मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आई धावत ये … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ आई धावत ये … ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

!!  श्री  !!

तूची माता तूची त्राता | देवी अंबाबाई |

तुझ्या दर्शना आलो आई | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

तुझी ओढ मना अनिवार | दर्शनासी झालो अधीर |

ऐकुनी माझी ही साद | आई सत्वरी दे प्रतिसाद |

सर्व समर्पित तुझ्या ठायी | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

हाके सरसी धावत येसी | भक्तवत्सले अंबाबाई |

लेकरांसी दुखवीत नाही |अगाध माया तुझी ग आई|

किती तुला मी विनवू आई | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही ||

☆ 

संकटांचा पडला घाला | जीव किती हा घाबरला |

दुःखविमोचिनी तू गे आई | तुझ्याविना जगी त्राता नाही |

एकची आस उरली | धावत ये लवलाही |

आई धावत ये लवलाही || 

☆ 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #144 ☆ नवविधा भक्ती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 144 – विजय साहित्य ?

☆ नवविधा भक्ती ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

चराचरी सर्वव्यापी, आदिमाया आदिशक्ती

नवदुर्गा नऊरुपे, करूं नवविधा भक्ती. ॥धृ॥

गुण संकीर्तन करू, नाम तुझे आई घेऊ

करू लिलया श्रवण, अंतरात भक्ती ठेऊ.

करूं श्रवण कीर्तन, दूर ठेवोनी आसक्ती…..॥१॥

करूं स्मरण अंबेचे, माय भवानी वंदन

दोन कर ,एक शिर,भाळी भक्तीचे चंदन

आदिशक्ती चरणांत, मिळे भवताप मुक्ती….॥२॥

सत्य, प्रेम ,आनंदाने,करू पाद संवाहन

आई माझी मी आईचा, प्रेममयी आचरण

परापूजा, मूर्तीपूजा, पूजार्चर्नी वाहू भक्ती….॥३॥

शब्द कवड्यांची माळ, दास्य भक्ती स्विकारली

आदिमाया आदिशक्ती, मनोमनी सामावली

नवरात्री उपासना, मनी धरोनी विरक्ती….॥४॥

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नवरंगी नवरात्र ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

? कवितेचा उत्सव ?

☆ नवरंगी नवरात्र… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रंग पांढरा पावित्र्याचा,

 लेऊन आली जगी शारदा!

नवरात्रीच्या रंगांमध्ये,

रंगून जाती साऱ्या प्रमदा!

 

जास्वंदीसह लाल रंगी,

 दुसऱ्या दिवशी देवी सजली!

रक्तवर्णी हा सडा शिंपीत,

मांगल्याची उधळण झाली!

 

आकाशासम निळे वस्त्र ते,

 लेऊन आली तिसऱ्या दिवशी!

व्यापून टाकी अंबर सारे ,

  रूप देवीचे  विशालाक्षी !

 

शेवंतीचा रंगही पिवळा,

  मोहक अन् उत्साही !

चौथ्या दिवशी देवी येई,

 करुनी शृंगार तो शाही!

 

चैतन्याचा रंग हिरवा,

  सृष्टीचा शालूच असे !

नवरात्रीचा दिवस पाचवा,

,सस्य शामल मूर्ती दिसे!

 

राखाडी, करड्या, रंगाचे, 

 वस्त्र तिचे गांभीर्य दाखवी!

रूप देवीचे शांतगंभीर,

 सहाव्या दिवशी मन रमवी!

 

वैराग्याचा रंग केशरी,

  खुलून दिसे देवीला!

नवरात्रीचे रूप देखणे,

 उजळे सातव्या माळेला!

 

प्रेमळ सात्विक  रंग गुलाबी,

  वस्त्र शोभे लक्ष्मीला!

अष्टमीच्या देवीचा हा,

   मंदिरी रात्री खेळ रंगला!

 

उत्साहाचे प्रतिक जणू असे,

  रंग गडद जांभळा !

अंबेच्या नवरात्री रंगी ,

  आनंद मिळे आम्हा आगळा !

 

नऊ दिवसाचे नवरात्र संपले,

 दहन करू दुष्ट रावणाचे !

सीम्मोलंघन  करुनी लुटुया,

  सोने आपट्याच्या पानाचे!

 

दसरा येई वाजत गाजत,

 आनंदाचे घेऊन वारे !

दीपावलीच्या स्वागतासही,

  सज्ज होई घरदार हे सारे!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #128 – नवं घर…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 128 – नवं घर…! ☆ श्री सुजित कदम ☆

जेव्हा शब्द..

समुद्राच्या लाटांसारखे

वागू लागतात..

तेव्हा तू समजून जातेस

शब्दांचा मनाशी चाललेला

पाठशिवणीचा खेळ..!

पण मी मात्र..,

शब्दांची वाट पहात

बसून राहतो

तासनतास

कारण….

मला खात्री आहे

शब्द दमल्यावर

ह्या को-या कागदावर

मुक्कामाला नक्की येतील..!

कारण शब्दांनाही हवं असतं

को-या कागदावरचं हक्काचं

असं ..नवं घर..!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 151 ☆ दोन अश्रू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 151 ?

☆ दोन अश्रू… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

पहाटे मोबाईल वाजला…..

  “अरूणा मुखर्जी”

     नाव वाचलं….

आणि काळजात धस्स !

नव्वदी ओलांडलेल्या ,

मावशींचं काही बरंवाईट??

 

क्वचितच कधीतरी

               फोन करणा-या

                या मावसबहिणीनं                                                                                                   –                    

               सांगितलं, 

“अगं दादा चा अॅक्सिडेंट झाला”

            पुन्हा..

                  कधी??

 इतकं च बोलले मी….

 

पुढचं वाक्य होतं–

                  “आणि त्यात तो गेला…

                 सव्वा महिन्यापूर्वी…

तुला कळवायचं राहून गेलं!”

 

            ”  अं…

             अहो, दोन महिन्यांपूर्वी

              येऊन गेले माझ्या कडे

                      अचानकच !”

 

             “हो,असं ब-याचजणांना

                       भेटून गेला तो-

               कोण कोण सांगत होते”

 

” विना हेल्मेट बाईक वरून

             जात  असताना ,

                उडवलं कोणीतरी…

               डोक्याला मार लागला. “

              ……

मला दादांची शेवटची भेट

      आठवत राहिली……

एका मोठ्या अपघातातून

 बरे होऊन ते

माझ्या घरी आले होते!

“मी आता

व्यवस्थित बरा झालो,

वाॅकर, काठी शिवाय

 चालू शकतो!

जिना ही चढू शकतो!”

 

जिना चढून, उत्साहाने पाहिली त्यांनी,

टेरेस वरची बाग !

 

खाद्यपदार्थांची 

आणि चहाची तारीफ करत,

    मनसोक्त गप्पा…

हास्य विनोद…

 

प्राध्यापक….

   जवळचा नातेवाईक…

      मावसभाऊ….

    कोण गेलं??

 

वयाच्या शहात्तराव्या वर्षी

विना हेल्मेट बाईक वरून

   जाताना अपघाती मृत्यू…..

     इतकीच नोंद,

  संपलं  एक  अस्तित्व!

   नाती दूर जातात..

नाहीशी होतात…

     “सारे घडीचे प्रवासी!”

 

हीच तर जगरहाटी!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वरलता ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

सुश्री त्रिशला शहा

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वरलता ☆ सुश्री त्रिशला शहा ☆

(जन्मदिवस निमित्त)

भारतमातेच्या शिरपेचातील

एक हिरकणी लखलखणारी,

साऱ्या जगाला व्यापून उरली,

होती नभीची शुक्रचांदणी,

स्वर तिचा होता अद्वितीय,

गळ्यात वसला होता गंधार खरोखर,

अवघ्या जनतेला पडला त्या स्वरांचा मोह,

वैराण जीवनातही ठरला संजीवन,

अंगाईने बाल्य जोजविले,

प्रेमगीतातून तारुण्य फुलले,

भक्तीरसाने वार्धक्य रिझविले,

भैरवीचे सूर आसमंती निनादले,

तिच्या स्वराने सुवर्ण उधळले,

मनामनात मोहर उमलले,

भारताची ती स्वरसरीता,

अभिमान आहे आम्हा तयाचा,

पदवी मिळाली तिज गानकोकिळा,

पुरस्कारांचा वर्षाव नुसता,

जन्मदिन आज त्या भारतरत्नाचा,

अभिवादन माझे

त्या लतादिदींना… 🙏🏻

 

© सुश्री त्रिशला शहा

मिरज

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चाल… ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ चाल… ☆ श्री आशिष मुळे ☆

उगारलेल्या व्याघ्रसुळयाला अग्र भाल्याचे भिडले पाहिजे

शेकोटीच्या ज्वाळेमध्ये मुख सापाचे पोळले पाहिजे

माणसाने पुढे चाललेच पाहिजे।  

 

पोटातल्या अग्नीलाही शेत हिरवे दिसले पाहिजे

अस्मानीच्या जळालाही छप्पर झोपडीचे अडले पाहिजे

माणसाने पुढे चाललेच पाहिजे।  

 

अज्ञानाच्या अंधकारात निरांजन शब्दांचे लावले पाहिजे

ज्ञानाच्या प्रखर तेजात निःशब्द अंतर्मुख झाले पाहिजे

माणसाने पुढे चाललेच पाहिजे।  

 

भोळ्याभाबड्या भक्तांना समज स्वत्वाची आली पाहिजे

परंपरेच्या पाईकांना बदलाची गरज कळली पाहिजे

माणसाने पुढे चाललेच पाहिजे।  

 

दगड मार्गीचे मागच्यासाठी खडयासारखे सारीले पाहिजे

उद्याच्या लढाईसाठी बळ लहान्यांना वाटले पाहिजे

माणसाने पुढे चाललेच पाहिजे।  

 

मनातल्या चातकाला अमृत कलेचे पाजले पाहिजे

थिजलेल्या हृदयाला चाल काव्याची दिली पाहिजे

माणसाने पुढे चाललेच पाहिजे।।  

© आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दातृत्व… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ दातृत्व… ☆ सौ. विद्या पराडकर ☆

रत्नाकराचया गर्भातून,गाभिर्याचे रत्न घ्यावे

धरित्रीचया उदरातून, औदार्याचे लेणे घ्यावे

 

काळ्या ‌काळया ढगांकडून, पर्जन्याच दान घ्यावे

मोठ मोठ्या वृक्षाकडून, समानतेचे बोध घ्यावे

 

जाईजुईचया फुलांपासून, धुंद मस्त सुवास घ्यावा

मृगोदरीतील कस्तुरीचा, दरवळणारा सुगंध घ्यावा

 

अंधार दूर करणारया,दिनपतीचे तेज घ्यावे

अष्टमीच्या चंद्रकिरणांपासून, अमृताचे कण‌ घ्यावे

 

निसर्गाने मुक्त हस्ताने, मानवाला देणे द्यावे

बदल्यात मानवाने निसर्गाचे दातृत्व घ्यावे.    

 

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ फार मस्त वाटतंय… ☆ कविता महाजन ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ फार मस्त वाटतंय… 

फार मस्त वाटतंय

थांबवताच येत नाहीय हासू

इतकं कोसळतय….इतकं..

नाचावसही वाटतंय

उडावसही

 

तू का असा,काही सुचत

नसल्यासारखा

पाहतो आहेस नुसता गप्प

खांबासारखा ताठ उभा राहून

काय झालय असं संकोचल्यासारख ?

 

खर तर तूही एकदा

पसरून बघ असे हात

घेऊन बघ गर्रकन गिरकी

 एका पायावर

विस्कटू दे केस थोडे विसकटले तर

 

बघ तर

तुझ्याही आत दडलं असेल

हसणं नाचणं उडणं

तुझ्या नकळत

 – कविता महाजन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #157 ☆ खडा मिठाचा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 157 ?

खडा मिठाचा

तो आकाशी भिरभिरणारा पतंग होता

रस्त्यावरती आला झाला भणंग होता

 

मठ नावाचा महाल त्याने उभारलेला

काल पाहिले तेव्हा तर तो मलंग होता

 

गंमत म्हणुनी खडा मारुनी जरा पाहिले

क्षणात उठला त्या पाण्यावर तरंग होता

 

काय जाहले भाग्य बदलते कसे अचानक

तरटा जागी आज चंदनी पलंग होता

 

चार दिसाची सत्ता असते आता कळले

आज गुजरला खूपच बाका प्रसंग होता

 

माझी गरिबी सोशिक होती तुझ्यासारखी

मुखात कायम तू जपलेला अभंग होता

 

घरात माझ्या तेलच नव्हते फोडणीस पण

खडा मिठाचा वरणामधला खमंग होता

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares