वाचताना वेचलेले
☆ घर कसं असावं? — कवी रमण रणदिवे ☆ संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे ☆
केवळ अपुल्या स्वार्थासाठी
कलह नसावा घरामधे
आपुलकीच्या नात्यामधुनी
स्नेह जपावा मनांमधे ——-
येणार्याला पाणी द्यावे
स्वागतातही गोडी हवी
जाणार्याच्या मनांत फिरुनी
येण्यासाठी ओढ हवी
ऐसा प्रेमळ माणुसकीचा
झरा वहावा घरामधे
आपुलकीच्या नात्यामधुनी
स्नेह जपावा मनांमधे ——–
भांड्याला लागतेच भांडे
विसरुन जावे क्षणामधे
परस्परांना समजुन घ्यावे
अढी नसावी मनांमधे
रुसवे फुगवे नको फुकाचे
मोद रहावा घरामधे
आपुलकीच्या नात्यामधुनी
स्नेह जपावा मनांमधे ——-
नित्य काळजी घरात घ्यावी
वय झालेल्या पानांची
ज्याची त्याला द्यावी जागा
वयाप्रमाणे मानाची
एकमताने निर्णय घ्यावे
नको दुरावा मनामधे
आपुलकीच्या नात्यामधुनी
स्नेह जपावा मनांमधे ——–
कवी : रमण रणदिवे
संग्रहिका : माधुरी परांजपे