मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नातं… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

नातं… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

नात्यास आपल्या जरीही,

रुढ नाव कोणतेच नाही.

तरी  कसे निक्षून सांगू,

आपल्यांत नातेच नाही.

भान ठेऊ अंतराचे,

जे आजही रुंदावले.

थंडावले आवेग सारे,

मनोवेगही मंदावले.

मेघ कांही भरुन आले,

आत्ताच ते बरसून गेले.

मागमूस अवघे पुसोनी,

आकाश माझे स्वच्छ झाले.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #219 ☆ जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 219 ?

जोखड आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

जीवन सोपे झालेले पण जगणे अवघड आहे

गायीचा मुडदा पडतो ती होता भाकड आहे

पैशाच्या मोहापायी मज भवती जमले सारे

पण श्वास थांबला नाही दाखवली रोकड आहे

सण आनंदाचा होता उत्साही होते सारे

मी ईद मुबारक म्हणता घाबरला बोकड आहे

खाणीत कोळशाच्या मी अन् तो आहे सोन्याच्या 

मी गुहेत अंधाराच्या का खेळत धुलवड आहे

जीवनदाते जेथे त्या जागेला किंमत येते

श्रावण बाळाच्या हाती सोन्याची कावड आहे

झाडावर जागा होती पिल्लाला रुचली नाही

त्या जुनाट घरट्याचीही झालेली पडझड आहे

शेतात राबतो आहे डोईवर कपास त्याच्या

बैलाच्या खांद्यावरती अजूनही जोखड आहे

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ युगसाक्षी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ युगसाक्षी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

(एकाक्षरी यमक.)

थांबूनी घे विसावा मना क्षणभरी

सावली इथे वृक्षाखाली उन जरी.

सहारा माणसा ओळखून घे तरी

थकवा निभावून नेती ही वल्लरी.

बघ सळसळ पाने धैर्य पांघरी

दुपार नत् रणरणती उदरी.

फडफड पंखांची घरट्यात परि

चाहुल पिलांना मानवी वाटे बरी.

सोबतीस क्वचित वार्याची झुंबरी

मनतृप्त सुख क्षणी डोले अंबरी.

बीज अंकुरले शाखेत भरजरी

माणसा तु प्रेम करशी निसर्गावरी.

पांग फेडिल युगायुगांची साक्ष खरी

थांबून घे विसावा मग चाल ती दुरी.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मुंबईची जीवनरेखा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– मुंबईची जीवनरेखा… – ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

पदोपदी चालतो

जगण्याचा  हा संघर्ष |

धक्काबुक्की खात,

लोटती वर्षामागून वर्षं |

लोकल ट्रेन सेवा,

मुंबापुरीची लाईफ लाईन |

ती आहे म्हणूनच,

कामधंदा चालतो फाईन |

घड्याळाच्या काट्यावर,

मुंबई मेरी जान धावते |

लोकलची वेळ गाठायाला,

मुंबई वायू गतीने पळते |

दिवसागणिक गर्दी तिच्यात,

वाढता वाढत  आहे |

तुडुंब भरलेल्या डब्यात,

चाकरमानी दिवस काढत आहे |

भार तिचा हलका व्हायला,

मोनो-मेट्रो जन्मल्या बहिणी |

दोघींचीही तिच्याचप्रमाणे,

होत चालली आहे कहाणी |

ऑन ड्युटी RPF-स्ट्रेचर हमाल,

कोणीतरी गेला हे ऐकून कळते |

कोणा कुटुंबाचा आधार तुटला,

कुठेतरी मन त्यांच्याप्रती काकूळते |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनात माझ्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मनात माझ्या… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

फूल एक घमघमते आहे मनात माझ्या

जगणे ‘ते’ दर्वळते आहे मनात माझ्या

 

रखरखणारा वास्तवतेचा ग्रीष्म जरीही

झाड तुझे सळसळते आहे मनात माझ्या

 

उत्सवांस त्या टाळत आलो नेहमीच मी

भुके कुणी तळमळते आहे मनात माझ्या

 

जगतो आहे उदासीन मी मौनी होउन

बाळ गुणी अवखळते आहे मनात माझ्या

 

नयनमनोहर जरी किनारा; रेतीवरची

मासोळी तडफडते आहे मनात माझ्या

 

काळरात्र वादळी जीवनी जन्मापासुन

स्वप्न-उषा झगमगते आहे मनात माझ्या

 

जरी निवारा..थंडाई..ना चैन जिवाला

दुपार ‘ती’ धगधगते आहे मनात माझ्या

 

कसा दिगंती झेपावू या घरट्यामधुनी

विध्द पिलू फडफडते आहे मनात माझ्या

 

तुझ्या स्मृतींच्या येतिल धारा गर्जत..नाचत

नभ काळे गडगडते आहे मनात माझ्या

 

अडसर आहे नित्य आपल्यांचा…दैवाचा

खंत हीच ठसठसते आहे मनात माझ्या

 

ऐल..पैल..तू..मी.. आता, तरिही निर्झरशी

ओढ जुनी खळखळते आहे मनात माझ्या

 

घाव तुझा तो भरून येण्याजोगा नाही

दु:ख नित्य भळभळते आहे मनात माझ्या

 

शांत..सुखाने कसा जगू मी कळे न मजला

रोज नवे चळवळते आहे मनात माझ्या

 

जाऊ नको हस-या या चेह-यावर माझ्या

सर अश्रूंची झरते आहे मनात माझ्या

 

लाख सुखे भेटली तरीही फिकीच आता

रे कविता अवतरते आहे मनात माझ्या

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 155 ☆ हे शब्द अंतरीचे… बंध जीवनाचे…!!  ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 155 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… बंध जीवनाचे…!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

(अष्ट-अक्षरी…)

कसे आयुष्य असावे

याचा विचार करावा

शांत वृत्ती मन शुद्ध

संग चांगला असावा…!!

संग चांगला असावा

क्षण इथे महत्वाचा

वेळ थांबत नाहीच

घ्यावा माग अनेकांचा…!!

घ्यावा माग अनेकांचा

दृष्टी असावी सोज्वळ

मित भाष्य प्रेमभाव

मनी नसावे कश्मळ…!!

मनी नसावे कश्मळ

स्नेह भावना जपावी

घ्यावा निरोप सप्रेमे

अशी तयारी असावी…!!

अशी तयारी असावी

राज माझ्या मनीचे

उक्त केले सहज मी

जपा बंध जीवनाचे…!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – ज्ञान योगिनी…– ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

सौ. अलका ओमप्रकाश माळी

?  कवितेचा उत्सव ?

☆ – ज्ञान योगिनी… – ☆ सौ. अलका ओमप्रकाश माळी ☆

स्त्री शिक्षणाची उघडूनी कवाडे..

मार्ग दाखविला तू ज्ञानाचा..

सोबतीने जोतिबाच्या..

गिरविलेस तू अक्षरांचे धडे

प्रसार करण्या स्त्री शिक्षणाचा..

झिझविलेस तू आयुष्य सारे..

खुल्या करुनी प्रकाश वाटा..

दूर केलास तू अंधार अज्ञानाचा..

पचविलेस तू दुःख अपमानाचे

हलाहल..

सहन करुनी कष्ट सारे फुलविले

तू ज्ञानाचे कमळ..

नाव तुझे ग असे सावित्री..

निश्चयाची तू ग जणू योग मूर्ती…

हाती देऊनी लेखणी..

जागविलास तू आत्मविश्वास..

तुमच्या मुळेच हो सावित्रीबाई..

घेतोय आज हा मोकळा श्वास..

स्त्री शिक्षणाचा देऊनी हा

अमूल्य ठेवा…

जागविलास तू स्वाभिमान स्त्री मनी..

देऊनी आत्मविश्वासाची लेखणी..

गुरुदक्षिणा काय देऊ ग तुला माऊली..

तू तर तेजोमयी ज्ञान योगिनी..

शब्द सुमनांची ही आदरांजली

वाहते ग माऊली तुझ्या चरणी..

तू दिलेला हा वसा जपेन निरंतर..

राहिल ना आता कोणी स्त्री निरक्षर..

 

© सौ. अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ती परत आली! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 😅 ती परत आली ! 🙆‍♀💃 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

आली गुलाबी थंडीला

पुन्हा एकदा लहर,

सुरू केला बघा तिने

परत तिचा कहर !

 

बाहेर काढा तुंम्ही

स्वेटर आणि शाली,

ऊब घ्या तयांची

मऊ मऊ मखमली !

 

आता घसरले आहे

इतके काही टेंपरेचर, 

करून टाकले तिने

मुंबईचे महाबळेश्वर !

 

पेटतील गावोगावी

आता रोज शेकोट्या,

सारे जमून करतील

आनंदाने “पोपट्या”!

 

बेभरोशी हवामानाची

पाहून अशी गती,

कुंठली आहे सध्या

मानवाची “मंद” मती !

 

पण

 

आपणच बघा मोडले

पर्यावरणाचे कंबरडे, 

आता रोज रोज मरे

त्याला कोण बरं रडे ?

त्याला कोण बरं रडे ?

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “स्वप्न असेही…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “स्वप्न असेही…” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

एकेक साडी उलगडताना

स्वप्न  विक्रीचे उमलून येते

तशीच साडी फेकली की

विस्कटून तयाच्या  मागे पडते

महिला साड्या पहातातच

अगदी निरखून आणि पारखून

नकार देत आणखी दाखवा

म्हणतात सारखे आवर्जून 

एकामागून  एक घडी येते

नकार घेऊन  मागे पडते

पडलेल्या साड्यांचा ढीग.. 

.. त्याची उंची वाढतच जाते

ढिगाखाली  आपसूकच 

विक्रेत्याची अपेक्षा घुसमटते

एवढ्या साड्या पाहूनही जर 

महिला तशीच उठून  जाते

आणि विक्रेत्याच्या चेहऱ्यावरती

हताशाच केवळ उरते  

तरीही उमेदीने परत घड्या घालतो

कारण ती त्याला परत परत

उलगडून दाखवायची असते …… 

…कुणातरी एकीला आवडेपर्यंत 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नववर्ष  शुभेच्छा… ☆ सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

नववर्ष  शुभेच्छा… ☆ सौ. गौरी गाडेकर

गत वर्षाने दिधले, नेले,

तरीही उरले हाती

आयुष्याच्या माळेमध्ये

 अनुभवांचे मोती

क्षणामागुनी क्षण धावती

 दिवसही येती जाती

दान म्हणुनी देती ओंजळीत

सोनसळी ती नाती

2024 साठी शुभेच्छा!

© सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print