मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाग्यवंत… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ भाग्यवंत… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

वृत्त: आनंदकंद

(गागाल गालगागा)×२

व्हावी क्षणास माझ्या, बाधा निळी अनंत

ओंजळ कृतार्थ व्हावी,आयुष्य भाग्यवंत !

 

कंठात दाटलेला,हा हुंदका कुणाचा?

भिडती अजून ह्रदयी, उद्ध्वस्त ते दिशान्त !

 

पंखांस ज्ञात माझ्या ,त्यांचा किती अवाका

स्वप्नी भल्या पहाटे, चळवी तरी दिगंत !…

 

तिमिरास तिमिर घेतो, कवटाळुनी उराशी

होतो जरा जरासा, काळोख तेजवंत !…..

 

रानात दाटलेली,हिमरात्र आरपार….

सूर्योदयात एका, फुलतो कधी वसंत !

 

लावण्य जीवनाचे, भोगून घे उदंड…

प्रेतास काय साजे, शृंगार शोभिवंत !

 

अंतागणीक माझ्या,मी जन्मतो नव्याने

आरंभ हा नवा अन् आता नवीन अंत !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ #120 – विजय साहित्य – भीमा तुझ्यामुळे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 120 – विजय साहित्य ?

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

☆ भीमा तुझ्यामुळे…!  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शिका, लढा, नी, संघटीत व्हा

कळले रे भीमा तुझ्या मुळे.

माणूस होतो, माणूस राहू

शिकलो रे ,भीमा तुझ्या मुळे…! १

 

चवदार तळ्याची घटना

तरलो रे, भीमा तुझ्या मुळे

समाजातले भेदाभेद ही

जाणले रे, भीमा तुझ्या मुळे…! २

 

समाज विघातक रूढींचे

निर्दालन भीमा तुझ्या मुळे

पाखंडी पणा, कर्मकांडाचा

उमजला, भीमा तुझ्या मुळे…! ३

 

लोकशाहीचा देश आपुला

एकी झाली, भीमा तुझ्या मुळे

समाज बांधवा दिशा मिळाली

जागृती ही , भीमा तुझ्या मुळे…! ४

 

संविधान राज्य घटनेचे

साकारले,भीमा तुझ्या मुळे

आचार आणि विचार मोठे

आकारले, भीमा तुझ्या मुळे…! ५

 

अन्यायाचा प्रतिकार करू

शिकलो रे, भीमा तुझ्या मुळे

कमवू आणि, आधार होऊ

जगलो रे, भीमा तुझ्या मुळे…! ६

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दुरावा… ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ दुरावा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

काळ नाही थांबणारा सारखा तो चालतो

वाटत्याची कोणती हे तो कुणाला सांगतो

 

माणसाला माणसाचा भरवसा आहे कुठे

संशयाने ग्रासलेल्या जिवलगा शी भांडतो

 

ग्रासलेला संभ्रमाने खेळ तेव्हा थांबतो

जिंकलेला डाव जेव्हा जिंकणारा हारतो

 

बेगडी प्रेमात होती गुंतली काही मने

हाल झाले काय त्यांचे हे जमाना पाहतो

 

का मला निक्षून काही बोलशी तू हे प्रिये

हा तुझा आवाज नाही आतला मी जाणतो

 

मागताना न्याय थोडा संकटानी घेरले

कोणता आहे पुरावा सांग येथे जाचतो

 

मांडला छळवाद आहे वास्तवाने सारखा

मी भविष्यालाच आता रोज माझ्या पाहतो

 

या फुलांचा त्या फुलांचा रंग आहे वेगळा

एकतेचा हार गुंफू दाखवाया लागतो

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ डाॅ.आंबेडकर ☆ कै विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

कै विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

? कवितेचा उत्सव ?

☆ डाॅ.आंबेडकर ☆ कवी कुसुमाग्रज ☆

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

सदाशिवाच्या शूलापरि तो असा परजला

वादळ पिऊनी तो जलधीसम असा गरजला

मेघ होऊनी तो धरणीला असा भेटला

वीज होऊनी तिमिरावरती असा पेटला

वज्रबलाने शत शतकांचा अडसर तुटला

मृत मातीवर नव्या मनूचा  अंकुर फुटला

– कै विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महामानव… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ महामानव… ☆ सौ राधिका भांडारकर

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

धम्मम शरणं गच्छामी….!!

 

तूच महामानव।तूच महानायक।

तू असे क्रांतीसूर्य। बहिष्कृतांचा उद्धारक।

 

तू ज्ञानवंत मनोज्ञ। स्त्रियांचा मुक्तीदाता।

मानवतेचा कैवारी।  कनिष्ठांचा ऊद्गाता।

 

भासली मनुस्मृती ।असमानतेची धुळवड।

करुनी तिचे दहन।भरली स्त्रीमुक्तीची कावड।

 

केली धडपड। क्षणभर नसे विराम

जागा करावया।हिंदुह्रदयीचा  राम।

 

लढा समतेचा। लढा मानव्याचा

सत्याग्रह चवदार।  हक्क पाण्याचा।

 

दुराग्रही इमारतीला। विचारांचा सुरुंग

धडधडलाआणि।फोडला धर्माचा तुरुंग।

 

काढली कवचे । हिंदु धर्माची

स्वीकारला धम्म। जिथे चाड शूद्राची।

 

ओळख भीमाची। घटनेचा शिल्पकार

वंदन महामानवा। तूच समतेचा चित्रकार।।

 

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #108 – भीमशक्ती जगाला कळावी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 108 – भीमशक्ती जगाला कळावी…

(14 एप्रिल 1891 – 6 डिसेंबर 1956)

माणसाने माणसे जपावी

भीमशक्ती जगाला कळावी…|| धृ. ||

 

शिकावे लढावे धम्मवाणी

दीन दलितांची जिंदगानी

नको अस्पृश्य विश्वात कोणी

मान सन्मान जागा मिळावी…|| १. ||

 

माणसें वाचली कौतुकाने

सुख दुःखे झेलली भीमाने

तोडली बंधने कर्मठांची

ध्येयवादी धोरणे दिसावी…|| २. ||

 

रमाई भीमाई ध्यास सारा

संविधानी दिला एक नारा

विश्व केले खुले नीलरंगी

लोकशाही घटना रूजावी…|| ३. ||

 

नको संकटे वळचणीला

दिशा लाभली चळवळीला

काय सांगू थोरवी भीमाची

नाव घेता मस्तके झुकावी….|| ४. ||

 

© सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रामनवमी… ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆

सुश्री उषा जनार्दन ढगे

 ? कवितेचा उत्सव  ? 

☆ रामनवमी… ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

चैत्र शुध्द नवमीचा तो शुभदिवस उगवला

प्रसवी कौसल्या राजा दशरथासी पुत्र जाहला

राम जन्मला गं सखी राम जन्मला

साक्षात् श्रीविष्णूने अवतार सातवा घेतला..

 

जन्म होता प्रभू श्रीरामचंद्राचा

प्रजाजनांना अती आनंद जाहला

जल्लोषसोहळ्यात नटली आयोध्यानगरी

रंगोली तोरणे पताकांनी सजविले पावनभूमीला..

 

लाडात वाढला अंगाखांद्यावरी रघु सावळा

पूनमचंद्र नभीचा खेळावयास मागितला

बाळलीला दावी त्रिमातांचा लडिवाळा

हिरेमाणिकांत जसा नीलमणी शोभला..

 

माता कौसल्येने गाईले अंगाई गीत

सावळा राम रत्नमंचकी शांत झोपला

पाहूनी निष्पाप रुप ते देखणे रघुरायाचे

गगनी निशाकर तो मेघाआड लपला..

 

प्रारब्ध ना टळले कुणाच मानवाला

ग्रहण लागले जसे देवदाम्पत्याला

वनवास भोगूनी..दुष्ट रावणाचा वध करूनी

लक्ष्मण मैथिलीसह रघुराम स्वगृही परतला..

 

एकवचनी एकबाणी एकपत्नीव्रत राखिले तयाने

त्या रघुरायास भक्तीभावे चिंतूनी आठवावे

स्वबलावरी ज्याने आदर्श रामराज्य प्रस्थापिले

रामनवमीच्या सुदिनी त्या प्रभू श्रीरामास पूजावे..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 127 ☆ नववर्ष येवो असे… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 127 ?

☆ नववर्ष येवो असे… ☆

वृत्त- वल्लभा🍀

चैत्रातली ही पालवी वा-यावरी झुलते अशी

सृष्टीतला हा सोहळा डोळ्यामधे मिरवू कशी ?

 

रंगीत या पानाफुला सांगेन मी त्या भावना

मेंदी अशी खुलणार की हातावरी नवचेतना

 

नववर्ष हे येईल ही सारे जुने सांगायला

गुलमोहरा, तो मोगरा येईल ही महकायला

 

येथे घडो आता पुन्हा काही पुराणे या भूवरी

त्या  वल्लरी बहरोत अन येवो नवा  धन्वंतरी

 

हा पाडवा येवो अशी घेऊन काही देणगी

सा-या जगा लाभो पुन्हा ती औषधी हो बहुगुणी

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन जगता जगता… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन जगता जगता… ☆ सौ राधिका भांडारकर

 मागे वळून बघताना

 आठवतात क्षण संघर्षाचे

किती बोचले काटे

किती वेचले खडे संकटाचे..

 

पोळले कितीदा तरी

ज्यांना  मानले आपले

ठेवला विश्वास निस्सीम

त्यांनीच जेव्हा फसवले…

 

नव्हती फार मोठी झेप

नव्हते चुंबायाचे आकाश

मूठभर सुखशांतीच्या कल्पना

वाट चालायची होती सावकाश….

 

सोसली निंदा ऐकले टोमणे

काळजात किती घरे पडली

नसता कसलेही कुणाचे देणेघेणे

नकळे बोलणी ही कशास साहली…

 

सदा वागले विवेका स्मरुन

सुविचारा नाही त्यागिले

नाही गमावला आत्मविश्वास

निर्धाराने तमास ऊजळविले…

 

होती कणखर रथाची दोन चाके

निभावल्या सार्‍या वळणवाटा

आता निवांत विसाव्याच्या क्षणी

कशास आठवाव्या सुटलेल्या जटा…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 133 ☆ गुलामी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 133 ?

☆ गुलामी ☆

गुलामी मी तुझी केली मला सांभाळ आयुष्या

छळाया गाठतो कायम तुझा वेताळ आयुष्या

 

मिळाला जन्म भूवरती किती आनंदलो होतो

इथे तर स्वर्ग नाही रे इथे पाताळ आयुष्या

 

तनावर मारला आहे फवारा अत्तराचा मी

मनाच्या सागरी आहे तरीही गाळ आयुष्या

 

दिले ना पंख तू मजला गगन मी भेदले नाही

जुळेना ही तुझी माझी कशी रे नाळ आयुष्या ?

 

शमवण्या आग पोटाची करावे लागते सारे

सुखाने घातले पायी कुठे मी चाळ आयुष्या

 

जिथे जावे तिथे अडचण उभी ही ठाकते आहे

कशी ही नांगरावी मी भुई खडकाळ आयुष्या

 

किती सोसायची दुःखे सुखाचे दिवस हे काही

दिवाळी ईदच्या सोबत असे नाताळ आयुष्या

 

तख़ल्लुस मागते आहे मला मक्त्यात ही कायम

समजती लोक तर येथे मला नाठाळ आयुष्या

 

हरावे मी कशासाठी तुझ्या पाहून ह्या ज्वाळा

सुवर्णाचीच ही काया कितीही जाळ आयुष्या

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares