मराठी साहित्य – ☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ “आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“आणि शेवटी तात्पर्य” – भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆ परिचय – सौ. राधिका भांडारकर ☆ 

पुस्तकाचे नाव   आणि शेवटी तात्पर्य(लघुकथा संग्रह)

मूळ लेखिका     हंसा दीप

अनुवाद            उज्ज्वला केळकर

प्रकाशक           मिलिंद राजाज्ञा

पृष्ठे                  १८४

किंमत              रु. ३३०/-

नुकताच,  सौ उज्ज्वला केळकर यांचा, “आणि शेवटी तात्पर्य ..”हा अनुवादित कथासंग्रह वाचनात आला.

यात एकूण १७ कथा आहेत आणि त्यांच्या, मूळ हिंदी लेखिका, कॅनडास्थित डॉक्टर हंसा दीप या आहेत.

डॉक्टर हंसा दीप या मूळच्या भारतातल्याच. त्या आदिवासी बहुल परिसरात जन्मल्या, वाढल्या, शिक्षित झाल्या.  त्यांनी शोषण, भूक, गरिबीने त्रस्त झालेल्या आदिवासींचे, तसेच परंपरांशी झुंजत, विवशतांशी लढणाऱ्या मध्यमवर्गीयांचे जीवन जवळून अनुभवले. त्यातूनच या कथा जन्माला आल्या.सृजन व संघर्षाचा अनुभव देणाऱ्या, या सुंदर कथांचं,  नेहमीप्रमाणेच उज्ज्वला ताईंनी केलेले अनुवाद लेखन, तितकंच प्रभावी आणि परिणामकारक आहे, हे या कथा वाचताना जाणवतं.

यातली पहिलीच, शीर्षक कथा ..”आणि शेवटी तात्पर्य ..”वाचताना, एक सहज वास्तव मनाला स्पर्शून जातं.  परदेशातले एक मंदिर आणि तिथे ध्यान धारणेसाठी जमलेली परदेशस्थित, भारतीय तरुण, वृद्ध, मध्यमवर्गीय माणसे. त्यांचे आपापसातले संवाद, चर्चा, आणि एकंदरच, वरवरचं  भासणारं वातावरण. या भोवती मंदिरातल्या पंडितांचही जोडलेलं, पोटासाठीचं भक्तिविश्व. केवळ एक व्यवसाय. आणि या सर्वांचे, शेवटी तात्पर्य काय तर मंदिरात येणारे भाविक आणि पंडित यांचा उथळपणा.

‘आपण काही क्षण तरी नतमस्तक झालो’, इतकेच श्रद्धेचे मापदंड.आणि त्यांच्या भावना एनकॅश करणारे पंडीत.  याचे सहज प्रतिबिंब, या कथेत उमटले आहे.

पोपटी पान पिवळं पान… या कथेत एका वृद्ध असहाय झालेल्या, एकेकाळच्या प्रख्यात डॉक्टरांची, एकाकी मानसिकता, त्याला बेबी सिटिंग च्या निमित्ताने सापडलेल्या, काही महिन्यांंच्या बाळासोबत झालेल्या दोस्तीमुळे, कशी बदलते, याचं अत्यंत भावस्पर्शी, अद्भुत वर्णन वाचायला मिळतं.

प्रतिबिंब…. ही कथा तर अत्यंत ह्रदयस्पर्शी आहे. नातीच्या आणि आजीच्या नात्याची ही कथा अतिशय भावपूर्ण, सहज बोलता बोलता लिहिली आहे.

जी आजी, नातीला लहानपणी  प्रॉब्लेम आजी वाटायची, तीच आजी, नात स्वतः मोठी झाल्यावर तिच्या अस्तित्वात कशी सामावून जाते, या प्रवासाची ही एक सुंदर कहाणी.

रुबाब… ही कथा लहान मुलांच्या विश्वाची असली तरी, माणसाच्या जीवनात पॉवर ही कशी काम करते, आणि त्यातूनच लाचखोरीची वृत्ती कशी बळावते, याचीच सूचना देणारी, काहीशी रूपकात्मक कथा वाटते.

मला नाही मोठं व्हायचंय… या कथेतील शेवटची काही वाक्यं मनाला बिलागतात.  कथेतल्या परीचे बालमन का दुखतं, त्याचं कारण हे शब्द देतात.

“मोठ्या लोकांना कळतच नाही की, जे तिने बघितले आहे,तिला आवडले आहे तेच काम ती करू शकेल ना? तिला पसंत असलेलं प्रत्येक काम ही मोठी माणसं रिजेक्ट का करत आहेत? तिच्या ‘मी कोण होणार’ या कल्पनेला का डावलतात?”

मग तिने मोठे होण्याचा विचारच मनातून काढून टाकला. वरवर ही बालकथा वाटत असली तरी, ती रूपकात्मक आहे, माणसाच्या जीवनाला एक महत्वाचा संदेश देणारी आहे.

छोटुली…  या कथेतल्या बालकलाकारावर, पालकांच्या प्रसिद्धी, पैसा, एका ग्लॅमरच्या मोहापायी होणारा आघात अनुभवताना, मन अक्षरशः कळवळते.

तिचं सामर्थ्य… ही कथा एका शिक्षण संस्थेत असलेल्या, द्वेषाच्या स्पर्धेवर प्रकाश टाकते.मिस हैली,एक प्राध्यापिका, तिच्यावरचे आरोप ती कशी परतवून लावते,आणि स्वत:चे निर्दोषत्व सिद्ध करते याची ही ऊत्सुकता वाढवणारी  कथा ,खूपच परिणामकारक आहे.

प्रोफेसर …ही कथा फारशी परिणामकारक नसली तरीही प्रोफेसर, विद्यार्थी, शिक्षणाबद्दलची अनास्था, राजकारण आणि या पार्श्वभूमीवर अधिकार आणि कर्तव्य याची, उपरोधिक, उपहासात्मक केलेली उलगड, ही चांगल्या प्रकारे  झाली आहे.

पाचवी भिंत… ही कथा समता सुमन या निवृत्त होणार्‍या,शाळेत प्राचार्य असलेल्या व्यक्तीच्या राजकारण प्रवेशाची आहे. काही धक्के बसल्यानंतर, राजकारण की पुन्हा शांत जीवन, या द्वद्वांत सापडलेल्या मनाची ही कथा खूपच प्रभावी आहे. आणि शेवटी समताने स्वीकारलेले आव्हान, आणि तिचे खंबीर मन, या कथेत अतिशय सुंदररित्या चितारले आहे.

रुपेरी केसात गुंतले ऊन… ही कथा तशी वाचताना हलकीफुलकी वाटली तरी, त्यात मनाच्या गाभाऱ्यातलं एक गंभीर खोल सत्य जाणवतं. आठवणीत रमलेल्या चार वृद्ध बहिणींच्या गप्पा, या कथेत वाचायला मिळतात.

“आतलं दुःख आजच काढून टाकायचं. हसून ,घ्यायचं.”

कुंडीतील सुकलेली फुले, पुन्हा नव्याने ताजी होत होती …..ही काही वाक्यं अंतराचा ठाव घेतात.

बांधाच्या खांद्यावर नदी.. .या कथेत भावनिक आंदोलनात सापडलेली स्त्री, अखेर त्यातून स्वतःच कशी सावरते, याचे एक सकारात्मक भावचित्र रेखाटलं आहे.

मधमाशी…ही कथा उल्लेखनीय आहे. अतिशय तरल भावनेला, बसलेला धक्का,यात अनुभवायला मिळतो.

तिचं हसू …..ही कथा जाणीवा नेणीवांच्या पलीकडची आहे.  या कथेत एका अकल्पित प्रेमाची ओळख होते. चूक की बरोबर या सीमारेषांच्या पलीकडे गेलेली, ही कथा मनाला घट्ट धरून ठेवते.

समर्पण…. या कथेत कोरोनाचा तो एक भयाण असा विनाशकारी काळ ,एका वेगळ्याच मानवतेचं ही दर्शन देतो. एक वृद्ध रुग्ण, स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा, एका तरुण रुग्णाच्या,  संपूर्ण भविष्याचा विचार करून मृत्यूला सामोरे जाण्यास तयार होते.

“त्याला या वेंटिलेटरची माझ्यापेक्षा जास्त गरज आहे. मी माझं आयुष्य जगले आहे. त्याचं जगणं महत्त्वाचं आहे.” असं डॉक्टरांना सांगून ती तिच्या जीवनाचे समर्पणच करते. अतिशय सुंदर कथा!

माझ्या घरच्या आघाडीवर….. ही कथा तशी हलकीफुलकी असली तरी परिवाराच्या सौंदर्याची मेख सांगणारी आहे. स्त्री सवलीकरणाच्या आंदोलनापासून, सुरुवात होणाऱ्या या कथेत, अंदोलनातला रुक्षपणा पटवून देणारी, काही वाक्यं मनाला फारच पटतात.

सविता, नेहा, एलिसिया, आणि यापूर्वी पाहिलेली आजी, आई, यांचा रुबाब सुयशच्या विचारांना नवी दिशा देतात. हे चेहरे त्याला आपले वाटतात. त्यांच्या धमकी भरलेल्या आवाजातही,प्रेम स्त्रवस्त असतं. ते संबंध परिवाराचा अर्थ शिकवतात. हे त्याला जाणवतं.थोडक्यात,या कथेत स्त्रियांच्या अनोख्या शक्तीत घेरलेलाच एक नायक आपल्याला भेटतो.

भाजी मंडई ….या कथेत एक विश्वस्तरीय समारंभात, देश विदेशी साहित्यिकांनी, स्वतःच्या सन्मानासाठी उठवलेला अभूतपूर्व गोंधळ अनुभवायला मिळतो. त्यातून प्रसिद्धीसाठी हापापलेल्यांचे मनोदर्शन अत्यंत वास्तविकपणे उभे रहाते.

अशा विविध विषयांवर हाताळलेल्या या सर्वच कथा मनोरंजना बरोबरच एक प्रकारचं ब्रेन वॉशिंगही करतात. आयुष्यात घडणाऱ्या बिन महत्वाच्या, साध्या, घटनातूनही आशय पूर्ण संदेश देण्याची, लेखिकेची क्षमता, कौतुकास्पद आहे.

आणि शेवटी तात्पर्य काय?.. तर एक अनोखे उत्कृष्ट कथा वाचनाचे समाधान!! उज्ज्वला ताईंची भाषांतर माध्यमांवर असलेली जबरदस्त पकड, याची पुनश्च जाणीव. त्यांचे अनुवादित लेखन, इतकं प्रभावी आहे की कुठेही मूळ कथा वाचनाचा, वाचकाचा आनंद, हिरावला जाऊच शकत नाही.  त्यासाठी आपल्याच संस्कृतीत रुजणाऱ्या कथांची, त्यांची निवड ही उत्तम आणि पूर्ण असते.

वास्तविक या कथा परदेशी वातावरणात घडलेल्या आहेत. पण तरीही त्या तिथल्या भारतीयांच्या आहेत. आपल्या संस्कृतीशी जुळणाऱ्या आहेत. म्हणून त्या वाचकाशी कनेक्ट होतात.

विचारांना समृद्ध करणाऱ्या या कथासंग्रहाबद्दल मूळ हिंदी लेखिका डॉक्टर. हंसा दीप (टोरांटो कॅनडा) आणि अनुवादिका सौ उज्ज्वला केळकर या दोघींचेही आभार आणि मनापासून अभिनंदन!!

धन्यवाद!!

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा” ☆ परिचय – सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे

लेखक -सदानंद कदम

प्रकाशक- सुनील अनिल मेहता, मेहता पब्लिशिंग हाऊस,

प्रथमावृत्ती -नोव्हेंबर,२०२१

सदानंद कदम यांचे ‘सांगाती: स्मरण झुला एका जिप्सीचा’ हे पुस्तक वाचायला मिळालं, तेव्हा खरं सांगायचं तर मला लेखकाविषयी काही माहिती नव्हती. पण जेव्हा पुस्तक वाचले, त्यांना भेटलेल्या, त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक प्रसिद्ध व्यक्तींबद्दल वाचायला मिळाले तेव्हा खरंच पुस्तक खूप आवडले ! एक दोन नाही तर अठ्ठेचाळीस व्यक्तींविषयी त्यांनी लिहिले आहे. अनेक मोठमोठ्या व्यक्तींबरोबर घालवलेले काही क्षण, काही वेळ आणि त्यांचा संवाद त्यांनी खूपच छान  रंगवले आहे. विंदा करंदीकर, कवी कुसुमाग्रज, जगदीश खेबुडकर, शांता शेळके ही तर माझी अत्यंत आवडती व्यक्तिमत्व ! त्यांच्याविषयी वाचताना तर मन भारावून जाते !

बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, रणजित देसाई ,गो नी दांडेकर, यांनी लिहिलेल्या पुस्तकांची पारायणे केलेली.. अशा थोर लेखकांचा सहवास कदम यांना लाभला. जी डी बापू लाड, नागनाथ अण्णा, शंतनुराव किर्लोस्कर, तारा भवाळकर ही तर आपल्या सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व ! इतकेच नाही तर जयमाला शिलेदार, पद्मजा फेणाणी, भक्ती बर्वे ही आपल्या नाट्य गायन क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी ! या सर्वांबरोबर काही काळाचा सहवास कदम यांना मिळाला हे तर त्यांचे भाग्यच !

त्यांचा प्रत्येक लेख वाचताना मनापर्यंत पोचतो हीच पुस्तक आवडल्याची पावती ! सुरेश भट, अशोकजी परांजपे, शाहीर योगेश या काव्यक्षेत्रातील ज्येष्ठ मंडळींचा थोडक्यात परिचय आणि लेखकाचा त्यांच्याशी काहीना काही कारणाने आलेला संबंध आणि त्याला अनुसरून त्यांना मिळालेला सहवास, यासंबंधीचे लेख वाचनीय आहेत.

अगदी सिंधुताई सपकाळ, प्रकाश आमटे यासारख्या समाज सुधारकांबरोबरही त्यांनी काही काळ व्यतीत केला होता, तर व. पु. काळे, विश्वास पाटील, शिवाजीराव भोसले तसेच  सुहास शिरवळकर यांच्याही संपर्कात कदम हे काही काळ  होते. एका सामान्य घरात रहाणाऱ्या व्यक्तीने केवळ आपल्या जगण्याच्या आनंदासाठी पुस्तक वाचन, ग्रंथ वाचन यास वाहून घेतले, त्यासाठी भरपूर पुस्तके खरेदी केली. आणि या  सगळ्या सांगात्यांना  बरोबर घेऊन आपले आयुष्य आनंददायी घडवले. कदम म्हणतात, ‘ माझ्या स्मरणाच्या, आठवणीच्या त्या झुल्यावर आजही मी झुलत असतो आणि माझ्या सोयऱ्यांचे बोट धरून वाटचाल करत असतो.’ 

 ‘ सांगाती ‘ हे पुस्तक मला आवडले आणि इतरांनाही ते वाचावेसे वाटावे यासाठी हा पुस्तक परिचय !

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आठवणींच्या रांगोळ्या’ – सुश्री हेमलता फडके ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आठवणींच्या रांगोळ्या’ – सुश्री हेमलता फडके ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

आठवणींच्या रांगोळ्या (आत्मवृत्त )

लेखिका : हेमलता भालचंद्र फडके 

प्रकाशन : प्रतिमा प्रकाशन 

(आठवणींच्या आकृती वेधक पण रंग उदास…)

हेमलता भालचंद्र फडके यांचं  “आठवणींच्या रांगोळ्या” हे आत्मवृत्त त्यांच्या व पतीच्या आठवणींचा संग्रह आहे. मराठीतील मान्यवर समीक्षक, प्राध्यापक डाॅ. भालचंद्र फडके यांच्या त्या पत्नी.. त्यांच्या निधनानंतर मन मोकळं करण्यासाठी त्यांनी ” शब्द ” या माध्यमाचा आधार घेतला..हे त्यांचं लेखन आठवणींचे कथन करणारे असल्यामुळे त्यात जीवनातले कडू गोड प्रसंग वर्णन करण्यावर भर आहे.

हेमलताबाईंनी आपल्या दोन्हीकडच्या आजोळचं चित्रण केलेले आहे.. त्या सोलापूरच्या.. माहेरचं नाव हेमलता बाबूराव कदम… महाविद्यालयीन वयात प्रा. भालचंद्र फडके त्यांच्या विधवा मावशीला शिकवायला घरी येत.. (सगळे घरचे त्यांना सर म्हणतं)

त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना ती म्हणजे सरांशी म्हणजेच प्रा. भालचंद्र फडके यांच्याशी केलेला प्रेमविवाह… भालचंद्र फडके कोकणस्थ ब्राम्हण तर या शहाण्णव कुळी मराठा.. पण त्यांच्या माहेरी प्रागतिक विचारांचा प्रभाव असल्यामुळे लग्नाला विरोध नव्हता, पण त्यांच्या आईचा मात्र होता.( त्यांना हे लग्न मान्य नव्हते) त्यामुळे प्रत्यक्ष लग्न होईपर्यंत बराच काळ गेला. इतकं होऊनही त्यांच्या सासूबाईनी त्यांना स्वीकारलं नाही. 

संघर्षशील संसाराचे हे स्मृतिचित्र — फडके यांच्याशी लग्न होईपर्यंतच्या कालखंडातील आठवणी यात आहेत..त्या सरांविषयीच्या आदराने आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने भारलेल्या आहेत. त्या लग्नानंतरही पतीला सरच म्हणत.. त्या लिहितात.. ते माझे जीवनसाथी असूनही माझे मार्गदर्शक होते. मला कधीही एक पै चा हिशोब विचारला नाही की घरात नवरेशाही दाखवली नाही…

नोकरी निमित्ताने भालचंद्र फडके यांना अकोला अमरावती येथे काही काळ वास्तव्य करावे लागले. तेथील त्यांच्या वास्तव्यातील फडके यांच्या सार्वजनिक जीवनातील यशस्वी सहभागाविषयी त्यांनी लिहिलेले आहे. ( भाषणे आदी माध्यमातून) … 

“ संसाराचं सामान हलवताना ‘— यात फडके यांच्या ( सरांच्या) पुस्तकसंग्रहाला मिळालेला डालडा तुपाच्या डब्यांचा सहवास– त्यामुळे घडलेलं रामायण, यांचे मिश्किल वर्णन त्यांनी केलं आहे..

ना.सी. फडके यांच्या उपस्थितीत फडक्यांनी ( सरांनी) केलेले परखड भाषण आणि ना.सी. फडके यांचे त्यावरील उत्तर…फडक्यांना पुणे विद्यापीठात नोकरी मिळाल्यानंतरचा हा प्रसंग लक्षात राहणारा आहे..

” तुकारामपणा ” हा त्यांचा स्वभाव हेमलताबाईंना खटकत असे.. विद्यापीठीय राजकारणाचे बसलेले चटके, त्यांच्या भिडस्तपणाचा इतरांनी घेतलेला फायदा, निवृत्तीनंतर पेंशन मिळण्यासाठी सात वर्षे करावी लागलेली प्रतीक्षा, या सा-या गोष्टी त्यांना संसार चालवतानाही त्रास देत होत्या.. त्या संदर्भात काही व्यक्तींचे तक्रारवजा उल्लेख यात प्रसंगपरत्वे आहेत..

मुलीचा जन्म व तिचे शिक्षण व स्वतः एम.ए ची पदवी प्राप्त करून विमलाबाई गरवारे प्रशालेत केलेलं अध्यापन, या जमेच्या बाजु.. सुखवस्तू घरातील असल्याने त्या अनाठायी खर्च करतील असा सरांचा झालेला समज.  त्यामुळे त्यांचा विश्वास संपादन करायला मला दहा वर्षे लागली असे त्या इथे नमूद करतात..अनेक बाबतीत आर्थिक तपशीलही देतात….. स्वतःचा भित्रा स्वभाव व स्वतःविषयीचा न्यूनभावही व्यक्त करतात..

निवृत्तीनंतर काही वर्षातचं सरांचे सुरू झालेले आजारपण सुमारे तेरा वर्षे चालूच राहिले होते…..हे फडक्यांचे (सरांचे)

आजारपण हेमलताबाईंसाठी सत्वपरीक्षेचा अनुभव होता. त्यातील अनेक आठवणी त्या इथे तपशीलवारपणे देतात..

फडक्यांना जवळच्या असलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुभाष मेंढापूरकर, तेज निवळीकर, डाॅ. किरवले यांच्या आठवणी हृद्य  आहेत.. मात्र नातेवाईक मंडळींचा आधार मिळाला नाही.. त्या लिहितात- काही गैरसमजाने दोन्हीकडचे म्हणजे सासर-माहेरचे लोक आमच्याशी बोलत नव्हते.. प्रत्यक्षात त्यांनी काही नातेवाईक मंडळींचे प्रतिकूल अनुभव दिले आहेत..

भालचंद्र फडके यांच्या मृत्युनंतर त्यांचे मन त्यांच्या आठवणींनी व्याकूळ होई.  त्या लिहितात, प्रथम प्रथम मी त्यांच्याशी तिन्ही भाषेत बोले.  ते समोर आहेत असे समजून जे बोलत असे ते वहीत लिहीत असे..

आठवणींतून स्वतःला बळ देण्याची, स्मरण संजीवनाची खास स्त्री- संवेदनायुक्त अशी ही प्रेरणा आहे. 

स्त्रीसाहित्यामागची ही ठळक निर्मिती प्रेरणा ” आठवणींच्या रांगोळ्या ” मधील वेधक आकृती व उदास रंग उठावदार करते..

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘स्वांतः  सुखाय’ – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

श्री सुहास रघुनाथ पंडित

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘स्वांतः  सुखाय’ – सुश्री गायत्री हेर्लेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

लेखिका :  गायत्री हेर्लेकर.

प्रकाशक: साई प्रकाशन,सांगली.

किंमत: रू.150/-

मी माझ्या आनंदासाठी लिहितो असे साहित्यिक म्हणत असतो व ते खरेही आहे.आपल्या नित्याच्या व्यवहारात आपल्या हातून इतक्या कृती होत असतात की आपल्या नकळत आपण त्यातून स्वार्थ आणि परमार्थ साधत असतो. सुप्रसिद्ध लेखिका गायत्री हेर्लेकर यांच्या बाबतीतही असेच झाले आहे.स्वांत सुखाय लिहिता लिहिता  त्यांनी नकळतपणे प्रत्येक वाचकाला सुख,आनंद वाटला आहे. माझ्या वाट्याला आलेल्या आनंदात सर्वांनाच सहभागी करून घेण्याचा हा एक प्रयत्न!.

कथा,कविता,नाटिका,अध्यात्म, व्यक्तिपरिचय अशा साहित्याच्या विविध प्रांतात कामगिरी बजावलेल्या लेखिका गायत्री हेर्लेकर यांचे ‘स्वांत सुखाय’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.हे पुस्तक म्हणजे विविध विषयांवरील लेखांचा एक संग्रहच आहे. यामध्ये मनाशी संवाद साधणारे,घर संसार कुटुंब याविषयी बोलणारे ,अनुभव कथन करणारे,आठवणींचा खजिना उघडणारे, वैचारिक आणि अध्यात्म व भक्तीमार्गाकडे घेऊन जाणारे लेख आहेत. विषयांची अशी विविधता असल्याने पुस्तक वाचताना सर्व प्रकारच्या वाचकांना खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.सुरूवातीच्या लेखातच त्यांनी मनाच्या रंगमंचावर जीवनपट मांडला आहे.मन,नाम,मना अशा शब्दांची उकल करत करत न उमगणा-या मनाला कसे उमगून घ्यावे तेही सांगितले आहे. ‘फुलले रे क्षण माझे’ हा लेख वाचल्यावर मन फुलवणारे क्षण स्वान्त सुखायच असतात हे मनाला पटते. निरागस बालमनाचे दर्शन घडवणारा लेखही यात आहे.मनाची शुद्धी करण्याचा मार्ग सांगणारा ‘ न दिसणारी गुलामगिरी’ सारखा लेख आहे.एकांत आणि लोकांत, एकांत आणि एकटेपणा यातील फरक समजावून देतानाच, स्विकारलेला एकांतवास सुखाकडे कसा घेऊन जातो हेही त्या सांगतात.

सुश्री गायत्री हेर्लेकर

लेखिकेतिल गृहिणीही त्यांची पाठ सोडत नाही. त्या बदलत्या कुटुंब व्यवस्थेवर भाष्य करतात .’अगं आई गं ‘ म्हणताना आईची महती गातातच पण बापावरही अन्याय करत नाहीत.या लेखात त्यांनी बाप मंडळींची दिलेली उदाहरणे बापाची बाजू उचलूनच धरतात. Child is the father of the man ची प्रचिती देणारा  ‘मुलेही शिकवतात नकळत’ हा लेख असो किंवा स्वयंपाकघरातील अनुभवांचे रसाळ वर्णन करणारा लेख असो, त्यांच्यातील गृहिणीचे दर्शन होतेच.मार्केटिंगच्या वेडाची प्रांजळ कबुलीही त्या हसत खेळत देऊन जातात.

आठवणींशिवाय आयुष्याला काय अर्थ आहे ? चैत्रागौरीच्या आठवणींचे त्यांनी चैत्रांगणच मांडले आहे.श्रावणातील आठवणींच्या रेशीमधाराही मन चिंब करणा-या आहेत. काही अनुभव कथन करतानाही त्यांची भाषा लालित्यपूर्ण असते. औटघटकेच्या कलाकाराची ‘झाकली मूठ ‘ असो किंवा शिपाईमामांची राखी पौर्णिमा असो,दोन्ही प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात.

सिलेंडर वरील त्यांचा लेख वाचून नाट्यछटेची आठवण होते. तर मायमराठीवरील त्यांचा लेख म्हणजे त्यांचे मराठी भाषेवरील प्रेम आणि अभिमान  व्यक्त करणारा  लेख आहे.

त्यांचे बरेचसे लेख हे वैचारिक व आयुष्यात आलेल्या अनुभवातून ,व्यासंगातून शिकायला लावणारे आहेत.चादरी विषयी लिहिता लिहिता त्या चिंतनाकडे घेऊन जातात. ज्येष्ठांच्या(इतरांना) खुपणा-या अपेक्षा त्या व्यक्त करतात .’सांज संध्याकाळ’ मधून त्यांनी संध्याकाळचे अनोखे दर्शन घडवले आहे.कोरोनाच्या दडपणातील काळात मनाने पाॅझिटिव्ह राहण्यासाठी सकारात्मकतेचा हसत खेळत उपदेश करतात. एका लेखातून त्यांनी पत्रकारितेवरही भाष्य केले आहे. तर कवितेचे विराट स्वरूप उलगडून दाखवताना त्या कवयित्रीच बनून जातात.सांस्कृतिक जडणघडणीमुळे मनुष्यप्राण्याला माणूसपण येते याची जाणीव करून देतात,आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्याच्या दोन बाजूही उलगडून दाखवतात. प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्राचा सर्व बाजूंनी अभ्यास करून मांडलेले विचार अत्यंत मौलिक आहेत.       

पुस्तकाच्या अंतिम भागातील सात आठ लेख हे भक्ती आणि अध्यात्म याविषयी विचार व्यक्त करणारे वाटतात. विश्वाला गुरू मानताना त्या गुरू या शब्दाची व्याप्ती, अर्थ समजावून सांगतात. पारंपारिक गुरू,आधुनिक गुरू,सर्व क्षेत्रातील गुरू,कौटुंबिक गुरू,ग्रंथगुरू या सर्वांचे स्मरण त्यांनी ठेवले आहेच, पण आधुनिक काळातील  संगणक या महागुरूसमोरही त्या नतमस्तक होत आहेत हे विशेष वाटते.

श्री स्वामी स्वरूपानंद हे तर त्यांचे श्रद्धास्थान आहे. त्यांना समजून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.तुकोबारायांना पत्र लिहून त्यांनी पालखी सोहळा  व वारकरी परंपरा याविषयी वेगळ्या पद्धतीने लेखन करून विषयाची गोडी वाढवली आहे. श्रीकृष्ण म्हणजे तर अनेक नात्यांच्या धाग्यांनी विणलेला मनमोहक गोफ.त्याचा एकेक पदर उलगडून दाखवताना भक्ती आणि श्रद्धा यांचेही दर्शन होते.ज्ञानेश्वरीचे अवलोकन करताना ‘ज्ञानेश्वरी’चे वेगवेगळे तीन अर्थ त्या समजावून सांगतात. सुख आणि आनंद याविषयी लिहिताना त्यांनी अनेक अध्याय,ओव्या,अभंग ज्ञानेश्वरी,वचने यांचा उल्लेख केला आहे.त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचल्याशिवाय ठेववत नाही. मानवी कल्याणासाठी तप अटळ आहे.पण जुन्या,प्राचीन आणि आधुनिक तपांची त्यांनी घातलेली सांगड अत्यंत समर्पक वाटते. विवेकाच्या उंबरठ्याशिवाय देहरूपी वास्तू सुखी होणार नाही हा विचार तर आजच्या काळात आवर्जून लक्षात ठेवावा असाच आहे.  

पुस्तकातील सर्व लेख वाचून झाल्यावर ,त्याचे मुखपृष्ठ किती समर्पक आहे हे लक्षात येते.

यातील बरेचसे लेख कोरोना काळात लिहिलेले आहेत.तेव्हाच्या सक्तीच्या एकांतात त्यांच्याकडून झालेले हे लेखन सर्व वाचकांना सुखावणारे आहे.प्राध्यापिकेची भूमिका पार पाडलेली असल्यामुळे अवघड विषयही सोपा करून सांगण्याची कला त्यांना अवगत आहेच, हे पुस्तक वाचल्यावर लक्षात येते. संपूर्ण लेखन हे साध्या,सोप्या भाषेतील असल्यामुळे चहा पिताना मोकळेपणाने गप्पागोष्टी कराव्यात असे झाले आहे. वाचक हा विद्यार्थी आणि रसिकही असतो.त्यामुळे त्याच्याशी उत्तम प्रकारे संवाद साधण्यात लेखिका यशस्वी झाल्या आहेत असे मला वाटते. या साहित्य- सुखाचा लाभ सर्व वाचनप्रेमींनी घ्यावा आणि वाटून द्विगुणीत करावा यासाठी हे माझ्या वाचनाचे अनुभव कथन.

पुढील  लेखनासाठी लाख लाख शुभेच्छा !

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली.

9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “स्पर्श” – श्री वैभव चौगुले ☆ परिचय – सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆

सुश्री सीमा पाटील (मनप्रीत)

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “स्पर्श” – श्री वैभव चौगुले ☆ परिचय – सुश्री सीमा पाटील (मनप्रीत) ☆ 

‘स्पर्श’ चारोळी संग्रह परीक्षण –

ताडामाडांशी गूज करताना

सागर थोडा हळवा झाला..

सखी सोबत विहार करताना

वारा थोडा अल्लड झाला..

असंच काहीसं प्रेमाच ही असतं..

कवी, गझलकार, चारोळीकार, वैभव चौगुले सरांचा ‘स्पर्श’ चारोळी संग्रह हाती पडला आणि आणि चारोळी संग्रहाच्या कव्हर पेजवर गुलाबी रंगाच्या फुलांनी सजलेल्या लांबच्या लांब वाटेवरील ते दोघे वाटसरू चारोळी संग्रहाचे ‘स्पर्श ‘ हे नाव सार्थ करून देतात हे समजून आले.

‘चारोळी’ म्हणजे चार ओळींची अर्थपूर्ण कविताच पण अतिशय मोजक्या शब्दांत आपल्या मनातील भाव वाचकांपर्यंत पोहोचवणे तसेच ते भाव वाचकांनाही आपल्या जवळचे वाटणे तितके सोपे नसते पण ‘स्पर्श’ या चारोळीसंग्रहामधील चारोळ्या वाचताना लक्षात येते की वैभव चौगुले सर हे चारोळी हा साहित्यप्रकार खूप सहज हाताळतात. त्यांच्या ‘स्पर्श’ या चारोळी संग्रहातील प्रत्येक चारोळी ही त्यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन घडविल्याशिवाय रहात नाही.

तुझ्या अंगणी प्राजक्ताचा सडा पडावा

फुले वेचताना मी तुला पहावे..

शब्दसुमने मी तुझ्यावर उधळावी

अन एक गीत मी तुझ्यावर लिहावे..

सखीचे अंगण सुखाच्या क्षणांनी भरून जावे आणि ती त्या सुखाचा आस्वाद घेत असताना मी दुरूनच सखीवर सुंदर असे गीत लिहावे. वर वर साधी सरळ ही चारोळीरचना वाटत असली तरी प्रेमातील त्यागाचे सुंदर शब्दांत उदाहरण पटवून देण्याचे काम कवी वैभव चौगुले सरांच्या शब्दांतील भावनांनी केले आहे.

अतिशय तरल भावनांनी युक्त अशा या पुस्तकातील सर्वच चारोळ्या आहेत, याचा अनुभव प्रत्यक्ष चारोळ्या वाचतानाआल्याशिवाय रहात नाही.

संध्याकाळी चांदण्या अंगणात स्वतःमध्ये डोकावताना,थंड वाऱ्याची झुळूक येऊन तिने अलवार बिलगावे असेच या पुस्तकातील प्रेममय चारोळ्या वाचताना मन प्रेमऋतू ची सफर केल्याशिवाय रहात नाही.

सखी चे जिवनात आगमन होताच एक कवी मन आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत असते हे,

गंध जीवनास आज आला

रंग जीवनास आज आला

सांग सखी कोणतं हे नक्षत्र

या नक्षत्रात प्रेमऋतू बहरला

वरील शब्दांत स्वतः कविलाच हे कोणतं नक्षत्र आहे? असा प्रश्न पडावा,अतिशय सुंदर शब्दांत हे आनंदी क्षण पकडण्याचा यशस्वी प्रयत्न फक्त कवीच करू शकतो!

केलास या प्रेमाचा स्वीकार

आयुष्यभर या प्रेमाचा गुलाम होईन

या ओळीतून,प्रेम म्हणजे फक्त आनंदाची सोबतच नाही तर ती सूख दुःखातही कर्तव्यातील साथअसते.हे सांगण्याचा प्रयत्न चारोळीतील अर्थपूर्ण शब्दांनी सार्थ ठरवला आहे.
प्रेमाचा गहन अर्थ,जोडीदारा विषयीच्या हळव्या भावना, व्यवहारी समाजात वावरताना लोकांच्या स्वभावाचे येणारे गोड कडू अनुभव तसेच प्रेमातील समंजस मन,विरह तसेच कवीचे हळवं भावविश्व् याचे दर्शन पोलीस क्षेत्रात काम करत असूनही एका संवेदनशील मनाचे दर्शन वैभव चौगुले यांच्या ‘स्पर्श’ या पुस्तकातील प्रत्येक चारोळीतून झाल्याशिवाय रहात नाही.

प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावा असा हा ‘स्पर्श’ चारोळीसंग्रह नव्याने चंद्रशेखर गोखलें च्या चारोळ्यांची ‘आठवसफर’ घडवून आणल्याशिवाय रहात नाही.
वैभव चौगुले सरांना त्यांच्या पुढील यशस्वी साहित्यवाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

© सीमा पाटील (मनप्रीत)

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ हिरव्या हास्याचा कोलाज… श्रीमती उज्वला केळकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

?पुस्तकावर बोलू काही?

☆ हिरव्या हास्याचा कोलाज… श्रीमती उज्वला केळकर ☆ परिचय – सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

पुस्तक परिचय :

पुस्तक–“हिरव्या हास्याचा कोलाज”

मूळ लेखक — गौतम राजऋषि

अनुवाद– उज्ज्वला केळकर

प्रकाशक–श्री नवदुर्गा प्रकाशन

“हिरव्या हास्याचा कोलाज”हे शीर्षक वेगळे आणि आकर्षक वाटले.नावावरून पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाढली. हिरवा रंग समृध्दी सांगणारा, सुरक्षितता देणारा,हास्य म्हणजे आनंद, सुख या भावना दर्शवणारा,कोलाज म्हणजे अनेक क्षणांचे,अनेक भावनांचे,अनेक तुकडे एकत्र असून ही एकसंध असणे. शीर्षकावरून तर हा कथासंग्रह सकारात्मक उर्जा देणारा वाटला.

कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावर चार  जवान आपला सगळा जोर लावून मोठ्या शर्थीने आपला तिरंगा आसमंतात फडकवण्यासाठी झटत आहेत असे दिसते.या कथासंग्रहाचे मूळ लेखक गौतम राजऋषि हे भारतीय सेनेत कर्नल आहेत.त्यांचं पोस्टिंग बऱ्याच वेळा काश्मीरच्या दहशतवादी भागात आणि सरहद्दीवरील  बर्फाळ, उंच पहाडी भागात झाले आहे.सैनिकी जीवनातील आव्हाने त्यांनी जवळून बघितली आहेत, पेलली आहेत. हेच अनुभव त्यांनी  ” हरी मुस्कुराहटोंवाला कोलाज” या कथासंग्रहात मांडले आहेत.या कथासंग्रहाचा भावानुवाद जेष्ठ साहित्यिका उज्ज्वला केळकर यांनी केला आहे.

प्रत्येक भाषेचे सौंदर्य वेगळे असते, नजाकत वेगळी असते,भाव वेगळे असतात.अनुवाद करताना या साऱ्याचा विचार करून लेखन करावे लागते.लेखिकेचे दोन्ही भाषांवर प्रभुत्व चांगले आहे.हा कथासंग्रह वाचताना कुठेही  या कथा अनुवादित आहेत असे वाटत नाही.लेखनाची भाषा प्रवाही आहे.प्रत्येक कथा लेखिकेची आहे असे वाटते.कथा चित्रमय आहेत, प्रवाही आहेत, उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत.

काश्मीर घाटी, बर्फाच्छादित शिखरे, सैन्याची ठाणे,चौक्या, काश्मीर खोऱ्यातील लोकजीवन,तिथले सौंदर्य,चीड,देवदार वृक्षांची जंगले,चिनार वृक्ष,झेलम नदी, या साऱ्यांचे दर्शन या कथातून घडते. त्यांना प्रत्यक्ष बघण्याची इच्छा निर्माण होते.

भारतीय जवानांचे भावविश्व,त्यांचे जीवन,त्यांची दिनचर्या,त्यांचे कर्तव्य, कर्तृत्व,त्यांची संवेदना,त्यांचे शौर्य, धैर्य या सगळ्याचे एक कोलाज म्हणजे हा कथासंग्रह आहे.मुख्य म्हणजे हिरव्या वर्दीतील भारतीय जवानांन बदल आदर भावना  वाढवणाऱ्या या कथा आहेत.

या कथासंग्रहात एकूण वीस कथा आहेत.या कथेतील नायक मेजर विकास,मेजर मोहित,मेजर गौरव इ. हे कर्तव्यदक्ष असून संवेदनशील आहेत.त्यांच्या  भावनांचे कोलाज कथेतून जागोजागी दिसते.

सामान्य माणसाला सिनेमातील हिरोचे आकर्षक असते.त्यांचे गुणगान सगळे गात असतात.पण खरे हीरो हिरव्या वर्दीतील जवान आहेत.आपल्या जिवाची पर्वा न करता येणाऱ्या संकटाला ते धैर्याने सामोरे जातात.पण हे हीरो दुर्दैवाने जनमानसात तेवढ्या तीव्रतेने दिसत नाहीत.या बाबत या कथेत भाष्य केलेले आढळते.

दुसरे हौतात्म्य,मी सांगू इच्छितो,इक तो साजन मेरे पास नही रे,त्या दिवशी असं झालं,हॅशटॅग इ. कथा मनात घर करून राहतात.प्रत्येक  कथेवर सविस्तर लिहिता येईल.पण इथं शीर्षक कथेचे चार ओळीत सार सांगते.उंच बर्फाळ पहाडावरील दुर्गम सरहद्दीवर पाहरा देणाऱ्या जवानांवर मेजर मोहित नजर ठेवून असतात.त्यांच्या कडक शिस्तमुळे “कसाई मोहित” अशी त्यांची ओळख असते.दुर्बिणीतून बघताना एका जवानाच्या पाहऱ्यात जराशी ढिलाई दिसते.त्याला जाब विचारण्यासाठी ते तडक तिथे जातात.पण त्याचे खरे कारण समजल्या नंतर ते मवाळ होतात.कामात दक्ष राहायची सूचना देवून तिथून बाहेर पडतात. तेव्हा त्या जवानाच्या चेहऱ्यावर हसू पसरते.माणूस किती ही कर्तव्य कठोर असला तरी भावना शून्य होवू शकत नाही.कर्तव्य जपताना संवेदना विसरून चालत नाही.आधीच मरणाच्या दारात उभं असताना आपुलकीचा एक शब्द ही आनंद पेरून  जातो. हेच या कथेतून अधोरेखित होते.

बिकट प्रसंगांना ,घटनांना सामोरे जाताना हिरव्या वर्दीतील जवान नेहमी मरणाला समोरा जातो.तेव्हा कुठे सामान्य माणसाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते!

आपल्या लाल जखमांचे प्रदर्शन न करता स्वतःच्या आणि सामान्य नागरिकांच्या आयुष्यात हास्याचा हिरवा कोलाज चितारणा-या जवानांच्या या कथा वाचल्यावर एकच शब्द ओठावर येतो तो म्हणजे’जय जवान’! आणि या कथा आपल्यापर्यंत पोहोचवणा-या लेखकाच्या लेखणीलाही  सलाम!

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ विशी  तिशी चाळीशी… डॉ. आशुतोष जावडेकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ विशी  तिशी चाळीशी… डॉ. आशुतोष जावडेकर ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

(एका आगळ्या-वेगळ्या ढंगाने केलेले पुस्तक- परीक्षण ) 

साहित्यप्रकार : लेखसंग्रह 

लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर 

प्रकाशक : उन्मेष प्रकाशन. 

प्रिय अरीन, तेजस आणि माही

तुम्हाला त्रिकुट म्हणू का थ्री इडीयटस… काही कळत नाही. पण त्यानं मला जे काही म्हणायचं आहे त्यात फारसा फरक पडत नाही. तुम्ही मला ओळखत नसणारच कारण मी एक सर्वसामान्य वाचक आहे. पण मी मात्र गेले कितीतरी दिवस तुम्हाला पाहतेय असं वाटण्याइतकी छान ओळखते. दोनतीन वर्षांपूर्वी लोकसत्तातल्या एका सदरात मी तुमच्याबद्दल ऐकलं होतं. तेव्हाही मला तुमच्या मैत्रीचं, कायप्पाचा(व्हॉटस्अप) ग्रुपचं अप्रूप वाटलं होतं… पण का कोण जाणे मी तेव्हा तुमच्याशी कनेक्ट नाही होऊ शकले. पण विशी-तिशी-चाळिशी या पुस्तकातून तुम्ही भेटलात आणि मी नकळतच तुमच्याशी भावनिकरित्या जोडले गेले. नक्की कशाचा परिणाम… हे काही सांगता येत नाही पण आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात ज्यांच्याशी काही काळानेच आपली नाळ जुळते.  त्यात मैत्र हे नातंच असं की ते कधी… कुठे… कसं… का… जुळेल याबाबत काहीही सांगता येत नाही. आणि त्यात वय, शिक्षण, लिंग हे मुद्दे गौण असतात.

तर मुद्दा हा की तुम्ही  तिघांनी मला फारच कॉम्प्लेक्स दिलात. अगदी तेजसच्या बायकोसारखा!  म्हणजे आपला का नाही असा एखादा मैत्रीचा ग्रूप…. निदान एखादा तरी मित्र असावा अरीन किंवा तेजस सारखा असं राहून राहून मनात येतंय. काय हरकत आहे – कल्पना असली तरी वास्तवात साकार व्हायला ? सगळ्याच कल्पना काही पूर्णतः काल्पनिक नसतात त्यात थोडातरी तथ्यांश असेलच की.  आता बघा वधू – वर पाहिजे अशा जाहिराती सर्रास  दिसतात – तसे मिळतातही. पण मैत्र पाहिजे अशी जाहिरात नाही नं देता येत आणि लग्न जुळवण्यासारखं मैत्र नाही जुळवता येत. आता उदाहरण घ्यायचं तर माही रिकीच्या आठवणीनं डिस्टर्ब झालेली असते तेव्हा अरीनशी ज्या पद्धतीनं मोकळं होऊन बोलते आणि तो तिला समजून घेतो ते किती भारी आहे. सॉरी टू से माही, पण तेव्हा मी अगदी जेलस झाले होते तुझ्यावर… फार फार हेवा वाटला होता तुझा. आणि धीरजशी लग्न करण्याबाबत तू साशंक होतीस  तेव्हा तेजसनं तुला समजावलं, धीर दिला ते वाचून नकळत डोळे ओलावले. इतकं मोकळं होता येतं कधी? कुणापाशी? आणि इतकं मोकळं झाल्यावर ज्याच्यापाशी मोकळं होऊ त्याच्याशी नंतरही इतकं जिव्हाळ्याचं नातं राहू शकतं? कमाल आश्चर्य वाटलंय मला. नाही म्हणजे ब्रेकअप होणं, पूर्वीचं अफेअर असणं ते जोडीदाराला सांगणं इथपर्यंत गोष्टी घडतातही . पण त्या किती खरेपणानं आणि किती सोयीनं सांगितल्या जात असतील हा एक वेगळाच प्रश्न आहे. इतकंच नाही तर रेळेकाकांसारख्या वडिलधाऱ्या व्यक्तीनंही हे नातं समजून घ्यावं. त्यात मनापासून सहभागी व्हावं हे सारं फारच सुखद धक्कादायक आहे. अरीनचा रुममेट अस्मित, गीता मावशी अशा कितीतरी मंडळींनी त्यांच्या वागण्याबोलण्यातून आपलंस केलं त्यामुळं हे मैत्र फक्त तुमचं राहिलं नाही, तर मैत्रीसाठी आसुसलेल्या प्रत्येकाचं झालं. प्रत्येकालाच तुमच्यामध्ये त्याचा किंवा तिचा मित्र-मैत्रीण दिसू लागले. जगण्याच्या नकळत राहून गेलेल्या जागा सापडल्या. आपल्या भूतकाळाशी आणि भविष्यकाळाशी संवाद साधला गेला. इथं मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आमचा विशी-तिशीतला जोश आणि तुमचा जोश यात कुठं काहीच कमी नाही.  पण मोठा फरक आहे तो व्यक्त होण्यात. तुमच्यातला ठामपणा पाहता जगण्यातली अपरिहार्यता आणि क्षणभंगुरता तुमच्या पिढीला अधिक जास्त कळली आहे आणि तुम्ही त्याचा खुलेपणानं स्वीकार केलाय. सोलो ट्रीपबाबत जे विचार तेजसच्या मनात येतात तेच त्याच वयोगटातल्या  आम्हाला पटतात. पण तिशीतल्या माहीला एक स्त्री म्हणून सोलो ट्रीप करतानाचे जे अडथळे जाणवतात ते इतरही वयातल्या  स्त्रियांनाही जाणवत असतीलच की. अरीनच्या पिढीकडे पाहून जाणवतं की सतत सामाजिक दडपण पांघरण्याचं व्रतच जणू आम्ही घेतलंय. कसंय ना आसपास पसरलेली गरीबी आम्ही पाहिलीये, वेळ प्रसंगी सोसलीये आणि आता वेगानं वाढणारी सुबत्ताही आम्ही पाहत, अनुभवत आहोत.  जी आत्ताच्या विशीतल्या पिढीला फारशी जाणवणार नाही. तेही खास करून मिडलक्लास, अप्पर मिडलक्लास, हायक्लासमधल्या तरुणांना. लोअर क्लासमध्ये विशी, तिशी आणि चाळिशी यांचे प्रश्नच वेगळे असतील. त्यांच्यातलं मैत्र कसं असेल, ते नात्यांकडे कसे बघत असतील असाही प्रश्न यानिमित्ताने मला पडला. कारण आत्ताच्या काळात फक्त आर्थिकच नव्हे तर वैचारिक दरीदेखील वाढत चालली आहे.  

जगण्याचे अनेक प्रश्न नव्यानेच निर्माण होतायत. सुखाच्या व्याख्या अनेक मितींनी बदलल्यात. त्यामुळे  पारंपारिक ठोकताळे आता पूर्णतः समाधानकारक ठरत नाहीत. अशा वेळी होणारी घुसमट ही फक्त कुणा एका पिढीची नाहीये तर सगळ्याच पिढ्या या घुसमटीला आज तोंड देत आहेत. आत-बाहेर कुठेच ताळमेळ नाही, अनंत कोलाहल माजलाय. म्हणून मग तुमच्या या विशी-तिशी-चाळिशी ग्रूपचं फारच कौतुक वाटतं. आणि असे ग्रूप व्हायला हवेत असं प्रकर्षानं वाटतं. मोकळं होता आलं पाहिजे, योग्य पद्धतीनं व्यक्त होता आलं पाहिजे. तरच या कोलाहलातून आपला निभाव लागणार आहे. प्रत्येकाला सच्चा सूर सापडणार आहे. असे ग्रुप समाजाच्या सर्व स्तरात अधिकाधिक तयार होवोत. असं मैत्र अधिकाधिक विस्तारित होत जावं.  हीच शुभ कामना.

 

ता.क.

खरंतर ही भेट अपुरी वाटतेय. इतरही भरपूर गप्पा मारायच्यात (कंसातल्यासुद्धा). तुम्ही पुन्हा काही नवीन विषय घेऊन याल तेव्हा नक्की भेटूयात.  

तुमच्यासारख्या मैत्राच्या प्रतीक्षेत असलेली —

एक वाचक—                       

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “माझी टवाळखोरी” –  श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार☆

सौ.अस्मिता इनामदार

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“माझी टवाळखोरी” –  श्री अमोल केळकर ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

 विनोदी साहित्याने जीवन आनंदी होते. टवाळा आवडे विनोद असं जरी रामदासांनी म्हंटले तरी टवाळ हा शब्द रिकामटेकड्या लोकांसाठी त्यांनी वापरला आहे. पण अमोलची – आत्ता हा जरी लेखक असला तरी आम्हाला तो अमोलच आहे – टवाळ खोरी ही टवाळगिरी नाही हे लक्षात घ्यायला हवे. शुद्ध भावनेने केलेले विनोदी लेखन हा या पुस्तकाचा गाभा आहे. हे लेख मनोरंजनाबरोबरच बोधप्रदही आहेत. अमोल उवाच – १ व अमोल उवाच -२ असे दोन भाग या पुस्तकात आहेत. पहिल्या भागात आपण विनोदी आठवणीत रमातो तर दुसऱ्या भागात विडंबन गीते आपल्याला खदखदून हसवतात. विडंबन कसे असावे याचा उत्कृष्ट परिपाठ इथे मिळतो

” कायप्पा ” च्या माध्यमातून आमोलची टवाळखोरी आपल्या समोर आली. कायप्पा हा शब्दही टवाळ खोरीचा मामला आहे. व्हॉटस् ॲप्स चे मराठी भाषांतर त्याने केलेय. काय अप्पा? = कायप्पा. मजा आहे ना ? निखळ आनंदाचा सागर निर्भेळ विनोद घेऊन या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आलाय. यातील प्रत्येक लेखावर बोलायचे झाले तर एक प्रबंधच सादर करता येईल. पहिल्या भागात एकूण ७१ लेख आहेत. दुसऱ्या भागात ४३ विडंबन गीते आहेत.

 अमोल उवाच मधील काही निवडक लेखांचा मी उल्लेख करेन ज्यातून त्याच्या लिखाणाची सुंदर झलक दिसून येईल. सध्या कोरोना मुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. भविष्यात शाळेचा वर्ग कसा असेल हे ” आधुनिक शाळेतील एक दिवस ” यात समजते. या लेखातील शिक्षण पद्धती खरोखरच थक्क करणारी आहे. शाळा आली की अनुषंगाने गुण पत्रिकाही आलीच. त्यावर मस्त खुसखुशीत टवाळखोरी आहे.

भाई अर्थात पु. ल. यांच्या वरचे ५ ही भाग एकदम भन्नाटच आहेत. ते जर  पु. ल. नी वाचले तर तेही छान दाद देतील. या बरोबरच गायकी ढंगातले संगीत रागही आपले अस्तित्व दाखवून जातात. ” शाळा चांदोबा गुरुजींची ” या गीतातून सर्व ग्रह नक्षत्रांची मांदियाळीच भेटते. ” जो उस्ताद तोच वस्ताद ” यातल्या कोपरखळ्या खदखदून हसवतात. ” साप शिडी ” हा वैचारिक लेख आपल्या जीवनावरच बेतलेला वाटतो.

” एक रस्ता आ हा आ हा ” हा एक प्रवासी. प्रवास हा अमोलच्या जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. प्रवास हा त्याचा छंदच आहे हे त्याच्या स्टेटस वरच्या फोटोने लक्षात येते.

” बदाम सत्ती ” हा एक वैचारिक लेख आपल्याला छान सल्ला देतो. आयुष्यातली अनियमितता किंवा कुठल्याही परिस्थितीत आशावादी राहणे हे या सत्तीकडून शिकायला हवे. ” एक संवाद त्यांचाही ” हा लेख अमोलची अप्रतिम कल्पनाशक्तीच प्रत्ययाला आणून देतो. सगळ्या रेल्वे गाड्या आपापसात जे काही बोलतात याची आपण कधीच कल्पना केलेली नसते. त्या बरोबरच एस टी चा ही संवाद आपल्याला प्रवासाचा आनंद देऊन जातात. ” मराठी भाषा दिन १ आणि २ हे लेख तर नक्कीच आवडण्या सारखे आहेत. मराठी भाषेचा अभिमान सर्वानाच असतो पण त्याबद्दलची अनास्था बघितल्यावर खंतच वाटते. ” इथे साहित्याचे साचे मिळतील ” हा ही लेख भन्नाट आहे. हा जो मॉल दाखवला आहे तो बघून थक्कच व्हायला होतं. त्याच्या मालकांनी तो मॉल बघायला बोलावलं आहे तेव्हा आपण नक्कीच जाऊ.

आता जरा विडंबनाकडे वळूयात. या भागाचे शीर्षकच मार्मिक आहे. ” अशी विडंबन येती आणिक मजा देऊनी जाती ” आठवलं ना ते गाणे ? अशी पाखरे येती…. यातले प्रत्येक विडंबन गाजलेल्या गाण्यावर आधारित आहे. हा साहित्य प्रकार फारसा लोकप्रिय नाहीय. विसंगती पकडणे हा विडंबनाचा मुख्य गाभा आहे, तो सापडला की विडंबन योग्य होते. सर्वच गीतांवर लिहिणे वेळेअभावी शक्य नाही, पण काही लक्षात राहण्यासारखींची शीर्षके सांगते, गाणी तुम्ही ओळखायची. ” खोटी खोटी रूपे तुझी “,

” जिवलगा कधी रे येशील तू ” ” स्विगीची भाकरी “,  ” ही पाल तुरू तूरू “, ” सुंदर ते यान “, ” अजी मोदकाचा दिनू “, ” योगा

योगा अखंड करूया “. ही गाणी प्रत्यक्ष वाचली तरच त्याचा आनंद मिळेल.

जाता जाता एक सांगावेसे वाटते की काही लेखात राजकीय भाष्य केले असले तरी राजकारणातला खवटपणा त्यात अजिबात नाही. अमोलची ही टवाळखोरी मनोरंजनाबरोबरच बौद्धिक विचारांना चालना देणारी नक्कीच आहे.

आता जास्त पाल्हाळ न लावता माझा हा टवाळ लेख इथेच संपवते.

जय टवाळखोरी….

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ अज्ञात… छाया महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

?पुस्तकावर बोलू काही?

☆ अज्ञात… छाया महाजन ☆ परिचय – सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

लेखिका | डॉक्टर छाया महाजन

साहित्यप्रकार | कथासंग्रह

प्रकाशक | मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे

माणसानं कितीही भौतिक प्रगती केली, अगदी चंद्रावर, मंगळावर पोहोचला , किंबहुना प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा ध्यास जरी त्यानं घेतला; तरीही काही गोष्टींपासून तो कायमच अंतरावर राहिला आहे- किंबहुना तो अनभिज्ञच आहे. अनेक शास्त्रज्ञ, विचारवंत, तत्त्ववेत्ते अशाच काही ‘अज्ञात’ गोष्टींचा शोध घेत असतात. तर संवेदनशील कलाकार, लेखक हे या अज्ञात गोष्टींचा आपल्या कल्पनाशक्तीद्वारे मागोवा घेऊन ते आपल्या कलाकृतीद्वारे, साहित्याद्वारे सादर करतात. अतिशय बोलकं मुखपृष्ठ असलेला लेखिका डॉक्टर छाया महाजन यांचा ‘अज्ञात’ हा कथासंग्रह हे याचंच एक उत्तम उदाहरण.

‘अज्ञात’ या शब्दाचा पैसच इतका व्यापक आहे की गूढता, रहस्यमयता, असहाय्यता यांचं व्यामिश्र दर्शन यातुन घडतं. आपल्यालादेखील भवतालातल्या अनेक घटनांमधून या अज्ञाताचं अस्तित्व जाणवत राहतं. आणि अशा अज्ञात गोष्टींना आपण आपापल्या परीने अर्थ देण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो.  अखेरीस त्यातली अपरिहार्यता स्वीकारून सामोरेही जातो.

अशाच प्रकारे अज्ञाताला सामोरं जाणाऱ्या सर्वसामान्य‌ व्यक्तींच्या व्यथा या कथांच्या माध्यमातून आपल्याला वाचायला मिळतात. सर्वच कथा उत्तम असून त्या आपल्याला अंतर्मुख करतात, विषण्णताही निर्माण करतात. समाजातल्या अनेक वाईट गोष्टी, चालीरीती या सगळ्यांचा परिणाम तर त्यात दिसतोच. पण मानवी मन आणि भावना यांच्या दौर्बल्याची स्पष्ट जाणीवही या कथांतून होते. वास्तववादी असणाऱ्या या कथा अज्ञाताची दखल घेत असल्या तरी त्यावर कुठलाही उपदेश किंवा पर्याय सुचवण्याच्या भानगडीत पडत नाहीत आणि हेच या कथांचं खरं बलस्थान आहे, जे संपादण्यात लेखिकेला कमालीचं यश मिळालं आहे. त्यामुळेच या अज्ञाताचं महत्त्व वाचकाच्या मनात नोंदलं जाऊन, पात्रांच्या सुखदुःखाशी  वाचक नकळतच समरस होतो. यातल्या अधिकतर कथा या नायिकाप्रधान आहेत. शिक्षित-अशिक्षित, शहरी-ग्रामीण अशा सर्व स्तरातल्या स्त्रीजीवनाचं भेदक दर्शन त्या घडवतात.

हे दर्शन घडवताना लेखिकेची ओघवती आणि संयत लेखनशैली ही फार मोठी भूमिका पार‌ पाडते. एकूण अकरा कथा असलेल्या या संग्रहातून फक्त कुठल्या एका कथेचा उत्तम म्हणून उल्लेख करणं फार अवघड आहे. आणि तशी तुलना करणंही योग्य नाही, कारण प्रत्येक कथेचा बाज वेगळा आहे.

अज्ञाताच्या या कथा वाचल्यानंतर मला  जाणवलेली गोष्ट म्हणजे जरी या अज्ञाताचा शोध ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असली तरी त्याला अपरिहार्यपणे तोंड देण्याऐवजी मानसिक सामर्थ्याचं महत्त्व जाणून तत्कालीन सुसंगत कृतीद्वारे तोंड देणं… आणि त्यातून बाहेर पडणं हे आवश्यक आहे. आणि हेच कदाचित या अज्ञाताला उत्तर देण्यासाठीचं पहिलं पाऊल आहे.

(तळटीप – आवर्जून वाचावा असा हा कथासंग्रह. लेखिकेने आणि जाणकारांनी एकांकिकेसाठी या कथासंग्रहाचा जरूर विचार करावा.)

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




मराठी साहित्य – पुस्तकावर बोलू काही ☆ “कुतूहलापोटी” – डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

? पुस्तकावर बोलू काही ?

☆“कुतूहलापोटी” – डॉ. अनिल अवचट ☆ परिचय – सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कुतूहलापोटी

पुस्तकाचे नाव … कुतूहलापोटी

लेखक … डॉ. अनिल अवचट

प्रकाशन:  समकालीन प्रकाशन 

पृष्ठे         २००

किंमत      रु  २००/—  

अवचटांचे प्रत्येक पुस्तक म्हणजे विचारांचा खजिनाच असतो. डॉक्टरकी बाजूला ठेऊन इतर गोष्टींत मनापासून रमणारा असा हा अवलिया आहे. नुकतेच त्यांचे मी एक पुस्तक वाचले जे नावापासून आगळे वेगळे आहे. “कुतूहलापोटी” या नावाचेच कुतूहल वाटून मी ते पुस्तक वाचायला घेतले आणि शेवटपर्यंत वाचूनच खाली ठेवले. तस पाहिलं तर या नाहीत कथा ना लेख. पण मांडणी इतकी सुरेख केली आहे की आपल्याच कुतूहलाचे निराकरण कुणीतरी लगेचच केले आहे असे वाटते

यातले प्रत्येक लेख हा लेखकाच्या कुतूहलाचा अनोखा पैलू दाखवतो. रोजच्या जीवनात आपण खूप गोष्टी अनुभवत असतो पण त्या बद्दल आपल्याला कधीच कसले कुतूहल वाटतं नाही.

या पुस्तकात एकूण ११ लेख आहेत, ज्याचे विषय आपण कधीच विचारात घेतलेले नाहीत. निसर्गातल्या गोष्टी मागचे विज्ञान आणि आपले जीवन याची सांगड लेखकाने कशी घातलीय हे समजून घेताना खूप मनोरंजक माहिती आपल्याला मिळते.

फंगस, बॅक्टेरिया, साप, आपले भाऊ म्हणजे निरनिराळे कीटक, मधमाशा, पक्षी, आपले शरीर, रक्त, पॅंक्री (पॅंक्रिआस), कॅन्सर, जन्म रहस्य यावरचे लेख वाचताना अक्षरशः आपण कधीही न केलेल्या विचारांवरचे विवेचन लक्षात येते.

प्रत्येक लेखाचे असं थोडक्यात वर्णन नाही करता येणार, त्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे. ती कल्पना येण्यासाठी या पुस्तकाचा ब्लर्ग मी देते म्हणजे या पुस्तकाची रूपरेषा लक्षात येईल.

आपल्या सभोवतालच्या प्रत्येक सजिवात किती आश्चर्य दडलेली आहेत बघा. पक्ष्यांच्या हलक्या मऊसूत पिसांमध्ये मैलोनमैल उडण्याची ताकद कुठून येते ? मधमाशा मधावर अशी कोणती प्रक्रिया करतात ज्यातून हजारो वर्ष टिकू शकणारा मध तयार होतो ? कुण्या एका किटकाची अंडी वीस वर्षे सुप्तावस्थेत कशी राहू शकतात ? माणसाला अजूनही न जमलेले सेल्युलोज चे विघटन बुरशी कसं करते ? आपल्या शरीराचेही तसेच. मेंदू पासून र्हृदयापर्यंतच्या लाखो गुंतागुंतीच्या यंत्रणा सुरळीत कशा चालतात हे एक कोडेच आहे.  

या आणि अशा प्रश्नांची कोडी लेखकाला पडली आणि लागले की ते त्यांच्या मागे. तज्ञ गाठले, पुस्तकं पालथी घातली, आणि ही कोडी सहज सोप्या भाषेत उलगडून आपल्या समोर ठेवली.

सजीवांच्या जीवन क्रियांविषयी कुतूहलापोटी घेतलेला हा शोध वाचाल तर थक्क व्हाल. !!

परिचय – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈