सुश्री शोभना आगाशे
इंद्रधनुष्य
☆ कवी भूषण… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆
कवी भूषण हे आधी राजा छत्रसाल व नंतर शिवाजी महाराजांच्या दरबारात कवी होते. कवी भूषण यांच्याविषयी फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथे झाला. स्वाभिमानी भूषण लहान वयातच घर सोडून बाहेर पडले. अनेक रजपूत राजे तसेच औरंगजेब, कुमाऊँ राजे, छत्रसाल अशा अनेकांच्या दरबारी जाऊन त्यांच्यावर काव्यरचना केल्या. त्यांनी रचलेले भूषण हजारा, भूषण उल्हास व दूषण उल्हास सारखे अनेक ग्रंथ व काव्यरचना काळाच्या उदरात गडप झाल्या. मात्र त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाने, व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन लिहिलेला ‘शिवभूषण’ हा काव्यग्रंथ उपलब्ध आहे.
छत्रपतींना भेटण्यासाठी ते उत्तर भारतातून रायगडावर १६७० साली आले. तेथील व्याडेश्वर मंदिरात त्यांची महाराजांबरोबर भेट झाली. पण त्यावेळी त्यांना हेच शिवाजी महाराज आहेत हे माहित नव्हते. महाराजांनी विचारणा केल्यावर भूषण यांनी खाली उद्धृत केलेला छंद खड्या आवाजात गायला. तो ऐकून सर्व मावळे रोमांचित झाले. त्यांनी भूषण यांना तो पुनःपुन्हा गायला लावला. तब्बल अठरा वेळा गायल्यानंतर मात्र भूषण यांना थकवा आला.
मग महाराजांनी आपली खरी ओळख दिली व राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती केली. गाव, हत्ती वगैरे इनाम दिले. भूषण यांनी तीन वर्षे रायगडावर वास्तव्य केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आपल्या वीररसपूर्ण, अलंकारिक काव्यात शब्दबद्ध करून तो ‘शिवभूषण’ काव्यग्रंथ १ जून १६७३ रोजी महाराजांना सादर केला. पं. विश्वनाथ प्रसाद मिश्र यांनी संपादित केलेल्या ‘भूषण ग्रंथावली’ या पुस्तकात कवी भूषण यांचे ५८६ छंद आहेत. त्यापैकी ४०७ शिवभूषणचे, ‘शिवबावनी’ चे ५२ ‘छत्रसाल दशक’ चे १० व इतर ११७ छंद आहेत. यात संभाजी महाराज, शाहू महाराज, थोरले बाजीराव पेशवे, मिर्झा जयसिंह यांच्यावर रचलेले छंद देखिल आहेत. एकूण त्यांच्या रचना वीररसपूर्ण आहेत. शृंगाररसयुक्त अशा फक्त ३९ रचना आहेत. त्यांनी औरंगजेबाची निंदा करणारे, मुघलांनी उद्ध्वस्त केलेली काशी, मथुरा इ. मंदिरे, तिथे उभ्या राहिलेल्या मशिदी यांचे व धार्मिक अत्याचारांचे वर्णन करणारे छंद देखिल रचले आहेत.
त्यांनी लिहिलेले ५८६ छंद प्रसिद्ध आहेत. त्यापैकी हा पुढील छंद, महाराजांवरील एका टी व्ही सिरीयलच्या शीर्षक गीतात वापरला गेल्यामुळे, अलीकडील काळात जास्त प्रसिद्ध झाला. हा पूर्ण छंद असं आहे —–
इंद्र जिमि जंभ पर,
बाड़व ज्यौं अंभ पर,
रावन सदंभ पर
रघुकुलराज है।
पौन बारिबाह पर,
संभु रतिनाह पर,
ज्यौं सहस्रबाहु पर
राम द्विजराज है।
दावा द्रुमदंड पर,
चीता मृगझुंड पर,
भूषन बितुंड पर
जैसे मृगराज है।
तेज तम-अंस पर,
कान्ह जिमि कंस पर,
यौंन म्लेंच्छ-बंस पर
सेर सिवराज है॥
— कवी भूषण
याचा थोडक्यात अर्थ असा :-
जसे इंद्राने जंभासुर दैत्यावर आक्रमण करून त्याचा वध केला.
जसा वडवानळ समुद्रात आग निर्माण करतो.
जसा रघुकुल शिरोमणी श्रीरामाने अहंकारी रावणाचा वध केला.
जसे जलवाहक मेघांवर पवनाचे प्रभुत्व असते.
जसे रतीचा पती कामदेवाची क्रोधित शिवाने जाळून राख केली.
जसे सहस्त्र बाहु असलेल्या कार्तवीर्य अर्जुनाला परशुधारी रामाने, म्हणजेच परशुरामांनी त्याचे हजार बाहु कापून टाकून त्याचा वध केला.
जसा जंगलातल्या मोठमोठ्या वृक्षांना दावानल भस्मसात करतो.
जसा हरणांच्या कळपावर चित्ता तुटून पडतो.
जसा जंगलाचे भूषण असलेल्या हत्तीवर सिंह झेप घेतो.
जसा सूर्याच्या तेजाने अंधाराचा विनाश होतो.
आक्रमक कंसावर जसा श्रीकृष्णाने विजय मिळवला —
— तद्वतच, नरसिंह असलेल्या शिवाजी महाराजांनी मुघल वंशाच्या शत्रुला सळो की पळो करून सोडलेलं आहे.
© सुश्री शोभना आगाशे
सांगली
दूरभाष क्र. ९८५०२२८६५८
निवेदन- आज याबरोबरच चांगदेव पासष्टी हे सदर संपत आहे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈