सुश्री उषा जनार्दन ढगे
कवितेचा उत्सव
☆ रामनवमी… ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆
चैत्र शुध्द नवमीचा तो शुभदिवस उगवला
प्रसवी कौसल्या राजा दशरथासी पुत्र जाहला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
साक्षात् श्रीविष्णूने अवतार सातवा घेतला..
जन्म होता प्रभू श्रीरामचंद्राचा
प्रजाजनांना अती आनंद जाहला
जल्लोषसोहळ्यात नटली आयोध्यानगरी
रंगोली तोरणे पताकांनी सजविले पावनभूमीला..
लाडात वाढला अंगाखांद्यावरी रघु सावळा
पूनमचंद्र नभीचा खेळावयास मागितला
बाळलीला दावी त्रिमातांचा लडिवाळा
हिरेमाणिकांत जसा नीलमणी शोभला..
माता कौसल्येने गाईले अंगाई गीत
सावळा राम रत्नमंचकी शांत झोपला
पाहूनी निष्पाप रुप ते देखणे रघुरायाचे
गगनी निशाकर तो मेघाआड लपला..
प्रारब्ध ना टळले कुणाच मानवाला
ग्रहण लागले जसे देवदाम्पत्याला
वनवास भोगूनी..दुष्ट रावणाचा वध करूनी
लक्ष्मण मैथिलीसह रघुराम स्वगृही परतला..
एकवचनी एकबाणी एकपत्नीव्रत राखिले तयाने
त्या रघुरायास भक्तीभावे चिंतूनी आठवावे
स्वबलावरी ज्याने आदर्श रामराज्य प्रस्थापिले
रामनवमीच्या सुदिनी त्या प्रभू श्रीरामास पूजावे..!
© सुश्री उषा जनार्दन ढगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈