सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

??

मंगळागौर व्रताचे बदललेले स्वरूप ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

मंगळागौर व्रत हे आईने मुलीला दिलेले व्रत आहे. शंकर पार्वती हे आदर्श जोडपे .त्यांचा आदर्श आपल्या मुलीने समोर ठेवून चांगला संसार करावा यासाठी हे व्रत असते. हे व्रत सलग पाच वर्षे करायचे असते. मी चार पिढ्यांच्या मंगळागौरी पाहिल्या. पूर्वी मुली लहान असत. घरातील मोठी माणसे सांगतील त्याप्रमाणे वागत .हे व्रत या माध्यमातून  भक्ती भावाने केले जायचे. डामडौल अजिबात नव्हता. खेडेगावात वाहनांची सोय नव्हती. पाऊस भरपूर असायचा. त्यामुळे पै पाहुणे फारसे कुणी या व्रताला जात नसत. घरच्या पुरतीच ही पूजा असायची. सजावट वगैरे फारशी नसायची. जेवायला मात्र साग्र संगीत नैवेद्य असायचा. मुली अगदी “न्हाऊनी माखुनी”, नऊवारी चा बोंगा सावरत, भरपूर दागिने अंगावर घालून व्रताला बसत. जिरे साखर तोंडात घेऊन पूजा भक्तिभावाने करत. दुपारचे जेवण मुक्याने करत असत. संध्याकाळी गावातील सर्व सुवासिनींना हळदी कुंकवाला बोलावले जायचे. दारात मोठी रांगोळी असायची. साखर खोबऱ्याची खिरापत आणि गव्हाने ओटी भरली जायची. संध्याकाळी वशेळ्या मुलींना भाजके पदार्थ खाऊ घालत. बहुतेक सगळ्यांना मग कढी, खिचडी, लाडू ,करंज्या, चकली ,मटकीची उसळ, असे पदार्थ जेवायला असत. रात्री मनसोक्त खेळ खेळत. त्यातून मग मनमोकळा संवाद होत असे. दुसरे दिवशी पहाटे उठून मुली आरती करत. दही भाताचा नैवेद्य दाखवत. व फुले, पत्री यांचे विसर्जन करून व्रताची सांगता करत असत. हे व्रत सलग पाच वर्षे करत. मग पाचव्या वर्षी आईला वाण देऊन या व्रताचे उद्यापन करत असत.

आता सगळे बदलले. मुली मोठ्या असतात. बहुतेक नोकरीवाल्या असतात. त्यांना वेळ नसतो. मग त्या पहिल्या वर्षी पहिल्याच मंगळवारी व्रताचे उद्यापन करून टाकतात. थाटमाट भरपूर असतो. फुले, पत्री यांची भरपूर सजावट असते .बहुतेक ठिकाणी महादेवाची पिंड करतात. पण माझ्या मंगळागौरीच्या वेळी माझ्या आईने पिंड करण्यास नकार दिला. एक तर गंज काळा करण्यास तिचा विरोध होता. शिवाय तो उपडा घालून ती मंगळागौर झाकली जाते असे तिचे म्हणणे असायचे. आता लाईटच्या माळा, फुले, विविध प्रकारचे डेकोरेशन, सजावट भरपूर .फोटो, व्हिडिओ शूटिंग ,नातेवाईकांची गर्दी, मित्र-मैत्रिणींचा धांबडधिंगा असतो .रात्री जागरण फार करत नाहीत. संस्कार भारतीने मंगळागौरीच्या खेळांच्या कार्यक्रमाची सुरुवात केली. आता खूप जणी तयार झाल्यात. मग अक्षरशः दहा दहा हजार रुपये देऊन त्या मुलींना बोलावतात. माझा देखील सातारला खूप मोठा ग्रुप होता. एका दिवशी पाच सहा ठिकाणी आमंत्रणे असत. मग सोयीप्रमाणे कधी कधी सकाळी नऊ वाजता सुद्धा जाऊन तासभर खेळून यायचे. बाकीच्या बायका फक्त पहात बसतात. कोणी खेळत नाहीत. काही ठिकाणी तर मुलींना रजा नाही या नावावर संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर पूजा असते. ते सुद्धा हात पाय धुऊन त्या मुली बसतात. मेकअप भरपूर असतो. ज्वेलरी,  कपडे, फोटो, व्हिडिओ शूटिंग हे मात्र अतीच असते. आता हा दिवस व्रत नव्हे तर इव्हेंट म्हणून साजरा केला जातो. देणे घेणे भरपूर असते. कालाय तस्मै नमः!. पण काही का असेना लग्नानंतर श्रावणातली एक तरी मंगळागौर साजरी केली जाते हे तरी अजून चालू आहे. पुढे काय होईल कोण जाणे. आता मुली  लग्न होऊन परदेशी जातात. तिथे कुठली आली मंगळागौर आणि कुठले आले आहे व्रत! असो. मंगळागौरी श्रावणातल्या मंगळवारीच करायची असते हे देखील आता मागे पडत चालले आहे. मुलींना किंवा त्यांच्या आईला, सासूला रजा नसते. म्हणून मंगळवारी घरातल्या घरात पूजा करून रविवारी मोठा कार्यक्रम करतात. मुलींना खेळायला बोलावतात. सोयीप्रमाणे व्रताचे बदललेले रूप पाहून अवाक व्हायला होते. यातही आणखी गंमत म्हणजे माझ्या मैत्रिणीची मुलगी लग्न होऊन अमेरिकेला गेली. ती डिसेंबर मध्ये फक्त तीन आठवड्यांसाठी आली. आणि त्यावेळी त्यांनी वर्षातले सगळे सण साजरे केले. डिसेंबर मध्ये मंगळागौरीचा इव्हेंट केला. आता बोला !

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments