मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #159 ☆ वळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 159 ?

☆ वळ… ☆

शब्दांच्या फटक्याने

भावनेच्या पाठीवर उमटलेले वळ

तू कोर्टात कसे सिद्ध करणार ?

त्यांनं तुला दिलेल्या वेदना

हे कोर्ट मान्य करू शकत नाही

डोळ्यावर पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेला

लागतात कागदी पुरावे,

काळजावरच्या जखमा

कोर्ट कधीच ग्राह्य धरत नाही

आणि काळजावरील

शब्दांचे वार टिपणारा कॕमेरा

अजून तरी अस्तित्वात आलेला नाही

मग कसा सादर करणार पुरावा

आणि कशी होणार त्याला शिक्षा

केस मागं घे म्हणणाऱ्यांना शरण जाणं

किंवा

पुराव्याअभावी

होणारी हार स्विकारणं

या शिवाय दुसरा पर्याय नाही

जर त्याला तुला शिक्षाच द्यायची असेल

तर स्वतःला सक्षम करून

त्याच्याशी कुठेही दोन हात करण्याची ताकद

तुला निर्माण करावी लागेल…

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆तोरण ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तोरण ☆  प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

न्याय रक्षणा उभे ठाकले

शौर्य प्रभावी अभिमानाचे

सुंदर मंदिर पावित्र्याचे

राज्य हिंदवी शिवरायांचे

 

माय भवानी आणि जिजाऊ

पाठीराख्या दोन देवता

बीज पेरले मनात त्यांनी

वेड लावले स्वातंत्र्याचे

 

सह्यगिरीच्या कडे कपारी

हर हर महादेवाने घुमल्या

मर्द मावळे झाले गोळा

स्वराज्य ठरले स्थापायाचे

 

चांद्यापासून बांधण्याचीशीव

निशान भगवे फडकायाचे

किती प्रभावी ठरले होते

राज्य हिंदवी पण रयतेचे

 

रयतेचा तो रक्षण कर्ता

महाराष्ट्राला देव लाभला

रायगडावर स्वप्न नांदले

होते तेव्हा मानवतेचे

 

अन्यायाला पाजत पाणी

मुलुख मराठी पावन केला

विश्र्व आजही धडे गिरवते

शिवरायांच्या सात्विकतेचे

 

राज्य हिंदवी आदर्शाचे

पुन्हा आणखी होणे नाही

घरास तोरण बांधून जगतो

शिवरायांच्या आठवणींचे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 101 ☆ हे विश्वची माझे घर… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 101 ? 

☆ हे विश्वची माझे घर… ☆

हे विश्वची माझे घर

सुबुद्धी ऐसी यावी 

मनाची बांधिलकी जपावी.. १

 

हे विश्वची माझे घर

औदार्य दाखवावे 

शुद्ध कर्म आचरावे.. २

 

हे विश्वची माझे घर

जातपात नष्ट व्हावी 

नदी सागरा जैसी मिळावी.. ३

 

हे विश्वची माझे घर

थोरांचा विचार आचरावा 

मनाचा व्यास वाढवावा.. ४

 

हे विश्वची माझे घर

गुण्यगोविंदाने रहावे 

प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे.. ५

 

हे विश्वची माझे घर

नारे देणे खूप झाले 

आपले परके का झाले.. ६

 

हे विश्वची माझे घर

वसा घ्या संतांचा 

त्यांच्या शुद्ध विचारांचा.. ७

 

हे विश्वची माझे घर

सोहळा साजरा करावा 

दिस एक, मोकळा श्वास घ्यावा.. ८

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 123 – बाळ गीत – रिमझिम पावसाच्या सरी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 123 – बाळ गीत – रिमझिम पावसाच्या सरी ☆

रिमझिम पावसाच्या सरीवर सरी।

खेळात रंगल्या चिमुकली सारी।।धृ।।

पावसात मारती गरगर फे ऱ्या ।

म्हणती गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या।

मोठ्यांचा चुकवून डोळा सारी।।१।।

थेंब झेलती इवले इवले।

अंगही झाले चिंब ओले।

चिखलात पडती खुशाल सारी।।२।।

छत्रीची नसे कसली चिंता।

भिजू आनंद लूटती आता।

दप्तर घेऊनिया डोक्यावरी।।२।।

पावसात भिजण्याची मजाच न्यारी।

पायाने पाणी उडवूया भारी।

आईला पाहू थबकली सारी।।३।।

पोटात एकदम ऊठले गोळे।

रडून के ले लाल लाल डोळे।

आई ही हसली किमया न्यारी ।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मी राजा, तू राणी माझी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ मी राजा, तू राणी माझी… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

(एक वास्तव)

आठवते का? काय आपुले ठरले होते! लग्नानंतर पहिल्या रात्री ?

स्पर्श बावरा वारा होता, साक्षीला अन्,

खिडकीच्या कानात सुगंधी फाया होता रातराणीचा

लाज हरवली होती गगनी ताऱ्यांनीही,

मिठी अनामिक पडली होती, श्वासांनाही… आठवते का?

 

त्या भेटीतच रचले होते, उंच मनोरे, स्वप्न फुलांचे !

म्हणालीस तू, या काळाच्या वटवृक्षावर,

बांधू आपण घरटे सुंदर, असेल ज्याला नक्षत्रांची सुंदर झालर,

इंद्रधनुची कमान त्यावर, गारवेल अन्,

कौलारांवर, वेलींच्या वेलांट्या असतील,

आणि मनोहर, दोन पाडसे गोजिरवाणी, बागडतील मग साऱ्या घरभर,

मीही म्हणालो, “हो गं!” होईल सारे मनासारखे,

आणि सहेतुक, एक जांभई दिली खुणेची,

हसलीस तू, मग मिटले डोळे… आठवते का?

 

हळू लागलो कानी नंतर, सलज्ज वदली तूही मग ते –

चावट कुठले – मी नाही गं अधीरता ती,

आणि हरवली कुशीत माझ्या, रात्र लाजरी… आठवते का?

 

अशाच रात्री आल्या गेल्या, कुठे हरवल्या? कुणांस ठाऊक?

उरल्या केवळ आठवणी त्या – गंध हरवल्या निर्माल्यागत –

उभारले घरकुल आपुले – पण उघड्यावर,

नक्षत्रांची होती झालर, अधांतरावर,

आणि पाडसे गोजिरवाणी – हमरस्त्यांवर,

नित्य उद्याचे स्वप्न पाहिले, ज्या नयनांनी,

त्या नयनांच्या पाणवठ्यावर, व्यथा मनाच्या भरती पाणी,

घट भरतो अन् भविष्यात भटकते, पुन्हा ती, आस दिवाणी,

आणि बरे कां ! त्या आशेच्या साम्राज्याचा

मी राजा, तू राणी माझी ! …..

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #145 ☆ शब्द ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 145 – विजय साहित्य ?

☆ शब्द ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

शब्द  असा

शब्द तसा

सांगू तुला

शब्द कसा?

माणुसकीच्या

ऐक्यासाठी

पसरलेला

एक पसा. .. . !

 

शब्द  अक्षरलेणे

देऊन जातो देणे

ह्रदयापासून

ह्रदयापर्यंत

करीत रहातो

जाणे येणे. . . . !

 

शब्द  आलंकृत

शब्द सालंकृत.

मनाचा आरसा

जाणिवांनी

सर्वश्रृत.. . . . !

 

कधी येतो

साहित्यातून

तर कधी

काळजातून.. . !

 

शस्त्र होतो कधी

कधी श्रावण सर

शब्द म्हणजे

कवितेचे

हळवे ओले

माहेरघर.. . . .!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #129 – काळोख…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 129 – काळोख…! ☆ श्री सुजित कदम ☆

काल पर्यंत

अंधाराला

 घाबरणारी

माझी माय

आज

माझ्या

डोळ्यांच्या आत

मिट्ट काळोखात

जाऊन बसलीय…!

पुन्हा कधीही

उजेडात

न येण्यासाठी…!

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सीमोलंघन… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ सीमोलंघन… ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

सीमेवरती लढणा-यांचे स्मरण करूया जरा

ज्यांच्यायोगे सदैव आहे सुरक्षित ही धरा.

 

ओलांडून आपुल्या प्रदेशा

अलंकारूनी नव गणवेशा

पाठ फिरवता पाहत नाहीत पुन्हा आपुल्या घरा

 

कर्तव्याचे करण्या पालन

करण्या शत्रूचे निर्दालन

हासत हासत तळहातावर धरती अपुल्या शीरा

 

सीमोलंघन जगावेगळे

मायेचे ते पाश सोडले

लुटून सोने विजयाचे उजळती अपुला दसरा

 

विजयश्रीचा लावूनी टिळा

भारतभूचा माथा उजळा

तुम्ही सुरक्षित अपुल्या घरटी परतून या माघारा

 

सीमेवरती लढणा-यांचे स्मरण करूया जरा.

सीमेवरती लढणा-यांचे स्मरण करूया जरा.

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 152 ☆ चेतना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 152 ?

☆ चेतना… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

 कशी सांग आता करू अर्चना

करावी कशी सांग आराधना

 

तुझी मूर्त आहे मनीमानसी

असे प्रीत माझी खरी साधना

 

करू मी कशाला व्रते ,याचना

असे श्वास माझा तुझी प्रार्थना

 

 भवानी तुला काय मागू पुन्हा

तुला माहिती नेमक्या भावना

 

 असे स्वामिनी तू कुळाची सदा

  वसे नित्य देही तुझी चेतना

 

तुझी सेविका मी तुझी बालिका

महामाय,रक्षी अशा बंधना

 

उभा जन्म लाभो तुझी सावली

अखेरीस स्वीकार ही वंदना !!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #158 ☆ खट्याळ वारा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 158 ?

☆ खट्याळ वारा… 

दुसऱ्यासाठी भरून माझं मन येईल का ?

नभासारखं मातीत ते विरून जाईल का ?

 

कधीतरी या देहाच माझ्या झाड होईल का ?

तरूसारखी शीतल छाया देता येईल का ?

 

माझ्यामधला खट्याळ वारा श्वास होईल का ?

हृदयी थोडीशी जागा मज घेता येईल का ?

 

दीन दुबळ्यांची भूक समजून घेईल का ?

जात्यामधली भरड थोडी होता येईल का ?

 

पार करुनी दगड धोंडे जाता येईल का ?

शुद्ध वाहते तशीच माझी नदी होईल का ?

 

कोकिळ गातो तसेच मला गाता येईल का ?

लता, रफीचा आवाज मला होता येईल का ?

 

डबक्यातून बाहेर मला जाता येईल का ?

मिठीत सागरा तुझ्या मला येता येईल का ?

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print