☆ पुण्यातली यंदाची विसर्जन मिरवणूक … लेखक श्री विक्रम रजपूत ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
कालची गणपती मिरवणूक म्हणजे आजवरचा कहर होता. टिळक रोड, अलका टॉकीज चौक, बेलबाग चौक इथे लोकांचा अक्षरशः महापूर आला होता.
मागच्या दोन वर्षांपासून तुंबलेले खास चेंगरून घेण्यासाठी बाहेर पडलेत असं वाटत होतं. निम्म्याहून जास्त लोक दारू प्यायलेले होते, तर काही जण रस्त्यावरच उभे राहून पीत होते. या पिणाऱ्यांमध्ये मुलीदेखील मागे नव्हत्या. दारू पिऊन बेभान नाचणे, नाचून नाचून रस्त्यावरच उलट्या करणे, आणि उलट्या करून झाल्या की पुन्हा नाचणे.
स्पीकर्सच्या आवाजाबद्दल तर न बोललेलं बरं. त्या बेसमुळे अक्षरशः छाती फुटून हृदय बाहेर येईल की काय असं वाटत होतं आणि ह्या सगळ्यात हाईट म्हणजे त्या मरणाच्या गर्दीत काही पालकांसोबत त्यांच्या कडेवरची लहान मुलं देखील रेटली जात होती. ती मुलं जीवाच्या आकांताने रडत होती.
कोरोनात घरटी एक माणूस दगावल्यासारखा दगावला आहे. त्या दुःखातून बरेच जण अजून नीट सावरले नाहीयेत आणि त्यांच्याच घरासमोर ‘ पोरी जरा जपून दांडा धर ‘ वगैरे सारखी गाणी कर्कश्श आवाजात लावून विचित्र हावभाव आणि ओंगळवाणे हातवारे करत नाचणारे, एकमेकांना रेटणारे आणि असा नाच पहायला गर्दीत चेंगरत वाहत जाणारे लोक बघून कोणत्याही स्थिर मानसिकतेच्या माणसाला मळमळल्याखेरीज राहणार नाही अशी एकंदरीत परिस्थिती होती.
‘ बाप्पाच्या आगमनाची चाहूल ‘, ‘ बाप्पा गेला की घरात पोकळी जाणवते ‘ हे सगळं त्यांनाच होतं ज्यांच्या घराजवळ एखादं सार्वजनिक मंडळ नसतं. बाकी जे मुख्य शहरात किंवा मिरवणूक मार्गावर राहणारी मंडळी आहेत त्यांना, म्हाताऱ्या माणसांना, सलग तीस-छत्तीस तास त्या गर्दीत उभे राहून ड्युटी करणाऱ्या पोलिसांना, ज्यांना खरंच सामान्य माणूस म्हणता येईल अशा सर्व स्थिर मानसिकतेच्या लोकांना, आणि स्वतः गणपतीला देखील गणेशोत्सव संपला की हायसं वाटत असावं.
‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘, ‘ पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत असे घाणेरडे प्रकार करणारे भक्त बघूनच गणपती बाप्पाने मागची दोन वर्षे ब्रेक घेतला असणार आहे …
लेखक : श्री विक्रम रजपूत, पोलीस उपनिरीक्षक
संग्राहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकरी कुस्करून द्यायची.
पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा…
एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.
घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहिलं . ‘ मेलं की काय ‘ अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं.
त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघितलं, आणि चक्क ‘ शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..’ असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!
त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टीपॉयवरचा चष्मा आणून दे… अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.
मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. ‘ अग मन्या दिसत नाही गं कुठं ? ‘ बायकोला सतत विचारत राहायचा.
असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबली.
मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅनमधे बसला. नवऱ्याने हे बघितले. हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.
नवरा म्हणाला, ” मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरांसाठी आहे. तुझ्यासाठी नाही.
“ मला माहितेय..! पण मला जायचंय आता.”— मन्या शांतपणे बोलला.
” मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही. माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता.” काकुळतीला येवून नवरा बोलला.
मन्या गोड हसला, आणि बोलला, ” तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर? “
” म्हणजे काय शंका आहे का तुला? “
” मित्रा, अरे मी जेव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेव्हा तोंड घालत होतो, तेव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. पण जेव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो, तुला हवं तसं करू लागलो…. तेव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय? ”
नॉट सो स्ट्रेंज यार…!! वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते. जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ? समोरचा जोपर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं.
पण जेव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेव्हा त्याचं आपल्यासोबत असणंही आता नकोसं वाटतं. आपण त्याला टाळत राहतो—-भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.
— आश्चर्य आहे ना ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?—–
— आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं, अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!
संग्राहक : श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
चंद्रपूर, मो. 9822363911
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ द टर्न ऑफ टाईड – ऑर्थर गार्डन ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.
त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला. शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली… शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले …… ‘‘ मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे. बरे व्हाल याची खात्रीही देतो. पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी. ’’
गॉर्डन तयारच होते…
त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले…. ‘‘ या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा. सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा. पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको. दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही. या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’
दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले…
सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्ठी उघडली…
त्यावर लिहिले होते … ‘ ऐका.’
‘काय ऐकायचे… ?’ त्यांना प्रश्न पडला…
ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले… एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…
झाडीतून वाहणारी हवा…… मध्येच समुद्रावरून येणारा वारा,….. विभिन्न पक्षांचे आवाज,….. दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्या पक्षांचे आवाज…,
अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या…
जणू काही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते…
आपणही या निसर्गाचा असाच साधा, सहज भाग आहोत, हे त्यांना जाणवले…
मनातला सर्व कोलाहल थांबला… एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता…….
बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही… दुसर्या चिठ्ठीची वेळ झाली होती…….
त्यावर लिहिले होते,… ‘ मागे वळून पहा.’……. त्यांना काय करायचे कळले नाही. पण सूचनांचे पालन करायचेच होते. त्यांनी विचार करणे सुरू केले……. भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला… आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,.. बालपणीचे सवंगडी,.. कट्टी आणि क्षणात होणारी दोस्ती,.. त्या हसण्या-रडण्यातील सहजता,.. अकृत्रिम वागणे,.. इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले…… भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले….
आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते, हे आठवून त्यांचा ऊर भरून आला……. आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो. संबंधात कृत्रिमता, दिखाऊपणा, औपचारिकता जास्त आली. या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्ठी उत्सुकतेने उघडली…….
त्यात लिहिले होते, ‘‘ आपल्या उद्दिष्टांची छाननी करा .’’
गॉर्डन म्हणतात, “ मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही. पण मी सखोल परीक्षण केले…… ‘ आपले उद्दिष्ट काय..? यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत…’ “ त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते……
सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्ठी उघडली….
त्यात लिहिले होते, ‘‘ सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये.’’
त्यांनी एक शिंपला घेतला … आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या… आणि ते घरी जायला निघाले…
समुद्राला भरती येत होती… त्यांनी मागे वळून पाहिले…. एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….
गॉर्डन म्हणतात, “ त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…”.
संग्राहक : सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, “ माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल.” वृद्ध स्त्री म्हणाली, “ बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते.”
मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली—
कालिदास म्हणाले “ मी प्रवासी आहे. “
वृद्ध स्त्री म्हणाली, “ प्रवासी तर फक्त दोनच आहेत– एक चंद्र आणि दुसरा सूर्य– जे दिवस रात्र चालतच असतात.”
कालिदास म्हणाले, “ मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?”
वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत– एक धन आणि दुसरं तारुण्य– ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?”
कालिदास म्हणाले, “ मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? “
वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती आणि दुसरं झाडं–धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात.”
कालिदास आता हतबल झाले. आणि ते म्हणाले “ मी हट्टी आहे.”
वृद्ध स्त्री म्हणाली, “ नाही तू हट्टी कसा असशील ? हट्टी तर फक्त दोनच आहेत– एक नख आणि दुसरे केस– कितीही कापले तरी परत वाढतातच. “
कालिदास आता कंटाळले,आणि म्हणाले, “ मी मूर्ख आहे.”
वृद्ध स्त्री म्हणाली, “ मूर्ख तर फक्त दोनच आहेत– एक राजा, ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो, आणि दुसरा दरबारातील पंडित, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.”
कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले.
वृद्ध स्त्री म्हणाली, “ ऊठ बाळा,”- आवाज एकून कालिदासांनी वर पाहिलं, तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले.
सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, “ शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते.” कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले.
तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका.
८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो. पण इतर कुठलाच जीव उपाशी रहात नाही….
आणि माणूस—पॆसे कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही !
संग्राहक – अनंत केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
ओंजळीत मी पाणी धरले. हाताला त्याचा गार स्पर्श छान वाटला. पण थोड्या वेळात पाणी आपणहून हळूहळू गळून गेले. मी खूप प्रयत्न केला त्याला सांभाळून धरण्याचा. नाही राहीले ते ओंजळीत ! पण हात मात्र ओले राहीले.
ओंजळीत फुले घेतली. त्यांचा तो मऊ मुलायम अलवार स्पर्श मनाला खूप आल्हाददायक वाटला .त्यांच्या सुगंधाने मन वेडावले. पण फुले कोमेजायला लागली. म्हणून ओंजळीतून त्यांना सोडून दिले. हाताला मात्र ती सुगंधित करुन गेली . क्षणभराच्या सहवासाने सुवासाची लयलूट झाली .
ओंजळीत मी मोती धरले. त्यांचा मऊ मुलायम पण थोडा टणक स्पर्श मनाला जाणवला. त्यांच्याकडे नुसत्या पाहाण्यानेही मनाला आनंदाचे , समाधानाचे सुख मिळाले, ते माझ्या ओंजळीत मी धरले. ते तसेच राहिले. त्यांच्या पांढर्या सौंदर्याने मन मात्र शांतशांत झाले . माझी मलाच ” मी धनवान असल्याची ” भावना मनात आली .
कुठे तरी मी मनात ह्या ‘ तीन सुखांची ‘ तुलना करु लागले. आनंदाचे, समाधानाचे माप लावून मापू लागले. तेव्हा ते ठरविणे खूप कठीण वाटले. कारण, ओंजळीतून प्रत्येकवेळी मनात बरेच काही शिल्लक राहिले .
माझ्या मनाने आता ह्यात माणसे शोधायला सुरुवात केली . तेव्हा खरंच खूप व्यक्ती तिथे मला तशाच दिसल्या .
काही आपल्याजवळ येऊनही पाण्यासारख्या पटकन गळून गेलेल्या, पण मनात आपुलकीचा ओलावा काठोकाठ भरून ठेवलेल्या—-
काही फुलासारख्या, आपण हातात धरले, म्हणून कोमेजून जाणाऱ्या , पण तरीही माघारी सुगंध ठेवणार्या—
काही अगदी जवळच्या– मोत्या सारख्या. आपण ठेऊ तशाच राहणार्या, आपले जीवन मौल्यवान करणार्या—
खूप चेहेरे आठवले मला , आणि नकळत माझ्या चेहर्यावर हास्य उमटले.
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“भाजीत चिमूटभर साखर घाल गं, म्हणजे उग्रपणाही कमी होतो आणि पदार्थाची गोडीही वाढते” — स्वयंपाक करताना आजी म्हणायची. भाजीमध्ये चिमटीभर साखर किंवा गूळ हवा म्हणजे पदार्थाची चव वाढते.
मला नवल वाटतं आजीवर्गाचं. त्यांना बरोबर माहित असायचं – कशात काय घातलं म्हणजे गोडी वाढते.
पूर्वी घरोघरी कर्ता पुरुष म्हणजे करारी, थोडा तापट, घराला धाकात ठेवणारा असायचा. कुणाचं कशावरून बिनसलं आणि आजोबांचा आवाज चढला की आजी ,” हो हो बरोबर आहे तुमचं ” म्हणून होणारा वाद टाळायची. नंतर सावकाशीने आजोबांना मुद्दा पटवून द्यायची.
‘चिमूटभर समजूतदारपणा दाखवला की कलह टळतो ‘ असं ती म्हणायची .
घरातील मूल चुकलं तरी त्यावेळेस आवाज चढवायचा नाही ,कारण मूलही मग आक्रमक होतं आणि ऐकत नाही. सावकाशीने समजावून सांगायचे ज्यावेळेस ते समजून घेईल. चिमूटभर माया दाखवली तर सांगण्याचा परिणाम होतो असं आई पण म्हणायची. म्हणूनच त्यांचे संसार विना कलह झाले कामवाल्या बाई बाबतही असंच – तिने कधी दांडी मारली, कधी उशीरा आली, तरी ती पण एक संसारी बाई आहे, आपल्यापेक्षा तिला आव्हानं असतात जास्त. मग अशावेळेस “का गं आज उशीर झाला ? बरी आहेस ना ? काळजी घे गं बाई– चल दोन घास खाऊन घे“ असं म्हटलं की ती बाई कायम आपल्याला बांधून राहील.
थोडी माणूसकी खूप मोठं काम करते. थोडा विश्वास ,थोडं प्रेम ,थोडी आपुलकी या गोष्टी माणसं जोडायला हव्यातच संसारात —- आजी नेहमी म्हणायची “ आपण ४ पावलं मागे आलो तरी लहान होत नाही आपण. एखादे वेळेस माघार घेणं हे माणूस म्हणून २ पावलं आपल्याला पुढे घेऊन जातं. “
आताची सतत अरे ला कारे करायची सवय पाहिली की आपण खूप काहीतरी गमावतो आहोत असं वाटतं.
ही एक चिमूट आयुष्यात बदल करू शकते.
थोडा चिमूटभर अहंकार कमी केला तर आपण आयुष्यात चिमुटभर आनंदाची नक्कीच भर घालू शकतो.
☆ सुस्वागतम् की स्वागतम् ? – लेखक – श्री अनिल कुमकर☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
हा अनुभव बारामतीतच नाट्यसंमेलनाच्या वेळी आला. त्या नाट्यसंमेलनाचा एक भाग म्हणून विद्याधर गोखल्यांच्या हस्ते कवी मोरोपंतांच्या प्रतिमेचे पूजन आयोजित केले होते. ठरलेल्या वेळी गोखले, जब्बार पटेल वगैरे प्रतिमा पूजनासाठी सिद्धेश्वर मंदिरामागच्या मोरोपंत स्मारकाच्या जागेत आले. त्या वेळी तो जुना वाडा होता. मोरोपंतांच्या खोलीची नि बाहेरची सजावट करण्याचे काम माझ्याकडे दिले गेले होते. मी बाहेर पताका वगैरे लावून रांगोळीने ‘सुस्वागतम्’ असा शब्द लिहून ठेवला होता.
गोखल्यांनी प्रतिमेचे पूजन केले. नंतर त्यांना ‘चार शब्द’ बोलण्याची विनंती केली गेली. गोखल्यांनी कवी मोरोपंतांबद्दल, स्मारकाच्या व्यवस्थेबद्दल गौरवोद्गार काढले. पण त्यानंतर मात्र ” रांगोळी छान काढली आहे, पण मराठीच्या शुद्धलेखनाची किमान मोरोपंतांच्या बारामतीत तरी हेळसांड होऊ नये “, असे शब्द ऐकवले.
रांगोळीत “सुस्वागतम्” हा एकच शब्द होता. त्यात काय चुकले हे मला कळेना. शिवाय गोखल्यांनी ‘चार शब्द’ बोलताना जाहीरपणे हे सांगितल्याने काहीशी अपमानकारक स्थिती झाली होती. शेवटी त्यांनीच खुलासा केला.
“सुस्वागतम् “या शब्दाचे मूळ ‘ग’ या संस्कृतमधील धातूमध्ये आहे. त्याला व्याकरणाच्या नियमानुसार ‘तम्’ हा प्रत्यय लागून गतम् असा शब्द बनतो. गतम् शब्दाला ‘आ’ हा उपसर्ग लागून ‘आगतम्’ असा शब्द बनतो. त्या आगतम् शब्दाला ‘सु’ हा आणखी एक उपसर्ग लागून तो शब्द ‘स्वागतम्’ असा बनतो. एकदा ‘सु’ हा उपसर्ग लावल्यावर पुन्हा ‘सु’ लावून “सु सु” का करता? ” असे त्यांनी बोलून दाखवले.
त्या वेळी सगळ्यांच्या समोर चूक काढल्यामुळे गोखल्यांचा मनातून राग आला होता. पण पुढे त्यातूनच व्याकरणाचा अभ्यास कमी पडतो आहे, हे जाणवले. माझ्या शुद्धलेखनाबद्दल नि मराठीच्या भाषिक प्रभुत्वाबद्दल कौतुकाचे शब्द अनेक वेळा ऐकायला मिळतात. त्याचे श्रेय कै. गोखल्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मराठी, संस्कृत व्याकरणाचा अभ्यास नि गुजराथी, कानडी, बंगाली, उर्दू वगैरे लिपी शिकाव्या वाटल्या. नाट्यसंमेलनाच्या वेळच्या या घटनेला आता निदान २५ वर्षे तरी झाली असतील. पण अजूनही व्याकरणाचा अभ्यास करावा वाटतो. हे सगळे गोखल्यांमुळे घडले.
लेखक – श्री अनिल कुमकर
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈