☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० (इंद्र सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १० ( इंद्र सूक्त )
ऋषी – मधुछंदस् वैश्वामित्र : देवता – इंद्र
मधुछन्दस वैश्वामित्र ऋषींनी पहिल्या मंडळातील दहाव्या सूक्तात इंद्र देवतेला आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त इंद्रसूक्त म्हणून ज्ञात आहे. याच्या गीतरूप भावानुवादाच्या नंतर दिलेल्या लिंकवर क्लिक केले म्हणजे हे गीत ऐकायलाही मिळेल आणि त्याचा व्हिडीओ देखील पाहता येईल.
मराठी भावानुवाद : डॉ. निशिकांत श्रोत्री
गाय॑न्ति त्वा गाय॒त्रिणोऽ॑र्चन्त्य॒र्कम॒र्किणः॑ ।
ब्र॒ह्माण॑स्त्वा शतक्रत॒ उद्वं॒शमि॑व येमिरे ॥ १ ॥
☆
गायत्रीतुन भक्त उपासक तुझेच यश गाती
अर्कस्तोत्र रचुनी ही अर्कअर्चनेस अर्पिती
पंडित वर्णित तुझीच महती तुझेच गुण गाती
केतनयष्टी सम ते तुजला उच्च स्थानी वसविती ||१||
☆
यत्सानोः॒ सानु॒मारु॑ह॒द्भूर्यस्प॑ष्ट॒ कर्त्व॑म् ।
तदिन्द्रो॒ अर्थं॑ चेतति यू॒थेन॑ वृ॒ष्णिरे॑जति ॥ २ ॥
☆
भक्त भटकला नगानगांच्या शिखरांवरुनीया
अगाध कर्तृत्वा इंद्राच्या अवलोकन करण्या
भक्ती जाणुनि वर्षाधिपती प्रसन्न अति झाला
सवे घेउनीया लवाजमा साक्ष सिद्ध झाला ||२||
☆
यु॒क्ष्वा हि के॒शिना॒ हरी॒ वृष॑णा कक्ष्य॒प्रा ।
अथा॑ न इन्द्र सोमपा गि॒रामुप॑श्रुतिं चर ॥ ३ ॥
☆
घन आयाळी वर्षादायक अश्व तुझे बहु गुणी
धष्टपुष्ट देहाने त्यांच्या रज्जू जात ताठुनी
जोडूनिया बलशाली हयांना रथास आता झणी
प्रार्थनेस अमुच्या ऐकावे सन्निध रे येउनी ||३||
☆
एहि॒ स्तोमा॑ँ अ॒भि स्व॑रा॒भि गृ॑णी॒ह्या रु॑व ।
ब्रह्म॑ च नो वसो॒ सचेन्द्र॑ य॒ज्ञं च॑ वर्धय ॥ ४ ॥
☆
अमुचि आर्जवे सवे प्रार्थना ऐका धनेश इंद्रा
प्रसन्न होऊनी प्रशंसून त्या त्यासि म्हणा भद्रा
अमुची अर्चना स्वीकारा व्हा सिद्ध साक्ष व्हायला
यज्ञा अमुच्या यशप्राप्तीचे आशीर्वच द्यायला ||४||
☆
उ॒क्थमिन्द्रा॑य॒ शंस्यं॒ वर्ध॑नं पुरुनि॒ष्षिधे॑ ।
श॒क्रो यथा॑ सु॒तेषु॑ णो रा॒रण॑त्स॒ख्येषु॑ च ॥ ५ ॥
☆
ऐका याज्ञिक ऋत्वीजांनो इंद्रस्तोत्र गावे
सर्वश्रेष्ठ ते सर्वांगीण अन् परिपूर्ण ही असावे
सखेसोयरे पुत्रपौत्र हे असिम सुखा पावावे
देवेंद्राच्या कृपादृष्टीने धन्य कृतार्थ व्हावे ||५||