सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “वर्षांनंद” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

प्रथम दर्शनी पुस्तकाचे नाव वर्षानंद आहे यावरून पाऊस पडून गेला आहे. त्याचे थेंब अजूनही झाडावर रेंगाळत आहेत आणि मुलांनी घेतलेला पावसाचा आनंद पाण्यातील कागदाच्या बोटी पाहून कळतो. बहुतेकांना पाऊस पावसाळा पावसाची मजा हे आवडत असल्याने एखाद्या आपल्या आवडीच्या विषयाचे चित्र म्हणून हे चित्र चटकन डोळ्यात भरते आणि मनास भावते.

काहीतरी पावसाबद्दल असेल असा मनाचा ग्रह होऊन पुस्तकात डोकावले जाते.

परंतु नीट पाहिले तर पुस्तकाच्या लेखकांची नावे लगेच खाली दिसतात आणि नंदकुमार मुरडे व वर्षा बालगोपाल यांच्या नावातील दोन दोन अक्षरे घेऊन वर्षानंद नाव आणि त्यावरून हे चित्र झाल्याचे चाणाक्षांच्या लक्षात येते.

परंतु अजूनही बारकाईने हे चित्र पाहिले तर त्यातील गहनता लक्षात येते. संथ पणे वाहणारी नदी किंवा रस्त्यावरील पाणी, त्यात सोडलेल्या दोन कागदी नावा, वरच्या बाजूने येणारी झाडाची फांदी आणि त्यावर अडकलेले पावसाचे थेंब पावसाचे पूर्ण दर्शन देऊन जाते.

पण झाडाची फांदी ही रुक्ष आहे त्यावर पाने नाहीत. त्याच्या जागी हे पावसाचे थेंब आहेत म्हणजे आता या झाडाला ओलावा मिळून पुन्हा पालवी फुटणार आहे याचे द्योतक असण्याबरोबरच, ही फांदी मानवी मनाचे प्रतिक मानले तर माणसाच्या रुक्ष मनाला नक्कीच या पुस्तकातील लेख- कवितांमधले काही शब्द मोती चिकटतील आणि त्यांच्या रुक्षमनालाही पालवी फुटेल हा लेखकांचा आशावादही त्यातून प्रतित होतो.

हे थेंब काही वेळाने नक्कीच पडून जाणार आहेत पण जेवढा वेळ ते झाडावर चिकटून असतील तेवढावेळ ते झाड मोत्यांचे झाड होऊन राहील आणि दिमाखाने मिरवेल. त्या सारखे आमचे शब्द जरी काही दिवसांनी मनातून निघून गेले तरी जेवढा काळ वाचक मनात राहतील तेवढा वेळ तरी तुमची मने सौख्य मोत्यांनी झुलतील असेही सुचवायचे आहे.

जीवनाचा प्रवास एकट्याने करायचा कंटाळा येतो म्हणून बरोबर कोणी मित्र मैत्रिण असेल तर तो मोठ्या दिमाखाने हेलकावे घेत का होईना चालू रहातो. तसेच या पुस्तकातील लेखन पाण्यात दोन मित्रत्वाने एकत्र आलेल्या जीवांच्या विचारांच्या दोन नावा आहेत. या एकमेकांसवे डौलत असताना त्याचा आनंद इतरही घेणार आहेत.

तसेच अंतरंगात पाहिल्यावर कळते यामधे ललीत लेख आणि कवितांचा समावेश आहे म्हणून लेखनाच्या पाण्यात या दोन प्रकारच्या नौका प्रवास करताना दिसत आहेत.

खर्‍या पावसाशी संबंध आहे का नाही असा विचार जरी आला तरी लेखकांच्या विचारांचा पाऊस येथे पडणार आहे. त्यातील काही विचारांचे मोती होऊन ते मनाला चिकटणार आहेत. आनंदाची पालवी देणार आहेत या लेखनाच्या नदीत दोन भिन्न प्रकारच्या व्यक्ती विचारांच्या, दोन वेगळ्या प्रकाराच्या नौकानयन करणार आहेत या विचाराने भारावून जाऊन अंतरंगात डोकावायचा मोह झाल्याशिवाय रहात नाही.

नौकांचा रंगही हिरवा आणि केशरी असून त्याचे शिड पांढरे आहे जे आपल्या तिरंग्याचे द्योतक आहे. अर्थातच यातील काही लिखाण देशभक्ती, देशातील समाज यांच्याशीही निगडीत आहे असे सुचवते.

इतक्या मोठ्या आशयाचे दही घुसळून त्यात मतितार्थाचे  लोणी तरंगत आहे असे बोलके मुखपृष्ठ मुक्तांगण प्रकाशनच्या समृद्धी क्रियेशनने तयार केले म्हणून मुक्तांगण प्रकाशनच्या राजू भानारकर आणि लेखक नंदकुमार मुरडे यांनीही या चित्राची पसंती केली म्हणून आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments