मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –4 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –4 ☆ श्री सदानंद आंबेकर

२२ जून :: धर्माच्या मार्गावर धर्मपुरी गाव : अंतर २७.७८ कि.मी. 

आज बरड गावात पालखीचा मुक्काम होता पण आमची सोय सुमारे पाच किमी लांब धर्मपुरी या गावात होती। बरड गावापर्यंत तर सहज चालत आलो, आता थकवा वगैरेची जाणीव नव्हती होत. त्या नंतर तिथून किंचित अंतरावर राजुरा गावात पुढे जाण्याकरिता दिंडीतर्फे मिनी ट्रक आला. त्यातून काही लोक गेले नि आपल्या ठिकाणी आलो। आज मी पण या वाहनाने आलो। इथे ग्रामपंचायत भवनात सोय होती आणि मुख्य म्हणजे नळ आणि हैंडपंप दोन्ही असल्यामुळे सगळयांनी मनसोक्त कपडे धुतले, त्यात मी सुध्दा सामील होतो। आज संध्याकाळी येथे हरिपाठ आटोपल्यावर दिंडी संचालिका सौ माईसाहेब आणि दिंडी प्रमुख डॉ भावार्थ यांनी भारूड प्रस्तुत केले। भारूड म्हणजे सहज रीतिने धर्मशिक्षण। त्यात विशेष होती ती संत एकनाथांची रचना — ‘‘विंचू चावला विंचू चावला देवा रे देवा  हे भारूड !! श्री शंतनु गटणे यांच्यासोबत डॉ भावार्थ यांनी प्रस्तुत केलेलं हे भारूड खूप काही सांगून गेलं। खरोखर दिव्य होता तो अनुभव। याशिवाय आमच्यातल्या काही माउलीताईनी पण भारूड प्रस्तुत केले। अनेक लोकांनी आज पावली खेळली – तेही खूप छान प्रकारे। इथे लाइटनी खूप त्रास दिला पण नंतर सर्व ठीक झाले। आज रात्री  तर जेवणात वेगळाच स्वाद होता अन् तो होता आम्रखंडाचा। दिंडीमधे काही बंधुंनी आपल्यातर्फे ही मेजवानी सादर केली होती। पुन्हा उद्याची तयारी करायला हवी म्हणून आम्ही ग्रामपंचायतच्या ओट्यावर खूप थंड हवेत झोपी गेलो. 

येथे मी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करू इच्छितो, मी एकटा असल्यामुळे मला बरेच वेळा जागा शोधावी लागायची. पण आमच्या गटातल्या अनेक माउलींनी बहुदा स्वतः बोलावून ज्या आपुलकीने आपल्या शेजारी जागा दिली त्याची आठवण मला नेहमी राहील।

२३ जून :: गाव नातेपुते : अंतर १२.५६ कि.मी. 

बरड गाव सोडून नातेपुते करिता निघालो। गावातून बाहेर येता येता एक भली मोठी नहर अर्थात् कैनाल दिसली। किंचित वेळ थांबून पुढे निघालो। आज बारा दिवस झाले होते. आता मी आसपासच्या वारकरी लोकांना पाहत चालत होतो। श्रध्देचं प्रमाण इतकं होतं की कोणालाही आपण कपडे काय घातलेत, पायांत जोडे़ चपला आहेत की नाही, बाहेर ऊन आहे की सावली आहे, जेवण मिळते की नाही,  ही काळजी नव्हतीच। खांद्यावर झोळी, डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ, मुखाने हरिनाम आणि मनात विठ्ठल ठेवून चालणे हेच त्यांचं उद्दिष्ट। नातेपुते पण एक गांव आहे अन् आमची शाळा गावात एकदम आत होती। आज पण संध्याकाळी हरिपाठ होत असतांना बरेच वारकरी पावली खेळायला आले अन् खूप आनंद घेतला। फुगडीवर त्याची पूर्णता होते ती पण आम्ही बघितली। आज पण जेवणात खूप स्वाद होता नि आज एका बंधूंची विवाह वर्षगाठ होती, म्हणून त्यांच्यातर्फे आम्हाला मेजवानी होती। आता उद्या पुन्हा लांब चालायचे आहे म्हणून इथे विश्रांति घेऊया।

२४ जून :: माळशिरस : अंतर २१.९८ कि.मी. 

आज पण आम्हाला सदाशिवनगर या ठिकाणी रिंगण बघायला मिळणार होतं। आजचे गोल रिंगण। मोठ्या शेतांत जागा करून त्यात चुन्याच्या रेघांनी मैदान तैयार केले होते। पोलिसांची सक्त व्यवस्था होती पण लोक ऐकत नव्हते। थोडयाच वेळात पालखीचे आगमन झाले अन् मागोमाग दोन अश्व आले। पहिल्यांदा  पूर्ण मैदानाचा एक फेरा लावला नि नंतर रिंगण सुरू झाले। वर ड्रोन सतत रेकॉर्डिंग करत होते। लोकांचा जल्लोष, उत्साह आणि आकाशातून पावसाची भुरभुर चालू होती। रिंगण पूर्ण होताच गर्दी व्हायच्या  आत आम्ही आपला मार्ग धरला। आधी पाऊस होऊन गेल्यामुळे आज गावात खूप चिखल होता. तरी आम्ही शोधत-शोधत आपलं ठिकाण मिळवलं। जागा मिळाल्यावर थोड्या वेळाने खूप जोरात पाऊस सुरू झाला नि शाळेच्या संपूर्ण मैदानात जणू तलाव निर्माण झाला। संध्याकाळी रोजच्याप्रमाणे हरिपाठ व रात्रीचे जेवण आटोपलं।

२५ जून :: आले वेळापुरः अंतर २३.४५ कि.मी. 

जसे-जसे पंढरपूरचे अंतर कमी होत होते तसतसा उत्साह वाढत जात होता। आजही त्या उत्साहात पाणी चिखल असतांनासुध्दा कमी वेळात वेळापुरला आलो. मात्र गावात आमची शाळा शोधायला खूप विचारावे आणि चालावे लागले। शाळा पण एकीकडे होती जिची वाट पूर्णपणे पाणी आणि चिखलानी भरून गेली होती। इथे खडूसफाटा येथे गोल रिंगण होते पण आम्ही ते नाही पाहिले। या गावात एक अर्धनारी नटेश्वर मंदिर दिसले जे प्राचीन वाटत होते. पण दर्शनासाठी खूप रांग लागली होती, त्यामुळे बाहेरून दर्शन करून आपल्या ठिकाणावर पोचलो। येथे मात्र संध्याकाळी खूप पाऊस आला, त्यामुळे रोजचा हरिपाठ, प्रवचन लहानशा जागेत करावे लागले। शाळेच्या समोर एक मंच आणि मोठ्ठे अंगण होते,  पण पाऊसामुळे तिथे झोपणे शक्य झाले नाही।

इथे सकाळी नित्यक्रियेकरिता जागा शोधावी लागली, कारण आसपास सगळी रहाती वस्ती होती, तरी प्रश्न कसाबसा सोडवला। रोजचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण घेऊन निघालो आपल्या शेवटच्या टप्प्या करिता। हा प्रवास पण फार लांबचा असणार होता.             

२६ जून :: यात्रेची शेवटची पायरी – शेळवे गावः अंतर २८.८१ कि.मी. 

सकाळी चालणे सुरू केल्यावर आज पावलं लवकर पडत होती। आज पण एका ठिकाणी गोल रिंगण होते. पण बहुतेक लोक सरळ चालत राहिले। दुपारी १२ वाजता मी भंडीशेगाव गावात आलो जिथून शेळवे गावाचा सहा किमी.चा रस्ता होता। फाटा येताच आमच्या वारीचे काही बंधु दिसले जे शेयर टेंपोत बाकी यात्रेकरूंची वाट बघत होते। आम्ही तीन लोक आल्यावर गाडी फुल झाली व तीस मिनिटांत आम्ही गावात उतरलो। इथे पण दोन दिशेला शाळा व एक बाजूस एक मंदिर आणि समोर काही टिनाचे वर्ग होते।  आधी झाडाखाली विसावा घेतला नि चार वाजता जवळच असलेल्या भीमा नदीत आम्ही सात आठ लोकांनी मनसोक्त आंघोळ केली। आमच्या सोबत एक तरुण वारकरी होते त्यांनी पूर्ण तन्मय होऊन – ‘बाप रखुमादेवी वरू, विठ्ठलाची भेटी, जाईन गे माये तया पंढरपुरा‘—- या ओळी गायल्या, आम्ही पण त्याच स्वरात त्यांची साथ दिली। शाळाभवनांत परत आल्यावर कळले की या दिंडीची एक विशिष्ट परंपरा आहे, दिंडीप्रमुख स्वतः आपल्या हातानी सर्वांना भीमा नदीवर आंघोळ घालतात. त्याप्रमाणे आम्ही पुन्हा नदीवर जाऊन या परंपरेचा आनंद लुटला। नंतर आम्ही सर्वांनी त्यांना पण तसेच स्नान घातले। हीच भीमा पंढरपुरात चंद्रभागा म्हटली जाते असे सांगण्यात आले। पुढील दिवशी पहाटे स्त्रियांकरिता सौ माईसाहेब यांनी स्नानाची सोय केली होती। सूर्यास्त व्हायच्या आधी आज सर्व माऊलीभगिनींनी सौ माईंच्या गाण्यांवर मन भरून नाच केला, फुगड्या घातल्या। खूप ‘आनंदी आनंद गडे होता। आज संध्याकाळचा हरिपाठ विशेष होता। आधी, आज जे एक विशिष्ट पाहुणे आमच्या दिंडीत आले होते, त्यांनी खूप सुरेख स्वरात अभंग ऐकविले अन् त्यानंतर विशेष उल्लेख म्हणजे, डॉ भावार्थ यांनी आपल्या पूर्ण टीमचा परिचय त्यांच्या कामा- -सकट करवून दिला। त्यात, आचारी भगिनी, चालक बंधू, साउंड लाइटवाले, इतर व्यवस्था करणारे हे सर्व होते, ज्यांच्या सहकार्याने ही यात्रा खूपच सोयीची झाली होती। आजचे जेवण पण विशिष्ट होते। आता सर्वांना उद्याची प्रतीक्षा होती जेव्हा श्रीहरिविठ्ठलाचे प्रत्यक्ष दर्शन होणार होते। उद्या कोण केव्हा परत निघून जाणार हे माहिती नसल्याने आजपासूनच एकमेकांचे संपर्क सूत्र फोन नंबर घेण्यास सुरुवात झाली होती।

– क्रमशः भाग चौथा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ चालणे म्हणजे दुसरे हृदय… ☆ प्रस्तुती डॉ. ज्योती गोडबोले 

आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायूंना जर आपले ” दुसरे हृदय ” म्हटले तर ती अतिशयोक्ती नक्कीच होणार नाही.

सर्वांना हृदयाचे कार्य काय असते ते ठाऊक असेलच….. हृदय म्हणजे शरीरातील एक पंप आहे. हा पंप रक्ताला पुढे पुढे ढकलत राहतो आणि त्यामुळे रक्त शरीरात धमण्या आणि नीला याच्यातून गोल गोल फिरत राहते, ते एका ठिकाणी साचून राहत नाही.

पण शरीरात आणखीही एक पंप कार्यरत असतो. होय. खर आहे. आपले पोटरीचे स्नायू हेच आपले दुसरे हृदय आहे… हृदयाचे काम काय तर रक्त वाहिन्यांच्या जाळ्यातून सतत वाहते ठेवणे. यालाच रक्ताभिसरण असे म्हणतात. रक्त असे गोल गोल सतत वाहत ठेवणे अत्यंत जरुरी आहे. तसे न झाल्यास आणि जर रक्त एकाच ठिकाणी साचून राहिले, तर शरीरातील अवयवांना रक्त पुरवठा होणार नाही आणि रक्ताच्या गुठळ्या बनून त्या प्राणघातक ठरू शकतात. हृदयाला शरीरात रक्त फिरते ठेवण्यास पायाच्या पोटरीचे स्नायू मदत करतात. जेव्हा आपण चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात आणि स्नायूतील रक्तवाहिन्यांमध्ये असलेले रक्त हृदयाच्या दिशेने ढकलून दिले जाते. निसर्गाने आपल्या शरीराची रचनाच तशी केलेली आहे.

पायाच्या पोटरीमधील रक्त वाहिन्या ( नीला ) या एका प्रकारे रक्ताचा साठा करण्याचे काम करतात.

त्यांना ” मसल विनस सायनस असे ” म्हणतात. ज्यावेळी पायाचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी पायात साठलेले रक्त नीलांमधून वर, म्हणजे हृदयाच्या दिशेने ढकलले जाते. या पायांच्या रक्त वाहिन्यामध्ये विशेष प्रकारच्या झडपा असतात. या झडपा रक्त वाहण्याची दिशा ठरवितात. या झडपा, रक्ताला पायाकडून हृदयाकडे जाऊ देतात, परंतु हृदयाकडून पायाकडे जाऊ देत नाहीत. आपण उभे असताना गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावामुळे रक्त हे खालच्या दिशेनेच जाण्याचा प्रयत्न करणार हे साहजिकच आहे. या झडपा, गुरुत्वाकर्षणामुळे रक्त पायात साचू देत नाहीत आणि रक्ताला हृदयाच्या दिशेने जाण्यास भाग पाडतात. आपण जेव्हा चालतो किंवा धावतो त्यावेळी पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात व हृदयास रक्ताभिसरण करण्यास मदत करतात.

घोट्याखालचा जो पाय असतो त्यात देखिल काही प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो. आपण ज्यावेळी चालतो, त्यावेळी सर्वप्रथम तळपायातील स्नायू आकुंचन पावल्याने तेथील रक्त वर हृदयाच्या दिशेने ढकलले जाते, नंतर जेव्हा पोटरीचे स्नायू आकुंचन पावतात त्यावेळी सर्व रक्त गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आणखी  पुढे ढकलले जाते आणि हृदयापर्यत पोहोचते. रक्त वाहिण्यातील झडपा रक्ताला खाली येण्यापासून रोकतात. आपण एकाच ठिकाणी खूप वेळ स्तब्ध बसून राहिलो ( विमानात, कारमध्ये, खुर्चीत   बरेच तास ) तर पोटरीचे स्नायू आकुंचन पावू शकत नाहीत. रक्त पायातच साचून राहते आणि रक्ताच्या गुठळ्या (DVT, Deep Vein Thrombosis) होण्याची शक्यता वाढते. म्हणून चालणे व पळणे किती महत्त्वाचे आहे ते कळते. 

एखादा रुग्ण खूप दिवस अंथरुणात खिळून राहिला तर त्याला DVT होऊ शकते. याचा अर्थ त्याच्या पायाच्या रक्त वाहिन्यामध्ये रक्ताच्या गाठी होतात. त्यामुळे पायाच्या पोटऱ्या दुखतात, तसेच सूज देखिल येते. अश्या प्रकारच्या रक्ताच्या गाठी पायातून निसटून फुप्फुसात जाऊन फसू शकतात, ज्याने जीवाला धोका उद्भवू शकतो.

जर पोटरीतील झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तरी देखील पाय दुखू शकतात. झडपा खराब झाल्या की रक्त पायात साचून राहते. पाय जड होणे, थकवा, पाय ठसठसणे, घोट्यात सूज, फुगलेल्या पायाच्या नसा, पायात अचानक चमक येवून दुखणे, खाज येणे, चमडीचा रंग बदलणे, पायात बरी न होणारी जखम होणे, इत्यादी त्रास होऊ शकतो.

थोडक्यात काय –- हे सगळे त्रास टाळायचे असतील तर …. चालत रहा, शक्य असल्यास धावत रहा.

निरोगी आणि सुदृढ रहा.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “एक उत्तुंग व्यक्तीमत्व…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

“लोकमान्य बाळ गंगाधर टिळक “एक उत्तुंग व्यक्तीमत्व”…” ☆ सौ राधिका भांडारकर 

मुंबईच्या हायकोर्टाच्या आवारात एका संगमरवरी पाटीवर हे शब्द कोरलेले आहेत.

IN SPITE OF THE VERDICT OF THE JURY IS STILL MAINTAIN THAT I AM INNOCENT. THERE ARE HIGHER POWERS THAT RULE THE DESTINY OF MEN AND NATION…

“जुरीने मला दोषी ठरवले तर खुशाल ठरवू दे पण मी गुन्हेगार नाही लौकिक गोष्टींचे नियंत्रण करणारी एक शक्ती या न्यायपिठाहून वरिष्ठ आहे.  मला शिक्षा व्हावी आणि मी शिक्षा भोगल्यानेच मी अंगीकारलेल्या कार्याला ऊर्जीतावस्था  यावी अशी कदाचित या शक्तीचीच इच्छा असेल.”

हे स्पष्ट, कणखर, खडे बोल आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या जहालमतवादी, उत्तुंग व्यक्तीचे.

राजेद्रोहाच्या आरोपावरून त्यांना सहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली गेली होती.  या काळात टिळकांना साबरमतीच्या तुरुंगात ठेवलं  गेलं आणि नंतर रंगून मार्गे त्यांना मंडालेच्या तुरुंगात रवाना केलं गेलं .(१९०८)  पण आरोप, शिक्षा, कारावास , टिळकांसारख्या महापुरुषाला यत्किंचीतही विचलित करत नसत. त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर नेत नसत. उलट या सहा वर्षाच्या अत्यंत कष्टमय, तापदायक  आणि प्रतिकूल वातावरणात मंडाले येथील तुरुंगवास भोगत असतानाच गीतारहस्य हा  अनमोल ग्रंथ त्यांनी लिहिला. 

वास्तविक रत्नागिरी येथे जन्मलेले (२३जुलै १८५६) केशव गंगाधर टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांच्यात जन्मतःच काही ठळक गुण होते.  शालेय जीवनात ते एक उज्वल विद्यार्थी होते.  त्यांच्यात एक नैसर्गिक सच्चेपणा आणि सरलता लहानपणापासूनच होती.  लहान वयातच त्यांची स्वतंत्र मते होती.  त्यांची वृत्ती सहिष्णु होती आणि अन्यायाबद्दल  त्यांना अपार चीड होती.

स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील एक युग म्हणजे लोकमान्य टिळक होय.   अनेक वर्ष इंग्रजांचे गुलाम झालेल्या जनतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद, देशप्रेम व स्वातंत्र्याची भावना निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम टिळकांनी केले.

लोकमान्य टिळक म्हणजे प्रखर पत्रकार.

थोर समाज सुधारक.

स्वातंत्र्य सेनानी.

राष्ट्रीय नेता.

संस्कृत भाषेचे पंडित आणि एक विद्वान शिक्षक.

जातीय व्यवस्थेचे योग्य समर्थन करणारे समाज सुधारक.

लोकमान्य टिळकांचे विचार हे जनतेद्वारे स्वीकृत होते म्हणूनच त्यांच्यापुढे लोकमान्य हे संबोधन लावलं गेलं.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रस्थानी ते होते. लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य खूप विस्तृत आहे. राष्ट्रीय कल्याणासाठी,, जनजागृतीसाठी आणि एक राष्ट्रीय मन घडवण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती.

शैक्षणिक जाण वृद्धिंगत व्हावी म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि त्यातूनच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली जिथे टिळक स्वतः विद्यार्थ्यांना गणित व संस्कृत या विषयांचे धडे देत. या कार्यामध्ये आगरकर, चिपळूणकर, रानडे, भांडारकर या थोर राष्ट्रीय विभूती त्यांच्यासोबत होत्या.  न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापनाही याच संस्थेच्या माध्यमातून झाली.  सर्वसामान्य विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षण उपलब्ध व्हावे हा या मागचा प्रमुख हेतू होता.

आर्यभूषण छापखान्याची  सुरुवात करून केसरी आणि मराठा ही दैनिके सुरू करून त्या माध्यमातून परखड लेख लिहून स्वातंत्र्यासाठी टिळकांनी जनजागृती केली. तरुणांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे, सर्व समाज एकत्र यावा या भावनेने त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव यांना सार्वजनिक स्वरूप दिले.  आजही देशभर हे उत्सव जोशाने साजरे केले जातात. मात्र यामागच्या  टिळकांच्या पायाभूत संकल्पनेचे काय झाले हा विषय वेगळा आणि विचार करण्यासारखा आहे. होमरूल लीगची स्थापना टिळकांनी केली. ही एक राष्ट्रीय राजकीय संघटना होती.

स्वातंत्र्यलढ्यात जाणीवपूर्वक आणि आंतरिक तळमळीने उतरणारी अनेक माणसे होती. त्यांचे ध्येय आणि उद्दिष्ट एक असले तरी दिशा निराळ्या होत्या, वाटा निराळ्या होत्या, विचार प्रवाह भिन्न होते.  टिळकांची विचारधारा ही प्रखर होती. थेट होती. ” सरकारचे डोके फिरले आहे का” असे निर्भीड वक्तव्य ते करत.  त्यामुळे एकत्र काम करणाऱ्या धुरीणांमध्ये फूट पडली.  दोन वैचारिक गट त्यातून निर्माण झाले.  जहाल मतवादी आणि मवाळ मतवादी.  टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व स्वीकारले. त्यामुळे टिळकांची आणि इतर जहाल मतवादी विचारसरणीच्या लोकांची काँग्रेस मधून हकालपट्टी झाली. या सगळ्या घटना १९०७/१९०८ या दरम्यान घडल्या.

स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य असा चतुसूत्रीचा कार्यक्रम त्यांनी राबवला.  त्यातूनच परदेशी कापडाची होळी ही ऐतिहासिक घटना घडली.  स्वदेशी वस्तूंचीच खरेदी करण्यासाठी टिळकांनी जनजागृती केली.

टिळकांचा खरा भरवसा होता तो देशातील युवाशक्तीवर. त्यांना संघटित करण्यासाठी टिळकांनी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम राबवले.  त्यांची  “जाज्वल्य राष्ट्रप्रेम, राष्ट्रासाठी काहीही, देश पहिला” ही मानसिकता त्यांनी त्यांच्या दमदार लेखनातून आणि भाषणातून तयार केली.  ते तरुणांना सांगत, “धर्माची सत्यप्रियता, भीमाचे बाहुबळ आणि अर्जुनाची तत्परता आणि शौर्य अंगी बाळगण्याचा प्रयत्न करा”

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे टिळकांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले. आणि टिळकांच्या या घोषणेमुळे स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन अधिक तीव्र झाले.

टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्री ही इतिहासात प्रसिद्ध.  मात्र वैचारिक मतभेदांमुळे या मैत्रीत फाटाफूट झाली.  आगरकरांचे म्हणणे होते स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणेला प्राधान्य द्यावे तर टिळकांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे अग्रक्रमावर होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाज सुधारणेला गती मिळेल असे टिळकांचे ठाम, परखड मत. बालविवाहाच्या प्रश्नांवरून आणि संयत वयाच्या धोरणावरून ही मतभेदांची दरी रुंदावत गेली. वास्तविक दोघेही आपापल्या तत्वाशी तडजोड न करणारे. ध्येय एक असले तरी मार्ग भिन्न झाले पण या मतभेदातही परस्पर मैत्रीच इतिहासाने पाहिली.  मतभेद झाले पण मने तुटली नाहीत .

कोण बरोबर कोण चूक हे अजूनही काळाला ठरवता मात्र आलेले नाही.

भारतीय असंतोषाचे जनक म्हणजे लोकमान्य टिळक. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ते स्फूर्तीदाते होते.  सावरकरांच्या क्रांतिकारक जीवनाच्या स्फूर्तीचे गुरु पद त्यांनी टिळकांनाच बहाल केलं होतं.  सावरकरांच्यातलं स्फुल्लिंग टिळकांनीही  टिपलं होतं.

टिळकांच्या नेतृत्वाचा दबदबा त्यावेळी वाढलेला होता आणि त्यातूनच सावरकरांसारखी तरुण क्रांतिकारी माणसं स्वातंत्र्यलढ्याच्या भविष्यासाठी तयार होत होती.  टिळकांच्या उत्तुंग आणि दिव्य व्यक्तिमत्त्वामुळे ब्रिटिशही हादरले होते.”वंदे मातरम्”ची गर्जना ब्रिटीशांची झोप उडवून देत होती.

लखनऊ करारानंतर चिरोलवर खटला भरण्यासाठी टिळक विलायतेला गेले होते निकाल विरुद्ध लागला आणि टिळक भारतात परतले.  त्यावेळी टिळक लोकमान्यतेच्या शिखरावर होते.  मात्र विलायतेच्या प्रवासाने त्यांना शारीरिक आणि मानसिक शीण आला होता. त्याही वेळी त्यांच्यातली जहाल वृत्ती टिकूनच होती.  सरकारला सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हा शब्द चाणाक्षपणे वापरला.  यावरून टिळक आणि गांधींमध्ये वादही झाले पण तरीही हिंदू मुस्लिम एकत्र येतील, ब्राह्मणेतर चळवळीला स्वराज्याची दिशा मिळेल अशी टिळकांनी तयारी करून ठेवली.

हळूहळू प्रकृती ढासळू लागली होती.  तरीही आल्या गेल्यांशी ते हास्यविनोद करत होते.  कौटुंबिक जीवनात ते अडकले नाहीत.  शेवटपर्यंत ते फक्त देशाच्या राजकारणाबद्दलच बोलत होते.

एक ऑगस्ट १९२०चा दिवस!  मुंबईच्या सरदार गृहापुढे लोक रस्त्यावर उभे होते.  मध्यरात्र उलटली होती. लोकमान्य यांचे देहावसन झाल्याची बातमी आली आणि प्रचंड जनसमुदायांच्या तोंडून शोकाचे आणि दुःखाचे विदारक उद्गार बाहेर पडले.  लोक अक्षरशः धाय मोकलून रडले.

महानिर्वाण यात्रेत स्त्रिया, पुरुष ,म्हातारे,  हजारो गिरणी कामगार,  हिंदू,  मुसलमान,  ख्रिस्ती,  पारशी,  जैन सारेच होते.  आकाशाची शिवण उसवावी आणि आभाळ फाटावे असा पाऊस होता आणि त्या मेघगर्जनेपेक्षाही “टिळक महाराज की जय” ही लोकगर्जना अवघ्या महाराष्ट्राला हलवून सोडत होती.

आज हे सगळं लिहीत असताना, मागे वळून पाहताना मनात येतं, या थोर उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आपला देश आज कुठे चालला आहे? राष्ट्रासाठी यांचे संसार पणाला लागले.  प्रत्येक वेळी तुरुंगात जाताना पत्नीकडून हातावर ठेवलेले दही घेताना टिळक पत्नीला म्हणत “तुमच्या खांद्यावर संसार ठेवून आम्ही हा राष्ट्राचा संसार सांभाळू शकतोत”. धन्य त्या स्त्रिया! कळत नकळत स्वातंत्र्याच्या लढाईत त्यांनीही अशा रितीने विडा उचलला होता.त्यांचे संसार सर्वसामान्यांसारखे नव्हतेच,

आज मनात येतं “कहाँ गये वो लोग”? त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान, त्यांचे कार्य  देशवासीयांच्या मनात सदैव उजळत राहो हीच त्यांच्या स्मृतीला  खरी श्रद्धांजली!

(लोकमान्य टिळकांवर लिहायला पाहिजे असेच ठरवले आणि ते एका कर्तव्य भावनेने, कृतज्ञतेच्या,ऋणी भावनेने. वास्तविक अशा लोकमान्य व्यक्तीवर लिहिणे किती अवघड आहे हे लिहिताना जाणवत राहिले पण तरीही…. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती)

धन्यवाद!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “दुखणं… वैयक्तिक, कौटुंबिक, आणि राजकीय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “दुखणं… वैयक्तिक, कौटुंबिक, आणि राजकीय…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

दुखणं या बद्दल काय सांगायचं. समज आली की दुखणं जाणवतं. किंवा दुखणं जाणवायला लागलं की समज येते.

अनेक प्रकारची दुखणी आहेत. पण सण म्हटलं की गणपती, नवरात्र, दिवाळी हेच पहिल्यांदा डोळ्यासमोर येतात, तसंच दुखणं म्हटलं की पहिल्यांदा आठवते ती डोकेदुखी किंवा पोटदुखी.

दुखण्यांची मेरिट लिस्ट केली तर डोकेदुखी आणि पोटदुखी कायम लिस्ट मध्ये वरच्या नंबरवर येतील.

हि दोन्ही दुखणी शारीरिक असतात तशीच ती मानसिक सुद्धा असतात.

नवरा बायको या नात्यात हे कधीकधी जुळ्याच दुखणं असतं. म्हणजे बायकोने काही (मनाला न पटणारं) केलं तर ती नवऱ्याची डोकेदुखी असते. तर नवऱ्याने काही (मनाविरुद्ध) केलं तर ती बायकोची पोटदुखी. कोणाही एकाला एक दुखण आल, तर दुसऱ्याला दुसर आपोआप येत.

अर्थात मनाविरुद्ध काही झाल्यावर होणारी डोकेदुखी आणि पोटदुखी नवरा बायको सोडून बाहेर, आजुबाजुला, समाजात, राजकारणात सुध्दा असते. पण नवरा बायकोची जवळची आणि आपली असते.

सहज म्हणून फिरायला गेल्यावर सुध्दा रस्त्यावरच्या दुकानात मिळणाऱ्या भांड्याच्या घासणी पासून कपाळावरच्या टिकली पर्यंत बायकोचा खरेदीचा उत्साह हि नवऱ्याची डोकेदुखी असते. तर वीकएंडला मित्रांसोबत घालवलेला वेळ बायकोची पोटदुखी.

माॅलमध्ये गेल्यावर दोनच वस्तू घ्यायच्या असल्या तरी पाहिल्या जातात दहा ते बारा. अशा दुकानातल्या वस्तू पाहिल्यावर बायको उत्साहाने विचारते सुध्दा ……. घ्यायच्या का?… त्यावर नवरा तेच शब्द पण वेगळ्या पद्धतीने बायकोलाच विचारतो….. घ्यायच्या?….. का?…. शब्द तेच असतात पण अर्थ……

बायकोच्या अशा विचारण्यात उत्साहाच्या फुग्यात आनंदाची हवा असते. तर नवऱ्याच्या विचारण्याने तिचा फुगा फुटतो….. आणि असा संवाद मग मानसिक डोकेदुखी आणि पोटदुखी यांना आमंत्रण देतो. आणि अशा आमंत्रणाची वाट बघत हि दुखणी डोक्याजवळ, आणि पोटाजवळच घुटमळत असतात.

अशावेळी बाम कामाला येत नाही. आणि हिंग लावायलाही कोणी विचारत नाही…… अशा दुखण्यानंतर वाचला, सांगितला जातो तो फक्त एकमेकांचा इतिहास….

हि दुखणी वैयक्तिक, सामुदायिक आणि राजकीय सुद्धा असतात. या तिन्ही ठिकाणी वेळ, वय यांच बंधन न पाळता मुक्त संचार करण्याचा मक्ता यांच्याकडे आहे.

नको असलेल्या माणसांची  जवळीक डोकेदुखी असते. तर आपल्या माणसांनी दुसऱ्यांशी साधलेली जवळीक पोटदुखी असते.

राजकारणात मला मिळत नाही, किंवा मिळणार नाही. या भीतीनेच या दुखण्यांचा उगम, प्रसार, आणि वाढ होते.

राजकारणात वातावरण बदललं की अशी दुखणी येतात. तर घरामध्ये अशा दुखण्यांची जाणीव झाली की वातावरण बदलायचे संकेत मिळतात.  हि दुखणी सहसा संपत नाही. ती एकाकडून दुसऱ्याकडे जातात.

अशा कौटुंबिक पण शारीरिक दुखण्यावर बाम किंवा चुर्ण काम करतं. तर मानसिक दुखण्यावर बाहेर खाणे, पिणे, फिरणे, आणि मजा करणे हेच औषध आहे.       

राजकारणात मात्र यावर फोडा आणि जोडा याच औषधाचा वापर होतो. आणि या औषधासाठी साम, दाम, दंड, भेद याचा आधार घेतला जातो.

राजकारणातील हि दुखणी काही वेळा बोलून दाखवली जातात. पण घरातल्या या दुखण्यावर न बोलण्याचा निश्चय होतो….. पण दोन्ही ठिकाणी चेहऱ्यावर दिसतातच.

हि दुखणी घरातली असतील तर, आता वयोमानाचा विचार करा आणि तसा योग्य निर्णय घ्या…. असा सल्ला मिळतो…. तेव्हा जबाबदारी घ्या….. असा सुर असतो.

पण हिचं दुखणी राजकीय असतील तर सल्ला तोच असतो. पण नेतृत्व आता तरुणांना द्या….. आणि जबाबदारी सोडा…. असा सुर असतो.

म्हणजे दुखणं सारखच पण एका ठिकाणी जबाबदारी घ्या. असा सुर. तर दुसरीकडे जबाबदारी द्या. असं सांगायचा प्रयत्न.

बऱ्याचदा घरातल्या या दुखण्यावर औषध घेतल जातं, तर इतर बाबतीत ते दिल जात.

मंगेश पाडगावकर यांची एक कविता आहे……

प्रेम म्हणजे प्रेम असत……

तुमचं आणि आमचं सेम असतं……

तसच दुखण्याच सुद्धा आहे………

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “माझी मैना…” ☆ सौ राधिका भांडारकर 

आज १ ऑगस्ट …. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन. ( १ ऑगस्ट १९२० ). 

दोन शब्दातच समोरच्या व्यक्तीला जिंकून घेण्याचं सामर्थ्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शब्दात आहे. या राष्ट्रीय पुरुषाने विपुल लेखन केले.

” माझी मैना गावावर राहिली..” हा मला तर त्यांच्या पूर्ण साहित्याचा परमोच्च बिंदूच वाटतो. 

माझी मैना गावाकडे राहिली

माझ्या जीवाची होतीया काहीली

ओतीव बांधा। रंग गव्हाळा।

कोर चंद्राची ।उदात्त गुणांची।

मोठ्या मनाची। सीता ती माझी रामाची ।

हसून बोलायची। मंद चालायची।

सुगंध केतकी। सतेज कांती ।

घडीव पुतळी। सोन्याची।

नव्या नवतीची। काडी दवण्याची।

रेखीव भुवया ।कमान जणू इंद्रधनुची।

हिरकणी हिऱ्याची। काठी आंधळ्याची ।

तशी ती माझी। गरीबाची मैना ।

रत्नाची खाण ।माझा जीव की प्राण।

नसे सुखाला वाण। तिच्या गुणांची छक्कड मी गायली। माझ्या जीवाची होतीया काहिली…।।

ही रचना वाचल्यानंतर सर्वप्रथम मनात येते ती दोन जीवांची झालेली ताटातूट. ती गरिबीमुळे झालेली आहे ..असावी.  राघू— मैने ची जोडी वेगळी होत आहे आणि त्या विरही भावनेत तिच्या प्रेमाचं, देहाचं,तिचं त्याच्या जीवनात असण्याचं नितांत सुंदर आणि ठसकेबाज वर्णन या रचनेत केलेलं आहे.  थोडक्यात हे एक सुंदर प्रेम गीत आहे.

पण ही मैना अधिक व्यापक स्वरूपात समजून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि मला या रचनेमागचे वेगळे संदर्भ लक्षात आले.  

माझी मैना ही एक छक्कड आहे.  छक्कड हा लावणीचा एक प्रकार आहे.  माझी मैना ही एक राजकीय छक्कड आहे. आणि त्या पाठीमागे अण्णाभाऊंच्या जीवनाची पार्श्वभूमी आहे.

अण्णा भाऊंना गरिबीमुळे त्यांचं मूळ गाव वाटेगाव सोडावं लागलं.  काम धंद्यासाठी त्यांना मुंबई नगरीत यावं लागलं. तिथे त्यांनी मिळेल ते काम केलं.  हेल्पर, बुटपॉलिशवाला, सिनेमागृहात द्वारपाल अशी विविध कामे केली.  ही कामे करता करता कोहिनूर मिलमध्ये ते कामगार म्हणून स्थित झाले.  या ठिकाणी त्यांचा संबंध कामगार चळवळीशी आला आणि त्याच वातावरणात त्यांची लेखन कला बहरली.  ते लेखक, शाहीर बनले.  त्यानंतर याच माध्यमातून त्यांचा संयुक्त महाराष्ट्र लढ्याशी संबंध आला.

चळवळीत कम्युनिस्ट पक्षाचे कार्ड होल्डर म्हणून ते काम करायचे पण ते खरे कलाकार होते.  नाटक, वग, पोवाडे आणि लावण्या लिहून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मशाल पेटती ठेवली.  त्याचवेळी माझी मैना ही छक्कड अतिशय गाजली ती एक रूपकात्मक रचना म्हणून.

ही मैना कोण याचे उत्तर या चळवळीत सापडलं.  संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली.( एक मे १९६०) पण बेळगाव आणि कारवार हा भाग महाराष्ट्राच्या सीमेत आला नाही मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात शेकडो लोकांनी रक्त सांडले तरी देखील संयुक्त महाराष्ट्र हवा तसा झाला नाही याचं दुःख त्यांच्या मनाला झालं आणि त्यातूनच माझी मैना या छक्कडचा जन्म झाला.  माझी मैना गावावर राहिली हे बेळगाव आणि कारवार या भागासाठी रूपक आहे आणि ही नितांत सुंदर मैना म्हणजेच निसर्गरम्य बेळगाव आणि कारवार.

आजही ही मैना प्रासंगिक आहे. साठ पासष्ट वर्षापूर्वी लिहिलेली ,गायलेली ही छक्कड आजही  तितकीच ताजी तवानी आहे कारण अजूनही सीमा प्रश्न सुटलेला नाही म्हणून “माझी मैना गावावर राहिली” हा सल आहेच.

(कै. विठ्ठल उमप यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून आणि अभिनयातून “माझी मैना” प्रचंड लोकप्रिय केली)

तर असा हा अलौकिक लोकशाहीर ! अण्णाभाऊ साठे…..  त्यांनी विपुल लेखन केले. कथा, कविता, गीत, लावण्या, कादंबऱ्या व नाट्य वृत्तांत, प्रवास वर्णने असे सर्व साहित्यप्रकार हाताळले. पण त्यांच्या जीवनातलं श्रेष्ठ साहित्य कार्य म्हणजे त्यांनी लोकसंस्कृतीला रंगभूमीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. ती गौरवली. जनमानसात रुजवली.

अण्णाभाऊ यांच्या जन्मदिनी या असाधारण लोकशाहीरास  भावपूर्ण श्रद्धांजली.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –3 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –3 ☆ श्री सदानंद आंबेकर

१७ जून :: नदी तटावर – नीरा गाव : अंतर ७.४४ कि. मी. 

रोजच्यापेक्षा आज आम्हांला थोडी सवलत मिळाली कारण आजचे आमचे अंतर फार कमी होते। येथे वाल्हे नावाच्या गावांत माऊलींची पालखी विश्राम घेते. पण आमचा मुक्काम नीरा गावात एका  खूप मोठया शाळेत होता। फार मोठे भवन आणि अतिशय मोठं पटांगण। आत्तापर्यत आपापसांत ओळखी झाल्या होत्या त्याचा फायदा आम्हाला आज झाला। आमच्या दिंडीतील एका वारकरीताईचे माहेरघर त्या गावात होते, दिंडीची परवानगी घेऊन आम्ही काही जण तिथे राहिलो. आज विशेष थकवा नव्हता। संध्याकाळी प्रथेनुसार हरिपाठ व जेवण झाले। आज तर मोठयाश्या अंगणात झोपायची छान सोय होती। दुसरे दिवशी गावातल्या नीरा नदीत माउलींचे स्नान होते. त्यामुळे पालखीचे दर्शन, त्यांच्या अश्वांचे दर्शन आणि स्नानाचा सोहळा पहायला मिळाला।

१८ जून :: पुढील टप्पा लोणंद : अंतर ६.३१ कि.मी. 

आजपण लोणंदपर्यंतचे अंतर अगदी कमी होते। आता चालण्याची इतकी सवय झाली होती की दहा बारा किलोमीटर अगदी सोपं वाटायचं। तिथे रेल्वे स्थानकाजवळ कांदेबाजारामधे सर्व दिंडयांचे मुकाम होते। येथे आज विशेष जेवण होते। स्वादिष्ट पुरण पोळी आणि सोबत आमटी। मन भरून जेवण झाले. मग मुंबईचे प्रसिध्द अभंग गायक श्री शंतनु हिर्लेकर यांचे, तबला संगतकार श्री प्रशांत पाध्ये यांच्या साथीने गायन झाले, यांनी शेवटी ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ‘ आणि महालक्ष्मीची कानडी स्तुती –  भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ही अत्यंत सुरेख गायली, त्या नंतर हरिपाठ व प्रवचन सेवा। येथे आम्हाला माउलींच्या रथाचे चोपदार यांचे पण दर्शन झाले। त्यांच्या श्रीमुखातून वारीबद्दल ज्ञान मिळाले। येथे एक विशेष सोय पहायला मिळाली– पाणी बॉटलवाले लोक भरलेले खोके घेऊन आमच्या जवळ पाणी विकायला येत होते। गर्मी खूप असल्यामुळे त्यांची विक्री पण भरपूर झाली। १९ जूनला येथे विश्राम होता।

२०जून :: आता  तरडगांव  : अंतर २०.45  कि.मी. 

इथपासून चालायचे अंतर पुन्हा वाढले होते. पण आता कसे झाले होते की १५-२० किमी ऐकलं की असं वाटायचं ‘ बस….. इतकंच अंतर ? ‘ आज मागच्या गावातून चालून आल्यावर मधेच एक नवीन अनुभव येणार होता। आज चांदोबाचा लिंब नावाच्या ठिकाणी रिंगण होणार होतं। मी पण वेळापत्रकात हे वाचले होते पण अर्थ काही समजला नव्हता. ते आज प्रत्यक्ष पहायचा मौका आला होता। त्या ठिकाणी आम्ही सकाळी साडेदहा वाजताच पोहोचलो. पण जिथे हे रिंगण होणार होतं तिथे खूप गर्दी होऊन गेली होती। आम्ही पण वाट पहात बसलो। अखेरीस, साडेतीन वाजण्याच्या सुमारास एकदम गर्दी वाढली अन् त्यानंतर हा सोहळा सुरू झाला। यात दोन अश्व सरळ मार्गावर धावतात. त्यात एकावर स्वार असतो नि दुसरा अश्व एकटाच असतो. असे मानतात की त्यावर स्वतः माऊली असतात। दोघे अश्व खूप जोरात धावतात, दोन चकरा मारतात अन् माउलींचा अश्व पुढे निघून जातो। हा सोहळा पाहिल्यावर पालखी  पुढे निघाली नि आम्हीपण पुढील मार्गावर चालू लागलो। तरडगांव हे लहान खेडयासारखं गाव, तिथे थांबायची शाळा मेनरोड वर होती। शाळेची वास्तु अगदी जुनाट होती अन त्याचं बांधकाम चालू होतं। या वेळी इथे पुरुषांकरिता राहुटी म्हणजे टेंटमधे राहायची सोय होती. पण नंतर जागा कमी पडल्याने समोर एका डॉक्टरकडे त्याच्या गैरेजमधे सोय झाली। आज रात्री जेवणांत एकदम नवीन पदार्थ होता तो म्हणजे पाव भाजी।

उद्या खूप चालायचं होतं म्हणून गैरेजसमोर अंगणात सगळयांनी आपले बिछाने लावले व झोपी गेलो। हेच ते पहिलं ठिकाण जिथे पुढल्या दिवशी जीवनांत पहिल्यांदा प्लास्टिकच्या मोबाइल शौचालयांत जावं लागलं। पण हे पूर्वीच्या तांब्या नाहीतर बाटली घेऊन शेतांत किंवा रस्त्याच्या काठी अंधारात जाण्यापेक्षा सोईचं होतं। असो, हा ही एक नवा अनुभव। बस भीती ही वाटायची की 

कुठं स्वच्छ भारतवाले कार्यकर्ते आम्हाला पकडू नयेत. 

२१ जून :: ऐतिहासिक स्थळ फलटण : अंतर २५ .६४ कि.मी. 

आज सकाळी का कुणास ठाऊक, पण सगळे दिंडी-यात्री अंधार असतांनाच म्हणजे सूर्योदय होण्याआधीच मार्गी लागले। आम्ही पण चालताचालता सूर्योदय पाहिला। फलटणपर्यंत उन्हाचे चटके तर सहन केले, पण आजची विश्रांतीची जागा म्हणजे मुथोजी महाविद्यालय शोधता शोधता फार थकवा आला। प्रत्येक माणूस त्याला विचारलं की वेगळाच रस्ता सांगायचा। त्यातच पालखी येत असल्या- -मुळे रस्ताभर खूप गर्दी होती। कसेतरी आपल्या स्थळावर पोहोचलो। हेही खूप मोठे संस्थान होते। फलटण शहरसुद्धा मोठं ठिकाण आहे। तिथे शिवरायांचे सासरघर आहे। एक मोठ्ठा महाल, अनेक प्राचीन देवळं आदि असल्याचे कळले, पण वेळ कुठे होता। इथे एक दोन इतर दिंड्या अन् एन सी सी चे कैडेट्स थांबले असल्यामुळे कॉलेजच्या पटांगणातसुध्दा भरपूर लोक झोपले होते। सकाळी पुन्हा पी वी सी चे पोर्टेबल शौचालय–ते पण चांगले लांब लावले होते,अन् नंतर टैंकरखाली पाण्याच्या बॉटलने आंघोळ, कारण  आपली बादली अजून कुठे तरी असायची ! नंतर स्वल्पाहार घेऊन पुढची यात्रा सुरू केली। आज पण खूप लांब चालायचे होते, अन् आता अर्धी यात्रा झाल्यामुळे लोकांनी उरलेल्या वेळेचा हिशेब करायला सुरवात केली होती।

– क्रमशः भाग तिसरा… 

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

वय असतं का पावसाला? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

असतं की…….

मऊ दुपट्यात आईच्या खांद्यावरून बघताना पाऊस एक वर्षाचा असतो.

वाजणारे बूट मुद्दाम डबक्यात आपटत चालताना पाऊस चार वर्षाचा असतो..

शाळेतून येताना छत्री मुद्दाम वाऱ्याच्या दिशेने धरून उलटी करताना पाऊस बारा वर्षाचा असतो..

ट्रेकिंग करताना चिंब भिजल्यावर टपरीवर चहा पिताना पाऊस टीन एज ओलांडत असतो..

तिला पाऊस आवडतो, रिमझिम गिरे सावन वगैरे गाणी ऐकताना अपरिहार्यपणे पाऊस गद्धे पंचविशीत असतो.

भिजायला नको वाटायला लागलं की पन्नाशी येते पावसाची..

गुडघे दुखू लागले की साठीशांत होते पावसाची..

नंतर नंतर पाऊस  मफलर कानटोपी गुंडाळून काठीच घेतो हातात आणि नातवंडांना ओरडतो….

….  “ अरे भिजू नका रे पावसात…… “ 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ संसाराच्या रंगपटावर… कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे 

ही दुनिया एक प्रचंड मोठा रंगपट आहे. त्यावर प्रत्येक जण आपल्या वाट्याला आलेली भूमिका यथाशक्ती वठवत असतो.  कोणी अगदी नटश्रेष्ठ ठरतो तर कुणाची नुसती दखल सुद्धा घेतली जात नाही. या सर्व खेळाचा सूत्रधार चराचर व्यापून उरलेला तो विश्वेश असतो. हा एक खूप मोठा चिंतनशील, विचारप्रवर्तक अभ्यासाचा विषय आहे. याच विषयावरील डॉक्टर निशिकांत श्रोत्री सरांची ‘संसाराच्या रंगपटावर’ ही अतिशय सुंदर कविता आहे. ती आपल्याला या खेळाचा जणू ट्रेलरच दाखवते.

☆ संसाराच्या रंगपटावर ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

 

मंचावर येतांना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेवुनी येई नाना वेश ||१||

 

जगण्याला भूमिका घेवूनी

          सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

 

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधत राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||३||

 

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश  ||४||

©️ डॉ.  निशिकान्त श्रोत्री

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

☆ रसग्रहण ☆ संसाराच्या रंगपटावर… कवी — डॉ.  निशिकान्त श्रोत्री ☆

ब्रह्मांडी लपला विश्वेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||ध्रु||

हे तीन ओळींचे वेगळे असे या गीताचे वैशिष्ट्यपूर्ण ध्रुवपद आहे. या अखिल ब्रम्हांडात तो विश्वेश लपलेला असतो. सर्वत्र भरून राहिलेला असतो. वेळोवेळी तो वेगवेगळी रुपे घेऊन साकार होतो. प्रत्येकातच हृदयस्थ आत्माराम म्हणजे तोच ईश्वरी अंश असतो. तोच वेगवेगळ्या जीवांच्या रूपाने प्रकट होतो.

मंचावर येताना पसरे

हृदयांतरी सकलांच्या मोद

हंसवुनी रडवूनीया जगता

अंतर्यामी नाही खंत

कनात खाली उतरता परी

देउनी जाई सर्वा क्लेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||१||

या पहिल्या कडव्यात कवीने जन्म आणि मृत्यू या घटनांचे सुयोग्य शब्दात वर्णन केले आहे. बाळ जन्माला आले की सर्वांना अतिशय आनंद होतो. नव्या जीवाचे जल्लोषात स्वागत होते. तोही आपल्या बाललीलांनी,  पुढे आपल्या गुणांनी सर्वांना कधी आनंद देतो तर कधी रडवतो. हे करीत असताना स्वतः त्यात न गुरफटका तो मात्र वाट्याला आलेली भूमिका जगून घेतो. शेवटी डाव संपला की खेळाची कनात उतरवली जाते म्हणजे त्याचा मृत्यू होतो. त्यावेळी मात्र त्याच्या जाण्याने सर्वांना खूप दुःख होते. याच पद्धतीने तो विश्वेश वेगवेगळ्या जीवांमधून वेगवेगळी भूमिका साकारत असतो. इथे कनात उतरवण्याच्या रूपकातून मृत्यूची संकल्पना अधिक स्पष्ट केली आहे. एखाद्या डाव किंवा खेळ संपला की उभारलेली कनात उतरवतात. त्याचप्रमाणे जन्माला आलेला जीव मृत्यू पावतो. ही कनात उभारण्याची आणि कनात उतरवण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू असते.

जगण्याला भूमिका घेवूनी

सवे आणतो काही कर्म

कधी भरजरी अंगी शेला

कधी नागवा सांगे वर्म

वसुंधरा ना भास्करमाला

कुठे उराशी धरिशी देश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||२||

जन्माला आलेला जीव आपली भूमिका कशी निभावतो हे कवीने या दुसऱ्या कडव्यात विशद केलेले आहे. कधी कधी जगण्यासाठी काही विहित कर्म बरोबर घेऊन त्याला योग्य अशी भूमिका घेऊनच हा जीव जन्माला येतो. कधी राजा म्हणून, तर कधी उच्चपदस्थ कार्यनिपुण अधिकारी म्हणून, कधी कलानिपुण कलाकार म्हणून, तर कधी समाजाचे भूषण अशी सन्माननीय व्यक्ती म्हणून जन्माला येतो. कर्तृत्वाचा, सन्मानाचा शेला पांघरून येतो. तर कधी तपस्वी, संन्याशी, विरक्त योगी बनून सर्वांना जीवनाचे वर्म, जगण्याचे प्रयोजन, सार्थकता याविषयी प्रबोधन करतो. असा हा विश्वेश अखंड ब्रम्हांडाला व्यापून राहिलेला असतो. सगळी पृथ्वी किंवा अख्खी सूर्यमालाही जिथे त्याला सामावून घेऊ शकत नाही तिथे देशाच्या सीमांचा तर प्रश्नच येत नाही. त्यात तो मावणारच नाही.

समाजात आदर्श म्हणून आदर सन्मान मिळून सन्मानाचे उच्च पद मिळणे आणि त्याद्वारे मिळणारे ऐश्वर्य, सौख्य उपभोगणे यालाच भरजरी शेल्याचे रूपक योजिले आहे. तर उग्र तपश्चर्या करून वैराग्य प्राप्त केलेले विरक्तयोगी तपस्वी यांच्यासाठी नागव्याचे रूपक योजिले आहे. म्हणजे ते जगरुढीत न गुरफटता आपली वाट आपल्या मनाप्रमाणे चोखाळतात.

पडदा पडला खेळ संपला

देह सोडूनी उडून गेला

कर्म परंतु शेष राहिले

शोधात राही नवकायेला

देहा मागुनिया देहाच्या

शोधासाठी नव आवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||३||

या तिसऱ्या कडव्यात अविनाशी आत्म्याचा प्रवास कवीने स्पष्ट केलेला आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय

नवानि गृह्णाति  नरोऽपराणी

तथा शरीराणि विहाय  जीर्णा-

न्यन्यानि संयाति नवानि देही ||

गीतेतील या श्लोकाचा अर्थ कवीने इथे अधिक स्पष्ट केलेला आहे. जसा खेळ संपला की पडदा पडतो. त्याप्रमाणे आपले विहितकर्म संपले की जीवाचा शेवट म्हणजे मृत्यू होतो. आत्मा हा जीव सोडून निघून जातो. ज्याप्रमाणे आपण आपले जुने वस्त्र जीर्ण झाले की ते बदलून नवीन वस्त्र परिधान करतो. त्याप्रमाणे आत्मा एका देहातून निघाला की दुसऱ्या नवीन देण्यात अवतीर्ण होतो. इथे कवी म्हणतो की त्या जीवाचे जगणे संपले, पण कर्म अजून शिल्लक राहिलेले असते. ते पूर्ण करण्यासाठी आत्मा नवीन देहाला शोधत फिरतो. अशाप्रकारे तो एका देहानंतर दुसऱ्या देहाच्या शोधासाठी नव्या जोमाने फिरत राहतो आणि नवीन वेश परिधान करून नव्या भूमिकेत रंगपटावर येतो.

नवा खेळ अन् भूमिका नवी

कथा कुणाला ठाऊक नाही

कशास आलो काय कराया

देहामध्ये विसरून जाई

संवादाची ओळख नाही

किती काळचा नवा प्रवेश

संसाराच्या रंग पटावर

घेउनी येई नाना वेश ||४||

एक भूमिका संपते. पुढे दुसरी,  त्यातून तिसरी असा जीवाचा प्रवास सुरूच असतो. त्याचे वर्णन कवीने या शेवटच्या कडव्यात केलेले आहे.

पुन्हा नवा खेळ सुरू होतो. नवीन भूमिका असते. पण त्याची नेमकी कथा कुणालाच ठाऊक नसते. आपण म्हणतो ना,  ” प्रारब्धात काय काय लिहून ठेवले आहे कुणास ठाऊक ?” पण त्या अज्ञानात सुख मानून जगताना आपण कशासाठी जन्माला आलो?  आपल्याला नेमके काय करायचे आहे ? याचाच विसर पडतो आणि या देहाचे चोचले पुरविण्यात देहात रमून जातो. त्या जीवाला आपल्या संवादाची तोंड ओळखली नसते. हा नवा प्रवेश किती काळाचा आहे हेही ठाऊक नसते. तरीही तो सतत वेगवेगळी रूपे घेऊन रंगपटावर येत असतो.

या सर्व प्रवासातून हे कळते की, आत्मा अविनाशी आहे, तो जुने वस्त्र बदलावे तसा देह बदलतो. पण एका जीवातून दुसऱ्यात प्रवेश, एका भूमिकेतून नव्याने वेषांतर करून नवी भूमिका वठवत या आत्म्याचा प्रवास अव्याहतपणे सुरू असतो. कथा, संवाद, कार्यकाळ काहीही आधी माहीत नसताना काही भूमिका अप्रतिम ठरतात. समाज मानसात कायमच्या कोरल्या जातात. तर काही उत्तम, काही ठाकठीक, काही सुमार, तर काही अगदीच नाकारल्या जातात.

ही संपूर्ण कविता रूपकात्मक आहे. प्रत्येक जीवात ईश्वर असतो आणि तो वेगवेगळी रूपे घेत प्रकटतो. तर प्रत्येक जीव अंतरात्म्यामुळे वेगवेगळ्या भूमिका वठवतो हे मुख्य रूपक आहे.

पहिल्या कडव्यात कनात खाली उतरणे या रूपकातून मृत्यू होणे हा अचूक अर्थ स्पष्ट होतो.

दुसऱ्या कडव्यात भरजरी शेला हे सामाजिक मानसन्मान, ऐश्वर्य, सौख्य यासाठी योजलेले रूपक आहे. तर नागवा हे रूपक निर्भीडपणे, परखडपणे समाज प्रबोधन करणारा विरक्त योगी, संन्यासी यांच्यासाठी योजले आहे .

तिसऱ्या कडव्यात पडदा पडला की खेळ संपतो या रूपकातून मृत्यू झाला की  जीवात्मा तो देह सोडून जातो आणि ती भूमिका संपते ही गोष्ट स्पष्ट होते.

अशा रीतीने उत्तम शब्द योजनेतून ही कविता जन्म-मृत्यूचे अव्याहत सुरू असणारे चक्र, त्या मागचा सूत्रधार आणि त्याच्या विविध भूमिका अतिशय सुंदर रीतीने विशद करते. जगाच्या व्यवहारावर अगदी चपखल शब्दात प्रभावीपणे प्रकाश टाकणारी डॉक्टर श्रोत्री यांची ही एक अतिशय सुंदर  कविता आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खिडकीतला पाऊस… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

🌸 विविधा 🌸

☆ खिडकीतला पाऊस… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

ब्रह्मानंद  म्हणजे नेमके काय हे समजले नसले तरी खिडकीतून , बाहेर  पडणारा पाऊस पाहण्यात जो आनंद  मिळतो त्याला ब्रह्मानंद  म्हणायला काय हरकत आहे ? ज्या आनंदामुळे आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लित  होतात आणि जो आनंद  आपल्या मनातील मळभ धुऊन काढतो तोच खरा ब्रह्मानंद  !

सौजन्याची  ऐशी तैशी ‘ म्हणत महिनाभर  मनमानी कारभा-यासारखा वागणारा हा सूर्य. त्याच्या तडाख्याने तापून निघालेल्या पृथ्वीला जगणं असह्य  होऊन गेलेलं.ग्रिष्माच्या निखा-यांनी अंग अंग पोळलेलं. एक तरी सर यावी म्हणून  आसुसलेले जीव.अशातच अनपेक्षितपणे कुठूनतरी थंडगार वा-याची झुळूक  येते.क्षणभर आश्चर्यच वाटतं.सहज बाहेर लक्ष जातं.उन्हाची तीव्रताही कमी जाणवू लागते. तसं म्हटल तर सूर्यास्ताला अजून  बराच वेळ असतो.पण बाहेर अंधार अंधार वाटू लागतो.वारे वाटेल तसे वाहू लागतात. झाडांच्या फांद्यांची घुसळण सुरू होते.पानांच्या माना मोडेपर्यंत फांद्या वाकू लागतात.कुठला कुठला पाला,पाचोळा, कागदाचे तुकडे,हा सारा केर वा-याने गोल गोल उडत उडत दारापाशी येऊन  साठतो.तेवढ्यात क्षणभर  सगळं काही शांत शांत  होतं.’ गेलेल्या ‘ पावसाला श्रद्धांजली वाहात झाडं स्तब्ध उभी राहतात.छपरावर आलेला पाऊस  गेला की काय  अशी शंका येते.तोच टप् टप् असे चार थेंब  पत्र्यावर  पडतात.घरांची  उघडी दारे धाड धाड आपटू लागतात.गेला गेला असं वाटणारा पाऊस  आपल्या लवाजाम्यासह  पुन्हा बरसू लागतो.थाड थाड थाड थाड पाय आदळत घरांच्या पत्र्यावर  नाचू लागतो.टेरेसच्या पाईप मधून पाण्याची धार सुरू होते.रस्त्याच्या कडेला पाण्याची डबकी तयार होतात.त्यात पाण्याचे टपोरे थेंब पडले की तयार होतात छोटी मोठी वर्तुळं, एकात दुसरं विरघळून जाणारी. स्वत:च्या वर्तुळातून बाहेर  न पडणा-या माणसांपेक्षा एकमेकात सहजपणे मिसळून जाणारी वर्तुळं बघितली की उगाचच मनात अपराध्यासारखं वाटू लागतं.सूर्याच दर्शन  तर आता होणारच नाही.पण चुकार किरण मात्र  एखाद्या ढगाआडून डोकावत असतात.मग मात्र  डबक्यातल पाणी आरशासारखं  चमकू लागतं.लांबून पाहिल तर अभ्रकाचा खूप मोठा तुकडाच पडलाय की काय असं वाटावं.तेवढ्यात  एखादी वीज चमकून  जाते, अंग वेडवाकडं नाचवत,एखाद्या नर्तकीसारखी  नृत्य करत. दूरवर कुठेतरी खूप मोठा आवाज  होतो आणि पडली वाटत वीज कुठेतरी ‘ लगेच चर्चा सुरू होते.तशातच या चित्रमय बदलांची कसलीही दखल न घेता एक आगगाडी उन्मत्तपणे सुसाट वेगाने धावत सुटते.कुठल्याही वेळेच बंधन नसणारा हा पाऊस, वेळा सांभाळत मुकाट्याने धावणा-या या आगगाडीकडे  पाहून मनातल्या मनात हसत तर नसेल ना ? बाहेरचा पाऊस  जराही आत येऊ नये म्हणून  आगगाडीच्या सर्व  खिडक्या बंद  करुन घेतलेल्या असतात.पण असे करताना,अंग भिजू नये म्हणून  काळजी घेताना,आपण चैतन्याच्या किती थेंबांना मुकतो आहोत याची आतल्या प्रवाशांना कल्पना नसते.विजेच्या तारांवरून घरंगळत जाणारे जलबिंदू  किंवा तारेवर बसून पंख फडफडवणारे इवले इवले पक्षी  त्यांच्या नजरेस पडू शकत नाहीत.गाडीचा आवाज विरून जातो.सगळी पाखरं कुठं चिडीचूप  होतात समजत नाही.पण लबाड बोका मात्र अंग झटकत धूम ठोकतो आणि आडोश्याचा आसरा घेतो.आता त्याने ‘ म्या आऊ ‘ ? अस विचारल तर मात्र  त्याला अगदी अवश्य  आत ये म्हणायच अस मी ठरवतो.पण तो इतका गारठलेला असतो की डोळे मिटून  गप्प उभ राहण्याशिवाय  त्याला काही सुचतच नाही.खरच,त्याला चहा द्यावा काय ? आणि एकदम लक्षात येत आपण तरी कुठे घेतलाय चहा हा पाऊस  बघण्याच्या नादात ! देहभान  विसरून  टाकायला लावणारा हा पाऊस! पण चहाची एकदा का आठवण झाली की मग मात्र  चैन पडत नाही.डोळ्यासमोर  चहाचा कप दिसू लागतो.त्यातून बाहेर  पडणा-या वाफा या,तापलेल्या जमिनीवर  मगाशी पावसाचे थेंब पडल्यावर  निघणा-या वाफांच्या इतक्याच महत्वाच्या वाटू लागतात.चहा प्यायची तीव्र  इच्छा होते आणि त्याच क्षणी ‘ती’ आपल्यासमोर चहाचा कप घेऊन  उभी असते.पृथ्वीवरच्या या अमृताचा आस्वाद  घेत घेत  मी पुन्हा खिडकीतून  बाहेर  पाहू लागतो.तंबो-याच्या तारांप्रमाणे दिसणा-या त्या जलधारांतून  निघणा-या तालबद्ध  आवाजाचा टपोरेपणा  नकळत  जाणवू लागतो.हे सर्व  पाहताना डोळ्यांना मिळणारं सुख , वहीची कितीही पानं लिहून काढली तरी मी कुणाला पटवून देऊ शकत नसतो.माझ्या अंत:करणात श्रावणसरी बरसत असतात आणि मनाच्या मोराचं नाचणं केव्हा सुरू होत हे मला समजतही नाही.हा पाऊस  माझा असतो आणि मी पावसाचा.   खाली उतरणारे मेघ, कोसळणारा पाऊस,न्हाऊन  निघालेले   डोंगरमाथे , माना तुकवून  पावसापुढे नम्र     होणारे वृक्ष,  फुलांपानांतून टपकणारे थेंब, थरथरणारी तृणपाती हे सगळं पाहताना ‘मी न माझा राहिलो ‘ अशी अवस्था होऊन जाते.मग वाटू लागतं,ब्रह्मानंद ,ब्रह्मानंद  म्हणतात तो हाच तर नव्हे  ?

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर ☆

श्री सदानंद आंबेकर

? मनमंजुषेतून ?

☆ आध्यात्मिकतेचा श्रेष्ठ अनुभव – पंढरीची पायी आषाढी वारी 2023 – भाग –2 ☆ श्री सदानंद आंबेकर

वारीचा पहिला दिवस – पहिला अनुभव – पहिली परीक्षा

एका ओळीत चालत मुखाने हरिनाम स्मरण करीत हळू-हळू शहरातील रस्त्यांवरून वारी चालली। पुढे जाता जाता अजूनही काही दिंड्या येऊन सहभागी होऊ लागल्या …. जसे गावागावातून वहात येणाऱ्या लहान नद्या पुढे एका नदीत येऊन मिसळतात नि एक मोठी नदी निर्माण होते … तसेच काहीसे वाटून गेले. वारीचा खरा उत्साह आता दिसू लागला होता। चहुकडे नुसता नामाचा गजर, भारी गर्दी, त्यांत आता आमच्या दिंडीचे वारकरी वेगळे होऊन गेले। रांग वगैरे सगळी संपली। आता आपण फक्त एका गावचे नाही …  आता संपूर्ण विश्व आपला परिवार आहे असा भाव निर्माण झाला। वारकरी आपसांत एकमेकांना माऊली हे असे संबोधतात । भक्तीची ही असाधारण भावना बघून माझे मन भारावून गेले, आणि त्याच क्षणी मी निर्णय केला की  घरी गेल्यावर हे सर्व विस्ताराने लिहायचे,  ज्याने श्रध्देचा हा अनुभव इतरांना घेता येईल। 

आता थोडे त्यांचे वर्णन, जे स्वतः प्रत्यक्ष वारीत नव्हते पण ज्यांची भावना वारकऱ्यांपेक्षा कुठेही कमी नव्हती। शहरांत चालत असतांना पदोपदी पाण्याची बॉटल, त्या दिवशी एकादशी असल्यामुळे, राजगिरा पापडी, लाडू, केळी, चहा, शेंगदाण्याचे लाडू, साबूदाणा, असे बरेच काही घेऊन अनेक श्रध्दाळू रस्त्याच्या कडेला उभे राहून विनवणी करून वारकऱ्यांना देत होते। काही काही ठिकाणी तर एक दोन वर्षाच्या पोरांना छान धोतर किंवा छोटंस नउवारी घालून सजवून कडेवर घेऊन त्यांच्या हातून वस्तू देत होते- काका याच्याहातून एक तरी घ्या। असा प्रेमळ आग्रह करत होते. एके ठिकाणी तर एक मध्यम वयाचे गृहस्थ हातात एक दोन रुपयांची नाणी घेऊन वारकऱ्यांना एक एक देत होते, त्यामागे भावना ही असावी की वस्तु नाही तरी अशी काही सेवा आपल्या हातून व्हावी। धन्य तेची जन, जयांचे संत चरणी मन !! पुढे मिलिट्री, डॉक्टर हे सर्वपण सेवेत हजर होते। याच ठिकाणी माऊलींच्या रथाचे पहिले दर्शन मला झाले। खूप जवळून पाहता आले।

पुणे सोडल्यावर माझी पहिली परीक्षा सुरू झाली, जेव्हा समोर दिवेघाट दिसायला लागला। याक्षणी यात्रेवर निघायच्या आधीचे सर्वांचे बोलणे मला आठवू लागले। सात महिन्यापूर्वी हृदयाघात कारणाने दोन स्टेंट घालावे लागले असल्यामुळे सगळयांनी खूप शंका व्यक्त केल्या होत्या की आता काय ही परीक्षा पास होणार का? देवाचे नाव घेतले नि सर्वांच्यासोबत घाटाच्या रस्त्यावर पहिले पाऊल ठेवले। वर सूर्यनारायण पूर्ण तेज घेऊन हजर होते। आता या मार्गी खाण्या-पिण्याची सोय जवळपास संपली होती.  वर तळतळतं ऊन नि खाली ज्ञानबा-तुकाराम-एकनाथ-मुक्ताबाई चा सतत गजर। येथे मी विशेष उल्लेख करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचे पाण्याचे भरपूर टैंकर सोबत होते. त्यामुळे वारकऱ्यांची मोठी सोय होत होती। घाटात एकीकडून पायी चालणारे नि अर्ध्या भागात दिंडीची वाहनं, रुग्ण्वाहिका चालत होत्या। दर एक दीड तासांनी रस्त्याच्या काठावर थांबायचे, दोन घोट पाणी घेऊन पुढे चालायचे। एका उत्साहात बिना काही त्रासाचा आठ कि.मी. चा हा घाट अखेरी संपला आणि पुढे समतल मैदानांत डाव्या बाजूला  ठेवूनिया कर कटेवरी उभा तो विठोबा–  अशी भली मोठी मूर्ति दिसली. एकदा वाटले – आलो का काय पंढरपुराला !!! पुढे पुष्कळ चालून सायंकाळी सुमारे पाच वाजता सासवडला आमच्या ठरलेल्या ठिकाणी- दादा जाधवराव मंगल कार्यालय येथे आलो।

तिथे अजून ही दिंड्या थांबल्या असल्याचे दिसून आले। संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ आणि प्रवचनाचा पहिला कार्यक्रम झाला। त्या वेळी दिंडी प्रमुख डॉ भावार्थ देखणे आणि त्यांच्या भार्या सौ पूजा देखणे यांस व्यासपीठावर ऐकायची संधी मिळाली। वारकरी संप्रदायाशी पूर्वीचा काही परिचय नसल्यामुळे माझ्यासाठी हा एक नवीन अनुभव होता। या अगोदर कधीच मी हरिपाठ ऐकला नव्हता। आतापर्यत काही बंधु भगिनींशी प्राथमिक ओळख झाली होती। वारीबद्दल माहिती साठी इंटरनेटवर बरंच काही वाचलं होतं.  पण माझा अनुभव त्यापेक्षा बराच वेगळा होता। प्रवचन आणि हरिपाठ अत्यंत सुरेख झाला, इथे मी देखणे दंपतिचे अभिनंदन करू इच्छितो की या तरुण वयात आणि स्वतः उच्चशिक्षित नि कॉर्पारेट क्षेत्रात उच्च पदी असूनही देवाच्या कामात येवढे कौशल्य !! मला स्तुत्य वाटले। त्यांच्या संगतीला टाळवादकांची ती एकसम पदचालना-पावली, जसे काही नृत्यच आणि पखावजाची ती उत्तम साथ, सर्व तरुण वयाचे, आनंद वाटला। आजचा दिवस सर्वात जास्त चालणे झाल्यामुळे पुढे १५ जूनला सासवडला विश्राम होता। इथे माझ्या पायाला झालेल्या छाल्यांकरिता मी औषध घेतले।

१६ जून :: येळकोट येळकोट जय मल्हार : जेजुरी तीर्थक्षेत्र अंतर २०.९४ कि.मी. 

सासवडच्या विश्रांतीनंतर नवीन उत्साह घेऊन आम्ही निघालो जेजूरीला। हे मल्हारी मार्तण्ड किंवा खंडोबाचे जागृत तीर्थस्थान आहे। एका उंच गडावर पायऱ्या चढून दर्शनाला जावे लागते। अतिशय गर्दी आणि थकवा असल्यामुळे मी दर्शनाला जाऊ शकलो नाही, किंवा खण्डोबाची मला आज्ञा नसावी असेही म्हणता येईल। येथे गावाच्या सुरुवातीला उजव्या हाताला एक प्राचीन देऊळ पाहिले, ज्या ठिकाणी रामदास स्वामींनी ‘लवथवती विक्राळा‘— ही शंकराची आरती लिहिली असा तिथे उल्लेख केला होता। देवळाला लागून एक तलाव दिसला जो अत्यंत घाण होता। आजच्या रस्त्यात पुन्हा चहा-कॉफी, वडापाव, उसाचा रस, सोडा आणि खूप काही खाय-प्यायची दुकानं होतीच. त्याशिवाय अनेक संस्थांतर्फे अन्न, पाणी, चहा याची मोफत वाटप केले जात होते। उसाच्या रसाच्या सगळया स्टॉलवर आधीच रेकॉर्ड केलेली कमेंटरी फार मजेदार होती। चंद्रभागेच्या पाण्याने जोपासलेल्या उसाचा अमृतासारखा गोड रस ‘ विठाई रसवंती ‘च्या नावाने फक्त पाच रुपयांत एक ग्लास मिळत होता, तो यात्रेत मी एक दोनदा घेतला सुध्दा। वारीला जातांना रस्ता कसा असेल याची शंका आता मिटली होती, कारण पूर्ण रस्ता रुंद हायवे होता, कुठेच उतार चढाव आणि वळण नव्हते। येथे आमचे मुक्कामाचे ठिकाण शोधायला खूप विचारावे लागले। आजचा मुक्काम श्री.आगलावे यांच्या धर्मशाळेत होता। रात्री दररोजप्रमाणे हरिपाठ ज्या ठिकाणी झाला ते एक अतिशय सुंदर राम मंदिराचे आंगण। छान गार वारा होता आणि सोबत सरस हरिपाठ। याच सत्संगात सौ.  माईंची अभंग प्रस्तुति – ‘ खंडेराया तुज करिते नवसू-मरू दे रे सासू- खंडेराया ‘, आणि सोबत डॉ. भावार्थचे संबळ वादन हे मी पहिल्यांदा ऐकले। खरं तर हे वाद्य पण पहिल्यांदाच पाहिले। त्या वास्तुचे मालक पण तिथे उपस्थित होते। रात्री नऊ वाजता जेवण नि नंतर विश्रांति।

– क्रमशः भाग दुसरा…

© सदानंद आंबेकर

भोपाळ, मध्यप्रदेश 

मोब. 8755756163 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares