार
नाशिक
(९७६३६०५६४२)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈