नारळी पौर्णिमा झाली आणि सागर थोडासा शांत झाला, त्यामुळे सागरावर जाणाऱ्या मच्छीमारांना आता आपल्या नौका समुद्रात नेता येतील! नारळी पौर्णिमेला समुद्रामध्ये नारळ अर्पण करून सागराची प्रार्थना केली जाते. तो सागर आता आपल्याला नेहमीच चांगली साथ देणारा आहे असा काहीसा विचार मनात आला आणि सागराची विविध रूपे डोळ्यासमोर आली.
असीम, अथांग सागरा, आत्तापर्यंत तू वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या रूपात भेटलास! बालपणी अरबी समुद्राच्या किनारपट्टीवरच बालपण गेलं!
काळी वाळू असलेल्या समुद्रावर वाळू तुडवत जाताना सूर्याचा गोळा अस्ताला जाईपर्यंत दूरवर दिसणाऱ्या बोटीसह तू चित्रात दिसावा तसं मी तुला पाहत होते! तेव्हा तुझी असीमता मला कळत नव्हती, ती माझ्या मनासारखीच छोटीशी होती.
समुद्रकिनाऱ्यावर फिरणे, भेळ खाणे आणि तो सूर्याचा लाल गोळा तुझ्या पोटात सामावला की घरी परत यायला निघणे. तुझा अस्त ही आमची घरी परतायची सीमा होती. तो रत्नागिरीचा काळा आणि डोंगरापलीकडचा पांढरा समुद्र बघत मी मोठी झाले!
खूप वर्षांनी मुंबईला जाण्याचा योग आला आणि तुझे चमचमणारा हार घातलेले मरीन ड्राईव्ह वरील रूप डोळ्यांना मोहवून गेले, तर गेटवे ऑफ इंडिया ला जाऊन तुझे खळाळणारे रूप पण पहायला मिळाले. जुहूच्या बीचवर तरुणांचा उसळता समुद्र दिसला तर कधी पाश्चात्यांच्या अनुकरणात दंग झालेल्या आधुनिक रूपात तू दिसलास!
जसा देश, तसा वेश असा बदलता तू मला नेहमीच भुरळ घालत राहिलास! गोव्यातील समुद्र पाहताना बा.भ.बोरकरांच्या “माझ्या गोव्याच्या भूमीत” कवितेतून दिसणारा तू डोळ्यासमोर येत होतास! किनाऱ्यावरील माडांच्या झावळ्यांचे आच्छादन घेऊन शितलता देणारं तुझं रूप थोडं सौम्य वाटत होतं!
पुढे गुजरात ट्रीप करतानाही तू सांगाती होतास. ओख्याच्या स्वच्छ किनाऱ्यावर शंख शिंपले वेचताना तुझ्या लाटांची गाज माझ्या कानात घुमत होती. द्वारकेला कृष्णाला मनात साठवताना हेच ते ठिकाण जिथे रुक्मिणीसह राजवाड्यात राहताना द्वारका बेटाभोवती संरक्षण देणारा तू होतास!
प्रत्येक ठिकाणी तुझं रूप न्याहाळताना माझी मीच राहत नाही! इतका तू विशाल होऊन मी तुझ्यात सामावून जाते….
आंध्र – ओरिसाची सहल करताना तुला पाहिले ते शांत रूपात! भुवनेश्वरला तुझं एक रूप पाहिलं तर कलकत्त्याला गंगेच्या विस्तीर्ण मुखाला सामावून घेणारा तू होतास!
तुझं खरं रूप पाहायचं ना ते कन्याकुमारीला! बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तिन्ही तुझीच रूपे, लहान- मोठी! तिन्ही सागर एकत्र पाहिले की तुझी विशालता मनात भरून राहते! कन्याकुमारीला सकाळचं समुद्र दर्शन करताना दूरवर दिसणारा विवेकानंद रॉक! इतक्या गंभीर वातावरणात स्वामीजींनी चिंतन केलं असेल ही कल्पनाच अंगावर काटा उभा करणारी होती! तो ज्ञानरूपी सागर खऱ्या सागरास अर्घ्य देऊन त्या खडकावर बसला असेल तेव्हा हे तीनही सागर त्याच्या चरणस्पर्शाने अधिकच पुनीत झाले असतील! एक संध्याकाळ कन्याकुमारीत अनुभवली! जिथे बंगालच्या उपसागराचे करड्या रंगाचे, अरबी समुद्राचे निळ्या रंगाचे आणि हिंदी महासागराचे अथांग पाणी, तिन्ही समुद्राचे पाणी एकमेकात मिसळताना पाहताना अंतरंगात इतके भाव उचंबळून आले की त्यांचे वर्णन करता नाही येत!
तुझे रुपच असे विशाल आहे. तुझ्या लांबी, रुंदी, खोलीचे मोजमाप शास्त्राप्रमाणे होत असेल कदाचित, पण खरं सांगू? तुझी अथांगता फक्त दृष्टीला जाणवते, मन जसं अपार, गूढ, अनाकलनीय आहे, तसाच तू अथांग आहेस! तुझ्या पोटात काय काय दडलं असेल!
वीर सावरकरांनी फ्रान्सच्या किनाऱ्यावर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’ म्हणताना, ते ऐकून तू सुद्धा गहिवरला असशील त्यांच्या देशभक्तीने! नाही तर एरवी कोणताही किनारा तुला सारखाच असेल ना भरती ओहोटीच्या लाटांनी वेढलेला! पण सावरकरांना आपल्या भारताच्या किनारपट्टीवरचा तू दृष्टीसमोर होतास!स्वातंत्र्य या भूमीला मिळालेले पाहायचे होते त्यांना! त्यासाठी तर त्यांनी अंदमानचा कारावास भोगला! तिन्ही बाजूंनी तू या भरतभूला वेढलं आहेस!
सह्याद्रीच्या कड्यांपली कडे अरबी समुद्राची तुझी दंतुर किनारपट्टी कोकणचं सौंदर्य वाढवते, तर पूर्वेला गंगा नदीच्या मुखाजवळचे बंगालच्या उपसागराचे बंगाली गाणे ऐकते. केरळच्या देवभूमीवर सागरा, तुझे सारे सौंदर्य फुलून आलेले असते. खरंच, या भरत भूचा एकेक भाग पाहताना मनात असंख्य विचार येतात..
भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक विविधतांनी नटलेल्या आपल्या भरतखंडाला नगाधिराज हिमालयाचा मुकुट आहे तर तिन्ही सागरांनी वेढलेला रत्नजडीत हार त्याच्या गळ्यात आहे. वेगवेगळ्या संमिश्र भावना तुझ्या दर्शनाने मनात येतात. त्या शब्दरूपात नाही मांडू शकत, पण भक्तीभावाने तुझ्या या निसर्गाच्या रूपा पुढे मी कायमच नतमस्तक होते आणि कृतज्ञतापूर्वक मी हा नारळ तुला अर्पण करून हा नारळी पौर्णिमेचा दिवस साजरा करीत असते!
मंगळागौर व्रत हे आईने मुलीला दिलेले व्रत आहे. शंकर पार्वती हे आदर्श जोडपे .त्यांचा आदर्श आपल्या मुलीने समोर ठेवून चांगला संसार करावा यासाठी हे व्रत असते. हे व्रत सलग पाच वर्षे करायचे असते. मी चार पिढ्यांच्या मंगळागौरी पाहिल्या. पूर्वी मुली लहान असत. घरातील मोठी माणसे सांगतील त्याप्रमाणे वागत .हे व्रत या माध्यमातून भक्ती भावाने केले जायचे. डामडौल अजिबात नव्हता. खेडेगावात वाहनांची सोय नव्हती. पाऊस भरपूर असायचा. त्यामुळे पै पाहुणे फारसे कुणी या व्रताला जात नसत. घरच्या पुरतीच ही पूजा असायची. सजावट वगैरे फारशी नसायची. जेवायला मात्र साग्र संगीत नैवेद्य असायचा. मुली अगदी “न्हाऊनी माखुनी”, नऊवारी चा बोंगा सावरत, भरपूर दागिने अंगावर घालून व्रताला बसत. जिरे साखर तोंडात घेऊन पूजा भक्तिभावाने करत. दुपारचे जेवण मुक्याने करत असत. संध्याकाळी गावातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावले जायचे. दारात मोठी रांगोळी असायची. साखर खोबऱ्याची खिरापत आणि गव्हाने ओटी भरली जायची. संध्याकाळी वशेळ्या मुलींना भाजके पदार्थ खाऊ घालत. बहुतेक सगळ्यांना मग कढी, खिचडी, लाडू ,करंज्या, चकली ,मटकीची उसळ, असे पदार्थ जेवायला असत. रात्री मनसोक्त खेळ खेळत. त्यातून मग मनमोकळा संवाद होत असे. दुसरे दिवशी पहाटे उठून मुली आरती करत. दही भाताचा नैवेद्य दाखवत. व फुले, पत्री यांचे विसर्जन करून व्रताची सांगता करत असत. हे व्रत सलग पाच वर्षे करत. मग पाचव्या वर्षी आईला वाण देऊन या व्रताचे उद्यापन करत असत.
आता सगळे बदलले. मुली मोठ्या असतात. बहुतेक नोकरीवाल्या असतात. त्यांना वेळ नसतो. मग त्या पहिल्या वर्षी पहिल्याच मंगळवारी व्रताचे उद्यापन करून टाकतात. थाटमाट भरपूर असतो. फुले, पत्री यांची भरपूर सजावट असते .बहुतेक ठिकाणी महादेवाची पिंड करतात. पण माझ्या मंगळागौरीच्या वेळी माझ्या आईने पिंड करण्यास नकार दिला. एक तर गंज काळा करण्यास तिचा विरोध होता. शिवाय तो उपडा घालून ती मंगळागौर झाकली जाते असे तिचे म्हणणे असायचे. आता लाईटच्या माळा, फुले, विविध प्रकारचे डेकोरेशन, सजावट भरपूर .फोटो, व्हिडिओ शूटिंग ,नातेवाईकांची गर्दी, मित्र-मैत्रिणींचा धांबडधिंगा असतो .रात्री जागरण फार करत नाहीत. संस्कार भारतीने मंगळागौरीच्या खेळांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आता खूप जणी तयार झाल्यात. मग अक्षरशः दहा दहा हजार रुपये देऊन त्या मुलींना बोलावतात. माझा देखील सातारला खूप मोठा ग्रुप होता. एका दिवशी पाच सहा ठिकाणी आमंत्रणे असत. मग सोयीप्रमाणे कधी कधी सकाळी नऊ वाजता सुद्धा जाऊन तासभर खेळून यायचे. बाकीच्या बायका फक्त पहात बसतात. कोणी खेळत नाहीत. काही ठिकाणी तर मुलींना रजा नाही या नावावर संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर पूजा असते. ते सुद्धा हात पाय धुऊन त्या मुली बसतात. मेकअप भरपूर असतो. ज्वेलरी, कपडे, फोटो, व्हिडिओ शूटिंग हे मात्र अतीच असते. आता हा दिवस व्रत नव्हे तर इव्हेंट म्हणून साजरा केला जातो. देणे घेणे भरपूर असते. कालाय तस्मै नमः!. पण काही का असेना लग्नानंतर श्रावणातली एक तरी मंगळागौर साजरी केली जाते हे तरी अजून चालू आहे. पुढे काय होईल कोण जाणे. आता मुली लग्न होऊन परदेशी जातात. तिथे कुठली आली मंगळागौर आणि कुठले आले आहे व्रत! असो. मंगळागौरी श्रावणातल्या मंगळवारीच करायची असते हे देखील आता मागे पडत चालले आहे. मुलींना किंवा त्यांच्या आईला, सासूला रजा नसते. म्हणून मंगळवारी घरातल्या घरात पूजा करून रविवारी मोठा कार्यक्रम करतात. मुलींना खेळायला बोलावतात. सोयीप्रमाणे व्रताचे बदललेले रूप पाहून अवाक व्हायला होते. यातही आणखी गंमत म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी लग्न होऊन अमेरिकेला गेली. ती डिसेंबर मध्ये फक्त तीन आठवड्यांसाठी आली. आणि त्यावेळी त्यांनी वर्षातले सगळे सण साजरे केले. डिसेंबर मध्ये मंगळागौरीचा इव्हेंट केला. आता बोला !
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 2 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही’ या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली.) इथून पुढे.
एके दिवशी दोघांनी हसत हसत येऊन निर्णय दिला… “आम्ही दोघेही स्वखुशीनं लग्नाला तयार आहोत… !”
तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणाऱ्या वधुपित्याची काय गत होत असेल हे मी त्यावेळी प्रत्यक्ष अनुभवलं ! आयुष्याच्या या नाटकात यावेळी सगळ्याच भुमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक मी खरोखर जगलो…! मीच पुरोहीत होवुन कधी लग्नाची तारीख काढली… तर मीच माझ्याशी बैठक घेवुन दोन्ही बाजुची यादीही केली ..! मुलाची बहिण होवुन मीच माझ्याशी भांडलो… तर मुलीची आई होवुन स्वतःशीच उगीच रडलो…!
या लग्नात मी वरातही झालो… आणि वरातीची म्हातारी घोडीही झालो…! मुंडावळ्या बनुन कधी कपाळावर झळकलो तर पायताण बनुन पायातही सरकलो… !
भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजुत काढुन पुन्हा खोटंखोटं हसलो … ! आणि त्याच्याबरोबर जातांना, ज्या क्षणी ‘दादा’ म्हणत मला तीनं गळामिठी मारली त्याक्षणी त्या मी तीचा बापच झालो… !
आज या लग्नाला दोन वर्षे झाली. दोघंही आनंदात आहेत, तीच्या अगोदर असलेल्या मुलासह !
या मुलाचं मला कौतुक वाटतं… आपल्या आईच्या लग्नाला तो हजर होता…! कळता झाल्यावर लोक त्याला टोचुन बोलतील का… ? सध्या माझ्याकडं या प्रश्नाचं उत्तर नाही!
असो !
जमिनीवर पडते ती सावली… ! हि सावली कुणाला आधार देते तेव्हाच ती छाया होते !!!
हे दोघेही एकमेकांना आधार देत, मुलाची छाया बनले आहेत. बीनबापाच्या मुलाला त्याने आपलं नाव दिलं आहे, खऱ्या अर्थानं तो बाप झाला आहे…!
बेसुर आणि भेसुर आयुष्य आता संगीत झालंय ! संगीत ऐकायला दरवेळी त्यातलं काही कळावंच लागतं असं नाही… मैफिल जमली की गायकाच्या हृदयात आधी तार झंकारते… ती ऐकु आली म्हणजे झालं… ! पहिली दाद या झंकाराला दिली… की कागदावरचे शब्द मोहरुन कविता होतात… ! या कवितेत गाणाऱ्याचा आणि ऐकणाऱ्याचा भाव एकरुप झाला की त्याचं भावगीत तयार होतं… ! या दोघांच्या या गाण्याला दाद देणारा मी फक्त रसिक !!!
आज हे सारं आठवायचं कारण म्हणजे…
‘ती’ अजुन एकदा आई होणार आहे हे मला ‘त्या’ने जानेवारी 2020 मध्ये सांगितलं. म्हणाला “सर, आत्ता चौथा महिना सुरु आहे तीला…”
“होय बाबा, आता सगळे कामधंदे सोडुन दुपटी शिवत बसतो मी …” माझ्या या बोलण्यावर ‘तो’ लाजला होता.
यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वगैरे आटोपुन 19 जून 2020 ला ती प्रसुत झाली. मुलगा झाला ! ‘त्या’ला आणि ‘ती’ला भेटायला आज 20 जुन ला मी पेढे घेवुन गेलो. दोघांच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता.
लाॕकडाउन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे, भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा टिकाव लागणार ? पण हरकत नाही, ये भी सही ! चालतांना कधीतरी काटेही टोचलेलं बरं असतं, म्हणजे माणुस त्याच जागी रेंगाळत नाही… काटे बोचायला लागले की, ती जागा सोडण्यासाठी का होईना, पण चालणाराचा वेग वाढतो… !
तो, नको नको म्हणत असतांना, त्याच्या खिशात साडेचार हजार रुपये कोंबले.
तो म्हणाला, “सर, हाॕस्पिटलची बिलं, औषधांचा खर्च आणि बाकीचंही सगळं तुम्हीच करताय, वर अजुन हे पैसे कशाला… ?”
“पहिली डिलीव्हरी माहेरीच असते बाबा, पोरीच्या बापालाच करावं लागतंय सगळं…” मी खळखळुन हसत म्हणालो…
मी हसत होतो आणि मागं मला तीच्या हुंदक्यांचा आवाज जाणवत होता … !
ती नाहीच बोलली काही… पण तीचे डोळे बोलायचे थांबत नव्हते… !
मी बाळाकडे पाहिलं… इतकं देखणं बाळ… ! कमळ चिखलात उगवतं हेच खरं… !
“तुझ्यासारखंच आहे गं बाळ” मी म्हटलं.
पालथ्या मुठीनं डोळे पुसुन ती हसायला लागली… !
कोणत्याही रडणाऱ्या आईजवळ जावुन बाळाचं कौतुक करावं, ‘स्सेम तुझ्यावरच गेलंय बघ’ म्हणावं… ती हसणारच ! कारण वजन फुलांचं होत असतं, सुगंधाचं नाही…!
एखाद्या आईच्या ममतेचं वजन कसं करणार ? ते ही या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच !
“बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय ?” निरोप घेत मी उठत सहजच विचारलं.
अगदी सहज आवाजात ती म्हणाली, “हो ठरवलंय ना ! अभिजीत नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं … !”
“क्काय … ?” खुप जोरात मी हे वाक्य ओरडुन बोललो असेन. कारण दवाखान्यातल्या अनेकांनी चमकुन पाहिलं माझ्याकडं !
वाढदिवसाच्या निमित्तानं सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवायला गेलो. मुलांनी निवडलेलं हॉटेल खरचं चांगलं होतं. नुसताच दिखाव्यावर खर्च केला नव्हता तर जेवणाची क्वालिटी आणि चवसुद्धा उत्तम होती. फक्त वेटरची सर्विस म्हणजे निवांत कारभार.
भरपूर गप्पा आणि आवडत्या डिशेशवर यथेच्छ ताव मारल्यावर वेटर बिल आणि बडीशेप घेऊन आला. कार्ड पेमेंट केलं आणि तो क्षण आला…. “ थँक्यु सर ”म्हणून वेटर गेल्यावर बायको आणि मुलगी माझ्याकडं एकटक पाहत होत्या. मुलगा मोबाईलमध्ये हरवलेला.दोघींच्या बघण्यावरून लक्षात आलं की आता नेहमीच्या वादाला तोंड फुटणार आहे. भरपूर आवडीचं खाऊन सुद्धा पोटात खड्डा पडला. मनापासून वाटत होतं ‘टीप’ द्यावी. पण बायको आणि मुलीचा तीव्र विरोध. ‘ टू बी ऑर नॉट टू बी ‘अशी संभ्रम अवस्था. मी खिशातून पाकीट काढलं…..
“अजिबात द्यायची नाही ” .. बायको
“ मागच्या वेळी सांगून सुद्धा तुम्ही दिली होती. आज नाही म्हणजे नाही ” .. मुलगी
“ बाबा,तुम्ही टीप द्या ” मोबाईल वरची नजर न हटवता मुलगा म्हणाला.
“ काय द्या ?आणि कशाला ??” .. बायको.
“ बाबा,नाही हं ” .. मुलगी
“ जेवणावर एवढा खर्च झाला ना मग आता क्षुल्लक गोष्टीसाठी वाद नको ” .. मी
“ येस,बाबा यू आर राईट ” .. मुलगा
“ ए,तु गप रे ” .. मुलगी खेकसली.
“ पन्नास रुपायानं काय फरक पडणारयं ”
“ तेवढ्या पैशात एक लिटर दूध येतं ”
“ आपण जेवलो तेवढ्या पैशात महिनाभराचं दूध आलं असतं ” .. मी चिडलो.
“ वेटरनं त्याचं काम केलं. त्याचेच तर पैसे मिळतात.”
“ बक्षिस म्हणून ‘टीप’ देतात. वेटरच्या अपेक्षा असतात. तशी पद्धत आहे.”
“ कोणी सांगितलं ? अशी पद्धत बिद्धत काही नाहीये. उगीच आपलं सगळे देतात म्हणून आपणही टीप द्यायची. त्याला काही लॉजिक नाहीये ” .. मुलगी उसळली.
“असं काही नाही. टीप न देता जाणं योग्य दिसत नाही ” .. मी
“ हे मेंढरांच्या कळपासारखं झालं. एकदा सर्वात पुढे असलेली मेंढी चुकून खड्ड्यात पडली आणि उठून पुन्हा चालू लागली. मागच्या सर्व मेंढयानी खड्ड्यात उड्या मारल्या. ’टीप’ द्यायचं पण असंच काही आहे.” .. बायको
“ ते काही माहीत नाही. उगीच ईश्यू करू नका. आज वाढदिवस आहे तेव्हा..” .. मी
“तेच तर आज चांगला दिवस आहे.असल्या गोष्टी बंद करा”मुलगी
“ तुमच्यासारखे कर्णाचे अवतार आहेत म्हणून तर हे टीपचं फॅड सुरू झालंय. चला आता, एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही.”
इतरवेळी मायलेकीचं अजिबात पटत नाही. पण इथं लगेच एकमत झालं. टीप न देण्याविषयी बायको आणि मुलीनं युती करून माझ्याविरुद्ध आघाडी उघडली.
“आजच्या दिवस देऊ दे नंतर कधीच देणार नाही.” … मी समेटाचा प्रयत्न केला. सगळे उभे राहिले परंतु टीप न देता बाहेर पडणं विचित्र वाटत होतं. हॉटेलमधले सगळे माझ्याकडेच बघताहेत असा भास व्हायला लागला. उगीचच गिल्ट आला. सर्विस देणारा वेटरनं एकदोनदा माझ्याकडं पाहिलं. पाय निघता निघेना. काहीतरी आयडिया करून टीप द्यावी असा विचार चालला होता, परंतु सोबतचे चार डोळे रोखून प्रत्येक हालचालीकडे पाहत असल्याने नाईलाज होता. पाकीट हातात धरून उभा असताना मनात मात्र विचारांचे चक्रीवादळ “ काय करावं? ‘टीप’ द्यावी की नाही. “ तुम्हाला काय वाटतं……
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ मी… माझा बाप… आणि माझी आई… !!!… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
ही मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी … ! वय साधारण ३५ , सोबत ५-६ वर्षांचा मुलगा…! एका धार्मिक स्थळाबाहेर मागून खायची. औषधं देता देता चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली !
दरवेळी मला कोडं पडायचं… हा मुलगा कुणाचा ? जर तिचा असेल, तर याचे वडील कुठं आहेत ? याला वडील असतील, तर मग ही एकटीच कशी दिसते ?
एके दिवशी मी विचारलंच… !
… लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही… पूर्णतः निराधार. जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधून झोपायचं, हा रोजचा दिनक्रम !
रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात!
अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली… आरडाओरडा केला पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता… ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं… !
या झटापटीत एक मूल हिच्या पदरात पडलं… ! एकटीची जगायची भ्रांत, त्यात अजून एकाची भर पडली.
‘ठीक आहे, जगात आपलं असं कुणीच नव्हतं, आता आपलं म्हणावं, असं आपलं मूल तरी आपल्याबरोबर आहे, आधार होईल भविष्यात जगण्याचा ‘ या सकारात्मक विचारानं तिनं आईपण जपलं… मुलाला जमेल तसं ती वाढवत गेली !
आणि याचवेळी मला ती भेटली होती…. तीनेक वर्षांपूर्वी !
“काम का नाही करत गं ?” मी तिला तेव्हा विचारायचो. ती फक्त मान डोलवत गूढ हसायची. वेगवेगळे व्यवसाय मी तिला सुचवायचो… मदत करतो असं म्हणायचो… पण ती ऐकल्यासारखं करायची आणि पोराला हाताला धरुन दूर जायची ! उदास होऊन शुन्यात बघत रहायची !
बरोबर आहे, इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तिनं माझ्यावर तरी का विश्वास ठेवावा ?
भरल्या पोटानं दिलेला सल्ला उपाशीपोटी पचत नाही हेच खरं ! गाण्यातले सूर हरवतात तेव्हा ते गाणं बेसुर होतं… आणि जगण्यातला नूर हरवला की ते जगणं भेसुर होतं…! असं सर्वच हरवलेलं ती…!
एकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळुन घेणारा, मनासारखा कुणीतरी जोडीदार मिळाला, म्हणजे ती डिप्रेशनमधुन बाहेर येईल असं मला डाॕक्टर म्हणुन सारखं वाटायचं.
डिप्रेशनच्या पेशंटला औषध न लगे… !
औषध ‘नल’ गे तीजला !
औषध फक्त त्या पेशंटचा हक्काचा ‘नल’ !
अत्याचार झालेल्या, भीक मागणाऱ्या मुलीला तिच्या मुलासह कोण स्विकारणार ? हा मोठा प्रश्न होता. तिला हा हक्काचा ‘नल’ कधी सापडणार…. ? कसा ?
दिवसांवर दिवस जात होते. अशात मला एक तरुण भेटला. चुणचुणीत आणि गोड बोलणारा. यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या, ढोलासारख्या ! थपडा मारुनही ढोल नाद निर्माण करतो…. ! हा सुद्धा त्या ढोलासारखाच ! थपडा खाऊनही बोलणं आणि वागणं अतिशय नम्र आणि गोड, एक नाद निर्माण करणारं !
आपल्या शब्दांत नम्रता आणि गोडवा असेल तर शब्दांना वजन प्राप्त होतं. शब्दांतली नम्रता आणि गोडवा हरवला की याच शब्दांचा स्वतःला भार होतो आणि दुसऱ्याला ओझं ! असो…
तर, यालाही मी काम करण्यासाठी विनवलं…! याला भीक मागायचीच नव्हती… कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात… व्यवसाय सुरु करण्याची जिद्द होती याच्यात, पण संधी मिळत नव्हती ! मी हात देतोय म्हटल्यावर, झट्दिशी त्याने तो पकडला. व्यवसाय सुरु केला… आणि बघता बघता छान चालायलाही लागला… !
अतिशय प्रामाणिक आणि मनमिळाऊ असलेला हा मुलगा मला आवडायचा. एकदा गंमतीने याला म्हटलं… “काय मालक ? आता लग्न करा की राव …!”
“करु की सर, तुम्ही बघा मुलगी… सांगाल त्या मुलीशी लग्न करतो…” तो म्हणाला होता.
हसून हा विषय तिथं संपला खरा… पण ‘सांगाल त्या मुलीशी लग्न करतो…’ या त्याच्या वाक्यानं मला रात्र रात्र झोप यायची नाही…!
एकदा मनाचा हिय्या करुन याला ‘ती’ ची सर्व परिस्थिती सांगितली. हात जोडून म्हणालो… “करशील का रे लग्न तिच्याशी ?”
क्षणभर विचार करत, माझ्या नजरेला नजर भिडवुन म्हणाला, “माझ्यासारख्या भीक मागणाऱ्याला तुम्ही हात देऊन बाहेर काढलंत सर, मी रोज विचार करायचो की या डाॕक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची ? उभं असलेल्या माणसाला पाडायला फार ताकद लागत नाही, पडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते, हे मी तुमच्याकडनं शिकलो सर…. तुम्ही मला तेव्हा उठवलंत… आता पडलेल्या कुणालातरी उठवायची पाळी माझी आहे… तुम्ही जे माझ्यासाठी तेव्हा केलंत, आज ते मी पुन्हा करणार तुमच्यासाठी …!”
माझ्या डोळ्यात पाणी ठरेना !
तो तिच्याशी लग्नाला तयार झाला यापेक्षाही.. ‘आपण सावरल्यावर, दुसऱ्याला हात द्यायचा असतो ‘, हे तो शिकला यात मला जास्त आनंद होता…!
माझ्यापेक्षा लहान आहे तो… पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले…!
पाय तरी कसं म्हणू ? चरण म्हणणंच जास्त योग्य !
भरकटतं ते पाऊल, घसरतात ते पाय… आणि दिशा दाखवतात ते चरण… !
अत्याचारीत मुलीला तिच्या मुलासह स्विकारण्याची तयारी आणि तिच्या मुलाला आपलं नाव देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणाऱ्या त्या तरुणाचे पाय मला जणु चरणच भासले… !
यानंतर दोघांची भेट घडवून आणली ! ‘दोघांनी एकमेकांना समजून घेऊन, पुर्ण विचाराअंती निर्णय घ्यावा. कोणताही निर्णय घेण्याचा समसमान अधिकार दोघांनाही आहे, कसलीच बळजबरी कुणी कुणावर करणार नाही’ या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली.
एक काळ असा होता की, धो धो कोसळणारा पाऊस अंगावर झेलत – रस्त्यात, शेतात, नदीच्या काठावर, नाही तर हिरव्यागार कुरणातून चालण्या-भटकण्याचा – मनसोक्त आनंद लुटत होतो.
ते दिवस तर आता संपले. आता तोच आनंद लुटत असतो, उघड्या पडवीत आरामखुर्चीत निवांत बसून – धो धो पाऊस, थोडीशी थंडी, भीमाण्णांचे मल्हाराचे सूर, कांद्याची भजी, आल्याचा चहा – या सगळ्यांचे कथ्थक नर्तन अवलोकून!
या पावसाच्या चालू हंगामामध्ये – पाऊस भजी चहा – असे अपूर्व त्रिवेणी योग तीन-चार वेळा जुळून आले आणि मानस तृप्त जहाले !!
आजही पाऊस पडतोच आहे. पण संतत धार नव्हे. एकदाच पडला. अगदी धो धो नसला, तरी बऱ्यापैकी सरी कोसळल्या. पण आज मला फक्त पाऊसच हवा आहे. बाकी काहीच नकोय्. दर क्षणांला स्वत:ला आकाशातून झोकून देत पृथ्वीकडे झेपावणारे पाण्याचे लाखो थेंब – शुद्ध, सात्विक आणि पवित्र – मी नजरेने पीत आहे – किती तरी वेळ! आता मला त्यासोबत इतर कुठले अर्कही नकोयत आणि दर्पही नकोयत.
कारण आजचा पाऊस, हा अष्टमीचा पाऊस. अष्टमीचा पाऊस म्हणजे कृष्णाचा पाऊस! त्याच्या जन्मकाळी पडला तोच हा पाऊस. वसुदेवाचा पाऊस, देवकीचा पाऊस, यशोदेचा पाऊस – आणि माझा पाऊस !!
हा पाऊस माझ्यासाठी घडवून आणील दुर्मिळ दर्शन श्रीमुखाचे, अलभ्य श्रवण वेणूनादाचे, अलौकिक स्पर्श चरणकमळांचे आणि उन्मनी गंधवेड ‘ अवचिता परिमळूचे ‘ !!
जसे इच्छिले तसेच घडले
मनिचे हेतू पूर्ण जाहले
थेंबाथेंबातून जाहले
दर्शन श्रीहरिचे
धारांच्या नादातुन आले
गुंजन मुरलीचे
मोरपीस लेवून मस्तकी
प्रभुजी अवतरले
अष्टमीच्या धारांतून दैवी
इंद्रधनू प्रकटले
लेखक : सुहास सोहोनी.
दि. ७-९-२०२३ – कृष्ण जन्माष्टमी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका मित्राच्या बर्थडे पार्टी होती. एका छानशा बँक्वे हॉलमध्ये ही पार्टी ठेवली होती. मित्राचे बरेच ओळखीचे आणि परिचयाचे लोक तिथे आले होते. “हाय! हॅलो!!” वगैरे सगळं झालं. मलाही माझे कॉलेज मधले कॉमन मित्र भेटले. पार्टी रंगात येऊ लागली होती. मग जेवणाच्या आधी ‘ड्रिंक्स & डान्स’ चं आयोजन होतंच.
सगळ्यांचे हात ग्लासांनी भरले. डी.जे.चं सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं. नाचायला पूर्ण तयार झालेली लोक, आता कुठलं गाणं हा डी.जे. लावेल आणि त्यावर कुठल्या स्टेप्सवर नाचायचं ह्यावर काही उत्साही मंडळी चर्चा करत होती… आणि गाणं सुरु झालं!
“गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया… मंगलमूर्ती…” सगळे आलेले लोक अवाक होऊन एकमेकांकडे बघू लागले. बर्थडे पार्टी, हातात दारूचे ग्लास आणि कसलं हे गाणं ? गजानना गणराया ?” लोकांची कुजबुज जाणवण्याएवढी वाढली. शेवटी त्या उत्साहावर पाणी पडलेल्या एकाने विचारलं, “ऐ, हे काय, पार्टीत काय हे गाणं लावता ? कोई पार्टीवाला गाना लगाओ यार!” तसा माझा मित्र, ज्याचा वाढदिवस होता, हातात माईक घेऊन स्टेजवर चढला.
“मित्रांनो, माझी बर्थडे पार्टी आहे. आता पार्टी म्हंटली कि त्यात कुठचंतरी पार्टी सॉन्ग वाजेल अशीच तुमची अपेक्षा होती ना ? अर्थात असणारच! पण जसं एखाद्या पार्टीत हे ‘गजानना गणराया’ गाणं शोभत नाही ना, तसंच एखाद्या गणपतीच्या मांडवात देखील एखादं पार्टी साँग शोभत नाही. पण त्यावेळेस आपण आपला विरोध दर्शवतो का? नाही! ‘आपल्याला काय करायचंय?’ म्हणून सोडून देतो. पण हे चुकीचं आहे. गणेशोत्सव हा ‘उत्सव’ आहे आणि गणपती हा आपण देव मानतो. त्याला ‘Showpiece’ करून ठेवू नका. आत्ता ह्या पार्टीत जसा विरोध दाखवलात ना, तसाचं विरोध एखाद्या गणपतीच्या मांडवातसुद्धा दाखवा. D.J. फक्त पार्टीची शोभा वाढवतो, उत्सवाची नाही! हे लक्षात ठेवा. हातात दारूचे ग्लास, पार्टीत बरे वाटतात, गणपतीच्या मिरवणुकीत नाही. विरोध दर्शवा. आपण गप्प बसतो म्हणून हे खूळ बोकाळलंय. सगळीकडे दारू आणि डी.जे चालणार नाही हे कळूदे ना गणेशोत्सव मंडळांना. जिथे असला थिल्लरपणा चालत असेल अशा उत्सव मंडळांना वर्गणी, देणगी, जाहिरात देऊ नका. मग बघा परिवर्तन होतं कि नाही ते. आणि, सो सॉरी. मला ही गोष्ट खटकते. गणपती यायला आता फक्त 10-12 दिवस उरलेत आणि आज तुमच्यापर्यंत माझा विचार पोचावा अशी माझी इच्छा होती, म्हणून हे सगळं मीच घडवून आणलं. Now enjoy your Party, Friends!” म्हणत हा खाली उतरला.,टाळ्यांचा कडकडाट झाला!
मी मात्र नाचण्याऐवजी ड्रिंकचा आस्वाद घेणं prefer केलं. हा माझा मित्र माझ्या शेजारी येऊन उभा राहिला आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाला, “लोकांना ना ज्या भाषेत समजतं, त्याच भाषेत समजवावं लागतं. कशी वाटली आयडिया ?” तसं मी हसत म्हटलं, “साल्या, डोक्याचा उपयोग अगदीच उशीवर ठेवण्याकरता करत नाहीस. ग्रेट! चियर्स!!”
कृपया हा मेसेज तुमच्या प्रत्येक ग्रुप वर शेयर करा जेणेकरून किमान ह्या गणपति उत्सवात देवाचे पावित्र्य जपले जाईल शेवटी मला जे योग्य वाटले ते मी सांगितले शेवटी प्रत्येकाला निर्णय स्वातंत्र्य आहे गणपत्ती बाप्पा मोरया ……
लेखक : अज्ञात
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज माझ्या स्वप्नात आलं आमचं घर, आमचं अंगण ! दारासमोर दिसला पारिजातकाचा सडा ! शुभ्र पांढऱ्या रंगाची ,केशरी देठाने सजलेली, नाजूक इवली इवली फुले सगळीकडे चांदण्यासारखी पसरली होती. नारळाच्या झाडाच्या साथीला होते प्राजक्ताचे झाड ! एरवी तसं रिकामंच दिसणारं ! पण पावसाची चाहूल लागली की बहरून येणारं ! डावीकडे होती इतर छान फुलांची झाडे ! एक मोठा कुंदाच्या झाडाचा पसारा बाजूला होता. काही वर्षे इतकी सुंदर कुंदाची पांढरी आणि मागून थोडीशी जांभळी झाक असलेली कुंदाची फुले येत होती .संध्याकाळी त्याच्या कळ्या टपोऱ्या फुगलेल्या दिसत. पण काही वेळा झाडाला दृष्ट लागते ना तसं झालं ! एवढं फुलणारं झाड.. त्याला फुलेच येईनाशी झाली ! राहिला तो मोठा झाडाचा पसारा !
बाजूलाच होता जुईचा वेल ! छोटी छोटी सुवासिक फुले ! वरच्या माडीपर्यंत वाढत गेलेला तो वेल पावसाचे दोन-चार महिने डोळ्याला आनंदित, सुगंधित करून जायचा ! त्याची इवली इवली फुले वेलीवरून घरंगळत खाली यायची आणि ती पहाताना मन मोहरून जायचे ! एक वर्ष तर अधिकाच्या महिन्यात रोज जुईचा गजरा देण्याचा नेम केला होता. सवाष्ण अगदी सुहास्य वदनाने ते वाण घेत असे. मोगऱ्याची दोन-चार झाडे उन्हाळ्यात आपल्या पांढऱ्या शुभ्र फुलांनी वातावरण आनंदित, प्रफुल्लित करून जायची ! देशी गुलाबाचं एक झाड असेच एखाद्या वर्षी बहरून जायचे ! जवळपास एखादा निशिगंधही असे. त्याचा एखादा तुरा मोरासारखा डोलत असे ! ब्रह्म कमळाचे खोड वर्षभर दिसे न दिसे, पण या पावसाच्या काळात ब्रह्मकमळाची पाच दहा फुले तरी मनाला आनंद देत असत ! तुळशी वृंदावनातील तुळस मनाला प्रसन्न करत असे. अधून मधून छोटी बटन शेवंती रुजवलेली असे तर दसऱ्याच्या दरम्यान मिळावीत म्हणून झेंडू वाढवलेला असे ! गौरीच्या दिवसात तेरडयाची पाने मिळावी म्हणून एखादं गौरीचे रोपही बागेत असे. जांभळी, गुलाबी गौरीची फुलं काही दिवसच येत, पण बागेची शोभा वाढवत ! छोटीशी जागा पण किती तऱ्हेतऱ्हेची फुले देत असे !
मागच्या अंगणात माझ्या दिरांनी सुंदर गुलाबाची कलमे वाढवलेली होती. तसेच पेरू, चिकू, पपई यांचे एकेक झाडे होते. विशेष म्हणजे आमच्या प्लॉटवर एक आंब्याचे, एक फणसाचे, एक जांभळाचे आणि तीन नारळाची अशी मोठी झाडेही होती. घराभोवतीचा सर्व परिसर हिरवा गार केलेला होता. छान वाटायचे झाडांच्या आणि घराच्या सावलीत !
या घराच्या सावलीत तीस-पस्तीस वर्षे राहिलो. हळूहळू मुले बाहेर पडली आणि आम्हीही बाहेर पडलो. मुलांकडे आलो. पण जेव्हा जेव्हा घराची आठवण येते तेव्हा हेच स्मरणातील घर डोळ्यापुढे येते आणि तेथील स्वप्न फुले स्वप्नासारखी मनामध्ये उमलू लागतात !
☆ हक्क – शिक्षणाचा आणि जीवनाचाही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
सन २००५, सप्टेंबर महिना. अमेरिकेतील अराकान्सास राज्याची राजधानी लिटल रॉक्समधील रॉबिन्सन शाळेचा नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस. सगळी मुलं सुट्टी संपवून मित्र मैत्रिणींना भेटण्याच्या उत्साहात होती.
इतिहास शिकवणाऱ्या मार्था शिक्षिकेच्या डोक्यात मात्र काही तरी वेगळंच शिजत होतं. मुख्याध्यापकांच्या परवानगीने, तिने तिच्या वर्गातली सर्व बाके काढून टाकली होती. वर्गात मुलं आली आणि मोकळा वर्ग बघून भांबावली.
” मॅम, बाकं कुठे आहेत ? आम्ही बसू कशावर ?”
” त्या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्हाला कसा मिळाला, हे जर तुम्ही सांगितलंत, तरच मी तुम्हाला बाकांवर बसू देईन.”
मुलांच्या चेहऱ्यावर भली थोरली प्रश्नचिन्हं…
“आम्ही चांगले गुण मिळवले म्हणून …” एकाने धीर करून सुरुवात केली. मार्थाची मान नकारार्थी हलली.
“आम्ही चांगले वागतो म्हणून …” आणखी एक प्रयत्न.
“चांगली वागणूक, चांगले गुण – या दोन्ही गोष्टी चांगल्या आहेतच. पण बसायला बाक मिळण्यासाठी त्या पुरेशा नाहीत.” मार्था.
प्रत्येकजण आपापल्या परीने कारणं सांगत होता, पण योग्य उत्तर काही गवसत नव्हतं.
पहिला तास संपला, दुसरा, तिसरा, चौथा. मधली सुट्टी झाली. शाळाभर बातमी पसरली, मुलांनी आपल्या आईवडिलांना कळवलं, वृत्तवाहिन्यांना या घडामोडींचा सुगावा लागला. शाळेत गर्दी जमू लागली. तर्क वितर्क होऊ लागले.
होता होता शेवटची तासिका सुरू व्हायची वेळ आली. मार्थाचे विद्यार्थी वर्गात जमिनीवरच फतकल मारून बसले होते. विद्यार्थ्यांचे पालक, पत्रकार – कोणी शाळेच्या प्रांगणात, कोणी वर्गाच्या खिडक्यांमधून आत डोकावत होते.
“ठीक आहे. तुम्ही तुमच्या परीने योग्य उत्तरं देण्याचे चांगले प्रयत्न केलेत. आता मी तुम्हाला खरं उत्तर सांगते.” असं म्हणत मार्थाने वर्गाचं दुसरं दार उघडलं. त्या दारातून, हातात एक बाक घेऊन, एक पूर्ण गणवेशधारी माजी सैनिक वर्गात आला, त्याच्या मागोमाग आणखी एक, आणखी एक… सैनिकांनी ते सगळे बाक व्यवस्थित लावले आणि बाजूला उभे राहिले.
विद्यार्थ्यांच्या आणि खिडकीतून डोकावणाऱ्या पालकांना – पत्रकारांना हळूहळू थोडा अर्थबोध होऊ लागला होता.
“या बाकांवर बसण्याचा हक्क तुम्ही मिळवलेला नाहीत. तो या सैनिकांनी तुम्हाला दिला आहे. काहींनी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले असेल, काहींनी मनावर दगड ठेवून त्यांच्या तुमच्यासारख्या लहान मुलांना घरी ठेवलं असेल आणि स्वतः सीमेवर लढायला गेले असतील, बर्फ – ऊन – वारा – पाऊस यांना तोंड दिलं असेल, स्वतः बंदुकीच्या गोळ्या झेलल्या असतील, जीवलग मित्रांना वीरगती प्राप्त होताना पाहिलं असेल – यांच्या त्यागाने, निरलस सेवेने हा हक्क तुम्हाला दिला गेला आहे. आता तुमची जबाबदारी ही आहे की चांगलं शिकून, चांगलं नागरिक बनून सैनिकांच्या या उपकाराचे तुम्ही उतराई व्हाल.”
मार्थाची ही सत्य कथा इथे संपली.
… पण ही कथा आपल्यालाही तितकीच लागू होते.
अगणित स्वातंत्र्य सैनिकांनी जीवाची बाजी लावली आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आपले सैनिक, पोलीस कामावर तैनात आहेत म्हणून आपण सुरक्षित जगू शकतो. आपले आई वडील, शिक्षक या सगळ्या सगळ्यांनी खस्ता खाल्ल्या त्यामुळे आपल्याला हा जगण्याचा हक्क मिळाला आहे.
…. सचोटीने वागून त्यांच्या या त्यागाला सार्थ, यथार्थ बनवणं हे आता आपलं कर्तव्य हे आहे, नाही का ?