श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ “मिसाईल वुमन”— “टेसी थॉमस”… ☆  प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर 

दिसायला अगदी साध्या वाटत असल्या तरी या कुणी सामान्य गृहिणी नाहीत. अफाट आणि अचाट कर्तृत्व असलेल्या ह्या महिलेचे नाव आहे टेसी थॉमस– एक असे नाव जे बऱ्याच जणांनी बहुतेक ऐकले नसणार. 

डॉक्टर अब्दुल जे कलामना आपण ” मिसाईलमॅन ” म्हणून ओळखतो. तर आपल्या देशातील हजारो शास्त्रज्ञ टेसी थॉमसना ” मिसाईल वुमन ” म्हणून ओळखतात. टेसी थॉमस ” भारतीय अंतराळ संशोधन संस्थे ” ( इस्रो ) च्या अधिपत्याखालील डिफेन्स रिसर्च अँड डेवलपमेंट ऑर्गनायजेशनमध्ये कार्यरत आहेत. आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर तब्बल दोन हजार शास्त्रज्ञांच्या प्रमुखपदी असलेल्या त्या देशातील एक महान शास्त्रज्ञ, ज्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात देशाने ” अग्नी ” क्षेपणास्त्राचा पल्ला चार हजार ते पाच हजार किलोमीटर इतका गाठून देशाच्या शत्रूंच्या हृदयात धडकी भरवली आणि देश अधिक सुरक्षित करण्यात मोलाचा वाटा उचलला. टेसी थॉमस यांच्या त्या अफाट कर्तुत्वाला त्रिवार सलाम !

केरळमधे एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या टेसीचे नाव टेसी पडले ते मदर तेरेसा यांना आदर्श मानणाऱ्या तिच्या आई वडिलांमुळे. लहानपणापासूनच जवळून अवकाशात झेप घेणाऱ्या क्षेपणास्त्राना, उपग्रहांना पाहून तिला त्या क्षेत्राविषयी कुतूहलमिश्रित ओढ लागून राहिली होती. अभ्यासात हुशार असल्यामुळे आयपीएस अधिकारी व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण ती वळली अंतराळ संशोधन संस्थेकडे. पुण्यामधे राहून तिने एम.टेकची पदवी घेतली. तिच्यातील अफाट बुद्धिमत्ता हेरून डॉक्टर अब्दुल जे. कलाम यांनी तिचा समावेश अग्नी क्षेपणास्त्र प्रोजेक्टमधे केला. आणि स्वतःच्या अफाट बुद्धीमत्तेच्या बळावर त्या तडक अग्नी क्षेपणास्त्र ५ च्या प्रोजेक्ट डायरेक्टर पदावर जाऊन पोहोचल्या. तेव्हा त्यांनी एक इतिहासच घडवला. तेव्हापासून त्यांची ओळख ” अग्निपुत्री ” म्हणूनही झाली.

आज ४९ वर्षे वय असलेल्या टेसी थॉमस एक आदर्श गृहिणीही आहेत. करिअर आणि संसार अशी कसरत त्यांनाही रोजच करावी लागते. २४ तासामधे कोणत्याही क्षणी कामावर हजार रहावे लागत असूनही आपल्या हाताने बनवलेला स्वयंपाक कुटुंबातील सदस्यांना देण्यातील आनंद त्या भरभरून घेत असतात. देश अधिक सुरक्षित करण्यासाठी अधिकाधिक लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसित करण्याच्या नवनवीन कल्पना राबविताना, त्यांना आपण हे सारे जागतिक शांततेसाठीच करतोय ह्याचे चांगलेच भान असते. दुर्दैवाने आपल्या देशाने त्यांना कधी पद्मश्री, पद्मभूषण किताबाने सन्मानित केले नाही हे आपल्या देशाचे दुर्दैव. 

टेसी थॉमस यांची ही कहाणी देशातील करोडो स्त्रियांना प्रेरणा देणारी ठरावी. आज इस्रोमध्ये  तब्बल बाराशे महिला ‘शास्त्रज्ञ’ म्हणून कार्यरत आहेत. देशातील करोडो महिलांची मान गर्वाने उंचावणारी टेसी थॉमस यांची ही अफाट कामगिरी येत्या काळात महिलांना प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला प्रेरित करेल याविषयी शंकाच नाही.

संग्राहिका: सौ उज्ज्वला केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments