मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅलन्सशीट – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बॅलन्सशीट – भाग – २ ☆ डॉ. शैलजा करोडे

(तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज, कर्मचार्‍यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला. चला हे ही काम झाले हातावेगळे. मला खरंच खूप मोकळं वाटलं.) – इथून पुढे –

“माई , खूप काम आहे काय गं तुझ्याकडे. चेहरा बघ किती कोमेजलाय तुझा.” 

“काही नाही गं आई. आहेत नेहमीची कामं. बाकी काही नाही.” 

“माझीही खूप सेवा करावी लागते तुला.” 

“अगं तुझ्या सेवेचा त्रास नाही होत मला. तू कशाला काळजी करतेस. बघ कशी ठणठणीत आहे मी. तू झोप आता.” मी आईच्या अंगावर पांघरुण घातले.

चला आता रात्रीच्या प्रशांतवेळी प्रसन्ना सिल्क मीलच्या बॅलन्सशीटचं काम उरकविण्यासाठी मी लॅपटाॅप हाती घेतला. यांच्या बॅलन्सशीटमध्ये मला कॅपिटल वर्क इन प्रोसेस, इन्व्हेन्टरी आणि व्यापारप्राप्तीचा दिलासा वाटला. मीलच्या इमारतीचे वाढीव बांधकाम होत होते, तसेच साठवलेला कच्चा माल, अर्धवट प्रक्रिया झालेला कच्चा माल, पूर्ण झालेला पण विक्री बाकी असलेला माल, यातून बराच फायदा होणार होता. कंपनीने काही दीर्घकालीन तरतूदीही केलेल्या होत्या. मी माझे विश्लेषण पूर्ण केले आणि निद्रेच्या कुशीत शिरले.

प्रथमेश रि रोलिंगचा बॅलन्सशीट अहवाल मात्र मी चांगला नाही देऊ शकले. कंपनीने वेळोवेळी अल्पकालीन व दीर्घकालीन तरतूदी वापरल्या होत्या. व्यापारी देयकेही भरपूर होती आणि इतर बर्‍याच लायबिलीटीझमुळे मी ते नाकारलं.

“निलीमा, अभिनंदन. आज विभागीय कार्यालयातून तुमच्यासाठी अभिनंदनपर लेटर आलं आहे. तुमच्या कामाचा गौरव करण्यात आलाय. लेटस् सेलिब्रेट. आज एक छोटीशी पार्टी आपल्या स्टाफलाही देऊया.”

आजपर्यंत मी अनेक बॅलन्सशीटचं काम केलं होतं, टॅली केलं होतं, पण आयुष्याचं बॅलन्सशीट, ते मात्र मी नाही टॅली करू शकले. आयुष्यभर मी प्रत्येकाला देतच राहिले, खूप देयके भरली. पण ॲसेटस् नाही मिळवू शकले. मी खूप चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केला म्हणून माझ्या वाटेला चांगलं येईलच हा विश्वास फोल ठरला होता. कारण इतर घटक परिणाम करणारे होते. कधी घर, कधी समाज, आपले म्हणणारा मित्र गोतावळाही, कधी रूढी, कधी परंपराचा गुंता, हा चक्रव्यूह तोडणे जमलेच नाही.

जीवनाच्या ताळेबंदात आर्थिक स्थितीला फारसे महत्व नसते, कारण पैसा सर्वस्व नाही, तर माणूस किती आनंदी आहे आणि किती उपयुक्त आहे हे महत्वाचे. जीवनात नाव, यश, किर्ती बरोबरच आपल्या व्यक्तीची सोबत, घर, कुटुंब व त्यातून मुलाबाळांच्या रूपातून होणारी गुंतवणूक, भावनिक आस्था, त्यातून निर्माण होणारं प्रेम व्यक्तीला समृद्ध करत असतं. प्रत्येकाच्याच वाटेला हे सुख येत नाही व जीवनाचा ताळेबंद संतुलित होत नाही.

काय दोष होता माझा ? माझं शिक्षण ? माझी बुद्धीमत्ता ? माझं सौदर्य ? कि माझं सुख पाहू न शकणारे नात्यांचे बंध, मी नेस्तनाबूत कशी होईल हे पाहणारे माझे शुभचिंतक ? हितचिंतक ? 

पण जाऊ देत. त्या त्या घटकांनी आपापली कामे केली. माझा जीवनाचा ताळेबंद असंतुलित केला. पण हे संतुलन मी का साधू नये. स्वतःला या कष्टातून मलाच बाहेर यावं लागेल. माझ्याकडे चांगलं नाव आहे आणि प्रतिभाही आहे. शब्दांची संपत्ती आहे. ही अविनाशी संपत्तीच माझ्या जीवनाचा ताळेबंद मजबूत करणारी ठरणार आहे.

सद् भावना ही एक आणखी माझी संपत्ती, आणि ती मिळवायला मला आयुष्य वेचावे लागले आहे. माझ्या समवेतचा भोवताल, त्यातील दुःख, वेदना तसेच प्रसंगी आनंदालाही मी चढवलेला शब्दांचा साज, लेखणीची धार माझ्या सोबतीला आहे.

मोबाईलच्या रिंगटोनने माझी तंद्री भंग पावली. सु का देवधर कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयातून फोन होता. “नमस्कार मॅडम, मी प्रिन्सिपाॅल अनिल महाजन बोलतोय. पुढच्या आठवड्यात वासंतिक व्याख्यानमाला आम्ही आयोजित करीत आहोत. त्यातील “जीवनाचा ताळेबंद” यावर आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतोय. आपण येणार ना मॅडम.” 

“होय सर, मी अवश्य येईन.”

“धन्यवाद मॅडम, मी ईमेल वर निमंत्रण पत्र पाठवतोय मॅडम, पुनश्च धन्यवाद.” सरांनी फोन ठेवला.

“माझ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲसेटस् आणि लायबिलिटीझच संतुलन म्हणजे बॅलन्सशीट आपण शिकलात. लायबिलीटीझ जितक्या कमी तितके चांगले मानले जाते. पण जीवनाचे बॅलन्सशीट फार वेगळे असते मित्रांनो. जीवनाचा ताळेबंद म्हणजे व्यक्तीचं आत्मचरित्रचं म्हणता येईल. घर, कुटुंब, मित्र गोतावळा, नात्यांचे बंध, आपला भोवताल, सगळेच घटक महत्वपूर्ण ठरतात. फार खोलात न शिरता काही महत्वाचे मुद्दे मी मांडणार आहे. तुम्ही या देशाचे भावी सूज्ञ नागरीक आहात. तुम्हांला मी काय शिकवावं.

तर जीवनाच्या ताळेबंदात आमचा जन्म हा ओपनिंग बॅलन्स, मृत्यू हा क्लोजिंग बॅलन्स, आमच्या सर्जनशील कल्पना, सद्भावना संपत्ती, पुर्वग्रहदूषित विचार, द्वेष, ईर्शा, मत्सर, क्रोध हे आमचे दायित्व, ह्रदय ही वर्तमान संपत्ती, आत्मा ही स्थिर संपत्ती, ‌नाव, यश, किर्ती हे आमचं खेळतं भांडवल, शिक्षण, ज्ञान, अनुभव हे सर्व आमचे जमा खाते, लोभ, स्वार्थ हे आमचे दायित्व.

शिक्षण, ज्ञान, आणि आत्मसात केलेल्या कौशल्यामुळे तुमच्याकडील सगळी संपत्ती जरी कोणी काढून घेतली तरी तुम्हांला पुन्हा श्रीमंत होण्यात कोणतीही अडचण येणार नाही कारण तुमच्याकडील आयुष्याचा ताळेबंद हा मजबूत असणार आहे.

बस एवढंच माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण मला इथे बोलावलंत, तुमच्याशी सुसंवाद साधण्याची संधी दिली. ऋणी आहे मी आपली. नमस्कार आज मलाही आंतरिक समाधान वाटले.”

– समाप्त – 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बॅलन्सशीट – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ बॅलन्सशीट – भाग – १ ☆ डॉ. शैलजा करोडे

सकाळी साडेपाचचा अलार्म वाजला. चला उठायला हवं, पण उठवलेच जात नाही आहे. शरीरच नकार देतंय. अंगात तापाची कणकण वाटतेय. आज रजा घ्यावी काय ऑफिसातून? नको, कामाचं आधीच प्रेशर आहे, त्यात रजा म्हणजे दुष्काळात तेरावा महिनाच म्हणावा लागेल . कितीही उपसला तरी कामाचा ढिग काही कमी होत नव्हता. या कर्ज विभागात तर कामाची कमतरताच नसते. जुनी कर्ज प्रकरणे, त्यांची वसूली, त्याचा पाठपुरावा, वेळोवेळी त्यांना पाठविलेल्या नोटिसा, दरवर्षी घेतले जाणारे बी सी लेटर्स,  क्षेत्रीय व विभागीय कार्यालयाने वेळोवेळी मागविलेली माहिती, स्टेटमेंटस्, नवीन कर्ज प्रकरणे, त्यांची सगळी कागदपत्रे, बॅलन्सशीटचे विश्लेषण करणे, खाते एनपीए होऊ नये म्हणून प्रयत्न करणे, एनपीए झालेले खाते पुन्हा ॲक्टीव्ह करण्यासाठी झटणे, एक ना हजार अशी कामे, जीव नुसता मेटाकुटीला यायचा. काही वेळा मनात विचार यायचा, घ्यावी स्वेच्छा निवृत्ती, पण दुसर्‍याच क्षणी मन म्हणायचं, ‘आव्हानांना घाबरतेस काय ? स्विकार चॅलेंज आणि चल पुढे, प्रामाणिकपणे काम करायचे. मग कसल्या अडचणी ?’

घड्याळ बाबाकडे लक्ष गेले. बापरे सहा वाजलेत. उठले. सकाळची सगळी आन्हीकं आटोपली. आईला उठवलं, शंभरवर्षीय आई सर्वस्वी आम्हां भावंडांवर अवलंबून होती. तिला दात ब्रश करायला लावले. तिची वेणी घातली, स्नान उरकलं, चहा पाजला.

आईला सांभाळणारी बाई नऊ वाजेला यायची. मी फटाफट स्वयंपाक उरकला, डबा भरला व धावतपळत ऑफिस गाठलं. 

आपल्या टेबलाशी आले. पी सी चालू केला आणि डे बिगीनला सुरूवात केली. काही महत्वाचे ईमेल आहेत काय पाहिले. त्यांना उत्तरे लिहिली. ग्राहकांच्या काही तक्रारी आहेत काय ते पाहिलं. एक तक्रार होती, त्याचा समाधानकारकपणे निबटारा केला.

इतक्यात माझ्या पी सी वर माझ्या वरीष्ठांचा मेसेज आला. मॅडम भेटून जा.

मी केबिनमध्ये गेले. “निलीमा मॅडम तुलसी पाईप्स, गौरव इंडस्ट्रीज, प्रथमेश रि रोलिंग, प्रसन्ना सिल्क मील यांच्या बॅलन्सशीटचं ॲनालिसिस करायचं आहे. तुम्ही केली काय सुरूवात. आम्हांला अगदी अग्रक्रमाने हे काम करायचं आहे. आता हा जानेवारी महिना, मार्चला आपलं क्लोजिंग. त्याच्या आत ही कर्जे मंजूर झाली पाहिजेत जेणे करून आमची तोट्यात गेलेली शाखा हा तोटा भरुन नफ्याकडे वाटचाल करील. नफा तर नाही होणार लगेच, पण आमचा तोटा तर कमी होईल. हळूहळू आमची ही गाडी राईट ट्रॅकवर आली कि पुढील भविष्यही मग उज्वल राहिल. यासाठी तुमचाही हातभार हवा निलीमा मॅडम. या चार दिवसात तुम्ही मला चारही बॅलन्सशीटचं विश्लेषण द्याल अशी मी अपेक्षा करते, जेणे करून मला पुढील प्रोसेस करता येईल.”

“मॅडम बॅलन्सशीटचं ॲनालिसिस करणं किती अवघड आणि जोखमीचं असतं. फार बारकाईने अभ्यासपूर्ण हे काम करावं लागतं. आमची बारीकशी चूकही महागात पडू शकते‌” 

“होय निलीमा मॅडम, म्हणून तुमच्यासारख्या हुशार, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकार्‍याकडे हे काम सोपवतेय. यापूर्वीही तुम्ही बर्‍याच बॅलन्सशीटचं विश्लेषण केलं आहे. यावेळीही तुम्ही चांगल्याप्रकारे हे काम कराल असा माझा विश्वास आहे. आणि तुम्ही ते करणारच याची खात्रीही आहे. मग शुभस्य शीघ्रम. आणि होय, हे काम झालं कि तुम्ही घ्या दोन दिवस सुट्टी. तुमची तब्येत बरी नसतांनाही तुम्हांला काम करावं लागतंय याचं वाईट वाटत आहे, पण तुमची कामाप्रतीची निष्ठा व तुमचं मनोधैर्य हे काम करण्यास ऊर्जा देईल. ऑल दि बेस्ट.”

मी आपल्या सीटवर स्थानापन्न झाले. “विवेक जरा चहा सांगशील रे माझ्यासाठी.” मी ऑफिसबाॅय ला आवाज दिला. गरम चहाचा एकएक घोट संपवत मी थोडीशी रिलॅक्स झाले. “दिपीका जरा तुलसी पाईपची फाईल दे गं”. फाईलमधून मी बॅलन्सशीट काढलं. “मनी कंट्रोल वेब साईट ओपन केली आणि बॅलन्सशीटच्या विश्लेषणाला सुरूवात केली. तुलसी पाईपच्या इतरही उपकंपन्या होत्या जसे तुलसी प्लाॅस्टिक, तुलसी स्टील, तुलसी ट्यूब सोल्यूशन. आम्ही फक्त तुलसी पाईपसाठी कर्ज देणार होतो म्हणून स्टँडअलोन बॅलन्सशीटच मला बघायचं होतं.

तुलसी पाईपची इमारत, वाहने, यंत्रसामग्री खरेदीसाठीची कर्जे, त्याचा परतावा, इक्विटिझ आणि लायबिलिटीझ मध्ये शेअर कॅपिटल रेशो स्थिर होता. एकंदरीत हे बॅलन्सशीट तसे ओ के होते. माझे विश्लेषण पूर्ण करून मी माझे कव्हरींग लेटर तयार केले. 

उद्या सर्कल हेडची ब्रांच व्हिजिट होती. त्यांना काय माहिती हवी, काय काय चेक करायचं आहे व ते कसं व्यवस्थित असेल याची यादीच मॅडमने माझ्याकडे दिली. रात्री उशिरापर्यंत मी व मॅडम सुलेखा आम्ही दोघींनी ते काम पुर्ण केलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.

आज मला गौरव इंडस्ट्रिजच्या बॅलन्सशीटचं विश्लेषण करायचं होतं. कंपनीची दिर्घकालीन कर्जे होती. तसेच शेअर कॅपिटलही भरपूर होतं. यातुन कंपनीचे दायित्व बरेच असल्याचे दिसत होते. मी कंपनीच्या आयपीओ पोस्ट वाचायला घेतल्या आणि शेअर फेस व्हॅल्यू व शेअर व्हॅल्यूतून शेअर प्रिमियमचा अंदाज घेतला. टॅक्स आणि लाभांश देऊन बरीच रक्कम शिलकीत राहात होती. तसेच कपनीच्या काही ठेवींवरील व्याज, कर्मचार्‍यांना व इतर उपकंपन्यांन्या दिलेल्या कर्जावरील व्याज पाहाता रिझर्व्ह व सरप्लस रेशो समाधानकारक वाटला. चला हे ही काम झाले हातावेगळे. मला खरंच खूप मोकळं वाटलं.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – [email protected] 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निळे मलम… भाग – २ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ निळे मलम… भाग – २ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

(आपल्या सहवासात माझा आत्मा आतृप्तच राहिला. माझ्या तृप्तीचा हा उपाय मी शोधला.’

 ‘कोणता उपाय?’

 ‘निळे मलम.’ ) — इथून पुढे 

‘निळे मलम , वाढत्या वयाचा परिणाम तुझ्या डोक्यावरही झालाय. विचारतोय काय? आणि तू उत्तर काय देतीयस?

‘बरोबर बोलतीय मी! बस आपण समजू शकत नाही. तसंही आपण मला कधी समजून घेतलय?’

‘खूप सांकेतिक बोलायला लागलीयास आज काल.’ सोमेशने चिडून म्हंटलं.

‘स्पष्ट करते. लहानपणी गरम दूध हातावर पडल्यामुळे माझा हात खूप भाजला होता. एक तर भाजल्यामुळे होणारी जळजळ आणि द्सरीकडे ही चिंता, की हातावर फोड येऊन माझा हात खराब झाला तर? माझ्या हाताचे डाग पाहून लोक हसतील. मी ओरडून ओरडून रडत होते. तेव्हा आईने जवळ असलेल्या शाईचा दौतीतली शाई माझ्या हातावर ओतली.

‘हे काय केलंस आई? एखादं औषध लावायचं ना! आता माझ्या हातावर फोड उठले तर? त्याचे डाग किती खराब दिसतात.’ मी रडत रडत आईला म्हंटलं

‘बेटी, हे औषधच आहे. बघ. याने तुझी जळजळही थांबेल आणि तुझ्या हातावर फोडही उठणार नाहीत.’ आईने समजावलं.

‘खरोखरच त्या निळ्या शाईने मला खूप आराम मिळाला. जळजळ थांबली आणि फोडही आले नाहीत.’

तू अजूनही भरकटतच आहेस.’ सोमेश चिडून म्हणाला.

‘मुळीच नाही. तिथेच येते आहे मी. विचार करा. तुमच्याशी लग्न करून मी या घरात आले. कधी तुम्ही माझं मन जाणून घेण्याचा प्रयत्न केलात? तुमची गरज भागवण्याचं मी केवळ साधन झाले. कधी माणूस म्हणून माझ्याकडे बघितलत, मला तरी आठवत नाही. तुमची उपेक्षा, अवहेलना, यामुळे माझंही हृदय खूप जळत होतं. मी पुन्हा घाबरले, की कुठे फोड उठू नयेत. नाही तर इच्छा नसतानाही त्यातून झरणारं पाणी समाजाच्या चर्चेचा विषय बनेल. ‘

‘म्हणजे?’

‘म्हणजे आत्तापर्यंत तरी लोकांना असं वाटतय, की आपल्यामधे प्रेमाचा झरा  वाहतोय. आपण दोन शरीर आणि एक आत्मा असलेले आहोत कारण सामान्यत: आपण समाजापुढे असाच चेहरा घेऊन फिरतो. आपण दोघं म्हणजे नदीचे दोन किनारे आहोत, ज्याच्या  आत एक ज्वालामुखी खदखदतोय, हे कुणालाच माहीत नाही. तुमच्याशी जोडली गेल्यावर मला खूप एकाकीपण वाटलं.’

‘तू जरा जास्तच , इच्छा, अपेक्षा बाळगल्यास… अं?’ सोमेश डोळे वाटारून  म्हणाला.’

‘इच्छा, अपेक्षा बाळगणं, हा प्रत्यक माणसाचा हक्क आहे. शिवाय, प्रत्येक बाईच्या काही इच्छा, काही कामना, अभिलाषा असतातच आणि जेव्हा त्या अपूर्ण कामनांसोबत जगावं लागतं ना सोमेश, तेव्हा खूप पीडा होते. मी ते एकाकीपण भोगलय, जेव्हा तुम्ही असूनही माझ्याबरोबर नव्हतात. माझं सुख तुमचं. माझं दु:ख मात्र माझं एकटीचं होतं तेव्हा. उशीलाच साथीदार बनवून तिच्या गळ्यात हात टाकून माझं दु:ख माझ्या वेदना वाटत होते मी. तिला माझ्या आसवांनी भिजवत होते. मला माहीत होतं, की मी म्हणजे अमृता नाही, जिला सहजपणे आपलं दु:ख वेदना सांगण्यासाठी आणि रडण्यासाठीही इमरोजचा खांदा मिळेल.’

एरवी सोमेशच्या पुढे येताना सुलभाची  बोलती बंद होते. आज न जाणे तिला एवढी ऊर्जा कुठून आली.

‘तर मग हा मार्ग शोधून काढलास तू, आपल्या  मनातलं दु:ख बाहेर काढण्याचा?’

‘काय वाईट आहे यात? तुम्ही मला कधीच समजून घेतलं नाहीत … आताही समजू शकणार नाही. आशा स्थितीत माझ्यापुढे दोनच रस्ते होते. एक तर बाथरूममध्ये जाऊन अंतरातला लाव्हा फ्लशबरोबर वाहून टाकायचा किंवा कुणाला तरी सांगून हलकं व्हायचं. पण काळजातलं दु:ख कुणाला ऐकवणार? जिथे सात फेर्‍यांचं बंधन आपलसं झालं नाही तिथे कुणाकडून काय अपेक्षा ठेवणार? दुसरा रास्ता हा होता की कुणी सहप्रवासी असा शोधायचा की जो जीवनात साथ देईल, माझ्याविषयी सहानुभूती बाळगेल, माझे दु:ख, वेदना समजून घेईल.- माझीही काळजी करणारा, माझाही विचार करणारा असेल आणि विश्वास बाळगा सोमेश… मिळालाही असता. किती तरी वेळा वाटलं, शोधावा असा जीवनसाथी, जो माझ्या भावनांना समजून घेईल, माझ्यावर मनापासून प्रेम करेल, ज्याच्या खांद्याववर डोके टेकून मी आपलं ओझं हलकं करू शकेन. जसे तुम्ही माझ्याबाबतीत बेपर्वा आहात, तशीच  मीही आपल्याबाबतीत बेपर्वा होईन. माझं वर्तमान जगू शकेन. ‘

‘म्हणजे आत्तापर्यंत तू मुडदा होतीस, आता जगू इच्छितेस.’

‘सोमेश केवळ श्वासोच्छवास करणं, एवढीच काही जीवंत रहाण्याची खूण नाही. जीवंत असण्यासाठी काही स्वप्न, इच्छा, अभिलाषा असणंही गरजेचं असतं. दररोज कुणी तरी  माझ्या आतून ओरडून ओरडून विचारतं… तू मृत आहेस..? उठ.जागी हो.  खरं तर त्यानेच माझ्या जिवंत असण्याची जाणीव कारून दिलीय. आता मी बघू इच्छिते, ती स्वप्ने, जी तुमच्या भीतीने मी पाहिली नाहीत. सगळी कर्तव्ये पार पाडूनही, जेव्हा नाराजीचा मुकुट माझ्या  माथ्यावर जडला, तेव्हा वाटलं या मनाला थोडं, सुख, आराम, चैन का देऊ नये? अश्रूंमध्ये माझं दु:ख वाहवून टाकत होते, त्यापेक्षा ते कागदावर उतरवणं मला जास्त चांगलं वाटलं. प्रेमाच्या खत-पाण्याच्या अभावाने निर्जीव झालेल्या संवेदना मलाच जडवत करू नये यसाठी विचार केला की, शब्दांच्या कॉंक्रीटचा का होईना, एक महाल बनवावा. भावना-संवेदनांची जी बीजे मनाच्या मातीत नुसतीच पडून आहेत, ती खत-पाणी घालून अंकुरित करावी. एवढा तरी हक्क आहे ना मला?’ सुलभात आज एवढी ताकद कुठून आली कुणास ठाऊक? स्वत: सोमेशही हैराण झाला.

“सोमेश ! आम्हा बायकांच्यात एक कमजोरी असते. आम्ही  ना, भविष्याची डोरी आधीच हातात, घेऊन ठेवू इच्छितो. यामुळे अनेकदा अर्तमानाचं टोक आमच्या हातून सुटून जातं. मीदेखील माझ्या जीवनाच्या तराजूनं माझं सुख तोलून बघितलं, तेव्हा मला वाटलं माझ्या वर्तमानापेक्षा मोठा आहे माझ्या माता-पित्यांचा अभिमान, जो त्यांना त्यांच्या लेकीबाबत आहे. माझ्या सासू-सासर्‍यांचा सन्मान, जो  त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या वागणुकीने मिळवलाय. लोक आपल्या दोघांमधील विसंवादाचे साक्षीदार बनावे, याच्यापेक्षा, पुन्हा एकदा निळे मलमच, पुन्हा एकदा माझं दु:ख, वेदानांना कमी करण्याचं साधन बनवावं, असं मला वाटलं. माझ्या आतील दु:ख याच  मलमानी बाहेर येत गेलं आणि मी समाजापुढे एक सुखद, संपूर्ण दांपत्यच्या आभासी जगाची  जाणीव करून देत, चेहर्‍यावर हसू आणत जगत राहिले.’

सोमेश गप्प बसून सुलभाकडे बघत राहिला.

सुलभाला जाणीव झाली, की एका शिकार्‍याच्या पंजाच्या हातून तिने आपली स्वप्ने वाचवली आहेत.

– समाप्त – 

मूळ कथा – नीला मलहम  

मूळ लेखिका – सुश्रीलता अग्रवाल, मो. – 9926481878

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ निळे मलम… भाग – १ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ निळे मलम… भाग – १ – हिन्दी लेखिका : सुश्री लता अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

आकाशात ढग विखुरलेले होते. मन मात्र एका संतापाने लिप्त झालेलं, कोमेजलेलं…. का ही केवळ सुलभाच्या मनाचीच छाया होती. तिचा प्रत्येक दिवस असाच जातो. सकाळी सकाळी थकलेला भागलेला देह, ओरडणारा, किंचाळणारा दिवस. देहाबरोबर मनदेखील मरतं, तेव्हा कदाचित अशीच स्थिती होत असेल.

काल रात्री तिने एक स्वप्न बघितलं. एक असं स्वप्न ज्यात कुणी तरी आपल्या हातात तिच्या स्वप्नांना कैद करू इच्छित होतं आणि ती आपली स्वप्ने त्याच्या तावडीतून सोडवण्याचा जिवाच्या आकांताने प्रयत्न करीत होती. खूप संघर्ष केल्यानंतर त्याच्या हातातून आपली स्वप्ने मोकळी करण्यात ती यशस्वी झाली. स्वप्नांबरोबर आपलं जीवनही स्वतंत्र करणं जमलं तिला. पळत पळत ती एका हिरव्या-गार मैदानात आली. तिथे उभं राहिल्यावर तिला निवांतपणा, शांतता जाणवू लागली. एका वृक्षाच्या सावलीत उभं राहून सुलभा विचार करू लागली, जर आज तिने आपली स्वप्ने वाचवण्याचा प्रयत्न केला नसता, तर तिला ती नेहमीसाठी गमवावी लागली असती.

एवढ्यात घड्याळाचा गजर झाला. सहा वाजले होते. तिच्या आरामाची निर्धारित वेळ संपली होती. तिने गॅसवर चहाचं आधण ठेवलं आणि आपल्या तोंडावर पाण्याचे हबके मारले, तोच पेपर वाचता छतावरून सोमेशने ‘सुलभा…. सुलभा’ म्हणत पत्नीला हाक मारली.

‘जी… आले आले. ’ स्वैपाकघरात जाऊन गडबडीने तिने गॅस बंद केला. कमरेला खोचलेला पदर खांद्यावरून घेतला आणि भरभर पायर्‍या चढताना विचार करू लागली, ‘आता काय झालं? सकाळी सकाळीच आरडा ओरडा सुरू केलाय. प्रत्येक गोष्टीत काही तरी खोड काढायची सवयच आहे लाटसाहेबांना. ’             

‘काय झालं?’ जवळ येत घाबरत तिने विचारलं.

‘हा तुझाच फोटो आहे नं? ‘ सोमेशने रागानेच पेपर सुलभाकडे करत विचारलं.

‘हो!’ सुलभाने पेपरवरून धावती नजर फिरवत म्हंटलं॰

‘याचा अर्थ तुला माहीत होतं’

‘होय. मोबाईलवर सूचित केलं होतं त्यांनी. ’

‘असं कसं होऊ शकतं?’

‘काय कसं होऊ शकतं?’

‘हेच की साहित्य क्षेत्रात सुलभा बाजपेयीला, तिच्या गीतांसाठी महादेवी पुरस्कार प्रदान केला जातोय. वरिष्ठ साहित्याकारांचं म्हणणं आहे की त्यांच्या गीतात महादेवी जी यांच्या गीतांसारखं दु:ख, वेदना झळकते. ’ सोमेशने एका श्वासात सगळी बातमी वाचून दाखवली.

‘तू कधीपासून गीतं लिहायला लागलीस? तीही दर्दभरी गीतं. ’

‘जेव्हापासून तुमचाशी बंधनात बांधले, तेव्हापासून’

‘व्हॉट यू मीन….. जेव्हापासून तुमचाशी बंधनात बांधले, तेव्हापासून… म्हणजे? सरळ प्रश्न विचारलाय, सरळ सरळ उत्तर दे. ’           

‘सरळच तर उत्तर दिलय’. ’

‘म्हणजे माझ्याबरोबत तू खूश नाहीस. बंधन आहे हे तुझ्यासाठी ?’’

‘खरं सांगायचं तर हो. ’ सुलभाने दृढतापूर्वक म्हंटलं.

‘आधीच बोलली असतीस तर, हे बंधन तुला वागवावं लागलं नसतं. तुला स्वतंत्र केलं असतं. ’

‘बोलले असते, पण विचार केला, की कधी तरी तुम्हाला जाणीव होईल….. मग मुलं झाली. त्यांच्यासाठी हे बंधन स्वीकारावं लागलं. ’

‘घरात सगळया सुविधा असून तुला हे बंधन वाटतं. कोणत्या गोष्टीची  कमतरता आहे तुला इथे?’’

‘त्या गोष्टीची… ज्याच्यासाठी मुलगी आपलं माहेर विसरून, एका अनोळखी माणसाबरोबर एका न पाहिलेल्या प्रवासासाठी निघते. ’

‘बघतोय, हे साहित्य जरा जास्तच चढलय तुझ्या डोक्यावर. साधं उत्तर देताना इज्जत घटते तुझी. ’

‘सरळ साधं ऐकायचं असेल, तर ऐका. लहानपणी मीदेखील स्वप्नामधे एक राजकुमार पहिला होता. विचार केला होता, त्याच्याबरोबर जीवनातील सार्‍या खुशा वाटून घेईन. तो मला आपल्या प्रेमाने संभाळेल. मी त्याचा घर-संसार सांभाळेन. मुलांना वाढवेन. सौभाग्यवती असताना मरेन. याच इच्छेने जीवन संपवेन. ’

‘मग काय नाहीये तुझ्याजजवळ? घर, मुले, तुझं सौभाग्य, म्हणजे मी…. मग रडगाणं कशासाठी?’

‘रडणंच तर राहिलाय आता जीवनात. जेव्हा आई-बाबांनी जीवनाचा दोर तुमच्या हातात सोपवला, तेव्हा वाटलं होतं, तुम्ही माझे सहप्रवासी, माझा विचार करणारे माझ्या सुख-दु;खात सहभागी व्हाल, आपण एकामेकांच्या आत्म्याला स्पर्श करू. पण कुठे घडलं असं? आपले संबंध देहापुरतेच  सीमित राहिले. ‘  

‘तुला जरा  जास्तीचेच पंख लागले नाहीत ना?’

पंख तर केव्हाच आपली उड्डाण विसरले. हसत-खेळत जीवन जगावं, एवढीच इच्छा होती माझी, पण आपण तर जसा काही हसण्यावरच कर्फ्यू लावलात. ’

‘मग तोडायचास ना हा कर्फ्यू… कुणी आडवलं होतं. ’

‘हे केवळ तुम्ही पुरुषच म्हणू शकता. आई-बाबा आम्हा मुलींना चांगलं बनण्याची घुटी पाजूनच पाठवतात. काहीही असो, नकारात्मकतेत, सकारात्मकता शोधत रहा. पण आता थकले. चांगलं होण्याचा सूळ वागवताना आता मात्र थकले अगदी. मन उत्तर देऊ इच्छितं.

‘काय बोलतीयास, कळतय का तुला? ‘ सोमेश चिडला. तो आज सुलभाचे हे  नवीन रूप पाहून हैराण झाला होता.

‘आपण सरळ शब्दात बोलायची आज्ञा केलीत, मी आपल्या आज्ञेचे पालन केले. ’

‘तू जरा जास्तच  बोलतीयस असं नाही वाटत तुला?’

‘मी तर काही बोलूच इच्छ्त नव्हते. जेव्हापासून या घरात आले, आपणच बोलताय. आपण म्हणता त्याप्रमाणेच तर जगते आहे. आपल्या खांद्यावर आपल्या स्वप्नांचे शव ओढते आहे. मोकळेपणाने हसणंही आपल्याला पसंत नाही. माझं सारं कौशल्य देह सजवण्यात खर्च केलं आपल्यासाठी. …. आता त्या कौशल्याचाच उबग आलाय. ’

‘बस.. बस.. मी एवढंच विचारू इच्छितो, की हा लिहिण्याचा रोग का लावून घेतलास? याच्या माध्यमातून लोकांना तू आपलं दु:ख सांगू इच्छितेस?’

तेच तर सांगतीय, …. तुमच्या भीतीने संस्काराची भारी भक्कम चुनरी डोक्यावरून ओढून घेतली. मनपसंत स्वप्ने कधी बघितलीच नाहीत, उलट लहानपणाची सगळी स्वप्ने गोळा करून, मानाच्या अंधार कोठडीत ठेवून दिली. आपल्या नाराजीचा मुकुट नेहमीच डोक्यावर ठेवला. त्याची बोच आता टोचू लागलीय. आपल्या सहवासात माझा आत्मा आतृप्तच राहिला. माझ्या तृप्तीचा हा उपाय मी शोधला. ’

‘कोणता उपाय?’

‘निळे मलम.’

– क्रमशः भाग पहिला 

मूळ कथा – नीला मलहम  

मूळ लेखिका – सुश्रीलता अग्रवाल, मो. – 9926481878

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “मृत्युपत्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “मृत्युपत्र…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

हल्ली ती झोपूनच असायची. फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं . तसं वयही झालं होतं म्हणा… नवरा गेल्यापासून डोळे मिटून गत जीवनातल्या घडामोडी आठवत राहायची… 

….. आज तिला नवऱ्याने केलेल्या मृत्युपत्राची आठवण आली.

तो दिवस आठवला.

 चार दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचा असं सुरू होत. तिने विचारलं

” काय करताय?”

”  महत्त्वाच काम करतोय..मृत्युपत्र लिहितोय..विचार करून ते लिहायच असत..”

” काय मृत्युपत्र..आत्ता …कशासाठी?”

” आत्ता नाही तर कधी  करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको”

” म्हणजे वाटणी का “

यावर तो जरा रागवलाच..

“नुसती वाटणी नसते ती… बरं ते जाऊदे..  उगीच काहीतरी विचारत बसु नको..तुला काय त्यातल समजणार ?एक वाजायला आलाय जेवायला वाढ “

ती गप्प बसली .खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा  काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं. नेहमीचच होतं ते .. त्याचं बोलणं तिने  मनावर घेतलं नाही. मनात  मात्र कुठेतरी वाईट वाटलच…

का कोण जाणे… पण गेले काही दिवस मृत्युपत्र हेच तिच्या डोक्यात होत..

आज लेक भेटायला आली .तेव्हा तिने विषय काढला .म्हणाली..

“मला पण मृत्युपत्र करायच आहे .”

“तुला ?…मृत्युपत्र ?…कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात ?” मुलीनी हसतच विचारलं..

तिचं लक्षच नव्हतं. ती तिच्याच नादात होती .पुढे म्हणाली ..

“अगं एक  महत्वाचं विचारायचं होतं मृत्यूपत्र लिहिले की त्याप्रमाणे वागावं लागतं का ?ते बदलता येत नाही ना ?” … आईचा शांत संयमित  आवाज ऐकून लेकीच्या  लक्षात आलं…आई गंभीरपणे काही सांगते आहे..ती म्हणाली….

” हो नाही बदलता येत .पण आई असं का विचारते आहेस?”

” मला पण करायचे आहे मृत्युपत्र. आण कागद.. पेन ..  घे लिहून …”

“कशाची वाटणी करणार आहेस ?काय आहे तुझ्याजवळ?”

लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं … ती तंद्रीतच बोलत होती …. 

“भावानी बहिणीला  वर्षातून एकदा माहेरपण करायचं..

राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं .त्याला ओवाळायचं .तबकात  अगदी अकरा रुपये टाकले तरी चालतील …भावाला  घरी बोलवायचं … गौरीला माहेरची सवाष्ण हवी ..नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं तिची ओटी भरायची.. बहिणीने भावाच्या अडीनडीला धावून जायचं ..त्याला मदत करायची.. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं.  तिच्यावर माया करायची.. आपापसात सगळ्यांनी प्रेमाने मायेनी  आपुलकीनी राहायचं … आत्या ,काकु,मामा ,मामी सगळी नाती जपायची .. एकोप्याने रहायच.. पुढच्या पिढीने पण हे असंच चालू ठेवायचं …..”

एवढं बोलल्याने ती दमली.  मग श्वास घेतला.  थोडा वेळ थांबली.

लेक थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती…आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती…

”  तु विचारलस ना…माझ्याकडे काय आहे वाटणी करायला ?खरंच ….काही नाही ग… मला वाटणी नाहीच करायची …तर तुमची जोडणी करायची आहे .

तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तरच ती टिकून  राहील ..हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्युपत्र असं समजा.”

लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली .तिने आईचा हात हातात घेतला…त्यावर थोपटले .. आश्वासन दिल्यासारखे……लाखमोलाच सदविचारांचं धन आईनी वाटल होत..

दारात भाऊ भावजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते पण आत आले त्यांनीही तिचा हात हातात घेतला. चौघांचे डोळे भरून वाहत होते .

आता ती निश्चिंत झाली होती .

खूप दिवसांनी ती समाधानाने हसली.

मनात म्हणाली …

“ रामराया आता कधीही येरे न्यायला… मी तयार आहे..”

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 2 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 2 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

(अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.) इथून पुढे 

अलीकडे खूपदा त्यांच्या मनात येई.. काय मिळवले आपण आयुष्यात?वडिलोपार्जित घर आहे ते सांभाळले फक्त. अदितीला पदवीधर केले. राहुलचे इंजिनिअर पर्यंत शिक्षण केले. दोघांची लग्ने केली. बस्स. नवीन प्रॉपर्टी करणे काही आपल्याला जमले नाही. ना एवढी शिल्लक राहिली की त्याच्या व्याजावर उरलेले आयुष्य जाईल. जी काय थोडी शिल्लक होती ती पण राहुलला देऊन बसलो.

आला दिवस घालवत होते. अशीच १०-१२ वर्षे गेली. वाडा आता खुपच मोडकळीस आला होता. त्यातल्या त्यात एक खोली शाबूत राहिली होती. तिथेच आता दोघे रहात. भद्रकालीत असलेले दुकान त्यांनी आता भाड्याने दिले होते. त्या पैशातून त्यांचा प्रपंच चालत होता. अदिती अधुनमधून थोडे पैसे देई. राहुलहि मीनुच्या नकळत पैसे देत होता. त्यांनाही त्यांचा संसार होता.. फ्लॅटचे हप्ते होते.. नीलचे शिक्षण होते. त्यांच्याकडून फार अपेक्षा करण्यात अर्थच नव्हता.

अदिती जिना चढून वर आली. जिन्याच्या फळ्या आता कधीही निसटतील अशा झाल्या होत्या. कठडे हलायला लागले होते.

“येगं.. आताच आई तुझी आठवण काढत होती” राजाभाऊ म्हणाले.

“कुठाय आई ?” तिने विचारले.

“येईल. खाली गेली आहे”.

अदितीने खोलीवर नजर टाकली. एका खोलीतील संसार. जुन्या लोखंडी टेबलवर गैसची शेगडी. त्याच्या बाजूला एक मांडणी. मांडणीवर भांडी मांडुन ठेवली होती. टेबलाच्या खाली काही डबे, ताट, वाट्या वगैरे. दुसऱ्या कोपऱ्यात लोखंडी पलंग. खरकट्या भांड्यांचा ढीग. त्याच्या वासाने अदितीला असह्य झाले.

“दादा मी एक सुचवायला आले आहे” अदिती म्हणाली.

“बोल. काय म्हणतेस?” 

“तुम्हाला माहितच आहे.. इंदिरा नगरला आम्ही एक फ्लॅट घेऊन ठेवलाय.”

“मग?”

“तिथे तुम्ही रहायचं”

“अगं पण जावईबापु..?”

तेवढ्यात ललिताबाई वरती आल्या. धापा टाकीत बसून राहिल्या. राजाभाऊंनी त्यांना सांगितले.. अदिती हे असं असं म्हणतीय.

“नको गं बाई जावयाच्या घरात..”

“काही जावयाचे वगैरे म्हणू नका हं. तो फ्लॅट मी माझ्या पगारातून घेतलाय. त्याचा निर्णय मीच घेणार. आणि तसंही मी यांच्या कानावर घातले आहे”.

राजाभाऊंना काय बोलावे हेच कळेना. हो म्हणावे की नाही? त्यांना सुचेनासे झाले. स्वस्थ बसून राहिले.

“आणि आता ही खोली कधी खाली येईल याचा भरवसा नाही. आई अगं तुम्ही रहाता इथे.. पण आम्हाला रात्री झोप येत नाही. रात्री बेरात्री काही झालं… भिंत पडली तर कोण आहे इथे?पावसाळा तोंडावर आलाय. मी आता तुम्हाला या पडक्या वाड्यात राहु देणार नाही”.

“अगं पण…”

अदिती सगळं ठरवुनच आली होती. दुसऱ्याच दिवशी तिने टेंपो बोलावला. राहुलच्या कानावर पण घातलं. दोघा बहिण भावांनी सर्व सामान हलवले. आणि इंदिरा नगरच्या फ्लॅट मध्ये राजाभाऊ, ललिताबाईंचे नवीन आयुष्य सुरू झाले.

बाल्कनीत उभे होते राजाभाऊ विचार करत होते. आता इथे येऊन तीन वर्षे झाली होती. त्यांना इथली सवय होउन गेली होती. मोकळी जागा, भरपूर खेळती हवा. इथले आयुष्य त्यांना मानवले होते. अधुनमधून लेक जावयी, मुले सुना येत. नातवंडे सुटीत रहायला येत. शेजारच्या बिल्डिंग मध्ये योगा हॉल होता. तिथे सकाळी तासभर दोघे जात. संध्याकाळी ऊन उतरल्यावर दोघेजण गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन बसत. येताना भाजीबिजी घेऊन येत. सर्व व्यवस्थित चालले होते. पण…

…पण अलीकडे राजाभाऊंचे मन अस्वस्थ होऊ लागले होते. वारंवार मनात विचार येत. आपण या जागेत, म्हणजे मुलीच्या घरात रहाणे योग्य आहे का? सर्व आयुष्य स्वतःच्या घरात गेले, आणि आता अखेरीस या जागेत येऊन राहिलो. मनात तोच एक सल होता. आतल्या आत तगमग होई. हि बाब त्यांनी ललिताबाईंजवळ पण बोलुन दाखवली नव्हती. 

तसं म्हटलं तर या विचारांना काही अर्थ नव्हता. त्यांच्याकडे दुसरा पर्याय पण नव्हता. मग आहे ते आयुष्य आनंदाने घालवायचे तर असला विचार का करत बसायचा? पटत होते त्यांना. पण डोक्यातील विचारही जात नव्हते.

आज त्यांचे लहानपणापासून चे मित्र.. चंदुकाका त्याच्याकडे आले होते. सहजच. त्यांच्याशी बोलताना राजाभाऊंनी मन मोकळे केले. मनातली व्यथा त्यांना सांगीतली.

“अरे,कसला विचार करत बसतोस राजा. मुलाची जागा.. मुलीची जागा. राहुलच्या घरी राहिला असता तर हे विचार आले असते का तुझ्या डोक्यात?का हा भेदभाव? उतार वयातील आयुष्य जरा मोकळ्या हवेशीर जागेत घालवायचे होते ना तुला? मग लेकीनेच केली ना तुझी इच्छा पूर्ण? 

एकिकडे म्हणायचं.. मुलगा मुलगी भेद नको. अरे, खरं तर तु भाग्यवान. म्हातारपणात पोरं आईबापांची रवानगी वृध्दाश्रमात करतात. तुला इतकी सुंदर जागा घेऊन दिली लेकीने आणि तु दुःख करत बसतोस. म्हणे मुलगा वंशाचा दिवा…. मग मुलगी? अरे ती तर पणती ना. दिवाळीत लावतो ती. सगळा आसमंत उजळून टाकणारी. तिनेच तर तुझे हे जीवन उजळून टाकले आहे.”

बराच वेळ चंदुकाका बोलत होते. आणि तसं तसं राजाभाऊंच्या मनावर आलेलं मळभ दुर होत गेलं. त्यांना हलकं हलकं वाटु लागलं. प्रसन्नपणे त्यांनी ललिताबाईंना हाक मारली..

“अगं.. चंदु आलाय, फक्कडसा चहा बनव.”

 – समाप्त – 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 1 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ वंशाचा दिवा… की पणती ?… भाग – 1 ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

दुपारी दोन वाजता राजाभाऊ दुकान वाढवून घरी आले. तसे ते रोज एक वाजताच घरी जेवायला जायचे, पण आज रविवार. मुलगा, सुन घरी असणार. स्वयंपाकाला जरा उशिरच होतो. त्यांना सुट्टी… मग आरामात उठणे.. त्यानंतर नाश्ता.. मग स्वयंपाक.

सोमवार पेठेत त्यांचा वडिलोपार्जित वाडा होता. बहुतेक सर्व जुने भाडेकरू. मालकाच्या.. म्हणजे त्यांच्या ताब्यात जेमतेम अडिच खोल्या. त्याही आता जिर्ण झालेल्या.

लाकडी जिना चढून राजाभाऊ वरती आले. कठड्याला धरून जरा वेळ थांबले. हल्ली  त्यांना दम लागायचा. आतला संवाद ऐकून ते जागीच थबकले.

“मला काय वाटते मिनु,आपण अजून एक दोन वर्षे थांबुया.” हा आवाज राहुलचा होता.

“नाही हं. एक दोन म्हणता म्हणता चार वर्ष झाली. तुझी कारणं चालुच असतात.”… मीनु जरा चिडुनच म्हणाली.

“माझं ऐकायचच नाही असंच तु ठरवलयं का? दादांना काय वाटेल?आईचा काही विचार केलास?”

“आता मी या पडक्या वाड्यात रहाणार नाही. चार वर्ष राहिले. खूप झालं. नील आता दोन वर्षाचा झालाय. त्याची शाळा सुरू होण्याच्या आत मला इथुन निघायचंय. या असल्या वातावरणात मी त्याला इथे ठेवणार नाही”.

राहुल चिडलाच मग. “या असल्या वातावरणात म्हणजे? आम्ही नाही राहिलो? अदिती नाही राहिली? अगं फार काय.. लग्नाच्या आधीचे दिवस आठव. माहेरचं घर म्हणजे काय फार मोठा महाल लागुन चाललाय का?विसरलीस का ते दिवस?”

राहुलचा आवाज वाढला.. तसे राजाभाऊ आत आले. त्यांनी राहुलला शांत केलं.

“सुनबाई, समजतं मला.. तुमची इथे अडचण होते. तु फ्लॅट घ्यायचा विचार करतेय ना? मग घेऊ की आपण फ्लॅट. मी काही मदत करीन. सर्वांनी मिळुन जाऊ नवीन घरात.”

मीनु जरा शांत झाली. आणि खरंच.. पुढच्याच आठवड्यात राहुल आणि मिनलने फ्लॅट चे फायनल केले. गंगापूर रोडवर आनंदवल्लीच्या पुढे एक टाऊनशिप तयार होत होती. त्यात काही फ्लॅटस् उपलब्ध होते. फ्लॅट बुक करायला ते दोघे राजाभाऊंना घेऊन गेले. फ्लॅट बुक झाला. येताना त्यांनी नवश्या गणपतीपुढे पेढे ठेवले. येत्या दिवाळीत ताबा मिळणार होता.

राजाभाऊ खुष होते. त्यांना पण अलीकडे वाटु लागले होते की, बस झाले हे गल्लीतील आयुष्य. आपल्या आजुबाजुला बघीतले की त्यांना जाणवायचं.. बरोबरीचे बरेच जण गल्ली सोडून गेले. बहुतेक जणांचे फ्लॅट झाले. ज्यांनी फार पुर्वी प्लॉट घेतले त्यांचे तर बंगलेसुध्दा बांधून झाले. आपण मात्र आहे तिथेच आहोत. अदिती, राहुलचे शिक्षण.. त्यांची लग्ने यातच बरीचशी पुंजी खर्च झाली. 

भद्रकाली परीसरात त्यांचे टेलरिंगचे दुकान होते. मिळुन मिळुन मिळणार तरी किती? अडचणी तर कायम दार ठोठावतच होत्या. त्यातुनही मार्ग काढला. ललितानेही साथ दिली. आता साठी जवळ आली. गावाबाहेर, मोकळ्या वातावरणात, मोठ्या खोल्यांमध्ये उर्वरित आयुष्य जाणार. अजून काय पाहिजे आपल्याला या वयात? आपल्याच मनाशी बोलत ते स्वप्न पाहु लागले.

2 बी.एच.के.चा प्रशस्त फ्लॅट सहा महिन्यात ताब्यात मिळाला. फर्निचरचे काम सुरू झाले. एक दिवस रात्री जेवताना राहुलने विषय काढला. “दादा, आम्ही पाडव्याला शिफ्ट होतोय”.

“आम्ही म्हणजे…?”

“आम्ही म्हणजे.. आम्ही तिघे. मुहूर्त पण चांगला आहे.”

“अधुनमधून येत जा ना तुम्ही आईंना घेऊन.” मीनु म्हणाली.

राजाभाऊंची बोलतीच बंद झाली. काय, कसे विचारावे त्यांना कळेचना.

“अरे,पण आपले तर ठरले होते…”

त्यांना पुढे बोलु न देता मीनलने सुत्र हातात घेतली. “ठरले होते दादा.. आपण सर्वांनी जायचं, पण मीच सांगितले राहुलला.. आई दादांना ईथेच राहु दे म्हणून. तुम्हाला इकडची.. गावात रहायची सवय आहे ना. तुम्हाला नाही करमणार तिकडे”.

“अगं,असंच काही नाही” त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला.

“नाही.. तसे येत जा ना तुम्ही अधुनमधून. नीलला भेटायला”.

काही बोललेच नाही राजाभाऊ. भ्रमनिरास झाला त्यांचा. किती स्वप्न रंगवली होती त्यांनी नवीन जागेची. जेवण करून बाहेर गॅलरीत येऊनही उभे राहिले. पराभूत मनस्थितीत. ललिताबाई मागे येऊन उभ्या राहिल्या.

“सांगत होते तुम्हाला.. पैसे देऊन टाकु नका. मागीतले तरी होते का त्यांनी? त्यांचे ते समर्थ होते ना जागा घ्यायला. तुम्हालाच फार हौस नवीन जागेची. जी काय गंगाजळी होती, ती पण गेली”.

राजाभाऊ ऐकत होते… आणि नव्हतेही.

पाडव्याचा मुहूर्त बघून राहुल, मीनल ..नीलला घेऊन नवीन जागेत गेले. फक्त कपडे नेले त्यांनी. बाकी सर्व इथेच ठेवले. वाड्यातील त्या दोन अडीच खोल्यात फक्त राजाभाऊ आणि ललिताबाई राहिल्या.

भद्रकालीत टेलरिंग शॉप होते, पण आता काही फारसा धंदा होत नव्हता. रेडिमेडच्या जमान्यात कपडे शिवायला कोण येणार? आणि तेही राजाभाऊंकडे. तेही आता थकले होते. फारसे काम होत नव्हते. आयुष्यभर मशीन चालवून गुडघे पण आताशा दुखत. दोघांपुरते कसेबसे मिळे. अजून तरी मुलाकडे हात पसरायची वेळ आली नव्हती. अपेक्षा होती…. म्हणावे राहुलने.. ‘दादा तुम्ही आता काही करू नका. दोघेजण आरामात रहा फ्लॅटवर.’ पण ते त्यांच्या नशिबी नव्हते.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओली भेळ आणि गेलेली वेळ…! — लेखिका : सुश्री रमा ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

? जीवनरंग ?

☆ ओली भेळ आणि गेलेली वेळ…! — लेखिका : सुश्री रमा ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

खूप दिवसांनी पक्याचा फोन… 

“नाक्यावर भेट, सत्याच्या भेळ कट्ट्यावर… सगळेच येतोय…”

सलग तीन दिवस सुट्टी आली होती… घरात जाम सडलो होतो. मॅच, वेब सिरीज सगळं पाहून झालं, पोटभर झोप काढून झाली, चवीचवीचं खाऊन झालं, तरी कंटाळा आला होता… आत्ता पक्याचा फोन आला आणि अंगात एकदम तरतरी आली !

बायकोला सांगून निघणार इतक्यात छोटी चिमणी आडवी आली… “बाबा, तू आज मला बागेत नेणार होतास, आता नको जाऊ बाहेर!”

“नेक्स्ट संडे जाऊ नक्की हां…” हे मी म्हणता क्षणीच भला मोठा भोंगा सुरू झाला.

मग बायको आडवी आली, “कशाला चिमूला उगाच प्रॉमिस करतोस? आज मला पण बाहेर पाणी पुरी खायला घेऊन जाणार होतास… दोन दिवस झाला ना आराम? साड्यांच्या एक्झिबिशनला पण घेऊन जाणार होतास!”

“नेक्स्ट संडे नक्की…”

“गेला महिना भर हेच सांगतोय तू…!” डोळे वटारून बायको करवादली, बॅकराऊंड ला भोंगा सुरूच होता.

“आम्ही मित्र किती दिवसांनी भेटत आहोत गं…”

“मॅच पाहायला आत्ता दहा दिवसांपूर्वी एकत्र जमला होतात ना…?”

बाकी कुंडली बाहेर यायच्या आत वटारलेले डोळे आणि चिमणा भोंगा दोन्हीकडे दुर्लक्ष करून मी पळ काढला.

भेळ कट्यावर आलो… सत्या भेळेच्या दुकानात गिऱ्हाईक सांभाळत होता. बाहेरून मी तोंडाने ‘टॉक’ आवाज करून त्याला बोलवलं.. 

“बस कट्ट्यावर… येतो अर्ध्या तासात…”

मी एकटाच लवकर आलो होतो. अजून कुणी चांडाळ जमले नव्हते. मी सुकी भेळ घेऊन आलो… मनात सत्या दिवसाला कसा आणि किती छापत असेल याचा हिशोब मांडत बसलो.

सुट्टीमुळं दुकान भरलेलं होतं. सत्या, त्याचा भाऊ आणि बापू फुल्ल खपत होते…

इतक्यात एक आज्जी-आजोबा आले. आजोबांचं वय अंदाजे ७० आणि आजीचं ६५ असावं. आजीला त्यांनी दुकानाच्या गर्दीत न बसवता माझ्या इथं मोकळ्या कट्ट्यावर बसवलं. 

“बाळा, मी आत जाऊन भेळ सांगून येतो. जरा हिच्याकडे लक्ष ठेवशील का?”

“हो… या…” इती मी.

मनात विचार आला… ‘वा ! काय हौस आहे भेळ खायची आजी आजोबांना… इथे आपण बायकोला अजून टांग मारतो!’

आजी शून्यात बघत बसल्या होत्या. चेहरा एकदम निर्विकार. आजोबा आले आणि आजीशी गप्पा मारायला लागले. पण आजीच्या चेहऱ्याची रेष हालेल तर शपथ…

“आज त्याला सांगितलंय… दाणे घालू नको, तुला त्रास होतो ना चावायला, जास्त कोथिंबीर, जास्त शेव पण घालायला सांगून आलोय. येईलच सत्या भेळ घेऊन हां…” आजोबा  आजीच्या हातावर थोपटत बसले. पण आजी एकदम फ्रीझ मोड मध्येच.

तितक्यात मिल्या आणि विक्या आले. एकेक कटींग मागवून आमच्या गप्पा सुरू झाल्या…

सत्यशील छोट्याशा द्रोणात भेळ घेऊन आला. ती त्यानं आजोबांना दिली, त्यांना वाकून नमस्कार केला, “आजी भेळ खाऊन आवडली का सांग गं!” असं काही बोलून आम्हाला जॉईन झाला. 

सत्या कस्टमर्सशी इतकी सलगी का दाखवत होता, हे आम्हाला समजलंच नाही. सत्याचं हे रूप आम्हाला नवीनच होतं. खुणेनं मी त्याला ‘काय हे?’ असं विचारलं, तेव्हा “आई आली की सांगतो,” म्हणाला मग आम्ही पण जास्त विचारत बसलो नाही.

आमच्यात सगळ्यात अतिशहाणा मिलिंद होता… चहा पित फिदीफिदी हसत म्हणाला, “काय राव रोमँटिक आहेत आजोबा… दोघं एका द्रोणात भेळ खातायत!”

सत्यानं त्याला जोरात चिमटा काढून गप केलं. पण आजोबांनी ऐकलंच आणि त्याला जवळ बोलावलं… 

“अरे बाबा, करायच्या वेळी रोमान्स केला असता तर काय हवं होतं रे? आज ही वेळ कदाचित आलीच नसती… पण एक लक्षात ठेव, आपल्याला माहीत नसेल, तर आपण काही बोलू नये!”

मिलिंद एकदम वरमला. आजीच्या नजरेतला तो निर्विकार भाव पाहून मिल्या अस्वस्थ झाला. मिल्यानं माफी मागितली आणि आमच्या कंपूत सामील झाला.

सत्यानं आणि मी मिलिंदला चागलं झापलं. तितक्यात सत्याई सत्याच्या बापूला घरचा चहा घेऊन आली. 

प्रेम करण्यात या बायकांचा हात कुणी धरू शकत नाही… भेळेच्या दुकानाशेजारी चहाची टपरी आहे, पण सत्याई, बापूला घरचाच चहा आवडतो, म्हणून घरून चहा करून आणते. सत्याच्या आईला आम्ही ‘सत्याई’ म्हणत असू. 

सत्यानं आईला हाक मारली आणि त्या आजी आजोबांची गोष्ट आम्हाला सांगायला सांगितली. मग सत्याईनं जे सांगितलं ते सगळं अचंबित करणारं होतं!

आजोबांचं नाव अविनाश भोळे… नाव ऐकून आम्ही एकदम चमकलो! भोळे कंपनीच्या उदबत्त्या, धूप, लोबान आजही घराघरात वापरले जात होते. आमच्या लहानपणापासून आम्ही घरात ‘A.B.’ कंपनीच्याच उदबत्या वापरल्यात… ते हे भोळे…? 

सत्याई सांगत होती… 

भोळे आजोबांचा तेव्हा एक छोटासा धंदा होता. आजोबांचं लग्न उषा आजीशी झालं आणि आजोबांना त्यांच्या धंद्यात एकदम यश मिळायला लागलं. कामानं आणि यशानं एकदम वेग घेतला. लग्नानंतरचे नवतीचे दिवस फुलपाखरू बनून उडून गेले. 

सुरुवातीला आजोबा जमेल तसा वेळ आजीला द्यायचे. पण हळू हळू सगळं बदलत गेलं… आजोबांना कामाची, यशाची, पैशाची झिंग चढत गेली.

बघितलं तर सगळं आलबेल होतं. लक्ष्मी घरी पाणी भरत होती. सुबत्ता होती, पण सगळं गोड असून कसं चालेल ना! यात वाईट एकच गोष्ट अशी होती, की आजीची कूस उजवत नव्हती… आजी या दु:खात होती आणि आजोबाही कामात खूप गुंतत गेले होते. त्यांना सुद्धा या गोष्टीची खंत होती पण ते कामात मन गुंतवून घेत होते. आजी मात्र हा मानसिक त्रास एकटी सहन करत होती.

आजी मनापासून आजोबांचं सगळं करायची… खाण्या पिण्याच्या वेळा, आवडी निवडी… पण आजीलाही काही इच्छा असतील, ती मातृसुखासाठी आसुसलेली आहे, मनानी कष्टी आहे, तिलाही काही हवं नको पाहायला हवं, वेळ द्यायला हवा, हेच आजोबा विसरले होते. 

आणि एक दिवस चमत्कार झाला… आजीला बाळाची चाहूल लागली ! आजीला वाटलं आता तरी आजोबा वेळ देतील, पण आता आजोबांना कामापुढे काही सुचत नव्हतं.

घरी काळजी घेणार मोठं कुणी नव्हतं. एक मुलगी त्यांनी आजीची काळजी घ्यायला सोबत आणून ठेवली होती. पण आजीला आजोबांची गरज होती. आजोबा म्हणायचे, “आता छोटे भोळे येतील, तर व्यवसाय अजून वाढवूयात…” ते सतत काम-काम-काम हाच जप करायचे. 

यातच आजीला सतत आंबटचिंबट खायचे डोहाळे लागले.. सोबतीची मुलगी हवं ते बनवून देई, पण एक दिवस आजीनी हट्ट केला की तिला बाहेरचीच ओली भेळ खायचीय!

आजोबा म्हणाले, “घरी बनवून खा.” 

आजी म्हणाली, “नाही खाणार.” 

आजोबा म्हणाले, “घरी आणून देतो!”

आजी म्हणाली, “तशी नाही खाणार… आपण सोबत जाऊन एकाच ताटलीत बाहेरच खायची…!” 

महिना झाला… आजीला आजोबा ‘आज जाऊ’, ‘उद्या जाऊ’ करत होते.

एक दिवस आजी हट्टालाच पेटली. रड रड रडली… “नाही नेलं आज तर आत्ताच माहेरी निघून जाईन, परत येणार नाही,” म्हणाली.

हे शस्त्र उपयोगी ठरलं. आजी एका संध्याकाळी गजरा माळून, सजून धजून तयार राहिली, पण आजोबा आलेच नाहीत! आजींनी कामाच्या ठिकाणी टेलिफोन केला तर आजोबा मीटिंग घेतायत असं कळलं… 

डोहळतुली बाई काही वेळा हळवी होते, काही वेळा चिडचिड करते. तिच्या मनाचे कल बदलत असतात.

आजोबा सांगून पण आले नाहीत याचा आजीला खूप राग आला… तिरीमिरीत आजी उठली, भलं थोरलं पोट घेऊन निघाली आणि उंबर्‍याला अडकून पडली…! क्षणात सगळं बिनसलं… होत्याचं नव्हतं झालं…!!!

आजी मरणाच्या दारातून परत आली… पण येणारा नवा जीव यायच्या आधीच देवाला प्यारा झाला! याचा आजीला भयानक मानसिक धक्का बसला. ती पडली तेव्हा डोक्याला वर्मावर मार बसला म्हणून, की बाळ गेलं हा मानसिक धक्का बसून, माहीत नाही… पण आजी ही अशी झाली!

तिची अनेक गोष्टींची पार ओळखच पुसली गेली. देव, यांत्रिक मांत्रिक, डॉक्टर, सगळं झालं, पण आजी अशी निर्जीव झाली ती आज पर्यंत. आजोबा या गोष्टीमुळं खूप हादरले… या सगळ्याला त्यांनी स्वतःला जबाबदार धरलं.

चाळीस वर्षांपूर्वीचा तो दिवस आणि आजचा दिवस… आजोबा आजीला महिन्यातून एकदा तरी भेळ खायला घेऊन येतात. त्यांना वाटतं कधीतरी भेळ खाऊन तिला जुनं काही आठवेल. तिला आपण आठवू, तिचा सगळा राग ती बाहेर काढेल. आजही ते म्हणतात… 

“देव मला इतकी कठोर शिक्षा देणार नाही… तिला एकदा तरी मी आठवेन!”

आजोबांकडे बघितलं तर आजोबा आजीला प्रेमानं एकेक घास भरवत होते.

“सत्याई, तुला कसं माहीत गं हे सगळं?” विक्यानं विचारलं.

“अरे, आजीला सोबतीला जी मुलगी ठेवली होती ना, ती मीच होते ! हे सगळं माझ्या डोळ्यासमोर घडलंय…!”

आम्ही सगळे वेगळ्याच मूड मध्ये गेलो होतो… मला एकदम तो चिमणा भोंगा आणि माझं वटारलेल्या डोळ्यांच प्रेम आठवलं…

“चल यार, मी निघतो… चिऊला बागेत आणि हिला पाणी पुरी खायला घेऊन जायचंय!”

आजी-आजोबाही भेळ खाऊन निघाले… सत्या आणि मी पटकन त्यांना आधार देऊन त्यांच्या गाडीपाशी सोडायला आलो. तितक्यात सत्याईनं एक चाफ्याचं फुल आणून आजीच्या अंबड्यात खोचलं. चाफा चाचपत आजी पहिल्यांदा एकदम गोड हसली. आजोबा पण त्यामुळे खुष झाले. 

दोघं गाडीत बसताना आजोबा म्हणाले, “मुलांनो, तरुण आहात, एक सांगतो… ऐका, वेळेला जपा… आज करायचं ते आजच करा! एकदा का वेळ गेली की गेली… मग आयुष्यात येतो तो फक्त यांत्रिकपणा…!” 

आणि आजीकडे बघत म्हणाले, “ओली भेळ कशी लगेच खाण्यात मजा, नंतर ती चिवट होऊन जाते! मला हे समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. म्हणून सांगतो… आयुष्यात योग्य वेळीच प्रत्येक गोष्टीला न्याय द्यायला हवा. उद्याची खात्री द्यायला आपण देव नाही… कायम ‘आज’ मध्ये जगा. चला निघतो, उषा दमली असेल आता !”

…. हे ऐकून डोळ्यात पाणी कधी जमा झालं, समजलंच नाही… पण सगळ्यांना ‘बाय’ करून मी सुसाट वेगानं घरी निघालो…

लेखिका : सुश्री रमा

संग्राहक : श्री मेघ:श्याम सोनावणे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोष ना कुणाचा… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दोष ना कुणाचा… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली.) – इथून पुढे — 

मुन्नीच्या घरी गेलो. तर मुन्नीची आई आणि भाऊ खुर्चीवर बसून कॉफी पित होते. मुन्नीच्या भावाकडे मी पाहत राहिले. अनोळखी तरुण मुलाकडे सतत पाहू नये हे माहीत असूनही त्याच्यावरुन नजर बाजूला करु नये असे वाटत होते. विलक्षण आकर्षण होते त्याच्यात. सरळ नाक, गोरा रंग, चेहर्‍यावर हुशारीची लकाकी आणि हसतमुख. मी पर्स उघडून गुलाबकळी बाहेर काढली आणि हळूच त्याच्या समोर धरली. त्याने माझ्याकडे पाहून स्मित केले आणि गुलाबकळी घेण्यासाठी हात पुढे केला. माझ्या बोटांना त्याच्या बोटांचा ओझरता स्पर्श झाला. त्याच्या बोटांचा स्पर्श होताच, सार शरीर थरारलं. पुरुषांचा स्पर्श घरीदारी होतच असतो. पण शरीरात अशी स्पंदने झाल्याचे कधी जाणवले नाही. मुन्नीच्या दादात काहीतरी विलक्षण जादू होती खरी. 

आणि मग मी या घरी कधी मुन्नीसोबत कधी एकटी जातच राहिली. मुन्नीचा दादा नेहमी कॉलेजात किंवा घरी असेल तेव्हा त्याच्या खोलीत बंद दाराआड अभ्यास करत असायचा. मला आता पक्के माहीत झाले होते, त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असेल तर तो घरी आहे, आणि त्याच्या खोलीचा दरवाजा उघडा असेल तर समाजव तो घरी नाही. मुन्नी खूपच लाडात वाढलेली. त्यामुळे तिचा घरात आरडाओरड चालायचा. मग मी तिला दटवायचे. दादाचा अभ्यास सुरु आहे ना, आवाज कमी कर. मुन्नीची आई गालातल्या गालात हसायची. 

मुन्नीच्या घरचा वातावरण मला आवडायचं. सर्वजण प्रेमळ आणि एकमेकांची थ्ाट्टा मस्करी करत रहायचे. मुन्नीचे बाबा फक्त रविवारी घरी असायचे. पण घरी असले की, दोन्ही मुलांसमवेत गप्पा, आपल्या धंद्यातल्या गोष्टी, मुलांचा अभ्यास, नातेवाईकांकडे जाणे असा मस्त कार्यक्रम असायचा. मुन्नीची आई म्हणजे मुन्नीची मैत्रीणच. मुन्नी आणि मुन्नीचा दादा आपल्या आईला कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींच्या गंमतीजमती सांगायचे आणि एकदम मोकळं वातावरण ठेवायचे. उलट आमच्या घरी हिटलरशाही. बाबा रागीट आणि हेकेखोर. त्यांच्यापुढे कुणाचे काही चालायचे नाही. आमची आर्थिक स्थिती यथातथाच. बाबा एका केमिकल कंपनीत केमिस्ट म्हणून नोकरी करीत होते. ते एकटेच मिळवणारे आणि आम्ही चारजण खाणारे. माझी आईमात्र कमालीची सोशिक. संसार काटकसरीने करणारी. तिचे सर्वगुण माझ्यात आहेत असे सर्वांचे म्हणणे. पण बाबांसमोर बोलायला मला भीती वाटते. त्यांनी एकदा निर्णय घेतला म्हणजे घेतलाच. आई बिचारी भांडण नको म्हणून पडतं घ्यायची. आमच्या घरच्या या कोंदट वातावरणामुळे मी मुन्नीच्या घरी वारंवार जायला लागले आणि कळायच्या आधी मुन्नीच्या दादाच्या प्रेमात पडले. मुन्नीचा दादा इंजिनिअर झाला आणि बेंगलोरला निघाला पण. माझे काळीज कासावीस झाले. आता तो नेहमी नेहमी दिसणार नाही हे समजत होते. पण मला वाटत होते. तो मला आपल्या प्रेमाबद्दल बोलेल. अगदी ट्रेन सुटेपर्यंत मला आशा वाटत होती. त्याच्या डोळ्यात माझे प्रेम दिसत होते. मग ओठांवर का येत नव्हते? 

मुन्नीचा दादा बेंगलोरला गेला आणि काही महिन्यात मुन्नी पुण्याला गेली. मी मुन्नीच्या घरी जातच राहिले. मुन्नीच्या दादाची खबरबात घेत राहिले. मला वाटायचे. मुन्नीची आईतरी मला विचारेल? ती पण गप्प होती. मी मुलगी, आपल्या संस्कृतीत मुली असे उघड उघड प्रेम दाखवतात का? केव्हा केव्हा वाटत असे, मी नोकरी करणारी नाही म्हणून मुन्नीचा दादा माझा विचार करत नाही की काय? हल्ली सर्वांना नोकरीवाली बायको हवी असते. मुन्नीचा दादा आपले प्रेम व्यक्त करील यासाठी जीव आसूसला होता. तीन महिन्यांपूर्वी मुन्नीची आई म्हणाली, अगं वल्लभ कंपनीत असिस्टंट मॅनेजर झाला. आता एक्सटर्नल एम.बी.ए. करतोय. तेव्हा मात्र मी मनात घाबरले. हा असाच शिकत राहणार असेल तर माझे काय?

आमच्या घरी गेली दोन वर्षे माझ्या लग्नाचा विचार सुरु होता. मी गप्पच होते. पण गेल्या आठवड्यात पुण्याच्या मावशीने तिच्या पुतण्याचे म्हणजेच विनोदचे स्थळ आणले. आणि सर्वजण हुरळून गेली. आईवडिलांचे म्हणणे सोन्यासारखा मुलगा आहे. असा नवरा मिळणे म्हणजे मिताचे भाग्य. माझ्या इतर मावश्या, मामा यांचे हेच म्हणणे. मी विनोदला कोणत्या तोंडाने नाही म्हणणार होते. वल्लभ कडून निश्चित काही कळत नव्हते, किंवा वल्लभची आई ठोस काही बोलत नव्हती. माझ ‘मौनम्’ हिच सम्मती समजून आईबाबा तयारीला लागले सुध्दा. मी मुन्नीला फोन करुन माझे लग्न ठरतयं हे कळविले. म्हटलं वल्लभकडून किंवा वल्लभच्या आईवडिलांकडून काही हालचाल होते का हे पहावे. दोन दिवस वाट पाहून काल शेवटी वल्लभच्या घरी गेली. आईना सर्वकसे गडबडीत ठरते हे सांगत होते. आता लग्न करुन पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियाला जावे लागणार हे सांगताना डोळ्यातून पाणी वाहू लागले. एवढ्यात खोलीचा दरवाजा उघडून वल्लभ बाहेर आला. एक क्षणभर त्याची आणि माझी नजरानजर झाली. रात्रभर झोप न झाल्याने ताठरलेल्या डोळ्यांनी त्याने माझ्याकडे पाहिले. माझ्याकडे दुर्लक्ष करुन आईना बँकेत जाऊन येतो असे म्हणून तो निघाला. आईने त्याला हाक मारुन, मिता लग्नाचे सांगायला आली रे वल्लभ असे म्हणाली. आणि बाहेर पडणारा वल्लभ मागे आला. आणि ‘‘अभिनंदन’’ असे म्हणून धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडला. 

– आई –

काल मिता आणि विनोद यांचे लग्न झाले. मुन्नी मैत्रिणीच्या लग्नासाठी मुद्दाम पुण्याहून आली. मी मुन्नीच्या बाबांना एक दिवस घरी थांबायला सांगितले. आणि आम्ही तिघेही लग्नाला गेलो. मुन्नी कार्यालयात गेली ती मिताच्या खोलीत तिची लग्नाची तयारी करायला. लग्नात मिताच्या शेजारी विनोदला पाहताना खूप त्रास होत होता. मुन्नीचे बाबापण गप्प गप्प होते. लग्नाच्या मंगलाष्टका सुरु झाल्या आणि मला वाटले या आनंदाप्रसंगी मला आता हुंदका येणार. कसे बसे रडू आवरले. मिता विनोदला भेटायला स्टेजवर गेलो. मला पाहताच मिता गळ्यात पडली. तिच्या डोळ्यातील दोन अश्रू माझ्या खांद्यावर पडले. आम्ही तिला अहेर केला आणि निघालोच. बाहेर पडून गाडी स्टार्ट करता करता हे म्हणाले, मला वाटलं होतं, वल्लभचं मिताशी लग्न होईल. हे असे कसे झाले ? मी म्हटले, वल्लभच्या मनात मिता होतीच. पण तो करियरच्या मागे लागला. मिताला तो गृहित धरुन बसला. आता दुखावलाय. मिताने तरी किती वाट पाहायची. प्रेमात पुरुषाने पुढाकार घ्यायला नको? तो तुमच्यावर गेलाय. मन मोकळ करावं माणसाने. नुसतं शिक्षण, शिक्षण… मिता किती दिवस वाट पाहिल याची?

मुन्नीचे बाबा शांतपणे गाडी चालवत होते, घरी येईपर्यंत कोण कोणाशी बोलले नाही. घरी आल्यावर कपडे बदलले. आणि बेडवर शांतपणे डोळे मिटून पडले. पहिल्यांदा मुन्नीसोबत आलेली १५-१६ वर्षाची मिता ते आज लग्नात शालू घातलेली मिता, मिताची अनेक रुपे डोळ्यासमोर आली. फार काहीतरी गमावलयं अशी हुरहूर मनाला लागून गेली. यात माझे काही चुकले का? या दोन तरुण मुलांची मने ओळखून मी पुढाकार घ्यायला हवा होता का? का नाही मी वल्लभला मिताबद्दल विचारले आणि मिताला वल्लभबद्दल? आता पुढे वल्लभ काय करील? विसरेल का तो मिताला आणि मिता वल्लभला ?

होय, वल्लभ आणि मिताप्रमाणे माझेपण चुकलेच. आता ही हुरहूर आयुष्यभर मन पोखरणार. त्रिकोणाच्या दोन बाजू तयार होत्या तिसरी बाजू त्याला जोडण्याची गरज होती. 

मी कुस बदलली आणि उशीत डोकं खूपसून रडू लागले.

— समाप्त —

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोष ना कुणाचा… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ दोष ना कुणाचा… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती. आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.) – इथून पुढे – 

शेवटी बेंगलोरला जायचा दिवस उजाडला. माझी सायंकाळची ६ ची ट्रेन होती. सकाळपासून मिता आमच्याकडेच होती. आईला जेवणात मदत कर, माझी कपडे इस्त्री करुन दे, माझ्या बुटांना पॉलीश कर. मिता नुसती धावत होती. शेवटी दुपारी ४ वाजता मी, आई, मुन्नी आणि मिता टॅक्सी करुन निघालो. बाबा परस्पर सीएसटी स्टेशनवर येणार होते. मी एवढ्या लांब जाणार म्हणून आई फार नर्व्हस झाली होती. टॅक्सीत सर्वजण गप्प गप्प होते. टॅक्सी स्टेशनवर पोहोचली, मिताला माझ्या दोन्ही हॅण्डबॅग खांद्याला लावल्या. मी एक सुटकेस घेतली. मिताने आईला आणि मुन्नीला घ्यायला काहीच सामान ठेवले नाही. गाडी लागलेली होती. माझ्या आधी मिता गाडीत चढली आणि बर्थ नंबर शोधून माझे सामान बर्थवर लावलेसुध्दा. आई म्हणाली, ‘‘मुन्नी ती मिता किती चटपटीत बघ, नाहीतर तू. ’’ मुन्नीला पण लटका राग आला. हो, हो, मिता चटपटीत आणि मी आळशी. बसवून ठेव मिताला मांडीवर. सर्वजण खूप हसलो.

गाडी सुटायची वेळ झाली आणि मी सोडून सर्वजण खोली उतरले. मला सर्वजण खिडकीतून हात दाखवत होते. मी पाहिलं, मिता रडवेली झाली होती. पर्समधील छोटा रुमाल हलवत होती परत डोळ्यांना लावत होती. मी मुन्नीला आणि मिताला म्हणालो, आईबाबांना सांभाळा गं. आणि गाडी सुटली. गाडी बरोबर मिता धावत धावत रुमाल दाखवत होती. गाडीचा स्पीड वाढला आणि प्लॅटफॉर्मवर आई, मुन्नी आणि मिता लांब लांब दिसायला लागली.

मी बेंगलोरला आलो. कंपनीने जागा दिली होती. कंपनीत जीव तोडून काम केले. पदोन्नती मिळत होती. मुंबईला सहा महिन्यानंतर जात होतो. दरम्याने मुन्नी आणि मिता ग्रॅज्युएट झाल्या. मुन्नीला संस्कृतमध्ये पी. एच्. डी. करायचे होते म्हणून तिने पुणे युनिव्हरसिटीमध्ये अ‍ॅडमिशन घेतले आणि ती पुण्याला गेली. मिता अभ्यासात यथातथाच होती. ग्रॅज्युएशननंतर तिने शिक्षण थांबविले आणि तिच्या आवडत्या कथक नृत्यामध्ये तिने जीव झोकून दिला. मी बेंगलोरमध्ये आणि मुन्नी पुण्याला. बाबा नेहमी प्रमाणे त्यांच्या व्यवसायात. आई घरी एकटी होत होती. पण मिता सकाळ संध्याकाळ घरी येऊन सर्वकाही पाहत होती. आईला घेऊन बाजारात जाणे, डॉक्टरकडे जाणे, बारीकसारीक सर्व गोष्टी मिताच पाहत होती. मिता आईजवळ येऊन जाऊन असते म्हणून मी आणि मुन्नी निर्धास्त होतो. मी मुंबईत आलो कि, मिता तिच्या क्लासची वेळ सोडून आमच्या घरी येत होती. माझ्या आवडीचे पदार्थ घरात शिजत होते. माझ्या खोलीत आवडती पुस्तके, कॅसेट ठेवली जात होती. पण मी मुंबईत जास्त काळ राहू शकत नव्हतो. आत फक्त एक वर्ष. एम. बी. ए. पुरे करावे आणि मिताला लग्नाचे विचारावे. मी तिचा होकार गृहित धरला होताच पण….

काल मी मुंबईत आलो, आणि आईने मिताच्या लग्नाची बातमी सांगितली आणि मी सटपटलो. आईने सांगितलेली हकिकत अशी, तिच्या मावशीने हे स्थळ आणले. मुलगा मावशीचा पुतण्या. गेली चार वर्षे ऑस्ट्रेलियात असतो. इंजिनिअर आणि देखणा. एकुलता एक मुलगा. नकार देण्यास काही कारणच नव्हते म्हणे.

संपूर्ण रात्रभर मिताला प्ाहिल्यांदा पाहिले त्यापासून आतापर्यंतचा काळ चित्रपटासारखा समोर येत होता. या कुशीवरुन त्या कुशीवर होत रात्रभर जागा होतो. आयुष्याची जोडीदार म्हणून मिताशिवाय कुणाचा विचारच केला नव्हता. आता पुढे काय? ओळखीच्या अनेक मुली मिताच्या जागेवर उभ्या करुन पाहिल्या. पण छे. माझं मन समजणारी मिता म्हणजे मिताच. तिची जागा दुसरी कुणीच घेऊ शकत नाही.

पुरी रात्र न झोपता मी अंथरुणातून बाहेर पडलो. चहा घेताना आई माझ्याकडे पाहून म्हणाली, अरे वल्लभ चेहरा असा काय? डोळे किती लाल. रात्रभर झोपला नाहीस की काय? काल मिताच्या लग्नाची बातमी ऐकलीस तेव्हापासून तू बेचैन झालास. अरे गोष्टी वेळच्यावेळी कराव्यात रे. मग पश्चाताप करुन काय उपयोग? चहा घेऊन मी उठलो आणि बाहेर जायची आवराआवर करु लागलो. एवढ्यात बेल वाजली. आईने दरवाजा उघडला. अग मिता, ये ये आत. मुन्नीने बातमी कळविली. पण तू केव्हा सांगणार म्हणून वाट पाहत होते. बस, बस, वल्लभ आलाय काल. आठ दिवसांची रजा घेऊन आलो म्हणाला, पण काल रात्रौ म्हणाला, उद्या रात्रौ म्हणजे आजच्या रात्रीच्या विमानाने निघणार. इथे आल्यानंतर काहीतरी बिनसलं त्याच. ’’ मी माझ्या खोलीतून आईचे बोलणे ऐकत होतो. ‘‘तुम्हाला आधी कळविले नाही. मुन्नीच्या आई राग मानू नका, सारे कसे अचानक झाले. ’’ मिताचा रडवेला आवाज मला ऐकू आला. ‘‘मावशीने माझ्या आईला तिच्या पुतण्याबद्दल विचारले. तो ऑस्ट्रेलियाहून आलाय आणि लग्न करुनच जाणार म्हणाली, आईबाबा एवढे खूश झाले की मला हो नाही विचारण्याची संधी न देता सर्व काही ठरवून मोकळे. माझा काही निर्णय होत नव्हता तो पर्यंत लग्नाची तारीख, हॉल सर्वकाही ठरवून झाले. ’’ आता मिताचे हुंदके मला स्पष्ट ऐकू येत होते. मला काय वाटले कोण जाणे. तिरमिरीत खाड्कन माझ्या खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर पडण्याच्या दरवाजाजवळच आई आणि मिता बोलत होत्या. रडवेली मिता मला पटकन सामोरी आली. तिच्याकडे दुर्लक्ष करुन मी आईला म्हणालो, आई मी बँकेत जातो. मी बाहेर पडणार एवढ्यात आई म्हणाली, अरे वल्लभ, मिता तिच्या लग्नाचे सांगायला आली रे.. मी चटकन मागे आलो आणि जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहून ‘‘अभिनंदन’’ म्हणालो, आणि धाड्कन दरवाजा लावून बाहेर पडलो. बाहेर आलो. पोर्चमध्ये जाऊन किल्लीने गाडीचा दरवाजा उघडला. आत बसलो. गाडीचा दरवाजा, खिडक्या सर्व बंद केल्या आणि स्टिअरिंगवर डोके ठेवून ओक्साबोक्सी रडू लागलो.

– मिता –

धाड्कन दरवाजा बंद करुन वल्लभ बाहेर चालता झाला. मला माझे अश्रू आवरतच नव्हते. मुन्नीच्या आईने मला जवळ घेतले. योग्य वेळी मन मोकळं करावं गं मिता. एकदा वेळ सटकली की हळहळण्या शिवाय हातात काही राहत नाही. माझं रडू काही आवरत नव्हतं. शेवटी मुन्नीच्या आईला, येते म्हणून सटकले. आता कसला निर्णय घेण्याची क्षमता आहे का माझ्यात? बाबा कालपासून आमंत्रणे द्यायला नातेवाईकांकडे जाऊन आले सुध्दा. मनात असेल तर वल्लभने आणि वल्लभच्या आईने पुढाकार घ्यायला नको? 

चार दिवसापूर्वी तिला पाहून गेलेला मावशीचा पुतण्या विनोद आठवला. खरच त्याच्यात काहीच दोष नव्हता. सुशिक्षित, उमदा, देखणा, स्थिरस्थावर सर्व काही उत्तम. पण वल्लभ….

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला मुन्नीची ओळख झाली आणि तिच्या बडबड्या स्वभावामुळे ती मैत्रीणच झाली. एक दिवस ती फार आनंदात होती. म्हणाली, माझ्या दादाला व्हि. जे. टी. आय. मध्ये अ‍ॅडमिशन मिळाली. त्यांच्या एवढ्या मोठ्या कॉलनीत प्रथमच. तिच्या घरी फार आनंद होता म्हणे. मना म्हणाली तू चल आमच्या घरी. मी तिच्या घरी जायला निघाले. तिच्या दादाचे कसे अभिनंदन करावे? असा विचार करताना कॉलेजमधल्या आवारात पिवळ्या गुलाबावर कळी फुलली होती. कोणी पाहत नाही हे पाहून हळूच ती खुंटली आणि पर्समध्ये टाकली.

– क्रमशः भाग दुसरा 

 © श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
image_print