☆ पुण्यात जन्म घ्यायचाय ? ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
मुळात पुण्यात जन्म घ्यायलाच पुण्य लागतं…
पहिल्या उष्टावणात पु ना गाडगीळांकडून घेतलेली अंगठी चितळ्यांच्या श्रीखंडात बुडवून बाळाला चाटवली की त्या
बाळाच्या पुणेकर होण्यास सुरुवात होते..
कोवळे नाजूक दात आले की काका हलवाईंकडची आंबा बर्फी किंवा काजू कतली खाल्ली की मग हा पुणेकर
कोणाचेही दात घशात घालू शकतो…
शालेय जीवनात कयानीचा केक खाल्ला नाही तर पुणे महानगरपालिका पालकांना दंड करते म्हणे…
वैशाली, रुपाली, वाडेश्वर मध्ये एकदा तरी खाल्लं नसेल असा माणूस यौवनाची पायरी घसरून एकदम म्हातारा झाला असंच समजावं…
उगा कोल्हापुरातील २-३ आणि नाशकातील २-३ मिसळींचं कौतुक ऐकवणाऱ्याला प्रत्येक चौकात नव्या चवीची मिसळ खिलवणारा खरा पुणेकर …
आमची गणेशोत्सवाची लांबणारी मिरवणूक दिसते.. पण मानाच्या पहिल्या पाच गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीच्या वेळी खरं कळतं ते पुणे, पुणेरी आणि पुणेरीपण…. अख्खी पुण्यनगरी दृष्ट लागेल अशी सजलेली असते…
मराठी संस्कृती आणि नाविन्याची कास धरायची वृत्ती जपली असेल तर ती फक्त आणि फक्त पुण्यानेच…
बाकी पुणेकरांपेक्षा १ ते ४ बंदचा त्रास पुणेतरांनाच जास्त होतो.. पण बहुदा तो त्या वेळेमुळे नाही, तर आपलं
शहर पुण्यासारखं नाही यामुळेच …..
बहुत काय लिहिणे ?
ता. क.
*जन्म नुसता पुण्यात असून चालत नाही. तर तो कसबा , शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार,
रास्ता पेठ, नाना, गणेश, नारायण ,सदाशिव ह्या पेठांमधील असला तरच सोन्याहून पिवळं ….
☆ स्वभाव पदार्थांचे— ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆
माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात. तसेच पदार्थांचेही असते, असं माझं मत आहे.
इडली ही मवाळ प्रवृत्तीची. अगदी लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं.
तुपाबरोबर नि दुध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते. कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही. पण एक नंबरची लहरी बरं का ही! कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल.
मिसळीचं अगदी उलटं. ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या ! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही. फक्त तरुणांची सोबत हिला आवडते. बालके नि वृद्ध हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत. रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना केवळ दर्शनाने नि गंधाने लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!
उप्पीट नि पोहे हे “सामान्य जनता” या वर्गात मोडणारे. म्हणजे अगदी सहनशील! यांच्या वाट्याला कधी कौतुकही येत नाही नि कधी टीकाही येत नाही. ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही. पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरीबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.
गोडाचा शिरा मात्र जरा खास व्यक्तीमत्त्व… खास प्रसंगांना उपस्थित राहणारं! सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी “नशीबवान”. महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ “कडा प्रशाद” नावाचं. तर कुठे “सुजी हलवा” नावानं मिरवणारं.. बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा “शिरा”.
वडा, भजी हे पदार्थांमधले हिरो. लोकप्रिय… पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे. हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल! पावाशी लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!
पावावरून आठवण आली ती पावभाजीची. सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव! बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात
गुण्या – गोविंदाने नांदवून आपला स्वत:चा चवीचा ठसा उमटवणारी खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!
गोड माणसांची दुनियाही अशीच रंगरसीली!
प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर! अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी. कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली! शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच…
“मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी” म्हणत बालपणीच परिचीत झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही. पण नसली तर मात्रं नाडवते.
लाडू हा चराचरातून तयार होणारा.
तूप आणि साखर हे याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा. रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि लक्षात येण्याआधी संपून जाणारा. साध्या पोळीपासून ते राजेशाही डिंकापर्यंत कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे! हा बच्चेकंपनीचा लाडका!
पुरणपोळी ही पक्वानांची राणी!
नाजुक-साजुक स्वभावाची.. महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!
जिलेबी…नटरंगी.. पण बिनभरवशाची.. कधी आंबट तर कधी गोड.. आज कुर्र्यात असणारी कुरकुरीत पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस..
वर्ण काळा असला तरी अंगी गुण असले की साऱ्याचे आपण लाडके होतो…हे शिकवणारा गुलाबजाम!
ओठाला मुरड घालून पोटातला आनंद पोटातच ठेवणारी करंजी!
सगळे गुणीजन भोवताली असताना आणि पटकन सांगता येईल असा एकही गुण अंगी नसताना ज्याच्याशिवाय पान वाढलच जात नाही ते म्हणजे पोळी,भाकरी … आत्मविश्वासाचा वारसा घ्यावा तर त्यांच्याकडून..ना रूप, ना रंग, ना ठसा उमटवणारी चव..पण वर्षानुवर्षे त्यांचं महत्त्व अबाधित आहे.
भाताची मात्र कथा आगळीच…
भात मनमिळावू.
भाता तुझा रंग कसा?….
ज्यात मला मिसळाल तसा…
वरणात रंगून पिवळाधम्म होणारा, साखरभातात केशरात केशरी होऊन जाणारा, पुलावात
रंगीबेरंगी तर दहीभातात पांढराशुभ्र! याला कशाचच वावडं नाही. दहीभात होऊन महादेवाच्या पिंडीवर विराजमान होतो नि चिकन किंवा मटणाशी दोस्ती करून इफ्तार पार्टीतही शामील होतो. सर्वधर्मसमभाव याच्याकडून शिकावा. चटकदार मसालेभाताच्या रूपात, तिखट बिर्याणीच्या थाटात सादर होणारा भात हा गोड केशरी साखरभाताच्या रूपातही प्रकट होतो. रूप, रंग, स्थळ, काळ, वेळ, प्रसंग… कशालाच न जुमानणारा हा भात माणसाला आयुष्याच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत आणि त्यांनतरही प्रामाणिक साथ देतो.
म्हणूनच दक्षिण भारतात त्याला “अन्न” म्हणतात. अन्न बनून एकट्याने माणसाला संपूर्ण आयुष्यभर पोसायचं सामर्थ्य भातात आहे. म्हणून तर जन्मापासून सहाव्या महिन्यात भाताच्या पेजेने सुरू होणारी खाद्ययात्रा मेतकूट भात, वरणभात, आमटीभात, मसालेभात, वडाभात, पुलाव, बिर्याणी करत पुन्हा वरणभात, मेतकूटभात, पेज या क्रमाने माघारी येते नि भाताच्या पिंडाने संपते… इहलोकीच्या प्रवासानंतरही वारसदारांनी ठेवलेल्या दहीभाताच्या रूपाने ती अनंतकाळ तशीच सुरू राहते.. ….
संग्राहक : – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈