मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #160 ☆ संत निळोबा राय… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 160 ☆ संत निळोबा राय☆ श्री सुजित कदम ☆

संत तुकाराम शिष्य

सांप्रदायी वारकरी

संतकवी निळोबा  हे

विठू भक्त खरोखरी…! १

 

संत निळोबा धार्मिक

प्रती पंढरपुरात

सेवा भावी पांडूरंग

निळोबांच्या अंतरात…! २

 

अहमद नगरात

जन्म पिंपळ नेरात.

घोडनदी काठावर

सेवा राम मंदिरात…! ३

 

मनोभावे पूजा अर्चा

कुलकर्णी वतनात

पंढरीच्या वारीसाठी

रामराम वतनास….! ४

 

गुरू प्रती श्रद्धा भाव

सुरू केली देहू वारी

एकोणींशें अभंगांनी 

केली साहित्याची वारी…! ५

 

भक्ती भावना जागृत

बुक्का लावला कपाळी

बरा झाला रोग आणि

पांडुरंग नाम ध्यानी…! ६

 

भुला गाजरे पाटील 

झाला मुक्त रोगातून

दिली हरीनाम मात्रा

हरी भक्ती बुक्क्यातून..! ७

 

लग्नामध्ये लेकीच्या रे

राब राबलासे हरी

विठू गडी होऊनीया

वावरला लग्नघरी….! ८

 

निळोबांची ऐसी ख्याती

पांडुरंग चमत्कार

उभारले देवालय

प्रती पंढरी साकार…!९

 

निळोबांचे पंचप्राण

तुकाराम महाराज

समाधिस्थ होता तुका

 सोडी अन्नपाणी काज…! १०

 

संत निळोबा रायांना

पांडुरंग साक्षात्कार

संकीर्तन प्रवचनी

केला प्रचार प्रसार…! ११

 

आहे पिंपळ नेरात

संत निळोबा समाधी

पांडुरंग कृपा छाया

संत निळोबा उपाधी….! १२

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आई… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? आई… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल

बोट माऊलीचे करी

जणू सुकाणू हातात

बोट जीवनाची आता

तरणार प्रवाहात॥

करी कर कोणाचाही

कन्या अथवा पुत्रीचा

करी भलेच तयांचे

स्वभाव या ममतेचा॥

माया कधी न शिवते

स्वार्थाची तिच्या मनास

माया निर्मोही वृत्तीची

करी पुष्ट सकलांस॥

आजी तिने दिधलाहे

जीवनाचा मूलाधार

आजी होईल उद्या ती

व्हावा तिचा स्वप्नाधार॥

हस्त तिचा सदा सवे

त्यामुळे मी बलवंत

हस्त तिच्या वात्सल्याचा

बरसता मी श्रीमंत॥

देणे आई ईश्वराचे

आहे स्वर्गाहून थोर

देणे सुख तिच्या ठाई

तिच्यामुळेच माहेर॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 181 ☆ जाण… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 181 ?

💥 जाण… 💥 सुश्री प्रभा सोनवणे ☆

आपण खूप  हाका माराव्यात,

पण ओ देणारेच कोणी नसावे,

आपल्याला वेगळेच सांगायचे असावे

आणि समोरच्याने

भलतेच अर्थ लावावेत,

असे दु:ख तुमच्या वाट्याला,

कधी आले आहे का?

माणसांच्या कीर्र ऽऽ जंगलातून

वाट काढताना,

कुणीच भेटू नये आपले ?

जाणिवांचे ओझे आता

सोडून द्यावे समुद्रात,

तर समुद्रही दिसेना कुठे !

मला जाण येऊ लागली

आणि सारेच जाणते हद्दपार

या जंगलातून!

आता गेंड्याचे कातडे तरी

कसे पांघरायचे

सा-याच संवेदना जागृत झाल्यावर

आणि झोपेचे सोंग तरी

कसे घ्यायचे टक्क जागेपणी !

मी हाका मारणेही

सोडून देत नाही

आणि व्यक्त होणे ही …..

निदान एखादा प्रतिध्वनी तरी

कधी काळी येईलच ना माझ्यापाशी !

अनिकेत मधून… १९९७ नोव्हेंबर

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आभास… ☆ सौ.वर्षा सुभाष शिंदे ☆

सौ. वर्षा सुभाष शिंदे

अल्प परिचय  

शिक्षण – B.A.,B,Ed

29 वर्षांपासून प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. लेखन,वाचन,अभिवाचनाची आवड. गायनाची आवड आहे.

? कवितेचा उत्सव ?

☆ आभास… ☆ सौ.वर्षा सुभाष शिंदे ☆

तलम रेशमी तरल मखमली

पटल अलगद दूर सारूनी

स्वप्नात प्रिये गं विहरावे

धुक्याची पहाट तू होऊन यावे

 

तनुवरी तव दिसती खुलूनी

अलंकार दवबिंदुंचे रमणी

चंद्रवदन अन् आले फुलूनी

प्राचीच्या कोमल किरणांनी

 

नाजूक सुंदर अधरांमधूनी

कुंदकळ्या डोकावती

गौर गुलाबी गालांवरती

गुलाब लाल उमलून येती

 

कुंतलामधे काळ्या कुरळ्या

चांदण्या नभीच्या माळल्या

गाली हसता गोडशा खळ्या

सडा मोतियांचा पडला

 

छंद लागला तुझा जीवाला

जाहलो प्रेमात वेडा खुळा

आभास तुझा प्रिये मधुबाला

जीवनास व्यापूनिया उरला

 

© सौ. वर्षा सुभाष शिंदे

कोथरूड.

०९/११/२०२२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ओढ तीच अजूनही… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ ओढ तीच अजूनही… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

ओढ  तीच अजूनही

अजूनही तीच आस

क्षणोक्षणी, पानोपानी

तेच तेच तुझे भास

 

मनी आठव दाटतो

गंधाळले हे चांदणे

माझ्या तुझ्या भेटीचेच

सुखवती ते बहाणे

 

हास्य तुझे मधाळसे

लाजुनिया ते पाहणे

पावसाच्या धारांचे ते

चिंब चिंब भिजवणे

 

कडाडता नभी वीज

बिलगुनी मज  जाणे

चिंब तुझ्या कुंतलात

माझे तुझे प्रेमगाणे

 

वाऱ्यावरी सखे तुझे

केस मोकळे मोकळे

गंधमळे दरवळता

जीव माझा तळमळे

 

 दोन धृवांवरी जरी

आज दोघे विहरतो

कोंदणात मनाच्या ग

 सुगंधल्या  क्षणी न्हातो

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #187 ☆ ओठ कोरडे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 187 ?

☆ ओठ कोरडे…

दुष्काळाच्या सोबत मी तर नांदत होते

ओठ कोरडे घामासोबत खेळत होते

किती मारले काळाने या जरी कोरडे

काळासोबत तरी गोड मी बोलत होते

जरी फाटक्या गोणपटावर माझी शय्या

सवत लाडकी तिला दागिने टोचत होते

शिकार दिसता रस्त्यावरती डंख मारण्या

साप विषारी अबलेमागे धावत होते

उंबरठ्याची नाही आता भिती राहिली

नवी संस्कृती तिरकट दारा लावत होते

रक्त गोठले भांगेमधले कुंकू नाही

जखमा काही केसामागे झाकत होते

सरणावरती अता कशाला हवेय चंदन

दुर्भाग्याचा रोजच कचरा जाळत होते

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आळवावरचे पाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आळवावरचे पाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आयुष्य तसे तर लटके

आळवावरचे पाणी

पण गात जायचे असते

सुंदर असे आपले गाणे

 

गाताना सूर जुळावा

इतकेच हवे आपल्याला

पण झटतो उगाच सारे

जे नको तेच जपण्याला

 

हव्यास असा असतो की

जगण्याला विसरून जातो

पळत्याच्या लागून पाठी

मग धाव धावुनी थकतो

 

ही घुसमट आयुष्याची

असतेच सोबती आपल्या

ज्या हव्यात गोष्टी त्या तर

नाहीत कुणीही जपल्या

 

या जंगलातल्या वाटा

चकव्यानी भरल्या येथे

जायचे कुठे पण आता

टेकून आपले माथे

 

नाहीच कळाले काही

जगताना जगणे कसले

या वाटेवर वणव्याच्या

बघ भलेभले ही फसले

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 130 ☆ महाराष्ट्राची यशोगाथा- भव्य राष्ट्र माझा…☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 130 ? 

☆ महाराष्ट्राची यशोगाथा- भव्य राष्ट्र माझा… ☆

महाराष्ट्राची यशोगाथा

शब्दांत कैसी मांडावी

शूर विरांच्या, विरगाथा

लेखणीतून व्यक्त करावी.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

शब्द हे, अपुरे पडती

संत महंतांच्या भूमीत

देव ही, इथे अवतरती.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

संत परंपरा,  थोर लाभली

वीर शिवबा, इथेच जन्मले

मराठ्यांची, सरशी झाली.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

सत्पुरुषांची, मांदियाळी

महात्मा फुले, आंबेडकर-शाहू

अनेक थोर, भव्य मंडळी.!!

 

महाराष्ट्राची यशोगाथा

कणखर ह्या, पर्वत-रांगा

राज-भाषा, मराठी बोली

जैसी पवित्र, गोदा- गंगा

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गुलमोहोर… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ गुलमोहोर… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

वैशाखातली एक शुष्क कोरडी दुपार 

तरीही त्याला होती चैतन्याची किनार 

वस्तीत असूनही निर्जन झालेले रस्ते 

मजुरांच्या छातीचे हलणारे भाते 

होरपळणारी मने आणि घामाच्या धारा 

वरून आग ओकणाऱ्या सूर्याचा मारा 

अशा या वणव्यात तरीही कुठेतरी …. 

गुलमोहोराच्या झाडावर सूर्य सांडलेला 

जमिनीचा देह पाकळ्यांनी झाकलेला 

पानापानावर खुले रसरसलेले फूल 

नकळत मनाला पडत होती भूल 

भडकलेल्या ग्रीष्मात सजलेला देह 

उदासवाण्या मनाला तेजाचा मोह …. 

वणव्यातही फुलणं जमायला हवं 

गुलमोहोराचं सांगणं समजायला हवं ……      

© सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ तू… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

तुज देखता, न देखती नेत्र।

तुज ऐकता, न ऐकती श्रोत्र।

तुज स्पर्शता, न स्पर्शती गात्र।

संभ्रमित करिसी भक्तांसी॥१॥

 

तुज चिंतता, नुरे चित्तवृत्ती।

तुज आठविता, सरे विषयवृत्ती।

तुज आकळिता, विसरे देहवृत्ती।

कुंठित करिसी कर्माकर्मही॥२॥

 

तव नामा स्मरता, स्मरण विस्मरले।

तव नामरसा चाखता, अमृत फिके झाले।

तव नामोच्चारे, शब्द  निःशब्द केले।

नेसी मम वैखरी, मध्यमेतुनि पश्यन्ती॥३॥

 

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares