मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गावठी गिच्चा…. श्री सचिन पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार

सौ. सुचित्रा पवार

?पुस्तकावर बोलू काही?

☆ गावठी गिच्चा…. श्री सचिन पाटील ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆

गावठी गिच्चा: लेखनभान जपणाऱ्या संयमित कथा – सौ. सुचित्रा पवार

नुकताच ‘गावठी गिच्चा’ हा सचिन पाटील यांचा कथासंग्रह वाचून झाला. एकूणच पूर्वापार शंकर पाटील ग्रामीण कथेचा बाज असणाऱ्या, लेखनभान जपणाऱ्या संयमित अशा एकूण बारा कथा या कथासंग्रहात आहेत. कोणत्याही बड्या लेखकाची प्रस्तावना न घेता लेखकाने स्वतः ‘गावातून फेरफटका मारण्यापूर्वी…’ या शिर्षकाखाली कथासंग्रहाची निर्मिती प्रक्रिया व आज-कालच्या गावाचा आढावा घेतला आहे. ‘गावठी गिच्चा’ म्हणजे हिसका किंवा खोड मोडणे या अर्थाचे संग्रहाचे शिर्षकच ठसकेबाज  आहे.

प्रत्येक कहाणीचे आशय अन् विषय वेगवेगळे आहेत, तसेच प्रत्येक कथा ग्रामीण जीवनाचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. आता गावाचे स्वरूप बदलत असले तरी माणसांच्या मनोवृत्ती मात्र बदलल्या नाहीत असेच काहीसे ग्रामीण वास्तव चित्र आहे.

या कथासंग्रहातील ‘उमाळा’ या कथेतील फटकळ असणारी पुष्पाआक्का रागेरागे भावाकडे येते, शरीराने ती भावाकडे आलीय पण तिचे मन मात्र तिच्या घरातच रेंगाळत आहे, म्हणूनच नातवाची आठवण येताच नातवाच्या काळजीने तिचे मन घराकडे ओढ घेतेय आणि ती लगेचच घरी परतते. बहिणीची तऱ्हा भावाला मात्र न कळल्याने तो चक्रावून जातो पण विहिरीला लागलेला ‘उमाळा’ मात्र आक्काचा पायगुणच समजतो. बहीण-भावाच्या प्रेमाचे दुर्मीळ चित्र उमाळा कथेत आपल्याला दिसते.

‘दंगल’ या कथेत दंगल असूनही आपल्या जीवावर उदार होऊन वेळप्रसंग पाहून अवघडलेल्या रेशमाला आपल्या रिक्षातून शहराकडे सुखरूप बाळंतपणाला नेणारा जेकब रिक्षावाला अनोख्या माणुसकीचे दर्शन घडवतो.

ऊस फडावरील खोपटात रात्रभर अब्रूच्या भीतीने गांगरलेली सुली प्रत्येक चाहुलीला घाबरते पण एका क्षणात वीज तळपल्याप्रमाणे तिला स्वतःच शील जपण्यासाठी ‘कोयता’ जवळ आहे याची जाणीव होते व तिची भीती कुठल्या कुठं पळून जाते.

विज्ञानयुग असलं तरी अजून खेडोपाडी करणीबाधेच्या भुताचा लोकांच्या मनावर पगडा आहे. त्यातूनच ‘करणी’ मधील विठाई आपल्या म्हशीची दुरावस्था बघून अंदाजाने, संशयाने आसपासच्या लोकांना शिव्या घालते पण प्रत्यक्ष मात्र तिच्याच मुलाने गोठ्यात मारलेल्या कीटकनाशकाचा अंश म्हशीच्या पोटात गेलेला असतो हे गुपितच रहाते.

अचानक नवरा मेलेली तरुण सुंदर सविता उर्फ सवी पतसंस्थेच्या कर्जाच्या विळख्यातून अब्रूसह चातुर्याने निसटते याचे वर्णन लेखकाने ‘डोरलं’ कथेत तंतोतंत केले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशा द्विधा मनःस्थितीत अडकलेली सवी आपलं डोरलं अर्थात मंगळसूत्र विकून आपला शब्द पाळते व शीलही वाचवते.

‘गावचं स्टँड’ आणि ‘तंटामुक्ती’ या दोन्ही कथा विनोदनिर्मिती करणाऱ्या असल्या तरी त्यातील कथानक हे ग्रामीण भागातील उपहासात्मक वास्तव आहेत.

‘उपास’ या कथेत ज्ञानू पैलवानाची मटण खायची तल्लफ  बायकोच्या संकष्टीच्या उपवासाने न भागताच दिवसभर त्याला कसा उपास घडतो आणि रात्री मात्र राग विसरून तो परत बायकोला माफ करून आनंदाने कसा शाकाहार करतो याचे रसभरीत चित्रण आहे. मात्र मटण न करता शाकाहारी जेवण करून पैलवनाची बायको रत्ना नवऱ्याची समजूत का काढू शकत नाही त्याला उपास का घडवते? हे मात्र कळलेलं नाही.

‘सायेब’ या कथेत लेखकाच्या मित्राच्या जीवनाला एका नापास शिक्क्याने कशी कलाटणी मिळाली याचे वास्तव चित्रण आहे. परंतु कथेचा आशय आजच्या शिक्षण पद्धतीला सुसंगत वाटत नाही.

‘चकवा’ या कथेतील बज्याच्या डोक्यात भुताचा विचार आल्याने  प्रत्यक्ष हव्याहव्याशा माणसाबरोबर बोलायची, एकांत सहवासाची संधी येऊन सुद्धा मनातलं गुपित मनातच ठेवून बाजाराचे सामान देखील कसे रस्त्यातच सोडावे लागते याची सुरस कथा आहे.

अनेक एफ.एम.वर सध्या सुरू असलेल्या फोनइन कार्यक्रमाची खिल्ली ‘टोमॅटो केचप’ या कथेत अगदी रास्त उडवली आहे. कारण खेडोपाडी रेंज नसताना, महत्त्वाचं काम असताना हा रेडिओवाला काळ-वेळ-प्रसंग न बघता समोरच्या माणसाची फिरकी घेतो पण लोक वैतागतात आणि ही फिरकी त्यांना किती महागात पडू शकते याचे ज्वलंत उदाहरण सतीश चव्हाण या व्यक्तीरेखेतून  कळते.

रुसलेल्या बायकोने आपली आज्ञा पाळली नाही म्हणून तिची खोड गमतीदार पद्धतीने मोडणारा शिवा ‘गावठी गिच्चा’ मध्ये आपल्याला भेटतो. नवरा-बायकोतले किरकोळ वाद तिथेच सोडून दिले तरच संसार गोडी-गुलाबीने होतो हे सूत्र या कथेतून लेखक अलवार गुंफतो.

एकंदरीत ‘गावठी गिच्चा’ मधील सर्व कथा ग्रामीण जीवन डोळ्यांसमोर ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत आणि त्या वास्तव जीवनाशी निगडित आपल्या आसपास असणाऱ्या सा…

पुस्तकावर बोलू काही

‘गावठी गिच्चा’ लेखक श्री सचिन पाटील

अभिप्राय – सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अपरिचित रामायण… दाजी पणशीकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अपरिचित रामायण… दाजी पणशीकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

ऐसे गुरू ऐसे शिष्य !

अर्थात ‘अपरिचित रामायण’

लेखक – दाजी पणशीकर

प्रकाशक – रविराज प्रकाशन

काही दिवसांपूर्वी ‘अपरिचित रामायण’ हे दाजी पणशीकर यांनी लिहिलेलं पुस्तक वाचनात आलं. हे पुस्तक वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणावर आधारित आहे. यात फक्त रामायणातल्या बालकांडातल्या घटनांचाच समावेश आहे. नंतरच्या घटना प्रामुख्याने सीता हरण, रावण वध यांचा यात समावेश नाही. तर मग आहे काय या पुस्तकात वाचण्यासारखं… असं एखाद्याला वाटू शकतं.

पण पुस्तक वाचल्यावर जाणवतं की रामायणात केवळ सीता हरण आणि रावणाचा वध या दोनच मुख्य गोष्टी नसून इतरही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जेव्हा युगानुयुगे संपूर्ण विश्वाला विचार प्रवृत्त करणाऱ्या घटना घडतात तेव्हा त्या निव्वळ योगायोगाने घडलेल्या नसतात. त्या मागे निश्चितच काही कार्यकारण भाव, हेतू असतो. तो हेतू काय? आणि रावण वध महत्त्वाचा का? ‘रामराज्य’ म्हणजे काय? रामाचा जन्म दशरथाच्या कुळातच का झाला? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक देतं.

या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे रामजन्मापूर्वीची परिस्थिती, ऐश्वर्याने संपन्न आणि वृत्तीनं रसिक, नीतिमान असलेल्या अयोध्येचं वर्णन वाचून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. स्त्रियांसाठी नृत्यशाळा आणि स्वतंत्र क्रीडाभवने होती यावरूनच स्त्रीचं त्या काळातलं सामाजिक स्थान लक्षात येतं. तसंच रघुकुळातला राज्यकारभार, राजा दशरथ आणि त्याचे अमात्य यांची गुणवत्ता, नितीमत्ता आणि प्रजेतील व्यवहार अशा सर्वच बाबी अचंबित करतात.         

या पुस्तकाचा मूळ गाभा म्हणजे राजपुत्र रामाची ‘प्रभू श्रीराम’ म्हणून होणारी जडणघडण… ही जडणघडण कशी आणि कुणामुळे घडली हे यात सविस्तर सागितलं आहे. ‘प्रभू राम’ घडण्यात सगळ्यांत जास्त महत्त्वाचा वाटा कुणाचा असेल तर तो ‘विश्वामित्र ऋषींचा’ आहे. आजपर्यंतच्या रामायणात पुत्रवियोगाने तळमळणारा दशरथ, शोकमग्न कौशल्या, वनवासाला पतीसोबत जाणारी सीता, बंधू लक्ष्मण… यांचं रामावरील प्रेम, त्यांचं आपापसातलं नातं हे आपण वेगवेगळ्या माध्यमातल्या रामकथांमधून पाहिलं आहे. दुर्दैवाने या सगळ्यांत विश्वामित्र ऋषींचा मात्र ठराविक प्रसंग वगळले तर फारसा महत्त्वपूर्ण उल्लेख येत नाही. पण रामाचं ‘रामपण’ आहे ते विश्वामित्र ऋषींनी गुरु म्हणुन केलेल्या ज्ञानदानात, संस्कारात… कसं ते जाणण्यासाठी हे पुस्तक वाचावं. 

राजा दशरथाकडे जेव्हा विश्वामित्र ऋषींनी राक्षसांचा वध करण्यासाठी रामाची मागणी केली तेव्हा राजा दशरथ त्यांच्यासोबत रामाला पाठवण्यास अजिबात अनुकूल नव्हता. पण तरीही विश्वामित्र ऋषी रामाला नेण्याबाबत ठाम आणि आग्रही राहिले तेव्हा महर्षी वसिष्ठ यांनी, ईश्वरी योजना, संकेत जाणून पुत्र मोहात अडकलेल्या राजा दशरथाला कसं राजी केलं… आणि नंतर विश्वामित्रांनी रामाला अक्षरशः कसं घडवलं… अगदी संध्या कशी करावी ते, आपले नित्यकर्म कशी असावीत इथंपासूनचे प्रसंग, गुरू-शिष्य नातं यात सांगितलं आहे.

एका राजपुत्रापासून ते प्रभू श्रीराम होण्यासाठी जे जे काही रामाच्या आयुष्यात घडलं ते अतिशय उत्कंठावर्धक पद्धतीनं यात सांगितलंय. केवळ वाचनप्रेमींनाच नव्हे तर रामायणाच्या अभ्यासूंनाही आवडेल असंच हे पुस्तक आहे. याच्यातलं ‘ताटका वध’ हे प्रकरण मला विशेष भावलं. देव आणि दैत्य यांच्यातलं वैर सांगणाऱ्या या प्रसंगातून प्रभू श्रीरामाच्या आगमाची नांदी आणि मानवजातीसाठी आश्वासक जीवनाची सुरुवातच जणू यातून होते. रामायणात या प्रसंगाचं महत्त्व विशेष आहे आणि ते मांडलं ही छान आहे. हे सारे प्रसंग वाचून गुरूचं आपल्या आयुष्यात नक्की स्थान काय असतं हे आपल्या मनात अधोरेखित होत जातं. असा उत्तम गुरु आणि असा उत्तम शिष्य लाभला तर रामराज्यासारखे चमत्कार खरंच घडू शकतात याची आपल्याला खात्री पटते.

हे पुस्तक वाचल्यावर भारावल्यावस्थेत मला या काही ओळी सुचल्या त्यानं मी या लेखाचा समारोप करते.

नाही राम कौसल्येचा।

नाही राम दशरथाचा।

राम असे विश्वामित्राचा।

जरी सोबत भार्या अन भ्राता।

सदैव तत्पर सेवक हनुमंता।

होई जयघोष जरी रघुकुलाचा।

राम असे विश्वामित्राचा।

षड्रिपूंवर मात करण्या।

दशाननाशी युद्ध लढण्या।

लाभे हस्त हा गुरुकृपेचा।

राम असे विश्वामित्राचा।

नित्यकर्म अन धैर्योपासना करवी।

शस्त्र, अस्त्र, धर्म, यांचे ज्ञान देई।

शुद्धाचरण, सत्याचा मार्ग जो दावी।

तो हा ‘परमगुरू’ ‘परमात्म्याचा’।

राम असे विश्वामित्राचा ।

राम असे विश्वामित्राचा।

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “अरूणोदय” – लेखिका सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ परिचय – सौ राधिका भांडारकर  

पुस्तकाचे नाव – (काव्यसंग्रह) अरुणोदय

प्रकाशन – १५ मार्च २०२२

प्रकाशक – शाॅपीझेन.काॅम

किंमत – रु ४०/—

 

आज मी तुम्हाला सुश्री अरुणा मुल्हेरकर यांच्या शाॅपीझेन या डीजीटल मीडीयावर नुकताच प्रकाशित झालेल्या अरुणोदय या काव्य संग्रहाचा परिचय करुन देणार आहे. या संग्रहात एकूण चाळीस कविता आहेत.

त्यांचे वैशिष्ट्य असे की, यातील एकही कविता मुक्तछंदातील नसून, प्रत्येक कविता नियमबद्ध आहे. त्यामुळे या चाळीस कवितातून चाळीस काव्यप्रकाराची अरुणाताई यांनी ओळख करून दिली आहे.

षटकोळी, कृष्णाक्षरी, शोभाक्षरी, शंकरपाळी, नीरजा, मधुसिंधु, रट्टा वगैरे एकाहून एक सुंदर काव्यप्रकार उलगडत जातात.

प्रत्येक काव्यप्रकाराचे नियम त्यांनी सांगितले आहेत. ओळी, यमक, वर्ण अक्षरं, शब्द यांची संख्या मांडणी याविषयीचे संपूर्ण तपशील यात दिले आहेत. त्यामुळे या सर्व काव्यरचना वाचताना आपोआपच एक लयबद्धता येते. आणि वाचकाला त्या रमवतात.

या सर्व कवितातून त्यांनी विवीध विषयही हाताळले आहेत. निसर्ग आहे.मनातली स्पंदने आहेत. सामाजिक दूषणे आहेत.

नव्या पीढीच्या समस्या आहेत. जीवनातली सुख दु:ख प्रेम यावरचे मोकळे भाष्य आहे. भावनांचे अविष्कार आहेत….

नाते प्रेमाचे या षटकोळी रचनेत त्या म्हणतात,

मधुप आणि कुसुम

धेनु वाढवी वासराला

पाखरे झेपावती नभात

घेत उंच भरारी

कोटरात परतती सांजवेळी

प्रेम आहे चराचरात..

या सहा ओळीच्या रचनेत अत्यंत सहज शब्दांत त्यांनी निसर्गातले प्रेम टिपले आहे.

द्विशब्दी रचनेतले आई विषयीचे दोनच शब्द मनाला भिडणारे आहेत.

आई देई

संस्काराचे आंदण

दारात तिच्या

बागडते अंगण…

मधुदीप काव्यांमधे शब्दांची मांडणी तेवत्या दीपासारखी असते. या कविता वाचताना अक्षरांच्या सुबक चित्राकृतीही खूप आकर्षक आहेत.

संगीताक्षरी.. तीनओळीची अक्षरबद्ध काव्यरचना.

चंदन झिजतसे

सुगंध भरीतसे

सदाकाळ…

लीनाक्षरी हे दोन ओळीचं, २४ अक्षरे असलेले काव्यही अतिशय लोभस आहे.

संकटाशी सामर्थ्याने लढायचे

शांतचित्त समाधान ठेवायचे…

शब्द साधे पण अत्यंत ओलावा असलेले. प्राणमय आणि सजीव. प्रत्येक रचना ही त्या त्या भावनेसकट,विचारांसहित मनाला भिडते. नियमबद्ध असूनही अवघड नाही. रुक्ष नाही. फाफटपसारा नाही. ओढूनताणून केलेली अक्षरांची कसरत नाही. एक सहजता, नाद लय गती.. या कविता वाचताना जाणवते. मन गुणगुणायला लागतं.. अरुणोदय या काव्यसंग्रहाचं हेच वैशिष्ट्य आणि यशही.

अरुणाताईंनी अतिशय अभ्यासपूर्ण असा हा काव्यसंग्रह प्रकाशित करून, नवोदित कवी कवयित्रींसाठी एक दालन उघडले आहे.

साहित्य कला व्यक्तिमत्व मंचाचे प्रमुख, आणि मान्यवर लेखक, कवी गझलकार या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेत म्हणतात की या काव्य सरितेत प्रथम मी सहज डोकावलो नंतर त्यात कसा ऊतरलो, पोहू लागलो नि संपूर्ण काव्यसंग्रह वाचल्यावर वर येउन पाहतो तर मी एकामहासागरात होतो. अरुणाताईंची प्रतिभा आणि प्रतिमा खूप काही शिकायला ठेवून गेली. तेव्हां रसिकहो आपणही  हा अनुभव घ्यावा. त्यासाठी शॉपीझेन डॉट काॅम या साईटवर जाउन अरुणोदय हा काव्यसंग्रह जरुर वाचावा.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ नमुना नमुना माणसं… सुश्री मंजिरी तिक्का ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी  ☆

नमुना नमुना माणसं

लेखिका | मंजिरी तिक्का

साहित्य प्रकार | अनुभवकथन

प्रकाशक | अक्षरमानव प्रकाशन

सात-आठ वर्षांपूर्वी चक्रम माणसांशी कसे वागावे हे कि.मो. फडके यांनी लिहिलेलं त्रिदल प्रकाशनचं पुस्तक मी वाचलं होतं. यात चक्रमपणाबद्दल व्यवस्थित माहिती दिली होती. त्याची लक्षणं, तीव्रता त्याचे होणारे परिणाम वगैरेंचे किस्से वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, याच्यातली बहुतांशी सौम्य का होईना लक्षणं आपल्या आजूबाजूला असणाऱ्या कित्येकांमध्ये आढळतात अगदी आपल्यातही. वागण्याची पद्धत किंवा अमुक प्रकारचा स्वभाव हा चक्रमपणात कसा नोंदला जाऊ शकतो किंवा इतरांसाठी तो कसा ठरू शकतो याची जाणीव या पुस्तकातून करुन दिली आहे.

तर मंडळी,

हे सगळं चऱ्हाट लावण्याचं कारण म्हणजे मी नुकतंच वाचलेलं ‘नमुना नमुना माणसं’ हे मंजिरी तिक्का यांचं पुस्तक. एव्हाना नावावरूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की नमुना नमुना माणसं असं म्हणताना त्यात चक्रमपणा हा हळुच डोकावतोय. अगदी थेट नसला तरी एखाद्या नुकसानकारक गुणाचा अतिरेक हा त्याच्या जवळपास जाणाराच गुण आहे. हेच गुण अंगी असलेल्या माणसांच्या कथा-व्यथा आणि त्यांचे त्याबाबत घडणारे विनोदी किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात.

अतिशय साध्या-सोप्या आणि संवादी शैलीत हे किस्से असल्यामुळे क्वचित प्रसंगी आपल्या हातूनही घडलेले असे फजितीचे प्रसंग किंवा आपल्या इतर मित्र-मैत्रिणी, भावंड यांच्यापैकी कोणाच्या तरी बाबतीत घडलेले प्रसंग आठवून आपल्याला खुदकन् हसू येतं. बालपणीच्या आठवणींमध्ये अधिक तर अज्ञानाचा, निरागसतेचा भाव असल्यानं त्यांचं वैषम्य जाणवत नाही. पण मोठेपणी मात्र आपल्या स्वभावामध्ये योग्य त्या प्रकारे बदल करता आला नाही तर त्याचा किती गैरफायदा घेतला जातो हे लक्षात आल्यावर हसू येण्यापेक्षा हळहळायलाच होतं.

मला या पुस्तकाची भावलेली आणखीन एक बाजू म्हणजे अतिशय प्रामाणिकपणे जे घडलं ते जसंच्या तसं स्वरूपात मांडल्याचं जाणवतं. त्यात अतिरंजितपणा, पाल्हाळीकपणा, अकारण विनोद निर्मितीचा प्रयत्न, शब्दविक्षेप आढळत नाही. त्यामुळे हे किस्से आपल्या घरातलेच आहेत, किंवा आपल्या समोरच घडताहेत असं वाटतं.

अगदी सर्वसामान्य कुटुंबामध्ये आढळणाऱ्या अतिचिकित्सक, अतिचिकट, अतिस्वच्छतावेड्या, अतिअबोल, अतिवाचाळ, अतिभिडस्त, तारतम्याचा अभाव असलेल्या नमुन्यांचा यात अंतर्भाव आहे. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे नात्यांमध्ये, कामामध्ये होणारा गोंधळ हा अतिशय सहजतेने टिपला आहे. प्रसंगांची मांडणी, किस्से हे जरी विनोदी पद्धतीने सांगितले असले तरी ते वाचून हसता हसता आपण नकळत अंतर्मुख होतो. आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे जास्त जाणीवपूर्वक बघू लागतो, हे खरंतर या पुस्तकाचं यश.

मंजिरी तिक्का यांचं हे पुस्तक जरी पहिलंवहिलं असलं तरी काहीसं स्वशोध घेणारं, स्वतःच्या अंतरंगात डोकवायला लावणारं आहे. त्यांच्यातल्या उत्तम निरीक्षकाची, लेखकाची चुणूक दाखवणारं आहे. शंभरेक पानांच्या या पुस्तकात वाचताना कुठेही कंटाळवाणेपणा जाणवत नाही. मात्र क्वचितप्रसंगी प्रसंग वर्णन करताना पुनरावृत्ती झाल्याचं जाणवतं.

पुस्तकाची महत्त्वाची आघाडी सांभाळणाऱ्या दोन गोष्टी एक मुखपृष्ठ आणि शीर्षक या अतिशय उत्तम जमून आल्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांनी साकारलेले पुस्तकाचं मुखपृष्ठ अतिशय बोलकं आणि विषयाला समर्पक असं आहे. माणसाच्या वेगवेगळ्या मनोवृत्तीचे दर्शन घडवणाऱ्या चौकटीतल्या व्यंगचित्रातून ‘नमुना नमुना’ माणसाचं उत्तम प्रतिबिंब पाहायला मिळतं. तर नमुना या शब्दाच्या पुनरुक्तीमुळे निर्माण होणारा भाव पुस्तकाच्या चेहऱ्यावर मिश्कील हसू आणतो.

सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या दिवसात एका बैठकीत वाचून संपणारं आणि मनाला प्रसन्नता देणारं हे पुस्तक आवर्जून वाचा. आणि आपल्या आजूबाजूची नमुनेदार माणसं शोधतानाच आपल्यातही लपलेला नमुनेदारपणा शोधून काढा.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ गाणा-याचं पोर… राघवेंद्र भीमसेन जोशी ☆ परिचय – सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

पुस्तकाचे नाव- ‘गाणाऱ्याचे पोर’

लेखक – राघवेंद्र भीमसेन जोशी

प्रकाशक- यशोधन पाटील

प्रथम आवृत्ती- 22 नोव्हें. 2013

 

पंडित भीमसेन जोशी, राघवेंद्र यांचे वडील. राघवेंद्र यांच्या आईचे नाव सुनंदा, भीमसेन जोशींची पहिली पत्नी. भीमसेन जोशी यांचे लहानपणी चे वास्तव्य गदग मध्ये गेले. 1944 मध्ये भीमण्णा यांचे लग्न सुनंदा कट्टी यांच्या बरोबर झाले. त्यानंतर त्यांचे गाण्याचे दौरे चालू झाले. कुटुंबाबरोबर घराबाहेर पडून नागपूर येथे  बिर्‍हाड केले. 

औरंगाबादमध्ये  त्यांची वत्सला मुधोळकर यांच्या शी गाठ पडली आणि कार्यक्रम करता करता ते त्यांच्या प्रेमात पडले. वत्सला यांचा उल्लेख राघवेंद्र यांनी ‘त्यांचा’ अशा शब्दात केला आहे. भीमसेनजींचा दुसरा विवाह ही गोष्ट च सर्वांना खटकणारी होती. पहिली पत्नी आणि मुले यांना भीमसेनजीनी पुण्यातील डेक्कन जिमखान्यावर  वेगळे बिऱ्हाड करून दिले.

भीमसेन जोशीं बद्दल आदर बाळगूनही त्यांच्या स्वभावाची अनेक वैशिष्ट्ये दिसून येतात. प्रेमळ तितकेच लहरी, बेफिकिरीने राहणारे होते, त्याचबरोबर गाण्यातील तन्मयता अशा अनेक गोष्टी राघवेंद्र यांच्या लिखाणातून दिसून येतात. सवाई गंधर्व महोत्सवातील त्यांची हजेरी हा एक गौरवास्पद प्रसंग असे.  त्यांच्या बादशाहीच्या बोर्डातील घरी पैसे आणण्यासाठी आई ज्यांना पाठवत असे. तेव्हाचे त्यांचे रूप राघवेंद्र यांच्या मनात ठसले होते. ‘भरदार छाती, बलदंड बाहू, असे मर्दानी रूप, कुरळे केस, देहाला एक विशिष्ट देह गंध होता, तो नुसत्या घामाचा वास नव्हता, तर त्यात तुळशी तल्या मातीच्या वासाचाही अंश  आहे असं वाटे.’ अशा शब्दात त्यांनी भीमसेन यांचे वर्णन केले आहे.

त्यांच्या पैशावर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा हक्क असे. त्यामुळे त्यांचे पहिले कुटुंब व मुले यांना त्यांचा सहवास मिळून नये असा  ‘त्यांचा’ प्रयत्न असे. राघवेंन्द्र म्हणतात,’ आई-भीमण्णा-त्या-… या त्रिकोणात  पिंगपाॅंग चेंडूसारखी माझी त्रिशंकू अवस्था होई! एकीकडे पैशाची बरसात,तर सुनंदा च्या घरी पैशाची ओढाताण!’असे काही वाचले की मनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीमत्वाला हा कसला डाग!

एकदा राघवेंद्र यांच्या घरी आई पुरणाच्या पोळ्या करीत असताना भीमसेनजीनी एका बैठकीत चार पाच पोळ्या संपवल्या याचेही राघवेंद्र ना कौतुक! एकदा लहानपणी साखर झोपेत असतानाच तंबोर्‍याच्या सूर राघवेंद्र यांच्या मनात चैतन्य निर्माण करून गेले’ ही बदामीची आठवण अजूनही त्यांच्या मनात घर करून आहे!

लहानपणीच्या अनेक आठवणी सांगता सांगतानाच राघवेंद्र भीमसेनजींच्या अनेक गोष्टी व स्वभाव वैशिष्ट्ये सांगत जातात. त्यावरून त्यांचे गाणे, त्यांचे खाणे, कलंदर स्वभाव, गाण्यातील एकतानता, राघवेंद्र स्वामी वरील श्रद्धा अशा अनेक गोष्टी आपल्या ला दिसून येतात. त्यांना कार ड्रायव्हिंग ची खूप आवड होती आणि काय संबंधी सखोल ज्ञान त्यांनी मिळवले होते असे दिसून येते.

भीमसेनजीनी मुलांची शिक्षणं पुण्यात केली.

दुसऱ्या घरी भीमसेनजीनी खूप खर्च केला, पण  पहिल्या कुटुंबाला मात्र गरीबीत ठेवले याची राघवेंद्र यांच्या मनात खूप खंत होती. पण तरीही त्यांनी वडिलांचा मोठेपणा जाणून शेवटपर्यंत त्यांना साथ दिली. त्यांची कीर्ती आणि समृद्धी जगभर पसरली होती. मोठा मुलगा म्हणून वडिलांची काळजी घेतली. भीमसेनजीनी आपल्या पहिल्या पत्नीला कधीच मानाने वागवले नाही.

मनात येईल ते करण्याची भीमण्णांची वृत्ती अनेक प्रसंगातून दिसून येते असेच माझे मत झाले. त्यांना पांढराशुभ्र रंग फार आवडे.’ सात स्वर रंग सामावलेला शुभ्र प्रकाश हेच या स्वरभास्कराचे वैशिष्ट्य होते.

राघवेंद्र यांच्या लिखाणातून मला असे जाणवले की सुरांच्या पलिकडे असणारे भीमसेन वेगळेच होते!त्यांना ‘पद्मश्री’ मिळाली, त्या प्रसंगाचा फोटो भीमाण्णांनी  त्यांना दिला.

भीमसेन जींचा मुलगा म्हणून राघवेंद्र यांनी स्वतः चा फायदा करून नाही घेतला.  राघवेंद्र नी आपली व्यावहारिक प्रगती स्वतः च केली. पाणी शोधण्याचे तंत्र त्यांना कसे सापडले, धायरीला त्यांनी घर केले, भीमाण्णांनी त्यांच्या’सह नवीन घराला भेट दिली.

भीमाण्णांना  भारत रत्न हा बहुमान मिळाला.

‘त्यांच्या मैफिलींच्या आठवणी काढणे म्हणजे मोत्याची थैलीच  मोकळी सोडण्यासारखे आहे. प्रत्येक मोती गोळा करताना परत मनात तोच आनंद!’ अशा शब्दात राघवेंद्र यांनी भीमसेनजींचा सन्मान केला आहे!

त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखवण्यात राघवेंद्र यशस्वी झाले आहेत असे मला वाटते.

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

वारजे, पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ १२ जुलै १९६१… सुश्रीआश्लेषा महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ १२ जुलै १९६१… सुश्री आश्लेषा महाजन ☆ प्रस्तुती – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

१२ जुलै १९६१

साहित्य प्रकार | कादंबरी

लेखिका | आश्लेषा महाजन

प्रकाशक | इंकिंग इनोव्हेशन

~~~~~~

१२ जुलै १९६१

काही तारखा काळावर आपलं अस्तित्व कोरून ठेवतात त्यातलीच ही एक तारीख. या तारखेनं पुनवडी ते पुणे अशा एका मोठ्या स्थित्यंतरावर आपला ठसा उमटवलेला आहे.

पानशेत पूर ! पुण्याचा संपूर्ण कायापालट करणारी घटना ही समस्त पुणेकरांची एक दुखरी नस आहे. करोनासारख्या जागतिक महामारीनंतरही ही घटना पुणेकर विसरू शकले नाहीत. याचा पुरावा म्हणजे करोनावासात १२ जुलै २०२१ या दिवशीच या पुराला तब्बल साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही कादंबरी प्रकाशित झाली.

पानशेत पुराच्या अनेक आठवणी आजही पुणेकरांच्या मनात जिवंत आहेत. माझा या आठवणीशी अप्रत्यक्ष संबंध असा की आमची सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला ही सुरुवातीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची शाळा होती. ती पुरात पूर्णपणे नष्ट झाल्यानं आबासाहेब गरवारे तिचं पुनर्वसन केलं. नुकत्याच झालेल्या नूतनीकरणानंतरही शाळेत हॉलमधल्या भिंतीवर पुराचं पाणी चढलं होतं तिथे लाल रंगात खूण केली असून पुराचा उल्लेख केलेला आहे. यावरूनच पानशेत पुराचं महत्त्व दिसून येतं. तसंच पुराच्या काळात पुणेकर असणाऱ्या माझ्या वडिलांनी तो पूर स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला त्यात ते स्वतः आर्किटेक्ट असल्यानं पूरग्रस्तांची घरं, त्यांचं बांधकाम, डागडुजी अशा अनेक गोष्टी त्यांच्या बोलण्यात यायच्या त्यामुळे ही कादंबरी वाचण्याची उत्कंठा माझ्या मनात निर्माण झाली.

जेव्हा एखाद्या सत्यघटनेवर आधारित काल्पनिक कथानकाची निर्मिती केली जाते तेव्हा लेखकाचा खरा कस पणाला लागतो. त्यात ती सत्य घटना जर अनेकांचे आयुष्य बदलवून टाकणारी असेल तर त्याच्याशी निगडीत अनेक धागेदोरे हे पिढ्यानुपिढ्या जपले गेलेले असतात. अनेकांच्या आयुष्यात त्यामुळे स्थित्यंतरं निर्माण झालेली असतात त्यामुळे त्या घटनेकडे ते केवळ कथा किंवा साहित्य या अंगाने बघू शकत नाहीत. अशावेळी वाचकांच्या मनातला हा ‘सल’ ओळखून त्यांची जखम तीव्रतेनं भळभळणार नाही याची काळजी घेत पण वास्तवातले अनेक धागे पुराव्यानिशी उलगडून सांगत त्यावर आधारित काल्पनिक कथानक रचणं हे अवघड काम आश्लेषा महाजन यांनी सहज पेललं आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावरुन त्यावेळच्या हाहाकाराची झलक पहायला मिळते. त्यामुळे पुस्तक उघडल्यानंतर पुराच्या कुठल्या अनामिक प्रसंगांची लाट आपल्यावर कोसळणार आहे अशी साशंकता मनात होती. पण तसं घडलं नाही कारण ही कादंबरी या घटनेनंतर बऱ्याच वर्षांनी लिहिली आहे. आणि ही घटना उलगडली ती आजच्या काळातल्या तरुणांनी… त्यामुळे या घटनेची तीव्रता ही प्रत्यक्षात जरी जास्त असली तरी काळाच्या फरकाने, कथानकाच्या मांडणीमुळे तितकीशी जाणवत नाही. या पन्नास वर्षांत पुण्याचा झालेला कायापालट केवळ एक शहर म्हणून नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या ही झालेला बदल आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतो. आणि या बदललेल्या दृष्टिकोनातून ही घटना वाचली जाते.

मोबाईल, वाय-फाय, इंटरनेट, लॅपटॉप अशा आधुनिक जगात जन्मलेली पिढी आणि तिच्याद्वारे उलगडत गेलेली पानशेत पुराची ही घटना आपल्याला या पुराकडे त्रयस्थपणे बघायला प्रवृत्त करते. पुरात घटनांचा इतिवृत्तांत, त्यावरच्या बातम्या, झालेलं नुकसान, आरोपप्रत्यारोप, राजकारण, समाजकारण अशा गोष्टी थेट न सांगता पात्रांच्या शोध मोहिमेतून कथानकाचा एक भाग म्हणून सांगितल्या आहेत.

पुरातन वस्तू आणि वास्तूंची आवड असलेली आर्किटेक्ट, इंटेरियर डेकोरेटर शैली, भाषाप्रेमी देश-विदेशात सतत भटकंती करणारा इंटरनॅशनल लॅग्वेज सर्व्हीसेसचा संस्थापक चित्ततोष, पर्यावरण प्रेमी ऋतुपर्ण आणि पुरातत्त्व अभ्यासक सुदर्शन या मुख्य पात्रांच्या संशोधन कार्यातून ‘पानशेत पूर’ समजू लागतो. प्रतिभा, वसंत आजोबा, पुणतांबेकर आजी, इ. उपपात्रंही ही पुरकथा आपापल्यापरीने उलगडून सांगतात. शिवाय घटनेचे साक्षीदार असलेली यातली अमानवी पात्रं म्हणजे जुने वाडे आणि खिडक्या यांच्या असण्यातून आणि नसण्यातूनही पुराची तीव्रता जाणवत राहते.

कादंबरीची सुरुवातच होते ते मुळी पुराणकालीन रचनेचा उत्तम नमुना असलेल्या खिडक्यांच्या शोधातून… आणि मग पुढे या खिडक्यांच्या निमित्ताने बंद वाड्याआड घडणाऱ्या आणि पुराने दबून गेलेल्या काही घटना काही प्रसंग हे समोर येतात. या कथानकात खिडकीचा केलेला वापर हा अनेक अर्थानं प्रतीकात्मक आहे. तसंच वाडा हे पुण्याचं गतकालीन सांस्कृतिक वैभव असलेलं प्रतीक आणि त्याच्या नामशेष होण्याच्या घटनेतून उलगडत जाणाऱ्या काही उपकथा यादेखील प्रतीकात्मकतेचा उत्तम नमुना म्हणता येतील.

आधीच म्हटल्याप्रमाणे या कादंबरीतून केवळ पुराबाबतच नव्हे तर बदलत चाललेल्या मानवी नातेसंबंधांबाबतचाही वेगळा विचार वाचायला मिळतो. विशेषतः स्त्री पुरुष संबंध, मैत्र या भावनेवरती या कथानकात ऊहापोह केला आहे.

आश्लेषा महाजन यांची ही पहिलीवहिली कादंबरी… त्यामुळे लेखनात ताजेपणा जाणवतो पण त्याबरोबरच काही प्रसंग हे गरजेपेक्षा अधिक सविस्तर लिहिले गेलेत असंही जाणवतं. कथानकात रंजकपणा यावा, पात्रांचे आपसातले बंध जाणवावेत यासाठी ते लिहिले गेले असले तरी क्वचित प्रसंगी शोधकार्यातला थरार त्यामुळे मंदावल्यासारखा वाटतो.

असं असलं तरीही तरुणाईच्या उत्साहातून या कथानकाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन, कादंबरी वाचनातला रस शेवटपर्यंत टिकवतो हे नक्की. एका गंभीर आणि वास्तव घटनेवर आधारित काल्पनिक कथनातली ही मांडणी प्रत्येकानं आवर्जून वाचावी अशी आहे.

चित्रपट अथवा वेबसिरीजसाठी हे कथानक उत्तम पर्याय असून लवकरच या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळावं ही सदिच्छा!

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी” – संकलन….सु.ह.जोशी ☆ परिचय – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी” – संकलन….सु.ह.जोशी ☆ परिचय – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

पुस्तकाचे नाव:  वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी

संकलन: सु.ह.जोशी.

प्रकाशक: सु.ह.जोशी.पुणे मो. 9922419210:

मूल्य: रू.180/-

पुस्तकावर बोलू काही :

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अनेक पुस्तकांची निर्मिती झाली आहे.नुकतेच आणखी एक पुस्तक हातात पडले.वीर सावरकर:आठवणी आणि गोष्टी.मागच्या वर्षी म्हणजे 26/02/2021 ला हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.पुस्तकाचे नाव आणि आकार बघता सहज पाने चाळली.पण मग थोड्याच वेळात पुस्तक वाचून पूर्ण केले.

असे वेगळे काय आहे या पुस्तकात? मुख्य म्हणजे हे एखाद्या चरित्रकारने लिहीलेले सावरकरांचे चरित्र नव्हे.या आहेत सावरकरांविषयी आठवणी व त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी,घटना यांची घेतलेली नोंद.या सर्व गोष्टींचे,आठवणींचे संकलन केले आहे श्री.सु.ह.जोशी यांनी.

या पुस्तकात स्वा.सावरकरांचे विचार जसे वाचायला मिळतात तसेच त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेली लहान मोठी  माणसे,त्यातून घडणारे त्यांच्या स्वभावाच्या विविध पैलूंचे दर्शन,मतप्रदर्शन,विरोध,साधेपणा,नामवंतांचा  सावरकरांविषयी  असलेला दृष्टीकोन अशा  विविधरंगी पैलूंचे दर्शन घडते.प्रस्तावनेत न.म.जोशी यांनी म्हटल्याप्रमाणे हे नुसते संकलन नाही तर हा सावरकरांच्या वीर चरित्राचा कॅलिडोस्कोप आहे.कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने वाचावे असे हे पुस्तक आहे.अनेक पुस्तकातील उतारे,वृतपत्रातील वृत्ते,सहवासातील व्यक्तींचे अनुभव असे विविध प्रकार वाचायला मिळत असल्याने पुस्तक रंजक व माहितीपूर्ण झाले आहे.स्वा.सावरकरांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल यात शंकाच नाही.

परिचय:सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “लाॅकडाऊन” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “लाॅकडाऊन” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

पुस्तकाचे नाव – ‘लाॅकडाऊन’

लेखिका – संध्या साठे-जोशी

बी-१०९, तुलसी सोसायटी, मार्कंडी, या. चिपळूण, जि.रत्नागिरी

पुस्तकाचा प्रकार – कथासंग्रह

दिलिप राज प्रकाशन प्रा.लि.

प्रथमावृत्ती १५ आॅक्टोबर २०२१

लेखिकेने या पुस्तकात लाॅकडाऊन आणि कोरोना काळाशी संबंधित अशा अनेक कथा लिहिल्या आहेत.साधारणपणे २०२० च्या मार्चमध्ये कोरोना भारतात आला. जास्तकरून पुणे, मुंबई या भागात.. परदेशात आपल्या नातेवाईकांकडे गेलेल्या आई-वडील, किंवा जवळचे नातेवाईक यांना या कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड द्यावे लागले.त्या गोष्टी चा अनुभव आम्हाला ही घ्यावा लागला, कारण आम्ही दोघे तेव्हा दुबई हून आलो होतो.त्यामुळे कथेतील काही अनुभव आम्ही घेतले होते.

कोकणातील मालघर सारख्या लहान खेड्यात राहून लेखिका तेथील रसरशीत आयुष्य अनुभवते आहे.तेथील अनुभव कथेच्या रुपात वाचायला खूपच आवडले.

२३ कथांचा हा संग्रह आहे.त्यांत कोकणातील चालीरीती,उत्सव, जीवनशैली या सर्व गोष्टी दिसून येतात.’स्पर्शतृष्णा’, मातृत्व’ती आई होती म्हणुनी’यासारख्या कथा मनाला स्पर्शून जातात.’कोरोनाची गोष्ट’ वाचताना दोन वर्षांपूर्वी आपण जे पाहिले,अनुभवले ते अगदी डोळ्यासमोर उभे राहते.

आत्ता च्या काळाशी सुसंगत आणि ओघवत्या भाषेत लिहिलेल्या कथा वाचायला खूप छान वाटले..

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “जाणिवांच्या परिघात” …स्वाती दाढे “सुखेशा” ☆ परिचय – सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “जाणिवांच्या परिघात” …स्वाती दाढे “सुखेशा” ☆ परिचय – सुश्री प्रभा सोनवणे 

प्रगल्भ जाणिवेची कविता ….

स्वाती दाढे “सुखेशा” हे नाव वाङ् मय क्षेत्रात सुपरिचित आहे. गेली अनेक वर्षे  अनेक दर्जेदार मासिकांमधून तिच्या  कविता प्रकाशित होत आहेत.

सुखेशा झाडाझुडपात, पानाफुलात, पक्षांमध्ये रमणारी संवेदनशील कवयित्री,तिची कविता तिच्या सौम्य, मृदुल व्यक्तिमत्त्वासारखीच तरल, हळूवार आहे, त्यात कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश नाही. या कवयित्रीने कुठलीच पताका खांद्यावर घेतलेली नाही, या कवितेत कुठलाच “वाद” नाही तरीही ही समग्र कविता अतिशय प्रगल्भ आहे,

या कवितांना आध्यात्मिक बैठक आहे, निसर्गाची ओढ आहे,स्त्रीजाणिवा, मैत्री, प्रेम, सामाजिक बांधिलकी, आई…..असे अवती भवतीचे सारे विषय ही कविता चितारते!

“जाणिवांच्या परिघात” हा सुखेशाचा दुसरा कविता संग्रह आहे. तिचा “मन हिंदोळा हिंदोळा” हा कविता संग्रह २०१५ मधे प्रकाशित झाला आहे. “जाणिवांच्या परीघात” मध्ये त्यानंतरच्या म्हणजे २०१६ ते २०२१ या कालखंडात लिहिलेल्या आहेत, बहुतांश कविता विविध मासिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत!

या संग्रहातील कविता सुसंस्कृत मनाचे हुंकार आहेत, एक शिस्तबद्ध सहजसुंदर, सुरेख शब्दकाळा असलेली ही कविता निश्चितच मोहात पाडते. कवयित्रीने आपल्या कवितेचे तीन भागात वर्गीकरण केले आहे. पहिल्या भागात सुंदर अभंग रचना आहेत.

कमलिनी पत्र कोरडे जलात

निर्लिप्त, स्वमग्न डोलतसे

या अभंग रचनेमागे कवयित्रीचे फार मोठे चिंतन आहे हे जाणवते, एकूणच काव्य रचनेत चिंतन, मनन, अभ्यासू वृत्ती, व्यासंग जाणवतो!

व्यासांची प्रतिमा उष्टावे जगात

ते महाभारत नित्य येथे ॥

जीवनातील सत्य उकलून दाखवणारे अनेक अभंग दाद घेऊन जातात.

स्वशोधाची, आत्मभान असलेली ही कविता आहे. स्री म्हणून जगताना आलेले अनुभव, क्वचित कुचंबणा,उपेक्षा खूप बारकाईन तिची लेखणी टिपते, तिने केलेल्या रचनांना  ती गझलसदृश म्हणते, ती कुठल्याही वादात अडकत नाही,

या ठिकाणी मला ख्यातनाम हिंदी कवी निरज यांचा कुणीतरी सांगितलेला किस्सा आठवला, ते गझल समीक्षकांना म्हणाले होते, “तुम्ही माझ्या रचनांवर काही टीका करा, त्या माझ्या गितिका आहेत. “

सृष्टी घेते बहुविध रूपे,मोहक कधी भेसूर

परी न लोपो अंतरीचा तो निर्मळ उमदा सूर

या सर्व कवितांमध्ये कवयित्रीने अंतरीचा निर्मळ उमदा सूर जपलेला आहे.अनेक रचना खूप मोहक आहेत, अगदी मनात रुंजी घालणा-या !

नकळत हासुनि पाहता तुझ्याकडे

वावडि इश्काची उठवतात लोक

किंवा 

हवे तसे सजून धजून, पुरव हौस स्वतःची

हाक येता सोडून सारे निघायला हवे

 या सर्व कवितांमधे आत्मचिंतन आहे, ही कविता प्रांजळ,प्रामाणिक आणि स्वच्छ आहे! या कवितेने स्वानंद स्वर जपलेला आहे.कवयित्रीने बंगाली भाषा आत्मसात केली,त्यात विशेष प्रावीण्यही मिळवले. मा.रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्याचा अभ्यास व अनुवाद केला आहे, सुखेशाची लेखणी चौफेर संचार करणारी आहे,या कवयित्रीला चांगल्या गोष्टींचा ध्यास आहे आणि  एकला चालो रे…..या उक्ती प्रमाणे ती आत्ममग्न राहून  हा ध्यास जपते आहे.

माझ्यावर मी टीका करणे आहे सोडून दिले

मीच स्वतःला कमी लेखणे आहे सोडून दिले

आजकालच्या जमान्यात प्रत्येकाची श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची चढाओढ लागलेली दिसते, अत्यंत सामान्य वकुबाची माणसेही बढाचढाकर स्वतःच्या कार्य कर्तृत्वाची खोटी शेखी मिरवताना दिसतात तेव्हा खरोखर असा प्रश्न पडतो आपणच का स्वतःला इतकं कमी लेखतोय? विनयशील रहातोय? आपल्याकडे जे आहे ते स्वतःचं आहे, प्रांजळ आहे, निखळ आहे मग का स्वतःला कमी लेखतोय आपण?

 या संग्रहातील पुढील द्विपदी पहा–

भरभर किती बाई आवरु हा पसारा

चिडचिड अति होई कोंडला जीव कारा

अशी अप्रतिम रचना ती सहजपणे लिहून जाते.

तिस-या भागात संमिश्र कविता आहेत, तृणी या पादाकुलक वृत्तातील कवितेत मनोहर निसर्ग चित्र आहे, “रद्दी” ही कविता मला विशेष आवडली,यात प्रत्येक कवयित्री/लेखिकेचे  सनातन दुःख नेमकेपणाने आले आहे, प्रतिभा ही ईश्वरदत्त देणगी असलेल्या स्त्रीची उपेक्षा…श्रेय न देण्याची वृत्ती हे सार्वत्रिक सत्य आहे, ” ” श्रेयाचा लाभ न होणं,या सारखा दुसरा शाप नाही ” असं म्हटलं जातं ते  “रद्दी” या कवितेत दिसतं.

“तिनोळी” या नाजूक काव्य प्रकारातल्या काही कणिका–

माघाची चाहूल

खोडांवर खळबळ

आली की पानगळ

*****

वाढतं वय

ओसरतं सौंदर्य

मनभर औदार्य

या सर्व कवितांमध्ये विविधता आहे,जीवनातील महत्वपूर्ण असे विषय या कवितांमधे आले आहेत.

सावळ मेघांनी कोंदले आभाळ

आता रानोमाळ जलोत्सव

ही कवयित्री निसर्गावर नितांत प्रेम करते हे तिच्या अनेक कवितांमधून जाणवते!

स्त्रीपुरूष समानतेची तिची मागणी सौम्य शब्दात ती व्यक्त करते.

सद्यस्थितीवर भाष्य करणारी दोन विडंबन गीते अंतर्मुख करणारी आहेत.  “जाणिवांच्या परिघात” दखल घेण्याजोगा, वाचनीय, आरस्पानी कविता संग्रह आहे. या कवितांमधून कवयित्रीच्या प्रगल्भ जाणिवा जाणवत राहतात!हा काव्यसंग्रह अनाहत प्रकाशनाची सुंदर पुस्तक निर्मिती आहे.

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈



मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ जंगलवाट ….सौ. सावित्री जगदाळे ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ जंगलवाट….सौ. सावित्री जगदाळे ☆ परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

 

सौ. सावित्री जगदाळे

जंगलवाट – सौ सावित्री जगदाळे

झाडं, प्राणी आणि पक्षांनी जंगल गजबजलेलं असतं. त्या जगलाचं माणसाशी नातं असतं. माणसाला जंगलाची ओढ असते. लेखिकेनं मुलांच्या निरागसतेतून जंगल आणि माणसाचं नातं उलगडलेलं आहे. मोविची साल, बारशिंग, मखर, हेडशिंग, मोडशिंग, रायगोंदण्या, कडूशेंदण्या, होले, चित्तर, धपचिड्या, कुंभारकड्या आणि भूक लाडू या सारखे शब्द जंगलाची भाषा सांगतात. जंगलाशी मैत्री केली तर आपल्याला जंगलाची भाषा कळू लागते, आपण जंगलाशी एकरूप होऊन जातो. जंगलातील ही वाट आपल्याला नक्कीच निसर्गात घेऊन जाते. आपण या वाटेने चालत जाऊ!

‘जंगलवाट’  किशोर वयाच्या मुलांना नक्कीच आवडेल. मुलांचे भावविश्व रुंद होऊन निसर्गाशी नातं घट्ट होईल.

सावित्री जगदाळेंच्या जंगलवाटेला वाचताना प्रत्यक्षात जंगलातील निरागस मायाळू लेकरं – माणसं, पशू – पक्षी, अलगद आपल्याला आपलसं करून घेतात . पोहे कमी भरले म्हणून एवढया छोट्याशा कारणासाठी भावानं बहिणीला मारण्याची हळहळ, माणसाच्या हातांनी होणाऱ्या निसर्गाच्या नुकसानाची तळमळ, कुत्र्याप्रमाणे माणसालाही जिभेचा वापर औषध म्हणून  करता आला तर हा आशावाद नक्कीच वाचनिय, संस्कारक्षम व निसर्गाकडे घेवून जाणारा आहे. निसर्ग शब्द, नाते, भावना व आत्मियता समृद्ध करणारी ही जंगलवाट. आपल्या लेकरांनी एकदा नजरेखालून घालायला हवीच !

०००

जंगलवाट – कुमार कादंबरी

लेखिका- सावित्री जगदाळे

किंमत – १०० / – रू .

पृष्ठ – ८७

प्रकाशक – डॉ. कल्पना भगत, गाथा कॉग्निशन

*Gatha Cognition ने ‘किशोर’ वयीन मुलांसाठी पुस्तकमाला सुरु केली आहे.

किंमत – १००/- रुपये (टपाल खर्च वेगळा)

सदर पुस्तक घरपोच मिळविण्यासाठी डॉ. कल्पना भगत (9511896365) यांच्याशी संपर्क साधावा.

पुस्तक या लिंक/संकेतस्थळावरून सुद्धा खरेदी करता येईल. >>  गाथा कॉग्निशन 

तसेच ग्रंथांच्या रु. १५००/- पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीसाठी COD(Cash on delivery) ची सुविधा उपलब्ध आहे.

 

लेखिका – सौ. सावित्री जगदाळे

१००, कुपर कॉलनी, सदर बाजार, सातारा ,पीन-४१५०० १

परिचय – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈