मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ गाडीचे गिअर्स… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆

गाडी चालवायची म्हणजे क्लच, ब्रेक आणि गिअरबरोबर झटापट ही आलीच. बदलत जाणारे गिअर्स आणि त्यामुळे बदलत जणारा गाडीचा वेग यावरून एक कल्पना सुचली.

गाडी सुरू झाल्यावर तिला पुढे नेण्यासाठी आपण ‘फर्स्ट गिअर’ टाकतो. हा ‘फर्स्ट गिअर’ म्हणजे आपल्या जवळची सख्खी माणसं. आई, बाबा, जोडीदार, मुलं, जवळचे मित्र. हा पहिला गिअर टाकल्याशिवाय गाडी पुढे जात नाही. मुंगीच्या गतीने का होईना गाडी न थांबता ‘पुढे’ जात राहिली पाहिजे हा पहिला ‘संस्कार’ फर्स्ट गिअर करतो.

इथे आपल्याला निर्व्याज्य प्रेम मिळतं, सुरक्षितता मिळते. गाडी ‘बंद पडणार नाही’ याची पुरेपूर काळजी हा फर्स्ट गिअर घेतो. परंतु गाडी ‘पळण्यासाठी’ इतका कमी वेग पुरेसा नसतो.

आपण गाडीचा वेग वाढवतो. सेकंड गिअर टाकतो. इथे आपल्याला घराबाहेरचं विश्व कळू लागतं. शाळा, कॉलेज, पुस्तकं, मिडिया, आपले छंद, विविध कला… बाहेरचं जग किती मोठं आहे आणि माहिती आणि ज्ञानामुळे हेच मोठं जग किती जवळ आलं आहे, हे कळतं. समोर पसरलेला संधीचा आणि प्रगतीचा रस्ता आता आपल्याला खुणावू लागतो.

गाडीचा वेग आणखी वाढवण्यासाठी आपण आता थर्ड गिअर टाकतो. गाडीचा वेग आणखी वाढतो. हा थर्ड गिअर म्हणजे आपला नोकरी धंदा आणि त्यातून मिळणारं विना-खंडित उत्पन्न. गरजे पुरतं घर, कपडालत्ता, भांडीकुंडी, पहिला फ्रीज, पहिला टीव्ही, प्रसंगानुरूप हॉटेलिंग, सणासुदीला नवीन कपडे, चांगले मार्क मिळाले तर मुलाला-मुलीला सायकल वगैरे थर्ड गिअरमध्ये येतं. या गिअरमध्ये आपण बऱ्यापैकी स्थिरावतो. गाडीचा वेग ना कमी ना जास्त. सेकंड मधून थर्ड गिअरमध्ये आलो तेव्हा वेग जास्त होता हे मान्य, पण आता तोच वेग कमी वाटू लागतो.

आपण आता ‘फोर्थ गिअर’ टाकतो. गाडी सुसाट निघते. मनात आलं की हॉटेलिंग-शॉपिंग-मल्टीप्लेक्स, गाडी, आकर्षक लेटेस्ट मोबाईल, एक बि. एच. के. मधून दोन बि. एच. के., लॅपटाॅप, ह्याऊ नि त्याऊ. या वेगाची नशाच काही और.

गंमत म्हणजे आपण पाचव्या गिअर मध्ये कधी जातो हे आपल्यालाच कळत नाही. आता गाडी अक्षरश: तरंगत जात असते. हजार… लाख… कोटी… खर्व… निखर्व… रुपये नाहीत, गरजा.. हा ‘वेग’खूप आनंददायी असतो. आपल्या गाडीच्या आड कुणी येऊ नये, ‘लाल’सिग्नल लागू नये असं मनोमन वाटत असतं आणि… आणि…. आणि…. ‘नियती’ नावाचा एक स्पीडब्रेकर समोर येतो. तो खूप प्रचंड असतो. गाडी थांबवण्यावाचून आता पर्याय नसतो.

पाच.. चार.. तीन.. दोन… एक…. खाट खाट

गिअर मागे टाकत आपण आता न्यूट्रलवर येतो. कचकावून ब्रेक लागतात. गाडी पूर्ण थांबते. आपल्या अंगाला खूप मोठा झटका बसतो. पाचव्या गिअरमध्ये गाडी असताना आपण कधी काळी फर्स्ट गिअरदेखील टाकला होता याचा विसर पडला होता. वरचा प्रत्येक गिअर टाकताना त्या गिअरची अशी एक मानसिकता होती.. आज एक एक गिअर मागे येताना हे पहिल्यांदा जाणवलं. गाडी आता पूर्ण थांबली आहे. गाडी आता पुढे न्यायची आहे. मला सांगा कुठला गिअर टाकाल ?

सुसाट वेगाचा पाचवा गिअर ? की मुंगीच्या वेगाचा पण गाडी चालू ठेवेल असा ‘फर्स्ट गिअर’ ?

आयुष्यात जेव्हा पराभवाचे, निराशेचे क्षण आले होते, तेव्हा कोण होतं तुमच्या जवळ ? कुणी दिला होता आधार ? आठवून पहा. प्लाज्मा टीव्हीने ? इ. एम. आय. भरत विकत घेतलेल्या क्लासिक बेडरूमने ? नव्या कोऱ्या गाडीने ? ‘ यू आर प्रमोटेड’ असं लिहिलेल्या कागदाने ? मी सांगतो कोण होतं तुमच्याजवळ. तुम्हाला आधार दिला होता फर्स्ट गिअरने.

आर्थिक अडचणीच्या वेळी आपल्या उशाखाली नोटांचं पुडकं हळूच ठेवून जाणारे बाबा, निरागस प्रश्न विचारून आपल्या चिंता घालवणारी आपली चिमुरडी मुलं, ‘होईल सगळं व्यवस्थित’ म्हणत डोक्याला बाम चोळून देणारी ‘बायको’ नावाची मैत्रीण, बाहेरचं खाऊन त्रास होऊ नये म्हणून पहाटे उठून पोळी भाजीचा डबा बनवणारी आई, ‘त्या’ काळात आपल्या नैराश्यावरचा ‘कान’ होणारे आणि योग्य सल्ला देणारे ‘जिवाभावाचे मित्र’ हे सगळे फर्स्ट गिअर तुमची गाडी ओढत नव्हते कां ?

माझा चवथ्या-पाचव्या गिअर्सना आक्षेप नाही. त्या वेगाची धुंदी जरूर अनुभवू या. त्याचा आनंद ही उपभोगू या. फक्त त्यावेळी आपल्या ‘फर्स्ट गिअर्स’ चं स्मरण ठेवू या. आयुष्याचा वेग मधून मधून थोऽऽऽडा कमी करत पुन्हा एकदा फर्स्ट गिअरवर येऊया.

जिंदगी हसीन है.

☆ ☆ ☆ ☆

लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

“गवार वीस रुपये…

कलिंगडं शंभरला तीन!”

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डोलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो.

इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकी आहे. तिथं पी’ असा सल्ला दिला.

‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं.

तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तीबी संपली. म्हणून म्हणालो.’

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, ‘वाह रे वाह शहाणा! म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना असेल, तर तो आम्हाला देऊन जाणार.’ ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं.

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्यागैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्च विद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. ‘उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या,’ असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला.

आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, ‘त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?’ पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, ‘वडील होते माझे.’

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, ‘घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकण्यासाठी इतकं हिंडतोय व्हय?’ गवार तोलत भैय्या म्हणाला, ‘घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत. पण तात्या म्हणत्यात, आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे. आत्ताच्या काळात गरिबांबरोबर लोक जेवढं वाईट वागत्यात, तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.’

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता.

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एक स्त्रीला तिच्या पतीचं समर्थन असेल तर ती अख्ख्या जगासोबत लढू शकते.. पण जर तिच्या पतीचंच समर्थन तिला नसेल तर ती स्वतःसोबत पण हरून जाते.. पराभूत होते.

‘नवरा’ आयुष्यभर ‘नवरा’च राहतो, ‘नवरी मुलगी’ मात्र “बायको” बनते..

नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ ‘फक्त नवऱ्यासाठीच’ ‘ती’ एका अनोळख्या घरात जाते, बाकी सासरची नाती तर नंतर निर्माण होतात हो..

पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्याआधी कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रीण असते..

नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्त्व द्यायला विसरते.. आणि मित्रमैत्रिणींना वाटतं, लग्नानंतर ‘ती’ बदलली..

लग्नानंतर सगळ्या परिस्थितीसोबत ‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यातही पतीची साथ असेल तर ठीकच, नाही तर ‘ती’ खचून जाते हो…

माहेरी लागलेल्या सगळ्या सवयींविरुद्ध सासरी वागावं लागतं.. अचानकच मोठं व्हावं लागतं.. अचानकच जबाबदार व्हावं लागतं.. आणि ‘ती’ हे सगळं बनण्याचा प्रयत्नही खूप करते..

माहेरी ‘ए आई, मला भूक लागली. लवकर खायला दे, ‘ म्हणत असतांना, आईने सगळ्यात आधी आपल्याच हातात ताट देणे..

पण सासरी गेल्यावर खूप भूक लागूनही सगळ्यांना वाढून झाल्यावरच, सगळ्यांचे जेवण झाल्यावरच, नंतर जेवण्याची सवय लागते..

माहेरी साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर घेणारी ‘ती’; सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी कुणाला जाणवू देत नाही..

कधी आईच्या राज्यात स्वयंपाकघरात न शिरलेली ‘ती ‘; सासरी मात्र ‘बायको’ म्हणून नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..

कधी स्वतःच्या हातात भारी ओझं न उचललेली ‘ती’; संसाराचं ओझं मात्र उचलायला शिकते. संसाराचा गाडा ओढायला शिकते..

कधीच स्वतःची बॅग नीट न पॅक केलेली ‘ती’; सासरी मात्र स्वतःसोबत नवऱ्याचीही पॅकिंग मस्त करून द्यायला शिकते..

माहेरी बहीण-भावामध्ये सगळ्यात आधी मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..

माहेरी दुसऱ्याच्या हिश्श्यामध्ये आलेलं असलं तरी हिसकावून स्वतः घेणारी ‘ती’; सासरी मात्र स्वतःच्या हिश्श्याचं आलेलंही पतीला न कळता द्यायला शिकते..

स्वतःची तयारी स्वतः नीट न करणारी ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याची, मुलांचीही तयारी करून द्यायला शिकते..

कधी स्वतःचीच योग्य काळजी न घेतलेली ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याचीही, त्यांच्या घरातल्यांची काळजी घ्यायला शिकते..

कधी आईबापाची पण ऑर्डर न ऐकणारी ‘ती’; सासरी मात्र सासऱ्यांची, घरांतल्या सगळ्यांचीच ऑर्डर ऐकते..

कधी आपल्या आईबापाला पण न घाबरणारी, आईबाबांसोबत मैत्रीपूर्वक बोलणारी ‘ती’; सासरी मात्र सासू सासऱ्यांना घाबरायला लागते..

स्वतःच्या आईला कसल्याही कामात मदत न करणारी ‘ती’, सासरी मात्र सासूचं ऑपरेशन झाल्यावर त्यांची सेवा करायला लागते..

घरी भांडून हुज्जत घालणारी ‘ती’; सासरी मात्र कुणाला वाईट वाटू नये म्हणून बोलणे सहन करते..

साधं दुखलं, खुपलं, माखलं तरी सगळ्यांसमोर ढसाढसा रडणारी ‘ती’; सासरी मात्र दुःख झालं तरी आईबाबांची आठवण काढून एकांतात रडायला लागते..

आईबाबांना खाण्यापिण्यापासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’; सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही, आईबाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..

बाहेरून शॉपिंग करून आल्यावरही लगेच लोळत, ‘ए आई, चहा दे ग, ‘ म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र कितीही थकून आली, तरीही लगेच कामाला लागते..

स्वतः कितीही शिकली तरी घरी तिची ‘बायको’, ‘सून’ वा ‘आई’ म्हणून असलेली भूमिका ‘ती’ निभावत असते..

जर एक ‘मुलगी’ लग्नानंतर इतकं बदलू शकते तर मग ‘मुलाने’ व घरातल्या इतर लोकांनी थोडं बदललं तर काय होतंय.. ?

एका मुलीला फक्त आदर आणि प्रेम हवं असतं हो, बाकी तर दुय्यम आहे..

“अरे 10 दिवसाचा गणपती उठवताना हृदय पिळून निघतं, मग एवढी वर्ष सांभाळलेली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देताना त्या आईवडिलांना कसं वाटतं असेल, त्या मुलीला कसं वाटतं असेल.. मुलगी सुखी राहावी, तिच्या नवऱ्याने, सासरच्या मंडळींनी तिला सुखी ठेवावं; ही केवळ एकच अपेक्षा असते.. “

ह्याची कल्पना करून पहा.. बघा ‘ती’ला आदर देणं जमतंय का?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ राम की कृष्ण ? – कवी – अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆

कोणीतरी विचारले, मला परवा,

तुला राम हवा की कृष्ण हवा?

मी म्हणाले, किती छान विचारला प्रश्न.

सांगते, कधी मला राम पाहिजे, कधी कृष्ण!

 

रामराया, पोटात घालेल माझी चूक

आणि कृष्ण भागवेल माझी भूक!

 

रात्रीची शांत झोप, रामरायाच देतो.

भूक लागली की कृष्णच आठवतो.

 

कशाचीही भीती वाटली की मला आठवतो, राम!

कष्ट झाले, दुःख झाले की कृष्णाकडेच मिळतो आराम.

 

रक्षण कर! सांगते रामरायालाच.

सुखी ठेव सांगते, मी श्रीकृष्णालाच.

 

बुध्दीचा विवेक रामाशिवाय कोणाकडे मागावा,

व्यवहारातील चतुरपणा कृष्णानीच शिकवावा.

 

सहनशक्ती दे रे, माझ्या रामराया.

कृष्ण बसलाय ना कर्माचे फळ द्यायला.

 

रामाला फक्त शरण जावे वाटते.

कृष्णाशी मात्र बोलावेसे, भांडावेसे वाटते.

 

रामाला क्षमा मागावी,

कृष्णाला भीक मागावी.

 

रामाला स्मरावे,

कृष्णाला जगावे.

 

अभ्यास करताना प्रार्थना राजमणी रामाला!

पायावर उभे राहताना विनवणी, विष्णूला.

 

एकाचे दोन होताना घ्यावे, रामाचे आशीर्वाद.

संसार करताना आवर्जून द्यावा नारायणाला प्रसाद.

 

आरोग्य देणारा राम,

सौंदर्य देणारा कृष्ण.

 

राज्य देणारा राम,

सेना देणारा कृष्ण.

 

बरोबर-चूक सांगतो राम,

चांगले-वाईट सांगणे कृष्णाचे काम.

 

रामाकडे मागावे आई वडिलांचे क्षेम,

कृष्णाकडे मागते मी मित्रांचे प्रेम!

 

पाळण्यात नाव ठेवताना गोविंद घ्या, गोपाळ घ्या.

अंतिम वेळी मात्र रामनाम घ्या.

 

दोघांकडे मागावे तरी काय काय?

ते दोघे हसत बघत आहेत माझ्याकडे,

म्हणत आहेत, अग आम्ही एकच!!

तू फसलीस की काय?

 

म्हणाले, कोण हवा? हा प्रश्नच नाही

मिळू दोघेही, नाहीतर कोणीच नाही.

 

मी रडले आणि म्हणाले, दोघेही रहा माझ्याबरोबर

परत नाही विचारणार हा प्रश्न.

राम का कृष्ण?

परत विचारले जरी

फक्त म्हणेन,

जय जय रामकृष्ण हरी,

जय जय रामकृष्ण हरी.

कवी: अज्ञात

प्रस्तुती :  श्रीमती प्रफुल्ला शेणॉय

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ सुटका… लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – श्रीमती स्वाती मंत्री ☆

भर समुद्रात एक बोट फुटली. एक माणूस वाचला आणि एका छोट्या बेटाच्या किनाऱ्याला लागला.

तो म्हणाला, देवा, तुझा चमत्कार अद्भुत आहे. तू माझा जीव वाचवलास.

त्याने त्या निर्जन बेटावर झावळ्यांची, पानांची एक झोपडी बांधली. तिच्यात तो राहू लागला. मासे मारून, फळं तोडून खाऊ लागला. कधीतरी एखादंजहाज जवळून जाईल आणि आपली सुटका होईल, अशी त्याला आशा होती.

तो सतत देवाची प्रार्थना करत असायचा.

एक दिवस तो फळं गोळा करून परत आला, तेव्हा त्याची झोपडी जळत होती, धुराचे लोट आकाशात उठत होते. ते दृश्य पाहून तो वेडापिसाच झाला. परमेश्वराला कोसू लागला. तू निर्दय आहेस, माझा आसरा हिरावून घेतलास. देव आहेस की सैतान, असं बोलू लागला. तेवढ्यात एक जहाज त्याच्या बेटाच्या दिशेने येताना दिसलं…

…बेटावरून सुटका होऊन जहाजावर आल्यावर त्याने कॅप्टनला विचारलं, पण, या बेटावर मी अडकलोय, हे तुम्हाला कसं समजलं?

कॅप्टन म्हणाला, तू धुराचा सिग्नल दिला होतास ना, त्यावरून.

लेखक: ओशाे

प्रस्तुती: श्रीमती स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ साई…  – कवयित्री : सुश्री अर्चना दिनकर फडके  ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ साई…  – कवयित्री : सुश्री अर्चना दिनकर फडके  ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

साई

कवयित्री: श्रीमती अर्चना दिनकर फडके

प्रस्तुती: श्रीमती शीतल कुलकर्णी

 

नवीन सुनेचा गृहप्रवेश झाला, सून म्हणाली सासूला

“काय हाक मारु आजपासुन मी तुम्हाला? “

सासू संभ्रमात, का हिला असा प्रश्न पडला?

वाटलं, पटकन म्हणावं, ” अगं, आईच म्हण मला”

पण हे नातं आहे, कुठला कागद नाही चिकटायला

वेळ द्यावा लागेल नातं आकार घ्यायला

सावरून स्वतःला म्हणाली सुनेला

“मनापासून जे वाटेल ती साद घाल मला

जे नातं जोडशील ते निभावून न्यायचंय तुला आणि मला”.

 

नव्या नवलाईचे दिवस सुरु झाले

मुलगा सून संसारात रमले

रोज नवीन बेत आखले गेले

कधी नाटक कधी सिनेमे बघितले

रोज नवनवीन पदार्थ होऊ लागले

कधी सासूने कधी सुनेने केले

वर्षाचे सण मजेत साजरे झाले

पण सासूच्या एक लक्षात आले

सुनेने तिला प्रेमाने साद घालायचे टाळले

मन खट्टू झाले पण वेळीच स्वतःला सावरले

 

ओठात एक नि पोटात एक, सून नाही अशी आपली

साद घालेल ती कायमची, ही सासूची खात्री पटली

 

दिवस सरले नवीन पाहुण्याची चाहुल लागली

गोड बातमी सर्वत्र पसरली

सासरी माहेरी कौतुकाला उधाण आले

सुनेचे मोठ्या प्रेमाने लाडकोड सुरु झाले

प्रसंगी मुलाला दटावले सुनेला पाठीशी घातले

सासूची लगबग सून डोळे भरुन पाहू लागली

सुनेचं दिवसागणिक बदलतं रूप सासू डोळ्यात साठवू लागली

 

दिवस काही सरले आणि सुनेने प्रेमाने साद घातली

” साई”

सासू गोंधळली. सुनेकडे पाहून विचारती झाली

“मला हाक मारली? “

सून प्रेमाने हसली आणि म्हणाली,

“सासू तुम्ही आहात पण आई माझी झालात

दोन नात्यांची सांगड घालून ‘साई’ म्हणायला केली सुरुवात”

सासू आनंदली, सून तिला बिलगली

दोघींच्या मनातली किल्मिषं दूर झाली

मग सासू म्हणाली सुनेला, “मानलं आहेस मला आई

तर आईसारखं कधी रागवले तर चालेल ना तुला बाई? “

सून म्हणाली, ” मानलं आहे तुम्हाला आई

मुलीसारखी रुसले तर सावराल ना हो साई? “

एक नातं आकार घ्यायला लागलं

सासू-सुनेचं चांगलच सूत जमलं!

 

दोघींनी मिळून मग निर्णय घेतला काही

घरातल्या पुरुषांना वादात कधी गुंतवायचं नाही

पुरुष याबाबत असतात अलिप्त

मोडू नये त्यांची ही शिस्त

दोघींनी करायची एक एक वही

लिहायचं त्यात सर्व काही

हेवेदावे, रुसवेफुगवे सगळं काही

कैद करायला वापरायची ती वही

आठवड्यातून एकदा करायची वहीची अदलाबदल

वाचून करायचा त्यानुसार स्वभावात थोडा बदल

 

वहीत लिहायला सुरुवात केली

मनातली अढी कमी होत गेली

एकमेकींच्या चुकांची दोघींना गम्मत वाटू लागली

क्षमाशील मनाची नव्याने ओळख पटली

 

मुलांच्या संसारवेलीवर फुले उमलली

मुलगा सून आता कर्तीसवरती झाली

नात्यांची वीण आता अधिक घट्ट झाली

तशी दोघींची वही आता कोरीच राहू लागली

वही आता कोरीच राहू लागली!

 

नवीन नात्याच्या उंबरठ्यावर उभी एक आई

येईल ना तिला पण होता कुणाची तरी “साई”?

 

कवयित्री: श्रीमती अर्चना दिनकर फडके

प्रस्तुती: श्रीमती शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “पराभव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “पराभव…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

गौशालक हा महावीरांचा शिष्य होता, पण, त्याच्या मनात त्यांचा सुप्त द्वेष होता. वर वर तो त्यांचा अनुयायी होता, आतून त्यांना खोटं पाडायला तत्पर असायचा.

त्या दिवशीही वाटेत एक छोटं, कोवळं रोप दिसल्यावर तो महावीरांना म्हणाला, गुरुदेव, तुम्ही परमज्ञानी आहात, तर या रोपाचं भवितव्य जाणत असालच. या रोपाची मजल फुलं येण्यापर्यंत जाईल का?

महावीरांनी डोळे मिटले.

गौशालकाला आश्चर्य वाटलं. एवढ्या छोट्याशा प्रश्नासाठी डोळे मिटायची काय गरज?

महावीरांनी डोळे उघडले आणि ते म्हणाले, हो, हे रोप फुलं येण्यापर्यंत मजल मारेल.

तत्क्षणी गौशालकाने ते रोप जमिनीतून उखडून टाकलं आणि तो विकट हसून म्हणाला, आता?

महावीर सुहास्यमुद्रेने मौन राहिले.

पुढे सात दिवस खूप पाऊस पडला. महावीरांचं त्या रस्त्याने जाणं झालं नाही. सात दिवसांनी गुरुशिष्य पुन्हा त्याच रस्त्याने गेले. त्या रोपाच्या जागी पोहोचल्यावर गौशालक आश्चर्यचकित झाला. त्याने उपटून फेकलेलं रोपटं, फेकल्याजागी मुळं धरून पुन्हा उभं राहिलं होतं.

त्याने महावीरांना विचारलं, हे कसं झालं?

महावीर म्हणाले, गेले काही दिवस पाऊस झाला, जमीन मऊ होती, रोपट्याच्या मुळांनी माती पकडली, जीवन पकडलं, ते पुन्हा उभं राहिलं. हे रोपटं मुळापासून उपटल्यानंतरही जगण्याची तीव्र इच्छा ठेवणार की नाही, हेच मला त्या दिवशी जाणून घ्यायचं होतं. ते समजलं आणि मला कळलं की हे रोप फुलांपर्यंत जाऊ शकेल.

पण, ते रोपटं उपटलं जाणार आहे, हे तुम्हाला कसं कळलं, गौशालकाने भयभीत होऊन विचारलं.

महावीर म्हणाले, मी डोळे मिटले तेव्हा मला अंतर्मनात ते रोपही दिसलं आणि तूही दिसलास.

मान खाली घालून गौशालक पुढे निघाला. काही पावलं गेल्यावर महावीर म्हणाले, एका छोट्याशा रोपट्याकडून पराभव का करून घेतलास?

गौशालक उसळून म्हणाला, पराभव? कसला पराभव? माझा कसला पराभव?

महावीर म्हणाले, दुसऱ्यांदा ते रोपटं उखडून फेकण्याची, त्याचे तुकडे तुकडे करण्याची तुझी हिंमत नाही झाली ना.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘चला बदडू या डॉक्टरला…’ –  कवी – डॉ. सुरेन्द्र पिसाळ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘चला बदडू या डॉक्टरला…’ –  कवी – डॉ. सुरेन्द्र पिसाळ ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

खराब रस्ते

बेफाम वेग

झाले अपघात

माणूस मेला हाँस्पिटलला

चला बदडू या डॉक्टरला

 

प्रदूषण किती

वाटते भीती

श्वास कोंडला

माणूस मेला हॉस्पिटलला

चला बदडू या डाॅक्टरला

 

फिरायला गेले

मिळेल ते खाल्ले

फूड पॉयझन झाले

माणूस मेला हॉस्पिटलला

चला बदडू या डॉक्टरला

 

पाऊस पडला

मच्छर चावले

डेंग्यू झाला

माणूस मेला हॉस्पिटलला

चला बदडू या डॉक्टरला

 

अकार्यक्षम आरोग्ययंत्रणा

बेभरंवशी सरकारी व्यवस्थापन

तातडीच्या सुविधांचा अभाव

माणूस मेला हॉस्पिटलला

चला बदडू या डॉक्टरला

 

पैसा अपुरा

आरोग्यसेवा मोफत

कसंही जगायचं आहे

माणूस मेला हॉस्पिटलला

चला बदडू या डॉक्टरला

 

चूक कोणाचीही असो

केले कुणीही असो

डॉक्टरने ताटावरून हवं उठायला

तरीही माणूस मेला हॉस्पिटलला

चला बदडू या डॉक्टरला

(आता डॉक्टर होणे मूर्खपणाचे लक्षण वाटू लागले आहे. सगळ्यांनी AI कडून treatment घ्यावी, चुकली तर computer फोडावा.)

कवी: डॉ. सुरेंद्र पिसाळ

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “दक्षिणायन-उत्तरायण ” – कवी :ॲड .समीर आठल्ये ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

सूर्योदय तो पूर्वेला अन्

पश्चिमेस तो अस्त असे

सृष्टीचा हा नियम मानवा

त्रिकालाबाधित सत्य असे ||

 *

रवि जरासा अवखळ भारी

एका जागी स्थिर नसे

एका जागी नित्य उगवणे

हेच तया मंजुर नसे  ।।

 *

वदे रवि तो ब्रह्मापाशी

जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी

मजला येईल कंटाळा   ।।

 *

आज येथुनी उद्या तेथुनी

उगवलो तर होईल छान

रोज नव्या देशाला देईन

पहिला बघण्याचा हो मान ।।

 *

ब्रह्मदेवही हसले किंचित

हट्ट पाहुनी सूर्याचा

दिवस कुठे अन् कुठे रात्र

हा मेळ कसा साधायाचा ।।

 *

मान राखुनी परी रविचा

ब्रह्मदेव वदले त्याला

उगवताना पूर्व दिशा अन्

पश्चिमेस जा अस्ताला  ।।

 *

परि उगवता पूर्व दिशेला

उत्तरेकडे सरकत जा

सहा मास सरताच मागुता

दक्षिण अंगे उगवत जा ।।

 *

सूर्य तोषला रचना ऐकून

उदय आणिक अस्ताची

दिशा जरी ती एक परंतु

जागा बदले नित्याची  ।।

 *

उत्तर अंगे उगवत जाता

उत्तरायणी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

दक्षिणायनी तोच दिसे ।।

 *

संक्रमणाने फुलते जीवन

गती लाभते जगण्याला

म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

नभांगणातुनी दिवसाला ।।

 *

जगी चिरंतन टिकून राही

बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

हे देवाचे दान असे ।


कवी :ॲड .समीर आठल्ये

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वजनकाटा ठेवला झाकून… – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ वजनकाटा ठेवला झाकून – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

उन्हाळ्याच्या सुरुवातीला खायची ओल्या काजूची उसळ….

चव बदलायला कधी तरी लागते मग मिसळ….

रसरशीत बिटक्या चोखताना तोंड जातंय माखून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

कैरीची डाळ आणि झकास पन्हं थंडगार….

रात्री पण आइस्क्रीमचा मारा चाललाय फार…..

व्यायाम करायचा निश्चय केलाय सोमवार पासून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

करवंद जांभळे कलिंगड

खावी ताव मारून….

फणसाचे गरे आणि सांदण जरा थोडी जपून…

रिचवावा पायरीचा रस आणि हापूस थोडा कापून…

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

 

आमरस पुरीचं जेवून करतो थोडा आराम…

वजन कमी करण्यासाठी

कोणते करू मी व्यायाम…

हाताची बोटं पायांच्या बोटाला टेकतात अजून वाकून..

वजनकाटा २ महिन्यासाठी ठेवला आहे झाकून..

कवी: अज्ञात

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares