☆ गॉडविट…– लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
काल हा फोटो बघितला आणि पुन्हा एकदा निसर्गाच्या पुढे आपण काहीच नाही याची जाणीव झाली.
गॉडविट (Godwit) जातीच्या पक्षाने नुकताच एक जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवला. ५ महिन्यांच्या या पक्षाने १३ ऑक्टोबर २०२२ ला अलास्का इकडून उड्डाण भरलं. तब्बल ११ दिवस १ तासात त्याने १३५६० किलोमीटर अंतर कापून ऑस्ट्रेलियातील टास्मानिया इथे तो उतरला. या ११ दिवसात त्याचा सरासरी वेग होता ५१ किलोमीटर / तास.
या संपूर्ण प्रवासात तो एकदाही झोपला नाही, त्याने काही खाल्लं नाही, त्याने पाणी प्यायलं नाही. तो फक्त उडत होता आपल्या लक्ष्याकडे. अलास्कामध्ये त्याच्या पाठीवर बसवण्यात आलेल्या ५ ग्रॅमच्या सॅटलाईट चिपने त्याच्या या संपूर्ण प्रवासाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा जागतिक विक्रम नोंदला गेला आहे.
गॉडविट नावाचे पक्षी स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे हवेतून तब्बल ८० किलोमीटर / तास वेगाने उडू शकतात. (उड्डाण करतात ग्लाइड न करता). तळ्याकाठी, मॅन्ग्रूव्हच्या जंगलात यांचं अस्तित्व दिसून येते.
निसर्गाच्या या अदाकारीपुढे पुन्हा एकदा नतमस्तक झालो. सलग ११ दिवस असा पृथ्वीच्या दोन टोकांचा प्रवास महासागरावरून करणं ही नक्कीच अविश्वसनीय अशी घटना आहे. आज तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अश्या घटना उजेडात येत असल्या तरी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी केलेला हा हजारो किलोमीटरचा प्रवास मला स्वतःला खूप शिकवून गेला.
लेखक – अज्ञात
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “श्री सुधांशु मनी”… ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
सुमारे ६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे , २०१६ची.
रेल्वेचे एक मोठे अधिकारी होते. खूप मोठे. पेशाने इंजीनियर होते. त्यांच्या रिटायरमेंटला केवळ दोन वर्षे बाकी होती. सहसा रिटायरमेंटच्या वेळीजेव्हा अंतिम पोस्टिंगची वेळ येते तेव्हा कर्मचार्याला त्याची निवड विचारायची पद्धत आहे. पसंतीच्या ठिकाणी अंतिम पोस्टिंग यासाठी की कर्मचार्याने आपल्या शेवटच्या दोन वर्षांत आपल्या आवडीने घर वगैरे बनवावे, स्थिर व्हावे. आरामात रहावे. परंतु या अधिकार्यानेने आपली अंतिम पोस्टिंग मागितली ICF चेन्नई ला.
ICF म्हणजे Integral Coach Factory, रेल्वेचे डबे बनविण्याचा कारखाना.
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने त्यांना विचारले, काय करणार?
ते इंजीनियर म्हणाले, “ आपल्या देशाची स्वतःची सेमी हायस्पीड ट्रेन बनविण्याची इच्छा आहे.” —–
–ही तेव्हाची घटना आहे जेव्हा ताशी १८० किमी धावणारी Spanish Talgo कंपनीच्या डब्यांची चाचणी सुरू होती.
चाचणी सफल होती.. पण ती कंपनी १० डब्यांच्या गाडीसाठी सुमारे २५० कोटी रुपये मागत होती. शिवाय तंत्रज्ञान देण्याचा करारही करत नव्हती.
अशा परिस्थितीत या इंजीनियरने संकल्प केला की ‘ आपल्याच देशात मी स्वदेशी तंत्रज्ञान वापरून Talgo पेक्षा चांगली गाडी बनवीन. तीही अर्ध्याहून कमी किमतीत.’
रेल्वे बोर्डाच्या चेअरमनने विचारले, “Are You Sure, We Can Do It ?”
उत्तर होते… “Yes Sir! “
“ किती पैसे लागतील R&D साठी ?” —- “ फक्त १०० कोटी रु सर!”
रेल्वेने त्यांना ICF मध्ये पोस्टिंग आणि 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले.
त्या अधिकार्याने लगेच रेल्वे इंजीनियर्सची एक टीम उभी केली आणि सर्वजण कामाला लागले.
दोन वर्षांच्या अथक परिश्रमांनंतर जे निर्दोष प्रॉडक्ट तयार झाले, त्याला आपण ट्रेन १८– म्हणजेच “ वन्दे भारत रॅक” नावाने ओळखतो.
आणि ठाऊक आहे या १८ डब्यांच्या गाडीला खर्च किती लागला? केवळ ९७ कोटी ! जेव्हा की Talgo केवळ १० डब्यांच्या ट्रेनचे २५० कोटी मागत होती.
ट्रेन १८ हा भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासातला निर्दोष असा हिरा आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य हे आहे की, या गाडीला ओढण्यासाठी कोणत्याही इंजिनाची गरज नाही. कारण हिचा प्रत्येक डबा स्वतःच ‘ सेल्फ प्रोपेल्ड ‘ आहे, म्हणजे त्या प्रत्येक डब्यात मोटर लावलेली आहे.
दोन वर्षात तयार झालेली पहिली रॅक, वन्दे भारत ट्रेन या नावाने वाराणसी ते नवी दिल्ली धावली.
या यशस्वी इंजीनियरचे नाव आहे सुधांशु मनी.२०१८ मध्येच हे निवृत्त झाले.
या देशात ट्रेन-१८ च्या यशासाठी कुणी या टीमचे कौतुक तर केले नाहीच, परंतु काही दिवसांपूर्वी जेव्हा वन्दे भारत म्हशीला धडकली आणि तिचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला, तेव्हा सर्व वामपंथी आणि देशद्रोही ट्रेनच्या अपयशाच्या नावाने शंख करायला लागले, तेव्हा सुधांशु सरांना दु:ख झाले. आणि त्यांनी एक लेख लिहून त्या ट्रेनच्या डिझाईनची वैशिष्ठ्ये सांगितली…
श्री. मनी सेवानिवृत्त होऊन सध्या लखनऊला रहात आहेत.
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दोनशे रुपयांची उधारी देण्यासाठी केनियाचा खासदार तीस वर्षांनी छत्रपती संभाजी महाराज नगरमधे येतो…!!
एकीकडे कोट्यवधी रुपये बुडवून परदेशात पळून गेलेल्या उद्योगपतींची उदाहरणं समोर असताना, परदेशात स्थायिक असलेली व्यक्ती तीस वर्षापूर्वीची अवघ्या काहीशे रुपयांची उधारी फेडायला भारतात येऊ शकते का?
या प्रश्नाचं उत्तर कोणीही नकारार्थी देईल.
मात्र औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी केनियाचा रहिवासी तब्बल तीस वर्षांनी भारतात आला. ही गोष्ट आहे केनियाचा खासदार रिचर्ड टोंगी याची..
सध्या केनियाचे रहिवासी असलेले रिचर्ड शिक्षणासाठी औरंगाबादेत होते. त्यावेळी परिस्थिती जेमतेम. खायची अडचण असताना एका माणसानं मदत केली. त्याची त्यावेळची दोनशे रुपयांची उधारी फेडण्यासाठी रिचर्ड तब्बल ३० वर्षांनी परत आले. तब्बल तीस वर्षानंतर झालेली ही भेट या परदेशी पाहुण्यासाठी आणि औरंगाबादेतील काशिनाथ गवळी यांच्यासाठी फारच आगळीवेगळी होती. अगदी सगळ्यांच्याच डोळ्यात या भेटीने अश्रू तरळले आणि प्रामाणिकपणाची एक वेगळी जाणीव या भेटीतून औरंगाबादच्या गवळी कुटुंबीयांना झाली. खासदार रिचर्ड टोंगी आता केनियाच्या संरक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समितीचे उपाध्यक्षही आहेत. रिचर्ड यांचं शिक्षण औरंगाबादेत झालं होतं. मौलाना आझाद कॉलेजमधून त्यांनी व्यवस्थापनाची पदवी घेतली. त्यावेळी ते औरंगाबादेत एकटे रहायचे. खाण्याची-राहण्याची सगळीच अडचण. कॉलेजच्या बाजूलाच असलेल्या वानखेडेनगरमध्ये काशिनाथ गवळी यांचं किराणाचं दुकानं होतं. अनेक परदेशी मुलं त्यावेळी तिथं यायची. रिचर्डही त्यापैकीच एक. रिचर्डना काशिनाथकाकांनी मदत केली आणि त्यांना रहायला घर मिळालं. इतकंच नाही, तर खाण्यापिण्याच्या वस्तूही ते काशिनाथकाकांच्या दुकानातूनच घ्यायचे. १९८९ मध्ये त्यांनी औरंगाबाद सोडलं त्यावेळी काशिनाथकाकांकडे 200 रुपयांची उधारी बाकी राहिली होती. रिचर्ड मायदेशी परतले. तिकडे राजकारणात जाऊन त्यांनी मोठं पदही मिळवलं, मात्र भारताची आठवण त्यांना कायम यायची. त्यात खास करुन काशिनाथकाका यांनी केलेली मदत आणि त्यांच्या 200 रुपये उधारीची जाणीव त्यांना होती. गेली 30 वर्ष त्यांना भारतात यायला जमलं नाही,
मात्र काही दिवसांपूर्वी केनिया सरकारच्या एका शिष्टमंडळासोबत रिचर्ड भारतात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर त्यांची पावलं आपसूकच औरंगाबादकडे वळली आणि त्यांनी शोध घेतला तो काशिनाथकाकांचा. तब्बल दोन दिवस त्यांनी काकांना शोधलं आणि अखेर त्यांची भेट झाली. ही भेट रिचर्डसाठी जणू डोळ्यात पाणी आणणारी ठरली. काकांना पाहून ते रडायला लागले. खरंतरं काकांच्या नीटसं लक्षातही नव्हतं. मात्र रिचर्डने ओळख दिली आणि काकांना सगळं आठवलं. ही भेट म्हणजे अनेक वर्षांची प्रतीक्षा फळाला आल्याचं रिचर्डने सांगितलं. आणि पैसै परत करण्याचा प्रामाणिकपणा सुद्धा भारतानेच शिकवला असल्याचंही ते आवर्जून सांगतात.
“ काकांनी त्यावेळी मदत केली, त्यांचे फार उपकार माझ्यावर आहेत, अनेक वर्ष त्यांच्या कर्जाची परतफेड कशी करु, हे सुचत नव्हतं. मात्र यावेळी भारतात आलो आणि थेट त्यांचं घरचं गाठलं. त्यांना भेटून आनंद झाला, पैसे परत करणं हा प्रामाणिकपणा आहे, असं लोक म्हणतात, मात्र हे मी या देशातच शिकलोय याचा अभिमान आहे, अशा शब्दात रिचर्डने आपल्या भावना व्यक्त केल्या.”
‘ अनेक वर्ष रिचर्ड गवळी कुटुंबाबद्दल सांगत होते, मात्र भेट काही शक्य होत नव्हती. अखेर यावेळी ती झाली, याचा रिचर्डना आनंद आहेच, मात्र मलाही अभिमान असल्याचं’ रिचर्डची पत्नी मिशेल टोंगी यांनी सांगितलं. “काशिनाथकाकांचा उल्लेख त्याने बरेच वेळा केला होता, मात्र आज भेट झाल्याचा आनंद वाटला.’ नवऱ्याच्या प्रामाणिकपणाचा निश्चितच अभिमान असल्याचं मिशेल म्हणतात.
काशिनाथ गवळी यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या आनंदात टोंगी दाम्पत्याचं स्वागत केलं. मराठमोठ्या पद्धतीनं टॉवेल-टोपी आणि साडी देऊन त्यांनी दोघांचा सत्कार केला. रिचर्डने त्यांच्या घरी जेवणही केलं. अजूनही काशिनाथरावांचं प्रेम कायम असल्याची भावना रिचर्डने व्यक्त केली. त्यांनी काशिनाथकाकांना केनियाला येण्याचं आमंत्रणही दिलं आहे.
प्रामाणिकपणा कोणी कोणाला शिकवू शकत नाही, तो रक्तातच असावा लागतो, हेच खरं.
लेखक : अज्ञात
संग्राहिका – माधुरी परांजपे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
दिसायला अगदी साध्या वाटत असल्या तरी या कुणी सामान्य गृहिणी नाहीत. अफाट आणि अचाट कर्तृत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॉमस– एक असे नाव जे बऱ्याच जणांनी बहुतेक ऐकले नसणार.
डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण ” मिसाईलमॅन ” म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थॉमसना ” मिसाईल वुमन ” म्हणून ओळखतात. टेसी थॉमस ” भारतीय अंतराळ संशोधन संस्थे ” ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनमध्ये कार्यरत आहेत. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने ” अग्नी ” क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर इतका गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थॉमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला त्रिवार सलाम !
केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसा यांना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तिचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाऊन पोहोचल्या. तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख ” अग्निपुत्री ” म्हणूनही झाली.
आज ४९ वर्षे वय असलेल्या टेसी थॉमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यांनाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार रहावे लागत असूनही आपल्या हाताने बनवलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना, त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव.
टेसी थॉमस यांची ही कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आज इस्रोमध्ये तब्बल बाराशे महिला ‘शास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी टेसी थॉमस यांची ही अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही.
संग्राहिका: सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ स्ट्रॅटॅजिक प्लॅनिंग…☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
Strategic Planning
तुम्हाला ठाऊक आहे का ??जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्याना ‘ Strategic Planning ‘ चा वस्तुपाठ म्हणून कोणत्या लढाई बद्दल शिकवले जाते..???
जगाच्या इतिहासात अशी लढाई पुन्हा झाली नाही…
२५ फेब्रुवारी
तो फक्त २८ वर्षांचा तरुण सेनापती होता. त्याचा शत्रू वयाने, अनुभवाने दुप्पट, वर कसलेला सेनापती. त्या तरुण वीराकडे सैन्य फक्त २५,००० आणि त्याच्या शत्रूकडे ४०,००० आणि ६५० तोफांचा त्या काळातील सर्वोत्तम तोफखाना.
नेमका तो तरुण सेनानायक राज्यापासून दूर दक्षिण दिशेला असताना, शत्रूच्या राजाने खुद्द राजधानीवर चाल केली, आपल्या बलाढ्य फौज व तोफखान्यासह…शत्रूची ही अपेक्षा की तो तरुण त्याची राजधानी वाचवण्यासाठी धावत येईल आणि आपल्या तावडीत सापडेल….पण…पण …घडले भलतेच : तो तरुण वायूवेगाने दक्षिणेतून निघाला आणि अचानक शत्रूच्या राज्यात आतपर्यंत शिरला, नुसता धुमाकूळ घालत लुटालूट सुरू केली. शत्रूला आता त्याच्या मागे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. तो राजधानी जिंकण्याचा विचार सोडून त्या तरुण वादळामागे धावला, पण वादळच ते…कधी खानदेश, तर कधी मराठवाडा तर अचानक गुजरात अशी शत्रूची आपल्यामागे फरपट करत होते..त्यातून अचानक बातमी आली – ते वादळ माळव्यात शिरले. आता शत्रूची खाशी राजधानीच मारणार …शत्रूला वेगवान हालचाली करता येत नव्हत्या म्हणून त्याने त्याचा तोफखाना मागे सोडून दिला आणि त्या वादळाचा पाठलाग सुरू केला पण हाती काहीच लागेना.
अन तश्यातच बातमी आली, शत्रूचा मागे सोडलेला तोफखाना त्या तरुण पोराने लुटून नेला…शत्रू आता पूर्ण हताश होऊन मराठवाड्यातल्या एका गावापाशी थांबला. दिवस उन्हाळ्याचे होते, रणरणता मराठवाड्याचा उन्हाळा, पाण्यासाठी नुसती घालमेल झालेली. शत्रूचे सैनिक जेव्हा पाणी आणायला जवळच्या तलावाजवळ पोचले तर पाहतात तो काय? ते तरुण वादळ आणि त्याचे सैन्य तलावाची वाट अडवून उभे…पाणीच तोडले, आधीच दमछाक आणि आता पाणी तोडले.
अखेर व्हायचे तेच झाले…तो बलाढ्य, अनुभवी शत्रूराजा एका तरुण पोराला शरण आला. शत्रूचा सम्पूर्ण पराजय, तोही आपला एकही सैनिक न गमावता…
जगाच्या इतिहासात अशी लढाई झाली नाही…आजही जगातील प्रमुख देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांना ही लढाई Strategic Planning चा वस्तुपाठ म्हणून शिकवली जाते.
२५ फेब्रुवारी १७२८ – पालखेडची लढाई
तो बलाढ्य शत्रू :- निजाम उल मुल्क
वय : ५७,
ते तरुण वादळ :- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
वय : २८ फक्त….
आपल्याला आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा असा जाज्वल्य इतिहास माहीत असायलाच हवा…
पण आपले दुर्दैव की पेशवे म्हणजे बाहेरख्याली. पेशवे म्हणजे मौजमजा करणारे, असं काहीस समोर आणलं जातं. पेशवे ब्राह्मण होते म्हणून त्यांचा तेजस्वी इतिहास जाणून बुजून झाकून ठेवून विकृतपणा समोर आणला जातो. हे आपल्या गौरवशाली इतिहास असलेल्या देशासाठी घातक आहे…
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈