सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ प्रिय वास्तू पुरुषास ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे  ☆

साष्टांग नमस्कार विनंती विशेष.

झालं असं की, एकजण घरी आले होते. ते बोलता बोलता म्हणाले ” वास्तू प्रसन्न आहे हं तुमची ” – आणि तुझी प्रथमच प्रकर्षाने आठवण झाली. तुझी वास्तुशांती करून, काही वस्तु जमिनीत पुरून, जेवणावळी केल्या, की तुला विसरूनच जातो रे आम्ही… मग उरतं ते फक्त  घर… तुझ्या खंबीर पाठिंब्याकडे अगदी पूर्ण कानाडोळा केला जातो !!—-  अगदी अपराधी वाटलं… मग काय तुझ्याशी पत्र संवाद करण्याचं ठरवलं..‌. म्हणून आज हे पत्र !

तुझ्याविषयी विचार करताना कितीतरी गोष्टी प्रथमच लक्षात आल्या… जिथे तू प्रसन्नपणे वावरतोस ते घरकुल खरंच सोडवत नाही…

घरात बसून कंटाळा येतो म्हणून प्रवासाला म्हणजे पर्यटनाला गेलो, तर चार दिवस मजेत जातात. पण नव्याची नवलाई संपते आणि घराची ओढ लागते…

आजारपणात डॉक्टर म्हणतात–” आराम पडावा म्हणून ऍडमिट करा “– पण तुझ्या कुशीत परतल्याशिवाय कोणाच्याही प्रकृतीला आराम पडत नाही हेच खरं… !

तुझ्या निवाऱ्यातच अपरिमित सुख आहे —

अंगणातील छोटीशी रांगोळी स्वागत करते, 

दारावरचं तोरण हसतमुखाने सामोरं येतं, 

तर उंबरा म्हणतो ‘ थांब लिंबलोण उतरू दे…’

 बैठकीत विश्वास मिळतो, तर माजघरात आपुलकी !

स्वयंपाकघरातील प्रेम तर दुधाच्या मायेनं ऊतू जातं !

तुझ्या आतल्या देव्हाऱ्यात बसलेली मूर्ती मनातील भीती पळवून लावते,

—–खरंच वास्तुदेवते या सगळ्यामुळे तुझी ओढ लागते.

तुझी शिकवण तरी किती बहुअंगी —

खिडकी म्हणते ‘ दूरवर बघायला शिक,’ 

दार म्हणतं ‘ येणाऱ्याचं खुल्या मनाने स्वागत कर,’

भिंती म्हणतात ‘ मलाही कान आहेत परनिंदा करू नकोस,’ 

छत म्हणतं ‘ माझ्यासारखा उंचीवर येऊन विचार कर,’ 

जमीन म्हणते ‘ कितीही मोठा झालास तरी पाय माझ्यावरच असू देत ‘ 

तर बाहेरचं  कौलारू छप्पर सांगतं ‘ स्नेहाच्या पंखाखाली सगळ्यांना असं काही शाकारून घे, की बाहेरची शोभा आतून दिसेल आणि कुणालाही ऊन, वारा, पाऊस लागणार नाही ! ‘

इतकंच नाही तर तू घरातील मुंग्या, झुरळं, पाली, कोळी,  यांचाही आश्रयदाता आहेस. त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्थाही तूच तर बघतोस आणि निसर्गाच्या अन्नसाखळीला हातभार लावतोस… 

— इतकं मोठं मन आमचंही व्हावं असा आशीर्वाद आम्हाला दे…

तुझ्या वाटणीसाठी दोन भाऊ कोर्टात जातात आणि वकिलांची घरं उभी रहातात याचं खरंच वाईट वाटतं…

एकत्र कुटुंब पद्धतीकडून एकल कुटुंब पद्धतीकडे वेगाने निघालोय आम्ही…….  पण तरीही शेवटी ‘ घर देता का कोणी घर ‘ ही नटसम्राटाची घरघर काही संपली नाही रे ! कारण जिथे तुझ्या प्रसन्नतेच्या खाणाखुणा नाहीत ते घर नसतं… ते बांधकाम असतं रे… विटा-मातीचं.

वास्तू देवते, पूर्वी आई-आजी सांगायची…’ नेहमी शुभ बोलावं म्हणजे आपल्या बोलण्याला वास्तूपुरूष नेहमी तथास्तु म्हणत असतो ‘ —– मग आज इतकंच म्हणतो की —

” तुला वस्तू समजून विकायचा अट्टहास कमी होऊन, तुझ्या वास्तूत वर्षातून काही क्षण तरी सगळी भावंडं, मित्रमैत्रिणी, सगेसोयरे, आप्तेष्टं एकत्र वास्तव्यास येऊ दे…”

—” आणि या माझ्या मागण्याला तू तथास्तु असं म्हणच… हा माझा आग्रह आहे.” 

 ll वास्तूदेवताभ्यो नम: ll 

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
1 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments