मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ३” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – ३” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आज आम्ही पहेलगामला भेट देणार होतो. अगदी उत्साहात सर्वजण तयार होऊन निघाले. अनंतनाग जिल्ह्यातले हे ठिकाण सृष्टी सौंदर्य आणि उत्साहवर्धक हवेसाठी प्रसिद्ध आहे. इथे वर्षात चार ऋतू व्यवस्थितपणे अनुभवता येतात. सभोवती हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे, आसमंतात उंचचउंच पाईन आणि देवदार वृक्ष, हिरवळीची मैदाने आणि पाण्याचे प्रवाह दिसतात. हे सर्व पहात पहात आमचा प्रवास सुरू होता. रस्त्याच्या जवळून खळाळत वाहणारी लिद्दर नदी, पाण्याचा खळखळ आवाज, हिरवीगार वृक्षराजी यामुळे वातावरण खूप छान होते. जाताना वाटेत प्रसिद्ध अनंतनाग मधून पुढे गेलो. काश्मिरी भाषेत नाग म्हणजे पाण्याचा झरा किंवा प्रवाह. झेलम नदी बेहरीनाग मधून उगम पावते. संगम गावात झेलम नदी आणि लिद्दर नदीचा संगम होतो.

आम्ही पामपूरमधे केशर मळ्याला भेट दिली. इथे ५० स्क्वेअर किलोमीटरच्या टापूत केशर पिकवतात. ऑक्टोबर-नोव्हेंबर हा त्याचा सीझन असतो. त्याबद्दलची अगदी सविस्तर माहिती घेतली. केशर खरेदी बरोबर कावा चहाचा आस्वादही घेतला.

इथून पुढे ‘अवंतीपुर मंदिर अवशेषां’ना भेट दिली. अवंतीपूर राजा अवंतीवर्मांची राजधानी होती. इथे अवंती स्वामी म्हणजे विष्णू आणि अवंतीश्वर म्हणजे शिव अशी दोन दगडी मंदिरे होती. या मंदिरात अतिशय सुंदर कोरीव काम, भव्य मूर्ती होत्या. पण भूकंप आणि भूस्खलनात मंदिराचे अवशेषात रूपांतर झाल्याचे समजले. अजूनही तिथे काही मूर्ती, खांब वगैरे शाबूत आहेत. त्यावरील कोरीव काम अप्रतिम आहे. आता पुन्हा हे मंदिर पुनरुज्जीवीत करण्यासाठी काम सुरू आहे. याच ठिकाणी ऑंधी सिनेमातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा नही’  हे गाणे चित्रीत झाल्याचे समजले.

पहेलगाम हे गाव छोटसं पण पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ आहे. पहेलगाम म्हणजे मेंढपाळांचं गाव. इथून छोट्या वाहनांनी आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहायला गेलो. सुरुवातीला पोहोचलो चंदनवाडीला. प्रसिद्ध अमरनाथ यात्रेचे हे प्रवेशस्थळ आहे. इथल्या पायऱ्या चढून अमरनाथ यात्रा सुरू होते आणि पुढे जाते. प्रत्यक्ष अमरनाथाला नाही पण पहिल्या पायरीला हात टेकून अमरनाथाला मनोभावे नमस्कार केला.

समोर सगळीकडे बर्फचबर्फ होता. इथला बर्फ थोडा कडक घसरडा असल्याने हातात काठ्या घेऊन गमबूट घालून पर्यटक फिरत होते. बर्फात खेळत होते. बर्फाखालून वहाणारा खळाळता पाण्याचा प्रवाह मध्येच उघडा झाल्याने छोटे ग्लेशियर तयार झाले होते. सर्वांचे फोटो सेशन उत्साहात सुरू होते. नजर जाईल तिथवर पसरलेला बर्फ, बर्फाच्छादित झाडे, शिखरे यामुळे निसर्गाची अद्भुत लीला इथेही अनुभवायला मिळत होती.

इथून परत येताना बेताब व्हॅलीला गेलो. या व्हॅलीचे मूळ नाव हजन व्हॅली असे होते. पण इथे हिंदी चित्रपट ‘बेताब’चे शुटिंग झाले आहे आणि त्यानंतर ही व्हॅली ‘बेताब व्हॅली’ म्हणून ओळखली जाऊ लागली. समोर बर्फाच्छादित पर्वतशिखरे, पाईन आणि देवदार वृक्षांची जंगलासारखी दाट झाडी, आभाळाला स्पर्श करू पाहणारी उंच उंच झाडे, दूरवर पसरलेली हिरवीगार कुरणे, जवळच वहाणारा खळाळता जलप्रवाह असे अतिशय विलोभनीय सृष्टी सौंदर्य सभोवार दिसत होते. त्याला कॅमेऱ्यात बंदिस्त करीत तृप्त मनाने परत फिरलो.

वाटेत पुढे क्रिकेट बॅट बनविणाऱ्या फॅक्टरीला भेट दिली. विलोची  झाडाच्या लाकडापासून या बॅट्स बनवितात. हे लाकूड थंडी, उन, वारा, पाऊस या कसल्याही परिस्थितीत अजिबात खराब न होता आहे असेच राहते हे त्याचे खास वैशिष्ट्य आहे. हा उद्योग इथे खूप मोठ्या प्रमाणावर चालतो.

एकूणच आजचे स्थल दर्शन खूप छान झाले होते. मनाला भुरळ घालणारे अप्रतिम निसर्गसौंदर्य, धार्मिक स्थळांचे दर्शन, उदरनिर्वाहासाठी स्थानिकांची चालणारी धावपळ अशा संमिश्र भावनात निसर्ग किमयेला मनोमन नमस्कार करीत उद्याच्या सोनमर्ग भेटीची आस घेऊनच हॉटेलवर परतलो.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “क ट्ट प्पा” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “क ट्ट प्पा” ☆ श्री मंगेश मधुकर

शेठचं आयुष्यातलं मोठं स्वप्न पूर्ण झालं. आजोबांनी सुरु केलेला व्यवसाय नंतर वडील, स्वतः शेठ यांनी सचोटीने, मेहनतीने नावारूपाला आणला. पुढच्या पिढीने काळानुरूप बदल करून झळाळी आणली. पिढ्यानपिढ्याची मेहनत फळाला आली. दहा बाय दहाच्या जागेत सुरु केलेलं दुकान सत्तर वर्षानंतर भव्य तीन मजली झालं. शेठ आणि कुटुंबीय प्रचंड आनंदात होते. नवीन वास्तूचे उदघाटन दणक्यात करायचे यावर एकमत झाले, परंतु उदघाटनाला कोणाला बोलवायचं यावर खल सुरु होता. घरातले सगळेच उत्साहाने सहभागी होते.

“ कुठल्या तरी मोठ्या माणसाला बोलवू ”

“ फिल्मस्टार आला तर पब्लिसिटी चांगली मिळेल ”

“ हिरो नको,हिरोईनला बोलवा ”

“ नको,हे लोक लाखात पैसे घेतात. आपल्याला परवडणार नाही ”

“ माणूस फेमस पाहिजे.म्हणजे त्याच्या जोडीने आपल्या दुकानाची हवा होईल.”

“ असल्या पब्लिसिटीची गरज नाही. आपलं काम आणि नावं फार मोठंय ”

“ मग क्रिकेटर?”

“ नको,”

“ कोणालाही बोलवा.  फक्त राजकारणी, नेते मंडळी अजिबात नको ”

“ मग राहिलं कोण?? ”

 

उदघाटनावरून चर्चा रंगली. घरातील लहान मुलांपासून–मोठ्यांपर्यंत सगळे हिरीरीने मत मांडत होते. प्रत्येकजण वेगवेगळे पर्याय सुचवत होता.बराच वेळ होऊनही एकमत झालं नाही. शेठ मात्र शांत होते. निर्णय होत नव्हता म्हणून थोरल्यानं शेठना विचारलं.

” बापुजी,तुमचं मत !!”

“ कोणाला बोलवायचं तो तुमचा अधिकार. उदघाटन दिमाखात करा, पण पाहुण्यांसाठी उगाच फालतू पैसा खर्च करू नये असं माझं मत आहे ” 

“ तुम्ही सुद्धा एक नाव सुचवा ”

“ नाही नको.”

“ का?? “

“ मी सुचवलेलं नाव आवडणार नाही ” .. शेठ.

“ आतातर सांगाच ” – सगळयांनी एकदम आग्रह केला.

“ सगळे चेष्टा कराल.त्यापेक्षा राहू दे ”–शेठ.

“ बापुजी, सस्पेन्स वाढवू नका. खात्रीने सांगते ते नाव वेगळं असणार ”

“ त्यामागे नक्कीच काहीतरी विचार असणार. तुम्ही सांगा.”

“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन करावं ”–असं शेठ बोलल्यावर ते गंमत करताहेत असं वाटून सगळे मोठ्याने हसले.

“ आपला एवढा मोठा कार्यक्रम आणि तुम्ही ….”

“ काहीही काय?? ”

“ तेच ना, खरं नावं सांगा ”

“ मनापासून सांगतोय. गंमत नाही ” –शेठ 

“ या नावाला माझा विरोध आहे ”

“ माझा बिनशर्त पाठींबा आहे ” –माई

“ आप्पांच्या हस्ते उद्घाटन, का? कशासाठी? ”

“ कितीही केलं तरी आप्पा आपले नोकर !!”

“ एक मिनिट,मान्य नसेल तर ठीक आहे. पण आप्पांविषयी काही बोलू नका ” – शेठचा आवाज वाढला. एकदम शांतता पसरली.

“ माफ करा. जरा आवाज चढला. पण आप्पांविषयी बरेच गैरसमज आहेत. आम्ही विनाकारण नोकर माणसाला मान देतो असं सगळ्यांनाच वाटतं.” 

“ बापुजी,रागावू नका. पण आता विषय निघालाच तर स्पष्टच विचारतो.  त्या आप्पांचे एवढे कौतुक?? ”

“ आप्पांविषयी तुम्ही जरा जास्तच भावूक आहात.  पण दुकानात केलेल्या कामाचे आपण त्याना पैसे देतो. हा एक व्यवहार आहे. आपल्याकडे असे बरेचजण काम करतात. आप्पा अनेक वर्षापासून काम करतायेत हाच काय तो फरक. पण म्हणून मग ….” – शेठच्या दोन्ही मुलांनी नापसंती व्यक्त केली.

“ आयुष्यात प्रत्येक ठिकाणी व्यवहार पहायचा नसतो. काही माणसं ही व्यवहारापलीकडची असतात. आप्पाविषयी सांगायचे तर माझ्या जन्माच्या आधीपासून ते दुकानात काम करतायेत. दुकान सुरु झाल्यावर सहा महिन्यातच गावाकडून आलेला एक अनाथ, गरीब, गरजू मुलगा कामाला लागला आणि नंतर दुकान हेच त्याचं आयुष्य झालं. एकोणसत्तर वर्ष आणि सहा महिने आप्पा या दुकानात काम करतायेत. डोळे झाकून विश्वास ठेवावा असा माणूस. प्रामाणिकपणाचा मापदंड, दुकानातली खडा न खडा माहिती. आपली चौथी पिढी दुकानात आलीय आणि अजूनही ऐंशी पार केलेले आप्पा दुकानात काम करतात.” – शेठ 

“ हे भारी आहे. मला आप्पांना भेटायला आवडेल.” – शेठची नात.

“ लग्नानंतर आप्प्पांची ओळख सासऱ्यांनी घरातला माणूस म्हणून करून दिली. घरात आप्पांना कधीच नोकर म्हणून वागणूक दिली गेली नाही आणि आप्प्पांनीसुद्धा मान मिळाला म्हणून आपली मर्यादा ओलांडली नाही. आजही आपल्यापैकी लहानमोठा कोणी दुकानात गेले कि आप्पा उभे राहतात. हात जोडून नमस्कार करतात. वयाकडे न पाहता मालकांचा मान राखतात.” – माई 

“ हे मी बघितलंय ”

“ मी सुद्धा हा अनुभव अनेकदा घेतलाय ”

“ आपलं दुकान म्हणजेच आप्पांचं आयुष्य. गावाकडून आले आणि इथलेच झाले. आजोबांनी एक खोली घेऊन दिली, त्याचे सगळे पैसे सुद्धा आप्पांनी फेडले. स्वतःविषयी कधीच बोलले नाहीत. अनेकदा विचारलं पण तेव्हा हसून उत्तर टाळलं. दुकानावर त्यांचा अतिशय जीव, दुकानाच्या बदलत्या रूपाचे आप्पा हे एकमेव आणि चालता बोलता साक्षीदार आहेत. त्यांच्याइतका योग्य माणूस दुसरा नाहीच  म्हणूनच… .” शेठ एकदम बोलायचे थांबले. पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. 

“ माझा आग्रह नाही. तुम्ही निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात.” – शेठ 

“ उदघाटन आप्पांच्या हस्ते करायचे हे सर्वांना मान्य ” – माईंनी विचारताच आपसूक सगळ्यांचे हात वरती गेले. 

“ आप्पांची ओळख कशी करून द्यायची? ”

“ बाहुबली सिनेमात महिष्मती साम्राज्यासाठी जसे कट्टप्पा तसे आमच्या दुकानासाठी आप्पा !!! ”

… थोडक्यात शेठनी समर्पक ओळख सांगितली तेव्हा सगळ्यांनी जल्लोष केला.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा श्रीगणेशा… ☆ डॉ. प्राप्ती गुणे ☆

डॉ. प्राप्ती गुणे

? मनमंजुषेतून ?

☆ ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा श्रीगणेशा… ☆ डॉ. प्राप्ती गुणे

आजकाल जिकडे पाहाल तिकडे सोशल मीडियावर ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओज ची मांदियाळी आहे.

बिफोर अमुक वजन आणि आफ्टर 10 किलो, 20 किलो, 30 किलो कमी झाल्यानंतरचे हे व्हिडिओ  आपल्याला प्रेरित केल्यावाचून राहत नाहीत. आपलाही असाच एक ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ  बनवावा, ही सुप्त इच्छा नकळत मनात जन्म घेतेय, अनेकांच्या ! आणि मग सुरू होतो या ‘ट्रान्सफॉर्मेशन’ चा प्रवास….

जिमला जायचंच असं पक्कं ठरवलं की मग चौकशी केली जाते. जिममध्ये पहिल्यांदा गेल्यानंतर तिथल्या भिंतीवरचे मोटिवेशनल कोट्स वाचून, उत्साहवर्धक म्युझिक ऐकून, अनेक बॉडी बिल्डर मंडळींना ‘ हिरो ‘ स्टाईलने वजन उचलताना पाहून भारावून जायला होतं. मनातल्या ‘ ट्रान्सफॉर्मेशन ‘ची कल्पना डोळ्यासमोर तरळायला लागते आणि ती प्रत्यक्षात उतरणार, हे अगदी खरं वाटायला लागतं.

जिममध्ये सहा महिन्यांची, वर्षाची फी एकत्रित भरली की ‘ एवढा डिस्काउंट मिळेल ‘ अशी आकर्षक ऑफर बिंबवून सांगितली जाते. आणि आपणही आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात मान डोलावून मोकळे होतो. …  चला, पहिलं काम तर झालं ! जिमची फी भरली…

आता एवढे भारी व्यायाम प्रकार करायचे तर त्याला शोभून दिसणारे कपडे नकोत, साजेशे शूज नकोत ?

चला, बाजारात खरेदीला…. हुश्श !  सगळी तयारी परफेक्ट झाली… आता जिमला जायचं फक्त बाकी राहिलं…

…  जिमच्या पहिल्या दिवशी शरीराला सवय नसल्याने कमी व्यायाम करायचा असतो. पण काही उत्साही वीरांनी निश्चित टार्गेट एकाच दिवसात निम्म संपवायचं असं जणू मनात ठरवलेलं असतं.. सगळा व्यायाम आटोपला की थोड्या वेळाने अंगाची ओरडाआरडी सुरू होते.. हात जरासे हलवले तरी दुखतात… चालण्यासाठी पाय मुश्किलीने उचलावे लागतात… संपूर्ण शरीर ठणकत असतं… आणि मग…?

… मग, काय ? दुसऱ्या दिवशी जिमला सुट्टी !!!

मला कोणत्याही पद्धतीने व्यायाम, जिम अथवा जिम लावणारे यांच्यावर कोणताही आक्षेप घ्यायचा नाही. 

वर सांगितलेलं हे फक्त एक जरासं रंजित पण खरं उदाहरण आहे. अनेकजण नियमितपणे व्यायाम करणारे आहेत, आरोग्याबाबत जागरूक असणारे आहेत व जिमला रेग्युलर जाणारे आहेत…

… पण माझा म्हणायचा मुद्दा एकच ! …

*जे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला बाह्य शरीरात हवंय, ते होण्यासाठी आणि ते करण्याअगोदर आपण आपल्या अंतररुपी मनोधारणेत बदल करणं खूप आवश्यक आहे,.. असं मला वाटतं*.

स्वतःला प्रत्येकाने एक प्रामाणिक प्रश्न विचारला पाहिजे.. ” मला माझ्या शरीराबद्दल किती आदर वाटतो ?”

एकदा मनुष्याने स्वतःच्या आरोग्याचा सन्मान करायला सुरुवात केली की, ह्या बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास सोपा होतो आणि तो पूर्ण व्हायला मदत होते. हे माझे स्वानुभवाचे बोल आहेत.

अनेकदा आपण आपलं निश्चित ध्येय गाठतो, परंतु कमी केलेलं वजन परत वाढतं आणि आपण पुन्हा पूर्वपदाला येऊन पोहोचतो. असं का ? एकदा ध्येय गाठलं की संपलं…पुन्हा खमंग आणि गोडाधोडाचे पदार्थ खाणं सुरू होतं. जिभेचे चोचले आणि पोटाचे लाड पुरवणं सुरू होतं….. 

…  आणि मग.. मग पुन्हा जैसे थे !

जर आपल्याला आपल्या शरीर आणि आरोग्याबद्दल रिस्पेक्ट असेल तर मात्र सगळं बदलतं…

आता गणपती बाप्पाचं आगमन होतंय. दहा दिवस खाण्यापिण्याची मस्त रेलचेल असेल…

– तर मग मी तीस मिनिटे जरा एक्सट्रा फिरतो..

– घरात मिठाई बनवताना साखरेचे प्रमाण मी कमी करते..

– बाहेरून मिठाई आणताना लक्षात ठेवून मी कमी गोड मिठाई आणतो..

– बाप्पा घरी सुट्टीसाठी आलाय, पण मी माझ्या व्यायामाला अजिबात बुट्टी होऊ देणार नाही..

– बाप्पाला वेगवेगळ्या फळांचा प्रसाद ठेवूयात..

– घरच्या घरी प्रयोगशील बनून, बाप्पाला आरोग्यदायी रेसिपीची नवलाई चाखवूया..

… वगैरे, वगैरे.. असं सगळं निश्चित ठरवता येईल की.. 

पण हे सगळं फक्त बाप्पा घरी आहे तेवढ्यापुरतंच ठरवून — फक्त ठरवून नाही, तर प्रत्यक्ष आचरणात आणून चालणारच नाही. हे सगळे नियम कायमसाठी पाळले तरच अपेक्षित ते ट्रान्सफॉर्मेशन होईल ना ? मग त्यासाठी काय करायला हवं तर कोणत्याही मोहाला बळी पडताना, एक क्षण थांबून आपण स्वतःलाच विचारावं .. ..

* मला माझ्या शरीराबद्दल आणि त्याच्या आरोग्याबद्दल खरोखरच मनापासून आदर वाटतो की नाही वाटत ? आणि वाटत असेल तर मग ही अमुक एक कृती माझ्या आरोग्यासाठी हितदायक आहे का ? जर ही कृती केल्याने माझ्या आरोग्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार असेल, तर या क्षणिक मोहाला मी बळी पडणार नाही* ! आणि हा निश्चय मात्र अगदी ठाम हवा बरं का .. “ केल्याने होत आहे रे – पण – आधी केलेची पाहिजे “ हा उपदेश आधी तुमच्या मनावर बिंबवला जायला हवा. आणि तो अगदी काटेकोरपणाने आणि अगदी मनापासून पाळला जायला हवा. मग बघा तुमच्याही नकळत हळूहळू कसे हवे ते बदल व्हायला लागतात. 

सुरुवात जर या ‘ आंतरिक ट्रान्सफॉर्मेशन ‘ च्या  नियमित सरावाने  केलीत ना की तुमच्या ‘ बाह्यरूपी ट्रान्सफॉर्मेशन ‘ चा व्हिडिओ ‘ व्हायरल ‘ झालाच म्हणून समजा..!!!

मग आता लगेच करूयात अशा ट्रान्सफॉर्मेशन चा ‘ श्रीगणेशा ‘ ?

© डॉ. प्राप्ती गुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सांगता गणेशोत्सवाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ सांगता गणेशोत्सवाची… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

अनंत चतुर्दशी झाली! आज सकाळ उगवली, तीच मुळी मरगळलेली! सकाळी उठून बाल्कनीत गेले तर मागच्या कॉर्पोरेशनच्या मैदानावर वेगळेच दृश्य दिसत होते. कॉर्पोरेशनचे कामगार कामावर येऊन स्वच्छता मोहीम सुरू झाली होती.

कालपर्यंत मंगलमय वातावरणात असणारे ते ठिकाण, आज अगदी मांडव परतणे झाल्यावर दिसणाऱ्या लग्न कार्यालयासारखेच दिसत होते! जिकडे तिकडे कागद, फुलांचे निर्माल्य ,डेकोरेशनचे मोडके तोडके साहित्य, आणखी काय काय!

तिथे दोन मोठे पाण्याचे टॅंक गेले दहा दिवस पाण्याने भरून ठेवले होते. प्रत्येकाच्या गणेश विसर्जनाच्या पद्धतीप्रमाणे- दिवसाप्रमाणे रोज गणपती विसर्जनासाठी लोक येत होते. बाजूलाच कचरा टाकण्यासाठी निर्माल्य कुंड होते. कोणी त्यात व्यवस्थितपणे कचरा टाकत, तर कोणी दुरूनच फेकत! ज्यामुळे कुंडा बाहेरही कचरा! आरती साठी दोन टेबले होती, जिथे गणेश मूर्ती ठेवून लोक बाप्पाची आरती म्हणणे, नारळ फोडणे, पुन्हा पुन्हा देवाला ‘लवकर ये पुढच्या वर्षी’ अशी प्रार्थना करून मगच गणपतीला उचलत होते!

आज सकाळी ते मोठे पाण्याचे टॅंक ग्राउंड वरच ओतले गेले. तळाशी राहिलेली माती खोऱ्याने काढली जात होती. रंगीबेरंगी पाण्याचे ओघळ बाहेर लांब पर्यंत वाहत होते. गेले २/३ पाऊस असल्याने आधीच भिजलेले ते मैदान आता आणखी चिखलमय दिसत होते.जणू काही सगळ्याचेच विसर्जन झाले होते. शेवटी गणेशाच्या मूर्तीची माती या जमिनीतच मिसळून जात होती. मन भरून आले! कालपर्यंत देव्हाऱ्यात विराजमान झालेल्या या मूर्ती आज पुन्हा मातीत मिसळल्या! मातीचा होतो, मातीत मिसळलो याप्रमाणे! मधला काळ म्हणजे फक्त रंगमंचावरील काही काळाचे आगमन असंच वाटलं मला!

नकळत मनात आलं, शेवटी आपण म्हणजे तरी काय जन्माला येतो ते मातीचा गोळा म्हणून! त्याला घडवत आकार देत वाढवले जाते. आयुष्याच्या बालपण, तरुणपण, वृद्धत्व अशा अवस्था अनुभवत शेवटी मातीलाच मिळतो. पार्थिव गणेश आपल्याला हेच सांगतो. ‘या जगाचा मोह करू नका, हे तर सोडून जायचंच आहे, पण जोपर्यंत देहात आहात, तेव्हा चांगलं काही करा. प्रत्येक क्षण आपल्या आयुष्याचा उत्सव असू दे!.’ जगण्याची ही उर्मी, आनंद आपण या गणेशा कडून शिकला पाहिजे….

कालच वाचनात एक कविता आली….

तळाशी जाता जाता,

आधी अंगावर लागलेली कौतुकाची निर्माल्य उतरवून ठेवायची..

मग अपेक्षांचा अबीर बुक्का तरंगू द्यायचा पाण्यावर..

अलंकाराचे ओझं हलकं करायचं, कालांतराने..

स्वतःला गोंडस बनवणारे रंगाचे थर विरघळू द्यायचे..

इतरांनी आपल्यावर चढवलेले श्रद्धेच्या पताका, दैवत्वाची झालर सोडून द्यायची,

आणि त्याच मातीचा भाग व्हायचं,

जिथून आपण आलो होतो..

पुन्हा एकदा तितकंच गोंडस रूप घेऊन येण्यासाठी,

बाप्पा जाता जाता सुद्धा बरंच काही शिकवून जातो…’

अशी एक सुंदर कविता आज व्हाट्सअप वर वाचायला मिळाली. कवी कोण आहे ते लिहिले नव्हते, पण अगदी सुंदर शब्दात बाप्पाच्या जाण्याच्या रूपाची सांगता या कवितेत व्यक्त झाली आहे, ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते!

‘गणेशोत्सव’ हा आता आपल्या सामाजिक जीवनाचे एक अंग झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य प्रती जागरूकता आणि एकत्र येण्याची वृत्ती वाढावी म्हणून गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिले. स्वातंत्र्य तर मिळाले, पण सार्वजनिक गणेशोत्सव मात्र वाढत्या प्रमाणात साजरा होऊ लागला..

त्याचे काही चांगले, काही वाईट असे रूप आता आपल्याला बघायला मिळते.

गेला महिनाभर सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्यकर्ते राबत असतात. आपला देखावा अधिकाधिक चांगला, नाविन्यपूर्ण होण्यासाठी धडपडत असतात. तात्कालीन नवनवीन विषयांचा विचार करून त्यावर आधारित  देखावे, जसे यंदा चांद्रयान मोहीम, पुण्याची मेट्रो यासारखे उत्तम उत्तम देखावे उभारले गेले. काही मंडळे समाजोपयोगी कार्यक्रम यानिमित्ताने आखतात. जसे रक्तदान शिबिरे, गरजूंना मदत, वेगवेगळ्या स्पर्धा….       या उत्सवामुळे समाजातील सर्व थरातील लोकांना काम मिळते. उद्योग धंदा वाढतो, त्यामुळे पैसा खेळता राहतो. नवीन पिढीसाठी हे उत्साहाचे टॉनिक असते. शाळा शाळातून गणपती पूजा, अथर्वशीर्ष या गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. शाळेतील गणपतीचेही चांगले डेकोरेशन केले जाते. मुलांच्या रोजच्या शाळेच्या चाकोरीबद्ध जीवनात हा एक चांगला बदल असतो. आनंददायी अशा या गणेशोत्सवाची सांगता आज झाली.

या बुद्धी दात्या गणेशाला आनंदाने निरोप घेऊन पुन्हा एकदा नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा त्याच्याकडून घेऊया, म्हणजेच या गणेशोत्सवाची खरी सांगता झाली असे म्हणता येईल! जय गजानन!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ एक नरश्रेष्ठ भारतीय सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके 

(डावीकडील छायाचित्रात नायक बिष्णू श्रेष्ठ दिसत आहेत. दुसरे छायाचित्र गोरखा सैनिकाचे प्रातिनिधीक छायाचित्र आहे.)

…अर्थात Once a soldier, always a soldier! Saving dignity of a woman! 

त्याने झटकन आपल्या पोटपाशी लटकावलेली खुखरी तिच्या म्यानातून उपसली आणि त्याच्यावर झेप घेतली! खुखरी एकदा का म्यानातून बाहेर काढली की तिला अजिबात तहानलेली ठेवायची नसते. त्याने सपकन आडवा वार केला आणि त्याचं नरडं कापलं. खुखरीच्या जिभेला शत्रूच्या गरम रक्ताचा स्पर्श झाला आणि तिची तहान आणखी वाढली….समोर आणखी एकोणचाळीस शत्रू होते…कुणाच्या नरडीचा घोट घ्यावा? 

तो सकाळीच आपल्या सैनिक मित्रांचा निरोप घेऊन घरी निघाला होता आपल्या पलटणीतून. का कुणास ठाऊक, पण त्याला आता घरापासून दूर राहण्याचा कंटाळा आलेला होता. घरी जाऊन वडिलोपार्जित शेती करावी,मुला-बाळांत रमावं असं वाटू लागलं होतं. त्याने मुदतपूर्व सेवानिवृत्ती मागितली तेंव्हा वरिष्ठही चकित झाले होते. बरं, वयही फार नव्हतं. फक्त पस्तीशीचा तो शिपाईगडी. त्यादिवशी त्याने साहेबांना कडक सल्यूट बजावला. जय महाकाली…आयो गोरखाली हा त्याचा सैन्यनारा मनात आठवला आणि आपला लष्करी गणवेश उतरवला….खुखरी मात्र गळ्यात घातलेल्या पट्ट्यात तशीच राहू दिली. खुखरी आणि गोरखा सैनिक म्हणजे जीवाभावाचं नातं…तिला दूर नाही करता येत. शीख बांधव जसं कृपाण बाळगतात सर्वत्र तसंच खुखरीचं आणि गोरखा सैनिकांचं. गुरखा किंवा गोरखा. इंग्लिश आमदनीत गुरखा असा उच्चार असायचा, तो स्वतंत्र सार्वभौम भारतात ‘गोरखा’ असा मूळच्या स्वरूपात केला जाऊ लागला.

त्याचा घरी जाण्याचा मार्ग झारखंड राज्यातून जात होता. रेल्वेप्रवास अपरिहार्य होता. तिकीट आरक्षित केलं होतंच. प्रवास सुरू झाला. सहप्रवाशांना प्रवासात लक्षात आलंच होतं की हा शिपाई गडी आहे. त्याच्या शेजारी बसलेल्या आणि आपल्या आई-वडिलांसोबत प्रवास करीत असलेल्या अठरा वर्षीय तरूणीने तर त्याच्याशी अगदी आदराने ओळख करून घेतली. रात्र झाली आणि सर्वजण आपापल्या बर्थवर झोपी गेले. जंगलातून जाणारा रेल्वेमार्ग. रात्रीचे बारा-साडेबारा झाले असतील. करकचून ब्रेक्स लागल्यासारखी गाडी मध्येच थांबली. बाहेर काळामिट्ट अंधार. मात्र बहुसंख्य प्रवासी झोपेत असल्याने त्यांना काही जाणवले नाही. आपला शिपाईगडीही गाढ झोपेत होता. अचानक रेल्वे डब्यात बाहेरून वीस-पंचवीस जण घुसले…हातातली धारदार हत्यारं परजत. डब्यात आधीच प्रवासी म्हणून बसलेले त्यांचे साथीदार तयार होतेच. त्यांनी प्रत्येकाला हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्याकडची चीजवस्तू,पैसे,मोबाईल ओरबाडायला आरंभ केला. अर्थवट जागे झालेल्या प्रवाशांना काही समजेनासे झाले होते. चोरट्यांच्या धाकाने कुणाच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. दरोडेखोरांनी आपल्या शिपाई गड्याला हलवून जागे केले. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून त्यानेही जवळचे सर्वकाही त्यांना देऊन टाकले…खुखरी सोडून! मी एक आर्मीवाला आहे हे त्याने त्याही परिस्थितीत ओरडून सांगितले. त्यांची हत्यारे,त्यांची संख्या आणि आपण एकटे…अशा स्थितीत धाडस करणे परवडणार नाही…असा त्याचा विचार! 

तेवढ्यात त्या हरामखोरांची नजर जवळच्याच बर्थवर अंगाचे मुटकुळे करून,थरथरत बसलेल्या त्य तरूणीवर पडली. त्यांच्या डोळ्यांत आता निराळेच भाव दिसू लागले. एकाने तिच्या अंगावर कापड फाडले आणि तिला खेचले. तिने जोरात आकांत केला आणि आपल्या सैनिक बांधवाकडे पाहिले…वाचवा! 

आता मात्र या शूर गोरख्याचा संयम संपला. आपण शत्रूच्या समोर उभे आहोत आणि तो आपल्यावर चाल करून येतो आहे,असा त्याला भास झाला. जय महाकाली…आयो गोरखाली असं हळू आवाजात पुटपुटत त्याने खुखरी उपसली आणि त्या मुलीची अब्रू लुटू पाहणा-या दरोडेखोरांपैकी पहिल्याचा गळा चिरला! त्या एवढ्याशा जागेला आता युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले. तिथे प्रचंड आरडाओरडा सुरु झाला. चाळीस पैकी एक दरोडेखोर आपल्या सैनिकाच्या हातात होता…बाकीचे एकोणचाळीस धावून येऊ लागले. आपल्या बहादूराने त्या दरोडेखोराच्या देहाची ढाल केली आणि तो पुढे सरसावला. त्यांच्या हातातली धारदार शस्त्रे आणि याच्या हातातली खुखरी….खुखरी अचूक चालू लागली…त्यांनी गोळी झाडली पण नेम चुकला. खुखरीचा मात्र नेम चुकू शकतच नाही. इतक्या वर्षाचे अघोरी वाटेल असं प्रशिक्षण…खुखरी आणि खुखरी चालवणारा कसा विसरेल? खुखरीने आणखी तीन जणांच्या कंठातून रक्त प्यायले…..त्या दुष्टांना खरोखरीचे कंठस्नान घातले. उण्यापु-या दहा-पंधरा मिनिटांचा हा थरार…तीन धराशायी आणि आठ-नऊ दरोडेखोर खुखरीच्या वारांनी पुरते घायाळ. या झटापटीत डब्यातील प्रवासी थरथरत निमुटपणे बसलेले होते. मुलीच्या गळ्याला थोडीशी दुखापत झाली होती. एवढ्यात जवानाच्या हातातली खुखरी खाली पडली…एका दरोडेखोराने तीच उचलून जवानाच्या हातावर वेगाने वार केला..खोलवर जखम झाली.रक्ताची चिळकांडी उडाली आणि जवान खाली कोसळला…पण हा पुन्हा उठून आपला जीव घेईल अशी त्यांना साधार भीती वाटली…ते डब्यातून उतरून जंगलात पळून गेले….नायक बिष्णू श्रेष्ठ,(सेवानिवृत्त्त) (गोरखा रायफल्स,भारतीय सेना) गंभीर जखमी होते…ट्रेन एव्हाना सुरू झाली होती..इतरांना या डब्यात नेमके काय घडलं होतं त्याचा तपास नव्हता…पुढच्या स्टेशनवर पोलिस,डॉक्टर्स तयार होते. डब्यात पडलेली तीन प्रेतं आणि एक जखमी मनुष्य…म्हणजे आपले बहादूर विष्णू श्रेष्ठ. अंगावर सिवीलीयन कपडे. पोलिसांना वाटले हा ही दरोडेखोरच! पण त्या तरूणीने आणि तिच्या आई-वडिलांनी सारी हकीकत सांगितली, हे नशीब! विष्णूजींना रूग्णालयात हलवण्यात आले. पूर्ण बरे होण्यास त्यांना तब्बल दोन महिने लागले यावरून त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीची कल्पना यावी! यथावकाश पोलिसांनी सहा दरोडेखोरांना जेरबंद करून आणले. त्यांच्याकडून दहा हजारांपेक्षा जास्त रोख  रक्कम,तेहतीस मोबाईल फोंस, काही घड्याळे, दोन पिस्टल्स,जिवंत काडतुसं हस्तगत केली! भारतीय सैन्याने या शूरवीराला सेना मेडल आणि उत्तम जीव रक्शा पदकाने सन्मानीत केलं. चांदीचं पाणी दिलेली नवी कोरी खुखरी भेट दिली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या डोक्यावर असलेलं रोख इनामही विष्णूजींना दिलं. सामुहिक बलात्काराच्या मोठ्या संकटातून आपल्या लेकीची, तळहातावर प्राण ठेवून सुटका करणा-या विष्णूजींना त्या मुलीच्या आई-वडिलांनी मोठी रक्कम बक्षिस म्हणून देऊ केली…..तेंव्हा नायक बिष्णू श्रेष्ठ म्हणाले….देशाच्या शत्रूंना ठार मारणं हे सैनिक म्हणून कर्तव्य होतं. तसंच नागरीकांचं रक्षण करणं हे माणूस म्हणून कर्तव्य होतं..ते मी निभावलं ! याचं बक्षिस कशाला? 

(दोन सप्टेंबर,२०१० रोजी हातिया-गोरखपूर मौर्या एक्सप्रेस मध्ये पश्चिम बंगाल मधील चित्तरंजन स्टेशनजवळ ही चित्तथरारक सैनिक-शौर्य कथा मध्यरात्री घडली. Once a soldier, always a soldier…ही म्हण प्रत्यक्षात आली ! मूळचे नेपाळचे असलेले आणि भारतीय सैन्यातील ७, गोरखा बटालीयनच्या ८,गोरखा रायफल्स पथकामधून निवृत्त होऊन घरी निघालेल्या नायक बिष्णू श्रेष्ठ यांनी हे अचानक हाती घेतलेलं ‘ऑपरेशन रक्षाबंधन’ आपले प्राण पणाला लावून यशस्वी केले होते. जय महाकाली..जय गोरखाली…भारत माता की जय…जय जवान…जय हिंद असा घोष तुमच्याही मनात जागवेल अशी ही कहाणी…इतरांनाही सांगा. कथा खरी. तपशिलातील उणिवांची जबाबदारी माझी.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन  भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला, एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.

“नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.

“अरे भाऊ …, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय.”

” ऱ्हावू द्या, तीनपेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय.” तो पुन्हा बोलला.

आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या, वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला ‘मला कांही खायला द्या’ अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या .

त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या, जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्‍या महिलेच्या कपड्यांकडे गेली. जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.

त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही, असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं. तर मग काय भाऊ? तू काय ठरवलंयस ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”

यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या. पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.

विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली.तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं  गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.

आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं.

तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं  देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता,याचं कारण  तिला आता चांगलंच उमगलं होतं.

आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणीव झाली होती.

तर…कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं.

आपल्याजवळ देण्यासारखे काय  आहे  आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही.

ज्याच्याकडे जे आहे , ते त्याने द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही. तर वेळ,मानसिक,भावनिक आधार देऊन एखाद्याचे जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो.

रस्ता ओलांडण्यास केलेली मदत,एखाद्याचं ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची.

आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील, तर तीही एक प्रकारची मदतच.

गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची.

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आम्ही आज गुलमर्गला भेट देणार होतो. प्रत्यक्ष हिमशिखरावर चढाई. मनात खूप उत्सुकता होती. पहाटे साडेपाच वाजता आमची बस निघाली. त्यामुळे गाडीतून सूर्योदय बघायला मिळाला. अगदी सूर्योदयापासूनची निसर्गाची विविध रूपे बघायला मिळत होती. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच देवदार वृक्ष, सूचीपर्णी झाडे, सफेदाची झाडे होती.

तो धावता निसर्ग अक्षरशः नजर खेचून घेत होता. मधूनच हिमशिखरे दिसत होती. शिखर दिसले की एकमेकांना हाका मारून दाखवणे आणि त्याचे वर्णन करणे अखंड सुरू होते. सगळेच जण अतिशय उत्साहीत होते.

गुलमर्गच्या आधी तांगमर्गला सर्वांनी फरकोट, हातमोजे आणि गमबूट घेतले. तिथून छोट्या गाड्यांनी सर्वजण पुढे गुलमर्गला गेलो. वळणावळणाचा  घाटरस्ता आणि त्यातून दिसणारा निसर्ग खुणावत होता. इथून आता खास आकर्षण असणाऱ्या गोंडोला राईडने म्हणजेच केबल कारने पर्वतावर जायचे होते.

सुरुवातीला केबल कारने पहिला टप्पा कांडोरी स्टेशनवर गेलो. आम्ही अंदाजे दहा हजार फूट उंचीवर पोहोचलो होतो. एकदम वातावरणात फरक जाणवत होता. उंचावरची बर्फाच्छादित शिखरे, धुके, खोल दरी यांचे दृश्य खूपच सुंदर होते. ज्यांना हवेचा त्रास जाणवत होता,  पुढे उंचावर जायचे नव्हते असे अनेक जण याच टप्प्यावर हाती काठी घेऊन किंवा घोड्यावरून समोरील उंच टेकडीवर चढत होते. इथला बर्फ जुना असल्याने खूप टणक आणि घसरडा होता. इथे काचेचे इग्लू रेस्टॉरंट आहे.

या स्टेशनवरून आम्ही केबल कारने अफरवत पर्वतावरील दुसऱ्या टप्प्यावर गेलो. तिथे आम्ही १३५०० फूट उंचीवर आलो होतो. केबल कारने वर जाताना खाली खोल खोल दरी,  उतारावरील उंच उंच पाईन वृक्ष आणि वरची एकदम उंच शिखरे यामुळे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. असे अधांतरी तरंगत जाण्यातला थरार मात्र जबरदस्त होता. आजूबाजूचे दृश्य अतिशय मनमोहक होते. सर्व झाडे, पर्वताचा बराचसा भाग बर्फाच्छादित असल्याने पांढरा दिसत होता.  दुसऱ्या टप्प्यावर आलो आणि शब्दशः बर्फात उतरलो. चारीबाजूने बर्फाच्छादित शिखरावर पोहोचलो होतो. समोरचे दृश्य बघून अक्षरशः नजरबंदीच झाली.

शिव शंभूची पवित्र भूमी

 बर्फाच्छादित शुभ्र कडे

विलोभनीय निसर्गाचे

 भव्य दिव्य दर्शन घडे ||

तिथे एकदम खूपच थंड हवा होती. सर्वांनी सर्व जामानिमा परिधान केलेला असल्याने थंडीचा त्रास होत नव्हता. बर्फ एकदम ताजा होता. अगदी भुरभूरीत. हाताने गोळा करता येत होता. तिथे आल्यावर सर्वच पर्यटकांचे बर्फातले खेळ सुरू झाले. नातवंडांनी गोळे केले, बाहुल्या बनवल्या, चक्क बर्फावर लोळणही घेतली. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाने डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी गॉगल्स घातले होते. एकंदरीतच प्रत्येकाचे रूप एकदम इथे वेगळेच झाले होते.

या ठिकाणी फोटो काढायची तर पर्वणीच होती. विविध पोज मध्ये सर्वांचेच फोटो सेशन सुरू होते. बरेच जण बर्फात स्किईंग, स्नो-बोर्डिंग करत होते. इतके दिवस ऐकू येणारी हिमशिखरांची साद इथे वरती आल्यावर शांत झाली होती. आम्ही वरपर्यंत येऊ शकलो याचे समाधान खूप मोठे होते. त्यामुळे एक खूप मोठा आनंददायी अनुभव मिळाला होता

जवळजवळ दोन अडीच तास इथे घालवायला मिळाले. किती  बघू आणि किती नको असं झालं होतं. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधानच होत नव्हतं. ऐकणं, सांगणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात फार फरक असतो त्याची इथे चांगलीच प्रचिती आली.  निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्याच्या समाधानात केबल कारने पुन्हा खाली आलो.

गुलमर्ग हे पीर पंजाब रेंजमध्ये आहे. ते पूर्वी ‘गौरी मार्ग’ म्हणून ओळखले जात असे. केबल कारने म्हणजेच गोंडोलाने अफरवत पर्वतावर आपण जातो. इथून खिल्लनमर्गचे विलोभनीय दर्शन होते. अप्रतिम नजारा दिसतो. काश्मीर ट्रीपचे खास आकर्षण म्हणजे ही गुलमर्गची गोंडोला राईड. ही गोंडोला आशियातील सर्वात उंच तर जगातील दुसरी सर्वोच्च आणि दुसरी सर्वात लांब केबल कार आहे. एका कारने सहा जणांना जाता येते.  इतरांच्या केबल कार वर जाता येता पाहणे, आपण स्वतः जाता येतानाचा अनुभव घेणे, त्या वेळेचे निसर्गदर्शन हा एक खूप वेगळाच पण सर्वांगसुंदर अनुभव आहे. पांढरे झालेले असंख्य उंचच उंच पाईन वृक्ष, बर्फाच्छादित उंच शिखरे आणि खाली खोल दरी यामध्येच ऊन आणि धुक्याचा पाठशिवणीचा खेळ हे अतिशय मनोरम दृश्य असते. केवळ एक अविस्मरणीय असा बेजोड अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो.

परत येताना काश्मिरी कार्पेट फॅक्टरीला भेट दिली. प्रत्येक प्रांताचे एकेक वैशिष्ट्य असते. काश्मिरी गालिचे ही इथली खास निर्मिती. कार्पेट कसे बनवतात याची झलक आणि असंख्य सुंदर असे नमुने बघितले. अगदी लाखाच्या पुढे किंमत असलेला अप्रतिम गालिचा बघीतला. एक अतिशय उत्तम आणि खास अशी ही कलाकारी आहे. ही कार्पेटस् घराच्या दिवाणखान्याला किंवा बैठकीच्या खोलीला एकदम खानदानी रूबाब बहाल करतात. अशा रीतीने आजचा दिवसही अतिशय छान गेला. हिमशिखरांचा एक अविस्मरणीय असा सहवास अनुभवता आला. आता वेध होते ते पहेलगामचे.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अमूर्ततेचा शोध ☆ श्री सुनील काळे ☆

श्री सुनील काळे

? मनमंजुषेतून ?

☆ अमूर्ततेचा शोध… ☆ श्री सुनील काळे 

भारतात अनेक जातींची, वेगवेगळ्या धर्मांची, विविध पंथाची, विविध भाषांची , वेगवेगळ्या विचारसरणींची , वेगवेगळा पेहराव करणारांची जशी रेलचेल  आहे तशीच चित्रकलेच्या क्षेत्रातही असंख्य वेगवेगळे प्रकार आहेत . काहीजण वास्तववादी चित्र काढतात , काहीजण व्यक्तीचित्र रेखाटण्यात तर काहीजण निसर्गचित्रात माहीर असतात . काहीजण अमूर्त आकारांच्या चित्रशोधात सतत मग्न व तल्लीन झालेली असतात . या सर्व चित्रकारांची माध्यमेही वेगवेगळी असतात . काही चित्रकार जलरंगात , काही तैलरंग तर काहीजण ॲक्रलिक रंगाचा वापर करतात .  एकाच विषयाच्या , वेगळ्या अमूर्त आकारांच्या चित्रशोधकार्यात कलाकार मंडळी कधी पाहून रंगवत असतात तर काहीजण प्रथम रंगवतात व नंतर पाहत असतात . प्रत्येकाची रंगवण्याची पद्धती वेगवेगळी असते .माझा एक जिज्ञासू चित्रकार मित्र भेटला की मला नेहमी अमूर्त चित्रांविषयी माहिती विचारायचा पण त्याच्या प्रश्नानां उत्तरे देताना मी भांबांऊन जायचो कारण अँब्स्ट्रॅक्ट  चित्र काढणे एक अवघड आणि तितकीच सोपी पण आव्हानात्मक व मानसिक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे असे मला आजही प्रामाणिकपणे वाटते .

1993 साली उमेदीच्या काळात मी मुंबईच्या प्रिन्सेस स्ट्रीटला पारशी डेअरी शेजारी असलेल्या प्रसिद्ध केमोल्ड फ्रेम्समध्ये कामाला होतो . त्याठिकाणी अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रे फ्रेमिंगसाठी येत असत . एके दिवशी खास मजबूत पॅकींग केलेले एक मोठे पार्सल खास स्पेशल गाडीत घेऊन कंपनीचे मालक केकू गांधी स्वतः वर्कशॉपला आले होते . एका मोठ्या चित्रकाराचे चित्र खास स्पेशल महागडी फ्रेम करण्यासाठी आले होते . ते अमूर्त चित्र एक कोटी रुपयांचे असून त्या चित्राला कंपनीद्वारे खास विमा संरक्षण केले होते . त्यामूळे त्या चित्राची फ्रेम काळजीपूर्वक करून घेण्याचे मोठे आव्हान माझ्यापुढे होते .

वर्कशॉपचा इन्चार्च म्हणून मी काम करत असल्याने त्या चित्राची पूर्ण जबाबदारी माझी होती . त्यासाठी मी सर्व तयारी केली . पण मलाही चित्र समजून घेण्याची उत्सुकता मोठी होती . वर्कशॉपला एक मोठे बर्हीवक्र भिंग घेऊन ते अमूर्त चित्र इतके महाग का आहे याचाच शोध घेण्याचे ठरवले . ते चित्र पूर्ण रात्रभर अगदी जवळून भिंगातून मी पहात होतो . कधी दूरून पाहायचो . त्या अदभूत चित्राचे आकार , रंगाचे ॲप्लीकेशन भलतेच वेगळे वाटत होते . कशाचा कशालाच मेळ लागत नव्हता . कधी वाटायचे फाटक्या विविध रंगाच्या लहानमोठ्या  चिंध्या एका लाकडाच्या तुकड्यात अडकल्या आहेत . तर कधी वाटायचे ह्या छोट्या छोट्या आकारांच्या रंगाच्या फटकाऱ्यांमूळे या चित्रात एक वेगळी रंगसंगती तयार झाली आहे . संपूर्ण चित्रात एक निर्जर निवांत शांतता पसरली आहे असे वाटायचे. कधी वाटायचे एक निवांत बेदरकार वाहणारी नदी एका नादभऱ्या तालात मनसोक्तपणे , स्वच्छन्दीपणे वहात आहे . ते चित्र गतिमान वाटायचे तर काही अँगलमधून शांत वाटायचे . अनेकवेळा पाहूनही मला त्यावेळी त्याचा अर्थ नक्की समजला नव्हता . त्या चित्राचे न समजलेले आकार , रंग , चित्राची रचना कित्येक वर्ष कायमची डोक्यात ठाण मांडून बसलेली होती . ते अमूर्त चित्र नक्कीच विसरण्यासारखे नव्हते .

पावसाळा संपल्यामूळे आज सकाळी सगळीकडे स्वच्छ वातावरण होते . मेणवली गावाजवळ कृष्णा नदी वाहते तेथे निवांतपणे फिरायला नदीकिनारी गेलो होतो . सगळीकडे हिरवागार परिसर , थंड हवा व नुकतीच सुर्याची किरणे पडत असल्याने पाण्याचा खळखळाट व त्या पाण्यावरील प्रतिबिंब मोत्याचा सर पडल्यासारखे चमकत होते . अनेकविध पक्षांच्या चिवचिवटामूळे आसंमतात एक वेगळे नादभरे संगीत कानांवर पडत होते .

नदीच्या किनाऱ्यावर चालताना मात्र एकदम वेगळेच अद्भूत चित्र दिसले . नदीच्या प्रवाहातून वहात आलेली घाण ,माणसांनी टाकलेली रंगीबेरंगी फाटलेले कपडे , प्लास्टीकच्या पिशव्या , बारदाने , थर्माकोलच्या वस्तू , बिसलरीच्या बाटल्या , जुन्या बॅगा , वापरलेल्या बूटांच्या व चपलेच्या जोड्या , झाडांच्या मोठमोठ्या बुंध्यावर व लटकत्या फांद्यांवर लोंबकळत होत्या . 

ती लाल ,पिवळी , जांभळी असंख्य अनेकरंगी छोटी छोटी फाटकी लफ्तरे निसर्गाच्या मोठ्या कॅनव्हासवर जणू अमूर्त चित्रांसारखी वाऱ्यावर डोलत होती . त्याच्या एकत्रित असण्याने ,फडकण्यामूळे त्या कॅनव्हासला एक अद्भूत गुढता निर्माण झाली होती . त्या चमकणाऱ्या सुर्यकिरणांच्या साक्षीने तो कॅनव्हास आता एका मोठ्या अमूर्त पेंटींग असल्यासारखाच भासत होता . 

तीस वर्षानंतर त्या अमूर्त चित्राचा विषय आता मनामध्ये हळूहळू पूर्णपणे उलघडत होता . माणसांनी टाकलेल्या अनेक बिनवापराच्या वस्तू , माणसांनी टाकलेला कचरा माणसांसाठीच  किनाऱ्यावर मुक्तपणे सोडून नदी मात्र स्वच्छपणे पाण्याच्या प्रवाहाचा खळखळाट करत नव्या उर्जेने , नव्या उमेदीने , नव्या धेय्याने , नव्या आकांक्षेने वाहत चालली होती 

नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . 

कोणतीही अपेक्षा , कोणतीही गुंतागुंत ,  कोणतीही तक्रार न करता ,मनात कोणतीही आढी न ठेवता स्वच्छ पाण्यासोबत नदी वेगाने वाहत चालली होती 

नव्या अमूर्ततेच्या शोधात . . . . . . 

आपणही कोणती अढी , कोणत्या इच्छा , कोणतेही वादविवाद डोक्यात न ठेवता नदीसारखे स्वच्छ वहात राहत राहीले पाहीजे कशातही गुंतून न राहता.  सगळा जात , पात, धर्म , उच्च , नीच आशा , अपेक्षांचा साचलेला डोक्यातला कचरा , राग , लोभ, मोठेपणाची हाव किनार्‍यावरच सोडून दिली पाहीजे आणि जीवनात मुक्तपणे आशाविरहित निर्विकार प्रवास केला पाहीजे …. नदीप्रमाणे  

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

नव्या अमूर्ततेच्या शोधात…….

© श्री सुनील काळे

संपर्क – 32, निसर्ग बंगला, मेणवली रोड, स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाजवळ, मु .पो. भोगाव, ता. वाई, जि.सातारा – ४१२८०३. 

मेल : [email protected]

मोब. 9423966486, 9518527566

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “देवाचं दुकान” ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

“देवाचं दुकान ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

एके दिवशी मी रस्त्याने जात होतो. वाटेत एक बोर्ड दिसला, ‘ईश्वरीय किराणा दुकान…’

माझी उत्सुकता वाढली. या दुकानाला भेट देऊन त्यात काय विकले जाते ते का पाहू नये?

हा विचार येताच आपोआप दार उघडले. थोडेसे कुतूहल असेल तर दरवाजे आपोआप उघडतात. ते उघडावे लागत नाहीत.

मी दुकानात पाहिले तर सर्वत्र देवदूत उभे होते. एका देवदूताने मला टोपली दिली आणि म्हणाला, “माझ्या मुला, काळजीपूर्वक खरेदी कर, माणसाला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट इथे आहे.”

देवदूत पुढे म्हणाला, “जर तुला टोपली एकाच वेळी भरता येत नसेल, तर पुन्हा ये आणि पुन्हा टोपली भर.”

आता मी सगळं बघितलं. आधी संयम विकत घेतला, मग प्रेम, मग समजूतदारपणा, मग विवेकाचे एक-दोन डबे घेतले.

पुढे जाऊन विश्वासाचे दोन-तीन डबे उचलले. माझी टोपली भरत राहिली.

पुढे गेलो.पावित्र्य दिसले. विचार केला- कसं सोडू? तेवढ्यात शक्तीची पाटी आली.शक्ती पण घेतली..

हिंमतसुद्धा घेतली.वाटले की हिमतीशिवाय आयुष्यात काहीच चालत नाही.

आधी सहिष्णुता घेतली. मग मुक्तीची पेटीही घेतली.

माझे सद्गुरू प्रभुजींना आवडणाऱ्या सर्व वस्तू मी विकत घेतल्या. मग एक नजर प्रार्थनेवर पडली.मी त्याचाही डबा उचलला.

कारण सर्व गुण असूनही माझ्याकडून कधी काही चूक झाली, तर मी देवाला प्रार्थना करेन की देवा,मला माफ कर.

आनंदी होऊन मी टोपली भरली, मग मी काउंटरवर गेलो आणि देवदूताला विचारले, “सर.. या सर्व गोष्टींसाठी मला किती पैसे द्यावे लागतील?”

देवदूत म्हणाला, “माझ्या बाळा, इथली बिल भरण्याची पद्धतही दैवी आहे. आता तू जिथे कुठे जाशील, तिथे या गोष्टींची उधळपट्टी कर, सर्वांना मुक्तपणे वाट. या गोष्टींचे बिल असेच भरले जाते…”

या दुकानात क्वचितच कोणी प्रवेश करतो. जो आत जातो, तो श्रीमंत होतो. तो या गुणांचा भरपूर उपभोग घेतो आणि लुटतो.

प्रभूंच्या या दुकानाचे नाव आहे ‘सत्संगाचे दुकान’….

सद्गुणांचा खजिना भगवंताने दिला आहे. रिकामा झाला तरी सत्संगाला या आणि टोपली भरा.

देवाच्या या दुकानातून मी एकतरी वस्तू आपलीशी करू शकेन असा मला आशीर्वाद द्या.

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ काहूर मनी दाटले… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

या निर्जन निवांत स्थळी, आणि अश्याच रोजच्या कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. तू हवा हवासा  असतोस जवळी..दिनवासर दिनकर निरोपाचे काळवंडलेले अस्तराचे पालाण घालून आसंमाताला जातो अस्ताला डोंगरराजीच्या पलिकडे दूर दूर. ते पाहून  हूरहूर मनातील उमटते  तरंग लहरी  लहरी ने तडागाच्या जलाशयावर. आता क्षणात येशील तू अवचित जवळी अशी मनास माझ्या समजूत घालते  आभासमय आशेवर. निराशेच्या काळ्या मळभाने गिळून टाकतात डोंगर, तलावाचे काठ, नि पाते पाते तरूलताचे, तृणपातीचे माझ्या मनासहीत..चाहूल पदरवांची येईल का , आतुर झालेले कान नि दाटून गेलेल्या  चोहिकडेच्या अंधकाराने भयकंपिताचे आलेले भान. आजची आशा निराशेत नेहमीप्रमाणे  लुप्त झाली, तसे उठून निघाले पाय ओढीत तनाचे मण मण ओझे घराकडे.चुचकारीले कितीतरी परी हटवादी मनास जोजवेना ते आढेवेढे..

.. अशी रोजच संध्याकाळी कातर वेळी, वाट पहात बसते तुझी प्रेमात बुडालेली वेडी खुळी. काहूर मनी दाटले नेत्रातून पाझरले.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print