मराठी साहित्य – विविधा ☆ जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे… ☆ श्री अरविंद लिमये ☆

प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ,रंग,भाव असतात.तसेच परस्पर भिन्न अर्थ असणारे पण वरवर एकच भासणारे अपवादात्मक शब्दही असतात.

‘वसा’ हा अशा अपवादात्मक शब्दांपैकीच एक. अक्षरे तीच.शब्दही तेच.पण अर्थ मात्र भिन्न. व्रत,नेमधर्म या अर्थाचा असतो तो ‘ वसा ‘ हा एक शब्द आणि स्निग्ध पदार्थ या अर्थाचाही ‘वसा’ हाच दुसरा शब्द.दोघांमधली अक्षरे तीच म्हणून चेहरामोहराही सारखा तरी DNA पूर्णत: वेगळा. स्निग्ध पदार्थ म्हंटले की तेल,लोणी,तूप,वंगण,मेण या सारखे पदार्थ चटकन् नजरेसमोर येतात पण या अर्थाने ‘वसा’ शब्दाकडे पाहिले की असा एखादा विशिष्ट पदार्थ नजरेसमोर मात्र येणार नाही.’मेदयुक्त पदार्थ’ या व्यापक अर्थाच्या वसा या शब्दात अशा सर्वच स्निग्ध पदार्थांचा समावेश होत असला तरी त्या अर्थाने वसा हा शब्द फारसा प्रचारात मात्र आढळून येत नाही.

वसा हा शब्द व्रत या अर्थाने मात्र सर्रास वापरला जातो.निदान वरवर तरी व्रत आणि वसा हे दोन्ही शब्द समानार्थी वाटतात आणि कांही अंशी ते तसे आहेतही. व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांचा समान अर्थ म्हणजे ‘नेम’ !’नेम’ हा शब्द मला तरी ‘नियम’ या शब्दाचा  बोलीभाषेत रूढ झालेला अपभ्रंश असावा असेच वाटते. कारण व्रत आणि वसा या दोन्ही शब्दांना ‘नियम’ या शब्दात असणारा नियमितपणाच अपेक्षित आहे हे लक्षात घ्यायला हवे.’नेम’ या शब्दाचे मात्र लक्ष्य, उद्दिष्ट ,रोख,शरसंधान असे व्रत किंवा वसाशी काही देणेघेणे नसणारेही अर्थ आहेत. त्यामुळे स्वतः साठी एखादा ‘नेम’ म्हणजेच ‘नियम’ ठरवून घेणे आणि तो सातत्याने पाळणे हेच व्रत किंवा वसा दोन्हींनाही अपेक्षित आहे.

व्रत या शब्दाचे संकल्प, उपवास हे अर्थ वसा या शब्दालाही अभिप्रेत आहेत.तथापी व्रत हे सदाचरण, ईशसेवा, भक्ती, आराधना यास पूरक असेच असते.पण वसा या शब्दाचा अवकाश यापेक्षा अधिक आहे. व्रत आणि वसा या दोन्हीमध्येही अध्यात्मिक उन्नतीसाठी स्वीकारलेले नेमधर्म गृहीत आहेतच पण वसा या शब्दात त्याहीपेक्षा अधिक व्यापक अर्थ सामावलेला आहे.

या व्यापक अर्थाला स्वतःचे जन्मभराचे उद्दिष्ट ठामपणे ठरवून स्वीकारलेला आचारधर्म अपेक्षित असतो.

कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडात अडकून न पडता दीनदुबळ्यांची,वंचितांची सेवा करण्यासाठी, सामाजिक उन्नतीचा ध्यास घेत अनिष्ट प्रथा ,रूढी ,परंपरा यातल्या तथ्यहीन गोष्टी कालबाह्य ठरवून समाजाचा दृष्टिकोन  बदलण्यासाठी, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन तन-मन-धनाने स्वतःचे आयुष्य राष्ट्राला अर्पण करून

राष्ट्रहिताला वाहून घेत ज्या थोर स्त्री-पुरुष महात्म्यांनी स्वतःची उभी आयुष्ये वेचलेली आहेत, स्वतःच्या स्वास्थ्याचा, सर्वसुखांचा त्याग करून, असह्य हालअपेष्टा  सहन करुन आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे त्या त्या प्रत्येकाने अतिशय निष्ठेने तरीही डोळसपणे स्वीकारलेला जीवन मार्ग हा त्यांच्यासाठी त्यांनी घेतलेला आयुष्यभरासाठीचा ‘वसा’च होता ! यातील  ‘डोळसपणे’ या शब्दाचा नेमका अर्थ समजून घ्यायला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे खालील प्रसिद्ध काव्य उचित ठरेल !   की घेतले न हे व्रत अंधतेने

लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग

 माने

  जे दिव्य दाहक म्हणुनी असावयाचे

    बुध्दयाची वाण धरिले करी हे सतीचे!

‘एखादे दिव्य कार्य दाहक हे असणारच. त्याचे चटके बसणारच. पण सतीचे वाण घ्यावे तसे आम्ही स्वखुशीने हे स्वीकारलेले आहे. अंधतेने नव्हे !’

स्वातंत्र्यवीरांची या काव्यामधे  व्यक्त झालेली निष्ठा आणि निर्धार ‘वसा’ या शब्दाचा पैस किती अमर्याद आहे याची यथोचित जाणिव करुन देणारा आहे !!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 18 – असतील शिते तर जमतील भुते ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 18 –  असतील शिते तर जमतील भुते ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प

नरेंद्र ब्राह्मो समाजाच्या कामात, त्यांच्या मतप्रणालीत आतापर्यंत चांगला मुरला होता. त्यामुळे श्री रामकृष्णांबरोबर पूर्ण वेळ काम करण्याचे अजून त्याचे मन मानत नव्हते. बर्‍याच दिवसांत नरेंद्र दक्षिणेश्वरला गेला नव्हता. त्यामुळे रामकृष्णांचे मन सुद्धा नरेंद्रला भेटण्यास उत्सुक होते. ब्राह्मो  समाजात गेलं तर, नरेंद्र तिथे नक्की भेटेल असं त्यांना वाटलं आणि ते सरळ संध्याकाळी उपासनेच्या वेळी ब्राह्मो समाजात गेले. त्यावेळी आचार्य, वेदिवरून धर्मोपदेश देत होते. त्यांच्या ईश्वरीय गोष्टी ऐकून रामकृष्ण सरळ वेदीजवळ जाऊन पोहोचले, याचा अंदाज नरेंद्रला होताच. लगेच तोही त्यांच्या पाठोपाठ वेदीजवळ गेला आणि त्यांना सावरू लागला. यावेळी आचार्य, आसनावरून उठले नाहीत आणि रामकृष्णान्शी बोलले देखील नाहीत. साधा शिष्टाचार सुद्धा पाळला नाही. नरेन्द्रनी, कसेतरी     श्री रामकृष्णांना सभागृहाबाहेर काढून, त्यांना दक्षिणेश्वरला रवाना केले. त्यांचा आपल्यासाठी असा झालेला अपमान नरेंद्रला सहन झाला नाही. या जाणिवेने क्षुब्ध आणि व्यथित होऊन नरेन्द्रने त्या दिवसापासून ब्राह्मो समाजाचे काम सोडले ते कायमचेच.

नरेंद्र बी.ए.ला शिकत असतानाच विश्वनाथ बाबूंनी त्यांचे मित्र, निमईचरण बसू यांच्याकडे कायद्याच्या शिक्षणाची सोय केली होती. त्याच्या जीवनात स्थैर्य यावं, म्हणून त्यांचा प्रयत्न चालला होता. घरी नेहमी पाहुणे रावळे, येणारे जाणारे, नातेवाईक यांची वर्दळ असे. त्यामुळे नरेंद्र अभ्यासाला आजीकडे जात असे. साधे अंथरूण, आवश्यक पुस्तके, एक तंबोरा एव्हढेच त्याचे सामान असे. एकांतवास, ध्यानधारणा, कठोर शारीरिक नियम असा ब्रम्हचार्‍याचा दिनक्रम असे. काही वेळा तर श्रीरामकृष्ण सुद्धा तिथे येऊन साधनेसंबंधी उपदेश देऊन जात असत. काही नातेवाईक आणि मित्रांना हे वागणे आवडत नसे. सर्वजण आध्यात्मिकतेपासून नरेंद्रला परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असत. मात्र तरीही नरेंद्र चे मित्रांना भेटणे सुरू असे.

एकदा असेच वराहनगर मध्ये मित्राकडे सर्व जमले होते. गप्पागाणी यात सर्व दंग झाले असताना, अचानक घाबरलेल्या अवस्थेत एकाने येऊन, नरेंद्रच्या वडिलांची हृदयक्रिया बंद पडून ते गेल्याची बातमी दिली. या बातमीने सगळ्या झगमगाटात सुद्धा नरेंद्रला सगळीकडे अंधार दिसू लागला. ताबडतोब तो घरी आला. ते दृश्य पाहून, पितृशोकाने नरेंद्रचे वज्रदृढ हृदय वितळून अश्रुंच्या धारा लागल्या.

आता भविष्यकाळ कसा असेल? आता दर महिन्याचा हजारो रूपयांचा खर्च कसा चालवायचा? भुवनेश्वरी देवींना आकाश फाटल्यासारखं झालं. संसारासंबंधी नेहमी उदासीन असलेल्या नरेंद्रला दारिद्र्याच्या कल्पनेने गांगरून जायला झालं. अनुकूल अवस्थेत अगदी जवळची म्हणवणारी, प्रतिकूल अवस्था येताच जवळचीच मंडळी पारखी होऊ लागली. विपन्नावस्थेत कुणी साथ देत नाहीत ही जगाचीच रीत. नरेन्द्रनाथाच्या तीक्ष्ण बुद्धीला सर्व उमजलं आणि समजलं सुद्धा. हे बसणारे चटके ते नेटाने आणि धैर्याने सहन करू लागले होते.

एकीकडे वकिलीची परीक्षा देत होते. दुसरीकडे कामधंदा, नोकरी शोधत होते. तीन चार महीने असेच गेले. घरात धान्याचा कण नसल्याने एखाद्या दिवशी सर्वांना उपाशीच झोपावे लागे. जवळच्या मित्रांना त्याने हे कळू दिलं नव्हतं. कधी अन्न आहे पण सर्वांना पुरेसे नाही. असे पाहून नरेंद्रनाथ, “आज मला एकाने जेवायला खूप आग्रह केला आहे, तेंव्हा, मी आज घरी जेवणार नाही” असे खोटेच भुवनेश्वरी देवींना सांगून कडकडीत उपास करत असे.

अशा लागोपाठ उपवासांनी तर एकदा ग्लानी येऊन  निपचीतच पडले. काही जवळचे मित्र आर्थिक मदत करायला पुढे येत, त्यांची मदत ते सविनय परत करत असत. पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षा स्वीकारायची हे त्यांना असह्य होत असे. कधी कधी मित्र त्याला घरी जेवायला बोलावण्याचा प्रयत्न करीत. तेंव्हा कामाचा बहाणा करून नरेंद्र टाळत असे. नाहीतर कधी खोटा खोटा आव आणत जेवायला जात असे तेंव्हा त्यांच्या मनात कालवाकालव होऊन, डोळ्यासमोर, भुकेने कोमेजलेली आपली लहान लहान भावंडे दिसत.

तारुण्यात पाय ठेवत असतानाच भाग्यचक्र अचानक पालटल्यामुळे, पितृछत्र गेल्याने नरेन्द्रनाथ कुटुंबाचा पालनपोषणाचा भार सांभाळत असतानाच आणखी एक अरिष्ट आलं. नातेवाइकांनी कुटुंबाला घराबाहेर काढण्याचा डाव रचून कोर्टात फिर्याद दाखल केली.

एक दिवस सकाळच्या प्रहरी उठता उठता भगवंताचे नाव घेऊन नरेंद्र अंथरुणातून उठत असताना, आईने ऐकले आणि त्वेषाने संतपून त्यांना म्हणाली, “ चूप रहा कार्ट्या, लहानपणापासून केवळ भगवान आणि भगवान. फार छान केलं भगवानानं?” हे शब्द ऐकून नरेन्द्रनाथाच्या व्यथित मनाला घरे पडली. तसच भाग्य फिरताच, वडिलांच्या जुन्या मित्रांचं वागणं पाहून नरेंद्र अचंभीत झाला. जगाच्या ह्या शोचनीय कृतघ्नतेचे बीभत्स रूप पाहून त्याचं मन बंडखोर होऊन उठलं.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पोस्टमनदादा… ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

?  विविधा ?

☆ पोस्टमनदादा… ☆ सुश्री त्रिशला शहा 

(अलिकडे मोबाईल आणि इंटरनेटच्या जमान्यात लोकांंच्या जिव्हाळ्याचे असलेले ‘ पोस्टखाते ‘बरचं मागे पडलंय,त्यामुळे पोस्टमनची फारशी कुणाला आठवणचं येत नाही.याचसाठी हा लेख)

नमस्कार पोस्टमनदादा,

एकेकाळी पोस्ट,पत्र आणि जनता यांच्यामधे तुमच्यामुळे एक भावनिक अनुबंध गुंफला गेला होता.अत्यंत जिव्हाळ्याच नातं तुमच्यामार्फत येणाऱ्या पत्रामुळे आमच्याशी जोडलं गेल होत.आपल्या माणसाच एखाद पत्र येणार असेल तर आम्ही तुमची आतुरतेने वाट पहायचो.तुमचा तो युनिफॉर्म, खाकी शर्ट-पँट,डोक्यावर टोपी,हातात पत्रांचा गठ्ठा आणि खांद्यावर शबनम बँग,अशा तुमच्या वेगळेपणामुळे तुम्ही लांबूनही ओळखायचात.तुम्ही दिसलात की इतका आनंद व्हायचा! ज्या पत्राची आम्ही वाट पहात असायचो,ते तुम्ही नक्की आणले असणार असं वाटायचं.तुमच्यामुळेच तर आम्हाला परगावी असणाऱ्या नातेवाईकांची खुशाली कळायची.आनंद,सुख-दुःख अशा सगळ्या बातम्या तुमच्यामुळेच तर कळायच्या.तुम्हालाही एखादी लग्नपत्रिका, आनंदाचे,खुशालीचे पत्र आम्हाला देताना आनंद व्हायचा.शाळेचा निकाल,नोकरीचा काँल,शहरातून आलेली एखादी मनीआँर्डर तुम्ही प्रसन्न मनाने आमच्याकडे सुपूर्द करायचात.नवविवाहित जोडपं,प्रेमीजन तर तुमची आतुरतेने वाट पहायचे.

पण एखाद्या दुःखद घटनेचे पोस्टकार्ड, तार देताना तुम्हीही तितकेच हळवे व्हायचात.तार आली म्हणजे तर घरातले सारे घाबरुनच जायचे.अशावेळी तुम्हीच ती तार वाचून दाखवायचात.ती वाचताना नकळत तुमचेही डोळे ओले व्हायचे.याच तुमच्या स्वभावाने लोकांशी आपुलकीचे नाते तयार व्हायचे.सासरी गेलेल्या मुलीची खुशाली,मुलीला माहेरची खुशाली या गोष्टी तुमच्यामुळेच कळायच्या.अशावेळी तुम्ही त्यांना एक देवदूतच वाटत होता.त्यामुळे दिवाळीची खुशी देताना तुमचाही नंबर त्यात असायचा.

पत्राची वाट पहाणं आणि त्यानंतर पत्र येण यातला हुरहुरीचा काळचं आता संपल्यासारख झालयं.या इंटरनेट,व्हाटस्अँपच्या जमान्यात तुमची कुणाला गरजच उरली नाही. किती बदललं जग सार! इथे वाट पहायला कुणाला वेळच नाही.फँक्स,ई-मेल,व्हाटस्अँपमुळे सारे जगचं जवळ आल्यासारखे झाले आहे.पाच मिनीटात साता समुद्रापार मेसेज पोहोचतोय.त्यामुळे पोस्ट आणि पोस्टमन या गोष्टी विस्मृतीत गेल्यासारख झालय.हुरहुरीतला आनंद संपलाय.आलेली पत्रे पुन्हापुन्हा वाचण्यातली गोडीच नाहीशी झालीये.जुनी तारकेटमधे घातलेली पत्रे पहाताना नकळत त्या पूर्वीच्या दिवसांची आठवण होते.हे काहीच उरले  नाही.आता फक्त मेसेज वाचणे आणि डिलीट करणे एवढचं उरलय.नाही म्हणायला ठराविक पार्सल सेवेसाठी, राखी पाठविण्यासाठी मात्र पोस्टाचा नक्कीच उपयोग होतो.पोस्टामधे पैसेही सुरक्षितपणे साठविता येतात.पण तो तेवढाच संबंध आता पोस्टाशी उरलाय हेही खरेचं

असो,कालाय तस्मै नमः इथेच थांबते. 🙏

© सुश्री त्रिशला शहा

मिरज 

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ हरवलेलं आजोळ… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

आजोळी जायचा विषय निघाला आणि माझ्या मुलांच प्लॅनिंग सुरू झालं. किती दिवस जायचे गाडीत, पुढच्या सीटवर कोणी बसायचे, कोणता सिनेमा पहायचा, कोणत्या ट्रेकींगला जायचे, मोबाईल मधे कोणते गेम लोड करायचे, domino’s चा pizza, अमूलच ice-cream, डॅशिंग कार कुठे जाऊन खेळायचे, मॉल कोणता पहायचा, शॉपिंग कुठे करायचे, बापरे बाप भली मोठी यादी ती…..

आमच्या लहानपणी आजोळी जायचे म्हटले की नुसती धमाल असायची.

आगगाडीत बसून धुरांचे ढग पहात जाण्यात एक अनोखा आनंद असायचा.

आम्ही भावंडं प्रत्येक वळणावर इंजिन पहायला मिळावे म्हणून खिडकीत बसण्यासाठी धडपडत असू.

जायच्या आधी चार- पाच दिवस आमचा बॅग भरण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. आत्ता सारख्या चाकांच्या बॅगा नव्हत्या त्यावेळी. त्यावेळी होत्या पत्र्याच्या ट्रंका जड च्या जड. कोणते कपडे घ्यायचे, तिथे गेल्या वर कायकाय करायचे ह्याचे नियोजन आम्हा भावंडांचे चांगले पाचसहा दिवस आधी सुरू होई. आमच्या मामाला दर मंगळवारी सुट्टी असायची. त्यादिवशी तर नुसती धमाल असायची.

मला चांगले चार मामा आणि दोन मावश्या आहेत त्यामुळे सगळे एकत्र जमलो की धमाल यायची. मला आता कौतुक वाटते ते माझ्या मामींचे एवढं सगळ्यांचे करतांना एकही आठी नाही कपाळावर. उलट प्रेमाने सगळ्यांना आग्रह करून करून वाढायच्या.

माझी आजी मात्र कडक शिस्तीची पण तेवढीच प्रेमळ. जेवण झाल्यावर सगळ्यांनी आपापली ताट धुऊन टाकायची हा तिचा नियम होता. आजी प्रमाणेच आजोबा पण कडक होते. त्यांना शिस्त आवडायची. आणखीन एक त्यांचा कटाक्ष होता तो म्हणजे प्रत्येक मुलींनी कपाळावर कुंकू लावायचेच.

त्यावेळी रोज आजोबा सगळयांना काहीना काही खाऊ आणायचे. आत्ता सारखे कॅडबरी, कुरकुरे, वेफर्स, pizza, burger असं काही नसायचे बरं का त्यावेळी. त्यावेळी आम्हाला मिळायचे ते करवंद, जांभळं, बोरं, श्रीखंडाच्या गोळ्या, गरे एकूण काय रानमेवा. आणि एक गंमत म्हणजे ते सगळ्यांना ओळीत उभं रहायला सांगत आणि स्वतः प्रत्येकाला ते वाटत.

त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि समाधान टिपण्या जोगा असायचा.

आत्ता सारखे हॉटेलिंग असं काही नसायचे त्यावेळी. बागेत डबे घेऊन जाऊन जेवायचे म्हणजेच हॉटेलिंग. काय मजा असायची सांगू त्यात !! खूप धमाल यायची. भाकरी, झुणका, वांग्याची भाजी, मसाले भात, पापड, तळलेल्या कुटाच्या मिरच्या आणि कांदा असा फक्कड ठरलेला बेत असायचा.

जेवणं झाली की मोठी मंडळी झाडाखाली चटई टाकून ताणून देत असत. आम्ही बच्चे कंपनी मात्र पत्यांचा डाव रंगवत असू. थोडसं उन उतरले की परत पकडापकडी, विटी दांडू असा खेळ रंगात येई. संध्याकाळी मात्र तिथली गाड्या वरची भेळ ठरलेली. आणि एक एक बर्फाचा गोळा.

आईस्क्रीमची सुद्धा एक धमाल असायची. मामा स्वतः ते पॉट मधे बनवायचा. खूप मेहनत घ्यावी लागते त्याला, आणि खूप वेळ लागतो, पण आजिबात तक्रार न करता आनंदाने आणि अगदी मनसोक्त ice-cream तो आम्हाला खाऊ घालायचा.

माझ्या आजोळी अंगणात छान मोठा जाई चा वेल होता. माझ्या मावसबहीणी सकाळी सकाळी त्या फुलांचे सुंदर गजरे बनवायच्या , मला काही बनवता येत नव्हता पण त्या कशा बनवतात ते पाहण्यातच खूप आनंद मिळायचा. दुपारच्या वेळी सगळे झोपले की आम्ही पत्र्यावर चढून जांभळे आणि पेरू तोडायचो. कधी सापडलोच तर एक धपाटा मिळायचा पण त्याचा काही फारसा परिणाम न होता वानरसेना दुसरे दिवशी परत पत्र्यावर हजर…

माझ्या एका मामाचे कार्यालय होते. त्यामुळे रात्री झोपायला दोन्ही बाजूला दहा दहा गाद्या घातलेल्या असायच्या. एकीकडे मुली आणि दुसरीकडे मुलं. साहजिकच आहे आम्ही सगळे मावस, मामे, आत्ते भाऊ बहीण जमलो की पंचवीस जण तर व्हायचो. मग काय रात्री पत्ते खेळणे, चिडवा चिडवी,चेष्टा मस्करी आणि गाण्याच्या भेंड्यांची मैफिल जमायची. शेवटी जेव्हा मामा चा ओरडा बसे तेव्हा शांतता पसरे.

आताना, कुठेतरी हरवली आहे ती अंगणातील जाई, जुई ,ती अमराईची मेजवानी , हरवला तो बर्फाचा गोळा, आणि तो पत्यांचा एक डाव, खरचं परत लहान व्हावं असं वाटतं परत बसावं आगगाडीत आणि परत धुरांच्या लोटांचा आनंद घेत मामाच्या गावी जावं, परत मनसोक्त दंगा करावा आणि लावावी पुरणपोळी ची पैज. रात्र रात्र जागून परत खिदळावे आणि जोरात मामाची हाक ऐकू यावी अरे झोपारे आता.

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पं. शिवकुमार शर्मा…. ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

 

☆ पं. शिवकुमार शर्मा… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

काही वर्षांपूर्वी पुण्याच्या सुप्रसिद्ध सवाई गंधर्व महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा यांचा संतुरवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष ऐकायची संधी मिळाली होती. सुरेख, देखणा, काश्मीरी सफरचंदासारखा टवटशवीत चेहरा,धवल केसांचा पसरलेला झाप, अंगातला जरकाडीचा सोनेरी कुर्ता,पायजमा,खांद्यावरची वेलबुट्टीची शाल पांघरलेला हा संगीत योगी  पाहताना मन भरुन गेले. वादनापूर्वी त्यांनी त्या अफाट श्रोतृवर्गाला नम्रपणे अभिवादन केले.आणि म्हणाले,”हे माझं भाग्य आहे की ज्या महान गायकाने सुरु केलेल्या या संगीत महोत्सवात मला माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे…मै पुरी कोशीश करुंगा..!!”

इतक्या महान कलाकाराची ही नम्रताच सदैव लक्षात राहण्या सारखी होती.

नंतरचे दीड दोन तास त्या तंतुवाद्यातून निर्माण  होणार्‍या संगीत लहरीवर श्रोते नुसते तरंगत होते. स्वर्गीय आनंदाचीच ती अनुभूती होती.

पंडीत शिवकुमार शर्मा हे मूळचे जम्मु काश्मीरचे. त्यांचे वडील ऊमा दत्त हे प्रसिद्ध गायक व तबला वादक होते.

वयाच्या पाचव्या वर्षीच शिवकुमारजींना त्यांनी गायन व तबलावादनाचे धडे द्यायला सुरवात केली.संतुर हे काश्मीरी लोकसंगीतातलं तंतुवाद्य. त्यांच्या वडीलांनीच असा निश्चय केला की,शिवकुमार हे भारतीय बनून प्रतिष्ठित भारतीय शास्त्रीय संगीत संतुरवर वाजवतील. वयाच्या तेराव्या वर्षापासून शिवकुमारजींने संतुर वादनाचे शिक्षण सुरु केले.

संगीतात संतुर व बासरीला आज मान्यता मिळाली असली तरी पूर्वी शास्त्रीय सभेमध्ये यांना समाविष्ट करुन घेण्यात विरोध होता.ही वाद्ये लोकसंगीतातील मानली जात होती. पार्श्वसंगीतात, पडद्यावर कुणी पहाडावर असेल तर,बासरी आणि खळखळत्या झर्‍याच्या काठी असेल तर संतुर अशीच धारणा त्यावेळी  संगीत क्षेत्रात होती. परंतु हरीप्रसाद चौरसिया आणि पंडीत शिवकुमार शर्मा या जोडीने मात्र या लोकसंगीतातल्या वाद्यांना शास्रीय संगीताच्या प्रवाहात आणले.

संगीत हा ईश्वरप्राप्तीचा मार्ग आहे. तपश्चर्या आणि साधनेच्या मार्गाने पंडीतजींनी प्रचंड यश मिळविले आणि संतुर या वाद्याला सांगितीक प्रतिष्ठा मिळवून दिली.नवं परिमाण दिलं. तसेच पुढच्या पीढीसाठी एक आयता रंगमंच मिळवून  दिला.

या त्यांच्या योगदाना बद्दल कुणी भरभरून कौतुक केलं तर ते एव्हढंच म्हणत, “मी फक्त प्रयत्न केला…!”

केव्हीडी नम्रता. तिळमात्रही अहंकार नाही.

वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची कारकिर्द सुरु झाली.

व्ही. शांताराम यांनी त्यांच्या झनक झनक पायल बाजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत करण्यासाठी त्यांना पाचारण केले.

त्यानंतर त्यांनी संतूरवादनाचे खासगी कार्यक्रम सुरु केले.

ते उत्तम तबला वाजवत. गाईड मधील, ‘पिया तोसे नैना लागे रे..’ या गाण्यात त्यांनी तबला वाजवला आहे. पं. जसराजजींनाही त्यांनी तबल्याची साथ दिली आहे. तरुणपणी

मिळालेल्या यशाने त्यांना ग ची बाधा झाली नाही. टीम वर्कचे महत्व त्यांना होते. आणि म्हणूनच ते  एस डी बर्मन, खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल, पंचमदा यांचे आवडते वादक होते.!

त्यांनी इराणी संतुरचाही अप्रतीम वापर केला. बॉबी, दाग, एक नजर या चित्रपट गीतांत हे विलक्षण सुंदर संतुर वादन ऐकायला मिळतं.

प्रतिभा आणि अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटगीतांना अप्रतीम चाली दिल्या. आणि त्या लोकप्रिय झाल्या. सिलसिला या चित्रपटातली गाणी सर्वज्ञातच आहेत.

अंतरराष्ट्रीय संतुर वादक म्हणून ते तुफान प्रसिद्ध झाले.

त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण , संगीत नाटक अॅकॅडमी च्या पुरस्काराने सन्मानित केले.

ज्या शास्त्रीय संगीतात संतुर वाद्याला स्थान नव्हते ,त्या संगीत सभा या वाद्याविना अपूर्ण ठरू लागल्या.या वाद्यावर दरबारी,मालकंस सारखे कठीण, अशक्य रागही त्यांनी सहजपणे वाजवले.  संगीतातला मिंड हा बहारदार प्रकारही त्यांनी लीलया हाताळला. काश्मीर संगीतातलं संतुर वादन काहीसं सूफी प्रकारातलं असतं. पण पंडीतजींनी या वाद्याची परिभाषाच बदलली. आणि भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रवाहात या वाद्याला उच्च स्थान मिळवून दिलं.

त्यांच्या वडीलांचं स्वप्नही पूर्ण केलं.चित्रपट सृष्टीतल्या झगमगत्या प्रसिद्धीकडे त्यांनी पाठ फिरवली. आणि भारतीय शास्त्रीय संगीतातच लक्ष केंद्रीत केले. सर्व तंत्र आणि परंपरेच्या पलीकडे त्यांचं वादन होतं. त्यांचं संतुर वाजत नसे तर गात असे…

१३जानेवारी १९३८ ला जम्मु शहरात जन्मलेल्या या संगीतदूताची प्राणज्योत १०मे २०२२ ला अनंतात विलीन झाली. पण हा संगीतात्मा अमर आहे. मृत्यु हे सत्य आहे पण अस्तित्व हे चिरंजीव आहे. त्याला अंत नाही.

या महान कलाकारास भावपूर्ण श्रद्धांजली!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

?विविधा ?

☆ तो ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आज मी ज्या विषयाला स्पर्श करणार आहे, हो तुम्ही बरोबरच वाचलेत, स्पर्शच करणार आहे असे मी फार जबाबदारीने म्हणतोय, त्याचे कारण म्हणजे या विषयाचा आवाकाच इतका प्रचंड आहे आणि त्या वरील दोन्ही बाजूने खूपच लिखाण अगोदरच झालेले आहे !

पण म्हणून माझ्या सारख्या, दोन्ही बाजूचे विचार वाचल्यावर, ज्याच्या मनाचा गोंधळ उडालेला आहे, अशा माणसाने त्या विषयी आपले मत व्यक्त करू नये असे थोडेच आहे?

“तो” अस्तित्वात आहे का नाही या विषयावर शतकानुशतके वाद चालू आहेत आणि जिथ पर्यंत मानव जात या पृथ्वीतलावर आहे, तिथपर्यत ते वाद असेच चालू राहतील यात कोणाला काडीचीही शंका घेण्याचे कारण नाही.

“तो”आहे असे मानणारा जो वर्ग आहे त्यांच्या मते, “त्याची” मर्जी असेल तरच झाडावरची पाने हलतात, फुले फुलतात एवढेच कशाला तर  “त्याच्या” मर्जीनेच चंद्र, सुर्य उगवतात अथवा मावळतात, पृथ्वी स्वतः भोवती गोल फिरते, वगैरे वगैरे. 

“तो’ नाहीच असे मानणारा जो वर्ग आहे, ते आपली बाजू मांडतांना विरुद्ध वर्गाची मते,  शास्त्रीय आधार देवून खोडून काढतात !

“त्याच्या” अस्तित्वाबाबतची दोन्ही गटांची मते, एक आहे रे आणि दुसरा नाही रे, आपण जर नीट वाचलीत, ऐकलीत,  तर आपल्या असे लक्षात येईल की ती दोन्ही मते इतकी टोकाची असतात की आपल्यास असे वाटवे की, एकजण उत्तर धृवा वरून बोलतोय तर दुसरा दक्षिण !  या मध्ये माझ्या सारख्या माणसाचा फारच म्हणजे फारच पोपट होतो बुवा  !  म्हणजे कधी उत्तर धृवाचा जे बोलतोय ते खरे वाटाते, तर कधी दक्षिणेचा जे सांगतोय ते पण पटावे !

मी या बाबतीत एक observe  केले आहे की, दोन्ही धृवावरील लोकांचे इतके प्रचंड brain washing झालेले असते, की त्यापैकी कोणीही दुसऱ्या बाजूचे मत ऐकण्याच्या मनस्थितीत कधीच नसतो. फक्त आपापल्या धृवावरुन आपणच कसे बरोबर आहोत, हेच  ओरडून ओरडून सांगत असतो आणि एकमेकास challenge करीत असतो !

हे उत्तर आणि दक्षिण ध्रुववाले आपापल्या विचाराने इतके भारावून गेलेले असतात, की

या दोन्ही गटांना आपला काही लोकांकडून राजकारणासाठी कसा उपयोग करून घेतला जातो आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही म्हणा, अथवा त्या योगे आपल्याला मिळणाऱ्या प्रसिद्धीच्या पुढे ते त्याकडे काणाडोळा करीत असावेत !

पण या सगळ्या गोंधळात, त्या दोन्ही गटांकडे तटस्थपणे पाहणाऱ्या लोकांचा मला फार म्हणजे फार हेवा वाटतो ! हे लोक दोन्ही बाजू अगदी लक्षपूर्वक ऐकल्याचे दाखवतात आणि शेवटी आपल्या जे करायचे आहे तेच करतात !

समजा, आपल्या अत्यंत जवळच्या अशा प्रिय व्यक्तीचे त्याच्या जीवावर बेतणारे,  operation एखाद्या डॉक्टरने आपले कौशल्य पणाला लावून, आठ-नऊ तास खर्च करून, आपल्या त्या प्रिय व्यक्तीचे प्राण वाचवले असतील, तर त्या डॉक्टर मध्ये एखाद्याला “तो” दिसू शकतो !

मला असे वाटत की “तो” कधी कुणाला कुठे दिसेल याचा नेम नाही.  एखाद्याने आपल्याला अत्यंत अडचणीच्या वेळी जर योग्य मदत केली असेल आणि आपले त्या वेळेस जीवावरचे संकट दूर झाले असेल, तर आपण “त्याला” मदत करणाऱ्या माणसात बघतो आणि त्याचे उपकार जन्मभर विसरत नाही !

मग मला प्रश्न असा पडतो की “तो” खरच आहे का नाही आणि असलाच तर त्याचे नेमके रूप काय ? यावर निर्गुण, निराकार असे शब्द आपल्याला ऐकवले जातात ! पण त्याने माझे तरी समाधान होत नाही बुवा !

माझ्या मते आपण जर “त्याला” नीट शोधण्याचा प्रयत्न केला, तर आपल्या रोजच्या जीवनात “तो” आपल्याला ठाई ठाई दिसत असतो, अनुभवायला येत असतो, पण त्या साठी आपली नजर पारखी पाहीजे !

आपल्याला सुद्धा अशी पारखी नजर लाभो हीच सदिच्छा !

© प्रमोद वामन वर्तक

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ अर्थपूर्ण भासे मज हा… ☆ श्री अरविंद लिमये ☆

एखाद्या शब्दाचं वर्णन करायला त्याच शब्दापासून तयार झालेले विशेषणच चपखल ठरावे असं क्वचितच पहायला मिळते. अर्थ हा असाच एक दुर्मिळ शब्द म्हणावा लागेल. ‘अर्थ या शब्दाचे सार्थ वर्णन करायला ‘अर्थपूर्ण’ हेच विशेषण यथार्थ ठरते’ या एकाच वाक्यात आलेले अर्थपूर्ण, सार्थ, यथार्थ, हे विविधरंगी शब्द ‘अर्थ ‘ या शब्दाच्या संयोगानेच जन्माला आलेले असणे हा योगायोग नव्हे तर आपल्या मराठी भाषेच्या सौंदर्याची सुंदर झलकच म्हणता येईल.!

‘अर्थ’ या शब्दाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे अर्थ या शब्दात परस्परभिन्न असे दोन अर्थ सामावलेले आहेत आणि त्या दोन्ही अर्थांनाही अंगभूत अशा खास त्यांच्याच विविध रंगछटाही आहेत.

अर्थ या शब्दाचा एक अर्थ म्हणजे धनसंपत्ती.आणि दुसरा अर्थ आशय.

या दोन्ही अर्थांचे विविध पैलू उलगडून दाखवणारे इतर असंख्य शब्दही आकाराला आलेले आहेत आणि त्या शब्दांतही ‘अर्थ’ आहेच. अर्थपूर्ण शब्दांचं हे फुलणं पाहिलं की एक सुंदर दृश्य माझ्या मनात अलगद तरळू लागतं. एखादं बी जमिनीत पेरावं तसा समजा एखादा शब्द पेरता आला असता तर तो अंकुरल्यानंतर त्याला कोवळी पालवी फुटावी आणि त्याच्या छोट्या छोट्या डहाळ्यांवर असंख्य शब्दफुले उमलावीत तसंच काहीसं ते दृश्य अर्थ शब्दाला सर्वार्थाने सामावून घेतेय असे जाणवत रहाते.’अर्थ’ शब्दाच्या संयोगाने आकार घेतलेले असंख्य शब्द पाहिले की त्यांना दिलेली ही शब्दफुलांची उपमा कशी समर्पक आहे हे लक्षात येईल.

अर्थ या शब्दाच्या संयोगातून जन्माला आलेले अनेक अर्थपूर्ण शब्द अर्थ या शब्दाचे सौंदर्य अधिकच खुलवत रहातात.अर्थ शब्दाच्या ‘धन’ ‘संपत्ती’ या अर्थाशी इमान राखत अर्थशास्त्र, अर्थसंकल्प,अर्थभान,अर्थसंचय सारखे असंख्य शब्द आपापल्या वेगवेगळ्या अर्थ आणि रंगांच्या छटांनी अर्थपूर्ण झालेले आहेत. या शब्दाचे आशय, अभिप्राय, कस हे अर्थरंग सांभाळत असतानाच स्वतःच्या वेगळ्या छटाही कौतुकाने मिरवणाऱ्या सार्थ,परमार्थ,स्वार्थ,कृतार्थ, निरर्थक,सार्थक, यासारख्या असंख्य शब्दांची खास त्यांची अशी वैशिष्ट्येही आहेतच. उदाहरणार्थ ‘निरर्थक’ हा शब्द.या शब्दाचा अर्थ उलगडून दाखवण्यासाठी अर्थशून्य, अर्थहीन,अनर्थक, व्यर्थ, पोकळ, वायफळ, भाकड, अकारण, अनावश्यक असे अनेक शब्द दिमतीला हजर होतात.सार्थ या शब्दाचा अर्थ अर्थासह,अर्थयुक्त यासारखे शब्द सोपा करुन सांगतात.स्वार्थ या शब्दाचे स्पष्टीकरण देणारेही मतलब, स्वहित,आत्महित,स्वसुख, आपमतलबीपणा असे अनेक शब्द आहेत.

एखाद्या शब्दाचे असंख्य पैलू उलगडून दाखवण्यासाठीच अगणित म्हणी रुढ झालेल्या असणं ऐकतानाही  अविश्वसनीय वाटेल पण ‘स्वार्थ’ या शब्दाला हे भाग्य लाभलेलं आहे.याचं प्रत्यंतर देणाऱ्या…’आवळा देऊन कोहळा काढणे’, ‘आपल्याच पोळीवर तूप ओढून घेणे’, ‘तुंबडी भरणे’,’आधी स्वार्थ मग परमार्थ’, ‘तळे राखी तो पाणी चाखी’, ‘आप मेले जग बुडाले’, ‘कामापुरता मामा’,’गरज सरो न् वैद्य मरो’ या आणि अशाच कितीतरी..!

हे पाहिले की भाषेचे नेमके सौंदर्य अशा अनेक शब्दफुलांच्या सौंदर्यातच सामावलेले आहे याची प्रचिती येते.मराठी भाषेचे अनेक प्रकारचे भाषालंकार,अर्थालंकार आहेत.यातील अनेक भाषालंकारांमधील ‘अर्थांतरन्यास’ या अलंकाराच्या रुपाने ‘अर्थ’ या शब्दाच्या सौंदर्यालाही खास सन्मान मिळालेला आहे..!

‘अर्थ’ या शब्दाला हिंदू तत्वज्ञानातही विशेष महत्त्व आहे. हिंदू धर्मतत्वज्ञान मानवी जीवनाचा अर्थ म्हणजेच पुरुषार्थ प्रदान करते. अशा पुरुषार्थाचे चार घटक धर्म,अर्थ, काम न् मोक्ष असे आहेत. म्हणजेच अनुक्रमे कर्तव्य, साफल्य, आनंद आणि मुक्ती ! यातील साफल्य या अर्थाने अर्थ हा शब्द माणसाच्या आयुष्याचे मर्मच अधोरेखित करतो.

मराठी भाषेचे सौंदर्य खुलवलेय ते अशाच असंख्य शब्दांनी ! त्यातही त्याच्या वर उल्लेखित सर्व विशेष आणि विविध कारणांमुळे मला सर्वार्थाने ‘अर्थपूर्ण’ भासतो तो ‘अर्थ’ हाच शब्द..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 17 – उपदेश ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र आणि श्री रामकृष्ण यांची पहिली भेट १८८१ च्या डिसेंबरमध्ये दक्षिणेश्वरला झाली. ‘मन चलो निज निकेतने’, म्हणजे, ‘हे माझ्या मना आपल्या घरी परत चल’,आणि ‘जाबे की दिन अमार विफले चलीये’, म्हणजे, ‘माझे सारे दिवस असे व्यर्थच जाणार काय? अशी दोन बंगाली गीतं नरेन्द्रने मोठ्या आर्ततेने म्हटली आणि नरेंद्रचे व्यक्तिमत्व वेगळेच होते, कलकत्त्याच्या भौतिक शहरातून आलेला असूनही आध्यात्मिक धारणा असलेला नरेंद्र बरोबरच्या मित्रांमध्ये  वेगळा उठून दिसत होता. जे रामकृष्णांना  अत्यंत भावले होते. नरेंद्रचे भजन म्हणणे इतरांहून निराळे होते. त्या आर्त स्वरांनी श्री रामकृष्णांच्या अंत:करणाची तार छेडली गेली होती. “पहा पहा साक्षात सरस्वती त्याच्या उज्ज्वल दर्शनात प्रकट होत आहे”. असे उद्गार त्यांनी यावेळी भक्तांसमोर काढले होते.

नरेंद्रचे सुप्त आध्यात्मिक गुण रामकृष्णांनी ओळखले होते. त्यांनी नरेंद्रला विचारले, “रात्री झोपी जाताना डोळ्यासमोर प्रकाश दिसतो का?” नरेंद्र म्हणाला, “हो दिसतो”. त्यावरून रामकृष्णांनी ओळखले की हा जन्मत:च ध्यानसिद्ध आहे. पहिल्या भेटीतच रामकृष्ण नरेंद्रला म्हणाले होते, “किती उशीर केलास? प्रपंचात बुडालेल्या या सार्‍या लोकांच्या कथा ऐकून माझे कान किटून गेले आहेत. माझ्या खोल मनातील अनुभव ऐकून समजून घेणार्‍याची मी कधीची वाट पाहतोय. हे प्रभो मी जाणून आहे, की नारायणाचा अवतार असा जो प्राचीन नर ऋषि तो तू आहेस आणि मानव जातीच दु:ख हरण करण्यासाठी या पृथ्वीवर जन्म घेऊन आला आहेस”. आपलं असं कौतुक ऐकून नरेंद्र गोंधळून गेला होता.      

पुढे अजून भेटी झाल्या. रामकृष्णांना नरेंद्रची भेट रोज व्हावी असे वाटू लागले. श्रीरामकृष्णांच्या  रूपाने देव पाहिलेली व्यक्ती आपल्याला अखेर भेटली याचा आनंद नरेंद्रला झाला होता. वेगवेगळे अनुभव येत होते. नरेंद्र ब्राम्ह समाजात जात होताच. मूर्तिपूजा निषेध हा तिथल्या सिद्धांतापैकी एक सिद्धांत होता. इकडे श्री रामकृष्ण तर, कालिमाता मानणारे, तिन्ही त्रिकाल  पूजाअर्चा करणारे मूर्तिपूजक होते. मनात द्वंद्व चालू होतच. या सगळ्याचा मेळ लावायचा नरेंन्द्र प्रयत्न करत होता. काहीतरी सखोल अनुभूति त्यांच्यात आहे हे जाणवत होते. पवित्र अंत:करणाचा, सर्व मानवजातीने आदर करावा अशा योग्यतेचे ते आहेत असे मनाला पटले आणि नरेन्द्रने त्यांना मनोमन नमस्कार केला. जवळ जवळ चार वर्षे नरेंद्रला श्रीरामकृष्णांच्या सहवासात येऊन झाली होती.

श्रीरामकृष्ण यांच्याकडे रोज भक्तगण येत असत. त्यांच्याशी ते संवाद साधत असत, एखादा अवघड सिद्धांत स्पष्ट करताना ते छोट्या छोट्या कथांचा वापर करत आणि समजावून  सांगत असत. त्यांचे बोलणे हे नुसत्या ग्रंथांतील सिद्धांताच्या आधारवर नसे तर ते स्वत:च्या अनुभवावर आधारित असायचे. एकदा असेच भक्तांशी संवाद चालू असताना श्रीरामकृष्ण सांगत होते, “लोक आपल्यावर टीका करतील, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करावे. आणि आपला मार्ग सोडू नये. कुत्री भुंकत असतात पण हत्ती आपल्या मार्गाने जात राहतो तशी आपली वृत्ती असावी”. असे विवेचन चालू असताना त्यांनी नरेंद्रला विचारले, काय नरेन तुला काय वाटतं ?ईश्वराची भक्ती करणार्‍यांची संसारी लोक त्यांच्या मागे निंदा नालस्ती करतात. तुझ्या माघारी लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले तर, तू काय करशील”? नरेन्द्रने उत्तर दिले, “ ती माणसं म्हणजे,उगाच भुंकणारी कुत्री आहेत. असं म्हणून मी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीन”. यावर श्री रामकृष्ण म्हणतात, “नाही नरेन एव्हढी कठोर प्रतिक्रिया होता कामा नये. अचेतन सचेतन अशा सार्‍या चराचरात तो ईश्वर भरून राहिलेला आहे. तेंव्हा कोणी  कसाही वागो, त्याच्याबद्दल योग्य तो आदर आपण ठेवला पाहिजे”.लोकांच्या टीकेकडे आपण दुर्लक्ष करावे. खरे पण त्या टीका करणार्‍यांबद्दल ही आपण आपल्या मनात दुजाभाव धरू नये. जो वाईट वागतो, त्याचेही आपण हिताच चिंतावे. असा उपदेश यातून दिसतो.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कव्हर… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆

?  विविधा ?

☆ कव्हर… ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆ 

आज खूप वर्षानंतर पुस्तक विकत घेण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात [ दालनात} गेले होते.

गेली अनेक वर्षे पुस्तकांना जणू पूर्णविराम द्यावा लागला होता, कारण तो दिला नसता तर माझ्या चिमुकल्यांमुळे एका पुस्तकाच्या अनेक प्रती तयार झाल्या असत्या….

आज मात्र अनेक वर्षांनी ह्या पुस्तकांना पाहून खूप आनंद होत होता. प्रत्येक पुस्तकांवरून नकळत हात फिरवला जात होता, अचानक लहानपणीची एक घटना आठवली. मी खूप छोटी असेन, मला माझे बाबा पहिल्यांदा पुस्तकांच प्रदर्शन बघायला घेऊन गेले होते.

खूप पुस्तके होती वेगवेगळ्या लेखकांची, वेगवेगळ्या विषयांची, काही संग्रही, काही लहानमुलांची, काही थोर नेत्यांची, मला त्यातले काहीही कळत नव्हते ती गोष्ट वेगळी.

माझे बाबा मात्र मला प्रत्येक लेखकाची माहिती देत होते. माझं लक्ष मात्र त्यांच्या बोलण्याकडे कमी, आणि पुस्तकांच्या छान रंगीत रंगीत आवरणावर जास्त होते. काहींवर सुंदर सुंदर पऱ्या होत्या, तर काहींवर अक्राळविक्राळ राक्षस,काहींवर हत्ती, उंट, सिंह ह्यांची चित्र होती तर काहींवर सिंड्रेलाची.

बाबांनी मला दोन पुस्तकं निवडायला सांगितली. मी अशी पुस्तकं निवडली ज्याची चित्र मला फार आवडली. ती कोणी लिहिली आहेत, कोणत्या विषयांवर लिहिली आहेत ह्याच्याशी माझे काही देणे घेणे नव्हते. त्यावेळी बाबा काहीच बोलले नाहीत. घरी आल्यावर मात्र त्यांनी मला विचारले की मी ती पुस्तक का निवडली ?? मी म्हणाले काही नाही त्याची चित्र बघा ना किती छान आहेत ती चित्र मला खूप आवडली म्हणून ती निवडली.

असच काहीस माणसांच्या आयुष्यात घडतं नाही. आपण माणसांचे चेहरे बघून त्यांची निवडत करत असतो. त्यांच्याशी मैत्री करत असतो, नाती जोडत असतो, त्यांच्या मनात काय विचार चालू आहे हे कधी डोकावून पहावे अस वाटतच नाही आपल्याला. त्यांचा पेहेराव, त्यांचा चेहरा, त्यांच ते शुगर coated बोलणे हे पाहूनच त्यांच्या बद्दल एक मत बनवून टाकतो.

आणि जसं पुस्तकं वाचायला सुरुवात केल्यावर आपल्या लक्ष्यात येत की, पुस्तक अजिबात वाचनीय नाही. तसं काहीसं माणसांच्या बाबतीत होत. एखाद्याचा चेहरा इतका प्रेमळ, दयाळू, सोज्वळ सज्जन असतो अगदी gentleman वाटतो. पण प्रत्यक्षात तो तिरसट, क्रूर, रागीट असतो. अति गोड बोलणार माणूस आतून किती धूर्त, लबाड आहे हे कळतच नाही आपल्याला.

फरक फक्त इतकाच असतो की पुस्तकं आपण न वाचता, आवडले नाही म्हणून ठेऊ शकतो.पण नाती नाही हो वगळता येत. ती निभावून न्ह्यावी लागतात.

पण काही वेळा असं ही होत की, पुस्तक चांगल की वाईट आहे हे आपल्याला काही पानं वाचल्यावर लक्ष्यात येतं, एखाद्या पुस्तकाला लेखकांनी अचानक यू टर्न दिलेला असतो. आपण हे पुढे आता अस होईल अस काहीतरी विचार करत असतो पण लेखकाने काहीतरी वेगळेच लिहिलेले असते… आपल्याला वाटत असतं की ह्यातला नायक किती रागीट आहे, तो आता तिचा शेवट करणारच पण पुढे वाचल्यावर कळते की तो असा का बनला. हां काही पुस्तक अपवाद आहेत म्हणा.

माणसांच्या मनांत नक्की काय चालू आहे हे आपल्याला त्याला समजून घेतल्याशिवाय कळत नाही. त्याचा स्वभाव असा का बनला हे आपल्याला त्याची बाजू समजून घेतल्याशिवाय कळत नाही.

त्याच्या सहवासात काही दिवस घालवावे लागतात त्याच्या मनात उतरून स्वतः ला त्याच्याजागी ठेऊन विचार करावा लागतो तेव्हां कुठे थोडे कळते.

खूप जणांना सवय असते एखाद्या बद्दल पट्कन मत बनवायची. खूप जणांना असं वाटतं की आपण माणसे परफेक्ट ओळखू शकतो. पुस्तकांची cover बघून त्यातली गोष्ट ओळखू शकतो, अगदी तशी. पण आपण स्वतःला तरी कितपत ओळखतो ही आपली एक शंका आहे मला.

आपण स्वतः च्या चेहर्‍यावर, मनांवर cover घालण्यात इतके बिझी असतो की आपल्याला ही कळत नाही की किती थर चढले आहेत. कधी अहंकाराचा, तर कधी लोभाचा, कधी दुःखी नसताना आपण किती दुःखी आहोत हे दाखवण्याचा तर कधी खूप कष्ट, अपमान, हाल सहन करूनही सुखी असण्याचा.काही वेळेला आपल्याला जाणून बुजून cover घालावे लागते आपल्या मनावर, चेहर्‍यावर.

मित्रानो मला पुस्तकं घेतांना ही जाणवलेली गोष्ट मी आज तुमच्या समोर मांडली.. माझं फक्त एवढेच म्हणणे आहे की कोणाही बद्दल पट्कन मत बनवू नका. दोन्ही बाजू समजून घ्या. पुस्तकाच cover बघून जसं पुस्तक निवडायचे नसते तसच माणसाचा चेहरा बघून त्याला निवडू नका.

 

©  सौ. श्रेया सुनील दिवेकर

मो 9423566278

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी एक मतदार… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? विविधा ?

मी एक मतदार… अनामिक ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

आजोबांनी कष्ट करून विकत घेतलेली, कसलेली, माझ्याच आज्याची शेती माझ्या बापाच्या नावावर करावी म्हणून तलाठी सज्जात गेलो . . .

तलाठ्यानं सांगितलं –

काम करू पण,

देणार किती ?

मला वाटलं शेती आमची,

बाप माझा,

आजा माझा.

मग याला का पैसे द्यायचे ?

 

तलाठ्याची तक्रार करावी म्हणून पोलिस स्टेशनला गेलो.

पोलीस म्हणाले –

 गुन्हा दाखल करू, तपास करू पण . . .

आमच्या चहा पाण्याचं काय ?

 

मला पुन्हा राग आला.

यांना तर, सरकार म्हणजेच मी पगार देतोय मग पुन्हा हे चिरीमिरी का मागत असतील.

 

म्हटलं हे आमदारांच्या कानावर टाकू,

आमदार म्हटले . . .

 त्याची गडचिरोलीला बदली करू,

त्याला निलंबित करू,

मंत्र्यांना भेटू पण . . .

वजन ठेवल्या शिवाय फाईल पुढं जातच नाही.

 

मला वाईट वाटलं.

यांना तर मी मतदान केलं होतं.

 

वाटलं कोर्टात जाऊ . . .

गेलो.

तिथं गेल्यावर कळलं की,

तिथं एक आज-उद्या मरेल अशी म्हतारी आली आहे.

 

तिच्यावर तरुणपणी अत्याचार झाला होता. त्या मॅटरची तारीख होती.

अजून निकाल लागला नव्हता.

शिवाय निकाल कसा लागेल याची खात्री नव्हती.

 

म्हटलं हे एखाद्या . . . पत्रकार,

लेखक,

कवीला सांगावं . . .

मन हलकं करावं ! आपल्या प्रश्नांना ते आवाज देतील.

 

तिकडे गेलो s s

तर सगळेच म्हणाले,

पेन आमच्या हातात असला तरी,

त्यातली शाई आम्ही विकली आहे.

आम्ही तसं लिहू शकत नाही.

आमचे हात अन . . .

पेन बांधलेले आहेत.

 

मला याचा प्रचंड राग आला होता.

म्हणून एका साधू कडे गेलो.

वाटलं तेवढीच आत्मशांती मिळेल.

मठावरचे सेवेकरी म्हणाले . . .

उद्या या !

 

सध्या भाऊसाहेब,

 P I साहेब,

आमदार साहेब,

पत्रकार साहेब,

लेखक,

कवी आले आहेत.

महाराज त्यांच्यासोबत बिझी आहेत,

नंतर . . .

त्यांच्या सोबत जेवायला बसणार आहेत.

आज ते तुम्हाला टाईम देणार नाहीत.

 

अखेर एक भक्त भेटला, म्हणे भाऊ

पेपर बिपर वाचतोस कि नाही…

प्रवाहाविरुद्ध  जायच नाही..

गंध नाही; तावीत नाही; धागा नाही…

कुठलाही झेंडा  नाही…

…अस चालणार नाही

पुस्तकातल  पुस्तकातच बरं…

आजा , जमीन तुझी असली तरी देशाचं ;धर्माच अन् देवाचं देणं द्यावच लागेल…

 

माझा सगळ्यांवरचा विश्वास उडाला होता.

म्हटलं जनतेच्या दरबारात जाऊ …!

 

लोकांसमोर गेलो, लोकांना हे सांगितलं.

लोकं म्हटली हा येडा झालाय् . . . . .

हल्ली काही बरळतोय् !

नंतर कळलं . . .

लोकं गुलाम झाली आहेत !

लाचार झाली आहेत !

 

क्षणभर वाईट वाटलं.

 

मी करणार तरी काय होतो.

 

त्यांच्यात सामील व्हावं कि मरावं ?

कि मारावं यांना . . .

😢 😢 ज्यांनी लिहिले त्यांना सलाम

 

– मी एक मतदार !

(या देशाचा मालक)

संग्राहक – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares