हा असं वागला , तो तसं वागला , कोण कसं वागला, या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा . आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा . त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा .
या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख , अडचणी , नाहीत . सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत ठरतो . कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नसतं . ” मिळतं तेच, जे आपण पेरलेलं असतं . ” आपल्याशी कोणी कसंही का वागेना, आपण सगळयांशी चांगलंच वागायचं . इतकं चांगलं की विश्वासघात करणारा ही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे .
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते .आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी घाबरून जाऊ नका . फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा— आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहे . ” जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात, ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत . ”
जगणं कोणाचंही सोपं नसतं . आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असतं . ” सर्वात सुखी माणूस तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो. ” म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी ” कृतज्ञ ” रहा .
पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही . म्हणूनच वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुख आहे . दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून, त्यांचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि कर्तव्य कधीच सिद्ध होत नसते .
वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये . कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात . कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते , ज्याचं नाव आहे , ” आत्मविश्वास ”
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी.
समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा —- ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून .
या भावना नक्की आचरणात आणाव्यात असे सर्वांना सांगणे आहे .
संग्राहक – श्री अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एक मित्र भेटला परवा… खूप जुना… बऱ्याच वर्षांपूर्वी भांडण झालं होतं आमचं… नेमकं कारणही आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर…
म्हणाला, ” मुद्दामहून भेटायला आलोय तुला… हा योगायोग नाही… क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं मी ठरवलंय.”_
सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन… सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो…अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजूला सारता आला नाही… तेव्हढा वेळच नाही मिळाला…… विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण… चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव ‘आलासच ना अखेरीस ‘_ हा माज ठेऊन.
तो मला म्हणाला, ” दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली….. काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास…… ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं….. आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता….. वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली…… त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच…..
मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी माफी दुर्लक्षून…… तू त्यावेळी मला म्हणाला होतास, “ देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो “……. ती वेळ माझ्यावर आली… दोन महिन्यांपुर्वी…… नाही शिवू शकलो मी ते भोक…
नाही करु शकलो रफू….. नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा ओतून ते एक छिद्र…… .
माझ्या मुलाच्या हृदयात पडलेलं…! _ गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दूषणं देत….. ‘ कसला बाप तू? ‘ अशी खिल्ली उडवत.. बहुदा मनातल्या मनात…… म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे… आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला… यावेळी तू आपलं नातं ‘ रफू ‘ केलेलं पहायला…
संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला…
_’ देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो ‘,चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता….
घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना… नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे…..
‘तो’ त्याने नकळत केलेल्या ‘ पापातून ‘ अन् ‘मी’ नकळत दिलेल्या ‘ शापातून ‘ उतराई होऊ बघत होतो…
मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो……
दोघं मिळून एक नातं, नव्याने ‘ रफू ‘ करू पहात होतो ! …..
तात्पर्य:….
सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो. मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा, कुणाचाही अपमान करू नका, कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका. आपले मित्र नातेवाईक,शेजारी,सहकारी,आपले नोकर चाकर, हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही. आपल्या आचरणाने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा, व कधी अनावधानाने कुणी दुखावलेच, तर वेळीच “रफू” करायला विसरू नका….
पहा विचार करुन…
संग्राहिका : स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मला फक्त मज्जा हवीये… ☆ संग्राहिका – सौ. अंजली दिलीप गोखले ☆
तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे?
—प्राचीन काळी “ज्ञानप्राप्ती आणि परमार्थसाधना” हे उदात्त उत्तर मिळत असे. अर्वाचीन काळी “प्रापंचिक सुख” हे व्यवहारात बसेल इतपत उत्तर देत असत. आत्ता काल-परवा ” पैसा, समाधान, शांती ” हे शब्द ऐकू यायचे.
हल्ली थेट विकेट पडते – “मला फक्त मज्जा करायचीये”. विषय संपला.
इथे “मज्जा” ही निवडीची गोष्ट राहिली नाहीये; ती ” निकड ” झालीये — केली गेलीये. मज्जा कशी करायची हे निवडण्याचंही स्वातंत्र्य नाही. ती समाजातल्या “मॉडर्न” शहाण्यांनी (!) आखून दिलेल्या पद्धतीनेच व्हायला हवी.
तशी ती नाही केली म्हणजे फालतू आहात तुम्ही, हे तुमच्या तोंडावर फेकून मारलं जातंय. म्हणजे पहा –
यात नफ्याची आर्थिक गणितं ठासून भरलेली आहेत. नव्वदच्या दशकात ग्लोबलायजेशन आपल्यावर येऊन आदळलं; आणि त्या नवश्रीमंतीच्या लाटेवर अनेकजणांनी विचार-विवेक गहाण टाकले.
तसे त्यांनी ते टाकावेत, जास्तीत जास्त मासे या भोगवादात सापडावेत, यासाठी (त्यातल्या त्यात पाश्चात्य) कॉर्पोरेट कंपन्यांनी मार्केटिंगची जाळी मस्तपैकी सर्वदूर फेकली होतीच. TV, सिनेमा, सततच्या जाहिरातींच्या भडिमाराने आमचा सुरेख ब्रेन वॉश केला. न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग तंत्राच्या वापराने, ध्वनी व दृश्य या दोघांनी आमचे कान आणि डोळे स्वप्नांत गुंतवले. मध्यमवर्गीय काटकसरीने म्हातारपणाच्या चिंता सोडून “आजचं बघा ” हा अमेरिकन मंत्र स्वीकारला. मग अचानक वाढदिवसाला निरांजनांच्या ओवाळणी backward झाल्या; वीस-पंचवीस हजारांचं हॉटेलवालं सेलिब्रेशन रीतीचं झालं. सी सी डी अन् बरिस्तामधल्या दोनशे रुपयाच्या कॉफ्या आम्हाला स्वस्त वाटू लागल्या. “अनलिमिटेड बुफे” च्या नावाखाली बार्बेक्यूंच्या भट्टीत पगार जाळून घेणं हे “त्यात काय एवढं?” असं झालं.
जीन्स पाचशेच्या पाच हजार झाल्या. पुर्वी कुत्रा कोण ज्या कॉटनला विचारत नव्हतं, तेच कॉटन “लिनन”च्या रुपात थेट स्टेटस सिम्बॉल बनलं. एक दिवसाचं मराठी लग्न पाच दिवसांचं “big fat पंजाबी वेडिंग” झालं. घराच्या हॉलमधले साखरपुडे नि टिळे हे फाईव स्टारवाले “इवेंट्स” झाले.
मज्जा, आनंद, आपल्या आत निर्माण करायचा असतो म्हणताय? तुमची संस्कृती तसं सांगते? हड. चुलीत घाला तुमची संस्कृती.—– आमचं Grand Live life kingsize उधळणं घ्या. बायकोला सोन्या-चांदीतून बाहेर काढा; हिरे नि प्लेटिनम मध्ये तिला बुडवून काढा.—- तुमच्या पोराला गर्लफ्रेन्ड नि पोरीला बॉयफ्रेन्ड असलाच पाहीजे. त्यांच्या “प्रेमाचं” मूल्यमापन गिफ्टच्या किमतीवर ठरेल.
कमवा— आणि उडवा.—-
तुम्ही तुमच्या नवाबज़ाद्यांकडे पाहा बघू. लिव Macho !! भले तुम्ही स्टायपेन्डवाले ट्रेनी इंजिनिअर असा.
विषय इतपत येऊन थांबलेला नाही. दारू नि सिगरेटचं उदात्तीकरण तर आता जुनं झालं. आता त्याच्यापुढे सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय पोरांच्या तोंडीही ” वीड “, ” ग्रास ” हे शब्द येऊ लागलेत.
यांचे अर्थ माहितीयेत? गांजासारख्या भयानक नशील्या पदार्थांची अमेरिकेतून उचललेली बोली भाषेतली नावं आहेत ही. या घाणीची जाहिरात थेट करता येत नाही; पण त्यासाठी आमचे नव्याने पैदास झालेले “रॉकस्टार्स” आणि “rap singers” आहेत ना ! त्यांच्या गाण्यांतून या अमली विकृतीची भलावण रोजच्या रोज होतेय. ” मनाली ट्रान्स ” म्हणे. शोधा गुगलवर लिरिक्स. शब्दांना जोड दृश्यांची. दृश्यांत ठासून भरलेला सेक्स. अनिर्बंध, अमर्याद आणि मुद्दाम चाळवण्याऱ्या अनैतिक नात्यांचा, अगदी घरच्या अंतर्गत नात्यातही तो मुक्तहस्ते सपोर्ट करणारा !!! एकेक वेब सिरिज मनोरंजन कमी, आणि पोर्नोग्राफी जास्त – इतपत मज्जेच्या डेफिनेशन्स गेलेल्या !!! तरुणांना नाद लावायला तेवढं पुरतं. —- चील… एंजॉय… पार्टी चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग.— मग मेलात तरी चालेल.
आपण ठरवलेलं उद्दिष्ट हे प्रत्यक्षात आपण स्वत: निवडलेलं नसून, ते आपल्याला गंडवून आपल्याकडून निवडून घेतलं गेलंय, हे लक्षात येतंय आपल्या?
चंगळवाद हा एक कॉर्पोरेटधार्जिणा पंथ झालाय. पंथामध्ये विचार आणि आचार निवडीचं स्वातंत्र्य नसतं. कुणीतरी महाभागाने सांगितलेलं तत्वज्ञान तो महापुरूष आहे असं सगळे म्हणतात म्हणून, मुकाट्याने नाकासमोर धरून चालणं, हे पंथाचं आचारशास्त्र असतं. तेच चंगळवादाचं आहे. “आम्ही कित्ती आनंदात आहोत “, “आमचं कित्ती मस्त चालू आहे “, “आम्ही कित्ती एंजॉय करतोय “, हे दुसऱ्याला दाखवणं, हा चंगळवादाचा अट्टहास असतो.
ते दुसऱ्याने सत्य म्हणून मान्य केलं, तर चंगळवादाचा विजय असतो. आणि आपण ओढवून घेतलेल्या पद्धतीचा दुसऱ्याने स्वीकार केला, तर तो चंगळवादाचा दिग्विजय असतो.
मुद्दा हा आहे, की या झुंडीत सामील झाल्यावर आपण किती “cool” आहोत, याच्या देखाव्यांचं एक compulsion असतं ना; त्यात बऱ्याच जणांचा श्वास कोंडला जातो. तो देखावा न करणाऱ्यांना पाखंडी समजून झुंडीबाहेर फेकलं जातं.—- मुळात जे झुंडीत कधी सामील झालेच नाहीत, किंवा आर्थिक कारणांमुळे होऊ शकले नाहीत, त्यांच्याकडे आगाऊपणाने “सो पथेटिक” म्हणून नकारात्मकतेने पाहिलं जातं; त्यांच्या मनात स्वत:बद्दल न्यूनगंड निर्माण होईल याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू होतात.
गंमत म्हणजे, चंगळवादाचे पुरस्कारकर्ते व्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारतात; पण हीच सोंगं आयुष्य आनंदाने जगण्याचे प्रत्येकाचे स्वतंत्र वेगळे मार्ग असू शकतात, हे साधं सत्य दुसऱ्याला नाकारतात. त्यावेळी आपण त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करतोय, हे यांच्या गावीही नसतं. म्हणूनच मग ” तुम्ही दारू पिऊन पार्ट्या करत नाही, म्हणजे आयुष्य कसं एंजॉय करायचं ते तुम्हाला माहीतच नाही “, अशी बिनडोक तर्कटं मांडली जातात; जी हास्यास्पद ठरतात.
हेअर जेल, मेक अप आणि ब्रांडेड कपड्यात आम्ही बिनधास्त आहोत हे दाखवत राहण्याची केविलवाणी धडपड नजरेत लपत नसते. ब्रांडेड आयुष्यातल्या पोकळ्या वेडावतातच.
जागे होऊया रे.—- स्वत्व नको विकूया आपण.— दुनियेतल्या प्रत्येकाला आपण आवडलोच पाहिजे, हा मूर्ख विचार सोडूया; आणि करूया हिंमत स्वत:चा स्वतंत्र जीवनभाव निवडण्याची. सेलिब्रेशन्स मिळकतीची होऊ देत; आणि ती नजाकतीची होऊ देत !!
उधळण्याच्या फुलबाज्या क्षणभरच चमकतात; स्वतंत्र विवेकाचा सूर्य अनंत चमकतो. आपण सूर्य निवडू या.
संग्राहिका : अंजली दिलीप गोखले
मो ८४८२९३९०११
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चिंचवड, पुणे येथील चापेकर कुटुंबातील तीन तरुणांनी स्वातंत्र्य संग्रमात स्वतःची आहुती दिली. त्यांचा जुना वाडा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही दिमाखाने उभा होता. सन १९४८ मधील जळितात तो भस्मसात झाला. आगीतून वाचलेले वाड्याचे लाकूड घरोघरी लोकांनी सरपण म्हणून नेले. भिंतींची माती घरे लिंपण्यास, चुली सारवण्यासाठी लोक घेऊन गेले. वाड्याच्या मागे असलेल्या विहिरीची कचराकुंडी झाली आणि ती चक्क बुजवली गेली. वाड्याच्या जागेवर दारूचे गुत्ते चालू लागले. कित्येक वर्षे त्याठिकाणी दारूचे गुत्ते चालू होते. ज्या ठिकाणी क्रांतिवीर जन्माला आले त्या ठिकाणी दारू पिऊन लोक झिंगू लागले. गावातील लोकांना या गोष्टीची पुरेपूर जाणीव होती. पण हे सारे बंद करण्याचे धाडस दाखवणारा एकही वीर पुढे येत नव्हता. एक दिवस काही मंडळींनी एकत्र येऊन सन १९९५-९६ च्या दरम्यान उठाव केला. मारामाऱ्या झाल्या आणि दारूच्या गुत्याची त्या जागेवरून हकालपट्टी झाली.
क्रांतिवीर चापेकर बंधूंचा वाडा पुन्हा जसाच्या तसा उभा करण्याचा विचार आणि निर्धार झाला. त्यासाठी स्थानिक मान्यवरांची समिती निर्माण झाली. गिरीश प्रभुणे, डॉ. वैद्य, दत्ता दातार, कांता जाधव, अश्विनी मोकाशी अशा अनेक मंडळीनी चापेकर वाडा पुन्हा पूर्ववत उभा करण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला हजारो हात पुढे आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुद्धा ठराव करून या पवित्र कार्यासाठी अनुदान मंजूर केले.
दि. २२ जून १९९७ रोजी चापेकर बंधूंच्या हौतात्म्याच्या शताब्दीदिनी कामास प्रारंभ झाला. जुन्या जाणत्या लोकांच्या मुलाखतीवरून वाड्याचा रचना-आलेख वास्तुरचनाकार संजू फणसळकर यांनी तयार केला.
काम महानगरपालिकेने टेंडरद्वारे एका ठेकेदाराला दिले. कामास प्रारंभ झाला. पाया भरला गेला. परंतु पुढील कामाचे क्लिष्ट व मोठे स्वरूप पाहून ठेकेदाराने काढता पाय घेतला. काम ठप्प झाले. त्यानंतर हे काम करण्यास कोणीही धजावत नव्हता. जुना वाडा, त्याचे जुने स्वरूप विशेषतः लाकडी काम त्यासाठी लागणारे किमती लाकूड, विशिष्ट प्रकारची तक्तपोशी, मेघडंबरी त्यावरील नक्षीकाम हे सारे पुन्हा तयार करावयाचे, या गोष्टी अत्यंत जिकिरीच्या, प्रचंड खर्चाच्या आणि कमीत कमी लाभाच्या होत्या. दगडाचे आणि विटांचे कामही तितकेच बारकाव्याचे आणि प्रमाणबद्धतेचे होते. विहीरही पुन्हा उभी करावयाची होती. सारे काही अवघड होते. राष्ट्रीय प्रेरणेनेच कोणी पुढे आला तरच हे काम पुरे होणार होते.
हे आवाहन पुण्यातील स्थपती नंदकिशोर एकबोटे यांनी स्वीकारले. त्यांनी फायद्याचा काही विचार केला नाही. चिंचवड येथील प्रसिद्ध दैवत गजानन व संत मोरया गोसावी यांचा आशीर्वाद घेऊन सन २००४ मध्ये नव्याने कामाला सुरुवात केली. हिरालाल व गणेश हे दोन सुतार व रोकडे नावाचा पाथरवट चालू असलेले काम पाहण्यासाठी आले. आणि हे काम करण्याचे त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारले.
वाडा पुन्हा उभा करण्यासाठी जुने सागवानी लाकूड मिळवून त्याचे योग्य त्या मापाचे दरवाजे, तुळया, खांब, कडीपाट इ. गोष्टी तयार करण्यासाठी स्वतंत्र मशिनरी खरेदी केली आणि जागेवरच लाकडांची कापणी करून सुताराकडून सर्व गोष्टी जशाच्या तशा बनवून घेतल्या. नेवासा या गावावरून दगड मागविला. व तेथील काही पाथरवटास बोलावण्यात आले. त्यांच्याकडून चौकातील दगडकाम, तुळशीवृंदावन, जोते, तळखडे, दगडी पायऱ्या तयार करून घेतल्या. अशी ही दगडी कामे अतिशय कष्टाची, बुद्धीची आणि नेटाची होती.
सज्जावरील मेघडंबरी तयार करणे व ती बसविणे, त्यावरील कोरीव कामास उठावदारपणा आणणे, कडीपाटास सुबक आकार देणे, तुळई आणि खांब यामधील ब्रॅकेट्स तयार करून बसविणे, हे सारे काम फारच जिकिरीचे होते. जाड खांबावर फळ्यांचे अस्तर देऊन त्यांची जाडी प्रमाणबद्ध ठेवून त्यावर तुळया व मध्ये कडीपाट बसविणे हे साधे दिसले तरी कौशल्याचे काम होते.
लहान आकाराच्या चपट्या विटा बाजारात उपलब्ध नव्हत्या. म्हणून ठराविक आकाराच्या विटा तयार करण्यासाठी वीटभट्टी सुद्धा जागेवरच लावण्यात आली होती. छपरासाठी लागणारी गोल नळीची कौले कोठेच मिळत नव्हती. हे सर्व साहित्य वीटभट्टीतून तयार करण्यात आले. वीटकाम इतके सुबक तयार करण्यात आले,आणि विटांचे सांधे एकमेकांस बरोबर जुळवून अशा पद्धतीने बसविण्यात आले की त्यातील सिमेंट कोठेही दिसत नाही. दर्शनी भिंतींचा रंग पिवळ्या मातीसारखा दिसणे गरजेचे होते. ही रंगसंगती साधण्यासाठी रंगांचे विविध नमुने आणून त्यांची मिश्रणे तयार करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली.
चौक, सोपे, आतील दालने, चौकातील वृंदावन, चौकात पूर्ण दगडी फरशी, अत्यंत रेखीव जोती, जोत्यांना ठिकठिकाणी बसवलेल्या कड्या, चापेकरांनी दुधासाठी पाळलेल्या गाई-म्हशी बांधण्यासाठीचा गोठा, सज्जा, सज्जा वरील मेघडंबरी, दरवाजा, बाजूच्या देवड्या, आतील पायऱ्या, असा तीनमजली वाडा अवघ्या काही महिन्यांत उभा राहिला.
— चिंचवड गावात रामआळीत हा पूर्वाभिमुखी वाडा उभा आहे. वाड्यासमोरून उत्तर-दक्षिण असा गावचा हमरस्ता आहे. वाड्याच्यासमोर उभे राहिल्यावर दरवाजावरील गणेशपट्टी आणि वरील मेघडंबरीयुक्त सज्जा पाहून मन प्रसन्न होते. वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर दगडी फरशीचा चौक, मधोमध असलेले तुळशीवृंदावन, चार सोपे, त्यावरील दोन मजले, सुंदर असे लाकूडकाम पाहिल्यावर खरोखरच चापेकरांचा हा वाडा नवा असला तरी जुन्या घटनांनी मात्र त्या काळातच घेऊन जातो. त्यांची त्या वेळची पितळी भांडी एका फडताळात ठेवलेली दिसतात. तर बाहेरच्या सोप्यात देव्हाऱ्यातील त्यांच्या पूजेच्या देवाचे दर्शन घडते. समोरच्या सोप्यात क्रांतिवीर दामोदर चापेकर यांचा पुतळा पाहिल्यावर क्रांतिदिन मनःचक्षू पुढे साक्षात उभा राहतो. वाड्याचे तिन्ही मजले पाहिल्यावर आणि परसातील विहीर पाहून नव्या उभ्या राहिलेल्या वाड्याचे मंगलमय प्रतिबिंब विहिरीतील पाण्यात दिसू लागते आणि त्याचक्षणी चापेकर बंधूंचा ब्रिटिशांच्या दडपशाही आणि अत्याचार यांच्या विरुद्ध दिलेला लढा आणि त्यातून प्राप्त झालेले वीरमरण याचा ज्वलंत इतिहास उभा राहतो.
संग्रहिका : सुश्री हेमा फाटक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले ” वास्तू प्रसन्न आहे हं तुमची ” – आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली. तुझी वास्तुशांती करून, काही वस्तु जमिनीत पुरून, जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही… मग उरतं ते फक्त घर… तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा केला जातो !!—- अगदी अपराधी वाटलं… मग काय तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं... म्हणून आज हे पत्र !
तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या… जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही…
घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते…
आजारपणात डॉक्टर म्हणतात–” आराम पडावा म्हणून ऍडमिट करा “– पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं… !
तुझ्या निवाऱ्यातच अपरिमित सुख आहे —
अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते,
दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं,
तर उंबरा म्हणतो ‘ थांब लिंबलोण उतरू दे…’
बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी !
स्वयंपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !
तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते,
—–खरंच वास्तुदेवते या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.
तुझी शिकवण तरी किती बहुअंगी —
खिडकी म्हणते ‘ दूरवर बघायला शिक,’
दार म्हणतं ‘ येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर,’
भिंती म्हणतात ‘ मलाही कान आहेत परनिंदा करू नकोस,’
छत म्हणतं ‘ माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर,’
जमीन म्हणते ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत ‘
तर बाहेरचं कौलारू छप्पर सांगतं ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे, की बाहेरची शोभा आतून दिसेल आणि कुणालाही ऊन, वारा, पाऊस लागणार नाही ! ‘
इतकंच नाही तर तू घरातील मुंग्या, झुरळं, पाली, कोळी, यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तूच तर बघतोस आणि निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस…
— इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद आम्हाला दे…
तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलांची घरं उभी रहातात याचं खरंच वाईट वाटतं…
एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालोय आम्ही……. पण तरीही शेवटी ‘ घर देता का कोणी घर ‘ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत ते घर नसतं… ते बांधकाम असतं रे… विटा-मातीचं.
वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची…’ नेहमी शुभ बोलावं म्हणजे आपल्या बोलण्याला वास्तूपुरूष नेहमी तथास्तु म्हणत असतो ‘ —– मग आज इतकंच म्हणतो की —
” तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन, तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तेष्टं एकत्र वास्तव्यास येऊ दे…”
—” आणि या माझ्या मागण्याला तू तथास्तु असं म्हणच… हा माझा आग्रह आहे.”
ll वास्तूदेवताभ्यो नम: ll
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ तो कल्याण करी — तो मुरारी वनचरी — तो रामकृष्णहरी… सौ.प्रिया श्रीनिवास जोग ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
आज गर्भरेशमी लाल रंगाचा शालू सीतामाईंच्या अंगावर अगदी खुलून दिसत होता. साक्षात लक्ष्मीचे तेज, तिचे ऐश्वर्य त्यांच्या मुखावर विलसत होते. पण कधी आपल्या रुपाचा त्यांना गर्व नाही झाला. अत्यंत सालस अन् सोज्ज्वळ अशी ती सीतामाई ! दाशरथी रामाची जनकनंदिनी सीता !
खरंतर देवळात आवळी पूजनाची चाललेली तयारी पाहून सीतामाई खुलल्या होत्या. वनवासातले भोग भोगून त्या मानवी जीवन खूप जवळून समजल्या होत्या. म्हणून तर माणसांच्यात घटकाभर त्यांनाही रमायला आवडत असावे. तितक्यात कुणीतरी एका कुंडीत लावलेले आवळीचे झाड तिथे आणून ठेवले. पाठोपाठ भगवान विष्णूंचा ध्यानस्थ फोटोही तिथे मांडण्यात आला. कुंडीभोवती फुलांची रांगोळी काय, फुलांचे तुळशीचे हार काय !! ती कुंडीतली छोटीशी आमलकी अर्थात आवळीच हो, लाजून चूर होतेय असा सीतामाईंना भास झाला. तिची इवली इवलाली नाजूक पाने तिने जणू लाजबावरी होऊन मिटून घेतली होती असंच वाटत होतं. खरंतर किती साधंसच तिचं रुप, पण श्रीविष्णूंच्या सान्निध्यात ते अधिकच खुललं होतं. ती अधिकच सौंदर्यवती भासत होती. नववधूचे भाव तिच्यावर विलसत होते. खरंतर नववधू तर सध्या वृंदादेवी आहेत. पण तरीही ही आमलकी किती आनंदात दिसत होती. औटघटकेचे तिचे हे सुख, हे सान्निध्य, पण ती अत्यंत समाधानी होती. सीतामाई एकटक तिच्याकडे पहात होत्या. ते रामरायांच्या चतुर नजरेने बरोबर टिपलं. थोडीशी थट्टा करायची लहर त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी एकवार लक्ष्मणाकडेही पाहिलं. पण तो काय बोलणार अशावेळी. तो बिचारा आपले धनुष्य सावरीत स्वस्थ उभा !!
श्रीराम— सीते, हे सीते , अशा एकटक कुठे पाहताय नक्की ? तुमच्याहून रुपाने कुणी सरस आहे की काय ?
सीतामाई – लटके हसत मान वेळावत, “अहो तसंच काही नाही. पण आज ती आमलकी पहा ना कशी अनुपम दिसतेय. आजचा दिवस तिच्या भाग्याचा. हेवा नाही हो आमच्या मनी. आपले एकपत्नी व्रत आम्ही जाणत नाही का ? पण तिचे उजळलेले रुप नेत्रात साठवावे वाटते हो. आज तिला विष्णूंचे सान्निध्य लाभलंय. त्यांचा परीस स्पर्श तिला मिळतोय. त्यांची कृपादृष्टी आज तिच्यावर आहे. समाधान मिळतंय हो ते पाहून.
श्रीराम— सीते हे वैभव तर तिच्या ओटीत तुम्हीच घातलंत ना. तिच्या झाडाखाली विष्णूरुपात पूजा करुन–तेही तुमच्या लक्ष्मीरुपात. आपण उभयतांनी तिथेच वास केला म्हणून तर तिचे माहात्म्य थोर झाले.
सीतामाई— ते सारं स्मरणात आहे हो. पण मी आता वेगळाच विचार करतेय. आपण राम अवतारात १४ वर्षे वनांतरी काढली. आणि त्या गोकुळातल्या कृष्णाने गाईगुरांबरोबर गोपगोपींबरोबर वनविहार केला. दोन्ही अवतारात वनात वास होताच. पण किती फरक पडला ना दोहोंत. कृष्ण अवतारात आपला एकमेकांचा सहवास किती ते जरा आठवावंच लागेल. तुमचा सहवास लाभला तो राधेला आणि वृंदेलाच.
श्रीराम— अवतारलीला होत्या त्या सर्व. पण हा राम मात्र सीतारामच किंवा सीताकांत म्हणून स्मरला जातो हेही सत्य आहे ना–
“ सीताकांत स्मरण जयजयराम “ — लक्ष्मणाने हळूच जयजयकार करत श्रीरामांना आपले अनुमोदन दर्शवले.
आता यावर सीतामाई निरुत्तर. पण रामांना कोपरखळी मारायचीच होती. त्यांचे लक्ष तितक्यात समोर गेलं. लाडू, पेढे, पोहे, चित्रान्ना, केळी, फुटाणे,- भगवंतासमोर किती ते भोग मांडले जात होते. पाणी फिरवून नैवेद्य दाखवला जात होता. रामराया आशिर्वाद मुद्रेत होते. स्मित हास्य चेहेऱ्यावर उमटत होते. ते पाहून सीतामाई चटकन म्हणाल्या,
“ अहो ऐकलंत का, तो नैवेद्य कृष्णार्पण आहे बरं. रामराय काय वनवासी, कंदमुळं खाऊन राहिलेले. तुम्हाला कुठला नैवेद्य दाखवायचा हा भक्तांना कायम प्रश्न पडत असावा. त्यामुळे सगळा नैवेद्य कृष्णार्पणच !! आणि हो, इथे श्रीविष्णूसहस्रनाम आवर्तन होणार आहे हे पण ध्यानात असू दे. “
श्रीराम — “ होय सीते जाणून आहोत ते आम्ही. ‘ सहस्र नाम तत्तुल्य रामनाम वरानने ‘ – ठाऊक आहे ना.
रामकृष्णहरी हा या युगासाठी अत्यंत सोपा मंत्र आहे. जो हा मंत्र जपेल त्याचे कल्याण होईल. आवर्तन श्रीविष्णूसहस्रनामाचे पण साक्षीला राम आहे हे महत्त्वाचे !!”
सीतामाई — एकवचनी रामाचे कुठलेही वचन कसे हो उणे पडावे. आम्ही निरुत्तर आहोत. तुमच्या बाणांप्रमाणे तुमचे वाक्बाणही अमोघ आहेत हे मान्य आहे आम्हाला.”
श्रीराम -राम अवतारात वनवासी राहिलो. पण कृष्ण अवतारात खरे निसर्ग सान्निध्य मोकळेपणाने अनुभवले. गोपांचा जीवनाधार तो गोवर्धन, त्यावरील वृक्ष राजी, यमुनेचा तो खळाळ अन् तिचे ते धीरगंभीर डोह, यमुना तटावरचा तो कदंब, आवळी, ते वृंदावन, गोधन, वेणूनादाने नादावलेले इतरही पशुपक्षी, हे सारे तर सृष्टीचे भाग. ही विपुल सृष्टी आहे. म्हणून मानवी जीवन समृद्ध आहे. म्हणूनच फक्त गोवर्धन नव्हे तर सर्व सृष्टीचे वर्धन व्हावे आणि अर्थातच पुढील पिढीसाठी संवर्धनही तितकेच महत्वाचे हे जाणून तशा लिला रचल्या. तशा कथा रचल्या आणि त्यातून कालातीत असे संदेश मानव जातीला दिले.”
सीतामाई— होय त्यासाठी गीतेची निर्मिती झाली. विभूतीयोगाद्वारे आपली विभूती निसर्गाच्या कोणकोणत्या रुपात आहे हे सांगितलंत. तेच मुख्य सूत्र धरुन आपल्या ऋषीमुनींनी सणवारांची रचना केली, असंच म्हणायचं आहे ना ?”
लक्ष्मण — “ मध्येच बोलतोय श्रीरामा. शेषरुपात या पृथ्वीचा भार आम्ही तोलतोय म्हणून जे वाटतंय ते बोलू का–”
सीतामाई— “ अहो भाऊजी, परवानगी काय हो मागताय? अहो बोलू शकता तुम्ही. तुमचे आमच्यात शाश्वत स्थान आहेच.”
लक्ष्मण — “ मानवाने त्याच्या कल्याणाकरता घालून दिलेल्या परंपरांचे पालन करावे यासाठी खरेतर मीच मनोभावे प्रार्थना करेन. कारण मानवाची चुकीची पावले धरणीला भारभूत होतात. आणि पर्यायाने मलाही.”
श्रीराम– “ अगदी योग्य बोललास लक्ष्मणा ! धर्माचे पालन व रक्षण करण्यासाठी परंपरांचे आणि पर्यावरणाचेही समजून उमजून जतन हेही महत्त्वाचे. काळाची बदलती पावले ओळखण्याइतका माणूस सूज्ञ आहेच. त्याने फक्त हितकारी मार्गावर पावले टाकत समस्त मानव जातीचे कल्याण साधावे.”
रामराया कल्याण करायला उत्सुक आहेतच. ते सर्वांच्या हृदयातच स्थित आहेत. ते फक्त ओळखावे आणि ज्याने त्याने आपले कल्याण साधावे.
लेखिका : सौ.प्रिया श्रीनिवास जोग, चिंचवड पुणे
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पाश्चिमात्य संशोधकांनी उलगडले की संस्कृत मंत्र लक्षात ठेवणारी मुले मोठी झाल्यावर अति हुशार का होतात ?
कठोरपणे लक्षात ठेवणे मेंदूला किती मदत करू शकते हे न्यूरोसायन्स दाखवते. ‘संस्कृत इफेक्ट’ ही संज्ञा न्यूरोसायंटिस्ट जेम्स हार्टझेल यांनी तयार केली होती, ज्यांनी व्यावसायिक पात्रता असलेल्या २१ संस्कृत पंडितांचा अभ्यास केला होता. त्यांनी शोधून काढले की वैदिक मंत्रांचे स्मरण केल्याने अल्प आणि दीर्घकालीन स्मृतीसह संज्ञानात्मक कार्याशी संबंधित मेंदूच्या क्षेत्रांचा आकार वाढतो. हा शोध भारतीय परंपरेच्या श्रद्धेला पुष्टी देतो, ज्यामध्ये असे मानले जाते की मंत्रांचे स्मरण करणे आणि पाठ करणे स्मरणशक्ती आणि विचार वाढवते.
डॉ. हार्टझेलच्या अलिकडील अभ्यासात असा प्रश्न निर्माण झाला आहे की अशाप्रकारच्या प्राचीन ग्रंथांचे स्मरण अल्झायमर आणि इतर स्मरणशक्तीवर परिणाम करणाऱ्या रोगांचे विनाशकारी आजार कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते का? वरवर पाहता, भारतातील आयुर्वेदिक डॉक्टर असे सुचवतात, आणि संस्कृतमध्ये अधिक संशोधनासह भविष्यातील अभ्यास नक्कीच केले जातील.
आपल्या सर्वांना सजगता आणि ध्यान पद्धतींचे फायदे माहित असताना, डॉ हार्टझेलचे निष्कर्ष खरोखरच नाट्यमय आहेत. कमी होत चाललेल्या लक्षांच्या जगात, जिथे आपल्याला दररोज माहितीचा पूर येतो आणि मुले लक्ष वेधून घेणारे अनेक विकार दाखवतात, तिथे प्राचीन भारतीय शहाणपणामध्ये पश्चिमेला (आणि पूर्वेकडील त्यांच्या ‘आधुनिक’ बौद्धिक सेवकांना) शिकवण्यासारखे बरेच काही आहे.
गायत्री मंत्रासारख्या सामान्य संस्कृत मंत्रांचे थोडय़ा प्रमाणात जप आणि पठण करूनही आपल्या सर्व मेंदूवर आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतो.