मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ द टर्न ऑफ टाईड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ द टर्न ऑफ टाईड ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

(आर्थर गॉर्डन या लेखकाने त्यांच्या व्यक्तिगत अनुभवावर आधारित ‘द टर्न ऑफ टाईड’ नावाची एक सुंदर कथा लिहिली आहे.)

त्यांच्या जीवनात एकदा खूप निराशेचा कालखंड आला.

शेवटी त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली…

शारीरिक दृष्टीने ते तंदुरुस्त असल्याचे पाहून उपचार करणारे डॉक्टर म्हणाले …

 

‘‘मी तुमच्यावर उपचार करायला तयार आहे.

बरे व्हाल याची खात्रीही देतो.

पण माझ्या पद्धतीने उपचार घेण्याची मनाची तयारी हवी.’’

 

गॉर्डन तयारच होते…

 

त्यांना चार चिठ्ठ्या देऊन डॉक्टर म्हणाले,

‘‘या चार चिठ्ठ्या घेऊन सकाळी समुद्रावर जा.

सोबत खाण्याकरिता काही घेऊन जा.

पण पुस्तक, वृत्तपत्र, रेडिओ नको.

दिवसभर कोणाशीही बोलायचे नाही.

या चिठ्ठ्यांवर लिहिलेल्या वेळी चिठ्ठ्या उघडायच्या आणि त्यातील सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.’’

 

दुसरे दिवशी सकाळी गॉर्डन बीचवर गेले…

 

सकाळी नऊ वाजता त्यांनी एक चिठ्‌ठी उघडली…

 

त्यावर लिहिले होते … ‘ऐका.’

 

काय ऐकायचे… ? 

त्यांना प्रश्‍न पडला…

 

ते एका निर्मनुष्य जागी नारळाच्या झाडीत जाऊन बसले…

एकाग्रपणे लाटांचा आवाज ऐकणे सुरू केले…

 

झाडीतून वाहणारी हवा…

मध्येच समुद्रावरून येणारा वारा,..

विभिन्न पक्षांचे आवाज,..

दूरवर आकाशात चित्कार करत उडणार्‍या पक्षांचे आवाज…,

 

अशा किती तरी गोष्टी त्यांना हळूहळू स्पष्टपणे ऐकू येत होत्या…

 

जणुकाही स्वतःचे अस्तित्व विसरून ते निसर्गाशी एकरूप होत होते…

 

आपणही या निसर्गाचा असाच साधा,

सहज भाग आहोत,

हे त्यांना जाणवले…

 

मनातला सर्व कोलाहल थांबला…

एका प्रगाढ शांततेचा त्यांना अनुभव येत होता…

 

बारा कधी वाजले त्यांना कळलेही नाही…

दुसर्‍या चिठ्‌ठीची वेळ झाली होती…

त्यावर लिहिले होते,…

 

‘मागे वळून पहा.’

त्यांना काय करायचे कळले नाही.

पण सूचनांचे पालन करायचेच होते.

त्यांनी विचार करणे सुरू केले….

 

भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोर आला…

आई-वडिलांचे निरपेक्ष प्रेम,..

बालपणीचे सवंगडी,..

कट्‌टी आणि क्षणात होणारी दोस्ती,..

त्या हसण्या-रडण्यातील सहजता,..

अकृत्रिम वागणे,..

इंद्रधनुष्यी आयुष्याच्या त्या सुखद आठवणीत ते रमले….

भूतकाळातले आनंदाचे क्षण ते पुन्हा जगले….

 

आज दुरावलेल्या माणसांनीही कधीकाळी किती प्रेम केले होते,

हे आठवून त्यांचा ऊर भरून आला…

आपण बालपणातली निरागसता हरवून बसलो.

संबंधात कृत्रिमता, दिखावूपणा, औपचारिकता जास्त आली.

या विचारात असतानाच त्यांनी तिसरी चिठ्‌ठी उत्सुकतेने उघडली…

त्यात लिहिले होते,

 

‘‘आपल्या उद्दिष्टांची छाननी करा.’’

गॉर्डन म्हणतात, मी स्वतःला विद्वान समजत असल्यामुळे सुरुवातीला याची मला गरज वाटली नाही.

पण मी सखोल परीक्षण केले…

आपले उद्दिष्ट काय..?

यश, मान्यता, सुरक्षितता ही काही महत्त्वाची उद्दिष्टे असू शकत नाहीत…

त्यांच्या लक्षात आले, मनात उद्दिष्टांच्या बाबतीत स्पष्टता नसेल तर सर्वच चुकत जाते…

सायंकाळ होत आली होती. सूर्य अस्ताला जात होता. त्यांनी चौथी चिठ्‌ठी उघडली.

त्यात लिहिले होते,

 

“सर्व चिंता, काळज्या वाळूवर लिहून परत ये.’’

त्यांनी एक शिंपला घेतला …

आणि ओल्या वाळूवर सर्व चिंता सविस्तर लिहिल्या…

आणि ते घरी जायला निघाले…

समुद्राला भरती येत होती…

त्यांनी मागे वळून पाहिले..,

एका लाटेने लिहिलेले सर्व पुसले गेले होते….

 

गॉर्डन म्हणतात, त्या दिवशी माझा पुनर्जन्म झाला…

 

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆  उगवतीचे रंग-कधी कधी मला वाटतं… श्रीविश्वास देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

उगवतीचे रंग-कधी कधी मला वाटतं… श्रीविश्वास देशपांडे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

कधी कधी मला वाटतं

विद्यार्थी व्हावं अन

विंदा मास्तरांच्या वर्गात बसावं

‘ कोणाकडून काय घ्यावं..’

ते त्यांनी शिकवावं.

वर्गातून बाहेर पडताना 

विंदांकडून कवितेची

हिरवी पिवळी शाल घ्यावी

आयुष्यभरासाठी समाधानाने

अंगावर ओढून घ्यावी.।। १ ।।

 

कधी कधी मला वाटतं

साने गुरुजींच्या वर्गात बसावं

श्यामची आई लिहिणाऱ्या

प्रेमळ श्यामला अनुभवावं.

त्यांच्या डोळ्यातलं

अपार प्रेम, माया अनुभवावी.

‘ खरा तो एकची धर्म’

शिकवण त्यांच्याकडून घ्यावी. ।। २ ।।

 

कधी कधी मला वाटतं

बोरकरांच्या वर्गात बसावं

त्यांचे सागरासारखे

सागरापरी गहिरे डोळे अनुभवावे

जे ‘ जीवन त्यांना कळले हो ‘ 

ते मलाही शिकवाल का

विचारावं. ।। ३ ।।

 

कधी कधी मला वाटतं

कुसुमाग्रजांच्या वर्गात जावं

कशास आई भिजविसी डोळे

त्यांच्याकडून ऐकावं

रात्रीच्या गर्भातील उषा:कालाची

आशा जागवीत निघावं.

पाठीवर तात्यासाहेबांचा हात असावा

‘ लढ रे पोरा…’ ऐकताना

‘ कणा ‘ ताठ व्हावा. ।। ४ ।।

 

कधी कधी मला वाटतं

शांताबाईंकडे जावं

ऋतू हिरवा, ऋतू बरवा

कुठे भेटला जाणून घ्यावं  ।। ५ ।।

 

माझे जीवनगाणे लिहिणाऱ्या

पाडगावकरांच्या वर्गात

एक चक्कर मारावी

विचारावं त्यांना…

व्यथा असो आनंद असो

तुम्ही गात कसे राहता

आनंदाच्या रसात न्हात कसे राहता

त्यांच्या चष्म्याआडच्या

प्रेमळ, मिश्किल डोळ्यात

खोल खोल डोकावून बघावं

‘ शतदा प्रेम करावे ‘ चं

रहस्य समजून घ्यावं.  ।। ६ ।।

 

कधी कधी मला वाटतं

ग्वाल्हेरला तांब्यांकडे जावं

‘ कळा ज्या लागल्या जिवा… ‘

त्या जीवाला भेटावं

दिवसभर त्यांच्या जवळ राहावं

पहाटे त्यांच्याकडून

‘ घनतमी राज्य करणाऱ्या शुक्राला ‘ बघावं

‘ ते दूध तुझ्या त्या घटातले ‘ चा गोडवा

त्यांच्याकडूनच अनुभवावा.

सायंकाळी त्यांच्यासोबत

‘ मावळत्या दिनकराला ‘ प्रणाम करावा.

‘ तिन्ही सांजा सखे मिळाल्या…’

ऐकताना पुन्हा भेटण्याचं

‘ देई वचन मला…’ म्हणावं.  ।। ७ ।।

 

कधी कधी वाटतं

जावं बालकवींच्या गावा

पाय टाकुनी जळात बसलेला

तो ‘ औदुंबर ‘ अनुभवावा.

सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुन घ्यावे

आनंदी आनंद गडे  च्या सड्यात

न्हाऊन निघावे.  ।। ८ ।।

 

कधी कधी वाटतं

सुरेश भटांना गाठावं

‘चांदण्यात फिरताना’

त्यांच्याशी संवाद साधावा

दुभंगून जाता जाता

मी अभंग कसा झालो

त्यांच्याकडून ऐकावं.  ।। ९ ।।

 

कधी कधी मला

असं खूप काही वाटतं

कवी आणि कविता यांचं प्रेम

हृदयात दाटतं.

कवी असतात

परमेश्वराचेच दूत

घेऊन येतात प्रतिभेचं लेणं

तुमच्या माझ्यासाठी

ते असतं

नक्षत्रांचं देणं.  ।। १० ।।

 

कवी : श्री विश्वास देशपांडे,  चाळीसगाव

०९/०२/२०२२

प्रतिसादासाठी ९४०३७४९९३२

(कृपया कविता नावासह शेअर करावी)

प्रस्तुती – सुहास रघुनाथ पंडित

 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ प्रभू…. ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ प्रभू…. ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

प्रभू…..

कोणताही अर्ज केला नव्हता की कुणाचीही शिफारस नव्हती,…..

असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्व ही नाही तरीही अखंडपणे तू माझे हे हृदय चालवत आहेस…..

चोवीस तास जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस…..

मला माहीत नाही खाल्लेले न थकता पचवून सातत्यपूर्ण कोणतीही तक्रार न करता चालणारे कोणते यंत्र तू फिट करुन दिले आहेस..,..

पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेश वहन करणारी प्रणाली कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे काही समजत नाही…..

मी मात्र ती कशी चालते हे सांगून खोटा अहं पोसतो आहे…..

लोखंडाहून टणक हाडांमध्ये  तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे याचा मला मागमूसही नाही……

हजार हजार मेगापिक्सल वाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहे…

दहा-दहा हजार टेस्ट करणारा जीभ नावाचा टेस्टर,…..

अगणित संवेदनांची जाणीव करुन देणारी त्वचा नावाची सेन्सर प्रणाली,…..

वेगवेगळया फ्रिक्वेंसीची आवाज निर्मिती करणारी स्वरप्रणाली आणि त्या फ्रिक्वेंसीचे कोडींग-डिकोडींग करणारे कान नावाचे यंत्र,…..

पंच्याऐंशी टक्के पाण्याने भरलेला शरीर रुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही कुठेही लिक होत नाही…..

अद्भूत,…..

अविश्वसनीय,…….

अनाकलनीय……

अशा शरीर रुपी मशीन मध्ये कायम मी आहे याची जाणीव करुन देणारा अहं देवा तू असा काही फिट बसविला आहे की… आणखी काय मागाव मी……

आता आणखी काही हवंय अशी मागणी सुद्धा शरम वाटायला भाग पाडते……

आज एव्हढेच म्हणावेसे वाटते मी या शरीराच्या साहाय्याने तुझ्या प्रेम सुखाची प्राप्ती करावी यासाठीच्या तुझ्या या जीवा-शिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन अशी सद्बुद्धी मला दे……

तूच हे सर्व सांभाळतो आहे याची जाणीव मला सदैव राहू दे…

देवा तुझे खूप खूप आभार…..

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ सुखाची शिल्पकार ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाढदिवसामीच मला चाॅकलेट दिलं,

एक घट्ट मिठी मारून “लव यू ” म्हटलं,

मीच केलय एक प्राॅमिस मला,

कायम खूश ठेवणार आहे मीच मला….

Priority लिस्टवर माझं स्थान नेहेमीच शेवटी,

ते आणिन आता थोडतरी वरती,

सगळ्यांचं सगळं करताना विसरणार नाही स्वतःला,

मीच एक फूल दिलय आज मला….

खूप खूप वर्षांनी खाली ठेवलाय

तो सुपरवुमनचा किताब,

मन होऊन जाऊदे फुलपाखरू आज…

नाही जमत मला तिच्यासारखा स्वयंपाक,

आणि येत नाही तिच्यासारखं रहायला झक्कास,

येत नाही टाईम मैनेजमेंट मला,

काँम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गैजेट्स मधे मी “ढ” गोळा….

आज मान्य मला माझे सारे दोष अन् कमतरता,

माझ्यातला वैशाख,

कारण आज उतरवून ठेवलाय,

मी आदर्श भारतीय नारीचा पोषाख….

हिचे केस, तिची उंची, हिचा रंग, तिचा आवाज,

नको ती तुलना, नको ती इर्ष्या,

तोच स्त्रीयांचा खरा शाप…

आज मी मिळवणार आहे अपूर्णतेतल्या पूर्णतेचा उःशाप….

मी शिकवणार आहे मला, जशी आहे तशी आज,

आरश्यासमोर उभी राहून बघणार आहे स्वतःला,

ना कोणाची

बायको, सुन, आई, मुलगी म्हणून… फक्त मला…

गुणदोषांसकट स्वतःच्या प्रेमात पडायचय मला…

का हवा मला

नेहेमीच घोड्यावरून येणारा स्वप्नातला राजकुमार?

मीच होणार माझ्या सुखाची शिल्पकार…

आत्ममग्नतेच्या तळ्याकाठी बसेन काही काळ,

आणि फुलवेन स्वतःच्याच अस्तित्वाची बाग!!!

Happy Valentine’s day  To All Women

 

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिक्त मरण (Die Empty) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ रिक्त मरण (Die Empty) ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

वाचण्यासाठी आणि त्यातून काहीतरी शिकण्यासाठी अनेक पुस्तकं आहेत त्यातलंच एक सर्वोत्तम पुस्तक म्हणजे टॉड हेनरी यांचे “Die Empty”

हे पुस्तक लिहण्याची प्रेरणा आणि कल्पना लेखकाला एका बिझनेस मिटींग मध्ये मिळाली…

मिटींगमध्ये डायरेक्टरने तेथे उपस्थित लोकांना प्रश्न विचारला. की “जगातील सर्वात श्रीमंत जमीन कोठे आहे?”

प्रेक्षकांपैकी एकाने उत्तर दिले : “तेलाने समृद्ध गल्फ राज्ये.”

तर दूसर्‍याने उत्तर दिले : “आफ्रिकेतील डायमंड खाणी.”

त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर डायरेक्टर म्हणाले : नाही, जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी. कारण असे लाखो लोक मरण पावले आहेत ज्यांच्याजवळ अनेक मौल्यवान कल्पना होत्या पण त्या कधीच प्रकाशात येऊ शकल्या नाहीत आणि इतरांना त्याचा काहीच फायदा सुध्दा झाला नाही. त्यांच्या या सर्व मौल्यवान कल्पना त्यांच्याबरोबर या दफनभूमीत पुरण्यात आल्या आहेत.

याच उत्तराने प्रेरीत होऊन लेखक टॉड हेनरी यांनी “Die Empty” हे पुस्तक लिहले.

सर्वात सुंदर जर त्यांनी काही या पुस्तकात म्हटलं असेल तर ते म्हणजे “तुमच्या आतमध्ये जे सर्वात बेस्ट आहे जे तुम्ही करु शकता ते आतमध्येच ठेवुन मरु नका. निवडण्यासाठी आपल्याकडे नेहमीच पर्याय असतो त्यामुळे नेहमी रिक्त मरण निवडा…

रिक्त मरण किंवा Die Empty या शब्दाचा इथे अर्थ असा आहे की तुमच्यामध्ये जो काही चांगुलपणा आहे, जे काही चांगले तुम्ही या जगाला देऊ शकता ते सर्व मरण्यापूर्वी या जगाला देऊन जा…

जर तुमच्याकडे एखादी कल्पना असेल तर ती सादर करा…

जर तुमच्याकडे ज्ञान असेल तर ते इतरांना द्या…

जर तुमच्याकडे एखादे ध्येय असेल तर ते साध्य करा…

तुमच्याकडे जे आहे त्यावर प्रेम करा, इतरांचा सांगा आणि इतरांमध्ये वाटा आतमध्येच दडवून ठेवू नका…

चला तर मग, द्यायला सुरुवात करुया. आपल्यामध्ये जे काही चांगले आणि आपण जे काही चांगले या जगाला देऊ शकतो ते सर्व  आपल्यामधून काढून या जगामध्ये पसरवा….

शर्यत सुरु झाली आहे…

चला, हे जग सोडण्याआधी रिक्त होऊया…

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ दिदी ssss… (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?  वाचताना वेचलेले ? 

☆ दिदी ssss…  (कविता)….प्रमोद जोशी ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

अशोकाच्या वाटेवर,

कुणी पसरला शोक?

टोचे देठानाच आता,

पाकळ्यांचे तीक्ष्ण टोक!

 

तुझे जाणे ना सामान्य,

आनंदाचा हा युगांत!

संवादिनीला असह्य,

तिच्या भात्याचा आकांत!

 

मंगेशाच्या मंदिरात,

देई हुंदका ओंकार!

घंटा बडवूनसुद्धा,

तिचा गोठला झंकार!

 

कुणी कुणाचे सांत्वन,

आता करायाचे सांग?

आसवांच्या पाठीमागे,

उभी हुंदक्यांची रांग!

 

कोणताही भाव नाही,

तुझ्या गाण्यातून वर्ज!

पिढ्यापिढ्याना हवेसे,

तुझे सप्तसुरी कर्ज!

 

दुस्वासाने “लता” शब्द,

उलटाही केला तरी!

तोही “ताल होतो आणि,

येई संगिताच्या घरी!

 

भैरवीचा फुटे बांध,

हमसून रडे नांदी!

साती स्वर वेडेपिसे,

शोधतात त्यांची दिदी!

 

मंगेशीच्या गाभाऱ्यात,

ज्योत स्फुंदे समईत!

अभिषेकही तुटक,

धार विसरली रीत!

 

वाट पाही दिनानाथ,

त्यांच्या लेकीची स्वर्गात!

तीही चालली तृप्तीत,

अलौकिक स्वर गात!

 

आज क्षितिजावरती,

सूर्य उगवला नाही!

गेल्या तमात बुडून,

आंधळ्याच दिशा दाही!

 

 -प्रमोद जोशी, देवगड.

9423513604

संग्राहक – मंजुषा सुनीत मुळे 

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३४ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३४– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[१५३]

जेव्हा पान प्रेम करतं

तेव्हा फूल  होतं त्याचं

आणि

जेव्हा फूल पूजा करतं

तेव्हा फळ होतं त्याचं.

 

[१५४]

साचून आहे तुझ्यावर

धूळच धूळ…

नीरव शांततेच्या

शुद्ध प्रवाहात 

धुवायलाच हवा एकदा

तुझा आत्मा

 

[१५५]

हळुवार झुळूक येते

आणि किती स्पष्टपणे

जाणवून जातो

ईश्वरी शक्तीचा परमस्पर्श

वादळामधून

कधीही न जाणवणारा.

 

[१५६]

साधंसुधं शुभ्रपांढरं

प्रकाशवस्त्र

लेऊन येतो सूर्य

आणि हे वेडे ढगच कसे

लगडून जातात

रंगारंगाच्या

भपकेदार दिमाखानं 

 

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आधीच आलिंगन द्या…. कवी : प्रा.विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

बॉडी डेड होण्या आधीच आलिंगन द्या

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

आयुष्य खूप छोटं आहे

भांडत नका बसू

डोक्यात राख भरल्यावर

फुटणार कसं हसू ?

 

अहंकार बाळगू नका

भेटा बसा बोला

मेल्यावर रडण्यापेक्षा

जिवंतपणी बोला

 

नातं आपलं कोणतं आहे

महत्वाचे नाही

प्रश्न आहे कधीतरी

गोड बोलतो का नाही ?

 

चुकाच शोधत बसाल तर

सुख मिळणार नाही

चूक काय बरोबर काय

कधीच कळणार नाही

 

दारात पाय ठेऊ नको

तोंड नाही पहाणार

खरं सांगा असं वागून

कोण सुखी होणार ?

 

तू तिकडे आम्ही इकडे

म्हणणं सोपं असतं

पोखरलेलं मन कधीच

सुखी होत नसतं

 

सुखाचा अभास म्हणजे

खरं सुख नाही

आपलं माणूस आपलं नसणे

यासारखे दुःख नाही

 

नातं टिकलं पाहिजे असं

दोघांनाही वाटावं

कधी गायीने कधी वासराने

एकमेकाला चाटावं

 

तुमची काहीच चूक नाही

असं कसं असेल

पारा शांत झाल्यावरच

सत्य काय ते दिसेल

 

ठीक आहे चूक नाही

तरीही जुळतं घ्या

बॉडी डेड होण्या आधीच

आलिंगन द्या

 

स्मशानभूमीत चांगलं बोलून

काय उपयोग आहे

जिवंतपणी कसे वागलात

जास्त महत्वाचं आहे

 

माझ्या कवितेत कोणतंही

तत्वज्ञान नाही

तुम्ही खुशाल म्हणू शकता

कवीला भान नाही

 

ठीक आहे तुमचा आरोप

मान्य आहे मला

माझं म्हणणं एवढंच आहे

वाद नको बोला

 

कवी : प्रा.विजय पोहनेरकर

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

आता उतार….अनिल अवचट ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

आता उतार सुरू

किती छान

चढणे ही भानगड नाही

कुठलं शिखर जिंकायचं नाही

आता नुस्ता उतार

समोरचं झाडीनं गच्च  भरलेलं दृश्य,

दरीतून अंगावर येणारा

आल्हाददायक वारा,

कधी धुकं, तर कधी ढगही..

टेकावं वाटलं तर टेकावं

एखाद्या दगडावर..

बसलेल्या छोट्या पक्ष्याशी

गप्पा माराव्यात,

सुरात सूर मिसळून…

अरे, हे सगळं इथंच होतं?

मग हे चढताना का नाही दिसलं?

पण असू दे

आता तर दिसतंय ना

मजेत बघत

उतरू हळूहळू

मस्त मस्त उतार

 

 – श्री अनिल अवचट

प्रस्तुती  श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – ३३ – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – ३३– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

 

[१४९]

बुरखा पांघरून

ही सावली

किती नकळत

प्रकाशाच्या मागून

जातच रहाते

प्रेमाच्या पावलांचा

आवाजाही न करता

 

[१५०]

ईश्वर अजूनही

निराश झालेला नाही

माणसाच्या बाबतीत

हाच संदेश घेऊन येतं

प्रत्येक नवजात बालक…

 

[१५१]

मावळत्या दिवसाचं

प्रेमानं चुंबन घेत

रात्र म्हणाली,

’महानिद्रा’

म्हणजे मृत्यू म्हणतात मला

पण माता आहे मी तुझी

मीच तुला पुन्हा

नवा जन्म देईन

 

[१५२]

पक्षी जेव्हा

विचार करतो

पुण्य करायचा.

तेव्हा ठरवतो ,

पाण्यातल्या माशाला

हवेत आणून   

उद्धार करावा त्याचा.

 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares