आमटीला फोडणी घातली की कसा चर्र असा आवाज येतो, आणि घरभर घमघमाट सुटतो. तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांचा स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला जातो!!
ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भूक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते.
नाती पण अशीच हवीत ना !! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी !!
— फक्त “अंदाज” बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानेच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो, समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणून ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणतंच नातं खुपत नाही.
हिंग कितीही औषधी असला तरीही जास्त पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो !!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडून बोलतो, तीव्र बोलतो आणि मग ते बोलणं कितीही समोरच्याच्या भल्यासाठी असलं तरी, नात्यांमधे वितुष्ट यायला वेळ लागत नाही.
मेथी जराजरी जास्त पडली, तर जेवणात कडवटपणाच येतो. आपणही कधी कधी राग आला की अगदी टाकून बोलतो, टोकाचं बोलतो, इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मग नात्यात अढी निर्माण होतेच ना!! अगदीच कबुल आहे, आपल्या माणसांना हक्कानं बोलावं…पण प्रमाणात. एक वेळ स्वैपाक कडवट झाला तरी चालेल, पण नाती नको!!
कढीपत्ता हा सुगंध येईल इतकाच घालावा, नाहीतर जेवण उग्र होतं. माणूस हा कायमच प्रेमात पडत असतो, कधी व्यक्तींच्या, तर कधी वस्तूंच्या !! एकमेकांवर अतोनात प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात गुदमरायला लावणं वेगळं !! स्वतःला आणि इतरांना झेपेल इतकंच प्रेम करावं, नाहीतर नात्यातला सुगंध हरवून जातो.
हळदीचा रंग मोहक, अगदी प्रमाणात घातली की तिच्या गुणांबरोबर तिचं अस्तित्वही प्रेमात पाडतं. गरज असेल तेव्हा मदत जरुर करावी, पण समोरच्याला “स्पेस” ही द्यावी. आपण आहोत, आपलं अस्तित्त्वं आहे, इतकं जरी समोरच्याला जाणवलं ना, की मग सगळंच सोप्पं होतं.
तेलही आवश्यक इतकंच !! भसाभसा ओतून किंवा अगदी थेंबभर घातलं की फोडणी बिघडलीच म्हणून समजा !! जास्त तेल पडलं तर मूळ पदार्थापेक्षा तेलाचीच चव जिभेवर रेंगाळेल, आणि कमी पडलं तर ते इतर घटकांना सामावून कसं घेणार?? नात्यात ओशटपणा नको. आपल्यात इतरांना सामावून घेण्याइतका मोठेपणा असावा, पण आपण किती महान आणि किती चांगले हे त्यांना न जाणवता, कसलाच दिखावा न करता !! तरच मनं एकमेकांत सामावली जातील.
आपल्या स्वैपाकात मिरचीचं प्रमाण कसं आणि किती असावं ? तसंच मुळमुळीत नाती नकोशी होतात अन तिखटपणा, जहालपणा नात्याला सुरुंग लावतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच !! फोडणी फक्कड तेव्हाच जमते, जेव्हा भांड्याखालची आच योग्य प्रमाणात असते अन भांडं योग्य प्रमाणात तापतं तेव्हा !! जर आच प्रमाणापेक्षा कमी असेल, तर फोडणी कच्चीच राहील आणि सगळ्या स्वैपाकाची मजाच जाईल. जर आच प्रमाणापेक्षा जास्त असेल तर रागाप्रमाणे त्यातला प्रत्येक घटक तडतडून अंगावर उडेल, इजा होईल, मोहक हळद काळी पडेल आणि फोडणी जळेल.
अत्यंत बेताच्या परिस्थितीतून शिक्षण घेतलेले दोघे. उच्च विद्या विभूषित. पदवी घेतल्यानंतर लग्न करतात.. स्वतःवर विश्वास असलेले शून्यातून विश्व निर्माण करायला निघतात. तो पैसे मिळविण्याकरिता करिअर करण्यात रममाण होतो. खूप स्वप्नं उराशी बाळगलेली ती संसारात मुलाबाळांच्यात पूर्ण विरून जाते. कायम सहकाऱ्याच्या रुपात आपली भूमिका बजावत राहते. तिला आवाज असतो पण बोलून उपयोग नसतो. अजून काही दिवस म्हणून शांत राहते.. प्रतिष्ठेला भुकेलेला आणि स्वतःला सगळं समजतंय या अविर्भावात असलेला तिचा जोडीदार, तिच्या मनाचा, करिअरचा विचार करत नसतो. ” तू हवं ते करु शकतेस !” असं म्हणायचं पण घरातली कोणतीही जबाबदारी उचलायची नाही. आपलं काम आणि समाजकार्याचं भूत डोक्यात घेऊन कोणत्या ना कोणत्या कामात गुंतून पडायचं. तिची केविलवाणी धडपड चालू राहते. सगळंच अंगावर पडल्यामुळे तिला काही सुचत नसतं. तिची खूप चिडचिड आणि स्वतःचा त्रागा होत राहतो.
एखाद्या गोष्टीला विरोध केला की, वाद-विवाद भांडण, अंगावर येणं, हात उगारणं ठरलेलं. स्वतःचे आई वडील, भाऊ बहीण यांच्यात रममाण. ” माझेच दोन रुपये घ्या पण मला साहेब म्हणा !” अशी त्याची अवस्था.
दोन मुलं, त्यांची शाळा, मुलांवरील संस्कार, स्वयंपाक, घरकामाचे नियोजन सगळं तिनचं पाहायचं..! मुलं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात छान प्रगती करतात.. त्यावेळी माझी मुलं म्हणून ओरडून ओरडून सगळ्यांना सांगायला हा पुढे पुढे पळायचा. मुलांना हे नको ते नको म्हणून आडवं पडायचे. त्यांच्याशी भांडणाच्या स्वरात बोलायचे. त्यांच्या वयाचे होऊन त्यांना समजून घ्यायचे नाही. स्वतःचे महत्त्व कायम अधोरेखित करायचे. सगळं श्रेय स्वतःला कसं घ्यायचे याची कला वाखाणण्याजोगी.
एक दिवस हा माणूस आपल्या बायकोला म्हणतो. ” आपली मुलं चांगली घडली. आपण आदर्श पालक आहोत. आपण घरात समतेने, लोकशाहीने वागलो. याचा मुलांवर चांगला परिणाम झाला..!” ती मागचं सगळं आठवते आणि म्हणते, “दहा मिनिट शांत बसून विचार कर ! लोकशाही, समता कशाला म्हणतात याचा अभ्यास कर ! मग बोलू आपण…. “
☆ रे मना… आज कोणी बघ तुला साद घाली… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
मन ! संस्कृत आणि प्राकृतातही एकच शब्द, काय आहे हो याची व्याख्या ?
“The heart is situated at the left side in the human body“–असं हृदयाबद्दल खात्रीशीर सांगितलं जातं मग मनाचं काय? कुठे असते ते वसलेलं ? हृदयात? हृदयाच्या पाठीमागे ? शरीराच्या उजव्या बाजूस ? मेंदूत ? नेमके कुठे? काहीच सांगता येत नाही ना?
बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचे झाले तर ‘आता होतं भुईवर, गेलं गेलं आभायात’. असंच काहीसं मनाचं स्थान आहे. शरीरात कधीच स्थिर नसणारे मन, ठावठिकाणा नसणारे मन, आपल्या शरीरावर ,जीवनावर मात्र प्रभावशाली अंमल करते. हृदयाची जागा खात्रीशीर असून देखील ते कधीकधी कमजोर असते ,नव्हे ते कमजोर असले तरी चालते कदाचित ! त्यावर उपचार करता येतात.. पण मन कमजोर असेल तर? तर मात्र माणूस पूर्ण दुबळा होतो. त्याची जगण्याची दिशा बदलते, त्याची आकांक्षा ,उमेद सर्वच नष्ट होते.
A sound mind in a sound body असं म्हटलं आहे ते उगाच नव्हे ! ‘ मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ‘!! असं तुकारामांनी म्हटलंय; कारण माणसाचे मन शुद्ध असेल तर त्यात सर्व भाव शुद्ध येतात, अन कर्मेही शुद्धच होतात.स्वच्छ पाण्यात सभोवतालचा परिसर स्वच्छच दिसतो. तसेच मनाचे देखील आहे. मनापासून केलेले कोणतेही काम मनाला आनंद ,उत्साह ,उभारी देते अन मन प्रसन्न करते. आणि त्यावरच त्या कामाची यशस्वीता देखील अवलंबून असते . वरवर केलेले काम भलेही चांगले दिसले तरी स्वतःस समाधान देत नाही . मन लावून केलेली देवपूजा मन शांत करते ,चित्त प्रसन्न करते. मन लावून धुतलेले कपडे ,घासलेली भांडी कशी स्वच्छ ,चकचकीत होतात ! मन लावून केलेला स्वयंपाक रुचकर होतो अन भूक तृप्त करतो .मनापासून केलेला अभ्यास ज्ञान वाढवतो. मनापासून गायलेलं गाणं हृदयास भिडते ,असे सर्व काही मनाच्या ओलसर भूमीतून अंकुरते .
एवढ्याश्या मनाची व्याप्ती मात्र खूप मोठी असते. शक्ती तर कितीतरी पट मोठी असते. म्हणून पंगूसुद्धा हिमशिखरे ओलांडतात, नावेशिवाय नदीचा तीर गाठतात. ‘ मन कधी कधी इतके छोटे होते की चिमटीहून लहान जागेत मावते अन कधी इतके मोठे होते की त्यात सारे अवकाश सुद्धा समावते ‘…..
‘मन एवढं एवढं जणू खाकशीचा दाणा
मन केवढं केवढं त्यात आभाय मायेना !’
मनोव्यापारावर मानवी देह व जीवन अवलंबून आहे. कधी ते आकाशात स्वैर भरारी मारते तर कधी फांदीवर बसून हिंदोळते. कधी चांदणे बनते तर कधी गच्च काळोख ! कधी भिरभिरते तर कधी स्थिर बसते ! अगदी निमिषार्धात ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाते.आपल्या प्रिय व्यक्तीपाशी पोचते. त्याच्याशी हितगुज करते, कधी रुसते तर कधी हसते, कधी खट्टू होते तर कधी लट्टू !
या जगात सर्वात वेगवान काय असेल तर ते मन ! एवढे मात्र खरे की, मन उत्साही असेल तर जीवन उत्साही प्रवाही राहते. मनाला कीड लागली , आजार लागला तर देह कितीही सशक्त असला तरी कमजोर बनतो, आजारी पडतो .
मन तरुण असेल तर ते म्हातारपणही टवटवीत बनवते, आणि मन म्हातारे असेल तर तारुण्यातही म्हातारपण येते. म्हणूनच मनाला हवे जपायला फुलासारखे ! मग बघा या फुलाभोवती किती रंगीबेरंगी आनंदाची फुलपाखरे रुंजी घालतात अन जीवन मधाळ फुलपाखरी होते !…. फुलपाखरू खरेच छान किती दिसते !!
लिहायला हवंच खरं तर. हा विषय डोक्यात नव्हता. कालपासून ग्रुपवर मेसेज बघितल नव्हते. आत्ता पाहिले,आणि मग राहवलं नाही. मी स्वतःला तसं कधी मानत नाही, पण शेवटी सत्य तेच असतं. म्हणून विचार केला की इतक्या गोष्टींचं प्रतिनिधित्व करते, आता विधवांचं देखील करावं.
मुळात मला स्त्रियांमध्ये विधवा, सधवा, परित्यक्ता, घटस्फोटिता ,कुमारिका, असा भेद करणं मान्य नाही. सगळ्या पुरुषांच्या नावाच्या आधी श्रीयुत लावलं जातं, मग सौभाग्यवती आणि श्रीमती असा भेद का असावा ? थोडंसं परखड होईल पण पुढील गोष्टीवरुन लक्षात येतं की पुरुषप्रधान संस्कृतीमधील हे जोखड आहे, किंवा आपमतलबी पुरुषांनी तयार केलेली ही संस्कृती आहे.
समस्त स्त्रियांना नटण्याची, छान दिसण्याची आवड असते हा मुद्दा बाजूला ठेवला तरी —– मंगळसूत्र,मांग-टीका,जोडवी, सिंदूर ही आभूषणे काय दर्शवतात? या एका स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि त्या एका स्त्रीचं झालेलं नाही. फक्त एखाद्या पुरुषाला बघून कळतं का, तो अविवाहित आहे की विवाहित? स्त्रीकडे बघून मात्र लगेच लक्षात येतं आणि अंदाज देखिल बांधले जातात.
आता मुद्दा विधवा स्त्रियांनी ओटी भरून घेणं, हळदीकुंकू लावून घेणं– हे नाकारण्याचे, तिच्यावर हजारो वर्षापासून झालेले संस्कार आहेत, ” तू जर शुभकार्यात पुढे झालीस तर तिथे काही तरी अशुभ होईल.”—- मग कोणाला वाटेल की आपल्यामुळे कोणाचे वाईट व्हावे?—- मी एक स्वावलंबी, सुशिक्षित, पुरोगामी, काहीशी बंडखोर वृत्तीची असून सुद्धा काही वेळा माझ्या मनात असा किंतु क्षणैक का होईना येतो. मग ज्या महिला परावलंबी आहेत, कमवत नाहीत, त्यांच्या मनात भीती असणारच ना आणि सालोसाल चालत आलेल्या संस्कारांचे ओझे झुगारून देणे अजिबातच सोपं नसतं.
कोणत्याही धर्माबद्दल मला काही म्हणायचे नाही. परंतू = गार्गी मैत्री राहतात पुराणात. वर्तमानात अजूनही माझ्यासारख्या महिलेला ओवसायला जाताना कोणी हाक मारीत नाही, की वडाची पूजा करताना पर्यावरणाचा विचार करून सुद्धा कोणी बोलावीत नाही.—- तुम्ही साऱ्याजणी डॉक्टर आहात विचाराने पुरोगामी आहात. पण समाजातील हे प्रमाण किती टक्के? बहुसंख्य समाज झी मराठी आणि कलर्स प्रमाणे चालतो. तिथले सगळे सणवार हेव्यादाव्यांसह, श्रद्धा-अंधश्रद्धा यासह समाजात साजरे केले जातात.
कधी कधी वाटते, .. फुले, आंबेडकर, आगरकर, शाहू महाराज, यांचा पुरोगामी महाराष्ट्र हाच आहे का? सुदैवाने माझे सासर, माझ्या सर्व मैत्रिणी अतिशय पुरोगामी आहेत. त्या असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. पण मला वाटायचे की असे व्यक्त व्हायची गरज का असावी? फक्त एका स्त्रीतत्वाने दुसऱ्या स्त्रीतत्वाचा सन्मान करणं जमू नये का? जसं पंढरीच्या वारीत प्रत्येक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याला माउली म्हणून भेटतो, त्याचप्रमाणे तू कोणीही अस– विधवा, सधवा, घटस्फोटिता अथवा कुमारी – तुझ्यातल्या स्त्रीत्वाचा माझ्यातलं स्त्रीत्व सन्मान करतंय, आणि म्हणून मी तुला हळदीकुंकवाची दोन बोटं लावते, एवढं साधं आहे. – आणि हे जमू नये हे आपलं दुर्दैव.
बाकी मधु, विषयाला वाचा फोडल्याबद्दल खरंच आभारी आहे आणि सावंतवाडी वैद्य राण्यांमधील सर्व सख्यांचे पण आभार.
लेखिका – डॉ. दिपाली घाडगे, विटा..
प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले
मोबाईल नंबर 8482939011
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मराठी — लेखक – डाॅ. विनय काटे ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
माझा लय जीव हाय ह्या बाईवर. मस्त, मोकाट, उंडारल्या खोंडासारखी भाषा ! लावल तितके अर्थ कमी ! पंढरपूरच्या घाटापासून ते पुण्यातल्या पेठेपर्यंत किती कळा तिच्या अंगात !
नाकातून आवाज आला की लगेच कळतं की कोकणातून लेले किंवा नेने आलेत. “रांडेच्या” म्हणले की लगेच कोल्हापुरी पांढरा रस्सा आठवतो. ” का बे छिनालच्या ” म्हणलं की सोलापूरची शेंगा चटणी आणि “पोट्ट्या” म्हणलं की नागपुरी सावजी जेवण. पोरीच्या तोंडून ” मी तिथे गेलो” आणि “ऐकू आलं म्हणलं की सांगली !! “काय करून राहिला?” म्हणलं की नाशिक, “करूलाल?” म्हणलं की लातूर आणि ” विषय संपला ” म्हणलं की पुणे !! हेल काढून बोललेला नगरी किंवा बीडचा आणि “ळ” चा “ल” केला की कोकणी ! एका वाक्यात माणसाचं गाव कळतं.
हिंदी बोलताना तर मराठी माणूस लगेच कळतो. आमच्या इतकी हिंदीची चिंधी कुणीच केली नसेल. मराठी माणसाचे हिंदी आणि मुसलमान बागवान लोकांची मराठी म्हणजे विष विषाला मारते त्यातला प्रकार. ” हमारी अडवणूक हो रही है ” हे मराठी हिंदी, आणि ” वो पाटी जरा सरपे ठिवो ” ही बागवानी मराठी ऐकून मी लय खुश होतो राव ! मराठी खासदार आणि राजकारणी लोकांचं हिंदी ऐकून तर हिंदी पत्रकारांना घाम फुटत असावा.
एकाच गोष्टीला प्रतिशब्द तरी किती ? बायको, पत्नी, सौभाग्यवती, अर्धांगिनी, सौ, खटलं, कुटुंब, बारदान, बाई, गृहमंत्री, मंडळी—- इत्यादी सगळ्याचा अर्थ एकच– ! “इ” सारख्या आडवळणी शब्दापासून पण सुरु होणारे कितीतरी वेगवेगळे अर्थाचे शब्द… जसे की “इस्कोट”, “इरड करणे”, “इरल”, “इकनं”. — “ग्न” ने शेवट होणारे चार शब्द मराठीत आहेत … लग्न, मग्न, नग्न आणि भग्न. किती मस्त क्रम आहे ना? हे “ग्न” बाबत आमच्या मास्तरच ज्ञान !
इदुळा, येरवा, आवंदा, कडूस पडाय, झुंजूमुंजू, दोपार, सांच्याला, रातीला, तांबडं फुटायला— यातून जो वेळ कळतो त्याची मजा am, pm ला कधीच येणार नाही. कोरड्यास, आमटी, कट, शेरवा, तर्री, शॅम्पल यातला फरक कळायला महाराष्ट्र उभाआडवा बघावा लागतो. खेकडा कुठला आणि चिंबोरी कुठली? उंबर कुठलं आणि दोड्या कुठल्या? शाळू, ज्वारी आणि हायब्रीड यातला पोटभेद कळायला रानातली मराठी लागते. कडवाळ कुठलं न मका कुठला हे शेरातला शाना कदीबी सांगू शकत नाय !
खाण-पिणं असू द्या, जनावरं-जित्राब असू द्या, शिव्याशाप असू द्या, लाडाची नाव असू द्या, वेळ-काळाची गणित असू द्या, हुमान-कोडी असू द्या, ओव्या-अभंग असू द्या, अंगाई असू द्या, सणवार असू द्या, झाडाझुडुप असू द्या, शेतीची अवजारे असू द्या, कापडचोपड असू द्या नाहीतर अजून काही,—- मराठी प्रत्येक ठिकाणी वेगळी असते. प्रत्येक गावात, शहरात, कामात, धंद्यात … सगळीकडे मराठीचा वेगळा बाज असतो, अंदाज असतो आणि लकब असते. दिवसातून ५ वेळा कपडे बदलणाऱ्या अवखळ, सुकुमार पोरीसारखी ही भाषा सगळीकडे नवनवे रंग उधळत असते.
माय मराठी… तुझ्यावर लय जीव आहे बाये !!! अशीच उंडारत राहा… वारं पिलेल्या खोंडासारखं !!
लेखक : डॉ. विनय काटे
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पाहता पाहता २०२२ संपत आलं, नव्हे संपलंच. प्रत्येक नवीन वर्षात अनेक गोष्टी , अनेक घटना घडतात. काही खूप संवेदनशील असतात तर काही आयुष्यभर आनंद उत्साह निर्माण करणाऱ्या असतात. तर काही हे घडलं नसतं तर बर झालं असतं, असे मनाला वाटून जाणाऱ्या असतात. काही आनंद हे दुःखाची झालर वा अस्तर लावून येतात. पण चेहऱ्यावर कधीच त्याच्या छटा दिसू दिलेल्या नसतात. पण असं का ? खरं जगावं, सुखात आनंदी, दुःखात थोडं निराशा दाखवण्याचे स्वातंत्र्य नाही का आपल्याला…! खरं जगूया, खरं बोलूया ! एकमेकांच्या सोबत सुख दुःख वाटून घेऊ या..!
वेदनेचं गाणं करता यावं आणि संवेदनेने ते गात रहावं. आणि हो आनंदाचा उन्माद होऊ नये एवढं मात्र नक्की करावं
नवे पान, नवे पर्व, नवे संकल्प, येणाऱ्या नव्या वर्षाने निर्माण केलेली नवी आशा, नवी स्वप्नं, उगवणारा नेहमीचाच सूर्यही जणू नवरंगांची किरणं घेऊन अवतरलाय, असा भास देणारा नव्या वर्षाचा पहिला दिवस!
मागे वळून पाहताना, जाणाऱ्या या वर्षाला निरोप देताना, मनात संमिश्र भावनांचा कल्लोळ आहे. काळाच्या बारा पावलांची, कधी सरळ, कधी वळणावळणाची, कधी चढ उताराची, काट्यांची, फुलांची, दगड गोट्यांची, रंगीत व रंगहीन वाट, पुन्हा एकदा न्याहाळून पाहताना, सहज मनात येते.. वर्ष संपले म्हणजे नक्की काय झाले?
कालचक्र अव्याहत फिरत असते. कालगणनेची गणितं मनुष्यनिर्मित आहेत. बाकी खरं म्हणजे एक दिवस जाणारा आणि एक दिवस येणारा यापेक्षा नवे काय? फक्त काळाच्या बारा पावलांनंतर आज आणि उद्या मधल्या अंतरात काही क्षणांची विश्रांती, असं म्हणूया आपण. वर्षाच्या चार आकडी संख्येच्या एककामध्ये एकाने झालेली बेरीज. भिंतीवरच्या जुन्या कॅलेंडरला काढणे आणि त्या जागी नवे कोरे कॅलेंडर लटकवणे. काय बदलतं?
कसे गेले हे वर्ष?
राजकीय, सामाजिक, वैयक्तिक बेरजा वजाबाक्या यांचं गणित मांडताना उत्तराचा झालेला गोंधळ हाही काही वेगळा असतो का?कुठे मंगल तोरणे तर कुठे प्रिय जनांचा वियोग.कुठे बढती कुठे बेकारी.कुठे यश कुठे अपयश.वादळं,तुफान,भूकंप तर कधी हिरवळ..आंसु आणि हंसु..माणसाने वर्षे मोजली आणि नियती हसली..
त्याच त्याच राजकीय धुळवडी पाहिल्या. नवे भाष्य, नवी विधानं, आरोप प्रत्यारोप, धार्मिक अन्याय,भावनिक गळचेपी वगैरे वगैरे… सगळा खमंग गोंधळ कान टवकारुन आणि डोळे फाडून पाहिला— ऐकला. काही आत गेले काही बाहेर आले. निवडणुका रंगल्या. कोणी हरले कोणी जिंकले. गुलाल उधळले, ढोल वाजले. पण हे सारं पाहताना मनात एवढंच आलं यापेक्षा मागचं वर्ष चांगलं गेलं!
आंतरराष्ट्रीय परिषदा भरल्या. सगळेच गोलमाल.युद्धे चालूच आहेत.सत्तेपायी अमानुषता बोकाळलीय्.प्रचंड हिंसाचार.”थांबवा रे!मला शांती हवी आहे!” हे सूरच गोठलेत.
पर्यावरणाविषयी कळवळून मुद्दे मांडले गेले आणि प्रत्यक्ष मात्र आम्हाला डोंगर तोडणारे, झाडे तोडणारे हातच दिसले. वीज नाही, पाणी नाही म्हणत वणवणारी जनताच दिसली. कव्हर पेजवर विकासाची गणित मांडणारे आलेख, हसणारे चेहरे, दाटलेली हिरवळ आणि आतल्या पानात खून, बलात्कार,अपघात, भूकबळी. मसल पाॅवर. असा रक्तबंबाळ माणूस.. पूर्ण विश्वातलाच.. पाहताना एवढंच वाटलं काय बदललं?
डाव्या हातातलं जाणारं वर्ष उजव्या हातातल्या येणाऱ्या नव्या कोऱ्या वर्षाला सांगते आहे,” बघ रे बाबा! तुला काही जमतय का? मी तर चाललो. तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”
जन्माला आलेलं हे दोन हजार तेवीस नावाचं बाळ मात्र खूपच गोंडस भासतंय. कुणा युगंधराचा अवतार असंच वाटतंय. कायापालट घडवून आणेल हे बाळ! या क्षणी तरी अनेक आशा, स्वप्नं, सुख- शांती, समृद्धी घेउन अवतरले आहे , असं आतून जाणवत आहे. बघूया याच्याही कुंडलीतले नवग्रह योग! विधात्यांनी मांडलेली २०२३ची ही पत्रिका अखिल विश्वासाठी फलदायी ठरो!इतकंच..
(आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!!) इथून पुढे —
शरमलेल्या बाबांना मी म्हणालो, “ बाबा लाजू नका, आपण आता मस्त आंघोळ करू….”
तेवढ्यातूनही बाबा म्हणाले, “ माझ्या लोकांनी मला नागडं करून जेवढी लाज आणली, त्यापेक्षा ही लाज काहीच नाही बाळा …”
यानंतर बाजूच्या दुकानदारांकडून बादली, पाणी आणि मग आणून, फुटपाथवर सूर्यानं जिथं ऊन दिलं होतं, तिथं या उन्हामध्ये बाबांना बसवलं आणि साबणाने त्यांना आंघोळ घातली….डोक्यावर प्रत्येक वेळी पाण्याचा तांब्या मी उपडा केला की ते म्हणायचे ….”शंभो”…! — इथे मला जाणवलं, की मी कुण्या माणसाला आंघोळ घालत नाहीये…. तर मी अभिषेक करतोय…. !!!
निर्वस्त्र बसलेल्या त्या बाबांचा पाय मी धुवायला घेतला…. आणि सहज त्या निर्वस्त्र रूपातल्या बाबांकडे माझं लक्ष गेलं…. त्या क्षणी मला वाटलं… आता मला कोणत्याही मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालण्याची गरज नाही… माझ्या हातात साक्षात पाय आहेत !
खरंतर आठ महिने अंघोळ नसताना, शौच वगैरे गोष्टी कपड्यातच घडत असल्यामुळे त्यांच्या अंगाला एक विचित्र असा वास येत होता…. खरंतर त्यांच्या आसपास, चार फुटाच्या परिसरात जाणेसुद्धा अतिशय क्लेशदायक होतं…
याची जाणीव त्या बाबांना सुद्धा असावी…. प्रत्येक वेळी ते म्हणत होते, “ माझ्या जवळ येऊ नकोस, मी अत्यंत घाणेरडा झालो आहे… I am infected…!!!”
मी मनात हसत त्यांना म्हणालो, “ जाऊ दे बाबा , आमच्यापैकी सर्वच जण असे आहेत, तुम्ही ते कबूल करत आहात, आम्ही ते कबूल करत नाही, इतकाच काय तो फरक ! “
कडक टॉवेलने अंग पुसून, बाबांना पांढराशुभ्र सदरा आणि लेंगा घातला. मघाचे बाबा ते हेच काय ? असे वाटावे इतका कायापालट झाला होता. यानंतर कडेवर घेऊन मी त्यांना ॲम्बुलन्समधील स्ट्रेचरवर झोपवलं…. एका मिनिटात ते गाढ झोपी गेले…. लहानपणी सोहमला मी असाच अंघोळ घालून, कडेवर फिरवत कॉट वर ठेवायचो आणि तो गाढ झोपी जायचा…. !
का कोण जाणे, परंतु या बाबांमध्ये मला माझा मुलगा दिसत होता…. !
” एकरूप ” होणं हा भाव असेल, तर ” एकजीव ” होणं ही भक्ती आहे असं मला वाटतं… !
नकळतपणे मी या बाबांशी एकरूप नव्हे…. एकजीव झालो होतो !
— चला, बाबांच्या अंगावर टाकलेली माझी चादर मंजूर झाली तर….!
सोमवार १९ डिसेंबर रोजी या बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.
बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून मी परत निघालो, बाबा आता प्रसन्न हसत होते. जाताना मला म्हणाले, “ बाळा इतकं केलंस. आता आणखी एक शेवटचं कर… माझ्या घरातल्या लोकांशी संपर्क कर आणि त्यांना माझा निरोप दे, म्हणावं…. मी खुशाल आणि आनंदात आहे. माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही जे वागलात, त्यात तुमचीही काहीतरी अडचण असेल, फक्त त्यावेळी मला ती समजली नाही इतकंच…. हरकत नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही अढी नाही. मी तुम्हाला माफ केलं आहे… त्यांना सांग, मी सर्वांना खरोखर मनापासून माफ केलं आहे “.
— खूप मोठ्या मुश्किलीने शून्यात पहात नमस्कार करण्यासाठी त्यांनी हात जोडले…. नजरेच्या या शून्यात त्यांना त्यांच्या घरातले सर्वजण दिसत असावेत…
इतका वेळ शांत असणारा मी… त्यांची ही वाक्ये ऐकून मात्र चिडलो… रागाच्या भरात ओरडून, मी त्यांना म्हणालो,
“ मी त्या तुमच्या लोकांशी कोणताही संपर्क करणार नाही…. तुमचा माफीनामा पोचवणार नाही… ज्यांनी तुम्हाला इतका त्रास दिला त्या लोकांची थोबाडं मला पाहायची नाहीत… मी काय रिकामा बसलो नाही तुमचा माफीनामा पोचवायला, बाकीची अजून शंभर कामं आहेत मला….”
माझा तोल सुटला होता… म्हाताऱ्या या माणसाला त्यांच्याच घरातल्या सर्वांनी इतकं अडचणीत टाकलं होतं , त्याचा राग मला येत होता आणि हे बाबा त्यांना माफ करायला निघाले होते, त्याचा दुप्पट राग मला आला होता …
यानंतर, तितक्याच शांतपणे हे बाबा मला म्हणाले, “ अरे बाळा चिडू नकोस…. माझ्या घरातल्या लोकांना मी प्रेम, माया, आनंद, सुख, समाधान, दया, क्षमा, शांती या पुस्तकातल्या सर्व शब्दांचा अर्थ आयुष्यभर समजावण्याचा प्रयत्न केला…. परंतु त्यांना हे अर्थ संपूर्ण आयुष्यात कधीही समजले नाहीत… या आजारपणात मी टिकेन की नाही याची खात्री तुलाही नाही आणि मलाही नाही… जिवंत असताना त्यांना कोणत्याही शब्दाचा अर्थ शिकवू शकलो नाही … आता मरताना ” माफी ” या शब्दाचा अर्थ तरी मला त्यांना शिकवू दे बाळा….!!! प्लीज बाळा …. प्लीज हा निरोप त्यांना दे … आयुष्याच्या उताराला, माफी हा शब्द तरी त्यांना शिकण्याची संधी देऊ आपण…! नाही म्हणू नकोस बाळा. माझा “माफीनामा” त्यांना पोचव…. “.
आज मला पुन्हा एकदा पटलं…. सतारीवर दगड जरी मारला तरी तिच्यातून मधुर झंकारच बाहेर येतात…!!!
बाबांनी जे विचार मांडले, त्यात माझ्या खुजेपणाची मला जाणीव झाली…! डॉक्टर झालो …खूप शिकलो … सुशिक्षित सुद्धा झालो, परंतू या सर्व प्रवासात सुसंस्कृतपणा शिकायचं माझ्याकडून सुद्धा राहूनच गेलं यार….!
रस्त्यावरच्या बाबांनी आज मला “ माफी “ या शब्दाचा अर्थ त्यांच्या वागण्यातून समजावून सांगितला…!
बाबांनी पुन्हा हात जोडण्याचा प्रयत्न केला…. काही केल्या नमस्कारासाठी हात जुळत नव्हते…. मी ते दोन्ही हात माझ्या हाताने जुळवले…!
जुळवलेल्या या दोन्ही हातांना कपाळाशी लावून मी फक्त इतकंच म्हणालो, “ बाबा मला माफ करा…!!! “
माफी …. क्षमा …. या पुस्तकात वाचलेल्या शब्दांचा अर्थ मी आज खऱ्या अर्थाने हृदयात घेऊन सुसंस्कृत झालो होतो…. बाबा माझा प्रणाम स्वीकार करा !!!
(खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???) इथून पुढे —-
बाबांची अवस्था पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं….
गेले आठ महिने अंघोळ नाही, संडास लघवीवर कंट्रोल नाही आणि त्यामुळे ती कपड्यातच होते, बाबांच्या घरातल्या लोकांनी त्यांची जरी साथ सोडली तरी सुद्धा रस्त्यावरच्या किड्यांनी, माशांनी बाबांची साथ सोडली नव्हती…. ते त्यांच्या डोक्यात आणि हाता पायावर, चेहऱ्यावर मुक्तपणे फिरत होते…!
आम्ही तुमच्या सोबत आहोत बाबा, असं तर या कीड्या आणि माशांना सांगायचं नसेल ?
…… अडचणीत साथ सोडणारे घरातले आपले ? की संकटाच्या काळात सोबत करणारे हे किडे आणि माशा आपले ?? आपण अडचणीत सापडलो की लोक हात पकडण्याऐवजी आपल्या चुका पकडतात हेच खरं…. !
ज्या दिवशी बाबा मला आठ महिन्यांपूर्वी शेवटचे भेटले होते, त्यानंतर त्यांना पॅरालिसिसचा आणखी एक झटका आला होता. ते आता जास्त हालचाल करू शकत नव्हते आणि म्हणून ते एकाच ठिकाणी पडून राहिले….
रस्त्यावर भेटलेल्या अनेकांना त्यांनी माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवा असे सांगितले, परंतू आठ महिन्यात एकाही माणसाने माझ्यापर्यंत हा निरोप पोहोचवला नाही….
रोजच्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम मध्ये मी अडकावं…. त्यानंतर मी रस्ता बदलावा…. तिथेही पुन्हा ट्रॅफिक मध्ये मी अडकावं…. मला हे बाबा दिसावेत…. ही निसर्गाची योजना होती !
बाबांशी बोलत होतो, परंतु डोक्यात विचारांची गर्दी झाली….
काय करता येईल या बाबांचे ? यांचे आत्ता आधी हॉस्पिटलमध्ये उपचार करून घेणे गरजेचे आहे… त्याआधी यांना संपूर्ण स्वच्छ करायला हवं… ! पुढे बघू नंतर जे सुचेल ते करू…
काही एक विचार करून, मी बाबांना म्हणालो, “ बाबा आज आत्ता शनिवारचा दुपारचा दीड वाजला आहे, मला उद्याचा दिवस द्या…. सोमवारी सकाळी दहा वाजता मी परत इथे येतो… ! “
खरंतर बाबा अतिशय गंभीर अवस्थेत होते…. त्यांना त्याच वेळी ऍडमिट करणे गरजेचे होते, परंतू कायद्याच्या चौकटीत राहून अनेक बाबी करणे अपरिहार्य असतं, आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा होता….!
बाबांना मी दोन पंप दिले … दर पंधरा मिनिटांनी ते पंप ओढायला सांगितले…. आठ महिने जगलात तसे आता सोमवार सकाळी दहा वाजेपर्यंत जिद्द सोडू नका, असं सांगून मी तिथून पुढल्या बाबी करण्यासाठी निघणार, इतक्यात बाबांनी मला खुणेने बोलावलं…. खूप मोठ्या मुश्किलीने ते बोलले…. “ काळजी करू नकोस , तू येईपर्यंत मी मरणार नाही…. अरे, डोळे मिटले म्हणून कोणाला मरण येत नाही…. चार चौघांनी आपल्याला खांद्यावरून खाली ठेवलं… बाजूला केलं की येतं ते मरण ! “ बाबांचा रोख त्यांच्या कुटुंबावर होता….! खरं होतं बाबांचं …. मी आता तिथून निघालो…
शनिवार रविवार आवश्यक त्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्या… मनीषाने बाबांची पूर्ण बॅग भरली… साबण, टूथपेस्ट पासून अंडरपॅन्टपर्यंत तिने सर्व तयारी केली…न पाहिलेल्या बापाची ती मुलगी झाली होती…! मी दाढी कटिंग चे सामान तयार ठेवले…. ‘मंगेश वाघमारे’, माझा सहकारी, याला आवश्यक त्या सर्व सूचना देऊन, सोमवारी सकाळी दहा वाजता स्पॉटवर येण्यास सांगितले….
रविवारची अख्खी रात्र तळमळण्यात गेली….अतिशय गंभीर अवस्थेत असलेले हे बाबा मी जाईपर्यंत जाणार नाहीत ना… ? ते असतील ना ? मी जाईपर्यंत राहतील ना ? या विचारात पहाटेचे साडेचार वाजले….
एखाद्याची जबाबदारी मनापासून घेतल्यानंतर… ती व्यक्ती पूर्णतः आपल्यावर विश्वास ठेवते… एखाद्याचा हा विश्वास जपण्यात जीवाची किती ओढाताण होते, हे मी शब्दात काय सांगू ???
आणि प्रश्न इथे एका बापाचा होता…. !
सोमवारी सकाळी लवकर सर्व तयारीनिशी मी गडबडीत निघालो, लिफ्टमध्ये सर्व सामान घेऊन जाताना मनीषा म्हणाली, “ अरे अभिजीत गडबडीत तू बूट किंवा चप्पल घातलीच नाहीस…” – च्याआयला , गडबडीत खरंच मी पायात काही घातलं नव्हतं…
यानंतर मी पायात बूट अडकवला पण जाणीव झाली, ज्या बापासाठी चाललो आहे, त्या बापाच्या पायात सुध्दा काही नाही… मग जाताना यांना एक बूट घेतला ! हे सगळं करून स्पॉटवर जाईपर्यंत मला अकरा वाजले….
मी त्या स्पॉटवर पोहोचलो…. परंतु त्या स्पॉटवर कोणीही नव्हते… ज्या स्पॉट वर बाबा राहत होते तिथे मी पोहोचलो, तेव्हा मला फक्त त्यांचे रिकामे अंथरूण दिसले…. इतर काही साहित्य दिसले … पण बाबा दिसले नाहीत…!
हे सर्व पाहून माझं अवसान गळालं… सोमवार पर्यंत सुध्दा बाबा माझी वाट पाहू शकले नाहीत…. ते गेले, या विचाराने माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू यायला सुरुवात झाली…
आणि तितक्यात मला एक आवाज आला…” सर आम्ही इकडे आहोत…” . हा आवाज मंगेशचा होता…!
मी वळून पाहिलं…. आमच्या मंगेशने या बाबांना घाणीतून बाहेर काढून दुसऱ्या स्वच्छ ठिकाणी ठेवलं होतं , म्हणून मला ते जुन्या ठिकाणी दिसले नाहीत..!… क्या बात है…!
मी सुखावलो होतो… मी येईपर्यंत जीव सोडू नका, असं मी माझ्या बापाला सांगून आलो होतो…. आज माझ्या बापानं माझा शब्द पाळला होता….मी खूप आनंदी होतो….
आज मी ऍम्ब्युलन्स आणली होती…. माझा बाप आज जिवंत आहे या आनंदात…. त्यांनी माझा शब्द पाळला या खुशीत, मी मस्त राजेश खन्ना स्टाईलमध्ये गाडीतून टुणकन खाली उडी घेतली… रजनीकांत स्टाईलने मी गाडीची किल्ली माझ्या बोटाभोवती फिरवत, बच्चन स्टाईलने चालत बाबांजवळ पोहोचलो … !
हो…. माझ्या बापाने आज शब्द पाळला होता…. मी येईपर्यंत तो जगलेला होता… ! निसर्गाने त्यांना जगवलं होतं….
मी लय खुश होतो राव …. इलेक्ट्रिकच्या खांबाच्या आधाराने या बाबांना बसवून आधी मी या बाबांची दाढी कटिंग केली… इलेक्ट्रिकचा खांब लाईट द्यायला नाही, परंतु कोणाच्या आयुष्यात प्रकाश पाडायला आज प्रथमच उपयोगी आला असावा….!
माझ्या अंगावर ॲप्रन ….गळ्यात स्टेथोस्कोप आणि फुटपाथवर बसून मी रस्त्यावरच्या गलिच्छ दिसणाऱ्या माणसाची दाढी करतो आहे….
मला पाहणाऱ्या अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं…! हा नेमका डॉक्टर आहे की न्हावी आहे ???
मी मात्र डॉक्टर आणि न्हावी या दोन तीरांच्या मध्ये असलेल्या “माणूस” नावाच्या “पात्रात” डुंबून, न्हाऊन निघत होतो…. ! असो….
यानंतर संडास आणि लघवीने भरलेले कपडे काढून मी फेकून दिले…. बाबा आता पूर्ण उघडे – नागडे झाले रस्त्यावर…. ते थोडे शरमले…. ! नागड्या बाबांना पाहून, इथे मला माझ्या मुलाची, सोहमची आठवण झाली, जन्मला तेव्हा नर्सने तो असाच उघडा नागडा माझ्या ओंजळीत त्याला दिला होता…. !
आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!!