श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “टीप…” ☆ श्री मंगेश मधुकर

वाढदिवसाच्या निमित्तानं सहकुटुंब हॉटेलमध्ये जेवायला गेलो. मुलांनी निवडलेलं हॉटेल खरचं चांगलं होतं. नुसताच दिखाव्यावर खर्च केला नव्हता तर जेवणाची क्वालिटी आणि चवसुद्धा उत्तम होती. फक्त वेटरची सर्विस म्हणजे निवांत कारभार.

भरपूर गप्पा आणि आवडत्या डिशेशवर यथेच्छ ताव मारल्यावर वेटर बिल आणि बडीशेप घेऊन आला. कार्ड पेमेंट केलं आणि तो क्षण आला…. “ थँक्यु सर ”म्हणून वेटर गेल्यावर बायको आणि मुलगी माझ्याकडं एकटक पाहत होत्या. मुलगा मोबाईलमध्ये हरवलेला.दोघींच्या बघण्यावरून लक्षात आलं की आता नेहमीच्या वादाला तोंड फुटणार आहे. भरपूर आवडीचं खाऊन सुद्धा पोटात खड्डा पडला. मनापासून वाटत होतं ‘टीप’ द्यावी. पण बायको आणि मुलीचा तीव्र विरोध. ‘ टू बी ऑर नॉट टू बी ‘अशी संभ्रम अवस्था. मी खिशातून पाकीट काढलं….. 

“अजिबात द्यायची नाही ” .. बायको 

“ मागच्या वेळी सांगून सुद्धा तुम्ही दिली होती. आज नाही म्हणजे नाही ” .. मुलगी 

“ बाबा,तुम्ही टीप द्या ” मोबाईल वरची नजर न हटवता मुलगा म्हणाला.

“ काय द्या ?आणि कशाला ??” .. बायको. 

“ बाबा,नाही हं ” .. मुलगी 

“ जेवणावर एवढा खर्च झाला ना मग आता क्षुल्लक गोष्टीसाठी वाद नको ” .. मी 

“ येस,बाबा यू आर राईट ” .. मुलगा 

“ ए,तु गप रे ” .. मुलगी खेकसली. 

“ पन्नास रुपायानं काय फरक पडणारयं ”

“ तेवढ्या पैशात एक लिटर दूध येतं ”

“ आपण जेवलो तेवढ्या पैशात महिनाभराचं दूध आलं असतं ” .. मी चिडलो. 

“ प्रश्न पैशाचा नाहीये ” .. बायको 

“ मग,प्रॉब्लेम काय ? ”

“ मेंटॅलिटी ”

“ कसली डोंबलाची मेंटॅलिटी,त्याचा इथं काय संबंध? ”

“ हॉटेलमध्ये आलो. ऑर्डर दिली, वेटरनं सर्व्ह केलं. जेवलो. बिल पे केलं.विषय संपला ”

“ अगं पण..”

“ वेटरनं त्याचं काम केलं. त्याचेच तर पैसे मिळतात.” 

“ बक्षिस म्हणून ‘टीप’ देतात. वेटरच्या अपेक्षा असतात. तशी पद्धत आहे.”

“ कोणी सांगितलं ? अशी पद्धत बिद्धत काही नाहीये. उगीच आपलं सगळे देतात म्हणून आपणही टीप द्यायची. त्याला काही लॉजिक नाहीये ” .. मुलगी उसळली.

“असं काही नाही. टीप न देता जाणं योग्य दिसत नाही ” .. मी 

“ हे मेंढरांच्या कळपासारखं झालं. एकदा सर्वात पुढे असलेली मेंढी चुकून खड्ड्यात पडली आणि उठून पुन्हा चालू लागली. मागच्या सर्व मेंढयानी खड्ड्यात उड्या मारल्या. ’टीप’ द्यायचं पण असंच काही आहे.” .. बायको

“ ते काही माहीत नाही. उगीच ईश्यू करू नका. आज वाढदिवस आहे तेव्हा..” .. मी 

“तेच तर आज चांगला दिवस आहे.असल्या गोष्टी बंद करा”मुलगी 

“ तुमच्यासारखे कर्णाचे अवतार आहेत म्हणून तर हे टीपचं फॅड सुरू झालंय. चला आता, एक रुपया सुद्धा ठेवायचा नाही.” 

इतरवेळी मायलेकीचं अजिबात पटत नाही.  पण इथं लगेच एकमत झालं. टीप न देण्याविषयी बायको आणि मुलीनं युती करून माझ्याविरुद्ध आघाडी उघडली.

“आजच्या दिवस देऊ दे नंतर कधीच देणार नाही.” … मी समेटाचा प्रयत्न केला. सगळे उभे राहिले परंतु टीप न देता बाहेर पडणं विचित्र वाटत होतं. हॉटेलमधले सगळे माझ्याकडेच बघताहेत असा भास व्हायला लागला. उगीचच गिल्ट आला. सर्विस देणारा वेटरनं एकदोनदा माझ्याकडं पाहिलं. पाय निघता निघेना. काहीतरी आयडिया करून टीप द्यावी असा विचार चालला होता, परंतु सोबतचे चार डोळे रोखून प्रत्येक हालचालीकडे पाहत असल्याने नाईलाज होता. पाकीट हातात धरून उभा असताना मनात  मात्र विचारांचे चक्रीवादळ  “ काय करावं? ‘टीप’ द्यावी की नाही. “ तुम्हाला काय वाटतं…… 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments