☆ “आंबामेव जयते…” – लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
अलीकडे ‘पहिला आंबा खाणं’ हा एक इव्हेण्ट झालाय. सुरुवातीला आंब्याचा भाव (अर्थात हापूस) हा डझनाला बाराशे रुपये असतो. मी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बाहेर पडलो तेव्हा बाराशे रुपये पगार हा ‘वलयांकित’ पगार होता. ‘‘मला फोर फिगर पगार आहे, ’’ हे ‘मेरे पास माँ है’ थाटात सांगितलं जायचं. आता त्या भावात बारा आंबे मिळतात.
आपण आंबे विकणाऱ्याला ‘चल एक आंबा वर घाल’, असं टिपिकल मध्यमवर्गीय थाटात सांगितलं की तो वर सुनावतो, ‘‘एक आंबा म्हणजे किती रुपये झाले कळतं ना?’’ नशीब तो विचारीत नाही, ‘कोथिंबीर, लिंबू किंवा दोन बोंबील आणि आंबा यांतला फरक कळतो ना? सरळ वर घाल म्हणून काय सांगताय?’
दर मोसमात आंब्याचा भाव वाढतो आणि दर मोसमात त्याचं कारण दिलं जातं की, ‘यंदा फळ जास्त आलं नाही’. ‘चांगला आंबा परदेशात पाठविला जातो म्हणून यंदा बाजारात आंबा नाही, ’ हेही अलीकडे या प्रश्नाचं दुसरं उत्तर असतं. पुढेपुढे ‘किती आंबे खाल्ले’ ही इन्कम टॅक्सकडे जाहीर करण्याची गोष्ट ठरू शकते आणि आयकर विभागाच्या धाडीत दहा पेट्या आंबा सापडला ही बातमी ठरू शकते. पण तरीही आंबा हा मराठी माणसाच्या आयुष्यातला महत्त्वाचा घटक कायम राहणार. सोन्याचे भाव वाढतात म्हणून लग्नात मुलीच्या अंगावर दागिने घालणं थोडंच कमी होतं? लहानपणी आईने आंब्याचा पहिला घास भरवला, तिथपासून आजपर्यंत आंबा मी प्रेमाने खात आलोय.
मी जिभेने सारस्वत असल्यामुळे सांगतो, मला बांगड्याएवढाच आंबा आवडतो. तुम्ही मला पेचात टाकणारा प्रश्न विचाराल की, ‘बांगडा की आंबा?’ तर हा प्रश्न, तुला डेटवर कुणाबरोबर जायला आवडेल? माधुरी दीक्षित (अर्थात तरुण) की श्रीदेवी (तरुणच). (आणि हो, मीपण तरुण.) तर उत्तर, दोन्ही, असं असेल. तसंच आंबा आणि बांगड्याबद्दल असेल. तळलेला बांगडा आणि आमरस हे एकाच वेळी जेवणात असणं यालाच मी ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं म्हणतो.
माझ्या लहानपणीसुद्धा हापूस आंबा महाग असावा. कारण तो खास पाहुणे आले की खाल्ला जायचा. आमरस करण्यासाठी पायरी आंबा वापरला जायचा आणि ऊठसूट खायला चोखायचे आंबे असत. बरं, पाहुण्याला हापूस देताना आंब्याचा बाठा खायला देणं अप्रशस्त मानलं जाई. त्यामुळे बाठा माझ्या वाट्याला येत असे. मला बाठा खायला किंवा चोखायला अजिबात लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. दोन मध्यमवर्गीय संस्कार माझ्यात आजही अस्तित्वात आहेत. एक, आंब्याचा बाठा खाणे आणि दुसरा, दुधाचं भांडं रिकामं झाल्यावर जी मलई किंवा तत्सम गोष्ट भांड्याला चिकटते, ती खाणे. कसले भिकारडे संस्कार, असा घरचा अहेर (माहेरहून आलेला) मला मिळायचा! पण ज्यांनी तो आनंद घेतलाय त्यांनाच माझा आनंद कळू शकेल. एवढंच काय की, घरचं दूध नासलं की मला प्रचंड आनंद व्हायचा. त्यात साखर घालून आई ते आटवायची आणि त्यातून जे निर्माण व्हायचं त्यालाच ‘अमृत’ म्हणत असावेत, अशी लहानपणी माझी समजूत होती. आता हा आनंद दुष्ट वैद्यकीय विज्ञानामुळे धुळीला मिळालाय. देवाने माणसाला कोलेस्टेरॉल का द्यावं? आणि त्यात पुन्हा वाईट आणि चांगलं असे दोन प्रकार असताना वाईट कोलेस्टेरॉल का द्यावं? बरं ते कोलेस्टेरॉल जर निर्माण करायचं, तर ते मलईत वगैरे टाकण्यापेक्षा कारलं, गवार किंवा सुरणात टाकलं असतं तर बिघडलं असतं का? आंबाही फार नको, असं सुचविताना डॉक्टर त्यात पोटॅशियम असतं ते चांगलं, असा उःशाप देतो ते बरं असतं.
मला जवळपास सर्व फळं आवडतात. कलिंगड, द्राक्ष (द्राक्षाच्या सर्व पेयांसह), संत्र्यापासून जांभूळ-करवंदापर्यंत. करवंदाच्या आतल्या रंगावरून कोंबडा की कोंबडी खेळ खेळत मी अनेकदा करवंदं खाल्ली आहेत. आता फक्त आठवते ती ग. दि. माडगूळकरांची लावणी, ‘जाळीमंदी पिकली करवंदं’. अजूनही कोकणाच्या दिशेने गेलं की करवंदांची जाळी दिसते. वाटतं कधीकधी लहानपणात शिरावं. मनाला वाटलं तरी शरीराला ते समजावणं कठीण जातं. करवंदाच्या जाळीत आणि लाल एस. टी. त शिरण्याची माझ्या शरीराची सवय गेली ती गेलीच!
असो, तर मी सांगत काय होतो? हं, फळं सर्व आवडली तरी आंबा हा फळांचा खऱ्या अर्थाने राजा! तो मला जेवणाच्या ताटात किंवा बशीत कुठल्याही रूपात आवडतो. आमच्या घरी आंबा खास पाहुण्यांना (बायकोची आवडती माणसं) हा सालंबिलं कापून, छोटे तुकडे करून एका ‘बोल’मध्ये छोट्या फोर्कसह पेश केला जातो. असं साहेबी आंबा खाणं मला बिलकूल आवडत नाही. आंबा खाताना हात बरबटले पाहिजेत, सालंसुद्धा चोखलीच पाहिजेत आणि जमलं तर शर्टावर तो सांडला पाहिजे. तरच तो आंबा खाल्ल्यासारखा वाटतो. आंबा ताटात असताना मासे सोडून इतर पदार्थ मला नगण्य वाटतात. विव्ह रिचर्डस् बॅटिंग करताना मैदानावरच्या इतर सर्व गोष्टी नगण्य वाटायच्या तशा! आंबा खाण्यासाठी चपाती, परोठ्यापासून सुकी भाकरही मला चालते.
फक्त एकच गोष्ट मला जमलेली नाही. आमरस भातात कालवून भात ओरपणे! माझ्या एका मित्राला ते करताना पाहिलं आणि मला त्या मित्रापेक्षा आंब्याची कीव आली. आंब्याची गाठ भाताशी मारणं हे मला एखाद्या गायिकेने औरंगजेबाशी विवाह लावण्यासारखं वाटलं. भात ओरपायला आंबट वरणापासून चिकन करीपर्यंत अनेक गोष्टी असताना आमरसाचा वापर का करावा?
आंब्याच्या मोसमात पूर्वी मला लग्नाला जायला आवडे. म्हणजे मी अशा काळाबद्दल म्हणतोय जेव्हा जेवणाच्या पंगती असत, बुफे नसे आणि जेवण हे मुंबईएवढं कॉस्मॉपॉलिटन नव्हतं. आता मराठी लग्नातही ताबा पंजाबी, गुजराती, चिनी, थाई, दाक्षिणात्य, इटालियन, अमेरिकन पदार्थांनी घेतलाय. त्या वेळी सारस्वत लग्नातली कोरडी वडी (जी ओली असून तिला कोरडी का म्हणत ते सारस्वत जाणे), पंचामृत आणि अनसा-फणसाची भाजी! ही भाजी त्या वेळी फक्त श्रीमंत सारस्वत लग्नात असे. कारण त्या भाजीत आंबा, अननस आणि फणस असे त्रिदेव असत. त्यामुळे तिला ग्रेट चव येई. त्या काळी सारस्वत लग्नात अनसा-फणसाची भाजी ठेवणं हा स्टेटस सिम्बॉल होता.
आंब्याचा आणि लग्नाचा संबंध हा जुनाच आहे. किंबहुना आंब्याचा उल्लेख रामायण, महाभारतातही आहे. तसंच पतंजलीचं महाभाष्य आणि पाणिनीची अष्टाध्यायी या ग्रंथांतसुद्धा आहे. हिंदूंच्या सर्व सणांत आणि उत्सवांत आंब्याला महत्त्व दिलं गेलंय. जवळपास सर्वच धार्मिक विधी आंब्याच्या पानाशिवाय होत नाहीत. मंगलकार्यात, मंडपात आणि दारावर आंब्याच्या पानांची तोरणं बांधायची पद्धत आहे. कोणत्याही कलशावर आम्रपल्लव ठेवून मग त्यावर नारळ किंवा पूर्णपात्र ठेवतात. वटपौर्णिमेला स्त्रिया आंब्याची वाणं देतात. आम्रफल हे वांझपण नष्ट करणारं आणि गर्भप्रद मानलं जातं.
आंब्याच्या सुमारे दोनशे जाती आहेत, पण माणसाप्रमाणे आंब्यांतला जातिभेदही मी मानत नाही. हापूसपासून राजापुरी, तोतापुरी, बाटली आंबा वगैरे कुठलाही आंबा मला आवडतो आणि मी तो खातो. लहानपणी तर मी कैरीपासूनच सुरुवात करायचो. किंबहुना शाळा-कॉलेजात असताना एप्रिल-मे महिन्यात आंबा आणि सुट्टी या एवढ्याच दोन गुड न्यूज असायच्या. बाकी सर्वच बॅड न्यूज! आधी परीक्षा, मग तिचा निकाल! गीतकार-कवी शैलेंद्रने एका गाण्यात म्हटलंय, ‘जब गम का अंधेरा घिर आए, समझो के सवेरा दूर नहीं’. परीक्षा-निकालाच्या ‘अंधेऱ्या’नंतर (खरंतर त्यामुळे डोळ्यांपुढे अंधारी आल्यानंतर) ताटातल्या आंब्याचं महत्त्व जास्त वाटायचं. तो त्या ‘सवेरा’सारखा वाटायचा. मुंबईत कैरी-आंबा हीच वसंताची चाहूल. एरवी कोकीळ इथे मुंबईत कुठे ऐकायला येणार! आणि ‘परीक्षा आलीए तरी झोपतोय कसला, ऊठ लवकर, ’ हे वडिलांच्या तोंडचे शब्द कोकिळेच्या तोंडातून ऐकायला आले असते तरी ते कर्कशच वाटले असते.
‘आंबा पिकतो रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’, ही कविता शाळेत न शिकवताही आम्हांला पाठ होती. भारतीय वाङ्मयात आंब्याला, आम्रवृक्षाला मोठं स्थान आहे. कालिदासाच्या निसर्गवर्णनात वसंतागमनसूचक तांबूस, हिरव्या आणि पांढुरक्या आम्रमंजिरीचं वर्णन नेहमी असतं. कामदेवाच्या पंचगटात आम्रमंजिरीचाही अंतर्भाव आहे.
आंबा नुसता जसा मला नुसता खायला आवडतो तसा कुठल्याही रूपातला आंबा मला आवडतो. उदा. कैरी, कैरीचं पन्हं, लोणचं, मोरांबा, आंबटगोड लोणचे, आंबापोळी वगैरे वगैरे! फक्त आंब्याच्या कोल्ड ड्रिंक्सच्या वाटेला मी जात नाही. अवाजवी आणि फालतू साखरेला शरीरात यायचं आमंत्रण का द्या? आणखीन एक प्रश्र्न मला पडतो. नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो, पण मग आम्रवृक्ष काय कमी उपयोगी नाही. कैरी-आंबा सोडा, बाठा किंवा कोयीचं पीठ पौष्टिक असतं. झाडाचं लाकूड उपयुक्त असतं. आंब्याच्या झाडाच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी करतात. तिच्यापासून रंगही तयार करता येतात. आंब्याचं झाड औषधी असतं, असं म्हणतात.
चला, आता दीड-दोन महिने आमच्या घरी मासळी, आयपीएलपेक्षा आंब्याची चर्चा जास्त असणार. पलीकडच्या कर्वेबाईंनी हापूस स्वस्तात मिळविल्याचा टेंभा मिरविल्यावर माझ्या बायकोचा चेहरा ख्रिस गेलचा कॅच सुटल्यासारखा होणार. पण पुढे आजचा मेनू काय, हा प्रश्न नवरा विचारणार नाही, याचं समाधान असणार. कारण बाजारातला हापूसच काय, बाजारातला शेवटचा बाटली आंबा संपेपर्यंत नवरा शांत असणार.
‘आंबामेव जयते!’
🥭🍑
लेखक : श्री द्वारकानाथ संझगिरी
(मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या रिव्हर्स स्वीप ह्या त्यांच्या पुस्तकातून साभार)
संकलन व प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
तू आमचे काम सोडून गेलीस त्याला आता महिना होऊन गेला. तुझी वाट बघून, फोन करून मी थकले पण तू काही परत आली नाहीस की फोन उचलला नाहीस.
आजारी आहे म्हणून सुट्टी घेतलीस ती काम सोडण्यासाठीच. तुझे ते न सांगता काम सोडणे माझ्या मनाला खूप लागले. वाटले काय कमी होते तुला आमच्या घरी?
तू तुझ्या सवडीनुसार कामाला यायचीस, भराभर कामे उरकायचीस, हक्काने रोज चहा आणि जेवण पण मागायचीस, दर रविवारी सुट्टी, दिवाळी बोनस, गरजेला आगाऊ रक्कम देत होतोच. जुने कपडे/ भांडी/ पुस्तके/ वस्तू / रद्दी हे सगळे तुझ्याच स्वाधीन करायचो आम्ही. असे काय कमी पडले म्हणून तू गायब झालीस?
तशी तू हुशार होतीस, हिंदी बरोबर तुला थोडे इंग्रजी पण यायचे म्हणून मला कौतुक वाटायचे. गप्पा मारायला तुला खूप आवडायचे. सगळ्या बातम्या मला तुझ्यामुळेच कळत, एवढेच नाही तर बाजारात काय नव्या गोष्टी आल्या आहेत हे पण तूच सांगायचीस, जसे की साड्या, ड्रेस, बांगड्या, दागिने, भांडी, मशिन वगैरे वगैरे…
तू अगदी हौशी होतीस, स्मार्टफोन पण माझ्या आधी तुझ्याकडे आला होता. तुला त्याचा उपयोग करता येत नव्हता ही गोष्ट निराळी! पण आपल्याकडे सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असाव्यात असा तुझा एक अट्टाहास असायचा.
त्यात काही गैर नव्हते पण या वस्तू तुला माझ्याकडून (किंवा इतरांकडून) मिळाव्यात असे वाटायचे. मग घरात काही नवी वस्तू आणली की लगेच जुनी वस्तू मला द्या म्हणून मागे लागायचीस. नवा लॅपटॉप, टीव्ही आला की जुना तुला पाहिजे म्हणायचीस. नवा मिक्सर आणला, तुला जुना दिला. अशा कित्येक गोष्टी तुला दिल्या.
दर महिना पगार होताच पण तू सतत काहीतरी मागत असायचीस. तुझी नजर सारखी घरातल्या गोष्टींवर भिरभिरत असायची. माझ्या घरी काय काय वस्तू आहेत आणि त्या कोठे ठेवल्या आहेत हे माझ्यापेक्षा तुला जास्त माहिती असायचे.
का कोणास ठाऊक पण मला तुझ्या या सगळ्या गुण दोषांची इतकी सवय झाली होती की मला त्यात काही वावगे वाटायचे नाही. कामवाल्या बायका अशाच असतात अशी माझी एक समजूत!
पण हे सगळे अती होत चालले होते. तुझा अहंकार आजकाल वाढत होता. ‘माझ्याशिवाय’ काही कामे होत नाहीत हे तुला कळून चुकले होते. त्यामुळे तुला ‘नाखुष ‘कोणी करत नव्हते.
अलीकडे तर तू मला कॉफीची ऑर्डर सोडू लागलीस. पाव नको बिस्किट द्या, शिळे नको ताजे द्या. मी समजू शकते हे, पण तू एकदा मला शिरा करून द्या म्हणालीस, आणि लाडू पण बरेच दिवसात दिला नाही खायला असे म्हणालीस, हा धक्काच होता मला.
माझ्या हातचे सांबार तुला खूप आवडायचे. ते केले की मी आधी तुला द्यायचे मग आम्ही खायचो. गोष्टी इतक्या थराला गेल्या.
पण काय करणार, आमचे हात बांधले होते. तुला गमावून चालणार नव्हते म्हणून मुकाट्याने सगळे सहन केले. म्हटले ही सोडून गेली तर रोज भांडी कोण घासणार? झाडू कोण मारणार? फरशी कोण पुसणार? आपल्याला काही झेपणार नाही हे.
आणि कामवाली बाई बदलली तरी हीच तर्हा असणार हे मी अनुभवावरून जाणून होतेच. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय असेच काहीसे झाले होते…
पण कोणत्याही गोष्टीला शेवट असतो. तुझी वाट बघता बघता ७/८ दिवस मी सगळी कामे केली. नाहीतरी मी भांडी स्वछ धुवूनच तुला घासायला ठेवत असे, आता फक्त साबण लावून धुवून टाकायची, आणि लक्षात आले की जमतंय…
सुरुवातीला खूप त्रास झाला, वेळ पण बराच लागला कारण या कष्टाची सवय नव्हती. दुसरी कामवाली बाई पण विचारून गेली पण मी मात्र ठरवले होते आता या कामवाल्या बायकांचे कौतुक बस्स झाले.
माझा पण आता थोडा आत्मविश्वास वाढत होता, आपण ही कामे करू शकतो आणि जास्त चांगली करू शकतो हेही लक्षात आले. नवरा पण मदत करू लागला, मुलाला पण थोडे ट्रेनिंग दिले.
ही कामे करता करता आमच्यातला संवाद वाढला. एवढेच नाही तर आम्ही घरा-दाराशी, भिंतींशी, घरातल्या वस्तू, भांडी-कुंडी, फर्निचर या सार्या गोष्टींशी बोलू लागलो.
साफसफाई करताना अधिक काळजी घेऊ लागलो. घराचा कोपरान् कोपरा लख्ख झाला.
आम्हा बायकांना भांड्यांविषयी जरा जास्त प्रेम असतेच. आता भांडी घासताना ते उतू जाऊ लागले. भांडी जास्त चमकू लागली.
तुला दर पंधरा दिवसांना लिक्विड सोपची मोठी बाटली लागायची. आता तीच बाटली मी दीड महिना वापरते आहे. भांडी घासताना तू खूप पाणी वाया घालवत होतीस, बर्याचदा सांगून पण तू ऐकले नाहीस. एवढे पाणी वापरुन पण भांड्यांवरचा साबण तसाच राहायचा. मला परत परत ते भांडे धुवायला लागायचे.
तुझ्यामुळे आत्तापर्यंत आम्ही किती किलो साबण खाल्ला असेल कोणास ठाऊक?
अजुन बर्याच गोष्टी कळल्या. भांडी मीच घासत असलेने स्वयंपाक घरातील भांड्यांची संख्या कमी झाली. भांड्यांचा एक सेट पुरतो आता. शिवाय भांडी चेपली जात नाहीत, पोचे येत नाहीत अगर हँडल तुटत नाही की काचेची भांडी फुटत नाहीत.
चार मोठ्या खोल्यांचा केर तू ५ मिनिटांत काढायचीस आणि १० मिनिटात फरशी पुसून टाकायचीस.
वाटायचे काय फास्ट बाई आहे, पण आता कळते की तू सोफा, कॉट, खुर्ची, टेबलखाली धुळ ठेवत होतीस. आता मी या सगळ्या वस्तू वेळोवेळी हलवून त्या खालचा केर काढून मग पुसून घेते. आता प्रत्येक वस्तू कशी लखलखते आहे.
तीच गोष्ट बाथ-रूमची. तू प्रचंड प्रमाणात हर्पिक, फिनेल वगैरे केमिकल्स नुसती ओतत होतीस. पण तरीही ते स्वच्छ वाटत नव्हते. कारण तू जोर लावून कामे करत नव्हतीस. ,
आता या सगळ्या सफाईच्या खाचा-खोचा मला माहिती झाल्या आहेत. त्यामुळे कमीत कमी केमिकल्स वापरुन फरशी आणि बाथ-रूम एकदम चकचकीत झाले आहे. अगदी नव्यासारखे. येऊन बघ एकदा!
कोणी तरी म्हटले आहे की माणूस हा सवयीचा गुलाम आहे. कोणतीही सवय अंगवळणी पडायला माणसाला साधारण २१ दिवस लागतात. त्याचा प्रत्यय आला.
ही कामे करायला मला आता जास्त कष्ट किंवा वेळ लागत नाही. अगदी हातासरशी ही कामे होतात.
भांडी घासता घासता मी मोबाइल वर माझी आवडती सिरियल पण बघते. झाडू-पोछा करताना छान गाणी लावते आणि त्या तालावर कामे कधी संपतात ते देखील कळत नाही मला.
अजून एक, हे सारे करताना माझे हात त्या उग्र रसायनांपासून जपतेय. रबरी हातमोजे वापरुन.
आता तुझी वाट बघणे नाही, तू येशील की नाही ही धाकधुक नाही. अचानक पडलेल्या कामांचा ढीग नाही की ते होणार कसे याचे टेन्शन पण नाही.
खरच आता मला जास्त रिलॅक्स वाटताय. स्वावलंबी असण्याचा अर्थ कळतोय. न जाणो अजून काही काळानंतर अमेरिकेसारखी कामवाल्या बायकांची कमतरता भासू शकते आपल्या भारतात सुद्धा… म्हणून आतापासूनच तयार आहे मी.
तू आमचे काम सोडून मला स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून दिलीस. बऱ्याच गोष्टी तुझ्या कडून शिकले. आता मला तू गुरू स्थानी.. म्हणून तुला दंडवत!
एका रविवारी नक्की घरी ये हा बदल पहायला!
तुझी
दीदी
☆
लेखिका : अनामिका.
प्रस्तुती – श्रीमती अनिता जयंत खाडीलकर
सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली
मो 9689896341
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “जीभ 👅 👅…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆
☆
ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण, असा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
रसनेंद्रिय आणि वाक् इंद्रिय! चव घेणे आणि बोलणे. एकाची प्रवृत्ती बाहेरून आत स्विकारण्याची तर एकाची आतून बाहेर पडण्याची! एकाच वेळी असं आत बाहेर काम करण्याचे सामर्थ्य असलेला द्वैत अवयव म्हणजे जीभ
एकाच अवयवावर ताबा मिळवला तर ज्ञान आणि कर्म या उभय प्रवृत्तींना जिंकता येणे सहज शक्य आहे, असा एकमेवाद्वितीय अवयव म्हणजे जीभ
सर्वात जास्त रक्तपुरवठा असणारा हा रसमय अवयव जीभ!
तोंडात आलेला घास घोळवत घोळवत, इकडे तिकडे फिरवत फिरवत, बत्तीशीच्या ताब्यात देत देत, त्यांच्याकडून बारीक पीठ करवून, तयार लगद्याला आतमध्ये ढकलण्याचे महत्त्वाचे काम करणारा अवयव म्हणजे जीभ.
प्रत्येक पदार्थाची चव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळेपणाने ओळखता येणारी, ही आगळीवेगळी जीभ,
भातातून नजर चुकुवून येणारा दगड शोधून काढतेच, पण डोळ्यांना सहजपणे न दिसणारा, अगदी दाताच्या फटीत लपून बसलेला केसही शोधून काढते. ही सीआयडीची दृष्टी असलेला हा कलंदर अवयव म्हणजे जीभ!
सतत बत्तीस दातांच्या संरक्षणात फिरणारा, पण चुकुन मनात आणलं तर चुकीच्या क्षणी, चुकीचा शब्द, चुकीच्या व्यक्तीसमोर बोलून, बत्तीसच्या बत्तीस दात हातात काढून दाखवण्याचे सामर्थ्य असलेला एक चमत्कारिक अवयव म्हणजे जीभ!
बेधुंदपणे अखंड बडबडण्याचे प्रमुख काम करणारा आणि अन्नाला फावल्या वेळात पाठीमागे ढकलण्याचे काम करणारा, पण हे “काम” करताना, कधीही न दिसणारा अवयव म्हणजे जीभ!
दिसतो तो फक्त “आऽऽ कर” असं म्हटल्यावर, थोडाच वेळ दर्शन देणारा अवयव म्हणजे जीभ!
काम करताना मात्र कधीही दिसत नाही, असा “कामानिराळा” राहणारा हा बिलंदर अवयव “जीभ”!
दाताशी युती करत त थ द ध, ओठाशी युती करत प फ ब भ, दंतमूलाशी युती करत च छ ज झ, टाळुशी युती करत ट ठ ड ढ, अशा अनेक युत्या, युक्तीने करत ध्वनी निर्मितीत सहाय्य करणारा युतीबाज अवयव म्हणजे जीभ!
पोटात काय चाललंय, याची बित्तंबातमी बाहेर डाॅक्टरांना दाखवणारा, तोंडात बसवलेला पण पोटाचा जणुकाही सीसीटीव्हीच असलेला एक अवलिया अवयव म्हणजे जीभ!
ओठाबाहेरील जगाला वेडावून दाखवून, आपल्या आतल्या मनाचं, तात्पुरते का होईना, समाधान करून देणारा, हा एक हुश्शार अवयव म्हणजे जीभ!
ज्या एका अवयवाला ताब्यात ठेवले तर शंभर वर्षापर्यंत सहज जगता येईल, अशी दिव्य अनुभूती देणारा एक योगी अवयव म्हणजे जीभ!
आजारी पडेपर्यंत खाणाऱ्यानी बरे होईपर्यंत उपवास करावा, असा संयम शिकणारा एकमेव अवयव म्हणजे जीभ!
उगाच नाही म्हटलंय__
जेणे जिंकीली रसना ।
तृप्त जयाची वासना ।
जयास नाही कामना ।
तो सत्वगुण ।।
– दासवाणी
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी
मो ९४२२३१९९६२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈