सौ.ज्योत्स्ना तानवडे

?  विविधा ?

☆ “पर्यटन – सफर नंदनवनाची !! भाग – २” ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आम्ही आज गुलमर्गला भेट देणार होतो. प्रत्यक्ष हिमशिखरावर चढाई. मनात खूप उत्सुकता होती. पहाटे साडेपाच वाजता आमची बस निघाली. त्यामुळे गाडीतून सूर्योदय बघायला मिळाला. अगदी सूर्योदयापासूनची निसर्गाची विविध रूपे बघायला मिळत होती. रस्त्याच्या दुतर्फा उंच उंच देवदार वृक्ष, सूचीपर्णी झाडे, सफेदाची झाडे होती.

तो धावता निसर्ग अक्षरशः नजर खेचून घेत होता. मधूनच हिमशिखरे दिसत होती. शिखर दिसले की एकमेकांना हाका मारून दाखवणे आणि त्याचे वर्णन करणे अखंड सुरू होते. सगळेच जण अतिशय उत्साहीत होते.

गुलमर्गच्या आधी तांगमर्गला सर्वांनी फरकोट, हातमोजे आणि गमबूट घेतले. तिथून छोट्या गाड्यांनी सर्वजण पुढे गुलमर्गला गेलो. वळणावळणाचा  घाटरस्ता आणि त्यातून दिसणारा निसर्ग खुणावत होता. इथून आता खास आकर्षण असणाऱ्या गोंडोला राईडने म्हणजेच केबल कारने पर्वतावर जायचे होते.

सुरुवातीला केबल कारने पहिला टप्पा कांडोरी स्टेशनवर गेलो. आम्ही अंदाजे दहा हजार फूट उंचीवर पोहोचलो होतो. एकदम वातावरणात फरक जाणवत होता. उंचावरची बर्फाच्छादित शिखरे, धुके, खोल दरी यांचे दृश्य खूपच सुंदर होते. ज्यांना हवेचा त्रास जाणवत होता,  पुढे उंचावर जायचे नव्हते असे अनेक जण याच टप्प्यावर हाती काठी घेऊन किंवा घोड्यावरून समोरील उंच टेकडीवर चढत होते. इथला बर्फ जुना असल्याने खूप टणक आणि घसरडा होता. इथे काचेचे इग्लू रेस्टॉरंट आहे.

या स्टेशनवरून आम्ही केबल कारने अफरवत पर्वतावरील दुसऱ्या टप्प्यावर गेलो. तिथे आम्ही १३५०० फूट उंचीवर आलो होतो. केबल कारने वर जाताना खाली खोल खोल दरी,  उतारावरील उंच उंच पाईन वृक्ष आणि वरची एकदम उंच शिखरे यामुळे पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. असे अधांतरी तरंगत जाण्यातला थरार मात्र जबरदस्त होता. आजूबाजूचे दृश्य अतिशय मनमोहक होते. सर्व झाडे, पर्वताचा बराचसा भाग बर्फाच्छादित असल्याने पांढरा दिसत होता.  दुसऱ्या टप्प्यावर आलो आणि शब्दशः बर्फात उतरलो. चारीबाजूने बर्फाच्छादित शिखरावर पोहोचलो होतो. समोरचे दृश्य बघून अक्षरशः नजरबंदीच झाली.

शिव शंभूची पवित्र भूमी

 बर्फाच्छादित शुभ्र कडे

विलोभनीय निसर्गाचे

 भव्य दिव्य दर्शन घडे ||

तिथे एकदम खूपच थंड हवा होती. सर्वांनी सर्व जामानिमा परिधान केलेला असल्याने थंडीचा त्रास होत नव्हता. बर्फ एकदम ताजा होता. अगदी भुरभूरीत. हाताने गोळा करता येत होता. तिथे आल्यावर सर्वच पर्यटकांचे बर्फातले खेळ सुरू झाले. नातवंडांनी गोळे केले, बाहुल्या बनवल्या, चक्क बर्फावर लोळणही घेतली. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशाने डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून सर्वांनी गॉगल्स घातले होते. एकंदरीतच प्रत्येकाचे रूप एकदम इथे वेगळेच झाले होते.

या ठिकाणी फोटो काढायची तर पर्वणीच होती. विविध पोज मध्ये सर्वांचेच फोटो सेशन सुरू होते. बरेच जण बर्फात स्किईंग, स्नो-बोर्डिंग करत होते. इतके दिवस ऐकू येणारी हिमशिखरांची साद इथे वरती आल्यावर शांत झाली होती. आम्ही वरपर्यंत येऊ शकलो याचे समाधान खूप मोठे होते. त्यामुळे एक खूप मोठा आनंददायी अनुभव मिळाला होता

जवळजवळ दोन अडीच तास इथे घालवायला मिळाले. किती  बघू आणि किती नको असं झालं होतं. कितीही पाहिलं तरी मनाचं समाधानच होत नव्हतं. ऐकणं, सांगणं आणि प्रत्यक्ष अनुभवणं यात फार फरक असतो त्याची इथे चांगलीच प्रचिती आली.  निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार प्रत्यक्ष अनुभवण्याच्या समाधानात केबल कारने पुन्हा खाली आलो.

गुलमर्ग हे पीर पंजाब रेंजमध्ये आहे. ते पूर्वी ‘गौरी मार्ग’ म्हणून ओळखले जात असे. केबल कारने म्हणजेच गोंडोलाने अफरवत पर्वतावर आपण जातो. इथून खिल्लनमर्गचे विलोभनीय दर्शन होते. अप्रतिम नजारा दिसतो. काश्मीर ट्रीपचे खास आकर्षण म्हणजे ही गुलमर्गची गोंडोला राईड. ही गोंडोला आशियातील सर्वात उंच तर जगातील दुसरी सर्वोच्च आणि दुसरी सर्वात लांब केबल कार आहे. एका कारने सहा जणांना जाता येते.  इतरांच्या केबल कार वर जाता येता पाहणे, आपण स्वतः जाता येतानाचा अनुभव घेणे, त्या वेळेचे निसर्गदर्शन हा एक खूप वेगळाच पण सर्वांगसुंदर अनुभव आहे. पांढरे झालेले असंख्य उंचच उंच पाईन वृक्ष, बर्फाच्छादित उंच शिखरे आणि खाली खोल दरी यामध्येच ऊन आणि धुक्याचा पाठशिवणीचा खेळ हे अतिशय मनोरम दृश्य असते. केवळ एक अविस्मरणीय असा बेजोड अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो.

परत येताना काश्मिरी कार्पेट फॅक्टरीला भेट दिली. प्रत्येक प्रांताचे एकेक वैशिष्ट्य असते. काश्मिरी गालिचे ही इथली खास निर्मिती. कार्पेट कसे बनवतात याची झलक आणि असंख्य सुंदर असे नमुने बघितले. अगदी लाखाच्या पुढे किंमत असलेला अप्रतिम गालिचा बघीतला. एक अतिशय उत्तम आणि खास अशी ही कलाकारी आहे. ही कार्पेटस् घराच्या दिवाणखान्याला किंवा बैठकीच्या खोलीला एकदम खानदानी रूबाब बहाल करतात. अशा रीतीने आजचा दिवसही अतिशय छान गेला. हिमशिखरांचा एक अविस्मरणीय असा सहवास अनुभवता आला. आता वेध होते ते पहेलगामचे.

क्रमशः…

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments