मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र) => लेखक : मा. यशवंतराव चव्हाण ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
सौ. सुचित्रा पवार
पुस्तकावर बोलू काही
☆ “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र) => लेखक : मा. यशवंतराव चव्हाण ☆ परिचय – सौ. सुचित्रा पवार ☆
पुस्तक : “कृष्णाकांठ” – (आत्मचरित्र)
लेखक : मा. यशवंतराव चव्हाण.
रोहन प्रकाशन
पृष्ठे-३१७
मूल्य-३००₹
☆ ‘कृष्णाकाठ‘- एक आदर्श राजकीय जडणघडण – सुश्री सुचित्रा पवार ☆
महाराष्ट्र मातेला लाभलेला एक आदर्श व्यक्तिमत्व. खरे तर हे त्यांचे आत्मचरित्र नसून एका यशस्वी नेत्याचा खडतर प्रवास आहे. एखादे लाडके, आदर्श, महान व्यक्तिमत्त्व मोठ्या घरात किंवा श्रीमंत घरात जन्म घेतल्याने घडते असे नसून आपल्या अंगच्या चांगल्या गुणांचे उदात्तीकरण केल्याने व आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरच घडते हे अधोरेखित करणारा यशवंतराव चव्हाणांचा हा थोडक्यात जीवनप्रवास. एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म ते प्रथम पार्लमेंटरी सेक्रेटरी पर्यंतचे त्यांच्या जीवनातील चढ उतार व स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सक्रिय सहभाग याचा तटस्थ मागोवा म्हणजे ‘कृष्णाकाठ’ होय.
या नेत्याबद्दल कुणाच्या मनात प्रेम, आपुलकी, आदर नसेल असा माणूस महाराष्ट्रात विरळाच. मलाही त्यांच्या जीवन चरित्राबद्दल आणि एकूणच व्यक्तिमत्त्वाबद्दल कसे न कधी कुतूहल, आदर, आपुलकी न जिव्हाळा निर्माण झाला हे आठवत नाही पण त्यांच्याबद्दल अपार जिव्हाळा आणि कमालीचा आपलेपणा आणि आदर वाटतो हे मात्र खरे.
१२मार्च १९१३ रोजी अशा या लाडक्या व्यक्तिमत्त्वाचा जन्म विट्याजवळील(जि सांगली) ढवळेश्वर या अतिशय छोट्याशा खेडेगावातील अतिसामान्य अशा शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माची पण हृदयस्पर्शी कहाणी आहे. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या आई बेशुद्ध झाल्या. देवराष्ट्रे आजोळ, ग्रामीण भाग आणि त्याकाळी दवाखाने, उपचार, औषधे याबाबतीत आपण मागासच होतो. त्यांच्या आईची न बाळाची सुखरूप सुटका व्हावी यासाठी आजीने सागरोबाला साकडे घातले व यश दे म्हणून प्रार्थना केली. झालेच तर तुझी आठवण म्हणून मुलाचे नाव ‘यश’वंत ठेवेन अशीही प्रार्थना केली आणि बाळ बाळंतीण सुखरूप सुटले. त्यावेळच्या आर्थिक सामाजिक परिस्थिनुसारच त्यांचेही बालपण होते. वडील कराडला बेलीफ. दोन थोरली भावंडे व आई यांच्यासोबतच्या सुखदुःखाचा प्रवास, कुटुंबाने वेळोवेळी त्यांना दिलेली साथ, मदत आणि निरक्षर आईचे आपल्या लाडक्या लेकास स्वातंत्र्य चळवळीत झोकून देण्याची संमती याचे वस्तुनिष्ठ चित्रण म्हणजे कृष्णाकाठ.
प्लेगच्या साथीत वडिलांचा मृत्यू झाला त्यामुळं लेखकास लहानपणी पित्याचे प्रेम मिळू शकले नाही. लहान लहान मुलांना घेऊन आईने माहेरची वाट धरली. देवराष्ट्रे(जि. सांगली) हे त्यांचे माहेर म्हणजेच यशवंतरावांचे आजोळ. त्यांचे बाल्य इथंच गेले. इथल्या मातीत इथल्या ओढ्याकाठी ते आपल्या सवंगड्याबरोबर वेगवेगळे खेळ खेळत, पोहत.
लहान लहान मुले व तुटपुंजे उत्पन्न यामुळे चव्हाण कुटुंबियांचे हाल झाले पण आईने कष्टातून, जिद्दीने त्यांच्यावर शिक्षणाचा संस्कारआणि जिवनाचा सुसंस्कार दिला. वडील बेलीफ अर्थात सरकारी नोकरीत असल्याने सांत्वनाला आलेल्या वडिलांच्या एका सहृदय मित्राने(शिंगटे) अनुकम्पा तत्वावर थोरल्या भावाच्या नोकरीसाठी खटपट केली आणि मोठ्या भावाला(ज्ञानदेव)नोकरी लागली व चव्हाण कुटुंब परत कराडला वडिलांच्या कर्मभूमीकडे गेले. तीच यशवंतरावांची देखील एका अर्थाने कर्मभूमीच होती. शिक्षण, व्यवसाय आणि स्वातंत्र्य चळवळीत घेतलेली उडी आणि सक्रिय सहभाग या सर्व बाबी कराड व कराडच्या आसपासच्या परिसरातच घडल्या.
कराडला स्थाईक झाल्यावर त्यांच्या आईने मुलांवर सर्वात महत्वाचा संस्कार दिला तो म्हणजे शिक्षण. कळत्या वयात यशवंतरावाना सुद्धा कळून चुकले की जीवनात व्यवस्थित रित्या तरून जायचेअसेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. काही माणसे विशिष्ट कर्मासाठीच जन्माला येतात त्यातलेच एक यशवंतराव देखील. घरात कुठलीच राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी नसताना यशवंतरावांचे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणे आणि नंतर वेगवेगळी राजकीय पदे भूषवणे हे त्याचेच द्योतक आहे.
ते दिवस होते स्वातंत्र्य चळवळींनी भारलेले. करू वा मरू, चले जाव, असहकार, उपोषण अशा नाना चळवळी अगदी टिपेला होत्या. प्रत्येकाचे रक्त स्वातंत्र्य प्रेमाने उसळत होते. (अपवाद देशद्रोही)साहजिकच आसपासच्या वातावरणाचा परिणाम लेखकाच्या मनात खोलवर रुजला. पण तो अगदी मुळापासून होता, त्यांच्या रक्तातच जणू स्फुरण चढले. मनात एखादा विचार खोलवर रुजणे, त्याचा अंगीकार करणे आणि या विचारांशी कुठल्याही परिस्थितीत प्रतारणा न करणे हे कोण्या सोम्या-गोम्याचे काम नसते. पोलिसांची एक लाठी बसली किंवा एक तुरुंगवास भोगला की सामान्य माणूस रुजलेला विचार मुळासकट काढून फेकतो पण यशवंतराव अशा हलक्या मातीचे बनले नव्हते.
शाळकरी वयातच म्हणजे जेमतेम१३-१४ व्या वर्षीच त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली. इंग्रज सरकार विरुद्ध केलेल्या भाषणासाठी त्यांना कैद करण्यात आले पण शाळकरी वय म्हणून एक दिवस तुरुंगात ठेवून दुसऱ्या दिवशी त्यांना सोडून दिले. यशवंतरावानी आपले विचार, आपण काय करणार?आपल्या जीवनातील सर्व घडामोडींची चर्चा प्रत्येक वेळी आपल्या मोठ्या भावांशी आणि आईशी केली. आसपासच्या भीतीदायक वातावरणाचे व धर पकडीचे भय व आपल्या मुलाची काळजी त्यांच्या आईला वाटणे साहजिकच आहे पण त्या माऊलीने आपल्या मुलाच्या कोणत्याच धाडसाला विरोध केला नाही. फक्त शाळा न सोडता, शैक्षणिक नुकसान न करता जे काही करता येईल ते करण्याचा सल्ला दिला आणि यशवंतरावांची चळवळीतील घोडदौड सुरू झाली ती इप्सित धेय्याच्या अलीकडे थांबली.
१९३२ साली यशवंतरावाना पहिल्यांदाच अठरा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. इतकी मोठी सजा प्रथमच तेही अगदी पोरसवदा वयात. त्यांना येरवडा इथं नेले जात असता आई व त्यांचे शिक्षक भेटायला आले होते. आईला अर्थातच दुःख झाले. शिक्षकांनी सांगितले की तू माफी मागीतलीस तर तू सुटशील. पण आईने बाणेदार पणे सांगितले, माफी कशासाठी मागायची?जे होईल त्याला सामोरे जायचे. धन्य ती आई!अशा अनेक माऊलीनी आपले पोटचे गोळे काळजावर दगड ठेवून देशाला दिलेत म्हणून आज आपण स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत. येरवडा येथील तुरुंगात गांधीजी सुद्धा शिक्षा भोगत होते मात्र कैदी जास्त असल्याने जवळच सर्व कैद्यासाठी स्वतंत्र बराकींची व्यवस्था करण्यात आली होती. छोटे छोटे तंबू प्रत्येक कैद्यासाठी उभारले होते. शिक्षा ही शेवटी शिक्षाच असते पण तिथं सहवासात आलेल्या एस एम जोशी व इतर बड्या बड्या आणि महत्वपूर्ण नेत्यांशी, व्यक्तिमत्वाशी ओळख व मार्गदर्शन झाल्याने शिक्षाही जीवनाला दिशा देणारी ठरली आणि सुसह्य झाली. वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन व त्या अनुषंगाने होणाऱ्या चर्चेतून जणू त्यांना भविष्यातील जीवनाचे नवनीत मिळाले. यतींद्रनाथांचा सुद्धा यशवंतरावांवर मोठा प्रभाव होता. त्यांच्या मृत्यूनंतर यशवंतराव खूप दुःखी झाले जणू घरातीलच एखादी व्यक्ती गेली आहे. साने गुरुजींशी झालेली त्यांची भेटसुद्धा उल्लेखनीय आहे.
अठरा महिन्यांची सजा भोगून आल्यानंतर त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत पूर्ण केले. शिक्षणाची आस, जिद्द, स्वातंत्र्य चळवळीतील धाडस व स्वभावातला गोडवा यामुळं शिक्षक प्रिय विद्यार्थी राहिले. पुढं व्यावसायिक शिक्षणासाठी पुणे इथं प्रवेश घेतला. विधी परीक्षा उत्तीर्ण होऊन कराड मध्ये त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. दरम्यान वेणूताईंशी विवाह देखील झाला.
यशवंतराव भूमिगत असताना सरकारने धरपकड सुरू करून कुटुंबियांना त्रास देणे सुरू केले. मोठ्या भावाची सरकारी नोकरी असल्याने खूप बिकट स्थिती होती. वेणूताईंना आणि त्यांचे मधले बंधू गणपतरावना अटक झाली. यावेळचे दोन प्रसंग खूप हृदय हेलवणारे आहेत. वडीलबंधूंचा गणपतरावांवर जीव होता व
गणपतरावांचा यशवंतरावांवर. गणपतरावांच्या सजेत सूट मिळवण्यासाठी ऐकीव माहितीवर घाई घाईने त्यांनी स्वतःच्या आवाळूचे ऑपरेशन करून घेतले. जखम चिघळू नये म्हणून डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला त्यांनी मानला नाही आणि जखम चिघळून त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. इकडं गणपतराव सुद्धा क्षयाने आजारी पडले. मिरजेत त्यांचे उपचार सुरू झाले. पण कुटुंबाच्या आर्थिक ओढाताणीसाठी ते आरोग्याकडे दुर्लक्ष करून काम करायला बघायचे व आजार बळावयाचा.
पुढं सार्वत्रिक निवडणुका झाल्या. कोणत्याही पदाची अपेक्षा न धरणारे किंवा स्वतःसाठी पुढं पुढं करणे हे त्यांच्या स्वभावातच नव्हते. पण तरीही त्यांची निवड पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून झाली. द्विधा मनःस्थितीतच ते बंधू गणपतराव, पत्नी वेणूताई आणि आईला सल्ला विचारण्यासाठी गेले असता तिघांनीही एकमतांनी पुढं जाण्यास सुचवले आणि त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. लेखक म्हणतात की मुंबईला जाताना मनात असंख्य विचार, पाठीमागील सर्व आयुष्य नजरेसमोर तरळून गेले. बोगद्यातून गाडी जात असताना ही भविष्यातील चढ उतारांची नांदी तर नसावी ना?असे वाटून गेले.
पुस्तक इथं संपलं. ‘कृष्णाकाठ’ खरे तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या व्यापक चळवळीचा एक अगदी छोटासा कोपरा आहे. पुस्तकातील प्रत्येक घटना प्रसंग त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवते. त्यावरून आपल्याला देशव्यापी चळवळ किती मोठी न व्यापक असेल याची कल्पना येते. लेखक स्वतः या चळवळीचा महत्वपूर्ण हिस्सा असले तरी त्याचे सर्व तपशील, घडामोडी आणि घटना या त्रयस्थपणे मांडल्या आहेत जे होतं तसच्या तसं. इतकेच काय त्यांनी आपल्या कौटुंबिक परिस्थितीचे वर्णन सुद्धा अतिरंजित पणे केलं नाही. नाहीतरी कित्येक लेखकांनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी अतिरंजित, तिखट मीठ लावून सांगून वाचकांकडून दया मिळवली आहे. पण स्वतः लेखकांनी कबूल केलेय की त्यावेळी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची जशी परिस्थिती होती तशीच आमची देखील होती. त्याला मी अतिरंजित करून सांगू इच्छित नाही. त्यांच्या जीवनातील कितीतरी प्रसंग आपल्या अंगावर काटा आणतात. बिळाशीत मैलोन मैलाचा प्रवास करून गुप्तपणे प्रवेश करणे, तिथं सभा घेणे आणि पोलिसांना न सापडता नदीतून पोहत कोल्हापूर गाठणे. मिळेल ती भाजीभाकरी खाऊन पुढचा कार्यक्रम करणे. कार्यकर्त्यांशी गुप्त चर्चा करणे, संघटना बांधणे. कोणत्याही प्रकारची संपर्क साधने नसताना त्यावेळची देशभक्तांची गुप्तचर संघटना किती प्रभावी व अचूक होती हे पुस्तक वाचताना समजते न आपण मनोमन सर्वाना नमन करतो. शालेय जीवनात शिक्षकांनी “तू कोण होणार?”याचे साधे सोपे उत्तर “मी यशवंतराव होणार”असे दिल्यावर शिक्षकांनी त्यांना गर्विष्ठ, शिष्ट समजणे अशा कुठल्याच प्रसंगात त्यांना तिखट मीठ लावण्याचा मोह झाला नाही.
आपल्या मनमिळावू स्वभावाने माणसे जोडणे त्यांना समजून घेणे व बरोबर घेणे यामुळे ते सर्व मित्रात प्रिय राहिले. आपल्या जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या व चळवळीस सहकार्य करणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सर्व सुहृदांचा त्यांनी उल्लेख केलाय आणि आठवणही ठेवली आहे. लहानपणापासून सर्व स्तरातील मुलांसोबत मैत्र केले आणि शेवट पर्यंत ते निभवले. आपले वाचन, चिंतन, मनन यामुळं सभा जिंकत राहिले. सर्वांशीच कृतज्ञता भाव ठेवला.
आपल्या कोमल हृदयामुळे ते सर्वाना आपले वाटले. आजपर्यंत आपण फक्त श्यामची आई वाचली पण यशवंतरावांच्या आईंवर सुद्धा एक स्वतंत्र पुस्तक होईल असे वाटते. पतीच्या पाठीमागे इवल्या लेकरांना खडतरपणे वाढवणारी, प्रत्येक प्रसंगात आपल्या मुलांचा आधार होणारी, कुटुंबाला प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवणारी मायाळू आई. जिने देशाला, मराठी मातेला एक थोर सुपुत्र दिला, आदरणीय व्यक्तिमत्व व आदर्श नेता दिला.
इतकी मोठी पदे भूषवून देखील आपली नाळ जन्मभूशी, मातीशी जोडून ठेवणारे विरळाच, यशवंतराव त्यातलेच एक.
या मातेला आणि यशवन्तरावाना माझे कोटी कोटी प्रणाम.
लेखक : मा. यशवंतराव चव्हाण.
समीक्षक – © सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈