मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नियमांस सक्त येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ नियमांस सक्त येथे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : आनंदकंद – गागाल गालगागा गागाल गालगागा)

नियमांस सक्त येथे अपवाद फार होते

दाते भिकार काही याचक उदार होते !

 

कळपात होयबांच्या शिरलो कधीच नाही

मानी बुलंद माझे काही नकार होते !

 

तपसाधना युगांची नाही फळास आली

होण्यास संधिसाधू…साधू तयार होते !

 

संग्राम घोर होता…संताविरुद्ध संत

श्वासात रोखलेले काही थरार होते !

 

सरला वसंत आता अधिराज्य पावसाचे

जलशात बेडके पण कोकिळ फरार होते !

 

झाले मरण सुगंधी अंतिम तुझाच घाव

किरकोळ बेहिशेबी बाकी प्रहार होते !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 104 ☆ माझ्या आईचे गुणवर्णन… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 104 ? 

☆ माझ्या आईचे गुणवर्णन..… ☆

माझ्या आईचे गुणवर्णन

मी कसे ते करावे

शब्दात कसे तोलावे.. ०१

माझ्या आईचे गुणवर्णन

शब्दातीत आहे आई

बहुगुणी प्रेमळ माई..०२

माझ्या आईचे गुणवर्णन

असह्य वेदना तिला झाल्या

न मी पहिल्या, न अनुभवल्या..०३

माझ्या आईचे गुणवर्णन

आई प्रेमाचा निर्झर

आई सौख्याचा सागर..०४

माझ्या आईचे गुणवर्णन

कोणते कोणते दाखले द्यावे 

ऋणातून कैसे मुक्त व्हावे..०५

माझ्या आईचे गुणवर्णन

पवित्र तुळस अंगणातली

मंदिरात समई तेवली..०६

माझ्या आईचे गुणवर्णन

मजला न करवे आता

देवा नंतर, तीच खरी माता ..०७

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ खेळ… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ खेळ… ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

संध्याकाळी

आयुष्याच्या गडद सावल्या लांबत गेल्या संध्याकाळी

आठवणींच्या तळ्यात सगळ्या मिसळत गेल्या संध्याकाळी

 

स्वप्नामधल्या ठोस प्रतिमा आदर्शाच्या मनात होत्या

काळासोबत फिरता फिरता वितळत गेल्या संध्याकाळी

 

सहजपणाने जगतानाही संघर्षाला भिडणे झाले

चालत असता अवघड वाटा चकवत गेल्या संध्याकाळी

 

अनंतकोटी ब्रम्हांडाची ओळख पुरती झाली नाही

जगण्यामधल्या मोहक बाबी फसवत गेल्या संध्याकाळी

 

अंधारातच अंदाजाने दिशा शोधल्या मानवतेच्या

मग प्रेमाच्या प्रकाश रेषा उजळत गेल्या संध्याकाळी

 

संसाराचा खेळ मांडला तो तर होता प्रभावशाली

प्रतिमा त्याच्या डोळ्यादेखत सरकत गेल्या संध्याकाळी

 

सुखदुःखाची करत बोळवण तडजोडीच्या घटना घडल्या

झंजावाती वादळात त्या उधळत गेल्या संध्याकाळी

 

खरे काय ते अखेर कळले अनुभवले ते मृगजळ होते

लोचनातल्या आसवधारा बरसत गेल्या संध्याकाळी

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विडंबन काव्य… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

विडंबन गीत… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

(मूळ गीत:घरात हसरे तारे असता, मी पाहू कशाला नभाकडे)

विडंबन:

घरात असले खाणे असता

मी जाऊ कशाला उडप्याकडे

मी जाऊ कशाला उडप्याकडे

 

चकल्यांचे ते मला खुणवणे

चिवड्याचे कधी मारू बकणे

शेवेमध्ये जीव गुरफटे हात जातसे पुढे पुढे

मी जाऊ कशाला उडप्याकडे

 

गोल गोल ते लाडू पळती

काजू कतली वरची चांदी

कोर जशी ती करंजी बघता ढगाआड ग चंद्र दडे

मी जाऊ कशाला उडप्याकडे

 

खारी बुंदी न् माहीम हलवा

चवीपुरता ग तो ही फिरवा

डब्यातले ते ताटी पडता तृप्तीचे मग पडती सडे

मी जाऊ कशाला उडप्याकडे

 

संमेलन हे खाद्यपुरीचे

प्रयोग सगळे पाककलेचे

दीपावलीच्या आनंदाला याचमुळे ग भरती चढे

मी जाऊ कशाला उडप्याकडे

 

घरात असले खाणे असता

मी जाऊ कशाला उडप्याकडे?

 

सुहास रघुनाथ पंडित. सांगली.

9421225491

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 126 – माय माझी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 126 – माय माझी ☆

माय माझी बाई। अनाथांची आई।

सर्वा सौख्यदाई। सर्वकाळ।

 

घरे चंद्रमौळी। शोभे मांदियाळी।

प्रेमाची रांगोळी। अंगणी या।

 

पूजते तुळस। मनी ना आळस।

घराचा कळस। माझी माय।

 

पै पाहुणचार। करीत अपार।

देतसे आधार। निराधारा।

 

संस्काराची खाण। कर्तव्याची जाण।

आम्हा जीवप्राण । माय माझी।

 

गेलीस सोडूनी। प्रेम वाढवूनी।

जीव वेडावूनी। माझी माय।

 

लागे मनी आस। जीव कासावीस।

सय सोबतीस। सर्वकाळ।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रकाश वाटा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रकाश वाटा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

चालत होतो मी एकाकी आयुष्याची वाट

पसरत होता अवतीभवती अंधकार घनदाट

पूर्वांचल कधी निघेल उजळून नव्हते ठाऊक मजला

ठेचाळत धडपडत चाललो रेटीत काळोखाला ।।१।।

 

कर्म भोग हा असा न जाई भोगून झाल्याविणा

गिळेल मज अंधार परंतु राहतील पाऊलखुणा

जे होईल ते खुशाल होवो मधे थांबणे नाही

असेल संचित त्याचप्रमाणे न्यायनिवाडा होई ।।२।।

 

निश्चय ऐसा होता उठली नवीन एक उभारी

शीळ सुगंधित वाऱ्याची मज देई सोबत न्यारी

बेट बांबूचे वन केतकीचे पल्याड मिणमिणतो दीप

दूर दूर तो प्रकाश तरीही मज भासला समीप ।।३।।

 

हे देवाने जीवन आम्हा दिधले जगण्यासाठी

उषःकाल तो नक्कीच आहे अंधाराच्या पाठी

मनात आली उसळून तेव्हा उत्साहाची लाट

त्या मिणमिणत्या दीपाने मज दाविली प्रकाश वाट ।।४।।

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #148 ☆ पाडवा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 148 – विजय साहित्य ?

☆ पाडवा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

साडेतीन मुहुर्तात

असे पाडव्याची शान

व्यापाऱ्यांचे नववर्ष

वहिपुजनाचा मान….! १

 

कार्तिकाची प्रतिपदा

येई घेऊन गोडवा.

दीपावली दिनू खास

होई साजरा पाडवा. . . . ! २

 

तेल, उटणे लावूनी

पत्नी हस्ते शाही स्नान.

साडेतीन मुहूर्ताचा

आहे पाडव्याला मान. . . . ! ३

 

सहजीवनाची गाथा

पाडव्याच्या औक्षणात

सुख दुःख वेचलेली

अंतरीच्या अंगणात.. . . . ! ४

 

भोजनाचा खास बेत

जपू रूढी परंपरा.

व्यापारात शुभारंभ

नवोन्मेष स्नेहभरा.. . . . ! ५

 

ताळेबंद रोजनिशी

जमा खर्च खतावणी

पाडव्याच्या मुहूर्ताला

होई व्यापार आखणी…! ६

 

व्यापाऱ्यांचा दीपोत्सव

वही पूजनाचा थाट

येवो बरकत घरा

यश कीर्ती येवो लाट. . . . ! ७

 

राज्य बळीचे येऊदे

दिला वर वामनाने

दीपोत्सव पाडव्याला

बळीराजा पुजनाने…! ८

 

संस्कारांचा महामेरू

बलिप्रतिपदा सण

दानशूर बळीराजा

केले गर्वाचे हरण…! ९

 

तीन पावले जमीन

दान केली वामनाला

क्षमाशील सत्वशील

सत्व लावले पणाला…! १०

 

पंच महाभुती पुजा

पंचरंगी‌ रांगोळीने

पंच तत्वे नात्यातील

शुभारंभ दिवाळीने…! ११

 

काकू वहिनी मावशी

आई आज्जचे कोंदण

पती पत्नी औक्षणाने

स्नेह भेटीचे गोंदण…! १२

 

शुभारंभ खरेदीचा

वास्तू, वस्त्र, अलंकार

गृह उपयोगी वस्तू

सौख्य वाहन साकार…! १३

 

फटाक्यांची रोषणाई

पंच पक्वांनाचा घाट

नव दांपत्य दिवाळी

कौतुकाचा थाट माट…! १४

 

जावयाचा मानपान

दिन दिवाळ सणाचा

तन मन सालंकृत

सण मांगल्य क्षणांचा…! १५

 

घरोघरी उत्साहात

आनंदाची मेजवानी

आला दिवाळी पाडवा

शेती वाडी आबादानी….! १६

 

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिक्षण… अर्नोल्ड बेनेट ☆ (भावानुवाद) श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?  विविधा  ?

☆ शिक्षण… अर्नोल्ड बेनेट ☆ (भावानुवाद) श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

शिक्षणाला असते

सुरुवात,

पण कधीच नसतो

शेवट.

जितकं अधिकाधिक तुम्हाला,

होत जातं माहीत

तितकी अधिकाधिक

होते जाणीव तुम्हाला

तुमच्या माहीत नसण्याची.

शहाण्यांनाच फक्त

असतं माहीत,

किती मूर्ख, अडाणी

आहोत आपण

पण आपल्या अज्ञानाची

जाणीव

हेच तर खरोखर

असतं

खूप मोठं शहाणपण,

कारण ते ठेवतं तुम्हाला

अगदी योग्य जागी.

अहंकाराच्या स्पर्शापासून

दूर…. अगदी दूर…

आणि देतं ऊर्मी… बळ…

अज्ञाताचे प्रदेश  शोधायला.

उजेडात आणायला .

अर्नोल्ड बेनेटच्या कवितेचा स्वैर अनुवाद

भावानुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

मो. 9403310170, email-id – [email protected]  

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #133 ☆ फराळ..! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 133 ☆ फराळ..! ☆ श्री सुजित कदम ☆

(दिवाळी निमित्त एक खास कविता….!)

आई म्हंटली दिवाळीला

फराळ करू छान

फराळात चकलीला

देऊ पहिला मान..!

 

गोल गोल फिरताना

तिला येते चक्कर

पहिलं कोण खाणार

म्हणून घरात होते टक्कर..!

 

करंजीला मिळतो

फराळात दुसरा मान

चंद्रासारखी दिसते म्हणून

वाढे तिची शान..!

 

एकामागून एक करत

करंजी होते फस्त

फराळाच्या डब्यावर

आईची वाढे गस्त..!

 

साध्या भोळ्या शंकरपाळीला

मिळे तिसरा मान

मिळून सा-या एकत्र

गप्पा मारती छान…!

 

छोट्या छोट्या शंकरपाळ्या

लागतात मस्त गोड

दिसत असल्या छोट्या तरी

सर्वांची मोडतात खोड..!

 

बेसनाच्या लाडूला

मिळे चौथा मान

राग येतो त्याला

फुगवून बसतो गाल..!

 

खाता खाता लाडूचा

राग जातो पळून

बेसनाच्या लाडू साठी

मामा येतो दूरून..!

 

चटपटीत चिवड्याला

मिळे पाचवा मान

जरा तिखट कर

दादा काढे फरमान..!

 

खोडकर चिवडा कसा

मुद्दाम तिखटात लोळतो

खाता खाता दादाचे

नाक लाल करतो…!

 

रव्याच्या लाडूला

मिळे सहावा मान

पांढरा शुभ्र शर्ट त्याचा

शोभून दिसतो छान…!

 

आईचा लाडका म्हणून

हळूच गालात हसतो

दादा आणि मी मिळून

त्यालाच फस्त करतो…!

 

लसणाच्या शेवेला

मिळतो सातवा मान

जास्त नको खाऊ म्हणून

आई पिळते माझा कान..!

 

शेवेचा गुंता असा

सुटता सुटत नाही

एकमेकां शिवाय ह्यांचं

जरा सुद्धा पटत नाही…!

 

दिवाळीच्या फराळाला

सारेच एकत्र येऊ

थोडा थोडा फराळ आपण

मिळून सारे खाऊ..!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 155 ☆ गझल …वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 155 ?

☆ गझल …वसंत वैभव ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

इथे कधी दरवळले नाही वसंत वैभव

उदास हृदयी रुळले नाही वसंत वैभव

 

निशीदिनी मी राखण केली रक्त सांडले

सभोवती सळसळले नाही वसंत वैभव

 

अता मलाही जगता येते तुझ्याविना रे

ऋतुबहरांशी वळले नाही वसंत वैभव

 

सख्या नको मज केविलवाणे तुझे समर्थन

मनात का वादळले नाही वसंत वैभव

 

कुहू कुहू कोकिळ गातो आर्त पंचम जरी

मधुर स्वरांशी जुळले नाही वसंत वैभव

 

किती दिसांनी जल हे सजले कमल फुलांनी

मृणाल ओठा कळले नाही वसंत वैभव

 

मला किती ते उपरोधाने उदंड हसले

“कसे तुझ्यावर खिळले नाही वसंत वैभव “

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares