मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आनंदी दिवाळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ आनंदी दिवाळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

आठवणींच्या पणत्यांनी,

उजळत जाई माझी दिवाळी!

बालपणीच्या रम्य जीवनाची,

सुबक उमटते मनी रांगोळी!

 

स्वस्त आणि मस्त खरेदी,

करीत होते मन आनंदी !

छोट्या छोट्या आठवणींची,

मन कुपीत भरली धुंदी !

 

तारुण्याच्या मस्ती मधली,

होती दिवाळी आनंदाची !

सुखी परिवारासह मनी दाटली,

दिवाळी होती ती सौख्याची!

 

फुलबाज्या अन् रंग-बिरंगी,

अनार झाडे उडली अंगणात!

दिवाळी आमच्या आयुष्यात,

करी आनंदाची बरसात !

 

आनंदाचा अंक तिसरा ,

अनुभवत आहे जीवनात!

सर्वांचा आनंद पहाता,

आनंदी दिवाळी राहो हृदयांत!

 

© सौ. उज्वला सहस्रबुद्धे

वारजे, पुणे (महाराष्ट्र)

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिवे…. ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दिवे…… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

ती ;

पहाटेच्या अंधारात

शेणानं सारवून अंगण.

शेणानंच साकारलेल्या

शेणगोळ्याच्या गवळणीतले

तिच्या हृदयातून उमटलेले

अंगणातले सौंदर्य,

आणि

संस्कृतीचे धागे जतन करत रहायची .

त्यातच खोलगटलेल्या

दिव्याच्या प्रकाशात

तिचं समाधान लकाकून जायचं.

अंगणभर पसरलेल्या,

अंधुकशाच प्रकाशात

तिची दिवाळी उजळत रहायची.

अंगणातल्या चुलीवर पाणी तापवायची.

लेकराबाळांना अंघोळ घालायची.

नव्या धडूत्यांच्या सुवासात

नातवंडं भरून पावायची.

तिच्या हातच्या कानवल्यातलं सारण

असं टचटचीत भरून सांडायचं अंगणभर.

फुलबाजांच्या सुरसुऱ्यात,

तिची दिवाळी

अशी प्रत्येक वर्षी खुलून यायची.

………….

आज

थरथरत्या हातांनी

आणि

खोल गेलेल्या डोळ्यांनी,

वाट पहात

ती ;

अंगण न उरलेल्या

रित्या घरात

उजळवत राहतेय

आता ;

तिच्यापुरतेच दिवे …!

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाऊबीज ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ भाऊबीज  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कार्तिकात द्वितीयेला

आली आली भाऊबीज

म्हणे बहिण भावाला

जरा आसवात भीज.. . . !

 

भाऊ बहीणीचा सण

औक्षणाचा थाटमाट

आतुरल्या अंतरात

भेटवस्तू पाहे वाट. . . . !

 

दोन घास जेवूनीया

आशिर्वादी मिळे ठेव

दीपोत्सव ठरे सार्थ

आठवांचे फुटे पेव. . . . !

 

किती दिले किती नाही

हिशोबाचा नाही सण

एकमेकांसाठी केले

आयुष्याचे समर्पण. . . . !

 

अशी स्नेहमयी वात

घरोघरी  उजळावी.

मांगल्याची भाऊबीज

मनोमनी चेतवावी.. . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कधी न केली.. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ कधी न केली.. ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

कधी न केली अशी वल्गना

सूर्यकुलाशी माझे नाते

मात्र येथल्या तमात माझे

दीपक मिणमिण तेवत होते !

 

कभिन्नकाळी रात्र परंतू

उष:कालही उजळत होता

कुणास ठावुक कसा परंतू

सूर व्यथांशी जुळला होता !

 

म्हणून स्पंदन नि:श्वासांचे

निरंत माझ्या कवनी होते

भिजुन चिंब त्या व्यथावनातुन

शब्द शब्द हे ठिपकत होते !

 

मला न कळले माझ्या देशी

कसा कधी मी उपरा झालो

नकाशातले गाव हरपले

कवनांच्या मग रानी आलो !

 

शब्दसाधना, शब्दच सिद्धी

पंचप्राण जणु शब्द जाहले

आत्मरंजनी जराजरासे

विश्वरंजनी थोडे रमले !

 

ओंजळीत या समुद्रतेचा

चुकून यावा अंश जरासा

अक्षरांस या अक्षरतेचा

चुकून व्हावा दंश जरासा !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 79 – फटाके ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 79 – फटाके ☆

हवे कशाला उगा फटाके

ध्वनी प्रदूषण वाढायला।

जीव चिमुकले,  प्राणी पक्षी

वाट मिळेना धावायला ।

 

आनंदाचा सण दिवाळी,

सारे आनंदाने गाऊ या।

मना मनातील ज्योत लावूनी,

आज माणूसकीला जागू या।

 

दीन दुखी नि अनाथ बाळा,

नित हात तयाला देऊ या।

अंधःकारी बुडत्या वाटा,

सहकार्याने उजळू या।

 

रोज धमाके करू नव्याने,

कुजट विचारा उडवू या।

ऐक्याचे भूईनळे लावूनी,

आनंद जगती वाटू या।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हेतू … ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ हेतू…. ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆ 

बोलले काही कुणी, …विसरून जा

त्यातला हेतू जरा …समजून जा

 

गर्द ओला मेघ होऊनी दयेचा

‘चातकां’साठी सदा …बरसून जा

 

उंबरा ओलांडुनी ये अंगणी तू

या ऋतूंनी वाळुनी…बहरून जा

 

भेट होण्याला तुझ्या संगे तुझी रे

एकदा गर्दीत या …हरवून जा

 

वादळांनी लक्तरे झाली तरीही

तू निशाणा सारखा …फडकून जा

 

हुंदके दाबून अश्रू झाकुनी ते

गांजल्या.. दुःखी जगा …हसवून जा

 

हार-जीताचा नको आनंद..चिंता

जीवनाचा हा लढा …लढवून जा

 

क्रंदते आहे तिथे कोन्यात कोणी

दो घडीसाठी तरी…थबकून जा

 

माणसांची ही मने; ओसाड राने

गाव स्वप्नांचे तिथे …वसवून जा

 

आडवे आले कुणी, थांबू नको रे

तू प्रवाही; आपणा …वळवून जा

 

शोध सोडूनी सुखाचा; भेटलेल्या

तू सुखे ‘दुःखा’ उरी… कवळून जा

 

आपल्यांचा; ना फुलांचा ही भरोसा

आपली तू पालखी …सजवून जा

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाडवा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ पाडवा  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कार्तिकाची प्रतिपदा

येई घेऊन गोडवा.

दीपावली दिनू खास

होई साजरा पाडवा. . . . !

 

तेल, उटणे लावूनी

पत्नी हस्ते शाही स्नान.

साडेतीन मुहूर्ताचा

आहे पाडव्याला मान. . . . !

 

रोजनिशी, ताळमेळ

वही पूजनाचा थाट

येवो बरकत घरा

यश कीर्ती येवो लाट. . . . !

 

सहजीवनाची  गाथा

पाडव्याच्या औक्षणात

सुख दुःख वेचलेली

अंतरीच्या अंगणात.. . . . !

 

भोजनाचा खास बेत

जपू रूढी परंपरा.

व्यापारात शुभारंभ 

नवोन्मेष स्नेहभरा.. . . . !

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आयुष्याचा उत्सव व्हावा…. ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ आयुष्याचा उत्सव व्हावा ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे

ध्यास असावा नित नूतनाचा उगा कशाला झुरणे

लावीत जावे मनामनातून आनंदाचे झाड

धडपडताना जपत रहावे मूल मनातील द्वाड.

 

कशास बुरखे विद्वत्तेचे कशास आठ्या भाळी

वाचियले ते कुणी कधी का लिहिले काय कपाळी

फुलवित जाव्या चिवटपणाने स्वप्नफुलांच्या वेली

उगारील जो हात,तयाच्या हातावरती द्यावी टाळी.

 

असतील,नसतील सुंदर डोळे;तरी असावी डोळस दृष्टी

ज्याच्या त्याच्या दृष्टीमधूनी दिसेल त्याची त्याची सृष्टी

शोधित असता आनंदाला कधी न व्हावे कष्टी

मर्म जाणतो तोच करीतसे सुख सौख्याची वृष्टी.

 

वाट वाकडी असली तरीही सरळ असावे जाणे

काट्यामधूनी,दगडामधूनी जावे सहजपणाने

शोधित जाता ताल सुरांना सुचतील मधुर तराणे

आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ लक्ष्मी पूजन ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव ?

☆ लक्ष्मी पूजन  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

अमावस्या  अश्विनाची

दिवाळीचा मुख्य सण

अंधाराला सारूनीया

प्रकाशात न्हाते मन. . . . !

 

धनलक्ष्मी सहवास

घरी नित्य लाभण्याला

करू लक्षुमी पूजन

हवे सौख्य  जीवनाला… !

 

धन आणि अलंकार

राहो अक्षय टिकून

सुवर्णाच्या पाऊलाने

यावे सौख्य तेजाळून.. . . !

 

प्राप्त लक्षुमीचे धन

हवा तिचा सहवास

तिच्या साथीनेच व्हावा

सारा जीवन प्रवास. . . . !

 

सुकामेवा ,  अनारसे

फलादिक शाही मेवा

साफल्याची तेजारती

जपू समाधानी ठेवा.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 85 – फराळ..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #85 ☆ 

☆ फराळ..! ☆ 

(दिवाळी निमित्त खास छोट्या दोस्तांसाठी.. बालकविता…!)

आई म्हंटली दिवाळीला

फराळ करू छान

फराळात चकलीला

देऊ पहिला मान..!

 

गोल गोल फिरताना

तिला येते चक्कर

पहिलं कोण खाणार

म्हणून घरात होते टक्कर..!

 

करंजीला मिळतो

फराळात दुसरा मान

चंद्रासारखी दिसते म्हणून

वाढे तिची शान..!

 

एकामागून एक करत

करंजी होते फस्त

फराळाच्या डब्यावर

आईची वाढे गस्त..!

 

साध्या भोळ्या शंकरपाळीला

मिळे तिसरा मान

मिळून सा-या एकत्र

गप्पा मारती छान…!

 

छोट्या छोट्या शंकरपाळ्या

लागतात मस्त गोड

दिसत असल्या छोट्या तरी

सर्वांची मोडतात खोड..!

 

बेसनाच्या लाडूला

मिळे चौथा मान

राग येतो त्याला

फुगवून बसतो गाल..!

 

खाता खाता लाडूचा

राग जातो पळून

बेसनाच्या लाडू साठी

मामा येतो दूरून..!

 

चटपटीत चिवड्याला

मिळे पाचवा मान

जरा तिखट कर

दादा काढे फरमान..!

 

खोडकर चिवडा कसा

मुद्दाम तिखटात लोळतो

खाता खाता दादाचे

नाक लाल करतो…!

 

दिवाळीच्या फराळाला

सारेच एकत्र  येऊ

थोडा थोडा फराळ आपण

मिळून सारे खाऊ..!

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares