? वाचताना वेचलेले ?

☆ सत्य… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

कालिदासांना ही जाणीव झाली होती की ते खूप मोठे ज्ञानी झालेत. एकदा प्रवासात त्यांना तहान लागली, त्यांनी पाहिलं की जवळच एक वृद्ध स्त्री विहिरीवर पाणी भरत आहे. कालिदास म्हणाले, “ माते मला पाणी देशील तर तुला खूप पुण्य मिळेल.” वृद्ध स्त्री म्हणाली, “ बाळा मी तुला ओळखलं नाही, कृपया तू तुझा परिचय दे, मग मी तुला पाणी देते.” 

 मग कालिदासाने परिचय देण्यास सुरवात केली—

कालिदास म्हणाले “ मी प्रवासी आहे. “

वृद्ध स्त्री म्हणाली, “  प्रवासी तर फक्त दोनच आहेत– एक चंद्र आणि दुसरा सूर्य– जे दिवस रात्र चालतच असतात.” 

कालिदास म्हणाले, “ मी अतिथी आहे. पाणी मिळेल ?”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे अतिथी तर फक्त दोनच आहेत– एक धन आणि दुसरं तारुण्य– ते निघून जातात. खरं सांग तू कोण आहेस ?” 

कालिदास म्हणाले, “ मी सहनशील आहे. आता तरी पाणी मिळेल ? “

वृद्ध स्त्री म्हणाली, “ अरे सहनशील तर तर फक्त दोनच आहेत ! एक धरती आणि दुसरं झाडं–धरती जी पुण्यवान लोकांच्या बरोबर पापी लोकांचं देखील ओझं घेऊन आहे. आणि झाडं ज्यांना दगड मारला तरी ती मधुर फळच देतात.” 

कालिदास आता हतबल झाले. आणि ते म्हणाले “ मी हट्टी आहे.”  

वृद्ध स्त्री म्हणाली, “  नाही तू हट्टी कसा असशील ?  हट्टी तर फक्त दोनच आहेत– एक नख आणि दुसरे केस– कितीही कापले तरी परत वाढतातच. “

कालिदास आता कंटाळले,आणि म्हणाले, “ मी मूर्ख आहे.”

वृद्ध स्त्री म्हणाली, “ मूर्ख तर फक्त दोनच आहेत– एक राजा, ज्याची योग्यता नसताना तो सर्वांच्यावर राज्य करतो,  आणि दुसरा दरबारातील पंडित, जो त्या राजाला रिझवण्यासाठी चुकीच्या गोष्टीला खरं सिद्ध करण्याची चेष्टा करतो.”  

कालिदास आता काहीही बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ते त्या स्त्रीच्या पायावर डोकं ठेऊन पाण्यासाठी विनवणी करू लागले. 

वृद्ध स्त्री म्हणाली, “ ऊठ बाळा,”- आवाज एकून कालिदासांनी वर पाहिलं, तर त्या स्त्रीच्या जागी साक्षात सरस्वती देवी उभी होती, कालिदास आता नतमस्तक झाले. 

सरस्वती देवी कालिदासांना म्हणाली, “ शिक्षणाने ज्ञान येते, अहंकार नाही. शिक्षणाच्या बळावर मिळालेला मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यालाच तू सर्वस्व समजलास आणि त्याचा तुला अहंकार आला. तुझे डोळे उघडणे आवश्यक होते.” कालिदासांना त्यांची चूक समजली, ते भरपूर पाणी पिऊन पुढील प्रवासाला निघाले. 

तात्पर्य: विद्वत्तेवर कधीच गर्व करू नका. 

          ८४ लाख जीवांमध्ये फक्त  माणूस पैसे कमावतो. पण इतर कुठलाच जीव उपाशी रहात नाही….  

          आणि माणूस—पॆसे कमवूनसुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही !

संग्राहक – अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments